कादंबरीचे नावः 'समुद्र'
लेखक: श्री मिलिंद बोकील
प्रकाशन संस्था- मौज
प्रथम आवृत्ती- मार्च २००९
समुद्र
लग्न हा टप्पा दोन व्यक्तींचं आयुष्य कायमस्वरूपी बदलून टाकतो. ह्या नंतरच्या प्रत्येक मोठ्या टप्प्यावरचे ते साक्षीदार असतात. लग्न झाल्यानंतर एकमेकांची खरी ओळख- शरीराची आणि मनाची हळूहळू होत जाते. त्या ओळखीच्या खुणा साठवत प्रवास चालूच राहतो- लग्न, नंतर मुलं, त्यांचं मोठं होणं, त्याच बरोबर नोकरी-व्यवसायात स्थिरावणं, वाढणं, मध्यमवर्गातून उच्चमध्यमवर्गाकडे वाटचाल- सगळं कसं आखीवरेखीव रेषेवरून एकमेकांच्या संगतीनं घडतं. लग्नाला साधारण वीसबावीस वर्ष झाली, की नवरा बायकोला एकमेकांबद्दल परिचित नसलेलं काहीच नसतं बहुधा- का तरीही काहीतरी असतंच? एकमेकांमध्ये शब्दश: विरघळून गेलेले दोघं जेव्हा भूतकाळात त्यांच्यापैकी एकाला व्यक्तिश: आलेल्या अनुभवाला अचानक सामोरे जातात, तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात? जोडपं म्हणून? व्यक्ती म्हणून? त्यानंतर त्यांच्या दांपत्यजीवनावर त्याचा काय आणि कसा फरक पडतो? मिलिंद बोकीलांची ’समुद्र’ ही छोटेखानी कादंबरी आपल्याला ह्या सर्व प्रवासातून घेऊन जाते.
भास्कर आणि नंदिनी ही दोनच मुख्य पात्रं कादंबरीत आहेत. सर्व कथा त्यांच्याभोवतीच घडते. हे दांपत्य खूप वर्षांनी एका समुद्रालगतच्या रिसॉर्टवर निवांत सुट्टी घालवायला आले आहे. ह्या रिसॉर्टच्या समोर अथांग समुद्र आणि मागे मोठा डोंगरकडा आहे. अतिशय रम्य अशा ह्या ठिकाणी भास्कर त्याच्या आणि नंदिनीच्या आयुष्याचा वेध घेतो. समुद्र आणि डोंगर ह्या स्थळांचा वापर लेखकाने सुरेख करून घेतला आहे. पुस्तकाच्या उत्तरार्धात ह्या जागा रूपकं म्हणूनही खुबीनं वापरल्या आहेत.
भास्कर एक बर्यापैकी मोठा उद्योजक आहे. पुष्कळ वर्ष केलेल्या कष्ट आणि धडपडीनंतर आता त्याचा ’पाणी शुद्धीकरण यंत्रणा’ तयार करण्याचा व्यवसाय बर्यापैकी स्थिरावला आहे. व्यवसायाच्या निमित्ताने घरी समृद्धी आली आहे. भास्कर एक सरळ माणूस आहे. काहीसा अबोलही. नंदिनीवर त्याचं मनापासून प्रेम आहे. तो एक टिपिकल नवरा आहे. नवरा-बायकोत लपवण्यासारखं काही नसतं अशी त्याची पक्की धारणा आहे. जे काही आहे, ते माहीतच असतं आणि जे नसतं ते हक्काने सांगायचं किंवा मागायचं असतं असं त्याचं साधं लॉजिक आहे. त्याची बायको नंदिनी ही गृहिणी आहे. मनानी अतिशय सरळ, पारदर्शी आणि काहीशी मनस्वी. तिचंही आयुष्य भास्करभोवती केन्द्रीत आहे. तो जसं म्हणेल तसं ती नेहेमीच करते, अगदी समरसून करते. पण ती स्वत:हून कशातच पुढाकार घेत नाही, हे शल्य भास्करला कायम टोचत असतं. नंदिनीला एकटं सोडलं, तर पुस्तक वाचनात ती स्वत:ला उत्तम रमवू शकते. तिचा विरंगुळा भास्करवर अवलंबून नाही, कारण भास्कर आजूबाजूला असण्याचीच तिला सवय नाही. मात्र निवांतपणे नुसतं पडून राहण्यासाठीसुद्धा भास्करला नंदिनीची गरज लागते. सुरुवातीच्या काही पानातच हा पात्रपरिचय लेखक छोट्या प्रसंगांमधून करतो, तेव्हाच लेखनाचा वेगळेपणा समजायला लागतो.
