रसग्रहण स्पर्धा: 'हिंदू' -भालचंद्र नेमाडे

Submitted by साजिरा on 24 August, 2011 - 07:12

कोण आहे?
मी मी आहे. खंडेराव.
ह्यावर स्तब्धता. मग मी विचारतो, तू कोण?
मी तू आहेस, खंडेराव.

..
इथून सुरू होणारी या 'मी' ऊर्फ 'खंडेराव'ची, खरं तर 'मी आणि खंडेराव'ची कथा सांगणारी 'हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ' नावाची कादंबरी आपल्या पुढ्यात पेश करते- तब्बल सहाशे पानांचे एक समृद्ध पाल्हाळ आणि तरीही शेवटी काही तरी राहून गेल्याची, काहीतरी अधुरेच असल्याची एक अस्वस्थ टोचणीही. आपल्या जातीजमातींच्या एकमेकांत अडकलेल्या अपुर्‍या-अधुर्‍या आयुष्यांच्या कहाण्या आणि त्यांचे एकमेकांवरचे, एकमेकांच्या जन्मांनाच संपूर्णत्व देणारे समृद्धसुंदर परावलंबित्वही. हिंदू म्हणून जन्माला आल्याचा, आयुष्यभर तोंडाची चवच बनून बसलेला कडवट विखार आणि या धर्मातल्या कधीही नीट न उमगलेल्या नितांतसुंदर गोष्टींचे मधाळ चवीचे निरूपणही. वारसा म्हणून पदरी पडलेल्या रीतीभातीपद्धतींतला निराशाजनक फोलपणा आणि पूर्वापार, बापजाद्यांपासून चालत आलेल्या अनंत आचाराविचारांतलं सौंदर्य आणि अर्थपूर्ण परिपूर्णपणही. आपल्या जातिव्यवस्थेतल्या सार्‍या जगाने धिक्कारलेल्या आणि आपल्या प्रगतीच्या रस्त्यातली कायमची धोंड बनून बसलेल्या करंट्या उतरंडीचा भयानक वास्तवपट आणि या उतरंडीमुळेच सहजसुलभ झालेल्या आपल्या जगण्याच्या प्रक्रियेचा मनमोहक चित्रपटही. स्वतंत्र-वेगळा विचार नाकारणारे, सतत दिवाभीतासारखे आणि मन मारून जगायला भाग पाडणार्‍या एकत्र कुटुंबपद्धतीचे जाणीवा विकसित-समृद्ध करण्यातले नाकर्तेपण आणि ग्रामीण समाजव्यवस्थेची वीण-एकजीवपण कायमस्वरूपी घट्ट ठेवणारे त्याच कुटुंबव्यवस्थेतल्या संस्कृतीचे असंख्य नयनमनोहर रंग दाखवणारे पीळही. नात्यानात्यांतले स्वतंत्रपणे ओळखू येऊ नयेत इतके बेमालूम मिसळलेले, लोण्या-तुपाचा संपन्न वास असलेले, जगण्यातल्या प्रत्येक वळणावर नव्या अर्थाने सामोरे येणारे, जगण्याला नवी ऊर्मी-उभारी देणारे पदर आणि त्याच नात्यांनी ठायीठायी व्यक्त केलेल्या अवाजवी अपेक्षांच्या ओझ्याचे पायांत बेड्या टाकणारे अनावश्यक रानटी लादलेपणही. नुसत्या श्रद्धांच्या बळावर उभ्या राहिलेल्या या हजारो वर्षांच्या एकूण व्यवस्थेच्या प्रचंड डोलार्‍यावरचे मार्मिक भाष्य आणि जातिजमातींसकट अख्ख्या संस्कृतीलाच पाषाणयुगाकडे नेऊ शकणार्‍या अंधश्रद्धांच्या जाळ्याजळमट्यांच्या भयप्रद वास्तवाचा आरसाही. थेट मोहेनजो-दडोचा संपन्नसमृद्ध वारसा सांगणारी सप्तसिंधु भूप्रदेशाची प्रतीकात्मक कडूगोड कहाणी आणि शतकानुशतके माणसाचे अवघे जीवन व्यापून शिल्लक राहिलेल्या रुढीपरंपरांच्या बर्‍यावाईटाची उभीआडवी वीण असलेल्या महावस्त्राच्या अवकाशाचे अंतरंगही.

***

तर, 'युनेस्को-मोहेनजो-दडो १९६३' या प्रकल्पांतर्गत 'दक्षिण भारतातल्या पश्चिम किनार्‍याजवळील उत्तर महाराष्ट्रातल्या पूर्व खानदेशात मोरगाव खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेला' आणि आता पुरातत्वज्ञ बनलेला 'श्री. खंडेराव विठ्ठल' पाकिस्तानात आपला शोधनिबंध सादर करतो- हीच खंडेरावच्या गोष्टीची सुरूवात.

आदि-वन्य-कृषी-नागरी-आधुनिक-उद्योग-इलेक्ट्रॉनिक- अशा बर्‍यावाईट क्रमाने झालेल्या, नैसर्गिक पद्धतीने किंवा नाईलाजाने किंवा बळ वापरून झालेल्या निरनिराळ्या संस्कृतींतल्या उत्क्रांतींवर धक्कादायक विधाने करत खंडेराव भाषण करतो, आणि हजारो वर्षांपूर्वीच्या मोहेनजो-दडो पासून गांधार-हडप्पाच्या ऐतिहासिक अवकाशावर हिंदूंचा, त्यांच्या जाणीवांचा अधिकार सांगतो, तेव्हा एकच गोंधळ उडतो.

