अभिजीत वैतागून बसला होता. अजून चार वाजले पण नव्हते आणि दिग्दर्शक आझमी पॅकप करण्याची बात करत होता. बात करायला त्याच्या बाचं काय जातंय. चॅनलवाली काजल मॅडम आझमीला बडबडणार नव्हती. दिवसाभरामधे अवघे चार सीन शूट झालेले बघून काजलचा बीपी चारशेपर्यंत चढलाच असता.
"स्पॉट, एक चाय देना" अभिजीतने ओरडून सांगितले. अर्थात सेटवरचा गोंधळ इतका होता की कुणालाच ते ऐकू गेलं नसतं. तितक्यात सीरीयलची हिरविण मेनकामॅडम मेकप रूममधून बाहेर डोकावून गेलीच. टवळीला दुसर्या कुठल्याच सीरीयल मधे चान्स देत नाहीत पण म्हणून ही मुरकायचे नखरे काही कमी करत नाही...
इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. काजलमॅडम नाव मोबाईलवर दिसताच तो जवळ जवळ उडालाच.
"आता कशाला केला या बयेने फोन??" पुटपुटतच त्याने कॉल घेतला.
"अभिजीत." हॅलो वगैरे बोलायची पद्धती आता संपुष्टातच आलेली आहे. "कितना सीन हुआ?"
"काजल, आत्ता एक शिफ्ट संपलीये. पाचवा सीन चालू आहे. अजून दोन सीन होतील"
"रब्बिश, अजून चार सीन घ्यायला सांग त्या आझमीला. आणि लवकरच एक नविन कॅरेक्टर घालायचं सीरीयलमधे. त्याची बॅकग्राऊंड तयार करायला सांग आजच्या एपिसोडमधे" काजलने फोन कट केला.
अभिजीत हातातला फोन जवळ जवळ फेकूनच देणार होता. साला.. काय आयुष्य आहे आपलं... गेली पंधरा वर्षं या लाईनमधे स्ट्रगलच स्ट्रगल केला आणि आता कुठे जरा चांगली पोझिशन मिळत होती तर ही बया आणून बसवली आपल्या डोक्यावर. बँकग्ग्राऊंड कोण बनवणार? रायटर की डिरेक्टर? आणि कोण कॅरेक्टर? बुवा आहे का बाई ते तरी सांगायचे कष्ट घ्यायचे होते. इतक्यात स्पॉटने चहाचा कप आणून दिला.
"साब, आता काय करायचं?" आझमी त्याच्या बाजूच्या खुर्चीत बसत म्हणाला.
"नेक्स्ट सीन. काजलमॅडमचा फोन होता, पुढचे पण सीन घेऊन टाक."
आझमीने त्याच्याकडे दयाद्र नजरेने पाह्यलं. एखाद्या लहान बाळाला गणित समजावल्यासारखा बघत तो म्हणाला.
"आता सगुणाच्या लग्नाचा सीन घेतला. पुढचा सीन रायटरने सगुणाच्या एक्स बॉयफ्रेंड जेलमधून पळून जातो असा घेतलाय. सेट डीझायनरवाल्याने बंगल्याचाच सेट अजून चार दिवस कायम ठेवायचा ठरवलाय. आता मी काय करू?"
अभिजीत हसला. काय करू म्हणून मलाच काय विचारतोस?
"सगुणाच्या बिदाईचा सीन घेऊन टाक."
"पण रायटरने तो सीन अजून दिला नाहिये"
अभिजीत मूग गिळल्यासारखा चहा प्यायला. अरे साल्या बिदाईच्या सीनला रायटर लागत नाय रे. बादलीभर ग्लिसरीन लागतं... सांग कधी कळणार तुला...
सांग कधी कळणार तुला.. अभिजीतच्या मनामधे गाण्याची धून आपोआप वाजायला लागली.
भाव माझ्या मनातला... आज तरी ती येइल का सेटवर.. हा एकच प्रश्न सतत त्याच्या मनामधे नाचत राहिला. खरंतर जेव्हापासून तिला बघितलं होतं तेव्हापासून त्याच्या मनामधे तिच्यासाठी पुष्कळ गाणी वाजून गेली होती. अगदी त्याच्या मनाचा एफेम रेडिओ झाला होता. सावरी..सावरी... सावरी...जेव्हापासून तिला बघितलं होतं तेव्हापासूनच...
सावरी. आसावरी चित्तरंजन. त्याच्या प्रोड्युसरची मुलगी. अभिजीत भानावर आला. हे प्रकरण आपल्या हातामधले नाही हे त्याला कधीच समजलेले होते. पण काय करणार दिल है के मानता नही... टणॅव, टणॅव...
