टपोर्या मोत्यांचा एखादा सुरेखसा सर असतो. त्यातला प्रत्येक मोती त्याच्या घाटदार आकाराने पटकन डोळ्यांत भरतो. ‘गोष्टीवेल्हाळ’ हा मधुकर धर्मापुरीकरलिखित कथासंग्रह अश्याच मोत्यांच्या सराप्रमाणे आहे.
या संग्रहातील कुठल्याही कथेचे कथानक सांगायचे झाले तर ते चार-दोन वाक्यांत सांगून होईल. तरीही या कथा लक्षणीय ठरतात त्या लेखकाच्या गोष्टीवेल्हाळपणामुळेच. धर्मापुरीकर प्रत्येक कथा घोळवून सांगतात. मुख्य पात्रांप्रमाणेच साहाय्यक व्यक्तिरेखांकडूनही तितकीच दमदार कामगिरी करून घेतात. असे करताना कथापरिसरातील बारीकसारीक तपशीलही त्यांच्या नजरेतून सुटलेला नाही. पात्रांच्या हालचालींना, भोवतालच्या प्रत्येक निर्जीव वस्तूलाही त्यांनी दृष्यरूप देऊ केले आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. या कथा वाचून संपतात तेव्हा आपल्या चेहर्यावर एक मंदसे स्मित झळकलेले असते; पण ते निव्वळ कथेतल्या खुसखुशीतपणामुळेच नव्हे, तर बघताबघता बेरकी मिष्कीलपणाने लेखक परिस्थितीवर रंगांचे फटकारे मारावेत त्याप्रमाणे फटकारे मारून गेल्याचे जाणवते म्हणून.
मोत्यांच्या सरातले मधले काही मोती थोडे मोठे, अधिक टपोरे असतील तर तो सर अधिक आकर्षक बनतो. प्रस्तुत कथासंग्रहातील असे दोन टपोरे मोती आहेत ‘वधू’ आणि ‘बंदा!’ या कथा. या दोन कथा वाचल्यावर ‘अश्या विषयांवर इतकी उत्तम कथा कशी काय लिहिली जाऊ शकते?’ ही पहिली प्रतिक्रिया मनात उमटते. ‘बंदा!’मधील बलजितसिंगच्या वर्णनासाठी केलेली अचूक आणि चपखल शब्दयोजना म्हणजे नवोदित लेखकांसाठी एक वस्तुपाठ ठरावा. ‘वधू’ या कथेमध्ये तर लेखकाला अश्या काही विशेष शब्दयोजनेचीही गरज भासलेली नाही. असे असूनही, ‘कंडक्टर पोरगी आपली सून होईल का?’ या अवघड प्रश्नात अडकलेले नारायणराव आणि त्यांच्या या अनपेक्षित परिस्थितीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असलेली ती कंडक्टर पोरगी यांचे चित्रण अतिशय परिणामकारक रीतीने केले गेले आहे.
या दोन कथा काय किंवा संग्रहातील इतरही कथा काय, कुठल्याच कथांमध्ये वाहवा मिळवणारी, जड शब्दांची वाक्ये नाहीत की ज्यामुळे कथांना वजन प्राप्त होते असे म्हणावे. पहिल्या एक-दोन कथा वाचून होईपर्यंत एखादा चाणाक्ष, अभ्यासू वाचक अश्या वाक्यांचा शोध घेईलही. पण अशी काही मोजकी वाक्येच नव्हे, तर संपूर्ण कथाच जबरदस्त ताकदीच्या आहेत हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा खर्या अर्थाने तो हे पुस्तक वाचण्यासाठी तयार होईल. मग ही जाणीव त्याला सुरूवातीच्या त्या एक-दोन कथांकडे पुन्हा घेऊन गेली तरी हरकत नाही.