आपल्याला कोणत्याही व्यक्तीला तिच्या सर्व गुण-दोषांसकट स्वीकारणं हे खरोखर अवघड जातं. त्या व्यक्तीची एखादी सवय, एखादी लकब- जी आपल्याला आवडत नाही, ती तिने केली की जरासं खट्टू व्हायला होतंच की नाही? या आपल्याला न आवडणार्या सवयी आपण सतत आपल्यापरीने सुधारायचा प्रयत्न करत असतो. भास्करचं नंदिनीवर प्रेम असलं तरी तिचं स्वत:तच रमणं, एकटीनेच पुस्तक वाचणं, वा समुद्राकडे टक लावून बघत बसणं त्याला सतत टोचत राहतं. तो अबोल असला, तरी आत्ममग्न नाही. निवांत सुट्टीला आल्यावर फिरणं, जेवणं हे दोघांनी एकत्रच केलं पाहिजे, तिथे परत एकेकट्याने सूर्यास्त बघणे वा चक्कर मारायला जाणे वगैरे त्याला पसंत नाही. तो प्रौढ वयातही शरीर कमावण्याची हौस असलेला आहे. त्याला नंदिनीचं थोडं चाललं तरी दमून जाणं फारसं पसंत नाही. असे हे एकमेकांचे छोटे छोटे दोष, किंवा एकमेकांच्या न आवडणार्या गोष्टी मनाच्या तळात नकळत साठवलेल्या असतात; आणि एखाद्या वादाचं निमित्त झालं, की मात्र तेच दोष उग्र स्वरूप धारण करून समोरच्यावर वार करायला बरोब्बर वापरले जातात. माणसाच्या ह्या स्वभावविशेषांचा असा समर्पक वापर जागोजाग केलेला आहे.
रिसॉर्टवरच्या निवांतपणात दोघांमध्ये एका छोट्याश्या वादाचं निमित्त होतं आणि अचानक नंदिनी एक गौप्यस्फोट करते- तिच्या आणि तिच्या एका मित्राच्या आलेल्या संबंधांबद्दल. भास्करला ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत असा अंदाज असतो, पण अर्थातच प्रकरण तिथवर गेले असेल, ह्याची कल्पना नसते. बायकोने स्वतःच्या तोंडाने असशी कबूली दिल्यानंतर कोणत्याही नवर्याची काय प्रतिक्रिया होईल? वाचक म्हणून आपल्या मनात जे जे येईल, ते ते पुस्तकात बरोब्बर पकडले आहे. रागाचा स्फोट, पराकोटीचा संताप, स्वामित्वाची भावना, उद्विन्गता, स्वत:वरचाच अविश्वास, फसवलं गेल्याची भावना- सगळं भास्करला टप्प्याने जाणवतं. ’तिला घालवून देऊ घरातून’ इथपर्यंत त्याचे विचार पोचतात. नंदिनीची ह्या घटनेवरची आणि आता भास्करला सांगितल्यानंतरची प्रतिक्रिया काय आहे? भास्करची प्रतिक्रिया बघून अर्थातच ती घाबरते. विमनस्क होऊन भास्करने स्वत:चे बरे वाईट करून घेऊ नये ही तिची प्रमुख चिंता आहे. पण भूतकाळातल्या घटनेबद्दल तिचं मन स्वच्छ आहे. एकापरीने ती त्याबद्दल तटस्थ आहे आणि त्याला काही कारणंही आहेत. ती पुस्तकात योग्य वेळी आणि योग्य प्रकारे उलगडत जातात. ती कारणं समोर आली की नंदिनीचा पारदर्शकपणा अधिकच भिडतो. नुसता गौप्यस्फोट करणं किंवा कबूली देणं हे तिला करायचंच नाहीये, तिचं त्यामागचं कारण कितीतरी वेगळं आहे- ह्या सर्वाचा भेद हळूहळू सुरेख केला आहे.
