प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे" - बेफ़िकीर

Submitted by बेफ़िकीर on 6 September, 2011 - 02:20

"कारण अजून याचं कशात काही नाही"

जिच्याबरोबर लहानपणापासून खेळत होतो त्या शेजारच्या मुलीचे व माझे वय लग्नाचे झाल्यावर मी मला नोकरीही लागलेली नसताना तिला प्रपोझ केल्यानंतर चक्क होकारही मिळाला, पत्रिकाही 'निम्या' जुळल्या आणि लग्नाची बैठक, साखरपुडा हे विधी उरकून प्रत्यक्ष कार्यालयात जेव्हा समरप्रसंग काही मिनिटांवर येऊन पोचला तेव्हाही माझ्या कानात होऊ घातलेल्या सासूबाइंचे हेच वाक्य कर्कश्शपणे घुमत होतं! 'अजून याचं कशात काही नाही'. चांगला 'नुकताच अभियंता' होतो, एक नोकरी मिळण्याची फिक्कट शक्यता निर्माण झालेली होती आणि दोन्ही घरची आर्थिक परिस्थिती तशी समानच होती तरीही सासुबाई जमेल तेव्हा जमेल त्याला हेच वाक्य ऐकवत होत्या. 'अजून याचं कशात काही नाही'. एकदा मी वैतागून ते वाक्य मित्रांना ऐकवलं तेव्हा स्फोट झाल्यासारखे सगळे हसले. तेव्हा मला त्या विधानात दडलेला दादा कोंडकीय अर्थही जाणवल्यामुळे तर मी 'सगळ्यात सगळं आहे' हे दाखवण्याची एकही संधी सोडायची नाही असे ठरवले.

मुलाला अजून नोकरी नाही. 'सेटल' झाल्यावर मग बघता येईल, तोवर नुसतंच लग्न करून ठेवू, फार मोठ्या प्रमाणावर करण्याची काही गरज नाही हे सासूबाईंचे आवडते मुद्दे होते. मात्र 'नुसतंच लग्न करून ठेवू' याबाबत त्या ठाम होत्या, हेही कमी नाही.

"१०.३२ झाले"!

वरपक्षात उपस्थित असलेल्या माझ्या मामेबहिणीने हे विधान 'अबतक छप्पन' झाले अशा स्वरात उच्चारले व ती माझ्यापेक्षा बरीच मोठी असल्याने ते विधान मला (अबतक छप्पन तोवर प्रकाशित झालेला नसल्याने) 'तीन तेरा' झाले असे ऐकू आले. दोन भाऊ व एक मित्र यांनी माझ्या टायशी जी झटाझट केली ती दुष्काळग्रस्त किंवा पूरग्रस्त भागात हेलिकॉप्टरमधून अन्नाच्या पुड्या फेकल्यावर लोक करतात त्याच्याशी मिळती जुळती असल्याचा निष्कर्ष एका लांबच्या नातेवाईकाने ऐकवला. या विधानानंतर तो लांबचा वाटू लागला की काय हे लग्नाला अनेक दशके लोटल्याने मला नीटसे आठवत नाही. 'अनेक दशके' अशी संज्ञा कुटुंबापुढे उच्चारल्यास सजा-ऐ-मौत ठरलेली असल्याने येथेच नोंदवत आहे. 'ब्लेझर असल्याने बेल्टची गरजच नाही' असे एक मत पुढे आले. बेल्टला माझ्या त्यावेळच्या बारीक कंबरेभोवती विळखा घालण्याइतकी भोकेच नसल्याचे १०.३० ला लक्षात आलेले होते व बेल्टसकट बोहला की बेल्टशिवाय बोहला असा प्रश्न १०.३१ ला पडला होता.

मी एक वस्तू झालो होतो.

कोणीही यावे, काहीही नीट करावे, नीट केल्याच्या अभिनिवेषात जे मुळात नीट होते तेही बिघडवावे आणि जग जिंकल्याच्या आविर्भावात वरपक्षातून बाहेर जावे.

"चला"

'चला आता' हे विधान कोणताही माणूस करत होता व करू शकत होता. वय वर्षे दोन पासून ते कार्यालयातील हेल्परचा हेल्पर यापैकी कोणीही कुणालाही 'चला आता' म्हणू शकत होते.

त्यातच वरपक्षात भूकंप झाला. हा प्रकार खरच कोणाच्याही लग्नात होऊ शकणार नाही. येथे दोन्ही पक्ष एकमेकांना कित्येक वर्षे ओळखत असल्याने वरपक्ष कोणता आणि वधूपक्ष कोणता हेच समजेनासे झालेले होते. त्याचाच गैरफायदा घेत सासूबाई नावाची एक 'फक्त जीभ हा अवयव व बोचरेपणा हा स्वभाव' प्राप्त झालेली व्यक्ती वरपक्षात उगवली आणि हल्लकल्लोळ माजला पण तो फक्त माझ्या एकट्याच्याच मनात! बाकीच्यांच्या दृष्टीने 'वधुची आई' हा किरकोळ व नगण्य घटक होता.

