राजाराम सीताराम.....भाग ६ - मसुरी नाइट

Submitted by रणजित चितळे on 1 September, 2011 - 02:15

ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम ...........प्रवेश
राजाराम सीताराम........ पुढचे चार दिवस
राजाराम सीताराम..... सुरवातीचे दिवस – भाग १
राजाराम सीताराम..... सुरवातीचे दिवस – भाग २
राजाराम सीताराम..... आयएमएतले दिवस भाग १

राजाराम सीताराम..... आयएमएतले दिवस भाग २ - मसुरी नाइट

मी सुब्रमण्यमच्या रूमवर गेलो त्याला भेटायला. त्याला शर्ट घालता येत नव्हता. तो नुकताच मेडिकल इन्सपेक्शन रूम मध्ये जाऊन डॉक्टरांना भेटून आला होता. डॉक्टरने एक दिवसासाठी त्याच्या सगळ्या परेड्स माफ केल्या होत्या. ‘सिक इन क्वार्टस’ म्हणतात त्याला. त्या दिवशीचे क्रॉलिंग त्याने भलतेच मनावर घेऊन केले होते त्यामुळे दोन्ही खांद्यांवरचे सालडे सुटले होते व जखम झोंबत होती. मला सुब्रमण्यम म्हणतो.....

"आकाशी, मी नाही राहणार येथे. मला नाही आवडले. अभ्यास काहीच नाही. नुसतेच रोलिंग व क्रॉलिंग करून वैताग आलाय".

खरे तर पाहिल्या पहिल्यांदा माझे सुद्धा मन लागायचे नाही. आयएमएतले नियम आवडले नाहीत किंवा इथला दिनक्रम झेपत नाही म्हणून जर आयएमए सोडून निघून गेले तर चालते. ही सूट फक्त पाहिल्या आठवड्या पुरतीच ठेवलेली असते. असे पाहिल्या आठवड्यात निघून गेले तर काही पैसे भरावे लागत नाहीत. आयएमएत मिळालेले कपडे, स्मॉल पॅक, बिग पॅक, सायकल वगैरे परत करून मुले परत जायची. पण एका आठवड्यानंतर जर कोणा मुलाला परत जायचे असेल तर शिक्षणाचा, राहण्याचा व खाण्यापिण्याच्या खर्चाची भरपाई करून जावे लागत असे. आयएमए सोडून जाऊ इच्छित जिसीच्या वडलांना बोलावण्यात येई व ‘हे ही दिवस’ जातील असे पटवून देण्याचा प्रयत्न होई. काही जिसी जायचे. शिक्षे पासून लांब राहण्यासाठी सुरवातीला आम्ही सगळे बिचकून वागत असू. कधी आमच्या हातून चूक होईल व रोलिंग क्रॉलिंगला सुरवात होईल समजत नसे. सुरवातीला, रोलिंग करायला लागले तरी आम्हाला वाईट वाटायचे. वाटायचे आमच्या हातुनच का चुका घडतात की आम्हाला रोलिंग करावी लागते. खरे म्हणजे जसे जन्म मरणाच्या फेऱ्यातून कोणाचीही सुटका नाही अगदी तसेच आयएमएचे आहे. शिक्षेवाचून कोणाचीही येथे सुटका नाही. हे गूढ फक्त आमच्यातल्या अमित वर्माला कळले होते. त्यामुळे त्याचे तसे नव्हते, बेधडक सगळे काम चालायचे त्याचे आणि चूक झाली तर रोलिंग करण्याचे वाईटही वाटायचे नाही त्याला.

