प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे" - जाईजुई

Submitted by जाईजुई on 5 September, 2011 - 14:15

"चला बाईसाहेब, बोलावलय"
"मला? पण ती आत आहे. शाल आणि मु...?"
"शाल घे तशीच. आता बाहेर सगळे वाट बघत आहेत"
"इथे कुठे?"
"ओ काका, ती माझी बायको आहे!"
ढण्याण.. ढण्याण.. ढण्याण.. !!!!

नाही! हा झी मराठीवरच्या गळिकांमधला सीन नाही आहे, ही कुण्या एकाची "विवाह गाथा" आहे!
(तुम्ही कंस वाचा मग गळिकांचा "फील" येईल.)

"वाह वाह रामजी! जोडी क्या बनाई" हॉलमध्ये पाय ठेवलेल्या सगळ्यांच स्वागत छोटे छोटे सलमान आणि टिचक्या माधुरीज करत होत्या. थंडगार हॉलमध्ये पैठण्या, शरारे, टाय, झब्बे, कुर्ते मिरवत होते.
(उगाच इथून तिथे करणारे एक्स्ट्रा)

वेगवेगळ्या गटात गटागटाने सिक्सर मारले जात होते.

"अग्गबाई, नविन का हा लक्ष्मी हार? ((उषा नाडकर्णी)स्वगत : आता सासूचा कोणता दागिना मोडलान हिने))"
"हो ना. ह्या लग्नासाठी म्हणून खास केलाय माझ्या आईने ((प्रिया मराठे)स्वगत: तुम्ही नुसत्या कुचाळक्या(च) करा) तुम्ही नविन साडी (तरी) घेतली का?"

"छावेहो, हे काय लिहिलय ? समीर वेड्स वेडा! फी: खि: खी:"

"अहो कर्नाटकात आघाडीये भाजपाची, महाराष्ट्रातपण घेतेय बघा"

"एवढ्या पाठोपाठचे मुहुर्त काढायच काही अडल होतं का? आमच्या विशुच लग्न आताच चार दिवसापूर्वी झालं ना? आम्हाला आवरायला म्हणून वेळच मिळाला नाही. होक्का नाही ग निशा?" (कुठच्याही सिरीअलची साईड वॅम्प)
"निशा ? (स्वतःमध्येच हरवलेली हिरवीण)"
"अं? हो ना !"
एवढ्या सगळ्या आवजाच्या भेळीतून नव्या सासूचे शब्द गाठी पडतील तर शपथ!
"(सुहास जोशी टोन)विशू कंटाळली असेल रे ती सारखी सासूच्या पदराला धरून. जरा हॉलमध्ये एक चक्कर टाका. त्या निमित्ताने तिची ओळख होईल. नाही तरी वन्संच्या घरच्या ह्या लग्नामुळे आमच्या कार्याला कोल्हापूरला कोणी विशेष आल नव्हत"

पडत्या फळाची आज्ञा घेऊन विशाल निशाला म्हणजे आपल्या नव्या नवरीला घेऊन तिथून सटकला. (पवित्र रिश्ताआआआआआआआ) तसा तो आणि निशा आता एकमेकांना चॅट, फोन, मेल्समुळे गेले सात-आठ महिने ओळखत होते. पण चारच दिवसापूर्वी त्यांच कोल्हापूरला लग्न झालं तेंव्हापासून दोघांनाच असा निवांत वेळ मिळतच नव्हता. लग्नाच्यादिवशी कोल्हापूरातून निघताना.. "बाबुल की दुवाए.." स्टाईल रडारड.. मग सत्यनारायण पूजा आणि मग वेदाचं म्हणजे त्याच्या आत्तेबहिणीच लग्न! आज संध्याकाळी लग्नानंतर एचएमला जायला विमानात बसू मग ........

"फ्रेश होऊन येऊ का रे जरा? आपली खोली कुठली आहे? ए, काय बघतोयस?" (माझिया प्रियालाआआ)

'तुम इस पिली सारीमें कितनी हसीन लग रही हो' वै. राजकुमार छापाचा डायलॉग आठवेपर्यंत निशाने "वधु - पक्ष" पाटी लावलेली खोली गाठली.

वेदा नीट लक्ष देऊन गौरी हर पूजत होती. निशा बाथरूममधून फ्रेश होऊन येऊन साडी नीट करताना आरशातून तिरपे कटाक्ष टाकत वेदाच निरीक्षण करत होती. "उसकी हेअरस्टाईलसे.. मेरी वाली अच्छी हैं.." टाईप्स काही तरी!

"तुच थांब आता हिच्याबरोबर. मी आमच्या शलूच्या सासूबाईंना जरा भेटून येते." म्हणून वेदाबरोबर बसलेल्या काकू चक्क सटकल्या.. बहुदा त्यांच्या धाकाने लक्ष देऊन पूजा करत बसलेली वेदा टुणकन उठली आणि काही बोलायच्या आत, "मी पण जरा फ्रेश होऊन येते. माझी शाल आणि मॅचिंग मुंडावळ्या धरशील का?"

