रविवार दि. २८ ऑगस्ट २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तकपरिचयपर लेख. मूळ लेख
इथे (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल.
----------------------------------
‘ड्रीम जॉब’ हा कॉर्पोरेट जगतातला परवलीचा शब्द आहे. हव्या असलेल्या चांगल्या नोकरीची एखादी संधी जर चालून आली तर वैयक्तिक विकासासाठी तिचा उपयोग करून न घेणार्याला आजच्या स्पर्धेच्या युगात करंटाच ठरवले जाईल. अधिक चांगली नोकरी आणि अधिक पैसा यामागे जसे कनिष्ठ नोकरदार धावत असतात तसेच उच्चपदस्थ आणि अतिउच्चपदस्थही धावत असतात. उच्चपदस्थांच्या अश्या नोकरीबदलामुळे कंपन्यांनाही त्यांच्या जागी अन्य सुयोग्य माणसे हवीच असतात.
आपल्याकडे जे, जितके आहे त्यापेक्षा अधिक काही मिळवण्याची हीच मानवी प्रवृत्ती काहीजणांच्या आयुष्याला एका निराळ्या पण योग्य अर्थाने कलाटणीही देऊ शकते. त्यांच्यातल्या अंगभूत गुणांना त्यामुळे स्वकर्तृत्वाचे कोंदण मिळते. ‘हेडहंटिंग’सारख्या भारतात अजून बाल्यावस्थेत असलेल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे गिरीश टिळक हे या वर्गाचे दमदार प्रतिनिधीत्त्व करतात. कॉर्पोरेट कंपन्यांची गरज ओळखून, त्यांच्यासाठी योग्य अशी माणसे शोधून ती नोकरीत रुजू होईपर्यंतचा सर्व घटनाक्रम पार पाडणे हे त्यांचे मुख्य काम. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वात धाकटे आणि काहीसे उपेक्षित अपत्य ते एक यशस्वी हेडहंटर हा त्यांचा प्रवास ‘हेडहंटर’ या पुस्तकात वाचायला मिळतो.
मनोगतात गिरीश टिळक म्हणतात की ही कहाणी म्हणजे कादंबरी नाही. पण एखाद्या काल्पनिक कादंबरीचे सर्व गुण या पुस्तकात ठासून भरलेले आहेत. आपल्यापैकी बर्याचजणांनी कॉर्पोरेट नोकरीच्या मुलाखतींसाठी प्लेसमेंट एजन्सीज्शी व्यवहार केलेला असतो. अश्या मुलाखती आखण्यापूर्वी पडद्यामागे काय काय हालचाली, खलबतं सुरू असतात त्याच्या या एक से एक सुरस कहाण्या वाचणार्याला गुंगवून टाकतात. मुख्य म्हणजे गिरीश टिळक यांच्या आठवणींतील या किस्सेरूपी घटनांच्या तुकड्यांची सांधेजोड पुस्तकात अगदी सहज, बेमालूम केली गेली आहे. त्याचे संपूर्ण श्रेय सुमेध वडावाला (रिसबूड) यांच्या लेखणीला द्यायला हवे.
टिळक यांचा या व्यवसायातील शिरकाव अगदी योगायोगाने झाला. नोकरीनिमित्त रोज कराव्या लागणार्या लोकल-प्रवासादरम्यान त्यांची मैत्री जमलेल्या श्री. उदय वैद्य यांनी ठाणे इथे ‘रिझ्युमे’ नावाची प्लेसमेंट एजन्सी सुरू केली. सुरूवातीला केवळ उत्सुकतेपोटी टिळक तिथे जायला लागले. तिथले काम पाहून त्यांना त्यात रस निर्माण झाला. इच्छुकांसाठी नोकरीच्या रिक्त जागा शोधताना ज्याची सर्वात जास्त गरज असते असा सुसंवादीपणा, माणसे वाचण्याची कला टिळक यांना चांगलीच अवगत होती. याची जाणीव त्यांना उदय वैद्य यांनी करून दिली आणि ‘रिझ्युमे’च्या कामात मदत करण्याची त्यांना विनंती केली. सुरूवातीला स्वतःची नोकरी सांभाळून संध्याकाळचा थोडा वेळ ‘रिझ्युमे’साठी द्यायला टिळकांनी सुरूवात केली. पण ते या कामात नकळत गुंतत गेले. इतके की एक दिवस स्वतःच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी ‘रिझ्युमे’त भागीदारी स्वीकारली. त्यानंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
अर्थात, या वाटचालीत त्यांना मिळालेल्या यशामागे त्यांचे स्वतःचे आणि उदय वैद्य यांचे अथक परिश्रम होतेच. निरनिराळ्या क्षेत्रातील माणसे शोधताना त्या-त्या क्षेत्रांबद्दलची तांत्रिक आणि व्यावसायिक माहिती त्यांना वेळोवेळी करून घ्यावी लागली. वेळप्रसंगी काही लोकांच्या मुलाखतीही घ्याव्या लागल्या. त्यासाठी देशभर प्रवास करावा लागला. अनेक उच्चपदस्थांशी अतिशय शांत डोक्याने सल्लामसलती कराव्या लागल्या. त्यांपैकी काहींशी त्यांचे कायमचे मैत्र जुळले. तर काहींच्या बाबतीत अतिशय कटू अनुभव आले. कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या लहरीपणामुळे प्रसंगी अपरिमित आर्थिक नुकसानही सोसावे लागले. पुस्तकात अश्या काही कटू अनुभवांबद्दलही टिळक यांनी मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत. दरवेळेला अश्या अनुभवातून काहीतरी नवीन शिकायला मिळाले हे ही प्रांजळपणे कबूल केलेले आहे.
