एक पलायनवादी परीकथा.
पुस्तकाचे नावः अंत ना आरंभ ही.
लेखिका : अंबिका सरकार
प्रकाशक : मौज प्रकाशन
पहिली आवृत्ती: ७ मे, २००८
स्त्रीवाद व स्त्रीवादी चळवळ हा माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय. देशी-विदेशी लेखिका, विचारतज्ञ, शास्त्रज्ञ
ह्यांनी निर्माण केलेले साहित्य व लेख वाचून मी या विषयाचे माझे ज्ञान वाढवायचा प्रयत्न केला आहे. आपल्या मराठीतही ह्या विषयावर आधारित उत्तम साहित्य उपलब्ध आहे. स्त्री लेखिकांनी स्त्रीयांच्या प्रश्नावर मोकळेपणे लिहीणे हे आता फारसे नवे राहिलेले नाही. नातिचरामी सारख्या पुस्तकांनी दिलेले धक्के आता निमाले आहेत. माहितीच्या ह्या प्रचंड ओघात काही साहित्य असे निर्माण होते की जे वरकरणी प्रांजल, नवे वाट्ते पण त्याच्या असण्याने काहीच साध्य होत नाही. एक फसवले गेल्याची रिकामी भावना उरते. अंत ना आरंभ ही हे अंबिका सरकार यांनी लिहीलेले पुस्तक अश्याच स्वरूपाचे आहे.
' एका स्त्रीच्या आयुष्याचा - खरं तर तिच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास ही कादंबरी रेखित करते. आयुष्यात अनेक नात्यांनी जवळ आलेल्या नि दुरावलेल्या पुरुषांच्या सहवासात - केवळ पुरुषांच्याच नव्हे, स्त्रियांच्याही सहवासात होरपळलं जाणं हेच यातील नायिकेचं भागधेय. पण जितकं कोसळणं तितकीच
कणखरपणे उभं राहण्याची धडपड करत, स्वतःचं घडणं, स्वत्वा:च्या हुंकारातून घडवतच राहणं ..... पुरुष प्रधान संस्कृतीच्या प्रभावाखाली आज देखील चालूच असलेली स्त्रीमनाची फरपट.... ही कादंबरीच्या नायिकेच्या जीवनव्यथेची यात्रा - तिचा चेहरा तिच्या एकटीचाच नाही तर त्यात अनेक स्त्रियांचे चेहरे प्रतिबिंबित झालेले दिसतील. ' हा परिच्छेद पुस्तकाच्या मागील कव्हरावर आहे. तथापि, पुस्तक वाचून संपे पर्यंत हा स्वत्वाचा हुंकार कि काय तो कुठेही ऐकू येत नाही. ना स्वतःच्या संसारात मग्न असलेल्या, स्त्रीवादापासून दूर असलेल्या स्वामिनीचा सुख भरला श्वास! संपूर्ण कादंबरी एका भूमिकेतून व्यक्त होते
ज्यातून फक्त रटाळरस निर्माण होतो. जेव्हा तुम्ही एखादे करमणूक प्रधान पुस्तक घेऊन सैलावून वाचत पड्ता तेव्हा त्या पुस्तकाकडून तुमची तेवढीच अपेक्षा असते. थोडा विनोद, थोडी चमकदार शैली, थोडे मनोरंजन, थोडे वैचारिक प्रबोधन. पण माझी लेखिकेकडून नक्कीच जास्त अपेक्षा होती, कारण त्या ती पुरी करू शकतील असा थोडा विश्वासही होता.
पहिल्या पानावर सुरुवात अगदी कोसलाशैलीत ' तर सर्व मुली असतात त्याप्रमाणे ही देखील तिच्या लहान वयात एक मुलगी होती अशी.' मग अपेक्षा उंचवतील नाहीतर काय. एक शैलीचा प्रकार म्हणून नायिकेचे नाव कुठेच येत नाही. ( रेबेका ह्या जगप्रसिद्ध कादंबरीतही हा प्रयोग आहे. ) तिचे नाव उषा आहे असा संभ्रम निर्माण केला आहे. पण म्हणून ती प्रत्येकीची गोष्ट होत नाही. कादंबरी ती उंची कुठेच गाठत नाही.
