खेड्यामध्ये खरंच एक अनोखं वातावरण अनुभवाला यायचं. बाबा सारखे अनेक शेतकरी लोकं उन्हाळ्यात आग ओगणार्या सुर्याच्या किरणाने बायका-पोरांसोबत भाजून निघत असतांना, त्याची तमा न बाळगता उन्हाळवाही करायचे. चोपुन-चापून शेतीची मशागत करुन येणार्या पावसाच्या आगमनाचं उत्सुकतेने वाट पाहत राहायचे.
आई वाळलेल्या पर्हाट्या व तुरीच्या सोंगलेल्या खुस्पटांना उपटून त्याला एकत्र करून संध्याकाळच्या वेळेला पेटवून द्यायची. ते आगीची लोळ पाहण्यात एक प्रकारची मला वेगळी मजा वाटायची. त्या गंजीतील किडे, माकोडे, अळ्या होरपळून मरत असत. बहुतेकांच्या आजुबाजूच्या शेतामध्ये असेच एखाद्या जंगलाला वणवा लागल्या सारखं दृष्य दिसायचं.
कोठ्याशेजारी किंवा गांवच्या वेशीच्या कुपाटाजवळ खड्ड्यात वर्षभर जमा करुन मुरवून ठेवलेला शेण-कचर्याचं खत बैलबंडीच्या डालीतून वाहत आणून शेतात पांच-सहा टोपले भरतील असे ढिग टाकत असत. मग तो ढिग शेतामध्ये सारख्या प्रमाणात पसरून देत. मी कधी कधी लहान असतांना कुणाच्या डालीवर डाव-डाव करायला जात होतो. मग त्या खताचे बारीक बारीक कण नाका-डोळ्यात व कानात शिरत असे. बैलगाडीच्या धुरीवर बसलेल्याचं गुणगुणणं वावर येईपर्यंत कानात घुमत राहायचं.
शेतकर्यांचे डोळे जसे पावसाकडे लागलेले दिसायचे तसेच उन्हाने रापलेली-तहानलेली माती सुध्दा मोठ्या उत्साहाने पावसाचं स्वागत करीत असल्याचे भासत असे..
कारण पाऊस पडला की जणू काही जमिनीची गर्भधारणा झाली असं वाटायचं. गर्भधारणा झाल्यावर लगेचच पावसाच्या पहिल्या सरीने धरतीचा कण न् कण कधी मोहरुन जायचा तेही कळायचं नाही. तिच्या कुशीत पहुडलेल्या बियांना नवीन नवीन कॊंब फुटून जमिनीच्या बाहेर डोकाऊन पाहतांना मन सुखावून जायचं. त्या कोंबाचं हळूच वर येणं म्हणजे हिरवीगार शालु परिधान केल्यासारखी दिसत असायची. मग ते हलकाशा वार्याने दिमाखाने डोलायला लागल्या की तो नजारा डोळ्यासमोरुन हलत नसे. कुजलेल्या पालापाचोळ्याबरोबर नविन कोवळ्या अंकुराचा तो मस्त वास नाकात घुमत राहायचा. मातीचा गंध चोहीकडे दरवळायचा. सृष्टीचा रंग बदलून जायचा . गांवाचा, पांदनीचा व वावराचा चेहरामोहरा बदलून जायचा.
ऊन्हाळभर रखरख असलेल्या गांवात व शेतात पहिल्या पावसानंतर वनस्पती भराभर उगवून वर यायला लागत. त्यात कुसळी, काशा, हराळी, कंबरमोडी, काटमाटी, बरबडी, चिकाटा, वाभिट, गोखरु, डोरली, वाघनखं, परडी, धोतरा, कामीनी, फटाके, ऎरंडी, चरोटा, रानभेंडी, पाया-पोटर्याला चिकटणारे कुत्रे, अशा कितीतरी वनस्पतीच्या जाती असायच्या.
वेलीपैकी भोवरा, दोडके, कोहळे, भोपळे, शेलणे, उतरन असे असायचे. पावसाळ्यात वेली इतक्या झपाट्याने वर चढून जायच्या की ते पुर्ण झाडाला वेढून घेत. मुळ झाड कोणतं तेही कळत नसे. अशा वेली कुपावर चढल्या की त्या कुपाचं वाळकं रुप पण बदलून हिरवेगार होत असे.
लोकं उन्हाळ्यात आमरस चाखल्यावर आंब्याच्या कोयी उकंड्यावर किंवा इतरत्र फेकत. पावसाळ्यात त्याच्या कोंबी जोगोजागी उगवून येत. आम्ही मुले त्याला उपटून चिमुकल्या झाडाला लागून असलेल्या कोयीला दगडावर घासून पुंगी बनवून वाजवत फिरायचो.