त्यानंतर शेकडो फूट खोल खणून शोधून काढलेल्या त्या ऐसपैस रस्त्यांच्या मधून 'हिंदू संस्कृतीचा एक प्रतिनिधी' म्हणून चालत निर्मनुष्य चव्हाट्या-वाड्या-ढेलजांकडे बघत असताना 'नाहीसं झालेल्या माहेरा'सारखा या नगरीचा त्याला अभिमान वाटतो. 'पृथ्वीवर कोणत्या लोकांना एवढा समृद्ध वारसा नुस्ता बेंबीच्या बळावर मिळतो?' असं स्वतःलाच विचारून तो स्वतःला नशीबवान ठरवतो आणि त्याच वेळेला 'अनेकवचनी भूतकाळी' हा परवलीचा शब्दच ठरून गेलेल्या प्राचीन सिंधू संस्कृतीबद्दल वैषम्य बाळगत, सूतक 'साजरं' करत खंडेराव मनाने पोचतो तो थेट त्याच्या खानदेशातल्या मोरगावात. दोन्ही ठिकाणची लाखो साम्यस्थळं आणि त्याच त्या एकसारख्या ओळखीच्या जाणीवांचा अभूतपूर्व साक्षात्कार! सिंधू प्रदेशभर हाहाकार माजवलेल्या प्रलयाचा, चक्रीवादळाचा, उत्पाताचा जणू त्याला भास होतो, किंवा पुनःप्रत्यय. त्याला सिंधुचं पात्र या चंडवातात अचानक अनेक मैल पूर्वेकडे सरकलेलं जाणवतं. तिच्या महापुरातून गुजराथच्या किनार्‍यावर, आणि मग तापीच्या मुखातून उलटा प्रवास करत मोरनदीच्या पात्रातून मोरगावच्या वाळूवर येऊन पडल्यागत जाणवतं. आणि मग समोर गावच्या वेशीवरचा ढसळता बुरूज, त्यावरचा पिंपळ आणि आकाशात घिरट्या घालणारे कावळे बघून तो संभ्रमात पडतो- हा भान, शुद्ध आणि भ्रमाच्या अलीकडे-पलीकडे कुठेतरी असलेला हा गृहस्थ म्हणजे- मोरगावचा पंचविशीचा 'मी खंडेराव', की पाच हजार वर्षांपूर्वीच्या याच संस्कृतीतला-पितरांतला 'तो खंडेराव', की संस्कृतीची ही अनाकलनीय, अत्यावश्यक, अर्थपूर्ण स्थित्यंतरे हजारो वर्षांपासून बघत आलेला, त्या सगळ्याचा एक भाग होत आलेला नुसताच एक 'प्रतिनिधी खंडेराव'?

***

पाकिस्तानच्या आता त्या परक्या झालेल्या भूमीतही खंडेरावला त्याच्याच संस्कृतीची पाळंमुळं सापडतात- हे तर एक आहेच, पण त्याला या भूमीशी जोडणारा आणखी एक धागा आहे. जिने खंडेरावला तान्हा असताना अंगाखांद्यावर खेळवलं, ती- लहाणपणीच दीक्षा घेऊन संन्याशीण व्हायला भाग पडलेली अप्सरेसारखी दिसणारी त्याची त्रिवेणी ऊर्फ 'तिरोनी' आत्या फाळणीनंतर इकडेच अडकली आहे. तिथल्या कुठेशा महानुभावी मठांत सापडेल ही आशा. मुलतान, लाहोर, पेशावर, वजिराबाद, रावळपिंडी.. वणवण फिरूनही कुठेच सापडत नाही. तशातल्या सैरभैर अवस्थेतच तार येते- वडील मृत्युशय्येवर. मृदंगे विठ्ठलराव. वारकरीपण प्राणपणानं जपणारे. मोरगावात आब राखून असलेले. भल्या मोठ्या शेतीमळ्याखळ्याचा गाडा आणि भला मोठा कुटुंबकबिला चालवण्याचा भार सतत डोक्यावर घेऊन वावरणारे. शंभर लोकांचे पोट सांभाळणारे, शेकडो लोकांना आधार वाटणारे. भाऊबंदांच्या वाट्याचे, उत्पन्नाचे, खर्चाचे, सालदारांच्या-कामगारांच्या मजूरीचे, ट्रस्टचे हिशेब सतत करणारे. हे 'हरितक्रांतीमुळे पदरात पडलेलं पुढारपण' करत करत स्वतःला पार झिजवून टाकलेले. आणि आता शेवटचं अंथरूण धरलेले. आयुष्य संपवून टाकण्याइतकं काहीच महत्वाचं नसतं- हे या प्राचीन लाहोरपेक्षाही अतिप्राचीन तत्वज्ञान शिकवणार्‍या वडीलांशी खंडेराव कळत्या वयापासून सतत फटकून वागत राहिला. शेवटचं पाहिलं पाहिजे त्यांना लवकर आता. हिंदू परंपरेप्रमाणे मांडी दिली पाहिजे. हिंदू प्रथेप्रमाणे अग्नी दिला पाहिजे.

***

भावडू म्हणजे खंडेरावचा मोठा भाऊ. ह्याच्याइतकाच हुशार. सार्‍या गोष्टीत रस असलेला. गोठ्यातल्या मोत्या-मुत्या जोडीसारखी, खरं तर खंडेरावसारखी बाणेदारपणे शिंगे रोखून बंड केलं असतं, घराबाहेर पडला असता तर काहीतरी मोठा झाला असता. पण कितीही जणांनी कितीही जनावरागत राबलं, तरी कमीच पडावं अशा शेतीगाड्याच्या वाईट चिखलात वडिलांनी त्याला फसवला, रुतवला. या दुष्ट शेतीच्या रामरगाड्यात काळी ढेकळं, पाणी, औजारं, मनुष्यबळ, खतं, बियाणं- ही तर संपत्ती आहेच, पण 'उपणणी' सारख्या कामात 'वारा' देखील सोन्याच्या मोलाचा. तो सोन्यासारखा वारा आहे तेवढ्यात धान्याची उपणणी केली पाहिजे नाही तर सोन्यासारखा वेळ वाया. सूर्याचा उजेड पण किंमती. अंधार पडायच्या आत आवरा.. किती कामं पडलीत. रात्रही किंमतीच. लवकर खाऊन झोपा. नीट झोप झाली पाहिजे. कारण भल्या पहाटे पुन्हा तिफणी, गुरं, पेरण्या, औतं. रामप्रहर वाया गेला तरी तब्बल अर्ध्या दिवसाची लांबण.. कशी परवडणार शेतकर्‍याला? पहाटे पाचपर्यंत झोपून राहणं म्हणजे चंगळवाद समजणारे हे जिवंतपणी काबाडकष्टात मरणारे शेतकरी लोक म्हणजे खंडेरावला भुताच्या जातीचे वाटतात. स्वतःच्या बायकोकडेही नीट बघू न शकलेला भावडू राबत राबत आधीच गेलेला. खंडेराव अपरंपार द्वेष करत असलेल्या त्या करंट्या कृषीसंस्कृतीने त्याचा बळी घेतला- ही खंडेरावची पक्की धारणा.

आता खंडेरावच वंशाचा दिवा आणि घरदार-शेतीमळ्या-सालदारांसकटच्या, बलुत्या-गावगाड्यासकटच्या, जातिजमातींच्या कोळीष्टकांसकटच्या, ट्रस्ट-सोसायट्यांच्या कायम आतबट्ट्याचा व्यवहार ठरलेल्या फुकटपुढारपणासकटच्या, वारकरी संप्रदायातल्या भक्ती परंपरेचे प्रतीक बनलेल्या मृदंगासकटच्या- विठ्ठलरावांनी मागे सोडलेल्या त्या भल्यामोठ्या झेंगटाचा वारसदारही. चार बहिणी आहेतच. पण त्यांचा काय उपयोग? बोरीबाभळी कशाही वाढतात. आंबे सांभाळावे लागतात. भावडू गेला. आता राहिला खंडेरावच. आंबेराव. घराचा खांब. खांबेराव. हीच पद्धत आहे हिंदू धर्मात. खंडेरावच्या मराठा-कुणबी जातीत आणि मोरगावातही.