ह्या निमित्ताने लेखाकाने वैवाहिक आयुष्यातल्या शारीरिक संबंधांचा होणारा प्रवास वेगवेगळ्या प्रसंगामधून दाखवला आहे. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला असलेली एकमेकांची झपाटल्यागत ओढ आणि नंतर शरीरं ओळखीची झाल्यानंतरचं आलेलं माधुर्य ह्या प्रवासातले चढ-उतार पुस्तकात संयतपणे टिपले आहेत. अनेकदा नकळत हे शारीरिक व्यवहार काहीतरी सिद्ध करण्यासाठीही वापरले जातात- नवर्याला वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ह्यांचा वापर करणं सोयिस्कर असतं, कधीकधी तर त्याला हाच एक मार्गही ठाऊक असतो, कधीकधी गैरसमज दूर करण्यासाठी, कधी केवळ प्रेमापोटी तर कधी सवय म्हणून.. आधी केवळ शारीर पातळीवर असलेला हा व्यवहार, हळूहळू मनांचीही गुंतवणूक करतो. एक वाचक म्हणून भास्कर-नंदिनीचा हा प्रवास आपल्याला अंतर्मुख करून जातो.
हादरलेल्या भास्करच्या सर्व प्रतिक्रिया एक वाचक म्हणून आपल्याला योग्य वाटतात. त्याच्याबरोबर आपणही मनाच्या विविध अवस्थेतून जातो. माणसाचं मन ही फार विचित्र गोष्ट आहे. मन कणखर असलं, उत्साही असलं की समोर काहीही आलं तरी झेलू शकतं. व्यवसायातले चढ-उतार लीलया पचवलेला भास्कर अशा प्रकारच्या धक्क्याला सामोरा जायला सक्षमच नाहीये. साहजिकच ही कबूली त्याच्या मनावर आघात करते, तो हेलपाटतो. समुद्राच्या साक्षीने विचारांच्या आवर्तनात एक संपूर्ण दिवस आणि रात्र घालवतो. समुद्राच्या लाटांसोबतचा त्याचा प्रवास, हळूहळू निवत गेलेलं त्याचं मन आणि त्याचे सुसंगत विचार, दृष्टीकोनात हळूहळू घडलेला बदल हे खूपच सुरेख टिपलंय. ’मन’ ह्या अदृश्य शक्तीचं आपल्या शरीरावर असलेलं निर्विवाद आधिपत्य एकदा मान्य केलं की अनेक घटना, त्यांच्यामागची सत्यता, आपल्या प्रेमाच्या माणसाला समजून घेणं किती सुकर होतं. विषण्ण मन:स्थितीत असलेला भास्कर त्या संध्याकाळी त्याच्या शरीराला सवयीचा असलेला व्यायामही करू शकत नाही.. संपूर्ण शरीर त्याच्यासाठी एक ओझं बनतं. मात्र मनातल्या शंकांचं मळभ दूर झाल्यानंतर काही तासांनंतरच तो पहिल्याच जोमानं व्यायाम करू शकतो- मनाच्या सामर्थ्याचं वर्णन करणारी ही अगदी छोटीशी गोष्ट आहे, पण अचूक पकडली आहे.