उन्हाळ्यात पळस पापड्या खेळत होतो. पावसाळा लागला की ह्याच पापड्यातून पळसाचे कोंब जागोजागी उगवून येत असे.
तसेच पावसाची चाहूल लागताच जमिनीच्या निर्जीव कुशीत पहूडलेले असंख्य जीव सुध्दा वनसपतीसोबतच घाईघाईने बाहेर येऊ लागत. त्यात गांडुळं गुळगूळीत माती घेऊन बाहेर येत. जमिनीच्या आंत दडलेली सुपिक माती जमिनीच्या बाहेर आणून शेतात टाकत.
गोगलगाई... काही मोठे तर काही लहान लहान पिल्ले... रस्त्यात पायाला आडवे आडवे होत चालत. मोठ्या गोगलगाईला हळूच स्पर्ष केला की स्वत:ला एखाद्या पैशासारखा गोल गोल गुंडाळून घेत. म्हणून आम्ही त्याला पैसा म्हणत होतो. एखादी गोगलगाय दुसर्या गोगलगाईच्या पाठीवर बसून डाव डाव करीत असल्याचे आम्ही पाहत होतो. त्यांच्या इवलाश्या पिलांच्या झुंडीवर एखाद्याचा किवा जनावराचा पाय पडला की चेंदामेंदा व्हायचे. त्यांच्या जीवाला माणसाच्या दृष्टीने काहीच किंमत नसायचं.
मी अशी एक गोष्ट वाचली होती की, “मुंगी आपल्या पिलाला सांगते, बाळ तु भिंतिच्या कोपर्या कोपर्याने चालत जा. कारण मनुष्य नांवाच्या प्राण्याला आपल्याकडे पाहण्यासाठी डोळे नसतात. ते आपल्याला चिरडून टाकून पुढे जात असतात.”
तसंच इतर वेळेस कुठेही दृष्टोत्पतीस न पडणारा आणखी एक किडा म्हणजे गोसावी. हा कीडा म्हणजे मखमली रेशमाच्या दाट केसांनी लपटलेला, गुबगुबीत-लालभडक संथगतीने चालणारा किडा असे. त्याला पकडण्यासाठी आम्ही त्याच्या मागे मागे जात होतो. त्याला काही आजीबाई कुंकवाच्या डब्बीत ठेवीत असत. कारण त्यामुळे कुंकु लालगर्द बनत असते असे ते म्हणत. त्याच्यात काही औषधी गुण असतात असेही त्या सांगत असत. अर्धांगवायूवर रामबाण उपाय म्हणून त्याचे तेल चोळीत असत. नवदांपत्यांना उत्तेजक म्हणून त्याचा वापर करीत असत असं मी ऎकलं होतं. पर्यावरणाच्या दृष्टीने हा किडा पालापाचोळा कुजवीण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्वाची भुमिका वठवीत असत.
काही सोनकिडे माणसाच्या घाणीचे गोल गोल गोळे करुन ते ढकलत ढकलत आपल्या बिळामध्ये घेऊन जातांना आम्ही पाहत होतो. त्यामुळे लहान पोरांनी किवा एखाद्या आळशी व भित्र्या मनुष्याने उघड्यावर केलेली घान निस्तारण्याचं काम करीत ते ईमानेइतबारे करीत असत. शिवाय वावरात कुणी ‘शी’ केली की शेताला सोनखत देण्याचं काम ते करीत असत. कुणी म्हणायचं की हेच किडे रात्रीला काजवा बनून अंधारात उघडझाप करीत ऊजेड पाडीत असतात.
अशा प्रकारचे अनेक हे किडे शेतकर्याना शेत पिकवीण्यासाठी जीवाभावाची मदतच करीत असत.
तसंच सोनपाखरु... हा भोंगरापेक्षा थोडा मोठा असलेला मनमोहक, सोन्याच्या रंगाचे पंख असलेला किडा चिल्हाटीच्या रंगीबेरंगी, रेशमासारखे पाकळ्याचे छोटे-छोटे, गोल-गोल फुले व बारीक बारीक काटे असलेल्या झाडावर नेमका बसलेला दिसायचा. त्याला चिल्हाटीचे बारीक बारीक पाणे खायला बहुतेक आवडत असत. आम्ही त्याला पकडून आगपेटीच्या रिकाम्या डब्बीत ठेवीत असे. त्यात त्याला खायला तो चिल्हाटीचा पाला ठेवत असे. बाहेर काढल्यानंतर तो ऊडून जाऊ नये म्हणून त्याच्या मानेला लांब सुताने बांधून त्याला वर फेकत असे. मग तो वर ऊडुन खाली येत असे. आम्ही अशा प्रकारची त्याची मजा घेत होतो.