तिसर्याच पानावर तरूण नायिकेचे चुंबन घेउन एक मुलगा तिला आपल्या जाळ्यात अडकवू पाहतो. तेव्हा ही मला वाटले होते कि ती कसे बरे हा प्रश्न सोडवेल. एक तर कथानक विसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात सुरू होते. शारीर व्यवहारांविषयी संपूर्ण अनभिज्ञ असलेली ती एका चुंबनाच्या जोरावर त्या मुलाशी पुढे भेट्ते. पण समर्पण करण्याआधी लग्न गरजेचे आहे असे त्याला सांगते. मुलाला फक्त तिच्या
शरीरातच रस असतो. तो तिला व्यवस्थित अडकवितो. ती ही त्याच्या सांगण्यावरून त्याला प्रेम असल्याची लेखी कबुली देते. आपण त्याच्यावर प्रेम करत नाही हे माहित असताना. मग घरचा विरोध पत्करून लग्न होते व लगेचच ही घोड्चूक आहे असा तिला साक्षात्कार होतो. माहेर तुट्ते व ती सासरी जमवून घेते. पतीकडून मिळणारी असह्य वागणूक सहन करत शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळविते व अपंग मुलीसकट घर सोडायचा निर्णय घेते. लगेच पुरुष नं. दोन तिच्या आयुष्यात हजर होतो. हा केवळ शारीर स्वरूपाचा मित्र. ( तेरुओ, विश्वनाथ, इअन प्रभुती आठवा) पण तेही तिला लाजिरवाणे वाटते व ती त्याला तोडते - एका भेटी नंतर. मग पुरुष नं. तीन हा विधूर वकील एक पुत्र असलेला. की ती त्याच्याशी लग्न करणार हे लगेच कळते. थोडया भेटींनंतर हा ही एक उत्स्फूर्त चुंबन तिला देतो. आतापर्यंत तिला कळायला हवे कि चुंबन हा लाल दिवा आहे. मग तो पुरुष आपला गैरफायदाच घेणार. पण नाही. लग्न करते. मग सासूरवास, नणंदवास नवर्याचा मुलासाठी आग्रह. व्यवसायात गुरफटून घरी लक्ष न देणे. हिचे नोकरी चालू ठेवणे इत्यादीचे वर्णन आहे. हे फारच पेडेस्ट्रिअन स्वरूपाचे आहे. एकही प्रसंग, नाट्यमय, हृद्य,
अति दु:खद असा काहीच नाही. एका पचपचीत जीवनाचे वैतागवाणे चित्रण. ह्यालाच व्यक्तिमत्त्वाचा प्रवास वगैरे म्हणायला माझे मन तयार नाही.
पुढे मुले मोठी होतात. मुलगे अमेरिकेस जातात व मुलगी मित्राबरोबर लग्नाशिवाय सहजीवन स्वीकारते.
हिचा नवरा चिडचिडा, एकलकोंडा होत जातो. हिची नोकरी चालू राहते. ते अमेरिकेत मुलाच्या मुलीला भेटायला जातात. दोन पाने अमेरिकेचे कौतुक प्रवाश्यांच्या नजरेतून. ते गाळून मग पुढे ही नात चार वर्षाची होते व तिचा खून होतो कि लगेच अमेरिका वाइट. हे उगीच फोड्णी म्हणून घातले आहे असे वाट्ते किंवा एनाराय वाचकवर्गाला आपलेसे करण्यासाठी. त्या मुलीला कधी तानी म्हणतात तर कधी तान्ही.
ही मुद्रणातली चूक खटकली.