सुब्बू म्हणायचा, "तो नंगा बघ, त्याला काही शिक्षेचे सोयरसुतक नाही असे वाटते. तो स्वतःच्या घरासारखेच वावरतो येथे". आयएमएत जे एनडिएतून म्हणजे पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून येतात त्यांना ‘नंगे’ म्हणतात, डायरेक्ट एंट्री जिसीजना ‘धक्का’ असे संबोधतात व अभियांत्रिकी करून आलेले ‘टेको डोप’. एनडीएत एक परंपरा आहे, एनडीए मध्ये पाहिल्या सत्राला सगळे कॅडेटस् अंघोळ एकत्र करतात व तेही कोणतेही कपडे न घालता. हो तुमच्या मनातली शंका मी ओळखली, म्हणूनच स्पष्ट केले. त्यामुळे नंगे ही उपाधी त्यांना तेव्हा पासून चिकटलेली असते. बीएस्सी, बीए, बीकॉम करून कंबाईंड डिफेन्स सर्विसेस म्हणजे सिडिएसची परीक्षा देऊन दीड वर्षाचा आयएमएचा कोर्स करणाऱ्यांना ‘धक्का’ ह्यासाठी म्हणतात कारण ही मुले म्हणे बाहेर धक्के खाऊन मग ह्या वळणाला आलेली असतात. अभियांत्रिकी करून आलेले इथल्या अपेक्षेने सगळ्यात बावळट ठरत असल्यामुळे त्यांना ‘टेको डोप्स’ म्हणतात. मजा ह्यात आहे की वर्षाच्या शेवटी तेथल्या शिक्षणाने व शिस्तीने, हे सगळे जिसी एकसारखे होतात. साच्यातून काढल्या सारखे. घाल माती काढ गणपती. तर असा नंग्या अमित वर्माचा फार राग टेको डोप सुब्बूला कारण जिसी सुब्रमण्यमला जेवढ्या शिक्षा भोगाव्या लागायच्या त्यापेक्षा जास्त शिक्षा अमित वर्माला मिळत असून सुद्धा तो नेहमी उत्साही, हसतमुख व खोड्या काढण्यात पटाईत असायचा.

जिसी सुब्रमण्यमची अवस्था मी समजू शकत होतो. मलाही सुरवातीला खूपवेळा वाटले होते की हा कोर्स आपल्याच्याने नाही होणार, आपल्याला नाही झेपणार व आपण परत जावे येथून. येथे आलो, त्यात काही चूक तर केली नाही आपण, असे वाटायचे. खूप वेळेला पळून जावे असे वाटायचे. पण मनातून, आई काय म्हणेल, बाकीची लोकं काय म्हणतील ह्याची भीती सतत भेडसावायची. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लहानपणापासून सैन्यात जायची इच्छी होती. त्या इच्छेचे काय होईल असे वाटायचे. जर लहानपणापासून इच्छा असून व त्यानुसार निवड झाल्यावरही मी आयएमए सोडून गेलो तर बाहेरजाऊनतरी दुसरे काय करणार होतो, आणि आयएमए सोडून दुसरे काम किंवा दुसरा नोकरीधंदा करायचा म्हणजे इथल्या सारख्या नाही तरी वेगळ्या काहीतरी अडचणी असतीलच की. मग मी त्या अडचणींपासून लांब कसा पळू शकणार होतो, काही समजत नव्हते. असे आयएमएच्या बाहेर जाऊन पुन्हा तेथेही आवडले नाहीतर? त्या वयात अशी काही घालमेल व्हायची. काय करावे काही समजायचे नाही. मी मनाला समजावायचा प्रयत्न केला, आता आलोच आहोत येथे तर कोर्स पूर्ण करूया. पण तरी सुद्धा सकाळ पासून चाललेल्या रॅगिंग मुळे मनाला पटत नव्हते. मी मला काही दिवस द्यायचे ठरवले. काही दिवस राहून बघायचे व मग ठरवावे येथे राहायचे का कोर्स सोडून माघारी फिरायचे ते.

माझ्या शेजारचा जिसी ब्रिजेशप्रताप सिंह ६ फूट ३ इंच उंचीचा व भारदस्त होता. माझे वजन चौपन्न किलो होते तर त्याचे सत्तर किलो भरायचे. मी कसेतरी पाच पुलअपस् काढू शकायचो व तो सहज पंधरा काढायचा. पुलअपस् म्हणजे लोखंडी सळईला लोंबकळून हाताच्या ताकदीने शरीर वर ओढून आपली छाती त्या सळईला लावायची, व परत खाली यायचे म्हणजे डोके पूर्ण सळईच्या खाली गेले पाहिजे व हात कापऱ्यात वाकलेले नकोत म्हणजे एक पुलअप झाला. ब्रिजेशप्रताप जेवढा अवाढव्य होता तितकाच एकदम साधा व प्रामाणिक. आम्ही त्याला बिपी म्हणायचो. सगळ्यांना मदत करण्यात त्याचा पाहिला नंबर. कोणाला लागले, कोणाला अडचण आली तर लागलीच मदतीला धावून जायचा. मी नेहमी सुब्रमण्यमला म्हणायचो, "ब्रिजेशकडे बघ त्याला पण तेवढीच शिक्षा होत असते तरी तो कधी तोंडातून हूं का चू काढत नाही. नाहीतर तू. दररोज एकदातरी पळून जायची गोष्ट करतोस (अगदी माझ्या मनातलं बोलतोस)".