गोठ्यातल्या मोत्या-मुत्याची डौलदार कंसाकार शिंगे गणिताचे असंख्य कंस बनून खंडेरावच्या मनात. इतकी वर्षे टाळलेले समीकरण आता मांडायलाच लागणार आहे त्याला. बौद्धिक-शिक्षण-विद्यापीठ-पीएचडी-पुस्तकं-लेख-संशोधन-शोधनिबंध-उत्खनन-वाचनलेखन-सांस्कृतिकभानगडी-महानगरातलं वेगवान सुखासीन जीवन हे सारं यापुढे तसंच जगत राहायचं; की माजलेल्या खोंडांची शिंगे पकडून मोडून टाकावीत तसे हे सारे मोडून खुडून विसरून जाऊन नाहीसे करून विठ्ठलरावांचा एकुलता एक वंशज म्हणून आणि जन्मापासून चिकटलेल्या परंपरेचा, संस्कृतीचा प्रतिनिधी बनून शेतीवाडी-घरदार-गुर्‍हाळं-नातीगोती-सोयरिकी-शाळा-गावातली नेतेगिरी नि राजकारण-लोकसेवा-विठ्ठलविठ्ठल-ग्यानदेव तुकाराम- हे सारं सांभाळायचं?

लाहोर-अमृतसर-जालंधर-दिल्ली-भुसावळ-मोरगाव.
बापाला शेवटचे भेटायला निघालेल्या पोराच्या दोन दिवसातल्या या प्रवासात खंडेरावने जागवलेल्या स्मृतींचा अख्खा पट आणि त्याच्याभोवतीची 'त्या' खंडेरावला बुद्धिबळाच्या विरूद्ध बाजूला बसवून त्याच्याकडून वदवून घेतलेल्या तत्वज्ञानाची आणि त्याच्या 'विचारांच्या कृती'ची, त्याच्या मार्मिक भाष्यांची गुंफण- म्हणजेच 'हिंदू'तले उरलेले काहीशे पानांचे समृद्ध पाल्हाळ. समीकरणांशी-प्रश्नांशी झुंज. संस्कृती-समाजाशी झुंज. गावगाडा-बलुते-जातिजमातींच्या उतरंडीशी झुंज. नात्यांच्या तुटू पाहणार्‍या आणि अतूट धाग्यांशी झुंज. खंडेरावची स्वतःशी झुंज.

***

'साहित्यातले देशीपण' आणि 'साहित्यातली नैतिकता' हे नेमाडे गेल्या काही दशकांपासून अटीतटीने साहित्यिक आणि समीक्षाजगताला सांगत असलेले खास सिद्धांत, तत्वज्ञान- हे सर्वश्रुत आहे. हीच तत्वे त्यांनी त्यांच्या थेट पहिल्या पुस्तकापासून असोशीने पाळलेली आढळतात. 'हिंदू'मध्ये पुन्हा एकदा या तत्वांचा सुंदर साक्षात्कार आपल्याला पानापानातून घडतो.

साहित्यातून खास त्या त्या प्रदेशाची वैशिष्ठ्ये म्हणता येतील अशा 'देशी जाणीवा' (संगीत, उत्सव, समारंभ, शिल्पकला, परंपरा, पद्धती, भाषा, म्हणी आणि वाक्प्रचार, प्रतीके, कथनतंत्रे, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक इ. मधून) व्यक्त होणे; त्या त्या साहित्यकृतीतली पात्रे, आशय, शैली, मूल्ये हे सारे त्या त्या भूमीशी, मातीशी जोडलेले असणे; त्या त्या समाज-संस्कृती-प्रदेशा-समूहाशी एकूणच त्या साहित्यकृतीची पाळेमुळे घट्ट रूजलेली असणे- हे देशीयतेचे तत्व. 'हिंदू'तले- भावडू असो की विठ्ठलराव, झेंडीगणिका असो की तिरोनीआत्या, हुनाकाका असो की निळूकाका, यारू असो की रघू नायक, उंटमारे देशमुख असोत की खंडेरावचे सातवे पूर्वज नागोराव, सोनावहिनी असो की सिंधुमावशी, खंडेरावच्या चार बहिणी असोत की चारही मेहुणे, चिंधुआत्या असो की खंडेरावची आई- ही सारी पात्रे आपल्याला अत्यंत जवळची ओळखीची वाटतील अशी खास वैशिष्ठ्ये, भाषा, लहेजा, वागण्याची पद्धत घेऊन आपल्यासमोर उभे ठाकतात. सतत नात्यांना भावनांनी पक्कं करत जाणारं स्थिर जग. नेमाडेंची इथली निवेदनशैलीही खास आपल्या ग्रामीण मातीतली- बहिणाबाईशी नाते सांगणारी- मारूतीच्या पारावर गावगन्ना पाल्हाळगप्पा ठोकताना मध्येच अचानक जगड्व्याळ तत्वज्ञान सांगून अवाक करून सोडणारी! या कहाणीतले छोटे मोठे प्रसंग आपल्याच आजूबाजूला कधीही केव्हाही घडू शकतात, घडून गेले आहेत असं वाटायला लावणारे. अस्सल ग्रामीण, खानदेशी, वैदर्भीय भाषेतले काही संवाद- शब्द (उदाहरणादाखल: झावर, आंडोर, भनका, गवरी, इतराने, रामपार, सैसान, पानकळा, बिल्लास, धंगडे, दिवटीबुधली, नितात, सावटं, वावधन, पावरी इ. शब्द; किंवा भांबरभुसक्या, भेंडसुमार्‍या, कावड्यामावड्या, सटार्‍या भपार्‍या, अडवंट्या अशा अस्सल ग्रामीण मातीतल्या, बाजाच्या शिव्या-संबोधने) हेही गावागावांतली बोली भाषा ही कितीही स्थानिक असली, तरी तिच्यातूनच 'वैश्विक' असे 'देशी' साहित्य जन्मते- हे बजावून सांगणारे.