ह्या दरम्यान नायिका ग्लोरिया स्टाइनेम, फ्रीडा व( लेखिकेला माहित असलेल्या इतर स्त्रीवादी दिग्गजांची ) इतर लेखिकांची स्त्रीवादावरील पुस्तके वाचते. पण त्यातून तिच्यात काहीही वैचारिक किंवा प्रत्यक्ष
क्रांती होते असे दिसत नाही. उगीच नावे माहीत आहेत हे सांगितलेले आहे.
नवरा पक्षघाताने आजारी पडल्यावर ती त्याच्या सेवेत अडकते. एकटी पडणार असे दिसत असतानाच मुलगी व तिचा मित्र तिच्या बरोबर येऊन राहायचे नक्की करतात व ती मरणाचा निर्णय त्याच्यावर सोडून शांत होते.
बायकांच्या आयुष्यात येणारे सर्व स्टिरिओटाइप्स व त्यांची तीच विश्लेषणे पुस्तकात आलेली आहेत.
१) ताई: सर्व समावेशक सोशीक सासू. कायम पड्ते घेणार. वाया गेलेल्या मुलावरही रक्ताचे नाते आहे म्हणून प्रेम करणार.
२) चैतन्यः प्रत्येक स्त्रीच्या मनात असलेला सोल मेट. पक्षी कान्हा. तो ही शेवटी राधेकडे कुठे आला? प्रत्येक गोपी बरोबर कसे काय रास खेळत असे असे बालिश प्रश्न नायिकेच्या मनात उपस्थित करून त्यांची उत्तरे दिली आहेत. हा लग्नापूर्वी तिच्या जीवनात येतो व घटस्फोटाच्या काळात तिला मानसिक आधार दिल्यासारखे करतो. म्हणजे ती गैरसमजूत तिच्याच मनात असते. त्याला तिच्याबरोबर परगावी जाण्यातच रस असतो.
३) विद्या: उच्च शिक्षित सहजीवन स्वीकारणारी व तरूण मित्राला शेवटी सोड्णारी मैत्रीण. नायिकेपेक्षा वेगळे जगूनही हिच्या वाट्याला सूख येतच नाही. यामुळे घरी पुस्तक वाचणार्या बंद डोक्याच्या स्त्रीयांना
आपलेच जीवन बरे. कशाला अस्ली थेरं हवीत असा दिलासा मिळेल कदाचित.
४) आई: तुटक, पतिपरायण. हिच्यासाठी म्हातार्या विधूराचे स्थळ घेउन येणारी. रूढी पाळणारी.
५) नणंदः डॉक्टर पण स्वभावाने कोरडी. यशस्वी.
६) मोहकः शारीर मित्र. ती अनुभव घेते पण गुंतत नाही. मग सर्व प्रकरणाचा उद्देश काय? नो आयडिया.
७) छाया : फसविणार्या नवर्याला परत घेणारी मैत्रीण. पुरुषाचा आधार गरजेचा आहे असे मानणारी.
फक्त मुलगी निर्भया जी मुकाट पणे हिच्या घरी वाढते व हिला आधार असते तिच्यातच एक स्ट्रेंग्थ ऑफ
कॅरेक्टर आहे. ही खरेतर निर्भयाची गोष्ट् म्हणूनच वाचावी.
पूर्ण पुस्तकात आपण कुणावर नक्की प्रेम करतो. हा प्रश्न नायिकेस सतवितो. व ती एकेक पुरुषास वगळत जाते. शारीर स्त्रावांमुळे जे वागणे भावना होतात त्यालाच बरेच जण प्रेम समजतात. खर्या प्रेमाची अनुभूती कोणास ठाऊक कशी असते. इत्यादी वर दीड पान विवेचन आहे. पण तोपर्यंत कथानकातील हवा गेलेली आहे. अनरॉमँटिक डिस्पॅशनेट असल्याचा आव आणला तरी आतली रोमँटिक मानसिकता लपत नाही.