दर आठवड्याला कोर्सलीडर बदलायचा. आमच्यातलाच कोणाला तरी करायचे. तो आठवडाभर वेळापत्रकाप्रमाणे वेगवेगळ्या परेड्सना व वेगवेगळ्या तासांना आमची संख्या डिएसला देण्याचे काम करायचा. डिएस व सीनियर्सने दिलेले हुकूम व धाडलेले निरोप सगळ्यांना सांगण्याचे काम पण त्याचेच असायचे. त्यामुळे त्या आठवड्यात त्याचा संबंध आमचा डिएस, कॅप्टन गिलशी सारखा यायचा व त्यामुळेच बहुतेक वेळेला कोर्सलीडर आठवड्याच्या शेवटी कोठचीनाकोठची शिक्षा ओढवून घ्यायचा. पाहिल्या सत्रा मधल्या शिक्षा जास्त करून सीनियर्सने दिलेल्या रॅगिंगच्या निमित्ताने मिळालेल्या असायच्या. बहुतेक वेळा डिएस प्रत्यक्षपणे कधी शिक्षा द्यायचा नाही पण, आपला अदृश्य हात सीनियर्सकडून आमच्यावर साफ करून घ्यायचा. डिएसचे शिक्षा सत्र टर्म एंडला व शेवटच्या टर्म मध्ये सुरू होणार होते म्हणे. आमचा क्लास जिथे भरायचा त्या खोलीत पाहिल्या दिवसा पासून फळ्यावर दोन गोष्टी बघायला मिळायच्या. संख्या व DLTGH. क्लास मध्ये कोर्सलीडरची दोन कामे असायची. फळ्याच्या उजव्या वरच्या बाजूला क्लास मधली आमची संख्या लिहायची. सिक रिपोर्ट सोडले तर क्लास बंक वगैरे करण्याचे कोणाच्याच मनात कधी यायचे नाही. कारण नसताना क्लास बंक केला तर रेलीगेशनच. सगळ्यांचे एकसारखे वेळापत्रक असल्या कारणाने बंक मारायला कारण काहीच नव्हते. क्लासची संख्या लिहिल्यावर लगेचच डाव्या कोपऱ्यात DLTGH असे लिहून त्यापुढे घरी जायला किती दिवस उरले त्याची उलटी उतरण लिहायचा - Days Left To Go Home. तो रोज कमी होणारा आकडा बघून मनातल्यामनात गुदगुल्या व्हायच्या.