आपल्या समाज-संस्कृती-प्रदेशा-समूहात जे अस्तित्वातच नाही अशा कल्पक गोष्टी, पात्रे, आशय असलेल्या साहित्यात अनैतिकता आहे, असं बजावून नेमाडेंनी एकेकाळी खांडेकर-फडके-खानोलकर सारख्या प्रस्थापित साहित्यिकांचेही वाभाडे काढले. देशी तत्वांचा अजिबात विचार न करता पाश्चात्त्य साहित्यातल्या पात्रा-प्रसंगांचे (जे देखील त्यांच्या त्यांच्या पाश्चात्त्य समाज-संस्कृती-भूमीशी प्रामाणिक आहेत!) सर्रास अनुकरण करून लिहिलेल्या यांच्या कादंबर्‍यांत अभिप्रेत असलेली नाजूक तरल कलावादी प्रेमप्रकरणे, मुक्त लैंगिक संबंधांच्या कल्पना ह्या फक्त महानगरांतच सापडू शकतात- तेही अपवादात्मक परिस्थितींत- त्यामुळे हे असले साहित्य आणि साहित्यिक आपल्या भूमीशी प्रामाणिक नाहीत- असे नेहमी ठासून सांगणार्‍या नेमाडेंच्या 'हिंदू'तला पुरातन 'हरिपुरा' गावातल्या लभान्यांच्या ('लमाणी' लोकांच्या?) बायकांचं त्यांनी केलेलं वर्णन अस्सल 'देशी' वाटतं, प्रामाणिक वाटतं. मनसोक्त खाणंपिणं आणि त्यानंतर उघड्यावर सामूहिक शृंगारक्रिडेसारख्या त्यांच्या पद्धती हजारो वर्षांपुर्वीपासूनच्या आपल्यातल्याच संस्कृतीशी, परंपरांशी थेट नाते जोडणारे वाटतात. अशा उघड्यावर बेभान होऊन केलेल्या सामूहिक शृंगारक्रिडांनंतर जवळपास बेहोश झालेल्या या सार्‍या लभान्यांवरचा ही नेमकी संधी साधून 'पेंढारी' लोकांनी केलेला हल्ला, त्यातून पळून आलेल्या दुपारच्या भट्टीसारख्या उन्हात स्वातीच्या नक्षत्रासारख्या अद्भूत रंगाच्या ह्या दोन सुकुमार लभान्या बघायला अख्खा गाव लोटणे, आता ह्या दोन जळत्या निखार्‍यांचे काय करायचे म्हणून भरलेली पंचायत, शेवटी गावातल्या घरंदाज सभ्य बायापोरींची इज्जत वाचावी, घरातच राहावी म्हणून गावाने त्यांना रीतसर 'गणिका' म्हणून स्वीकारणे- हे सारे बरेवाईट वाचताना आपल्याला 'आपले-आपल्यातले' वाटते. कुठेतरी बघितलेले, अनुभवलेले वाटते. लहानपणापासून ऐकत आलेल्या पुराणकथा-लोककथांशी थेट संबंध दाखवणारे आढळते. ब्राह्मण्या-बौद्धत्वावरचे खंडेरावचे चिंतन आपल्याला हजारो वर्षे मागे नेते आणि आजच्या वास्तवाचा चटकाही देते.

उंटमार्‍या देशमुखांच्या गढीचे वर्णन, त्याच्या घरी सून म्हणून गेलेल्या चिंधुआत्याने अतिशय थंडपणे आणि हिकमतीने केलेला नवर्‍याचा खून, झेंडीगणिकेचा इतिहास, हरिपुर्‍यातल्या लभान्यांची, मोरगावातल्या महारांची आणि स्वातंत्र्यसैनिक बनलेल्या खंडेरावच्या 'हुनाकाका'ची गोष्ट, फाळणीच्या वेळचे दोन्ही बाजूंचे उद्रेक आणि मानसिक आंदोलने आणि विठ्ठलरावांच्या मृत्युनंतर खंडेरावच्या आईने लेकींना हाताशी धरून त्याच्या अपरोक्ष चालू केलेले कारस्थान- यासारख्या आपल्याला सुन्न करून सोडणार्‍या 'हिंदू'तल्या काही गोष्टींचे अस्सलपण देखील आपल्याला नीट भिडते. अठराव्या शतकात खंडेरावचे सातवे पूर्वज नागोराव स्वार्थासाठी इंग्रजांना जाऊन मिळाले आणि खानदेशातली मराठेशाही संपुष्टात आणण्याची कर्तबगारी केली- ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्या-तालुक्या-गावागावांमधल्या हजारो खंडेरावांच्या पुर्वजांची कहाणी वाटून आपणही यातले एकतरी खंडेराव असूच- असा खिन्न विचार आपल्या डोक्यात येणे हे 'हिंदू'च्या देशीयतेचे आणि नेमाडेंमधल्या साहित्यिकाच्या 'नैतिकते'चे लक्षण. आणि हे फक्त उदाहरणादाखल.

***

'हिंदू'तला खंडेराव हा पांडुरंग आणि चांगदेवसारखाच अस्सल मातीच्या रंगाचा असला, तरी त्या दोघांपेक्षा याची जातकुळी वेगळी आहे. खंडेराव निसर्गतःच आशावादी आहे. तो 'जगण्या'कडे पाठ फिरवत नाही, तर नेहमी काहीतरी दैवी, निखळ आणि सुंदर शोधू पाहतो. 'कृती टाळण्याचा' नाकर्तेपणा, अनैतिकता करत नाही, तर तो 'विचारांची कृती' करतो. जरूर तिथे आसूड ओढतो. जरूर तिथे छद्मी, हेकट बनतो. लांबचलांब पाल्हाळातून काहीतरी ठोस असे स्वतःसाठी काढू पाहतो. हे पाल्हाळ त्याला स्वतःला एखाद्या निश्चित ठिकाणी, निर्णया-तत्वा-तत्वज्ञानाप्रत आणण्यासाठी आवश्यक वाटते. त्याच्या स्मृतींच्या पटातही सुसंगतता नसून नैसर्गिक विस्कळितता आहे. कारण त्याने मन हे मानवी आहे, यंत्र नाही. या विस्कळिततेमुळेच तो पट अत्यंत पारदर्शी, प्रामाणिक आणि भिडणारा झाला आहे. आठवणी मनात येतील त्या आणि येतील त्या क्रमाने तो न्याहाळू, मांडू इच्छितो, मानवी स्वभावाप्रमाणे गोंधळून जाऊ इच्छितो. कारण हे सारे रीतसर होऊन गेल्यानंतरच त्याला स्वतःचे असे काहीतरी सापडणार आहे.

