रसग्रहण स्पर्धा - वास्तव नावाचं झेंगट - लेखक : सुमित खाडिलकर

Submitted by Adm on 21 August, 2011 - 09:59

पुस्तकाचे नावः वास्तव नावाचं झेंगट
लेखक: सुमित खाडिलकर
प्रकाशन संस्था- नविन प्रकशन
प्रथम आवृत्ती- एप्रिल २०१०

वास्तव नावाचं झेंगट

इंग्रजी पुस्तकं किंवा ब्लॉगविश्वावर नजर टाकली तर असं दिसतं की सर्व वयोगटांतली लोकं आपल्या अनुभवांवर आधारित भरभरून लिहीत असतात. नोकरी करणारे, नोकरी न करणारे, विद्यार्थी , प्रवास करणारे, खेळाडू, कलाकार, तंत्रज्ञ असे कुठल्याही क्षेत्रातले असले तरी लिहितात. आपल्याला आलेले अनुभव जमतील तसे जमतील त्या पद्धतीने आणि शक्य असेल त्या माध्यमात लिहितात. मराठीतही अशाप्रकारचं लिखाण वाचायला मिळतं पण त्याचं प्रमाण इंग्रजीपेक्षा बरंच कमी आहे. इतके दिवस लिखाणातली ही 'तरूणाई' थोडीफार पुस्तकं, काही ठरावीक ब्लॉग किंवा इतर माध्यमांमधून कमीअधिक प्रमाणात दिसणार्‍या लेखनापुरतीच मर्यादित होती. पण हल्ली संपादक तसेच प्रकाशकांकडून मिळणार्‍या पाठिंब्यामुळे आणि वाचकांकडून मिळणार्‍या प्रोत्साहनामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पुस्तकं, मासिकं, ब्लॉग, संकेतस्थळं ह्या सगळ्या माध्यमांमध्ये अश्या नविन लेखकांचं प्रमाण वाढायला लागलं आहे.

नुकतच अश्याच एका नविन आणि तरूण लेखकाने, सुमित खाडिलकरने, लिहिलेलं 'वास्तव नावाचं झेंगट' हे पुस्तक वाचलं. लेखक अभियांत्रिकीचं पदव्युत्तर शिक्षण नुकतंच संपवलेला. ह्याचा उल्लेख इथे अशासाठी केला जेणेकरून लेखकाच्या वयोगटाचा आणि त्या अनुषंगाने असणार्‍या अनुभवविश्वाचा थोडाफार अंदाज यावा.
पुस्तकातली दोन प्रकरणे "मी - आम्ही- आमची टीम" आणि "वास्तव नावाचं झेंगट" एका अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची गोष्ट सांगतात. या कथांमधला कथानायक आणि त्याच्या कॉलेजमधले इतर विद्यार्थी एका सांघिक स्पर्धेत भाग घेतात आणि ती स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न पाहतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेली विद्यार्थी वयोगटाला साजेशी धडपड, त्यांना आलेले अनुभव तसेच हाती न लागलेलं आणि लागलेलं बरच काही सांगणारी ही गोष्ट. अतिशय उत्स्फूर्त आणि मुख्य म्हणजे कथानायकाच्या वयाला साजेशी लेखनशैली वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते आणि त्या प्रवासाचा भाग बनवून टाकते.

