"काय ग ! फोन केला होतास ना आपल्या प्रियसखीला ? आपण सगळे जमलोत नि तिचा मात्र पत्ता नाही. येतेय् ना ती ?"
" येतेय् मालिका संपल्यावर ! फार अटीतटीच्या वळणावर आली आहे म्हणे गोष्ट ! इकडे आली तरी ’गप्पात लक्ष लागणार नाही’ म्हणाली."
"काय बाई हे टी व्ही चं वेड तरी! बरं काही नाविन्य तरी असतं का य मालिकात? तेच ते नि तसंच ते!"
" हो ना! आता गावाकडली मुलगी शहरातल्या श्रीमंत, आधुनीक घरात येणे ही कल्पना किती मालिकात वापरली गेली आहे !
’मन उधाण वार्याचे’, तुजवीण सख्या रे, कुंकू --"
" पुरे पुरे! नकॊ करूस यादी! नाहीतर तो एल् आकाराचा कारंजवाला बंगला, स्मृती हरवलेली व्यक्तीरेखा यांचीही यादी करावी लागेल."
" तुम्हाला प्रत्येक मालिकेत हॉस्पीटल, डॉक्टर्स चालतात, पोलीसठाणे, पोलीस चालतात, कोर्ट चालतं, मग कारंजवाला बंगला, गावाकडली मुलगी का नकॊ?"
" आणि आपला प्रियकर दुसरीचा झाला म्हणून दुखावलेली प्रेयसी, पोटातल्या बाळाकडे आशेने पहाणारी विधवासुद्धा!"
"त्यापेक्षा रिअॅलिटी शोज् बरे. एवढीशी पोरं काय छान नाचतात, गातात. कौतुक वाटते."
" हो तर ! चिमुरडया पोरी ’माझ्या उसाला लागेल कोल्हा’ किंवा ’ राया मला--’ यासारख्या लावण्या म्हणतात, त्यावर नाचतात तेव्हाही कसं छान वाटतं, नाही का?"
" आज काय भांडणाची थीम आहे का आपल्या कटृयाची? कदाचीत् आपल्यासारख्या ढ लोकांना जगरहाटी, त्यातले हेवेदावे आणि कावे इ. ची तोंडऒळख तरी व्हावी, ढ नसतील त्यांच्या भात्यात अधीक बाण - सॉरी, पिस्तुलात अधीक गोळ्या जमा व्हाव्यात असा उद्देश असेल या मालिकांचा !"
"आणि पुन्हापुन्हा सांगितल्याने गोष्टी पक्क्या होतात म्हणून वर्षानुवर्षे चालतही असतील त्या; ’चार दिवस सासुचे’’ किंवा ’या गोजिरवाण्या घरात’ यासारख्या !"
’ऑब्जेक्शन ! तुम्ही लोक मराठी मालिकांच्याच का मागे लागताय्? हिंदीबद्दल काहीही बोलत नाही. खरे तर या हिंदी मालिकांनीच बिघडवलय् मराठी मालिकांना."
" वा वा ! आज काय मराठी मालिका विरुद्ध हिंदी मालिका असा सामना रंगवायचा असा बेत आहे की काय ? होऊन जाऊ दे. तूम लढो हम --"
" भाषांवरून आठवलं. अरे तुम्ही कुणी ती बातमी वाचलीय् का? काही दिवसांपुर्वी अगदी पहिल्या पानावर आली होती पहा"
" कुठली? अनील अंबानीला ५० कोटींचा दंड झाल्याबद्दलची का?’
" ते सोड! एकाने किंवा अनेकांनी मिळून आर्थीक घोटाळे करायचे आणि आपण त्यांच्या बातम्या वाचायच्या हे नेहमीचच झालंय्."
" खरय्. शिवाय या घो्टाळ्यांचे रुपयातले आकडे वाढतच असतात चढत्या भाजणीने !"
" हो ना ! हर्षद मेहता, तेलगी, मुंबईचा आदर्श घोटाळा, पुण्याचा त्याहून ’महा’आदर्श घोटाळा !"