687_3.jpg

बहुतेक जिसी क्लासेस मध्ये डोळे उघडे ठेवून झोपायचे. एवढ्या व्यायामाची सवय कोणालाच नव्हती. माझ्या सारखी काही पत्र लिहायची. आयएमए मध्ये कोणताही अभ्यासक्रम शिकवण्याची फार सुंदर प्रथा असायची. समजा युद्धशास्त्रातला ‘शत्रूवर चढाई’ हा विषय शिकवायचा असला, तर त्या विषयावर पहिल्यांदा थिअरी क्लास घेतला जायचा. मैदानी चढाई, आंतरराष्ट्रीय सीमेवरची चढाई, लाइन ऑफ कंट्रोलवरची चढाई, पहाडामधली चढाई, जंगलातली चढाई असे चढाईच्या प्रकारांचे प्रात्यक्षिक करून दाखवले जायचे. चढाई करताना रणगाड्यांचे काम काय असते, तोफा केव्हा डागल्या जातात, विमानातून बॉम्बं कसे व कधी टाकले जातात हे सांगितले जाते. प्लटून लेव्हल चढाई, कंपनी लेव्हल चढाई, बटालियन लेव्हल चढाई, ब्रिगेड लेव्हल चढाई अशा चढाईच्या चढत्या कक्षा शिकवल्या जायच्या. चढाई आधीची तयारी, चढाई करण्यासाठी किती फौज घ्यायची, काय काय बरोबर घेऊन जायचे, कोठे जमायचे, कसे चालून जायचे, शत्रूच्या फौजा एकमेकांना भिडल्या, की कशी आगेकूच करायची, शत्रूची फळी कशी फोडायची, एकमेकांशी संपर्कात कसे राहायचे, रेडिओ सायलेन्स म्हणजे काय व केव्हा सुरू करायचा, रसद कशी पुरवली जावी, किती दारुगोळा घ्यायचा व त्याचा अनुमान कसा बांधायचा ह्याचे धडे शिकवले जायचे. ऐकून व लिहून लक्षात राहते मग मनात ठसवण्यासाठी ‘शत्रूवर चढाई’ ह्या विषयावरचा चित्रपट दाखवला जायचा. हे झाल्यावर पुढे काही दिवसांनी उघड्या मैदानात नेऊन आम्हाला चढाईचे प्रात्यक्षिक करून दाखवले जायचे. प्रात्यक्षिकासाठी दोन इंफन्टरी बटालियन्स तैनात असायच्या. एक बटालियन संरक्षक पावित्र्यात व दुसरी शत्रू होऊन आक्रमक पावित्र्यात. खऱ्यासारखे लुटुपुटूच्या युद्धाचे प्रात्यक्षिक करून दाखवले जायचे. शेवटची निकराची लढाई म्हणजे शत्रू व आपण समोरा समोर उभे ठाकल्यावर शेवटची रणदुंधूभी पुकारून बंदुकीला लावलेली संगीन शत्रूवर रोखून शेवटचे दहा मीटर पळत जिवाच्या आकांताने 'हरहर महादेव' किंवा 'जो बोले सो निहाल, सत् श्रीअकाल' अशा वेगवेगळ्या गर्जना करत, जेव्हा शत्रूची छाती संगिनीच्या कक्षेत येते तेव्हाच तोंडाने जोरात ‘घोsssssssssssप’ असा उच्चार करत सगळे बळ एकवटून संगीन शत्रूच्या छातीत घुसवायची व लागलीच परत तोंडाने ‘निकाल’ असे म्हणत ती रक्त लांछित भोसकलेली संगीन तेवढ्याच ईर्ष्येने काढून दुसऱ्या शत्रूच्या छाताडात भोसकण्यासाठी तयार व्हायचे. हे करत असतानाच हळू हळू शत्रूला मागे रेटत शत्रूचे ठाणे काबीज कसे करायचे, शत्रू अशा वेळेला शेवटचा उपाय म्हणून आकस्मिक पणे उलट चढाई करतो त्याला तयार कसे राहिले पाहिजे व हे सगळे होत असतानाच शक्य होईल तितके आपल्या घायाळ झालेल्या सैनिकांना मागे नेऊन प्राथमिक उपचार केंद्रावर न्यायची जबाबदारी पण आपल्या तुकडीवर असते ह्याचे भान सोडले नाही पाहिजे, अशा बऱ्याच चढाईच्या वेगवेगळेया दशांचे प्रात्यक्षिक मैदानात आम्हाला करून दाखवले जायचे. मैदानात चालले प्रात्यक्षिक, आम्ही उंचावर बसून बघायचो. उंचावर बसून बघता येण्याजोगी सुबक गॅलरी असायची. आयएमएत जागेची कमी नाही. मैदाने मोठी मोठी. त्यामुळे अशा तऱ्हेचे प्रात्यक्षिक सहजच जमते. पुढे मिलिटरी इतिहासातले एका यशस्वी चढाईचे एक उदाहरण नकाश्यावर दाखवून, नकाश्यावरच आपल्या व शत्रूच्या सेना कशा एकमेकांशी झुंजल्या ते दाखवून, चढाई करणाऱ्या सेनेची आगेकूच नकाश्यावर दाखवायचे. नकाश्यावर बघत असताना आपल्या मनात परिसराची, अंतरांची व वेळेची चांगली कल्पना येऊ लागते. हे झाल्यावर एका पहाडा पायथ्याशी आम्हाला घेऊन जायचे व जागेचे अवलोकन झाल्यावर तेथेच ग्रुप डिस्कशन घेतले जायचे व आता पर्यंत शिकवलेल्या रणनीतीवर आपण चढाईचा डाव कसा मांडू व आपल्या व्युव्ह रचनेची परीक्षा घेतली जायची. एकमेकांशी बोलून संदेह दूर होतात त्याचा प्रत्यय यायचा आम्हाला. शेवटी एक सैनिकी कवायत म्हणजे एक्सरसाईज ठेवण्यात येई ज्यात शिकवलेली रणनिती वापरून एका जिसी गटाने दुसऱ्या जिसी गटावर चढाई करायची. स्वतः केले की समजते व मनात बिंबते. हाच शिकवण्याचा प्रकार युद्धशास्त्रातल्या व बाकीच्या विषयांचे शिक्षण देण्यासाठी वापरला जायचा. एक विषय घेऊन त्याचे सहा पदरी पद्धतीने शिक्षण दिल्यामुळे आपल्या मनावर पक्के भिनते कारण प्रत्येक गोष्टीचा सहादा उच्चार होतो. युद्धशास्त्रातील प्रत्येक संकल्पना वेगवेगळ्या प्रकाराने शिकवली की शिकणाऱ्यावर कायमचा ठसा उमटवून जाते. जिथे मरणाचा संबंध असतो तिथे गांभीर्य आपोआप येते.