"अरे काय भूषण? साडे दहा वाजून गेले, अजून कशात काही नाही"

हे वाक्य डायरेक्ट मलाच! माझी आई, एक मावशी, एक बहिण व तो 'लांबचा' खिदळले. मी 'झालेच, झालेच' करत दोन पावले पुढे टाकली.

ते 'अजून कशात काही नाही' हे विधान मला अजूनही कशात काही नसताना अचानक मध्यरात्री स्वप्नात ऐकू येते आणि मी दचकून जागा होतो.

दोन जिने, एक दार आणि लांबवर असलेले स्टेज! हा प्रवास मी दोन मित्र, दोन भाऊ व एक करवली यांच्या पकडीत एखाद्या कैद्यासारखा केला. फक्त माझ्या डोक्यावर चेहरा झाकणारी टोपी नसून मुंडावळ्या होत्या. या मुंडावळ्या बांधताना मला पोळ्याच्या दिवशी बैलांना कसे वाटत असेल याची कल्पना आलेली होती. दुतर्फा लोक माझ्याकडे बघत हासत होते. लग्न हा एक आनंदादायी सोहळा आहे म्हणून हसत होते हा माझा गैरसमज होता. 'आपल्यातला आणखीन एक अडकला' हा तो सुप्त असुरी आनंद होता.

"मुलगा कुठे आहे?"

हा प्रश्नही आता कोणीही कोणालाही विचारत होते. मी बोहल्यावर चढल्यावर तर गुरुजींनी 'हाच वर ना?" असेही विचारले. त्यावर कोणीतरी 'अहो पण मुलगी कुठे आली आहे अजून' असे विचारल्यावर पुन्हा सासूबाईंनी ब्रह्मास्त्र फेकले.

"वधूला मामा आणतो, पण आधी मुलगा तर यायला पाहिजे ना? अजून कशात काही नाही"

हे वाक्य मी आजवर त्यांनाच काय, माझी गाडी रोज सकाळी धुणार्‍या पोर्‍यालाही म्हणू शकलेलो नाही. त्या कशा काय सहज म्हणायच्या काय माहीत!

लांबून एक जमाव येताना दिसला. मला मिळाली त्यापेक्षा अधिक मानवंदना दुतर्फा उभ्या असलेल्या खादाड नागरिकांकडुन त्या जमावाला मिळत असल्याने त्यात कोणीतरी नक्कीच वधू असणार हे माझ्या कशात काही नसलेल्या भाबड्या मेंदूला जाणवले.

स्टेजवर अमाप गर्दी झाली आणि काही उत्साही 'डोंबांनी' अंतरपाट धरला. खासगीत म्हणून सांगतो की त्या अंतरपाटाने ठेवलेले अंतर आजही तसेच असते तर मी माझा प्रत्येक सदरा सुखी माणसाचा सदरा म्हणून लिलावात काढला असता. गुरुजी मागच्या जन्मी गर्दभयोनीत असावेत. तसेच, गुरुजींचा भूतकाळ कळल्यामुळे स्वतःचाही भूतकाळ आठवलेल्या काही महाकाय प्रौढा आता मंगलाष्टके रेकू लागल्या. एकही घटना मंगल नसते ते मंगलकार्य ही व्याख्या माझ्या मनात दृढ होऊ लागली. नाकातोंडावर काहीतरी फटाफट आपटू लागले तसे कळले की या अक्षता असाव्यात! ताराबलं चंद्रबलं सुरू होईपर्यंत कार्यालयात इतके जण रेकले होते की रमारमणच्या बाहेरचे ट्रॅफीक दचकून ब्लॉक झाले असे एक जण म्हणाला असे मी हिच्यासमोर आजही मुद्दाम खोटेच सांगतो.

अंतरपाट धरणारे 'खांदे बदलतात' तसे बदलत होते असा अभद्र विचार खरे तर नोंदवू नये, पण भावनांचा कोंडमारा असह्य झाल्यावर माणसाने काय करावे?