खरंतर सावरीबद्दल अभिजीतच्या मनात हा विचार यायला आणि सेटवर एक पॉश इंपोर्टेड गाडी येऊन थांबायला एकच वेळ झाला. त्याचबरोबर एक सुगंधाची लकेर सर्व आसमानात पसरली. आणि सावरी गाडीतून खाली उतरली.
अभिजीतचे हृदय जागच्याजागी टणाटणा उड्या मारू लागले. सावरी मेकप रूममधे जाईस्तोवर अभिजीत नजरेने तिचा पाठलाग करत होता.
"आता ही बघणार आहे ही सीरीयल." आझमी म्हणाला. अभिजीतला भानावर यायला अजून पाच क्षण गेलेल. "म्हणजे तो जाड्या येणार नाही रोज?"
"नाही, तो वेगळी सीरीयल बनवतोय, मारूती जमादार डिरेक्टर घेतलाय." आझमी म्हणाला. मारूती जमादारने या आधी ओळीने चार पिक्चर सुपरडुपर फ्लॉप दिलेत.
तितक्यात मेकपरूमाम्धून अभिजीतला बोलावणे आले. सावरी तिथेच असेल या उद्देशाने त्याला भरपूर उत्साह आला आणि तो नाचत नाचत मेकपरूममधे गेला.
"अहो, ऐकलं का?" सावरीच्या या वाक्याने अभिजीत सुपरमॅनसारखा उडाला. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं. सावरीला कॉन्व्हेंट मराठी येत आणि आपलं नाव तिच्या लक्षात नसल्याने तिला आपल्याला अशी आदरार्थी हाक मारलेली आहे. "मेनका कायतरी म्हणतेय. तुम्ही पण म्हणा तिच्यासोबत"
मेनका मॅडम ( हे अर्थातच तिचे खरे नाव नव्हते.) हातातल्या कागदावरचे डायलॉग वाचत होत्या. अभिजीत हताशपणे खाली बसला आणि मेनका सोडून इतराचे डायलॉग वाचायला लागला.
सावरी तोपर्यंत सेटवर निघून गेली. तिथे आझमी सेट डिझायनरला काहीतरी समजावत होता. "हाय.." सावरी त्याला म्हणाली.
"हॅलो मॅडम"
"व्हॉट्स दिस? आझमी, मी तुला कितीवेळा सांगले की मला मॅडम सांगू नका. सावरी सांग ना.." लाडात ती म्हणाली.
"माझ्या लक्षातच राहत नाही. तुम्ही किती वेळा सांगली आपलं चुकलं बोलली तरी..." आझमी हसला.
"आझमी, मी तुला एक विचारू?"
"विचार ना!"
"तू माझ्यासोबत आज येशील? डिनरला?"
आझमी जागच्याजागी धसकला. सावरी आपल्याला डिनरला बोलावते??? तेही इतकं गोड गोड बोलत.. आयला ही पण सीरीयल हातातून गेली का काय?? नक्की विचार काय आहे काय हिचा?
अभिजीत तेच तेच डायलॉग वाचून वैतागला. मेनका मात्र अजून प्रॅक्टिस करू म्हणत होतीच. इतक्यात स्पॉट धावर मेकपरूममधे आला. काजल मॅडम आयेली है, असे सांगून गेला.
मेनका मॅडम अचानक उठून उभी राहिली. आरश्यामधे स्वतःचा मेकप नीट आहे की नाही ते बघितले. आणि अभिजीतला म्हणाली. "अभिजीत, आता तू सेटवर जा. आझमीला सांग मी तासाभरात सीनसाठी येते."
"तासाभरात? पण सेट तयार आहे. तुम्ही पण रेडी आहात. मग हा सीन पटकन घेऊन टाकू. "
मेनका मॅडम एकदम लाजून हसली. "काजलशी मला जरा पर्सनल काम आहे, ते झाले की सीन घेऊ ना.. तू जा ना तवर सेटवर"
अभिजीत चिडून उठला. काजलला दिवसाभरात चार चार सीन शूट करायची घाई आणि ही म्हणे तासाभराने येणार. मेनकाचे काम असून असून काय असणार? चॅनलवाले परत एखादा डान्सचा प्रोग्राम करत असतील त्यामधे हिचे नाव आतातरी येऊ दे म्हणून काजलच्या हातापाया पडायच्या असतील, दुसरे असून असून काय असणार?.
तो उठून बाहेर येऊन बसला. त्याने खिशामधले पत्र पुन्हा काढून वाचले.
सीरीयलसाठी लिहिणार्या तीन चार लोकांकडून त्याने हे पत्र लिहून घेतले होते. सावरीला देण्यासाठी. पत्राची सुरूवातच मुळात "ओ मोरी प्यारी सावरिया" अशी सुंदर होती. आज सावरीला हे पत्र द्यायचेच. आपल्या मनातल्या भावना तिलाच सांगायच्या असे त्याने मनोमन ठरवले होते. हातातले पत्र त्याने पुन्हा खिशात ठेवले आणि तो सावरी जिथे बसली होती तिथे निघाला....