दोर्‍यांच्या जंजाळातून टोकं शोधून काढावीत तसे वेळोवेळी खंडेराव स्वतःला 'अ‍ॅक्रॉस टेबल बसवून' जी कडूगोड बरीवाईट भाष्ये करत स्वतःला बजावतो- त्यातली काही वरकरणी कडू वाटत असली तरी मडक्याच्या घाटाच्या आत जन्माचं कारण सापडल्यागत अंतिम सत्य आणि आशावादही जाणवतो. काही वानगीदाखल-
'कुठच्याही नागरी संस्कृतीच्या घडणीतच त्यांनी आपोआप नष्ट व्हावं, असं पायाभूत तत्व जडलेलं असतं. महानगरे उद्ध्वस्त व्हायला शस्त्रे नि आक्रमणे लागत नाहीत. ऐतखाऊ नागरी समाज आधीच स्वतःच्या आतल्या हिंसेच्या भुसभुशीत पायावर उभा असतो..'
'राष्ट्रीय योजना, सामाजिक विमा अशा गोष्टी ज्या समाजांमधे अशक्य आहेत, त्याचा वाली कोण असणार..?'
'२६ जानेवारीचं संचलन बघताना एकसारखे युनिफॉर्ममधले मारायला ठेवतो- असे कोंबड्यांसारखे सैनिक. अमानुष..'
'नखं पंधरवड्याला कापावीच लागतात. कोट्यवधी वर्षांपासूनचा माणसाचा मूळ हिंस्त्रतेचा पुरावा काही शेपटीसारखा नाहीसा करता आला नाही..'
'..स्वार्थ सांभाळणार्‍याकडूनच कधीतरी परमार्थ घडू शकतो. स्वतःचं हित हेच सर्वश्रेष्ठ कर्तव्य असतं. आयुष्य ही उधळून लावायची गोष्ट नसते..'
'पुरुषासारखं अमानुष होणं स्त्रीला किती सोपं असतं! पण तेच तिला कठीण झालं आहे..'
'लिपी, घरे-रस्ते-नगरे-तटबंद्या यांच्या रचना, मुद्रा, चित्रं, मूर्ती-शिल्पं यांमागच्या जाणीवांना स्थळा-काळाच्या पलीकडचे अस्तित्व असते. त्या सार्वकालीन असतात. वैयक्तिक जाणीवा या खरं तर सामाजिक, ऐतिहासिक असतात..'

***

मडकं. त्याची खापरं. उत्खननात सापडलेली खापरं किती महत्वाची? थेट माणसाच्या अस्तित्वाशी-अंताशी जोडणारी. सांगाडा सापडणार तिथं मडकं आणि मडकं तिथे सांगाडा. आपल्या संस्कृतीचा-रीतीभातींचा, परंपरांचा पुरावा? नव्हे. आपल्या जन्माचा, अस्तित्वाचाच पुरावा. घाटदार मडकं. आत काहीही नाही. आशयशून्य घाट. जिवंत असताना संबंध युगाचा, स्थळाचा, काळाचा संदर्भ मिरवणारी डोके- मेल्यानंतर फक्त एक घाटदार आशयशून्य कवटी. मडकं. आयुष्य संपवून टाकण्याइतकं काहीच महत्वाचं नसतं, खंडेराव, तुझा वारसा केवळ तुझं घरदार जमीनजुमला शेतंशिवारं एवढाच नाही. १० हजार वर्षांपासूनचा कृषीसंस्कृतीचा हा सतत तुझ्यापर्यंत झिरपत आलेला वारसा आहे. धीर धर. ध्यान कर. दाट चिंतनात असं वारंवार शिरणं म्हणजे अज्ञाताचं कर्ज फेडण्याचाच प्रकार. अशा गुंगलेल्या अवस्थेतच खर्‍या जाणीवा समोर येतात. चंद्रावर जाणारी वाहनं निघाली असतील आजकाल. पण दोन्ही पाय झोकून कधीच कुदू नये. तुला वाचवेल तुझी स्वतःची पायवाट. ती तुला सोडून कधीच जाणार नाही. कारण तूच ती तयार करतोस..!

***
***

'हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ'
लेखक- भालचंद्र नेमाडे
पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
प्रथम आवृत्ती- २०१०
पृष्ठसंख्या- ६०३
किंमत- रु. ६५०

***
***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तब्बल सहाशे पानांचे एक समृद्ध पाल्हाळ आणि तरीही शेवटी काही तरी राहून गेल्याची, काहीतरी अधुरेच असल्याची एक अस्वस्थ टोचणीही. आपल्या जातीजमातींच्या एकमेकांत अडकलेल्या अपुर्‍या-अधुर्‍या आयुष्यांच्या कहाण्या आणि त्यांचे एकमेकांवरचे, एकमेकांच्या जन्मांनाच संपूर्णत्व देणारे समृद्धसुंदर परावलंबित्वही. हिंदू म्हणून जन्माला आल्याचा, आयुष्यभर तोंडाची चवच बनून बसलेला कडवट विखार आणि या धर्मातल्या कधीही नीट न उमगलेल्या नितांतसुंदर गोष्टींचे मधाळ चवीचे निरूपणही. वारसा म्हणून पदरी पडलेल्या रीतीभातीपद्धतींतला निराशाजनक फोलपणा आणि पूर्वापार, बापजाद्यांपासून चालत आलेल्या अनंत आचाराविचारांतलं सौंदर्य आणि अर्थपूर्ण परिपूर्णपणही. आपल्या जातिव्यवस्थेतल्या सार्‍या जगाने धिक्कारलेल्या आणि आपल्या प्रगतीच्या रस्त्यातली कायमची धोंड बनून बसलेल्या करंट्या उतरंडीचा भयानक वास्तवपट आणि या उतरंडीमुळेच सहजसुलभ झालेल्या आपल्या जगण्याच्या प्रक्रियेचा मनमोहक चित्रपटही. >>>>

तुला याबद्दल १०० मार्क्स. परफेक्ट सारांश.

आणि तुझं अभिनंदन 'हिंदू'वर रसग्रहण लिहायचं धाडस केलंस. मर्यादित शब्दसंख्येचं भूत मानेवर असताना मला 'हिंदू' या खूप आवडलेल्या कादंबरीकडे मनात असूनही वळणं केवळ अशक्य वाटत होतं. दुसरं कोणी करेल अशीही आशा वाटेना. तु छानच पेलून नेलं आहेस हे आव्हान.

शर्मिलाला, संपूर्ण अनुमोदन

आणि +१ म्हणजे,
साजिरा, तू "श्री नेमाडे" ह्यांचं पुस्तक निवडलंस... तिथेच तुझे अभिनंदन!
त्यांची लिखाणशैली, रुढ पद्धतींच्या पार पलीकडे आहे, मतितार्थ जाणून घेऊन ते व्यक्त करणे अवघडच...

पुनश्च अभिननंदन तुझे!! Happy

शर्मिला +१.
पंधराशे शब्दात हिंदु बद्दल लिहायचे धाडसच थोर.

सुरेख लिहीलेस साजिर्‍या.