रंगिबेरंगी फुलपाखरं व पिवळ्या रंगाच्या फुलपाखरांपेक्षा लहान आकाराच्या फिकोल्या या फुलांवरुन त्या फुलावर जिकडे तिकडे उडतांना नजरेस पडायच्या.
तसेच पावसाळ्याच्या आगमनानंतर माकोड्यांना पंख फुटत असे. ते मोठ्या प्रमाणात जमिनीवर व आकाशात जिकडे तिकडे प्रकाशात ऊडतांना दिसत. त्यांचे पंख तुटून इतस्तत: पसरलेले दिसायचे.
पावसाळ्यात डोबरे साचले की, मातीत किंवा नद्या-नाल्यात, विहिरी-झर्यात लपुन बसलेले बेंडुकांच्या जाती प्रकट व्हायचे व डरावऽऽ डरावऽऽऽ असा त्यांचा कल्ला सुरु व्ह्यायचा. रात्रीच्या सुनसान वातावरणात त्यांचाच आवाज सर्वदूर घुमत असे.
पाऊसही किती खट्याळ, कधी लहरी, कधी मिरगातला नाजूक, कधी हलकासा, कधी मोत्यासारखा टपटपणारा, तर कधी प्रत्येकवेळी, प्रत्येकक्षणी तो वेगळाच भासणारा...!
असा हा नटखट पाउस कधी स्त्री देहाशी झोंबाझोंबी करुन तिला ओलेचिंब करुन टाकतं. तिचं वस्त्रात लपलेलं उत्तान भाग पारदर्शक करुन वात्रटपणा करतांना दिसायचा.
आमची त्यावेळी घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे सुट्टी असली की गांवला येऊन घरखर्चाला आधार म्हणून मी व बाई, आई-वहिनीसोबत लोकांच्या कामाला जात होतो. आम्ही असंच एकदा पांढरी गांवच्या रस्त्याने श्रावणच्या वावरात भाकरी बांधून हातात विळा, फडकं व पोतं घेऊन निंदायला जात होतो. रस्त्याच्या बाजूला धुर्यावर एक सरळ आभाळाकडे सागाच्या झाडासारखं वाढलेल पण त्याच्यापेक्षा मध्यम उंचीच मेडसिंगचं झाड होतं. त्या झाडाच्या खाली जमिनीवर पडलेल्या पांढर्या फुलाच्या सड्याने माझं लक्ष वेधून घेतलं होतं. त्या झाडाला मोगर्यासारखे पांढरे फुले लागले होते. वार्याच्या झुळकीने हे वन-फुले टपाटप खाली पडत होते. जणूकाही आभाळातले तारे जमिनीवर अवतरले आहेत की काय असे वाटत होते. त्या वनफुलांचा वास पण सुगंधीत होता. मी एकटाच तो नजारा पाहात तेथे घुटमळत थांबलो होतो. माझ्या सोबतचे सारे लांब दूर निघून गेले होते. त्यांच ते रोजचच होतं. त्यामुळे त्यांना त्याचं काही अप्रुप वाटत नव्हतं. पण मला त्या दृष्याने मोहित करुन टाकलं होतं. या रस्त्याने जेव्हा-केव्हा मी जायचा तेव्हा मला हे झाड नेहमीच खुणावत असे. त्या झाडापासून दूर गेल्यावरही मागे मागे पाहत राहत असे.
त्यावेळी निंदनासाठी एक आण्यापासून किंवा जास्त गवत वाढले असेल तर त्यापेक्षा जास्त पैसे एका तासाचे मिळत असत. तास म्हणजे घड्याळाचे तास नव्हे तर पिकाची जी ओळ असायची त्याला तास, ओळ किंवा पाथ असे म्हणत असत.