’मग ! पुण्य़ाचं सगळंच ’महान्’ असतं नि सगळ्याच घडामोडी ’महोत्सव’ असतात. ’असंतसं चालत नाही पुण्याला !’
" किती निर्लज्ज मंडळी असतात ना ही ! चक्क ’आदर्श’ नाव आहे त्या बिल्डींगचं."
"तुलाच काही कळत नाही बघ. किती चपखल शब्द वापरला आहे त्यांनी. एकदम रिअॅलिटीचे दर्शन घडवणारा. भारतापुढे आज कोणते आदर्श आहेत याचे याहून नेमके वर्णन दुसरे काय असेल?"
" तुम्ही विषय अगदी कुठल्याकुठे नेताय् बरे का ! मी काही त्या नेमेची येणार्या घोटाळ्यांच्या बातमीबद्दल नाही तर शिक्षणाबद्दल बोलतेय्. बातमी अशी होती की भारतात पाचवीतल्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचे धडेसुद्धा वाचता येत नाहीत की दोन अंकी संख्या ओळखता येत नाहीत. गुणाकार-भागाकाराच्या साध्या गणितांची तर बातच सोडा."
" ही बातमी होय्? काही बिघडत नाही. आता आठवीपर्यंत परीक्षा नाहीत ना ! मग नापास होण्याची भीतिच नको. कित्ती ओझं उतरलं बुवा, मुलांच्या नि पालकांच्या डोक्यावरचं !"
"हो ना ! पूर्वी नापास होण्याच्या भीतिने मुलांना अभ्यास करावा लागायचा. आता तो उद्देशच नाही मग कशाला करायचा अभ्यास?"
" असंच काही नाही हं. आता शिक्षणाची पद्धत बदललीय्. पूर्वीसारखी घोकंपट्टी करून परीक्षेत पास होण्यापेक्षा मुलांनी वस्तुपाठ घेत शिकावं, पास-नापासाचे ओझे न घेता समजून घेण्याचा आनंद मिळवत शिकावं, असा उद्देश आहे या नव्यापद्धतीचा !"
"हो ना ! हल्ली मुलांना प्रत्येक विषयाची प्रोजेक्ट्स असतात, वैयक्तीक आणि गटागटांची."
"ख्ररं सांगु का? मला तर रागच येतो या प्रोजेक्ट वगैरेंचा. काही तरी नवी फॅडं काढतात नि आपलं ओझं पालकांवर ढकलतात झालं. एवढ्या फिया घेतात तर करून घ्यावं की हे सगळं शाळेतच. "
"मुलांनी स्वत: प्रयोग करत शिकावं म्हणून असतात ना ही प्रोजेक्ट्स. स्वत: केले की चांगले समजते."
"छे बाई ! नसते उपद्व्याप करत पोरांनी काही अपघात करून घेतले तर? काही नको प्रयोग वगैरे. मिळतं सगळं नेटवर रेडीमेड. घ्यावं की सगळं तिथून."
"पण मग मुलं शिकणार कशी खर्या अर्थाने?"
"वळली का गाडी परत शिक्षणाकडे? एवढा काय बाऊ करता तुम्ही या सगळ्याचा? आम्ही तर ठरवून टाकलय्. मुलांच्या शिक्षणासाठी पैशांकडे बघायचं नाही. आजकाल सगळ्या सोयी झाल्या आहेत. क्लासेस असतात, प्रोजेक्ट्स पण करून मिळतात रेडीमेड. एकेकटीच तर पोरं असतात अलीकडे. त्यांच्यासाठी नाही तर मग कोणासाठी करायचा खर्च? मिळवतोय् ना दोघेही !"
"मला नाही पटत. ज्ञान ही काय कुणी ओंजळीने पाजायची गोष्ट आहे का? नेटवरुन माहिती कट-पेस्ट करायची काय किंवा कुणीतरी रेडीमेड प्रोजेक्ट करायचं काय. मुलांना काय शिकता येईल त्यातून?"