त्यांच्या या वाटचालीच्या बाबतीत त्यांच्या घरचे मात्र काहीसे उदासीन हो्ते. याबद्दल टिळकांच्या मनात सतत एक खदखद होती. अर्थात, त्यापायी त्यांनी आपल्या एकत्र कुटुंबाच्या बांधीव चौकटीला कधीही धक्का लागू दिला नाही. पण पुस्तकात ही खदखद त्यांनी लपवूनही ठेवलेली नाही. घरातल्या ज्येष्ठांना विनम्र निर्धाराने त्याबद्दल समज देतानाचा पुस्तकातला भाग अतिशय हृद्य आहे.
गिरीश टिळक यांची ही कहाणी वाचून, काही ठराविक, लोकप्रिय शिक्षणवाटा किंवा व्यवसायवाटांपलिकडेही आपले कर्तृत्व दाखवण्यासाठी अगणित क्षेत्रे आणि संधी उपलब्ध आहेत; तिथेही तितकीच आव्हाने आहेत; कामातून मिळणारा आनंद, पैसा तिथेही भरभरून आहे याचा अक्षरशः साक्षात्कार होतो.
कुठल्याही सर्वसामान्य पुस्तकप्रेमीला जर विचारलेत की त्याला पुस्तके का आवडतात तर तो ‘नवनवीन माहिती मिळते, ज्ञानात भर पडते, मनोरंजन होते’ ही कारणे हमखास देईल. हे पुस्तक या सर्व निकषांवर अगदी शंभर टक्के खरे उतरते.
**********
हेडहंटर. लेखक - सुमेध वडावाला (रिसबूड)
राजहंस प्रकाशन. पृष्ठे १९९. मूल्य २०० रुपये.
एक सुखद धक्का म्हणजे काल
एक सुखद धक्का म्हणजे काल सकाळीच लेखक सुमेध रिसबूड आणि गिरीश टिळक दोघांचाही फोन येऊन गेला.
धन्यवाद ललिता-प्रीति, चांगले
धन्यवाद ललिता-प्रीति, चांगले परीक्षण. हे पुस्तक काही दिवसांपूर्वीच आणले आहे, वाचायचे अजून राहिले आहे. आता वाचतो आणि लिहीतो मला कसे वाटले.
धन्यवाद ललिता. माहित नव्हते
धन्यवाद ललिता.
माहित नव्हते या पुस्तकाबद्दल.
ललिता-प्रीति,छान परीक्षण. आपण
ललिता-प्रीति,छान परीक्षण.
आपण घेतलं असेल हे पुस्तक तर माझा नंबर लावून ठेवाल का?
आपण घेतलं असेल हे पुस्तक तर
आपण घेतलं असेल हे पुस्तक तर >>> नाही, मला लोकसत्ताने दिलं होतं वाचायला...
नाही, मला लोकसत्ताने दिलं
नाही, मला लोकसत्ताने दिलं होतं वाचायला...
>>>
ओह्हो... 'बन चुकें' च्या यादीत समावेष!
रच्याकने, हल्ली परिक्षणाच्या सुपार्या घेतेस का काय?
इंटरेस्टिंग वाटतेय. मिळवून
इंटरेस्टिंग वाटतेय. मिळवून वाचेन नक्की
वाचणार
वाचणार
तुम्हा लोकांमुळे पुस्तकांची
तुम्हा लोकांमुळे पुस्तकांची यादी वाढत चाललेय
पर्या
पर्या सुपारलली, वाचेन
पर्या
सुपारलली, वाचेन मिळवून.
छान परिक्षण.. पुस्तक वाचाय्ला
छान परिक्षण.. पुस्तक वाचाय्ला हवं..
>>> रच्याकने, हल्ली
>>> रच्याकने, हल्ली परिक्षणाच्या सुपार्या घेतेस का काय?
<<<
खुपच छान लिहीले पुस्तक नक्की
खुपच छान लिहीले
पुस्तक नक्की वाचेन
सुरेख लिहिलंयस. पुन्हा
सुरेख लिहिलंयस. पुन्हा वाचण्याची उर्मी उफाळून आलीय.
छान परिचय करून दिला आहे!
छान परिचय करून दिला आहे! सध्या हे पुस्तक वाचतेय. संपूर्ण वाचून झाल्यावर पुन्हा लिहेन या धाग्यावर.
मस्त पुस्तक आहे ते.२-३
मस्त पुस्तक आहे ते.२-३ वर्षांपूर्वी वाचले होते.चौकटीबाहेरचे आयुष्य! खरंच कौतुक आहे त्या माणसाचे.
नाव विसरले होते पुस्तकाचे परत कळले,धन्यवाद.