खरंतर पुस्तक पूर्ण झाल्याशिवाय अवाक्षर काढु नये त्याबद्दल. पण 'हिंदू' 'घडायला' हवी एकदा प्रत्येकाला असे कळकळीने वाटते.
- Poetry meets skepticism ही नेमाड्यांच्या शैलीची खासियत वाटते. 'रोशन सूर्य' या पहिल्याच काही ओळींपासून ती ठाव घेते. तो जो 'आता- या- जगाचा -अन्वयार्थ - तरी -कसा- लावायचा' संघर्ष ते मांडतात ना आणि ज्या शब्दातून मांडतात, एखाद्याच्या अंगातून जखमांमुळे रक्त गळावे तशी खंडेराव/पांडुरंग/चांगदेवाची ही वेदना जवळची वाटते. ती आपण अनुभवली नाही तर नेमाड्यांचे काही बिघडत नाही, आपले मात्र बिघडेल.
- या नायकांच्या जाणिवा (sensibilities) नागरी आहेत आणि पाळेमुळे रुढीप्रिय. आणि नेमाडे थांबतात ते नेहमी अपरिहार्यतेच्या काठावर का? तरूणपणीनंतरचे खटले आणि रेटावे लागणारी ती पुढली चाळीसेक वर्षे यांच्या तडजोडी ते नायक निभावतात तरी कसे? निबर कडवट बनतात पुढे, की हॅहॅहॅहॅ ? खंतावत राहतात पुढे की वंशवृद्धीत गाडुन घेतात ? प्रत्येक कादंबरीत त्याच वळणांवर (being vs becoming) का येऊन थांबते ?
सारखे तिथवरच थांबल्यामुळे होते काय की वाचकाला चांगदेवावर पांडुरंगाचा आणि खंडेरावावर दोघांचा काहीसा प्रभाव वाटत राहतो. एक कादंबरीकार म्हणून नेमाड्यांनी याचा विचार करायला हवा. ६ही कादंबर्‍यांत 'बाहेरून आत पहात राहणे, स्वतःला सोलत, साले काढत अनेक पातळ्यांवर शोधत राहणे ' या पद्धतीने नायकांचे भावजीवन साकारताना मग साम्यस्थळे जास्त होतात. उदाहरणार्थ father complex.
- शैलीच्या बाबतीत नेमाड्यांचा हात धरणारे कोणी नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले
- 'हंऽ मग पुढे काय झाले' या एकरेषीय पद्धतीने वाचायला गेल्यास अवघड होऊन बसेल. ती अपेक्षाच न ठेवणे एकुणात. आणि पट मोठा आहे, त्यामुळे काळजीपूर्वक वाचणे.
- भास्करने आधी लिहील्याप्रमाणे मलाही हिंदूचा feel तरूण वाटला, आणि नेमाड्यांचे कौतुक वाटले.
- नेमाड्यांकडुन नवीन विचार मिळाला नाही असे होत नाही आणि हिंदूमध्येही ते तसे होत नाही. मलातरी प्रत्येकवेळा त्यांच्याकडुन नवीन काहीतरी मिळते.

साजिरा ~

तुमची माझी ओळख नाही आणि तसे पाहिल्यास मीही 'मायबोली' वर नवाच आहे. पण आता या क्षणी इतकेच सांगतो की कधीकाळी तुमचीमाझी समोरासमोर भेट झालीच तर त्यातील ९९% भाग केवळ 'हिंदू' वर बोलण्यासाठीच होईल.

२३ जुलै २०१० ला पॉप्युलरकडून भालचंद्र नेमाडे यांच्या सहीनिशी कुरिअरमार्फत 'हिंदू' घरी आली आणि पुढील आठवडा मी वाचनाच्या नशेत घालविला होता. जो जो भेटेल त्याला विचारत गेलो की, 'हिंदू वाचलीस का?" आणि त्यांच्या चेहर्‍यावरील नकारार्थी भाव पाहून मनी खिन्नही होत गेलो. पुढे पुढे तर असे झाले की, जो कुणी या कादंबरीबद्दल चार चांगले शब्द बोलेल तो इतरांच्या दृष्टीने गुन्हेगारच झाला. 'कादंबरी अशी फसली, तिथे नेमाडे घसरले, ही कादंबरीच नव्हे, कशाला ३० वर्षे लावली ? कसले पाल्हाळ लावले आहे...!!" इ.इ. अशा तर्‍हेवाईक प्रतिक्रिया विविध माध्यमातून प्रकाशित होत गेल्या. मला वाटते कित्येक मराठी संस्थळावरदेखील 'हिंदू" + नेमाडे यांच्याविरुद्ध लिहिण्याची जणू काही अहमहमिकाच लागली होती.

.,..आणि अशा कोंदट वातावरणात आज हे खासा न्याय देणारे रसग्रहण वाचले आणि अतोनात आनंद झाला.

'कोसला' चे हस्तलिखित वाचल्यावर पंचविशीतील भालचंद्र नेमाडे याना प्रकाशक रा.ज.देशमुख नाराजीने म्हणाले होते, "अरे, ही कशी काय कादंबरी, यात कुठे नायिका नाही." खांडेकर-फडके-माडखोलकर यांच्यासमवेत पंगतपान घेतलेल्या देशमुखांना तो एक युवक मराठी कादंबरीचे पिढ्यानपिढ्याचे संकेत मोडीत काढीत आहे हे उमगणे शक्यच नव्हते....आणि आज जवळपास ५० वर्षानंतरही मराठी साहित्याविषयीचा वैचारिक दृष्टीकोन फारसा बदललेला दिसून येत नाहे, हीच बाब 'हिंदू' वर बरसण्यास कारणीभूत झाली असल्याचे तीवर झालेल्या टीकेवरून प्रत्ययास येते. कोसलाच काय पण त्यापुढील बिढार जरीला झूल यातही नायिका नाहीच. मग 'हिंदू' तही तेच. पण वाचकाला ती बाब अजिबात खटकत नाही.

'हिंदू कादंबरी' आणि तिचा आवाका [निव्वळ पृष्ठसंख्याच नव्हे तर कथानकाचा काळ आणि शेकडो पात्रांचा वावर] पाहता रसग्रहण स्पर्धेच्या नियमावलीशी समांतर जाईल याची सुतराम शक्यता नव्हती. असे असूनही साजिरा यानी ते अत्यंत यथार्थपणे करून दाखविले आहे यात संदेह नाही.

{काहीसे अवांतर :

१) "लभान" बरोबर आहे. बंजारा जमातीतील चार प्रमुख गट : मथुरा, चरण, लभान आणि धाडी. पैकी फक्त मथुरा बंजारा हे शाकाहारी असून बाकीचे तसे नाहीत. "लमाण" ही यांच्यातील उपजात....मिश्रही म्हटले जाते. लमाण हे फिरते विक्रेते तर लभान [पुरुष आणि स्त्रीयाही] प्रामुख्याने आक्रमक आणि स्वतःला राजपूत म्हणवून घेतात. पेंढार्‍यांशी यांचे हाडवैर. त्याचाच संबंध नेमाड्यांनी हिंदूत उल्लेखिलेला आहे.

२) रसग्रहणात 'खंडेराव' चा उल्लेख तुम्ही 'खंडेराव विठ्ठल' असा केला आहे. कथानकात नायकाचे पूर्ण नाव "खंडेराव विठ्ठल कुंडलीक" असे आहे.}

असो. एका चांगल्या लेखकाच्या तितक्याच चांगल्या कादंबरीचा इतका छान परिचय इथल्या सदस्यांना करून दिल्याबद्दल श्री.साजिरा यांचे अभिनंदन.