वरवर अगदी साध्याश्या वाटणार्या कल्पनेचे कथेत रुपांतर केले गेले आहे आणि त्या साध्याश्याच भासणार्या कथेत गुंगवून, हरवून टाकण्याचा जो डाव लेखकाने मांडलाय त्यात आपण अलगद सापडलोय हे लक्षात येईयेईपर्यंत कथा शेवटाकडे आलेली असते. वाचकांकरता ही हवीहवीशी फसवणूक आहे. पुनःपुन्हा या शब्दजाळ्यात अडकावेसे वाटते. कथांच्या शेवटाकडे ‘सम’ गाठायच्या लेखकाच्या विलक्षण हातोटीची पुनःपुन्हा अनुभूती घ्यावीशी वाटते.
‘दृष्टांत!’, ‘व्यथा’, ‘तफावत’ या कथा शहरी विभागात घडतात. इतर कथांना निमशहरी किंवा ग्रामीण पार्श्वभूमी आहे. असे वातावरण आपण कधी ना कधी अनुभवलेले असते. कथा वाचताना मग ते ठिकाण, तो परिसर डोळ्यांसमोर उभा राहतो. कथेतील पात्रे तिथल्या रस्त्यांवर, घरांमधून वावरताना दिसू लागतात. पण लेखनशैलीच्या दृष्यरूपकात्मकतेची महति इथेच संपत नाही. ती पूर्णपणे अनुभवायची असेल तर या कथा वाचून त्या-त्या आठवलेल्या ठिकाणी पुन्हा जा. तिथल्या चालत्या-बोलत्या माणसांच्या जागी तुम्हाला कथांमधील पात्रे दिसायला लागतील आणि चेहर्यावर नव्याने मंदसे स्मित झळकेल. उपरोल्लेखित स्मित आणि हे स्मित यांची जातकुळी एकच.
निरनिराळ्या सरकारी खात्या-उपखात्यांत गावपातळीवर चालणारे कारभार, तिथले ‘तयार’ कर्मचारी या बाबींचा कथानकांत उत्तम प्रकारे उपयोग करून घेतला गेला आहे. म्हणजे कथांचे मुख्य सूत्र ते आहे असे नव्हे. तर त्याचा पार्श्वभूमीसाठी अतिशय खुबीने वापर करून घेतला गेला आहे. ते वातावरण, अर्क वाटावेत असे तिथले एकएक मानवी स्वभावाचे नमुने, त्यामुळे होणारी विनोदनिर्मिती या घटकांनी सर्वच कथांत एखाद्या ‘कॅटॅलिस्ट’चे काम केले आहे. त्याचबरोबर, एकूण समाजव्यवस्थेवर, पांढरपेशा वृत्तीवर कोरडे ओढताना कुठेही शालजोडीतले हाणले जाणार नाहीत याची पुरेपूर दक्षताही घेतली गेली आहे. वर ‘बेरकी मिष्कीलपणा’ हे शब्द वापरले ते त्यासाठीच. या लेखनशैलीमुळे सर्वच कथांना जो एकजिनसीपणा प्राप्त झालेला आहे, त्याला जणूकाही दृष्ट लागू नये म्हणून योजली जावी अशी ‘डिबिकिंग’ ही कथा आहे. लेखकाचे गोष्टीवेल्हाळ असणे या कथेतही पानापानावर प्रत्ययास येते. पण कुक्कुटपालन व्यवसायाची पार्श्वभूमी असलेली ही कथा संपते तेव्हा एक प्रकारची हतबलता मनाला घेरून टाकते. कथांमधील वातावरणाशी, पात्रांशी वाचक किती तादात्म्य पावतात त्याचेच हे लक्षण.
‘डिबिकिंग’मधील एस.के., ‘परीक्षा’मधील इंदूरकरबाई, ‘आक्षेप’मधील एकनाथ ही परिस्थितीपुढे हतबल झालेली पात्रे आहेत. पण दैनंदिन आयुष्यातील त्यांचा झगडा वाचताना अंगावर येत नाही, तर अंतर्मुख करून जातो. तशीच काहीशी अवस्था ‘कास’मधील विकास देसाईची आहे. पण तो हतबलतेला झटकून टाकून वकिली पेश्यामुळे अंगात मुरलेल्या बेरकीपणालाच हाताशी धरतो. व्यवसायाला उतरती कळा लागलेली असतानाही उद्याची चिंता करत न बसता फक्त आजचा विचार करणे त्याला अजिबात गैर वाटत नाही. हे विकास देसाईचे पात्र किंवा ‘तीव्रकोमल’मधील सर्वच पात्रे ‘कॅरिकेचर’ पध्दतीने रंगवण्यात आली आहेत जी कथेची खुमारी अधिकच वाढवतात.
