हाचीजोजिमा २०/०७/२००८

Submitted by cybermihir on 25 July, 2008 - 15:09

गेले अनेक दिवस GS च्या गडव्हेंचर टीमचे प्रताप ऐकत / वाचत होतो. खुप वाईट वाटायचे. ट्रेकिंगची प्रचंड आवड असुनही अशा उपक्रमांमधे सहभागी होता येत नाही याचे फारच वाईट वाटायचे. यावर एक उपाय होता की इकडे टोक्योमधे काही डोंगर वगैरे शोधुन काढुन, ग्रुप तयार करुन सुट्टीच्या दिवसात एक एक डोंगर सर करायचा. पण एकुणच इकडे असले काही उद्योग करण्याचा उत्साह जरा कमीच. संधी शोधतच होतो ... पण म्हणतात की बरेचदा संधीच तुमच्याकडे चालुन येते. त्याचप्रमाणे अचानकपणे एक संधी चालुन आली आणि मनाला अतिशय समाधान देउन गेली.

मागचा आठवडा जपानमधे long weekend होता. शनिवार, रविवार आणि सोमवर सुट्टी होती. कंपनीमधे गप्पा चालुच होत्या .. कुठेतरी भटकायला जाण्याबद्दल. जपानमधला सुप्रसिद्ध 'माउंट फुजी' पासुन कुठेतरी River rafting पर्यंत बरेच पर्याय चघळुन झाले आणि नेहेमीप्रमणेच हे सुट्टीचे ३ दिवस असेच काही न करता जाणार याची खात्री झाली. त्यामुळे शनिवारी तर सुट्टीच्या दिवसांचे वेळापत्रक नेहेमीप्रमाणे चालू होते. पहाटे पहाटे १२ वाजता उठुन नाष्टा करुन मग २-३ च्या सुमारास जेवण करुन जवळच्या एका पार्कमधे जाउन थोडा व्यायाम वगैरे करत होतो. तेव्हा कंपनीमधल्या एका मित्राचा फोन आला. हाचीजोजिमा ला जायचे चालले आहे ... येणार का ? मी काय तयारच होतो. लगेच 'हो' म्हणालो. पण हाचीजोजिमा म्हणजे काय ... कुठे आहे, कसे जायचे, किती दिवस लागतील वगैरे माहीती न विचारताच हो म्हणुन टाकले. रात्री १० वाजता निघायचे होते. मग आहे त्या वेळात जिथे जाणार त्या जागेची थोडी माहिती काढली.

टोक्योच्या जवळ ७ बेटांचा समुह आहे. इझु बेटं म्हणतात त्यांना. त्यातले सगळ्यात शेवटचे बेट म्हणजे हाचिजोजिमा. पुर्वी या बेटावर कैद्यांना ठेवत असत. पण आता पर्यटन स्थळ म्हणुन विकसित केले आहे. ही सर्व बेटे फु़जी पर्वताच्या आणि पर्यायाने ज्वालामुखीच्या टापुत येतात. किंबहुना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेच ही बेटे तयार झाली असावीत ... कारण ह्या सर्व बेटांवर निद्रिस्त किंवा जागृत ज्वालामुखी पर्वत आहेत. हाचीजोजिमावर तर २ पर्वत आहेत. या बेटावर येण्यासाठी दोनच मार्ग - हवाई किंवा समुद्री. बोटीचा मार्ग त्यातल्यात्यात स्वस्त आणि मुख्य म्हणजे विमानाचा प्रवास बराच झालेला असल्याने जरा वेगळा अनुभव म्हणुन आम्ही बोटीनी जायचे ठरवले. पर्वत आहे म्हटल्यावरच मी सवयीने ट्रेकिंगचे सामान बरोबर घेतले. तसाही जपानमधे उन्हाळा चालू असल्यने कपड्यांचे वजन तसे नव्हतेच, पण बाकी बरेच काय काय घेतले होते.