दोन्ही पाय मोडून किंवा खाली बसून सरकत सरकत जावून एका धुर्यापासून ते दुसर्या धुर्यापर्यंत विळ्याने गवत ऊपटून पुंजाण्यावर टाकावे लागत असे. खूप चिखल किवा पाणी साचले असेल किंवा थुईथूई पाऊस पडत असेल तर ऊभ्या ऊभ्यानेच किंवा ओणव्याने निंदावे लागत असे. पायाच्या पोटर्या भरुन दुखायला लागायचे. कंबर मोडल्यासारखी वाटायची. कधी कधी चिखलात रुतून बसलेला काटा हळूच पायात घुसला की जीवाची तळमळ व्हायची. पाय सतत चिखलात, पाण्यात राहत असल्यामुळे पायाच्या बोटाला चिखल्या व्हायच्या.
नेसलेले कपडे चिखलाने भरु नये म्हणून खराब टॉवेल, धोतराचं किंवा लुगड्याचं फडकं कमरेला गुंडाळून घ्यावे लागत असे. निंदता निंदता एखादी अंबाडीची, चरोट्याची, कुंजर्याची, काटमाटीची भाजी दिसली की ते खुडून ओट्यात टाकत असे. मग रात्री किंवा सकाळी त्याचीच भाजी जेवणाला होती.
निंदता निंदता एखाद्यावेळेस लाजरीच चिमुकलं झाड दिसायच. त्याचे बारिक बारिक पाने पाहून मन आनंदित होवून जात असे. मग या झाडाला बोट लावतां क्षणीच तिचे पाने मिटून जायचे. जणूकाही ती लाजेने चुर होऊन जात होती की काय असे वाटायचे! जशी एखादी बाई लाजून घसरलेला पदर सावरून घेते, तशी ती लाजून आपले पाने मिटवून घेत होती.
कधी कामून्याचं झाड दिसलं की त्याचे फळे खाल्ल्याशिवाय राहत नव्हतो. मिरचीच्या झाडाएवढं वाढणारी ही वनस्पती. याला बारीक बारीक पिवळसर रंगाचं फळं लागत होते. हे फळ खायला गुळसर लागत असे.
फटाक्याचं झाड दिसले की ते तोडून पटापट फोडत होतो. बाहेरून पातळ कवच असलेले हे फळं दाबल्यावर फटकन् असा फटाक्यासारखा आवाज करुन फुटायचा. म्हणून या वनस्पतीला कदाचित फटाके असे नांव पडले असावे.
दुपारी भाकर खाऊन ओढ्याचं, झर्याचं किवा त्या वावरातील विहिरीचं किंवा घरुन मडक्यात भरुन आणलेलं पाणी पित होतो.
एखाद्या वेळेस निंदता निंदता आभाळ गच्च भरुन येत असे. पाहतां पाहतां सर्वदूर काळोख पसरत असे, इतकं की पुढचं अंधुक दिसायला लागायचं. आणि क्षणार्धात आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळू लागत असे. लखकन चमकणार्या विजांच्या तारा आमच्या डोळ्यासमोर नाचत असत ढगांचा गडगडाटाने कानठळ्या बसत असत.
अशा वेळेस पोत्याची घोंगशी करून एखाद्या झाडाखाली किंवा त्या शेतात बांधलेल्या ईरल्यात बसून पाऊस, वारा व विजेशी टक्कर द्यावे लागत असे. असंही करुन पाण्याने ओलं झालं की, थंडीने कुडकुडायला, गारठल्यासारखं होत असे. पण विजा पडत असतील तर झाडाच्याखाली थांबू नये असे लोकं सांगत असत. कारण विज नेमकी झाडावर पडत असते. त्यामुळे अनेक लोकं विजेने जळून मरत असतात.
पाऊस कोसळणं थांबल्यावर तरारून फुललेली गवतफुले, पक्ष्यांचा पंख झटकण्याचा आवाज सगळीकडे पसरलेला शांत ओलसर हिरवटसर रंग हे सगळं अनुभवतांना गदगदून येत असे.
पावसाचे अनेक रुप आणि तर्हा आम्ही पाहत होतो. रोहिणी, मृग आणि आद्रा या नक्षत्रात पडणारा तर्हेवाईक पाऊस दिसायचा, आला तर भरपूर नाहीतर अजिबात नाही असा तो.
पुनर्वसु या नक्षत्रात पडणारा पाऊस हा जोरदार, मुसळधार व जोशपूर्ण असायचा म्हणून त्याला तरणा म्हणायचे तर पुष्य नक्षत्रात पडणारा पाऊस हा सारखा पण रिमझिम पडणारा. शेतीसाठी फारसा उपयोगाचा नसणारा. त्यात जोश नसणारा म्हणून त्याला म्हातारा म्हणायचे.