ह्यातला कथानायक हा भवानी शिक्षण मंडळाच्या प्रगती इंजिनीअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकल ब्रँचचा विद्यार्थी. परीक्षेनंतरच्या सुट्टीत ठरलेल्या एका कम्पनी व्हिजिटच्या मिटींगसाठी तो कॉलेजला जातो आणि त्यांचे सर तिथे एकदम वेगळाच विषय काढतात. 'एस.ए.इ. इंडिया' ह्या संस्थेतर्फे आयोजित 'ऑल टेरेन व्हेईकल' बनवण्याच्या स्पर्धेबद्दल ते सांगतात. कथानायक आणि त्याचा मित्र त्यात नाव देऊन टाकतात आणि नंतर त्याबद्दल विसरूनही जातात. सुट्टी संपल्यावर कळतं की त्यांच्याशिवाय अजून फक्त दोघांनी ह्या स्पर्धेसाठी नावं दिलेली आहेत. सर आणि हे चार जण ह्या स्पर्धेची कॉलेजमध्ये जोरदार प्रसिद्धी करतात, आपापल्या मित्रांना ह्यात खेचायचा प्रयत्न करतात आणि सरतेशेवटी दुसर्‍या वर्षाची सतरा आणि फक्त बाहेरून मदत करायला तयार झालेली शेवटच्या वर्षाची तीन, अशी एकूण वीस जणं गोळा होतात. ह्यातल्या कोणाला किंवा अगदी सरांनाही गाडी बनवायचा अनुभव सोडाच पण त्याबद्दल फारशी माहितीही नसते. त्यात अगदी शेवटच्या क्षणी असं कळतं की स्पर्धेचे संचालक स्पर्धेपूर्वी इंटरव्ह्यू घेणार आहेत. टीम मधल्या कोणालाच इंटरव्ह्यूला काय विचारणार हे माहीत नसतं किंबहुना काहीही विचारलं तरी सांगता येणार नाहीये ह्याची खात्रीच असते. अश्याच एका गोंधळातल्या मिटींगमध्ये रघुनाथ भावे नावाचा एक मुलगा येऊन स्वतःची ओळख करून देतो आणि पुढे "कुणाला असं वाटतं का, मी कॅप्टन बनू नये, किंवा दुसर्‍या कुणी बनावे?" असा सरळ प्रश्न विचारतो. अर्थातच कोणाकडूनही काहीच उत्तर न आल्याने हा रघुनाथ भावे टीमचा कॅप्टन बनतो आणि तिथून सुरु होते एका ध्यासाची सुरस कथा.

कॉलेजमधल्या टीमच्या संदर्भात जे जे काही घडू शकतं ते सगळं ह्या टीमच्या बाबतीत घडतं. दोन नेत्यांमध्ये मध्ये भांडणं होतात, ज्युनियर पोरांवर सिनियर्स दादागिरी करतात. काही जणं ही दादागिरी सहन करून पाट्या टाकत राहतात पण काही जण मात्र टीम सोडून जातात. सोडून गेलेल्यांपैकी काही जण तो राग मनात ठेऊन ह्या टीमच्या विरुद्ध मोर्चेबांधणी करतात. ह्या सगळ्या प्रकारांमुळे टीम आणि कॉलेजमधले शिक्षक तसच व्यवस्थापन ह्यांचे संबंध बिघडतात. कॉलेज वेळच्या वेळी पैसे तसेच इतर आवश्यक गोष्टी पुरवत नाही. टीममधली मुलं आपल्या पालकांकडून पैसे घेऊन गाडीचं काम पुढे नेतात. अश्या परिस्थितीत पैसे देणार्‍या पण काम न करणार्‍या मुलांशी काम करणार्‍या मुलांना जुळवून घ्यावं लागतं. स्पर्धेच्या सुरुवातीला सगळेच जण भन्नाट कल्पना लढवून डिझाइन करतात पण ते प्रत्यक्षात उतरवणं जवळजवळ अशक्य ठरतं. मग ऐनवेळची धावपळ. त्यात तोंडावर आलेल्या परीक्षा. काही जण एखाददोन पेपर बुडवतात मात्र गाडी चाकांवर पळवायचीच ह्या एका इर्ष्येने पेटून उठतात. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडतो. जे जे शक्य होईल ते ते शेवटच्या क्षणापर्यंत केलं जातं मात्र स्वप्न १०० % पूर्ण होतंच नाही. कल्पनांच्या कितीही भरार्‍या मारल्या आणि ध्येयपूर्तीचा कितीही ध्यास घेतला तरी वास्तव नावाचं झेंगट त्यांच्या स्वप्नाच्या आड येतं !
पुढच्या वर्षी टीम नव्या दमाने कामाला लागते. आदल्या वर्षी झालेल्या चुका टाळायची जबाबदारी कथानायक आपल्या खाद्यांवर घेतो, नवे वर्ष, नवी टीम आणि त्यांच्या पुढच्या नव्या समस्या ! फक्त आता गाठीशी असतं एका वर्षाच्या अनुभवाचं पाठबळ आणि आदल्यावर्षीच्या चुका टाळण्याचा निश्चय. टीमचा नविन वर्षातला स्पर्धेच्या दिवसापर्यंतचा प्रवासही अतिशय रंजक आहे. कथानायक म्हणतो, "पहिलं वर्ष स्वप्नवत होतं तर दुसरं वास्तव. या वेळी आम्ही आंधळेपणाने झपाटून नाही तर डोळसपणे कष्ट केले होते. पण त्यामुळेच बहूतेक ह्यावेळी कमी मजा आल्यासारखं वाटतं होतं."