अशोक पाटील

छान रसग्रहण. आतापर्यंत आलेली परिक्षणं/रसग्रहणं वाचल्यावर हिंदू वाचावी की नाही संभ्रमात होते. आता मिळवून वाचेन नक्की Happy

पुन्हा वाचले साजिर्‍या. तुझे आभार.

औद्योगिक व्यापारी महानगरी लोकांच्या उन्मूलित भुतवळीत शिरणं काही फार कठिण नसतं. लाखो लोकं ते करतच असतात. पण खंडेराव तू इतका क्षुद्र नाही आहेस. घराला अंगण आणि दारी पिंपळ ही तुझी ओळख.
रुखमाकाकु ऐन पेरण्यात गचकते. चिंधीचे हाल..' कुंडलिका आमचे ऐक. एवढी हयाकया घेऊ नको. जन्मोजन्म पाप राहतं हे. अरे नशीबच ते..''

पाणी काढतात हे भाग.. खंडेराव अलिच्या गढीवर तार्‍यांखाली अर्धवट जागा अर्धवट झोपलेला असतो तो भाग.. सांगायचे म्हणले तर किती सांगु असे होते..

वाचताना अर्थ लागत नाही असे होणार नाही (संगती लागत नाही असे मात्र होऊ शकेल). वेगवेगळ्या पात्रांच्या सुखदु:खात तुम्ही गोवले जाल आपोआप. हाँ, पटावर ते नेमके कुठे येतात आणि का.. या हजारो कहाण्यांचा परस्परसंबंध काय, इथे थोडीशी अडचण येऊ शकते.. पण दॅटस ओके. पुन्हा वाचायचा तो भाग.

आवडणे, न-आवडणे ही फार पुढची पायरी झाली. You can't miss it.

साजिर्‍या, छान लिहिलं आहेस रसग्रहण. Happy मी हे पुस्तक वाचायची शक्यता फार म्हणजे फारच कमी आहे पण जी काही आहे ती हे लेखन वाचून निर्माण झालेली आहे.

तू "श्री नेमाडे" ह्यांचं पुस्तक निवडलंस... तिथेच तुझे अभिनंदन!
त्यांची लिखाणशैली, रुढ पद्धतींच्या पार पलीकडे आहे, मतितार्थ जाणून घेऊन ते व्यक्त करणे अवघडच... >>>>>
नेमाडे थांबतात ते नेहमी अपरिहार्यतेच्या काठावर का? तरूणपणीनंतरचे खटले आणि रेटावे लागणारी ती पुढली चाळीसेक वर्षे यांच्या तडजोडी ते नायक निभावतात तरी कसे? निबर कडवट बनतात पुढे, की हॅहॅहॅहॅ ? खंतावत राहतात पुढे की वंशवृद्धीत गाडुन घेतात ? प्रत्येक कादंबरीत त्याच वळणांवर (being vs becoming) का येऊन थांबते ? >>>>>
Poetry meets skepticism ही नेमाड्यांच्या शैलीची खासियत वाटते. >>>>>>

नेमाडेप्रेमी हे असलं काहितरी लिहितात/बोलतात आणि मग आमच्यासारखा (प्रथमपुरषी बहूवचनी) सामान्य वाचक नेमाडेबिमाडेंच्या वाट्याला जायला घाबरतो... Proud

नेमाडेप्रेमी हे असलं काहितरी लिहितात/बोलतात आणि मग आमच्यासारखा (प्रथमपुरषी बहूवचनी) सामान्य वाचक नेमाडेबिमाडेंच्या वाट्याला जायला घाबरतो >>>> अनुमोदन Happy

अप्रतिम Happy
खूप आनंद, समाधान मिळालं हा लेख वाचून.
एखादं पुस्तक वाचणे आणि त्या पुस्तकाबद्दलचा एखादा उत्तम परिचयपर / रसग्रहणात्मक लेख वाचणे या दोन पूर्णपणे निराळ्या गोष्टी आहेत माझ्यासाठी. They don't go hand in hand for me. 'हे असं का?' असा प्रश्न जर मला कुणी कधी विचारलाच तर मी हा लेख आणि प्रत्यक्ष कादंबरी या जोडीचं उदाहरण देईन. Happy

रैनाच्या दोन्ही पोस्टी आवडल्या. पण तोंड भरून अनुमोदन परागच्या पोस्टीला Proud

अर्र,
असं झालय होय. Lol
मी उडवते माझ्या पोस्टी. मग वाचावेसे वाटेल का?

मी जे लिहीले ते नेमाड्यांच्या पाचतरी कादंबर्‍या एकापेक्षाजास्त वेळा वाचून. त्याचा संदर्भ लागणार नाही एकदम. साजिर्‍याचे आणि माझे हिंदुवर बरेच बोलणे झाले आहे याआधी.
कथानक, रसग्रहण त्याने सुरेख मांडले आहेच. पूर्वपिठिका तयार आहे, म्हणुनच फक्त नेमके काय खटकते तेही लिहावेसे वाटले, म्हणजे वाचकांना एका पानावर सर्व संदर्भ राहील. असो.

दुसरे, वाचूनही आवडणार नाही ही शक्यता आहेच. कदाचित पुन्हा काही वर्षांनी तिकडे पावले वळतील पुन्हा. There is nothing to lose.

तिसरे अचानक पहिल्याफटक्यात फुलमॅरॅथॉन शेकडा किती टक्के लोकांना पळता येईल? दमादमाने स्टॅमिना (रियाज) वाढवावा लागतो, तसेच हे की. पहिले पाऊल मात्र टाकायला हवे.

चौथे, emperor's new clothes सारखे लोकं उगाच नेमाड्यांचे कौतुक करतात पण खरे म्हणजे ते फाल्तू आहेत असे त्यांचे टीकाकार सुद्धा म्हणणार नाहीत.
आणि नेमाड्यांची कसली हव्वा?