"अरे स्वत: नाही केले तरी वाचलं की मिळते ना माहिती! पुरे झाले की ! Information is knowledge." आणि ती मिळेल तिथून घेतली, store केली कि झालं. नको असली किंवा काम झालं की delete करायची."
" पण तुझी व्याख्याच चुकीची आहे. नुसती माहिती मिळवून काय होणार?"
"काय नाही होणार? आजकाल आपल्या सरकारने information technology वर एवढा जोर दिला आहे तो काय उगाच? प्रत्येक इंजिनिअरींग कॉलेजमधे IT ची शाखा असतेच. एवढे ITचे पदवीधर आहेत म्हणून तर जगभरातल्या IT तील नोकर्या आपल्यासाठी उपलब्ध होताहेत."
"हो ना! केवढे पगार मिळताहेत आपल्या तरुण मंडळींना. IT बरोबर इतर क्षेत्रातही आपली प्रगती आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग काहीही घ्या. विकासाचा ९-१०% दर आहे भारताचा. म्हणून तर आपण २०२० मधे भारत महासत्ता होण्याची स्वप्ने बघतोय्."
"पहावीत ना स्वप्ने ! पण जरा जमिनीवरही असावं. IT चं ठीक आहे पण संशोधन होतय् का काही मुलभूत science, गणीत, मेडीकल science वगैरेत?"
"खरं आहे. IT क्षेत्रात नोकर्या आहेत पण त्या ’सेवा’ प्रकारातल्या. आपले उद्योग विदेशी तंत्रज्ञानावर आधारलेले असतात, जे आपल्याला चढ्या भावाने विकत घ्यावं तर लागतंच पण एकदा घेऊनही भागत नाही. त्याचं सारखं नूतनीकरण करावं लागतं."
"ते असो! आमचं शिक्षणक्षेत्र वाढतं आहे. नवनवीन कॉलेजेस त्यामुळे अधिकाधीक नोकर्या. शिकल्यावर आम्हालाही येईल ना क्षमता नवे शोध लावण्याची. शिवाय कॉलेजेस मधे M.Phil., Ph.D वगैरे लागतं, त्यामुळे आपोआप संशोधन होतं.’
"चुकीचा समज आहे. पेपर वाचता ना? आपली शिक्षणाची प्रत किती खालावलीय् हेच सांगतात ना बातम्या? campus interview साठी कंपन्या मोजक्याच शिक्षणसंस्थात जातात . बाकीच्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांवर येते ना बेकारीची पाळी? एवढे पैसे भरून प्रवेश घ्यायचे या व्यावसायीक शिक्षणसंस्थात आणि पदरी काय पडतं?"
"आणि प्रवेश घेणे तरी किती कठीण असतं. सगळ्या राखीव जागा जाऊन खुल्या संवर्गात किती कमी जागा शिल्लक असतात. त्यातल्या खर्या गरजुंची गोष्टच वेगळी, पण या तथाकथीत मागासवर्गींय आणि मुली यांना कशाला हवं आरक्षण? उगाच जागा अडवतात या मुली !"
"अरे, त्यामुळे त्यांची मार्केटव्हॅल्यु वाढते ना! मग बड्या पगारवाला नवरा गाठला की या मोकळ्या शिक्षण, भ्रष्टाचार यावर तत्वज्ञान पाजळायला."
"बोलले ! डोळे उघडून बघा. सगळ्याच क्षेत्रात बायका नोकर्या, उद्योगधंदे करतांना दिसतात. आता तुमची, पुरुषांची एकाधिकारशाही संपली म्हटलं."
"काय उपयोग त्याचा? कितीही शिकलो, बाहेरच्य़ा जबाबदार्या पेलल्या तरी घरच्य़ा जबाबदार्या बायकांच्याच उरावर असतात ना! कुठेकुठे पहायचं ग बाईने?"
"आता का रडता? ३०% आरक्षण तर तुम्हीच मागून घेतलं होतं ना!"