काही मोजक्या उदाहरणांच्या साहाय्याने धर्मापुरीकरांच्या लेखनशैलीच्या अजून एका पैलूचा इथे विस्ताराने उल्लेख केला पाहीजे.
‘मिती’मधील खानापुरे गावात कश्यासाठी आलाय याचा अंदाज घेत घेतच ती संपूर्ण कथा वाचली जाते. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याच्या कुटुंबियांना भेटून त्यांच्याशी बातचित करण्यामागचे त्याचे प्रयोजन नक्की काय आहे हे आपल्याला अक्षरशः शेवटच्या वाक्यात कळते. ‘आक्षेप’चे कथानक ‘दोन बायका फजिती ऐका’च्या वळणाने जाता जाता शेवटच्या परिच्छेदात नायक एकनाथच्या फजितीवरून अचानक गयाबाईच्या आक्षेपात परावर्तित होते. ‘वरवंटा’ कथेतील वरवंट्याचा वस्तुरूपातून आशयात्मकतेकडे प्रवास शेवटच्या परिच्छेदात सुरू होतो आणि निवेदनशैलीची एक निराळीच अनुभूती देऊन संपतो देखिल. पान पालटून पुढील कथेकडे जाण्याचा काही क्षण आपल्याला विसरच पडतो. ‘झोत’ या कथेच्या बाबतीत तर शीर्षकाचे अंतिम प्रयोजनच शेवटच्या वाक्यात ध्यानात येते. हे एक प्रकारचे धक्कातंत्रच. पण ही पध्दत धर्मापुरीकरांच्या शब्दसामर्थ्याचे, लेखनशैलीचे नाणे खणखणीत वाजवते.
अगदी काटेकोरपणे पहायचेच झाले तर ‘तफावत’ आणि ‘दृष्टांत!’ या कथा काहीश्या डाव्या म्हणाव्या लागतील. मोत्यांच्या सरातले दोन्ही टोकांकडचे, टपोरे पण आकाराने लहान दोन मोती म्हणू आपण त्यांना हवे तर.
अनेक कथांमध्ये वकिली, पेशकार, पक्षकारांची पार्श्वभूमी आहे. काही कथा मराठवाड्यात घडतात, तर काही कथांमध्ये महाराष्ट्र-आंध्रप्रदेश सीमाप्रदेशातील, तेलंगणातील संदर्भ आहेत. त्यामुळे प्रादेशिक भाषावैशिष्ट्याचे अनेक नमुने कथांमध्ये वाचायला मिळतात. फक्त प्रमाण मराठीच माहीत असणार्यांना असे शब्द काहीसे अनोळखीच. तरीही, कथांच्या आकलनात विशेष अडथळा निर्माण होत नाही. असे असूनही फक्त ‘बंदा!’ याच कथेत जिथे जिथे असे शब्द येतात तिथे लगेच कंसात त्यांचे अर्थ दिलेले आहेत. याचा मात्र वाचताना किंचित अडथळा वाटतो. केवळ एकाच कथेतील हे कंस काढून टाकले असते तरी हरकत नव्हती. फारतर, पुस्तकाच्या शेवटी शब्दार्थांचे एक परिशिष्ट जोडता आले असते. इतर कथांमधीलही अजून काही शब्दार्थ मग त्यात देता आले असते.
अर्थात, चौदा कथा आणि एकशेचाळीस पाने यांतून वाचकाच्या हाती जी झळझळीत मोत्ये लागतात त्यांच्याशी तुलना करता ही बाब तशी किरकोळ म्हणता येईल.
जाताजाता एक सल्ला - आधी ‘ब्लर्ब’ वाचून मग पुस्तक वाचण्याची नेहमीची पध्दत या पुस्तकापुरती बाजूला ठेवा. हातात पुस्तक आले की थेट पहिल्या कथेलाच हात घाला. कारण, ‘ब्लर्ब’मधील मजकूर आपल्याला जे सांगू पाहतो, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक धर्मापुरीकर आपल्याला देऊ करतात.