जेव्हा तुम्ही ब्लर्ब मध्ये कणखर पणे उभं राहण्याची अखंड धड्पड वगैरे लिहीता तेव्हा पुस्तकाने ते देऊ केले पाहिजे नाही का? इथे कथानक कमी पड्ते. सुरुवातीपासून शेवट्पर्यंत एकाही प्रसंगात नायिका आसूसून परिस्थितीला भिडली आहे. तिचा कस लागतो आहे असे होत नाही. ती फक्त सर्वात कमी विरोधाचा मार्ग पत्करून एका उथळ पातळीवर जगत राहते. कणखरपणा, परिस्थितीला विरोध करून ती बदलणे,
लढा देणे इत्यादी दूरच राहिले. पहिला नवरा तिला अत्याचार करून, व्यभिचारी ठरवून घरातून बाहेर काढतो तरीही त्याच्या बद्दल तिला उच्च कोटीचा संताप,तिरस्कार असे काहीच वाट्त नाही. तो फक्त गैरहजर राहावा असे तिला वाट्ते. कुठेच ती पॅशनेट, पिसाळून उठलेली रागावलेली, भावनाप्रधान अशी सामोरी येत नाही.
सगळ्याच तश्या नसतात असे मानले तरीही जेव्हा अश्या प्रसंगी स्वतःचा कस लागतो तेव्हा तरी व्यक्तिमत्वातील खोली प्रकट व्हावी नाही का?
आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणे व मग त्यातून अर्थ काढत बसणे हा तिचा छंद दिसतो. ते पुढे कंटाळ वाणे होते. कव्हरवर प्रॉमिस केलेली आत्यंतिक उत्कटता दिसून येत नाही. एक मुलगी सोडली तर तिचे कुठेच दृढ नाते निर्माण होत नाही. निसर्ग, साहित्य, राजकारण, सामाजिक परिस्थिती यांपासूनही ती
अंमळ दूरच आहे. वरवर स्त्रीवादी वाटले तरी हे लेखन स्त्रीयांना त्यांनी पॅसिव राहावे, परिस्थिती समजून स्वीकारावी, असाच संदेश देते. ही ह्या पुस्तकाची शोकांतिका आहे.
अनुभवी तसेच नव्या जोमाच्या स्त्री लेखिकांनी त्यांच्या मनावरचे हे स्त्री असण्याचे, स्त्री म्हणूनच
जीवन स्वीकारण्याचे व व्यक्त करण्याचे ओझे बाजूला ठेऊन एक माणूस म्हणून जीवनाला सामोरे जायचे
ठरविले तर त्यांच्या हातून जास्त व्यापक, सखोल निर्मिती होईल.
धन्यवाद
अश्विनी खाडीलकर
मस्त लिहिले आहे अश्विनीमामी,
मस्त लिहिले आहे अश्विनीमामी, हा असला फसवा, पलायनवादी स्त्रीवाद ७०-८० च्या दशकातल्या सुप्रसिद्ध, लायब्ररीक्वीन लेखिकांच्या सोबतच संपला असं वाटलं होतं. अंबिका सरकारांकडून ही अपेक्षा खरंच नव्हती. बरं झालं पुस्तक घेतलं नाही. यापेक्षा सिरियली बघितलेल्या काय वाईट?
मस्त! एकदम बिनचूक आणि चपखल
मस्त!
एकदम बिनचूक आणि चपखल शब्दांत रसग्रहण केलंय.
खूपच छान
लय मस्त, अश्विनी 'अपेक्षा
लय मस्त, अश्विनी
'अपेक्षा नव्हती' हे खटकलं.
वा ! मस्त लिहिलत अश्विनीमामी
वा ! मस्त लिहिलत अश्विनीमामी !
अनरॉमँटिक डिस्पॅशनेट असल्याचा
अनरॉमँटिक डिस्पॅशनेट असल्याचा आव आणला तरी आतली रोमँटिक मानसिकता लपत नाही. >>
अरे कर्मा! सगळ्या तथाकथित स्त्रीवादी साहित्याचे हेच एक सार .
खल्लास लिहीलेत अश्विनीमामी.