भास्करची व्यक्तिरेखा जरी जास्त स्पष्ट असली तरी मनस्वी नंदिनी चांगलीच लक्षात राहते. काहीशी पॅसिव्ह, फक्त प्रतिक्रियांमधून व्यक्त होणारी नंदिनी सुरेख रंगवली आहे. तिचे विचार, तिचं भास्करवर असलेलं प्रेम अगदी स्वच्छ आहे. त्यात कोणताही अभिनिवेश नाही. एक पाऊल मागे राहणे, पण ज्यात सहभाग घेऊ, त्यात पूर्णपणे समरस होणे ही तिची वृत्ती आहे. भास्करवर ती पूर्ण अवलंबून आहे, आणि हे ती त्याला अनेकदा बोलून, कृतीतून दाखवतेही. तिच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटनेबद्दल तिच्या मनात कोणतांही अपराधीपणा नाही. भास्करला हे सगळंच पचवायला जरासं अवघडच जातं, पण त्याला इतक्या वर्षाची ओळखीची बायको ह्या तीन दिवसात अगदी नव्याने कळत जाते. तिच्या चेहर्यापासून तिच्या स्वभावाचे अनेक कंगोरे ह्या सगळ्यांकडेच तो एका नव्या दृष्टीने बघू लागतो. हा प्रवास खूप रोचक आहे. पुस्तक ज्या प्रसंगाने सुरू होतं, त्याच प्रसंगाने संपतं. पण दोन्हीतला फरक इतका ठळक आणि लोभसवाणा आहे, की आपण नकळत लेखकाला दाद देऊन टाकतो. आपल्याला वाटत असतं की आपल्या जीवनसाथीला आपण चांगलंच ओळखतो, मात्र त्याच्या अंतरंगापर्यंत पोचणं हे समुद्रात डुबकी मारण्यासारखं आहे- आत काय दडलेलं आहे, ते खूपच वेगळं आणि आश्चर्यचकित करणारं असू शकतं. त्यातून जे हाती लागतं ते अतिशय सुंदर असं काहीतरी असतं- आपल्या मनात आपणच निर्माण केलेल्या प्रतिमेला एखादा सुखद धक्का देणारं!
मिलिंद बोकीलांची ही तिसरी प्रकाशित कादंबरी. ’समुद्र’च्या आधी त्याच्या ’शाळा’ आणि ’एकम’ ह्या कादंबर्या आल्या आहेत. ’शाळा’शी आपण सगळेच परिचित आहोत. शालेय विद्यार्थ्यांची, त्यातूनही वयात येणार्या विद्यार्थ्यांची अचूक नस त्यांनी त्या कादंबरीत पकडली होती. व्यक्तीरेखा उभ्या करणे, त्या रंगवणे, त्यांच्या आजूबाजूचे प्रसंग वाचकाला आपलेसेच वाटतील असे लिहिणे, आणि खूप काही लिहूनही शेवटी वाचकाला विचार करायला प्रवृत्त करणे ही ह्या लेखकाची वैशिष्ट्य. ही वैशिष्ट्य पुरेपूर जपत बोकीलांनी ’समुद्र’ लिहिली आहे. नव्वद पानांचीच असलेली ही छोटीशी कादंबरी आशयात कुठेही कमी नाही. मानवी मन आणि समुद्र, संसार आणि डोंगरकडा हे दृष्टांत कादंबरीला एक सुरेख उंची देतात. मानवी मनाइतके गुंतागुंतीचे काहीच नसेल. त्याच्या एका कंगोर्याचा कानोसा आपण ही कादंबरी वाचता वाचता घेऊ शकतो, हे नक्की.
सुरेख लिहिलेयस ... बोकिलांनी
सुरेख लिहिलेयस ... बोकिलांनी पण एव्ह्ढेच सुरेख लिहिलेले असले म्हणजे मिळवले
रसग्रहण खुप मस्त लिहिले
रसग्रहण खुप मस्त लिहिले आहे.
मंजूडी+१
बोकिलांनी पण एव्ह्ढेच सुरेख
बोकिलांनी पण एव्ह्ढेच सुरेख लिहिलेले असले म्हणजे मिळवले >>>
अवांतर - मी बोकीलांची 'शाळा' आणि 'झेन गार्डन' ही २ पुस्तकं वाचली आहेत. 'झेन गार्डन' मधली पहिलीच कथा ('यंत्र') मला प्रचंड रटाळ, कंटाळवाणी वाटली होती. नंतरच्या कथा मात्र त्यामानाने चांगल्याच होत्या. (नंतर कुठेतरी 'यंत्र' कथेचा समीक्षकांनी प्रचंड गौरव वगैरे केलेलाही वाचला होता !! :अओ:)
हो लले मी पण एवढीच दोन
हो लले मी पण एवढीच दोन वाचलीयेत. शाळा जेवढं आवडलं तेवढंच झेन गार्डन कंटाळवाणं झालं होतं.
बोकीलांची 'दूर्ग' नावाची
बोकीलांची 'दूर्ग' नावाची दीर्घकथा खूप सुरेख होती. एका दिवाळी अंकात आली होती. आता मला वाटतं अजून एक दीर्घकथा एकत्र करुन पुस्तकही आलय त्याचं.
धन्यवाद. रसग्रहणाचा हा माझा
धन्यवाद.
