व्हेज फ्रँकी

Submitted by मंजूडी on 23 September, 2011 - 05:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पोळीसाठी -
मैदा - पाऊण वाटी
गव्हाची कणिक - अर्धी वाटी
चमचाभर तेल
चवीप्रमाणे मीठ
कोमट पाणी

पॅटीसांसाठी
मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे - चार ते पाच
गरम मसाला - एक चमचा
आमचूर पावडर - एक चमचा
लाल तिखट - एक ते दीड चमचा
मीठ चवीप्रमाणे

फ्रँकी देताना
मोठे लाल कांदे - दोन (खूप बारीक चिरून नको, मध्यम जाडसर कापून घ्या)
व्हिनेगर - तीन ते चार चमचे
सोया सॉस - एक - दोन चमचे
चाट मसाला - लागेल तसा
हिरव्या मिरच्या - दोन (बारीक तुकडे करून) - ऐच्छिक

क्रमवार पाककृती: 

१. मैदा आणि कणिक एकत्र करून तेल, मीठ, गरम पाणी घालून पोळीपेक्षा किंचीत सैल कणिक भिजवून घ्या. अर्धा तास झाकून ठेवा. नंतर कणिक चांगली मळून घेऊन पराठ्याइतपत जाडसर पोळ्या लाटून तव्यावर दोन्ही बाजूंनी शेकवून घ्या.

२. उकडलेले बटाटे सोलून हातांनीच छोटे छोटे तुकडे करून घ्या. पूर्ण गुळगुळीत मॅश करू नका, खाताना मधेमधे किंचीत फोडी तोंडात लागणं अपेक्षित आहे. त्यात मीठ, तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर घालून व्यवस्थित मिसळून घ्या. कबाबांसारखे लांबुळके आकार देऊन तव्यावर किंचीत तेलावर शेकवून घ्या. खमंग परतवू नका. वळलेला कबाब फुटू नये म्हणून फक्त शेकवून घ्यायचे आहे.

३. सोया सॉस आणि व्हिनेगर एकत्र मिसळून घ्या. आवडत असल्यास त्यात हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे घाला.

४. शेकवून घेतलेली पोळी गरम तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्या. पोळी तव्यावर असतानाच त्यावर एक - दीड चमचा सोया-व्हिनेगरचे मिश्रण लावून घ्या. तयार केलेला कबाब, मसाला डोश्यातल्या मसाल्याप्रमाणे व्यवस्थित चपटवून पोळीवर बसवा. दोन चमचे चिरलेला कांदा त्यावर घाला. पूर्ण पोळीवर चमचाभर चाट मसाला भुरभुरवा. पोळीची घट्टा गुंडाळी करून टिश्यू पेपर लावून गरम गरम खाण्यास द्या.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ फ्रँक्या होतील.
अधिक टिपा: 

१. पोळीभाजीच्या गुंडाळीला 'फ्रँकी' हे गोंडस नाव आहे.
२. टिब्समधे व्हेज फ्रँकी मिळते त्यात हे असे बटाट्याचे कबाब वापरतात. हाताशी भरपूर वेळ असेल तर बटाट्याच्या मिश्रणाऐवजी अंजलीचे व्हेज कबाब फ्रँकीसाठी करा. शाही फ्रँकी होते.
३. आपल्या आवडीप्रमाणे पनीर, तोफू, मटार किंवा कुठलेही कबाब इत्यादी सारणे फ्रँकीसाठी करता येतील. मामीचे आलू चालवूनही वापरता येतील.
४. पोळी पूर्ण मैद्याची केली तर काही वेळा तेल सोडून भाजताना चिवट होण्याची शक्यता असते. म्हणून त्यात मऊपणा येण्यासाठी कणिक मिसळलेली चांगली.

माहितीचा स्रोत: 
टिब्सच्या वेगवेगळ्या दुकानातले आचारी आणि फ्रँकी घरी करता यावी म्हणून केलेले अनेक प्रयोग.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा!!! धन्स मंजू. मी कधी घरी केली नाहीयेत फ्रँकी. पण आमच्यात आवडतात सगळ्यांना. आता करून बघेन. Happy

मी आता पर्यंत बाहेरची कोणतीच फ्रँकी खाल्ली नाहीए, त्यामुळे हा प्रकार कसा लागेल चवीला याविषयी उत्सुकता आहे.

मी घरगुती फ्रँकी करते तेव्हा त्यात घरातील कोणतीही कोरडी भाजी / उसळ, कोरडी चटणी, पनीर भुर्जी / स्वीट कॉर्न भुर्जी असे स्टफिंग घालते. अगोदर २ पोळ्या / फुलके किंचित तूप/ तेल/ लोण्यावर हलकेच भाजून घेते, त्यांच्या एकेका बाजूला तिखट / मिरपूड, मीठ (हवे असल्यास) भुरभुरून घेते. तिखट मीठ लावलेल्या बाजूवर भाजी / उसळीचं स्टफिंग घालून त्यावर दुसरी पोळी लावते. दुसर्‍या पोळीची तिखट भुरभुरलेली साईड भाजीच्या बाजूला असेल. पुन्हा ही स्टफ रोटी दोन्ही बाजूंनी शेकते. त्यांची वळकटी करते, त्यावर हवं असेल तर सॉस / शेव/ चिरलेला कांदा - टोमॅटो असं भुरभुरते, सुरीने कापते व गट्टं स्वाहा!

मंजू.. एकदम परफेक्ट रेसिपी...

मुंबईहून पुण्याला येताना जो पहिला फूड मॉल आहे तिथे अशीच फ्रँकी मिळते... माझी फेव्हरेट डीश... एकदम जबरी लागते...

सहीच!! करुन बघेन...मी एकदा श्रावणी घेवड्याच्या भाजीचं स्टफिंग असलेली फ्रँकी खाल्ली आहे.ती पण मस्त लागते Happy

मस्त. Happy

न्युयॉर्क सिटीत रुमालीमध्ये रोल मिळतात ते साधारण असेच असतात.
चना-मसाला रोल: ह्यात भजी (भज्यांचीच चव असते), नुसतच मीठ लावून शिजवलेले छोले, कच्चा कांदा, लेट्युसचं फिलिंग असतं.
पनीर टिक्का रोल: ह्यात टिक्का पनीर, रोस्टेड भाज्या- बहुतेक करुन सिमला मिरची, कांदा, लेट्युस असं फिलिंग असतं.
आलु टिक्की रोल: हे सेम तू कृती दिली आहेस तसं बनवत असणार. सोया सॉस नसतो मात्र कशातच.

वा वा मस्त आठवण. आजची आर्डर नोंदवते लगेच Happy

मस्त झाला. मी सोया-विनेगर वापरले नाही. त्याऐवजी टोमॅटो सॉस पसरला, त्यावर मोझेरेला चिज किसले, वर भाजीची पॅटी टाकली, कांदा टाकला (कोबी नव्हता नाहीतर तोही टाकला असता), परत थोडे चिज आणि गुंडाळी करुन कापुन दिली... मुलीला आवडली. फक्त मुळ पोळी अजुन पातळ लाटायला हवी होती असा रिमार्क मिळाला. पुढच्या वेळेस इंप्रुवमेंट करता येईल. Happy

कणिक घालायची आयडीया चांगली आहे. बाहेरची फ्रँकी खाता खाता थोडी वातड होते हे मुलीने मान्य केले पण तेच घरात मात्र तशी झाली असती तर लगेच नापसंतीचा शिक्का उठला असता. कणकेमुळे वातड होत नाही.