1bayoattack_jpg_w300h187.jpg

(घोssssssssssssप निकाल)

एव्हाना कडाक्याची थंडी पडायला लागली होती. सुब्रमण्यमचे रडगाणे सुरूच होते. आमच्या चारशेपन्नास जिसीजच्या कोर्स मधली नऊ मुले पाहिल्याच आठवड्यात पळून गेली होती. तीन जणांनी पैसे देऊन बाहेर जाण्यासाठी अर्ज केले होते. प्रत्येक कोर्स मधून म्हणे पंधरा सोळा मुले कंटाळून, निराश होऊन किंवा घाबरून निघून जायची. कॅप्टन गिल नेहमी म्हणायचा ‘डोंट वरी गाइज, दे डोंट हॅव इट इन देम. गाइज यू आर इन द आर्मी नाउ, एंड आर्मी वॉन्टस् रिअल मेन'. तेवढ्या वेळापुरती आमची छाती फुगायची व वाटायचे आम्हीच काय ते भारताचे खड्गहस्त आहोत.

मॅक्टिला कंपनीजवळच्या उतारावरून सायकलवर स्वार होऊन सायकल चालवायची नाही हे सांगितले असताना आम्ही नेहमी सायकली वरून न उतरताच यायचो. का कोण जाणे पण मजा यायची. त्या दिवशी नेमके हेच करताना जिसी सुब्रमण्यम सायकल वरून घसरून पडला व त्या बरोबर त्या स्क्वॉड मधले अजून काही जिसीस पडले. उतार एवढा होता की आम्ही एकमेकांना एकदम खालीच भेटलो. बिपी व उरलेल्या बाकीच्यांनी पडलेल्या जिसीजना उठवले व जवळच्या मेडिकल रूम मध्ये नेले. औषधे व चिकटपट्या झाल्या व आम्ही वेळापत्रका प्रमाणे त्या दिवसाच्या चक्रात गुंतलो.

खरे म्हणजे संध्याकाळचा जेवणा पर्यंतचा वेळ हा अभ्यासाचा तास असायचा. पण सीनियर्सना हाच वेळ मिळायचा आमचे फॉलइन घेऊन रॅगिंग करायचा. रॅगिंग जेवणा पर्यंत चालायचे व त्यानंतरही परत रात्री अकरा, साडे अकरा पर्यंत, जो पर्यंत सीनियर्सना झोप यायची नाही तो पर्यंत. काहीनाकाही कारण रोज मिळायचे.

आज विशेष राग असणार सीनियर्सचा आमच्यावर ह्याची आम्हाला कल्पना होतीच. पण त्या दिवशी जेवणा पर्यंत आम्हाला चक्क अभ्यासाच्या तासा मध्ये अभ्यास करायला मोकळे सोडले होते. जेवण झाल्यावर मात्र आमच्या नशिबाने कोलांटी मारली व आम्हाला मधल्या अंगणा मध्ये फॉलइन व्हावे लागले. रोज काही तरी नवे कारण असायचे. आज सायकली उतारावरून चालवत आलो ते कारण होते.