रसग्रहणाचा हा माझा पहिलाच प्रयत्न. शेकडो पुस्तकं आपण वाचत असतो, त्यातली काही आवडतात- पण ती नक्की का, कशामुळे आवडतात ह्याचा इतका खोलवर विचार केला जातोच असं नाही. ह्या स्पर्धेच्या निमित्ताने तो ह्या पुस्तकाबद्दल केला गेला. 'हे वाचून झाल्यावर पुस्तक वाचावसं वाटलं' ही प्रतिक्रिया माझ्यासाठी अत्यंत अनमोल! मनापासून धन्यवाद.
अवांतर- माझ्याकडे आहेच पुस्तक. कोणाला हवे असल्यास अवश्य देईन.
मला हवं आहे हे पुस्तक समुद्र
मला हवं आहे हे पुस्तक
समुद्र चाळली होती मागे एकदा. आता ह्या सुंदर रसग्रहणानंतर वाचणे मस्ट दिसतंय.
पूनम, चांगले रसग्रहण लिहिले
पूनम, चांगले रसग्रहण लिहिले आहेस.
पूनम, सुरेख! पुस्तकापेक्षा
पूनम, सुरेख! पुस्तकापेक्षा रसग्रहण मस्त झालंय. परत वाचायला हवं.
पूनम, मलाही, तुझं रसग्रहण
पूनम,
मलाही, तुझं रसग्रहण वाचुन पुस्तक वचावसं वाटतयं. मस्त लिहीलयस.
सुंदर लिहिलं आहेस पूनम. आत्ता
सुंदर लिहिलं आहेस पूनम. आत्ता भारतात असते तर लगेच शोधून काढले असते लायब्ररीमध्ये
छान लिहिले आहेस वाचावेसे
छान लिहिले आहेस वाचावेसे वाटते आहे!
पूनम, सुरेख लिहिलं आहेस
पूनम, सुरेख लिहिलं आहेस
असामी आणि मंजूडीला अनुमोदन !
पूनम,सुरेख रसग्रहण केलयस.
पूनम,सुरेख रसग्रहण केलयस. नक्की वाचणार ही कादंबरी.
वा, फारच सुरेख रसग्रहण केले
वा, फारच सुरेख रसग्रहण केले आहेस..
पूनम, फार सुरेख टिपले आहेस
पूनम, फार सुरेख टिपले आहेस पुस्तक. मला आवडते बोकीलांची शैली. साधी सरळ आणि म्हणूनच भिडणारी.
नुकतच हे पुस्तक वाचलं. खूप
नुकतच हे पुस्तक वाचलं. खूप आवडलं. पुस्तकातली भाषाशैली जबरदस्त आहे. भाषेसाठी साजिर्याने वापरलेला 'अनलंकृत' शब्द फारच पटला !
आपल्याला वाटत असतं की आपल्या जीवनसाथीला आपण चांगलंच ओळखतो, मात्र त्याच्या अंतरंगापर्यंत पोचणं हे समुद्रात डुबकी मारण्यासारखं आहे- आत काय दडलेलं आहे, ते खूपच वेगळं आणि आश्चर्यचकित करणारं असू शकतं. >>>>> पुस्तक वाचल्यानंतर ह्याला अगदी अगदी !!
बोकीलांचं 'झेन गार्डन' खूप आवडलं होतं. आता हे ही आवडलं.
पुस्तक उत्तम आहे आणि हे रसग्रहणही त्याच तोडीचं आहे. ह्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
मस्त लिहिलं आहे,
मस्त लिहिलं आहे, पौर्णिमा.
रसग्रहण वाचल्यापासून पुस्तक वाचायचे ठरवले होते, काल योग(आय डी नव्हे) आला
समुद्र मी कालच वाचून
समुद्र मी कालच वाचून संपवली.
अगदी छोटेखानी पुस्तक आहे त्यामुळे पटकन वाचून होते.
मला खूप नाही आवडली गोष्ट.
बरेचदा वर्णन रिपिटेटिव्ह होत जातं उदा. नंदिनीच्या झोपायच्या सवयीबाबत लिहिताना. वाचताना कंटाळा पण येतो. त्यामुळे अधुन मधुन एखादा पॅरिग्राफ स्किप केला जातो.