बरं मी उद्या हॅरीपॉटर बद्दल लिहीले तर तुम्ही ते वाचणार नाही का? तुम्हाला एकतर हॅरीआवडेल किंवा आवडणार नाही. अर्ध्या तरी जगाला तो आवडतो.. मग काय? काहीच नाही.
म्हणजे पुस्तक वाचायचे की नाही हा निर्णय आपला कुठेतरी आधीच झालेला असतो. कोणी काही म्हणुन लिहुन फारसा फरक पडत नाही. Happy

तरीही शेवटी काही तरी राहून गेल्याची, काहीतरी अधुरेच असल्याची एक अस्वस्थ टोचणीही. आपल्या जातीजमातींच्या एकमेकांत अडकलेल्या अपुर्‍या-अधुर्‍या आयुष्यांच्या कहाण्या आणि त्यांचे एकमेकांवरचे, एकमेकांच्या जन्मांनाच संपूर्णत्व देणारे समृद्धसुंदर परावलंबित्वही. हिंदू म्हणून जन्माला आल्याचा, आयुष्यभर तोंडाची चवच बनून बसलेला कडवट विखार आणि या धर्मातल्या कधीही नीट न उमगलेल्या नितांतसुंदर गोष्टींचे मधाळ चवीचे निरूपणही. वारसा म्हणून पदरी पडलेल्या रीतीभातीपद्धतींतला निराशाजनक फोलपणा आणि पूर्वापार, बापजाद्यांपासून चालत आलेल्या अनंत आचाराविचारांतलं सौंदर्य आणि अर्थपूर्ण परिपूर्णपणही. आपल्या जातिव्यवस्थेतल्या सार्‍या जगाने धिक्कारलेल्या आणि आपल्या प्रगतीच्या रस्त्यातली कायमची धोंड बनून बसलेल्या करंट्या उतरंडीचा भयानक वास्तवपट आणि या उतरंडीमुळेच सहजसुलभ झालेल्या आपल्या जगण्याच्या प्रक्रियेचा मनमोहक चित्रपटही. >>> सुंदर रे मित्रा!

मला साजिर्‍याचे रसग्रहण आवडले. मी नेमाड्यांच्या टिकाकार नाही वा नेमाड्यांची पालखी मिरवणाराही नाही. (सध्या हे दोनच वर्ग दिसतात) नेमाड्यांनी माझी वाचक म्हणून निराशा केली ती दुसरीकडे लिहिली आहे. मला नेमाड्यांच्या शैली विषयी बोलायचे आहे, पण ते दुसरीकडे बोलेल.

साजिर्‍या परत एकदा परिक्षण म्हणून चांगले लिहिलेस हे मात्र नक्की सांगेन.

एका पुस्तक खरेदी प्रदर्शनात गेलो तर तिथे समोरच 'हिंदू' पुस्तक पाहीलं. मुळात त्याच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंग, नेमाडेंची आयबीएन वरची मुलाखत ह्या सगळ्यांमुळे आजही हिम्मत होत नाही 'हिंदू' वाचण्याची.
इथे 'हिंदू' बद्दल वाचुन भिती कमी झालेली असली तरीही नेमाड्यांची आधीची काही पुस्तकं वाचूनच हिंदू वाचण्याचं धाडस करावसं वाटतयं.

अतिशय सुरेख रसग्रहण साजिर्‍या. कादंबरीच्या कथानकाचा आढावा, त्यामागची भुमिका-समाजिक संदर्भ, कादंबरीची शैली वगैरे विविध सौंदर्यस्थळे, बुलेट पॉइन्ट्स तुझ्या रसग्रहणात आले आहेत. उत्तम, परिपुर्णतेच्या जवळ जाणारे (दिलेल्या शब्दमर्यादेत).

मी ही कादंबरी अर्धीच वाचली आणि इकडे यायच्या सामानाच्या मर्यादेत ती भारतातच राहिली. पण त्यातून जी शैली जाणवत राहते ती खरेच प्रगल्भ आहे. जसे मार्क्वेला त्याच्या विस्कळीत, आवर्ती शैलीबद्दल (A hundred years of solitude) गौरवले जाते त्याचप्रमाणे ह्या पुस्तकात कथा सांगण्याच्या शैलीचा सुंदर प्रयोग केला आहे असे माझ्या अर्धवट वाचनावरून मला वाटले.

मागे एकदा चिनूक्सने एका दैनिक/पुरवणीतल्या 'हिंदू'च्या परिक्षणाचा दुवा दिला होता. तीत 'हिंदू'तील तपशिलांचे, घटनांच्या उल्लेखलेल्या काळाचे दाखले व त्याची प्रत्यक्ष घटलेल्या घटनांबरोबरची विसंगती खूप तपशिलात दिली होती. जर ते बरोबर असेल तर तपशिल/काळ ह्यांचे संदर्भ चुकीचे असणे हा मोठा दोष आहे असे म्हणावे लागेल.

नेमाडे काय, आरती प्रभू काय वा इतर एखादे अभिजात पण प्रथमदर्शनी/प्रथमवाचनी 'अवघड' साहित्य काय, रैनाने म्हटल्याप्रमाणे >> अचानक पहिल्याफटक्यात फुलमॅरॅथॉन शेकडा किती टक्के लोकांना पळता येईल? दमादमाने स्टॅमिना (रियाज) वाढवावा लागतो, तसेच हे की. पहिले पाऊल मात्र टाकायला हवे. >>, रियाझ पाहिजेच. पण इथे अजून एक मुद्दा येतो. जर एखादा केवळ रंजनासाठी वाचत असेल तर त्याने मॅराथॉन पळण्याची तयारी का करावी? उर फुटेस्तो का धावावे? त्यामुळे प्रत्येकाच्या वाचनाकडून (हेच इतर कलांबाबतही दिसेल उदा: चित्रपट, चित्रकला, संगीत) असलेल्या अपेक्षाच वेगळ्या असल्याने सर्वांस एखादी कलाकृती समजावी वा त्यादिशेने प्रत्येकाने धावावे अशी अपेक्षा चुकीची ठरते. पण वाचन हे आपल्या सुशिक्षिततेशी वा तथाकथित 'बुद्धि/हुशारीशी' जोडले गेल्याने (म्हणजे तसे आपल्यावर बिंबवले गेल्याने), अनेकांना न्युनगंड येतो की 'च्यामारी हे आपल्याला समजत नाही'. मग त्याच्या परिणाम एकतर असे साहित्य 'फुकाचे व्यामिश्र आहे' असे म्हणण्यात होतो वा मारुन मुटकून ते वाचण्याचा प्रयत्न करण्यात होतो. शास्त्रीय संगीत न समजणे, मॅराथॉन (वा अर्ध मॅराथॉन) पळता न येणे, पोट सुटलेले असणे व ते कमी करण्यात अपयश येणे वगैरे गोष्टी आपल्याला मराठी म.व.इं.ना तितका न्युनगंड आणवत नाहीत म्हणुन त्यावर अश्या प्रतिक्रिया दिसत नाहीत इतकेच. पुस्तकांच्या बाबतीत मात्र अश्या प्रतिक्रिया दिसत राहतात कारण 'अवघड' साहित्य समजणे - न समजणे व त्याच्याशी निगडीत असलेली आपली 'सुशिक्षीत','हुशार', खात राहते.

अभिनंदन.......इतक्या मोठ्या कादंबरीवर रसग्रहण करायचे तर वाचन तितकेच खोल असावे लागते........
छान लिहिले आहे

मी उडवते माझ्या पोस्टी. मग वाचावेसे वाटेल का? >>> ओ रैनाताई, असलं काही करू नका हो... तुमच्या पुस्तकांवरच्या पोस्टी म्हणजे ट्रीट असते आमच्यासाठी Happy

Pages