प्रत्येक कोर्स मध्ये एकदातरी ही मसुरी नाइट होते. मसुरी नाइट यशस्वी होण्यास कडाक्याची थंडी असली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे. अशीच कडाक्याची थंडी पडली होती, जेवण आटोपले होते, नेहमी प्रमाणे सकाळा चार वाजता उठायचे हे डोक्यात होते, असे वाटत होते कधी एकदा गादीवर अंग टाकतो. तेवढ्यात फॉलइनची घोषणा झाली व आम्ही मधल्या अंगणा मध्ये जमा झालो. आजचा विषय होता अर्थातच उतारावरून सायकल चालवणे. आम्हाला गेम्स ड्रेस मध्ये एक बादली भर गार पाणी घेऊन बोलावले होते फॉलइन. मला समजून चुकले आज आज आमची मसुरी नाइट असणार आहे म्हणून. आम्ही फॉलइन झालो व जेयुओ भुल्लरने आम्हाला ‘एमएल’ पाजणे सुरू केले. एमएल म्हणजे ‘मॉरल लेक्चर’. फॉलइन मध्ये प्रत्येका शेजारी पाण्याने भरलेल्या बादल्या होत्या. दहा वाजता सुरू झालेले ‘एमएल’, मध्यरात्रीला संपले. एमएल मध्ये फार काही अकलेचे कांदे फोडले जात नव्हते, ते फक्त वेळ काढत आम्हाला तिष्ठत उभे ठेवण्याचे एक साधन होते. आम्ही सुद्धा प्रवचन ऐकण्याचा नुसताच आव आणला होता. प्रत्येक अर्ध्या तासाने थंड पाण्याचा एक मग स्वतःच्या डोक्यावर ओतायचा असा हुकूम. मसुरीच्या डोंगरांवरून गार वारे अंगावर शहारे आणत होते. तशातच असा गार पाण्याचा मग त्या थंडीच्या रात्री डोक्यावर उपडा केल्यावर पूर्ण अंग रोमांचित व्हायचे.... पण चुकीच्या कारणाने. एकदा पाण्याचा मग घातला की पुढे अर्धातास थंडी वाऱ्यात व भिजलेल्या अंगाने कुडकुडत त्या मस्तावलेल्या भुल्लरचे एमएल ऐकल्या सारखे आम्ही करत होतो. अंगाच्या गरमीने जेव्हा अंग वाळायची वेळ यायची व आम्हाला बरे वाटायला लागायचे तेव्हाच परत एक गार पाण्याचा मग डोक्यावरून घ्यायचा हुकूम भुल्लर सोडायचा. अंघोळ करताना लहानपणी ‘हर गंगेsssss भागीssssरथी’ असे म्हणत डोक्यावर ऊन पाण्याचा तांब्या उपडा करताना जितके बरे वाटे त्या उलट ही शिवालीकच्या खोऱ्यातली गार गंगोत्री. विजेचा झटका लागल्यागत मणक्यातून थंडीच्या वेदना उठायच्या व नंतर बराच वेळ गार बोचणारा वारा अगदी सहनशीलतेचा अंत बघायचा. मागून कोठूनतरी कोणत्यातरी सीनियरच्या, बहुतेक बटालियन अंडर ऑफिसर ज्याला बियुओ म्हटले जायचे अशा बियुओ रिनच्या खोलीतल्या रेडियोवरून हिंदी चित्रपट ‘कयामत से कयामत’ मधले ‘तुम भी अकेले हम भी अकेले मजा आ रहा है कसमसे।’ हे गाणे कानावर पडत होते. रॅगिंगमे मजा आ रहा है कसमसे। असे आम्हाला सीनियर्स चिडवत होते जणू. कित्येक लोकांना ह्या गाण्याने त्यांच्या पाहिल्या प्रेमाची आठवण होत असेल, पण मला मात्र ती मसुरी नाइट आठवून रोमांच उभे राहते अंगावर. ज्याने स्वतः रॅगिंग सहन केले आहे तोच नीट रॅगिंग करू शकतो. रॅगिंग ज्याने सोसले आहे त्यालाच बरोबर कळते की आपल्या कनिष्ठांचे रॅगिंग किती घ्यायचे, कसे घ्यायचे व कोठे थांबायचे ते. आमच्या बरोबर असेच व्हायचे. आमचे सीनियर्स बरोबर समजायचे कोठे थांबायचे ते.