काही काही प्रसंग लेखकाच्या शैलीमुळे तसेच नाट्यमय वर्णनांमुळे आपल्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे रहातात. पहिल्यांदा गाडी चाकांवर चालवली जाते त्या प्रसंगाचं वर्णन वाचताना आपल्यालाही स्फुरण चढतं. स्पर्धेच्या दिवशीची धावपळ, ऐनवेळची कामं आपल्याला तिथल्या वेगवान वातावरणात घेऊन जातात. लेखकाने पुस्तकात सांगितलेते इंजिनीयरिंग कॉलेजमधल्या शिक्षकांबद्दलचे अनुभव तर अगदी वास्तवदर्शी आहेत.
कॉलेजमधल्या शिक्षिकेशी संबंध बिघडलेल्या एका मुलाला लेखी परिक्षेत ७० मार्क मिळतात मात्र कॉलेजमधल्या शिक्षकांच्या हातात असलेल्या त्याच विषयाच्या तोंडी परीक्षेत तो नापास होतो. ह्या प्रसंगाबद्दल लेखक म्हणतो, "लायकी नसताना अधिकार मिळाले तर काय होतं याचं आमच्या मॅडम जिंवत उदाहरण होत्या."
किंवा अनेक वर्ष शिक्षकी पेशातच असलेले आणि बाहेरच्या कॉर्पोरेट जगात काय सुरु आहे ह्याची फारशी कल्पना नसलेले एक सर कथानायकाला टीमचा "मॅनेजर" कसा असावा ह्या बद्दल बरच काही ऐकवतात. ह्या प्रसंगाबद्दल लेखक लिहितो, "सर मला मॅनेजर बनवायच्या दृष्टीने लेक्चर द्यायला लागले. माझा टीशर्ट किंवा वरची एक दोन बटणे उघडी ठेवलेला, बाह्या फोल्ड केलेला शर्ट, जीन्स, सँडल, हातातलं कडं, गळ्यातला गंडा, चेहेर्‍यावरची बेफिकिरी, एवढंच काय पण माझी चालण्याची पद्धतसुद्धा 'त्यांच्या' मॅनेजरच्या श्रेणीत बसणारी नव्हती. त्यांना माझं हसणं सुद्धा मॅनेजरसारखं वाटायचं नाही. ते मला म्हणाले होते हसताना माझे डोळे खूप बारिक होतात. भरपूर मोठं लेक्चर ऐकून मला हसावं की रडावं ते कळेनासं झालं. रोहन मात्र पोट धरून हसत होता." अर्थात पुस्तकातले हे विद्यार्थी फक्त शिक्षकांच्या विरोधातच आहेत असं नाही. तसच या मुलांच्या वयाला अनुसरून असणारा समजुतदारपणा दाखवणारे काही प्रसंगही लेखाकाने भाषेचा बाज न सोडता लिहिले आहेत. एका प्रसंगात लेखक लिहितो, "त्यांना चढलेल्या धुंदीचा हेवा वाटून मलाही क्षणभरासाठी बडवायजरचा मोह झाला, पण मी तो यशस्वीरीत्या आवरला. जवळपासचा काही नातेवाईकांचा इतिहास ह्या बाबतीत चांगला नव्हता आणि तो आठवला की, मला या गोष्टीचा मोह आवरता यायचा. माझ्यासमोर माझ्या आईचा चेहेरा यायचा आणि मग मी असं काही करणं अशक्य व्हायचं. मी दारू प्यायल्याचं आईला नुसतं कळलं, तर तेव्हड्यानंच तिला काही तरी होऊन बसलं असतं."