" पुर्वीच्या नवर्यांना घरी आल्यावर आयतं सगळं मिळायचं. केवढा आराम होता त्यांना१ आणि आता? बायकोची सारखी कटकट चालू असते मदत करा म्हणून. "
"अरे, काय चाललेय् काय आज? "स्त्रीशिक्षण योग्य की अयोग्य यावर परिसंवाद आहे कि ’बाई विरुद्ध पुरुष’ असा दुरंगी सामना ठेवलाय् फटकेबाजीचा?"
"विषय बदलुया का आता?"
"ऐका, ऐका, ऐका! आपल्या शहरात पुस्तकप्रदर्शन चालू आहे चार दिवस. मी जाऊन आले. खूप चांगली पुस्तके मिळालीत मला."
"पुस्तके काय पाहून कळतात का चांगली की वाईट ते? त्या काय साडया आहेत?"
"रेसीपीबुक्स कळतात. शिवाय आरोग्य, आध्यात्म, व्यक्तीमत्वविकास ! खूप काही मिळतं की या प्रदर्शनात ! पण खरच, तू कोणती पुस्तकं आणलीस ग?
" इंदिरा संतांचं ’मृद्गंध’, कविता महाजनांचं ’ब्र’, झालंच तर --"
" ए बाई, विषय बदललास ते कळलं आम्हाला, पण आता पुस्तकांवरून बोअर नको करुस. आधी त्या पुस्तकाचे परीक्षण, मग इतर पुस्तकांबरोबर तौलनीक समीक्षण--"
"तुझं निरीक्षण बरोबर असू शकतं बुवा! काय बरं उगाच हे लोक पुस्तके लिहिण्यावाचण्याचे कष्ट घेतात!
" तुमच्यासारख्या ’ज्यांच्यापुढे गीता वाचू नये’ अशांना अकला याव्यात म्हणून १ तुम्ही लोक पेपर तरी वाचता का रे रोजचा?"
" कशाला वाचायला हवा पेपर? त्यापेक्षा इंटरनेटवर सर्फींग करावं. हवं ते मिळतं. न्युज, स्पोर्ट्स, अगदी तुमच्या कथाकादंबर्यासुद्धा. शिवाय मित्रमंडळी भेटतात फ़ेसबुकवर. धमाल येते चॅट करतांना."
" Idea ! इथे असं भेटण्यापेक्षा वेबवरच भेटलं तर? आपण असं करूया. प्रत्येकाने खर्या नावापेक्षा वेगळ्या नावाने चॅटरुमवर यायचं आणि आपल्या चॅटवरून एकमेकांनी आपली खरी नावे ओळखायची. कशी आहे कल्पना?"
"म्हणजे मुखवटे घालून पार्टीत येतात, तसेच ना?"
"अरे पण खरी नावे कशाला ओळखायची? राहू यात की त्या virtual -आभासी जगातच. नाहीतरी ’ह्या’ जगात भ्रष्टाचार, ताणतणाव, परीक्षा, स्पर्धा, याशिवाय आहे काय? वेबवर नवं जगच
उभारुया आपण!"
" हे म्हणजे - ’स्वप्नामधील गावा स्वप्नामधूनी जावे’"
"ऐकलेत का रे तुम्ही?"
"अग, अशी धापा टाकत का आलीस? जग पेटलं की काय तिकडे? मालिका संपली का तुझी?"
"जग नाही पण जिवंत माणसाला पेटवलंय् पेट्रोल ओतून. अगदी जिल्हाधिकार्याच्या पदावरील माणसाला! पेट्रोलमधील भेसळ ओळखायला गेले म्हणून. आताच T.V.वर ऐकलं नि धावत आले तुम्हाला सांगायला !"
" पाहिलंत? पटलं ना माझं म्हणणं! खरंच नाही राहिलं हे जग, त्याबद्दल बोलण्यासारखं! virtual world हाच एक आधार आहे आता आपला. इथल्या चिंताकाळज्या तिथे मात्र आणू नका."
"ठीक तर ! बघू या करून हेही ! भेटूया चॅटरुमवर! त्या नव्या जाळ्यात !"
’