आयएमएत रॅगिंग घेऊन असे वातावरण निर्माण कले जाते की पाहिल्या काही दिवसातच आपला आत्मविश्वास साफ मोडून काढला जातो. पण हळूहळू शिस्तबद्ध वातावरणात जिसी स्वतःचा हरवलेला आत्मविश्वास परत बांधतो तेव्हा तो द्विगुणित होऊन प्रत्येकात निवासतो. शिस्त व एकवाक्यता ह्याने मनाला सुरक्षितता येते व आपली प्रतिभा उजळून येते. त्या दिवशीची मसुरी नाइट रात्री बारा पर्यंत चालली होती. जेव्हा जेव्हा लहानपणीच्या वर्षासहलीची आठवण येते किंवा चित्रपटात नायक नायिका पावसात ओले चिंब बेधूंध नाचताना पाहतो तेव्हा तेव्हा रोमांचित होण्या ऐवजी मसुरी नाइटच्या कल्पनेने माझ्या अंगावर शहारे येतात. प्रत्येक तांब्यागणिक जिसी सुब्रमण्यम शिव्या घालत होता मजजवळ. उद्याच वडलांना बोलावतो म्हणत होता. दमून भागून कुडकुडत जेव्हा मी माझ्या खोलीवर गेलो तेव्हा मी पण शिव्या घालत होतो. देवाजवळ माझी एकच प्रार्थना होती ती म्हणजे ‘मला ताप येऊन मी जबरदस्त आजारी पडू देत, कसे तरी करून आयएमएच्या हॉस्पिटलात भरती होऊ देत, काही दिवस ह्या रॅगिंग पासून सुटका मिळवू शकेन’. पण तसे काही होणार नव्हते. काही महिन्या नंतर कळून चुकले की देवाने आपले शरीर किती भरभक्कम केले आहे ते.

ज्या रात्री मसुरी नाइट झाली त्या रात्री व नंतर काही दिवस जिसी ब्रजेशप्रतापसिंह खूप गंभीर झाला होता. त्याला नेहमी वाटायचे की आपण असे वागले पाहिजे की आपल्याला मुळीच कधी शिक्षा होता कामा नये. मी त्याला सांगायचा विफळ प्रयास करायचो. मी म्हणायचो त्याला ‘असे वागण्याचा प्रयत्न जरूर कर पण कधीकधी आपली काही चूक नसताना सुद्धा आपण ग्रुप मध्ये आहोत त्याचे कर्म आपल्या माथी मारलेच जाते. रॅगिंग घेण्यासाठी सतत कारणेच शोधणारे सीनियर्स असल्या मुळे, रॅगिंग पासून आपली मुक्ती एवढ्यात नाही. जिसीजचे मन कणखर करण्याचे रॅगिंग एक साधन आहे, असे धरून चालले तर रॅगिंग बद्दल काही वाटणार नाही व आपण त्याबद्दल रोजरोज शिव्या घालत बसणार नाही’. ब्रिजेशला काही ते पटले नाही व पुढच्या दोन दिवसातच तो अचानक कोर्स सोडून निघून गेला. त्याचे वडील आले होते, आमच्या डिएस ने त्यांना भरपूर समजावले पण त्याने त्याचा निर्णय घेतला होता. चार महिन्याचे पैसे भरून तो निघून गेला. आमचा बिपी आम्हाला मध्येच सोडून घरी निघून गेला. कायमचा.

(क्रमशः)

आपण राष्ट्रव्रत घेतले का

त्या संबंधी अजून येथे वाचा

http://rashtravrat.blogspot.com/ आणि येथे

http://bolghevda.blogspot.com/ (मराठी ब्लॉग)

गुलमोहर: 

खूपच छान वाटतं तुमचे लेख वाचायला. या अगळ्या विश्वातले अनुभव पुस्तक रुपाने लिहिण्याचा विचार आहे का???

मस्त.

चितळे सर, तुमचे अनुभव वाचताना प्रचंड मजा येते. आपल्या सैन्यदलाचे अधिकारी कसे बनतात हे वाचनाना रोमांच उभे राहातात.