शर्मिला- खरंच संपला? मला तर वाटतं ती हुळहुळपुस्तके तरी बरी होती, जे होते ते unpretentious तरी होते. वाचतावाचताच तिथवरच त्यांची झेप हे सहज कळायचे. आता मात्र आव असा असतो की .. त्यामुळे अजूनच भोंगळ वाटते सर्व. दुर्दैवाने आणि काहीश्या खेदाने गौरीताई यांस काही अंशी तरी जवाबदार वाटतात कधीकधी. नंतरच्यांनी नुसतीच त्यांची शैली उचलली आणि पुन्हा मागील पानावरून पुढे चालू.
अनुभवी तसेच नव्या जोमाच्या
अनुभवी तसेच नव्या जोमाच्या स्त्री लेखिकांनी त्यांच्या मनावरचे हे स्त्री असण्याचे, स्त्री म्हणूनच
जीवन स्वीकारण्याचे व व्यक्त करण्याचे ओझे बाजूला ठेऊन एक माणूस म्हणून जीवनाला सामोरे जायचे
ठरविले >>>
पण असे ठरवून काही होते का? स्त्री सोडाच पुरुषांनाही फारसे शक्य होईल असे वाटत नाही. लिंगभानाचा प्रभाव अभिव्यक्तिवर होत असला आणि बरीवाईट कशी का असेना पण निदान प्रामाणिक अभिव्यक्ती असली तरी एकवेळ ठिक आहे की.
उत्तम रसग्रहण
उत्तम रसग्रहण अश्विनीमामी.
वरवर स्त्रीवादी वाटले तरी हे लेखन स्त्रीयांना त्यांनी पॅसिव राहावे, परिस्थिती समजून स्वीकारावी, असाच संदेश देते. ही ह्या पुस्तकाची शोकांतिका आहे.
तेच ते, ये रे माझ्या मागल्या!
अनुभवी तसेच नव्या जोमाच्या
अनुभवी तसेच नव्या जोमाच्या स्त्री लेखिकांनी त्यांच्या मनावरचे हे स्त्री असण्याचे, स्त्री म्हणूनच
जीवन स्वीकारण्याचे व व्यक्त करण्याचे ओझे बाजूला ठेऊन एक माणूस म्हणून जीवनाला सामोरे जायचे
ठरविले तर त्यांच्या हातून जास्त व्यापक, सखोल निर्मिती होईल. >>> अगदी परफेक्ट आणि नेमक्या शब्दांत!
रैना, ते 'ओझे' नेमके आणि नक्की काय आहे, तेवढे नीट उमगले, तर (आणि तरच) लिंगभानाचा योग्य तो प्रभाव दिसेल की. आणि मग प्रामाणिक अभिव्यक्ती त्यामागून आपोआपच.
दुर्दैवाने आणि काहीश्या खेदाने गौरीताई यांस काही अंशी तरी जवाबदार वाटतात >> अनुमोदन.
अ.मा., सही, मार्मिक लिहिले आहेस. आवडलं.
अमा खल्लास लिहीलेत!! नेहेमी
अमा खल्लास लिहीलेत!!
नेहेमी का लिहीत नाही ओ??
एक सुखद धक्का आहे हे परिक्षण
एक सुखद धक्का आहे हे परिक्षण म्हणजे. स्त्रीने स्त्रीविषयी लिहिलेले वा तिच्या साहित्यात रेखाटलेले एक ढोबळ चित्र असे असते की पुस्तक खाली ठेवताना वाचकाने त्या मुख्य व्यक्तिरेखेविषयी उदगार काढले पाहिजे की, 'अरेरे, किती सोसले आहे या नायिकेने !" गौरी देशपांडे असोत वा मेघना पेठे वा सानिया...यांच्या बंडखोरी विचारातील स्त्री देखील शारीरसंबंधाच्या प्रतिमातच अडकलेल्या दिसतात. हा जो ठराविक विस्कळीतपणा वारंवार लेखनात डोकावतो त्यामुळेच की काय, आजही स्त्री लेखिकेने लिहिलेले जे काही साहित्य ['सत्यकथे'च्या अंतानंतर आता फक्त दिवाळी अंकातून प्रकटणारे] समोर येते त्यातील पुणे-मुंबई ही ठिकाणे बदलून दुबई-लंडन-न्यू यॉर्क-मेलबोर्न येथील प्लॉट. लक्ष्मी रोडऐवजी टाईम स्क्वेअर. बस्स..एवढाच बदल बाकी दुखणे तेच.