तितक्यात काजल कारमधून खाली उतरली. तिच्या हातामधे एक भला मोठा खोका होता.
***
******************************
अभिजीत धडपडतच उठला. मनोमन शिव्या देत चेहर्यावर मात्र शक्य तेवढे अजिजीचे भाव आणुन तो काजलच्या हातातला खोका घ्यायला धावला.
एवढ्यात त्याच्या हातात खोका न देता तो धप्पकन जमिनीवर टाकुन काजल बद्दकन त्याच्या रिकाम्या झालेल्या जागेवर बसली.
ही अशी अचानक इथे कशी? तरीच मेनका म्हणत होती काजलशी मला जरा पर्सनल काम आहे, म्हणजे तिला माहित असणार ही इथे अशी उगवणार ते. मनातले सर्व प्रश्न गाळत अभिजीत म्हणाला "चार शॉट्स खुप कठीण आहे .."
त्याला मध्येच तोडत काजल म्हणाली "ते सर्व जाउदे आता अभिजीत. तुला आधी बोलले नाही कारण नवी साहेबांबरोबर बोलण झाल्याशिवाय नक्की काहिच नव्हते. पण हा माझा इथला शेवटचा दिवस आहे, अभिजीत"
"म्हणजे.." आनंद कराव की अचानक पडलेल्या कामाबद्दल दु:ख्ख हे न कळतच अभिजीत म्हणाला.
"आणि मला नविन जॉब मिळाला झी मध्ये, मेनकाही येते आहे माझ्याबरोबर नव्या प्रोजेक्टवर. तु पण.."
काजल चाचपत होती असा कष्ट करणारा बकरा बरोबर येत असेल तर कशाला सोडा.
"नेक्स्ट एपिसोडचे काय? " अभिजीतची आता फाटली होती.
"हू केअर्स.. तुला माहितच आहे माझा सेल नम्बर. मेनकाबरोबरच लगबगीने सेट सोडताना काजल म्हणाली.
बघता बघता बातमी पसरली. आजमी आता लवकर सटकायला पाहु लागले. त्यांना थांबवत अभिजीत नवीसाहेबांना कॉल करु लागला. एवढ्यात त्यांचाच फोन वाजला.
"काय अभिजीत चांगलाच दगा मिळाला आपल्याला..", हळु दुखावलेल्या आवाजात नवी म्हणाले. काजलला त्यांनी प्रमोशन दिले खरे पण अभिजीत बद्दल ही बोच त्यांच्या मनात होतीच.
काही काळजी करु नका सर मी पाहतो सर्व.
अभिजीतने लवकरच भराभर उत्साहाने सुत्रे आपल्या ताब्यात घेतली. या भागात दाखविण्यात आके की मेनकाचा अचानक वळणापाशी अॅक्सिडंट होतो आणि तिला हॉस्पिटल्मध्ये हलवण्यात येते. चेहर्याला बॅन्डेज बान्धलेल्या मेनकाचा चेहरा दिसत नाही पण जवळच तिच्यावर उपचार करत असते तिची चुलत बहीण डॉ सावरी. लवकरच तिचा म्रुत्यु होतो. मेनकाचा फोटो तिथे लावण्यात येतो.
काही करुन आपल्या बापाच्या सिरियल मध्ये आपल्याला काम मिळावे यासाठीच सावरी दिग्दर्शकांना फ्लर्ट करत डिनरला बोलवत होती, जेंव्हा डॅशिन्ग अभिजीतने "तु सिरियल आणि वडिलांचा पैसा वाचवायला हा रोल करशील का? मी तुझ्या वडिलांना समजावेन" असे विचारले तेन्व्हा प्रश्ण पुरा होण्याआधि ती जोर जोराने मान हलवित होती.
*********************************
मंगळवारी सिरियल पहाता पहाता मंगला , अभिजीतची बहिण बोलली, "काय रे तुमची पण सिरियल त्यापैकीच निघाली , हिरॉइन्सना मारणारी." काही न बोलता अभिजीत मोकळेपणाने हसला. मेनकाच्या रोलचे शेवटचे वळण त्याच्या आयुष्यात एका नविन करियर आणि प्रेमप्रकरणाची सुरवात तर ठरणार नव्हते?
छान
छान
चांगला आहे शेवट
चांगला आहे शेवट
छान आहे.. पण थोडी अर्धवट
छान आहे.. पण थोडी अर्धवट वाटतेय का?
छाने शेवट
छाने शेवट