करवली म्हणून काही बहिणी हासत उभ्या होत्या व त्यांच्या चेहर्‍यावर 'आपला भाऊ आता मार्गी लागला' असे विचार होते. वर पंखा होता पण तो लावल्यास समया, निरांजने विझतील अशी धमकी मिळत होती. उकाड्याने हैराण झालेली माणसे गुरुजींकडे हिंस्त्र नजरेने पाहू लागली तेव्हा शेवटचे शुभमंगल झाले. अंतरपाट खाली आला आणि नजरानजर झाली. एकमेकांना हार घालणार तेवढ्यात टाळ्या वाजू लागल्या. टाळ्या का वाजत आहेत व याच कार्यालयात आपल्या लग्नापेक्षाही महत्वाचा असा काही समारंभ चालू आहे का हे मी तपासू लागलो. चुकून मी माझेही हात टाळ्यांसाठी हालवणार तेवढ्यात सासूबाइंना वाटले की.....

... हा बहुतेक 'हार सत्काराचा' आहे असे समजून नाकारत आहे.

"हार घालायचा असतो लग्नात..... नाही कसा म्हणतोस??"

"नाही नाही... घाला ना... ए घाल गं"

मी सरळ नुकत्याच झालेल्या पत्नीलाच म्हणालो... ते पाहून खरे तर मला उद्देशून पण दोघांना बोलतीय असे दाखवून सासूबाई म्हणाल्याच...

"आत्ताशिक लग्न लागलंय... व्यवस्थित बोला एकमेकांशी दोघे... अजून कशात काही नाही"

-'बेफिकीर'!

=======================================

१. मला प्रचि देता येत नाहीत म्हणून देऊ शकलो नाही.

२. ही तळटीप व टिंबे शब्द म्हणुन मोजले जाणार नाहीत अशी नम्र आशा (डोमा) (दिवा)

३. 'अजून कशात काही नाही' हे त्यांचे पेटंत वाक्य आम्हा मित्रात फेमस झलेले होते, त्या एक्स्टेन्टपर्यंत ही सत्यकथा आहे. Happy

४. सहभाग सामील करून घेतल्याबद्दल खूप आभार!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'अजून याचं कशात काही नाही'. एकदा मी वैतागून ते वाक्य मित्रांना ऐकवलं तेव्हा स्फोट झाल्यासारखे सगळे हसले. तेव्हा मला त्या विधानात दडलेला दादा कोंडकीय अर्थही जाणवल्यामुळे तर मी 'सगळ्यात सगळं आहे' हे दाखवण्याची एकही संधी सोडायची नाही असे ठरवले.

==============================================

वरपक्षात उपस्थित असलेल्या माझ्या मामेबहिणीने हे विधान 'अबतक छप्पन' झाले अशा स्वरात उच्चारले व ती माझ्यापेक्षा बरीच मोठी असल्याने ते विधान मला (अबतक छप्पन तोवर प्रकाशित झालेला नसल्याने) 'तीन तेरा' झाले असे ऐकू आले. दोन भाऊ व एक मित्र यांनी माझ्या टायशी जी झटाझट केली ती दुष्काळग्रस्त किंवा पूरग्रस्त भागात हेलिकॉप्टरमधून अन्नाच्या पुड्या फेकल्यावर लोक करतात त्याच्याशी मिळती जुळती असल्याचा निष्कर्ष एका लांबच्या नातेवाईकाने ऐकवला. या विधानानंतर तो लांबचा वाटू लागला की काय हे लग्नाला अनेक दशके लोटल्याने मला नीटसे आठवत नाही. 'अनेक दशके' अशी संज्ञा कुटुंबापुढे उच्चारल्यास सजा-ऐ-मौत ठरलेली असल्याने येथेच नोंदवत आहे.
======================================

अंतरपाट धरणारे 'खांदे बदलतात' तसे बदलत होते असा अभद्र विचार खरे तर नोंदवू नये, पण भावनांचा कोंडमारा असह्य झाल्यावर माणसाने काय करावे?

==================================

"आत्ताशिक लग्न लागलंय... व्यवस्थित बोला एकमेकांशी दोघे... अजून कशात काही नाही"

========================================

फार हसलो.... जबरदस्त चितारलं आहे तुम्ही. धन्यवाद. Happy

.

व्वा .... बेफिकीरजी..... मस्तच.

“मी बोहल्यावर चढल्यावर तर गुरुजींनी 'हाच वर ना?" असेही विचारले.”
“या मुंडावळ्या बांधताना मला पोळ्याच्या दिवशी बैलांना कसे वाटत असेल याची कल्पना आलेली होती.”
“गुरुजी मागच्या जन्मी गर्दभयोनीत असावेत.”
“लग्नापेक्षाही महत्वाचा असा काही समारंभ चालू आहे का हे मी तपासू लागलो. चुकून मी माझेही हात टाळ्यांसाठी हालवणार”
...... या आणि अशच अनेक खुसखुशीत, खुमासदार वाक्यांनी
हे ’प्रवासवर्णन’ खूपच रंजक झालंय.