अश्विनी खाडीलकर यानी वरील सुंदर परिक्षणात हीच दुखरी नस पकडली आहे आणि कोणताही आडपडदा न ठेवता [पुस्तक 'मौजे'चे असूनही] अंबिका सरकार यांच्या नायिकेची तथाकथित बंडखोरी किती पोकळ आहे हे दाखविले आहे.
विभावरी शिरूरकर ते कविता महाजन असा शतकभराचा प्रवास आज आपल्यासमोर ठेवला तर [दुर्दैवाने] असे दिसून येते की लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी यांच्यासारख्या अशिक्षित/अल्पशिक्षित ते मेघना कविता यांच्यासारख्या उच्चशिक्षित लेखिकांच्या समग्र साहित्यात आपल्याला 'पांडुरंग सांगवीकर' सम एखादी साहित्यात 'माईल स्टोन' ठरू शकणारी नायिका सापडत नाही. पूर्णपणे स्त्री म्हणून विचार करून आपले [च] स्वतंत्र अस्तित्व दाखविणारी एक नायिका निर्माण करावी असे कुठल्याही लेखिकेला का वाटू नये हा खरा तर मराठी साहित्यासमोर प्रश्न आहे. सो-कॉल्ड स्त्रीवादी साहित्यातील हरेक नायिका अंती पुरुषावर - आणि तो अटळ शरीरसंबंध, मग तोंडी लावण्यापुरता तो कौटुंबिक 'सासबहू-देवरदेवराणी' कलह - अवलंबून राहणंच हेच प्रकर्षाने दिसून येते वाचकाला. मेघनाची 'नातिचरामी' तर वेगळाच विषय होईल.
अश्विनी लिहितात अंबिकाची नायिका [जिचे नाव कादंबरीत येत नाही....कसला हा अट्टाहास नाविन्याचा ? एक 'रेबेका' मध्ये शोभले ननाव नायिका त्यामुळे केवळ चूष म्हणून आपली नायिका तसली दाखविण्याने काय साधले आहे?] "लेखिकांची स्त्रीवादावरील पुस्तके वाचते. पण त्यातून तिच्यात काहीही वैचारिक किंवा प्रत्यक्ष
क्रांती होते असे दिसत नाही." ` खरंय. इतकं स्त्रीमुक्ती वा वादावरची पुस्तके वाचून ती नायिका कुठल्या पुरुषासंदर्भात कणखर झालेली आहे ? हा प्रश्न खरं तर अंबिका सरकार यानाच विचारावा असे वाटू लागले आहे.
असो. स्त्रीच्या भूमिकेतून स्त्रीवर लिहिण्याला कोणाचा काही आक्षेप असण्याचे कारण नाही, पण अंबिका सरकार यांच्या नायिकेचे दुखणे हे नव्या बाटलीत जुनीच दारू या उक्तीतील आहे हे अश्विनी खाडीलकर यानी योग्यरितीने दाखविले आहे.
अशोक पाटील
सुरेख लिहिलय ! बस्केला
सुरेख लिहिलय ! बस्केला अनुमोदन. नियमीत लिहा.
अशोक ह्यांची प्रतिक्रियाही वाचनीय.
रसग्रहण छान लिहिलय
रसग्रहण छान लिहिलय अश्विनीमामी.
अश्विनी, त्या आधी अशा
अश्विनी, त्या आधी अशा अनुभवातून होरपळून जावे लागते, तरच तसे लिहून होणार ना !