निशाने ती नीट घडी करून हातावर धरली. आपल्या हातभर बांगड्या कोपरापर्यंतची मेहंदी बघून तिला आपल्या लग्नाची नि मग आई बाबांची आठवण आली. आई बाबा पोहचणरच होते मुहुर्तापर्यंत, लेकीच्या सासरचे पहिले कार्य ना? आणि मग तिला विमानातळावर सोडायला म्हणून! आई .. बाबा! (या गोजिरवाण्या घरातमधले दक्षाचे आई बाबा)

आणि तेंव्हाच दार वाजवून टोपीवाले दोन गृहस्थ आत आले.
(ढण्याण.. ढण्याण.. ढण्याण.. !!!!)
गृहस्थ कसले? आजोबाच म्हणायच (पण शास्त्रीबुवा नव्हेत)!
"चला बाईसाहेब, बोलावलय"
"मला? पण ती आत आहे. शाल आणि मु...?"
"शाल घे तशीच आता बाहेर सगळे वाट बघत आहेत"

निशा सगळ्या सामानासकट आपल्या आईबाबांना नि नवर्‍याला भेटायला खोलीतून बाहेर पडतेय.
(बाथरूमच्या दरवाज्याचे तीन वेगवेगळ्या कोनातून फोटो.. ढण्याण.. ढण्याण.. ढण्याण.. !!!! तिचा खोलीत मागे वळून बघतानाचा क्लोज अप - ढण्याण.. ढण्याण.. ढण्याण.. !!!!)

हॉलमध्ये आंतरपाट धरलेला आणि हौशी गायक एकापेक्षा एक मंगलाष्टका माईकमधून म्हणत आहेत.
"पित्याने दिली वेदा कामधेनु"
आजोबा द्वयी निशाच्या दोन्हीबाजूना चालत चालत तिला स्टेजकडे नेत आहेत.
आता इथे कुठे असेल विशाल?
"चल पुढे चल"
"इथे कुठे?"

आपल्या नवर्‍याला तिथे तो नाहीये हे पाहून (?) निशाने कावर्‍या बावर्‍या नजरेने शोधतेय. आजोबा तिला पाटाच्या दिशेने पुढे जायच्या सुचना करत आहेत. निशा काय बोलतेय ते (सगळे सायलेंट मोड, स्लो मोशनमध्ये असल्याने) कोणाला ऐकूच येत नाहीये. आंतरपाटाच्या दुसर्‍याबाजूला समीर हातात माळ घेऊन (रेड्डि का? मोड मध्ये) उभा आहे.

तिथे विशाल स्टेजच्या दुसर्‍याबाजूला निशाला शोधतोय. निशाचा पाय आता पाटावर (पक्षी : बोहल्यावर) एवढ्यात (पवित्र रिश्ताआआआ)

"ओ काका, ती माझी बायको आहे!" मंगलाष्टक म्हणणार्‍या काकूंच्या "सुकन्या वेदा वर समीर" च्या वरच्या पट्टीत माईकमधून अख्ख्या हॉलला नीट ऐकू जातं.

मग शांतता.. सगळ्या गर्दीतून निशाकडे येऊ पहाणारा विशाल आणि त्याच्याकडे (तीन वेळा) वळलेली वेदा (पवित्र रिश्ताआआआआआआ)! हातातून गळून पडलेली शाल नि मुंडावळ्या!

आंतरपाटामागून समीर "नाही नाही माझीच होणारी बायको आहे ती"

" नाही हो, मी ह्यांची बायको आहे. मला कशाला इथे आणलय? विशाल"

(स्टेजवरच्या कोंडाळ्याबाहेर आता नुसता कलकलाट)

"ए, मुलाने मुलीला बघायच नसत लग्नाआधी" - भो काकू

"आई" - सध्याचा नवरदेव!

"आहो, ही कोण आणलीत? आम्हाला फोटो पाठवला ती मुलगी आणि सकाळपासून विधीला बसलेली मुलगी ही नव्हतीच. वेगळीच होती"

"मी नाही आहे हो मुलगी!"

"आऑ?"

"अहो काकू, ही वेदा नाहीये मूळी! हिने आधीच मंगळसूत्र घातलयं"

"काय?"

"नन्दू मामा, किच्चू मामा कोणाला आणलत इथे? अहो, ही आपली वेदा आहे का?"

"मला काय माहीत? आम्ही सटीसमाशी भेटतो ह्या लेकींना. तरी मी हिला विचारलं. तुझी मामीच म्हणाली की पिवळी झिरमिळ्याची साडी नेसून, शाल घेऊन खोलीत असेल तीच आपली वेदा असणार ना?"

"इश्श्य, अहो, झिरमिळ्या नव्हे, जरदोसी म्हणाले होते मी" नवर्‍याचा पूर्ण मोरू नाही केला तर बायको कसली?

"ह्या मुलीचा बुचडा, चुडा, शाल, वै. सगळं पाहिलं ना मी नीट!"

"शी! हेअरस्टाईल म्हणा हो आणि ही आपल्या वेदापेक्षा कित्ती डावी आहे"

"वन्स, व्याह्यांसमोर हिच का शोभा करायला बोलावलत आम्हाला? माझी सून डावी? नुसता अमेरिकेला जाऊन आलेला मुलगा म्हणून तुम्ही घाईघाईत कोणालाही रावसाहेब म्हणताहात ते? आणि आमच्या ह्यांना मामाचा मान दिल्ला असता तर असं झालचं नसतं"

एवढ्यात खोलीत आपली शाल शोधत जरदोसीची पिवळी साडी नेसलेल्या वेदाला तिचा भाऊ घेऊन येतो.

मुहुर्त चुकण्यापूर्वी समीर आणि वेदाच कार्य संपन्न होतं आणि त्याच वेळी खोली ते बोहल्यापर्यंत (गेल्या चार दिवसात) दोनदा प्रवास केलेली निशा पिवळ्या झगमगणार्‍या साडीत, विशालचा हात गच्च धरून उभी असते. (सारे कळत नकळतच घडते, सारे..)

त. टी. - प्र.चि. शोधून टाकण्यात येतील. सध्या रूमाल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

Lol सही!

छान Lol