--------------------
गोष्टीवेल्हाळ. मधुकर धर्मापुरीकर.
राजहंस प्रकाशन. प्रथमावृत्ती - जानेवारी २०११.
चांगलं लिहिलं आहेस ललिता.
चांगलं लिहिलं आहेस ललिता.
And looks like we have a
And looks like we have a winning entry!
अतिषय रसाळ रसग्रहण. ह्या लेखकाचे नाव मी खरच आधी कधी ऐकले नाही पण पुस्तक वाचायची तीव्र ईच्छा हे वरचं रसग्रहण वाचून होते आहे हेच उत्तम रसग्रहणाचं लक्षण काय?
रसाळ रसग्रहण ललिता!
रसाळ रसग्रहण ललिता!
अगदी अगदी रसाळ रसग्रहण
अगदी अगदी रसाळ रसग्रहण
लले मस्तच
लले मस्तच
रसग्रहण छान. वाचणार.
रसग्रहण छान. वाचणार.
छान लिहिलं आहेस ललिता.
छान लिहिलं आहेस ललिता. धर्मापुरीकरांचं अजुन काही वाचलेलं नाही. वाचनालयातून मिळवून वाचायला हवं.
परफे़क्ट!!! उत्तम रसग्रहणाचा
परफे़क्ट!!! उत्तम रसग्रहणाचा नमुना!
रसग्रहण आवडले! पुस्तक वाचणार!
रसग्रहण आवडले! पुस्तक वाचणार!
आवडलं गं वाचलं पाहीजे आता.
आवडलं गं वाचलं पाहीजे आता.
छान लिहिले आहेस. मीही ह्या
छान लिहिले आहेस. मीही ह्या लेखकाचं नाव आधी वाचले नाही. पुस्तक नक्की वाचणार.
छान रसग्रहण. पुस्तक शोधते
छान रसग्रहण. पुस्तक शोधते आता.
लले, मस्त लिहिलं
लले, मस्त लिहिलं आहेस.
धर्मापुरीकर यांचे लेखन वाचले नाहीये, त्यामुळे पुस्तक वाचण्याची उत्सुकता अजूनच वाढली आहे. पुस्तक वाचूनच इथे प्रतिसाद लिहू असं मी ठरवलं होतं. प्रशांतमधे क्लेम लावून ठेवलाय या पुस्तकासाठी... पण अजून एक-दोन आठवडे तरी मिळण्याची शक्यता नाहीये.
छान.
छान.
प्रीती, छान लिहिलं आहेस.
प्रीती,
छान लिहिलं आहेस.
मधुकर धर्मापुरीकरांचा व्यंगचित्रांवरचा एक सुरेख लेख गेल्या वर्षी कुठल्याशा दिवाळी अंकात आला होता. ' हसर्या रेषेतून हसविण्याच्या पलीकडले' हे त्यांचं याच विषयावरचं पुस्तक आहे. मॅजेस्टिक प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं. 'लोकरंग' पुरवणीत दर रविवारी ते लिहितात. 'विश्वनाथ' हा त्यांचा कथासंग्रहही मॅजेस्टिकने काढला आहे.
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
धर्मापुरीकरांचं मी ही याआधी काही वाचलं नव्हतं. त्यात हा पडला कथासंग्रह. त्यामुळे अगदी योगायोगानेच वाचलं मी हे पुस्तक - असंच म्हणावं लागेल.
थोडक्यात सांगायचं तर 'वळू' सिनेमा पाहून जी अनुभूती मिळते तशीच हे पुस्तक वाचल्यावर मिळते - (कथानकातले आणि व्यक्तिचित्रणातले बारकावे, विविधरंगी पात्रे आणि ग्रामीण किंवा निमशहरी वातावरण या निकषांतून.)