अमा, परखड शैलीत मस्त समाचार
अमा, परखड शैलीत मस्त समाचार घेतलात
आव आणणार्या बायकांचा, लेखकांचा कंटाळा येतो!
अश्विनी, खूप छान लिहिले आहे.
अश्विनी,
खूप छान लिहिले आहे. आवडले.
छान लिहिलंय. अगदी आतून आलेलं,
छान लिहिलंय.
अगदी आतून आलेलं, प्रामाणिक. एखाद्या पुस्तकानं केलेला अपेक्षाभंग फार वाईट. (माझ्याकडे आहे असं एक अ.भंगी पुस्तक. लिहावं का त्याच्यावर??)
बस्केला अनुमोदन.
मस्त लिहलंत मामी! शेवटाचा
मस्त लिहलंत मामी!
शेवटाचा पॅरा तर अगदी अगदी..
हा स्वत्वाचा हुंकार कि काय तो
हा स्वत्वाचा हुंकार कि काय तो कुठेही ऐकू येत नाही. ना स्वतःच्या संसारात मग्न असलेल्या, स्त्रीवादापासून दूर असलेल्या स्वामिनीचा सुख भरला श्वास! संपूर्ण कादंबरी एका भूमिकेतून व्यक्त होते
ज्यातून फक्त रटाळरस निर्माण होतो >> मामी, त्रिवार अनुमोदन. मी पण नेटाने वाचली ही कादंबरी, अन का वाचली म्हणून स्वत:लाच शिव्या दिल्या. अमेरिकेतल्या कोणाला ' किती वाईट आहे पाहू तरी' म्हणून हवी असेल तर सांगा. परत न करण्याच्या बोलीवर मी पाठवून देईन.
परत न करण्याच्या बोलीवर मी
परत न करण्याच्या बोलीवर मी पाठवून देईन. >>>
मामी, खूप मस्त लिहिलत. अगदी
मामी, खूप मस्त लिहिलत. अगदी अश्विनीमामी स्टाइल
बस्के, पग्या +१
आव आणणार्या बायकांचा, लेखकांचा कंटाळा येतो! >>>> बहुत करुन असेच लोक जास्त भेटतात, कुठेही गेलं तरी
अमा,मस्त लिहिलंय
अमा,मस्त लिहिलंय परीक्षण.
अनुभवी तसेच नव्या जोमाच्या स्त्री लेखिकांनी त्यांच्या मनावरचे हे स्त्री असण्याचे, स्त्री म्हणूनच
जीवन स्वीकारण्याचे व व्यक्त करण्याचे ओझे बाजूला ठेऊन एक माणूस म्हणून जीवनाला सामोरे जायचे
ठरविले तर त्यांच्या हातून जास्त व्यापक, सखोल निर्मिती होईल.
खरं आहे.
>> आतापर्यंत तिला कळायला हवे
>> आतापर्यंत तिला कळायला हवे कि चुंबन हा लाल दिवा आहे.
मस्त परिक्षण.
आवडलं. बस्के +१ लायब्ररीक्वीन
आवडलं. बस्के +१
लायब्ररीक्वीन लेखिकांच्या >>
आतापर्यंत तिला कळायला हवे कि चुंबन हा लाल दिवा आहे>>
मस्त लिहिलंत अमा. बस्के +१
मस्त लिहिलंत अमा.
बस्के +१
अंत ना आरंभ ही. याचा अर्थ "ना
अंत ना आरंभ ही. याचा अर्थ "ना शेंडा ना बूड" असा घेतला तर त्याला साजेसेच पुस्तक आहे म्हणायचे.
सुरेख रसग्रहण.
मामीसा, रटाळरस भावला.
मामीसा, रटाळरस भावला.
मस्त लिहिलयं अमा.
मस्त लिहिलयं अमा.
भारी लिहीलंत अमा! अक्षरशः
भारी लिहीलंत अमा! अक्षरशः वैताग असतो असली पुस्तकं म्हणजे.
चांगले लिहीले आहे परिक्षण.
चांगले लिहीले आहे परिक्षण.