एक विनंती आहे, पुढचा लेख जरा लवकर टाकाल का? दोन भागांमधे एवढा मोठा कालावधी गेला की आधीच जरा विसरायला होतं. आठवड्यातून एक भाग टाकलात तरी चालेल.

जबरदस्त...काय एकेक अनुभव आहेत.....साध्या सिव्हीलयनचे सैन्यदलाचे अधिकारी हा प्रवास खूप रोमांचकारी आहे....

वर्षू नील, रान्चो, चौकट राजा, nilima_v, आशुचँप, शकुन आपल्याला धन्यवाद. कामाच्या मुळे हा भाग उशीरा आला.

या प्रशिक्षणात - शरीर कणखर करणे, मनोधैर्य सतत बळकट असणे, एका समूहात सतत राहिल्याने त्याची बांधिलकी अशा व इतरही अनेक गोष्टींत जीसी तयार करणे याला महत्व देत असावेत असं मला वाटतं.
सर्व साधारण माणसाला याची सवय लगेच होत नसल्याने काही मंडळी बाहेर पडत असावीत.
तुमचे लेखन फार सुंदर ओघवते व तेथील प्रत्यक्ष अनुभव देणारे आहे. अशा प्रकारचे लेख प्रथमच वाचत असल्याने खूप उत्कंठा वाढत आहे. असेच लेखन कृपया चालू रहावे.
जय हिंद ||

रणजितराव,

बीपी गेला आणि तुम्ही राहिलात. काहीतरी तात्विक अधिष्ठान असणं आवश्यक असतं नाही? भले आपण त्याला 'तात्त्विक अधिष्ठान' असं म्हणत नसू! किंवा कॅप्टन गिलच्या दृष्टीने 'काहीतरी अनुल्लेखित' असेल ते. तो म्हणायचा नाहीका, 'Don't worry, they don't have it in them'...?

आ.न.
-गा.पै.

बर्‍याच दिवसांनी पुढचा भाग आला... त्यामुळे अधाश्यासारखा वाचून काढला...

ह्या मालिकेतला प्रत्येक भाग वाचताना वाटंत राहतं... आपणही का नाही गेलो सैन्यात.... Uhoh

पुस्तकलेखनाच्या सल्ल्यावर खरंच विचार करा....तुमच्या अनुभवांनी प्रेरित होऊन सैन्यात स्वत:हून भरती होणार्‍यांच्या संख्येत त्यामुळे नक्कीच हातभार लागू शकेल..

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत Happy

>>पुस्तकलेखनाच्या सल्ल्यावर खरंच विचार करा

अनुमोदन!

Days Left To Go Home - एमबीएला असताना पहिली टर्म झाल्यावर मीसुध्दा मोजायला सुरुवात केली होती. Happy

हिम्सकूल, स्मितागद्रे, कविता नवरे, पुरंदरे शशांक, गामा पैलवान, शूम्पी, सावली, ASMITA RAJU TELANG, मित, स्वप्ना_राज आपल्या प्रोत्साहनासाठी धन्यवाद.

सॅल्यूट... एक कड्डक सॅल्यूट... ते 'घोssssप निकाल वाचताना' सण्णकन काहीतरी निघून गेलं मणक्यातून.
पुढल्या जन्मांमधे बरंच काही करायचय... त्यात जवान म्हणून एक जन्मं हवाय... कोणत्या मातीसाठी जन्मं असेल तो असो... पण त्यासाठीचं घडणं हे इतकं बुलंद, इतकं सच्चं असायला हवं... असणारच.. खात्रीच केलीत माझी, तुम्ही.
खरच पुस्तक काढा.

मसुरी नाईट वरून माझ्या हॉस्टेलवरच्या पहिल्या पाणमारीची (water fight) आठवण झाली. पावसाळा नुकताच चालू झाल्याने थंडी होती. आमच्या एका सिनियरने नळाचं थंडगार पाणी बालदीत घेतलं आणि तपेलीने प्रत्येक नवख्याच्या (freshie) चड्डीत बरोब्बर जागी ओतलं. :चेहरा कसनुसा झालेली बाहुली:

मग जाहीर केलं की पाणमारी सुरू झाली आहे.