चिन्मय, (तू मला अगदी आवर्जून प्रीति म्हणतोस, म्हणून आता तुझाही चिनूक्सऐवजी चिन्मय असा उल्लेख करायला हरकत नाही. )
तू उल्लेख केलेला लेख मलाही वाचल्याचा आठवतोय. 'लोकरंग' पुरवणीतलं त्यांचं दरवेळचं एकेका व्यंगचित्रावरचं निरुपण(!)ही मी न चुकता वाचते. सध्या ते म.टा.मध्येही लिहितात आठवड्यातून एकदा (माझे अध्यात्म.)
'विश्वनाथ' हा कथासंग्रहही आता वाचायला हवा.
लले, उत्तम रसग्रहण.
लले, उत्तम रसग्रहण.
छान लिहिलं आहेस. आवडलं. या
छान लिहिलं आहेस. आवडलं.
या कथेच्या बाबतीत तर शीर्षकाचे अंतिम प्रयोजनच शेवटच्या वाक्यात ध्यानात येते. हे एक प्रकारचे धक्कातंत्रच. >> यावरून प्रकाश संत आठवले.
छान. आवडलं.
छान. आवडलं.
अगदी नवकोरं पुस्तक दिसतय. छान
अगदी नवकोरं पुस्तक दिसतय. छान लिहिलय.
लले, कथासंग्रह च उलट वाचायला
लले, कथासंग्रह च उलट वाचायला आवडतात मला, हे नक्की बघेन मी लायब्ररीत छान लिहिलं आहेस, धक्कातंत्र वगैरे लिहिलंयस त्यामुळे उत्सुकता वाढलेय
छान लिहिलयस लले मधुकर
छान लिहिलयस लले
मधुकर धर्मापुरीकरांचे काही लेख/कथा लोकसत्तामधल्या हास्यरंग पुरवणीत वाचल्या होत्या.
उत्सुकता चांगलीच निर्माण झाली
उत्सुकता चांगलीच निर्माण झाली हे पुस्तक वाचायची. छान ललीता.
मस्त रसग्रहण. फार तपशील न
मस्त रसग्रहण. फार तपशील न देता पुस्तकाविषयी उत्सुकता वाढवण्याचे काम ह्या रसग्रहणाने उत्तम केले आहे. पुस्तक मिळवून नक्की वाचणार.
स्पर्धेत रसग्रहण झालेली पुस्तकं लवकरच मायबोली खरेदीमध्ये उपलब्ध होतील ही आशा.
मस्त लिहिलं आहेस
मस्त लिहिलं आहेस रसग्रहण.
पुस्तक वाचायलाच हवं.
रसग्रहण उत्तम! पुस्तक वाचेन
रसग्रहण उत्तम! पुस्तक वाचेन बहुधा..!
मी पण धर्मापुरीकर यांचे लेखन
मी पण धर्मापुरीकर यांचे लेखन कधीच वाचले नाहीये.
पण लले टु इतक सुंदर रसग्रहण केल आहेस कि आता नक्की वाचेन
ललितादेवी, अहो, तीनदा वाचलं
ललितादेवी,
अहो, तीनदा वाचलं रसग्रहण तेव्हा थोडंथोडं कळू लागलंय! तुमची ती मोत्यांच्या माळेची उपमा एकदम खासंच! तुमचं उपमेय रसग्रहण अगदी अनुपमेय आहे! ( श्लेष अभिप्रेत, की अनभिप्रेत? काय म्हणू? )
शेवटी सल्ला देताहात की ब्लर्ब न वाचता पुस्तक वाचायला घ्या. कारण दुधाची सर ताकाला नाही म्हणून. पण ब्लर्ब हे एक प्रकारचं रसग्रहणंच असतं, नाहीका? निदान तशी अपेक्षा तरी असते, बरोबर ...? किंबहुना तुमच्या रसग्रहणाचा सारांश काढून ब्लर्ब म्हणून टाकला तर ...?
शोभून दिसेल नाही? प्रयोग करून बघावासा वाटतो!
आपला नम्र,
-गा.पै.
धर्मापुरिकरान्चे दोन blogs
धर्मापुरिकरान्चे दोन blogs आहेत :
http://jaanibemanzil.wordpress.com
http://hasanyachaaakar.wordpress.com
मस्तच लिहिलं आहेस
मस्तच लिहिलं आहेस रसग्रहण.
पुस्तक वाचायलाच हवं.
Pages