स्पर्धेबद्दलची कहाणी सांगताना लेखक टीममधल्या मुलांची व्यक्तिचित्रं आपल्या डोळ्यासमोर उभी करतो. विषयातली भरपूर आणि अचूक माहिती असलेला, समोरच्यावर छाप पाडण्याची क्षमता असलेला आणि त्यामुळेच स्वभावात उद्दामपणा आलेला टीमचा कॅप्टन रघुनाथ, रघुनाथ इतकीच माहिती असणारा पण आपलं म्हणणं दुसर्‍यासमोर न मांडू शकल्याने मागे पडणारा रोहन, 'वन मॅन आर्मी' असलेला पण मुखदुर्बळ प्रसाद, दोघांच्या भांडणात न बोलून शहाणे ठरणारे कुंटे आणि शेट्टे आणि आपल्या क्षमतांची आणि उणिवांची पुरेपुर जाणीव असणारा आणि एखादी गोष्ट मनापासून कराविशी वाटली की त्यात स्वतःला झोकून देणारा कथानायक हे सगळेच जण आपल्या अवतीभवती कुठे ना कुठे सापडायला लागतात.

ही संपूर्ण कहाणी सांगताना कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची मानसिकता लेखकाने अचूकपणे टिपली आहे. आपल्या महाविद्यालयीन जीवनात अश्याप्रकारच्या सांघिक स्पर्धांमध्ये भाग न घेतलेल्या वाचकांना
ह्या पुस्तकानिमित्त एक आगळ्या अनुभवविश्वाचं दर्शन होतं तर अश्याप्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेले वाचक नकळत "अगदी अगदी !" अशी दाद देऊन जातात. पुस्तकाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे त्यात मांडललेलं सगळं अतिशय प्रामाणिकपणे लिहिल्याची सतत जाणिव होते आणि म्हणूनच पुस्तक फार जवळच वाटतं आणि आवडून जातं !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच मस्त वाटलं तु ह्या पुस्तकावर लिहिलस म्हणून. मलाही हे पुस्तक एक्झॅक्टली त्याच कारणांसाठी आवडलं ज्यासाठी तुला आवडलय. मला लिहायचंही होतं यावर पण समहाऊ (नेहमीप्रमाणेच) ते राहून गेलं. बरं झालं लिहिलस तु आणि इतक्या छान पद्धतीने मांडलं आहेस.

इंग्रजीतल्याप्रमाणे मराठीत स्वतःच्या अनुभवांवर आधारीत लिखाण तरुणांकडून अजिबात केलं जात नाही. तरुण लेखन म्हणजे ५०+ लेखकांनी आपल्या नॉस्टेल्जियावर आधारीत केलेलं लेखन असा मराठी साहित्यातला जनरल प्रकार. म्हणूनच सुमीतचं हे पुस्तक मलाही महत्वाचं वाटलं. लिहिलय खूप जेन्युईनली. त्याचं लेखक म्हणून असणारं अननुभवीपण इथे खूप मोठं प्लसपॉइन्ट ठरतं. प्रोजेक्ट पुरा होत जाताना सुमीतचं वैयक्तिक इव्हॉल्व्ह होत जाणंही नकळत आलय आणि म्हणूनच ते खरं वाटतं.

सुरेख लिहिलंय Happy
सुरूवातीचं लेखनातल्या तरुणाईवरचं भाष्य आवडलं, पटलं.

बाकी, रसग्रहण स्पर्धेला रंग चढायला लागला आहे. Happy आता किती किती नवीन पुस्तकांसाठी वाचनालयात क्लेम लावायचे ते एक ही स्पर्धाच जाणे... Wink

छान लिहीलं आहेस पराग.
लायब्ररीत हे पुस्तक मी चाळलं होतं. इंजिनियरींग शिक्षणाची पार्श्वभूमी पाहून पुन्हा ठेऊन दिलं होतं. पण आता हे रसग्रहण वाचल्यावर पुस्तकही वाचेन.
धन्यवाद Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद सगळ्यांना. Happy
मंजूडी, इंजिनीयरिंगची पार्श्वभूमी असली तरी क्लिष्ट, बोजड नाहीये अजिबात. वाच नक्की.

रच्याकने, हा सुमित मायबोलीवर पण आहे. मागे कविता आणि बहूतेक एक दीर्घकथा प्रकाशित केली होती.

प्रिय सुमित,
तुझं हे पुस्तक तर मी वाचलंच आहे. त्याचबरोबर निर्णय ही गोष्ट पण वाचली. जर्मनीतल्या बऱ्याच ट्रिप्स मी तुझं हे पुस्तक वाचत केल्या. इतक्या प्रतिक्रिया बघून खूप छान वाटलं. आणि मराठी मातीत आणखी एक उमदा लेखक निर्माण होईल अशी खात्री पण वाटली. लवकरच तुझं नवं लिखाण वाचायला मिळेल अशी आशा करतो.