नायिका फारच नाइव्ह वाटते. जरा अतिच भोळी भाबडी; ती तशी असायलाही काही हरकत नाही पण, ते तितकं कन्विंसिंगली लिहिलं गेलं नाही.
नायिका बोलताना "रे" असं दर दुसर्या वाक्यात म्हणते ते जरा इरिटेटिंग झालं मला.
तिने केलेल्या प्रतारणेबद्दल कळल्यावर भास्कर चिडतो, रागावतो पण आदळाआपट, आरडाओरडा करत नाही.
त्याला संघर्ष आवडत नाही असं काहीसं वाटलं. शेवटी 'दे लिव्ह हॅपिली एव्हर आफ्टर' पर्यंत ते पोचतात पण ते प्रेमापेक्षा एकामेकांच्या गाढ सवयीमुळे असं काहिसं वाटत राहतं.
पुस्तकातलं आवडलेलं पण आहे थोडंफार. ते म्हणजे शेवटची २-३ पानं. समुद्राचं रुपक छानच वापरलं आहे. अशोक काकांनी लिहिलेला तो परिच्छेद मला पण फार आवडला.
ही कथा मला थोडीशी वेगळी वाटली
ही कथा मला थोडीशी वेगळी वाटली होती.
कथेत तीन टप्पे आहेत.
१) भास्कर एक यशस्वी उद्योजक आहे. तो नंदिनीला एका अॅन्गलने पहातो ज्यात त्याला ती तिच्या आनंदासाठी सर्वस्वी त्याच्यावर अवलंबुन असलेली, कधीही कोणतीही स्वतःची अशी गोष्ट न करणारी अशी स्त्री समजतो.
२) मधला भाग काहीसा गड्बडला आहे. यात नंदिनी भास्करला आपल्या एका मित्राबरोबर आलेल्या संबंधाबद्दल सांगते पण ती त्यातुन काय साध्य करु इच्छिते ते कळत नाही. बर आपल्या कृत्याच स्पष्टीकरण देताना ती सांगते ते एकदमच नाइव वाटते. आपण हे मुद्दामुन लपविले नाही कारण यामुळे भास्कर दु:ख्खी होइल असेही त्यावेळी कधी आपल्याला वाटले नाही अशा काही प्रकारचे स्पष्टीकरण नवर्याला जाउ द्या पण वाचकाला पण एकदम अनकन्व्हिन्सिंग वाटते. याउपर आता भास्कर उतारवयात असताना आता तु पण असे काही केलेस तर माझी काहिच हरकत नाही असे काही विचित्र ती सांगते. थोडक्यात ती इतक्या वर्षांनी हे का सांगते हे लेखकाला नीट स्पष्ट करता आले नाही.
३) शेवट मात्र सुरेख घेतला आहे. यात भास्कर नंदिनीला माफ करतो वा ते हॅपिली एव्हर आफ्टर होतिल असे मला तरी जाणवलेच नाही पण हा निर्णय तो का घेतो हे मी सांगितले तर ते कदाचित योग्य होणार नाही. हे स्पष्ट करताना समुद्राचे रुपक फारच सुरेख वापरले आहे हे मात्र एकदम खरे.
बोकिलांची शाळा थोडी शेवटी गड्बडल्यासारखी मला जाणवली तशी समुद्र मध्यात मार खाते पण एकदा वाचण्यासारखी नक्कीच आहे.
सुरेख लिहिले आहे.आता वाचेन ही
सुरेख लिहिले आहे.आता वाचेन ही कादंबरी .
खरेच शर्मिला यांनी म्हटल्याप्रमाणे सानियांचे अनुकरण एकम वाचताना जाणवले होते.
ती वाचून बोअर झाल्याने समुद्र वाचायची राहिलीय.
अशोक यांनी दिलेला परीच्छेदही सुंदर.
खरंच खुप सुरेख रसग्रहण केलं
खरंच खुप सुरेख रसग्रहण केलं आहेस पूनम. वाचायला हवी. मी फक्त शाळा वाचली आहे आणि समुद्रापारचे समाजचं आकाशवाणी अभिवाचन ऐकलं आहे.
मूळ कादंबरीबाबत उत्सुकता
मूळ कादंबरीबाबत उत्सुकता चाळवणारं रसग्रहण.
Pages