रसग्रहण स्पर्धा - सर आणि मी - ले. : जोत्स्ना कदम

Submitted by नीला on 30 August, 2011 - 08:28

पुस्तकाचे नावः सर आणि मी
लेखिका: जोत्स्ना कदम
प्रकाशन संस्था- राजहंस प्रकशन
प्रथम आवृत्ती- मे २०१०

सर आणि मी

नुकतच राजहंस प्रकाशनाचं जोत्स्ना कदम लिखित 'सर आणि मी' हे पुस्तक वाचलं. मे २०१० साली ह्या पुस्तकाची प्रथमावृत्ती प्रकाशक श्री. दिलीप माझगांवकर आणि संपादिका सुजाता देशमुख ह्यांनी प्रसिद्ध केली. अत्यंत सुंदर असं मुखपृष्ठ शार्दुल कदम ह्यांनी म्हणजे जोत्स्ना बाईंच्या मुलाने रेखाटले आहे. 'सर' म्हणजे प्रा. संभाजी कदम हे जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सचे डीन आणि लेखिका जोत्स्ना कदम ह्या त्यांच्या शिष्या आणि नंतर प्रेयसी आणि सहचारिणी. ह्या दोघांच्या वयातलं पंचवीस वर्षांचं अंतर हे त्यांच्या प्रेमाच्या आड कुठेही आलं नाही. विद्यार्थिनी ते प्रेयसी ते पत्नी या नात्याचा धीट आणि सुंदर प्रवास, त्यांचं प्रेमळ सहजीवन, कलेविषयी ओढ, एकमेकांवरचं नितांत सुंदर प्रेम वाचताना वाचक अक्षरशः खिळून रहातो. त्या दोघांचं प्रत्येक गोष्टीत एकमेकांना समजून घेणं, नात्याचे पदर हळूवारपणे उलगडत जाणं, चित्र, स्केचेस काढतांना एकमेकांशी विचार विनीमय करणं, एकमेकांची मतं समजून घेणं हे सगळं लेखिकेने पुस्तकात उत्तमपणे रेखाटलं आहे. पुस्तकातली भाषा अतिशय साधी, सोपी आणि सरळ असली तरी त्याला तत्त्वज्ञानाची डूब दिलेली दिसते. सरांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान केलेतही, कलेच्या प्रत्येक अविष्कारातही साकारताना दिसतं जे जोत्स्ना बाई पुस्तकातही उत्तमपणे मांडतात.

१९८० साली कदमसर जोत्स्नाबाईंच्या जीवनात आले. तेथपासून १५ मे १९९८ पर्यंतचा म्हणजे उणापुरा अठरा वर्षांचा कालखंड या पुस्तकात आला आहे. अठरा वर्षांचा हा काळ म्हंटला तर थोडा म्हंटला तर भरपूर.
कदमांच्या जीवनातून आवडत्या विद्यार्थीनीचं, ललितेचं अपघाती जाणं, त्यांना जाणवणारी पोकळी, प्रेमाची, सहजीवनाची कमतरता, जोत्स्ना बाईंमुळे भरून आली आणि पुढे कदमांचं जीवन खर्‍या अर्थाने परिपूर्ण झालं.
जोत्स्ना बाईंची कदम सरांशी पाहिली भेट, त्यांच्याविषयी वाटणारा आदर आणि त्याच पुढे प्रेमात रुपांतर हे पुस्तकातून सुरेख पध्दतीने व्यक्त होतं. जोत्स्ना बाई सांगतात, "स्त्रीबद्दल त्यांच्या मनात मुळातच एक विलक्षण आदर होता. त्यांनी मला केवळ पत्नी म्हणून स्वीकारलं नव्हतं तर एक स्त्रीशक्ती म्हणून स्विकारलं होतं." कदम सरांना संगीताचीही उत्तम जाण होती. लहानपणी वडिलांबरोबर ते आवडीने भजनाला, किर्तनाला जात. तिथे तबला, मृदुंग, पेटी, गाणं हे सगळं बघून आपणही हे शिकावं असं त्यांना वाटे. कदमसरांची पेटी म्हणजे त्यांचा जीव होता आणि हा जीव त्यांच्या बोटांतच नव्हे तर त्यांच्या ह्र्दयात जपून ठेवला होता, असं जोत्स्नाबाई सांगतात.