१० वाजता टोक्यो ताकेशिबा पोर्टला जमायचे ठरले होते. मी नेहेमीप्रमाणे वेळेत (म्हणजे १०-१५ मिनिटे उशीरा) पोचलो. तिथे शिल्पा, अनिरुद्ध, वृषाली, अभिजीत आणि त्यांचा पोरगा करण येऊन पोचले होते. त्यांनी आमचे बोटीचे तिकीट काढुन ठेवले होते. ही बोट टोक्योहुन निघुन मधे २ बेटांवर थांबुन दुसर्य दिवशी सकाळी ९ वाजता हाचीजोजिमाला पोचते. एकुण ११ तासांचा प्रवास. तोही खुल्या समुद्रात ... माझा तर पहीलाच प्रवास होता. या आधी या बेटसमुहातील सगळ्यात पहील्या बेटावर जाउन आलो होतो. पण तेव्हा फक्त ४ तासांचा प्रवास होता. आणि तेव्हा म्हणजे समुद्रात गेलो न गेलो तोच उतरायची वेळ आली होती. खुल्या समुद्रातला इतका वेळ प्रवास करण्याचा पहीलाच अनुभव. पण बोटीत बसल्यावर समजले आम्ही पाचही जण हा अनुभव प्रथमच घेणार होतो. रात्रीच्या प्रवासात थोड्याफार गप्पा झाल्यावर सगळेजण झोपी गेले. मला तर इतकी शांत झोप लागली की हाचीजोजिमा आल्यावरच सगळ्यांनी मला उठवले. बोटीतुन उतरलो तेव्हा उकाडा होता, पण तरीही हवा आल्हाददायक होती. उतरल्यावर लगेचच पर्वत चढायचा मुद्दा पुढे आला ... आणि बरीच चर्चा होऊन अखेरीस पायथ्यापर्यंत गाडीने जाउन तो पर्वत चढायचे ह्या मुद्यावर एकमत झाले. त्यानुसार एक मोटार भाड्याने घेतली. पण गाडीत दिशादर्शक नसल्याने शेवटी तिथल्या भ्रमण कक्षात मिळालेल्या माहितीपत्रकांच्या आधारे आम्ही मार्गक्रमण सुरु केले. आणि थोडे अंतर गेल्यावर लक्षात आले की रस्ता चुकला. मग शिल्पाने आपल्या कुशल नेतृत्वाच्या आधारावर सगळी सुत्रे आपल्या हातात घेतली आणि दिशादर्शकाचे काम सुरु केले. आणि मग आम्ही ५-६ किलोमीटर मागे फिरुन बरोबर रस्त्याला लागलो. जाताना मधे एका दुकानात खाण्यापिण्याचे पदार्थ बरोबर घेतले.

थोड्याच वेळात आम्ही पायथ्यापाशी पोचलो. खरं म्हणजे तो पायथा वगैरे नव्हता .... जवळपास निम्मे अंतर आम्ही गाडीने पार केले. त्यापुढे गाडीचा रस्ता नसल्याने चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण तरीही तेवढे चढायला तासभर लागतो. पायथ्यापासुन ३-४ तास लागतात. आणि त्यातुनही जपान असल्याने चालत जाण्याचे रस्ते पण एकदम आखुन वगैरे ठेवलेले असतात. त्यामुळे सह्याद्रि चढणे आणि हे पर्वत चढणे ह्यात खुपच फरक आहे. गाडीने अर्ध्या अंतरापर्यंत जातानाच धुक्याचे राज्य सुरु झाले. इतके की १०-१५ फुटांपलिकडचे काहीच दिसत नव्हते. त्या नादात आम्ही त्या पर्वताला एक पुर्ण फेरी मारली. आणि मग लक्षात आले की आता कुठेतरी गाडी पार्क करुन चालायला सुरुवात केली पाहीजे.

चढायला सुरुवात करतानाच तिथे काही काठ्या पडलेल्या दिसल्या आणि जपान्यांच्या मदत करण्याचा स्वभाव बघुन मन भरुन आले. चढायला सुरुवात केल्यावर थोड्याच वेळात चांगली दमणूक झाली आणि सह्याद्रिमधले ट्रेक्स आठवले. तरी बरं ऊन फार नव्हते ... उलट मस्त धुके होते आणि हवाही छान होती. त्यामुळे दमणूक झाली तरी त्याचा त्रास होत नव्हता. हळुहळू आम्ही मार्गक्रमण करत होतो. हा ज्वालामुखी पर्वत असल्याने वरती त्याच्या मुखापर्यंत जाऊन तिथे जेवण करायचे आणि उतरायला सुरुवात करायची असे ठरले होते. क्रेटरमधे उतरणे शक्य नाही असे ऐकले होते. पण धुक्यामुळे काहीच दिसत नव्हते. बर्‍यापैकी पर्वत चढुन गेल्यावर साधारण वाटत होते की आता पर्वतमाथा आला असावा. कारण आता नुसती चढण नव्हती अधुन मधुन उतार सुद्धा होता. पण नक्की कळत नव्हते ... त्यामुळे आम्ही पुढे पुढे चाललो होतो. वरती पोचलो म्हणावे तर धुक्यामुळे क्रेटरचा पलिकडचा भाग दिसतच नव्हता. शेवटी एका ठिकाणी थांबुन आम्ही परत फिरायचे ठरवले. तेव्हा तिथे एक सेकंदासाठी धुके जरा विरळ झाले आणि क्रेटरचा साधारण अंदाज आला. आणि आम्ही माथ्यावर पोचल्याची खात्री झाली. क्रेटरला गोल प्रदक्षिणा घालण्याचाही विचार होता ... पण तो रस्ता जरा अवघडच होत होता ... आणि तिथे अनेक वेगवेगळी झुडुपे, गवत चांगले छातीपर्यंत वाढलेले होते ... त्यातुन पायवाट दिसतच नव्हती. त्यावर परत धुक्याचा पडदा. तिथुन जाणे जरा रिस्की वाटल्याने आम्ही परत फिरलो आणि एका सपाट जागी बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांचा (म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांचा) आस्वाद घेतला. आणि उतरायला सुरुवात केली. अधुन मधुन विरळ होणार्‍या धुक्यातुन खालचे दृष्य अतिशय छान दिसत होते. खाली एक छोटे विमानतळ, त्याच्या पलिकडे छोटे गाव आणि पलिकडे समुद्र.