मघा या नक्षत्रात पडणारा पाऊस जोरदार कडाडणारा, त्रास देणारा म्हणून सासूचा पाउस तर पुर्वा फाल्गुनी नक्षत्रात पडणारा पाऊस शांतपणे व शेतीला उपयोगी असतो. म्हणून सुनांचा पाऊस असे म्हणतात.
हस्त नक्षत्रात पडणारा पाऊस हत्तीचा, शेतीला उपयुक्त असणारा. म्हणून ‘पडतील हस्त तर शेती होईल मस्त’ असे म्हटले जात होते.
चित्रा नक्षत्रात पडणारा पाऊस शेतीचे नुकसान करणारा तर स्वाती नक्षत्रात पडणारा पाऊस मस्तच असणारा. म्हणून ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती’ असे म्हटले जात होते.
आषाढ श्रावणातली पोळ्याच्या जवळपासची पावसाची झड तर भारी जड जायची. बाहेर दिवसरात्र थुईथूई पाउस पडायचा. कित्येक दिवस सूर्याचं दर्शन होत नसे. बाहेरचा कामधंदा मंदावून जात असे. मजुरांच्या मजूर्या पडायचे. जेवणाचे फाके पडायचे. घरात सारखं कोंडून राहावे लागे. घरात ओल, चिकचिक राहत असे. थंडीने आंग थाटरुन जायच. चुलीत जाळ करुन शेकत बसावे लागे.
घरातला दाळदाणा संपून जायचा. वावरातून अशीच एखादी काटमाट्याची,
चरोट्याची किंवा मसाल्याचे पाने आणून त्याला वाफलून, तिखट मिठ टाकून खावून दिवसं कंठावे लागत असे. मुठभर पिठ असलं तर त्याच्या भाकरी थापायच्या. ज्वारी भरडून कण्यासोबत खायच्या. आंबिल घाटा खायचा. कसेतरी कास्तकारांकडून उसणवारीने दाळ दाणा आणून आपले पोट भरावे लागत असे. किंवा उपास-तापास करुन कड काढावे लागत असे. अशी झड कधी कधी एक एक महिण्यापर्यंत राहत असे. तरिही झड काही थांबत नसे. तेव्हा कास्तकार व मजुरांचे हालच पाहावल्या जात नसे. घराच्या बाहेर पडणं मुष्किल व्हायचे.
वावरातही त्यावेळी पाणी साचून राहत असे. दलदल तयार व्हायची. वावरात पाण्याचे झरे व चिलक्या तयार होत असे. पिके पिवळे फटक पडत असे. त्याची वाढ खुंटून जात असे. गवताचं टोंगळाभर पिक उगवून येत असे. ओला दुष्काळ पडायचा. त्यामुळे कास्तकार व सारेच हवालदिल होवून जात असे.
अशी ही झड कधी संपते याचीच आम्ही वाट पाहत राहायचो.
मस्त...
मस्त...
प्रामाणिक लिहीलय, आवडले.
प्रामाणिक लिहीलय, आवडले.
खुप सु॑दर लिहीलय. अगदी गावी
खुप सु॑दर लिहीलय. अगदी गावी असल्या सारख वाटल.
छान
छान
आवडलं.
आवडलं.
आवडल... पावसाच वर्णन वाचताना
आवडल... पावसाच वर्णन वाचताना काटा आला अंगावर , मस्त
छान लिहलय... आवडल
छान लिहलय... आवडल
खुपच सुंदर लिहिले आहे.
खुपच सुंदर लिहिले आहे.
आवडल
आवडल
जुमळे, तुम्ही विश्वास नाही
जुमळे, तुम्ही विश्वास नाही ठेवणार.......
वरील एक एक अक्षर मनात घोळवत्....प्रत्येक वस्तु डोळ्या समोर आणुन.....त्या प्रसंगाचा त्या त्या घटनेचा.... इथे बसल्या जागी आस्वाद घेउन वाचला आहे.
खुप खुप छान वाटले....त्या वातावरणाची, निसर्गाची ओढ लागली आहे....जी मनात आधीपासुन तरळत आहे..... आता या वेळी मनात येणारी भावना शब्दांत मांडणे अशक्य आहे.
तुम्ही गावी असतांना.....या निसर्गाच्या सुंदरतेचा जो अनुभव घेतला...तो खरंच अवर्णनिय आहे.....
तुम्हाला याची जाणीव आहे.... हे जाणुन खुप आनंद झाला....
एरवी कित्येकांना निसर्गात घटणार्या 'सुंदर घटनांशी' काहीच देणे घेणे नसते...!!! पण 'झड' लागली की निसर्गाला दोष द्यायला विसरत नाहीत ते..