कदम सर हे मुळचे देवगडचे. तिथल्या 'शेठ म.ग. हायस्कुल'चे विद्यार्थी. त्या शाळेचे मुख्याध्यापक गुरुवर्य ढेंगशेसर त्यांचे श्रध्दास्थान. कदम सर कविताही सुंदर करायचे आणि ऐकवायचेही. 'सागराची ओढ तुझी', 'किती सुखाने सह्याद्रीच्या कुशित निघाले होते.' ह्या त्यांच्या कविता डोळ्यासमोर दृश्य उभ्या करणार्‍या आहेत. जोत्स्नाबाई सांगतात, "कदमांचे ऐन तारूण्यात लग्न झालं नव्हतं. त्यामुळे आपलं काम आणि अभ्यास त्यातच ते रमलेले असत. कडक शिस्तीचे कदम, थोडे अहंमान्य, रूक्ष, पुस्तकी वाटायचे. सतत अभ्यसाचा, जीवनमुल्यांचा विचार करणारे वाटायचे पण त्यांच्यातही आयुष्याचा निखळ आनंद घेणारा एक उत्कट माणूस जागा होता." कदमांनी साहित्य, संगीत व चित्रकला ह्या तीनही प्रकारांत भरपूर चांगलं काम करून ठेवलं आहे. समीक्षा आणि सौंदर्यशास्त्रात त्यांचा अभ्यास, तपश्चर्या दांडगी आहे. तत्वज्ञान, मानसशास्त्राचा अभ्यासही पुरक होता. त्यांनी अनेक व्याख्याने दिली. अनेक शोधनिबंध लिहिले. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे हे सगळे पैलू जोत्स्नाबाई पुस्तकाद्वारे उलगडून दाखवतात. आपल्या शिष्येशी वागताना कदम सरांनी कुठेही भान सोडलं नाही. ते सम्यक विचारी होते. लग्नाआधीच्या त्यांच्या अनेक मोहाच्या प्रसंगी त्यांनी स्वतःला विचारपूर्वक दूर ठेवले होते. कदम सर म्हणतात,"बाहेरचं सुंदर दिसणं हे अंतरीच्या सुंदर असण्यावर अवलंबून असतं. आपण असे अंतर्यामी सुंदर बनायला शिकलो की आपोआपच त्याचे पडसाद बाहेर अवतरू लागतात." कदम सरांच्या ह्या सगळ्या विचारांचा जोत्स्नाबाईंवर खोलवर परिणाम झाला.

कदम सरांनी केलेलं शारिरिक आणि मानसिक सौंदर्य आणि कला ह्यांचं फार सुंदर तात्त्विक विश्लेषण पुस्तकात येतं. त्यांनी प्रेमभावनेचे उदात्तीकरण केले. ललिता ही त्यांची विद्यार्थीनी, ती गेली तेव्हा सरांच प्रेमविश्व संपल्यासारखं झालं होतं पण कोरड्या पडलेल्या जमिनीखाली कुठेतरी सुप्त राहिलेला प्रेमाचा झरा असा फुटून वर आलाच आणि जोत्स्नाबाईंची ओढ कदमसारांना लागली. जोत्स्नाबाईंनी केलेलं सरांबद्दलच्या शारिरिक ओढीचं वर्णन हे काही वेळा जास्त वाटतं, जास्तच स्पष्टपणा त्यात जाणवतो. त्यामानाने पुस्तकात उल्लेखलेली सरांनी केलेली विवेचनं जास्त आवडून जातात पण जोत्स्नाबाई वयाने लहान असल्याने असं असणं स्वाभाविक आहे. शार्दुलच्या जन्माच्या संदर्भात कदम सर म्हणतात, "स्त्री पुरुषांचं शारिरिक - मानसिक एकत्र येणं आणि त्याचवेळी अज्ञातातल्या एखाद्या जिवाला त्या एकरुपतेतून नवा जन्म घ्यावासा वाटणं ही निसर्गाची खरोखर लिला आहे. ती जेव्हा आयुष्यात घडते, तेंव्हा कुठेतरी आपल्यालाही कणाकणात व्यापलेल्या चैतन्याची साक्ष पटते व परमेश्वरी शक्तीचं अस्तित्त्व मान्य करावं लागतं." अशी अनेक तत्त्व सर जाता जाता सांगून जातात. कदम सरांची 'इरॉस', 'जयंती', 'ललिता', 'गुरुवर्य', टेंगशे सरांचे तैलचित्र, टेंगशेबाईंचे चित्र, पळशीकरांचं पोट्रेट, जोत्स्नाबाईंची अनेक पोट्रेट ही विशेष उल्लेखनीय आहेत आणि ह्या चित्रांची अत्यंत वाचनीय अशी तपशीलवार वर्णन पुस्तकात येतात.

पुस्तकातील लेखनाचा बाज चित्रकार, तत्त्ववेत्त्याबरोबरच एका शिष्येचा, गृहिणीचाही वाटतो. एकूण काय तर हे पुस्तक वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतं आणि आवडतं सुद्धा !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिम्पल अ‍ॅन्ड गूड वन! Happy

(अवांतर - ते नांव 'ज्योत्स्ना' असे असते की 'जोत्स्ना' हे माहीत नाही. )

पुस्तकातली भाषा अतिशय साधी, सोपी आणि सरळ असली तरी त्याला तत्त्वज्ञानाची डूब दिलेली दिसते.>>>

हे विधान मला तरी फार महत्वाचे वाटते.

आपल्याला शुभेच्छा! Happy

-'बेफिकीर'!