खाली पोचलो तेव्हाही धुकं होतच. आणि आता पायही बोलायला लागले होते. जपानमधे डोंगरांमधे भ्रमण वगैरे करायची कधी वेळच येत नाही ... त्यामुळे सगळ्यांनाच जरा वेगळा अनुभव मिळाला होता. पर्किंगमधेच बरोबर आणलेली संत्री, द्राक्षं वगैरे खाल्यावर खुपच तरतरी आली आणि सगळा शीण निघुन गेला. एवढे शारीरीक कष्ट झाल्यावर गरम पाण्याच्या कुंडामधे पाय शेकण्यासारखे सुख नाही. आणि ती तर जपानची पेशालिटी आहे. ज्वालामुखीचा पर्वतांचा भाग असल्याने इथे बरेच ठिकाणी गरम पाण्याचे कुंड असतात. अशाच एका ठिकाणी एक कुंडातुन पाणी सोडलेले आहे. तिथे समोर समुद्र बघत पाय शेकण्याची सोय केली आहे. त्याचा आनंद घेतला. समुद्रात पोहण्याची खुप इच्छा असुनही इथे चांगले बीच नसल्याने मनाला बांध घातला.

ह्या बेटावरची अजुन एक पेशालिटी म्हणजे अंधारात चमकणारे मशरुम. खरच ते अतिशय सुंदर दृष्य होते. रेडिअम सारखे ते मशरुम चमकत होते.

ती रात्र एका घरात काढुन दुसर्‍या दिवशी सकाळी परतीच्या बोटीवर चढायचे होते. ज्या घरात राहीलो होतो ... त्या घराची मालकीण तर वस्ताद निघाली. प्रचंड उत्साह होता त्या बाईच्या अंगात. त्यांचा समुद्राच्या पाण्यापासुन मीठ तयार करण्याचा व्यवसाय आहे. तिने आम्ही रात्री ११ वाजता तिथे पोचलो, तेव्हा त्या बाईने आम्हाला प्रयत्न करुन बघायची इच्छा आहेका विचारले आणि लगेच तयारीही करुन दिली. त्यानंतर आम्ही तिथे समुद्राचे पाणी उकळुन त्यापासुन मीठ तयार केले. त्या बाईने लगेच वजन करुन, पॅकिंग करुन ते आम्हाला देउन टाकले. वर परत थोडी अंडी उकडुन त्याच मीठाबरोबर खायला दिली.

खरंतर ही एक पिकनिकच ... पण ट्रेकमुळे त्या पिकनिकला अजुन मजा आली. आणि जपानच्या खेडेगावातले आदरातिथ्य अनुभवायला मिळाले. एक रात्र आणि एक दिवस प्रवासात घालवुन एकच दिवस त्या बेटावर घालवला. पण सुट्टी अतिशय चांगल्या प्रकारे घालवली याचा जास्त आनंद वाटला. पण हा ट्रेक मात्र चांगलाच महागात गेला. २ दिवसात ३०००० येन खर्च करुन सोमवारी रात्री आम्ही दुसर्‍या दिवशीच्या कामांचा विचार करत घरी पोचलो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रे मिहिर. फारच छान अनुभव आणि वर्णनही छान केले आहेस. तू आठवडभर सुट्टी काढायला तयार असशील तर आम्हीच येतो तिकडे ट्रेक करायला.

मिहिर.. मस्त रे. छान वाटले वर्णन वाचुन...

मिहिर... सही रे... तिकडे पण ग्रुप तयार केलास का?

वर्णन आवडलं... फोटो असतील तर इथे टाक.

gs1,
अरे या की .... सुट्टी काय केव्हाही काढतो. तुम्ही या तर आधी. आत्ता ऑगस्टमधे तर फुजी पर्वत पण चढता येईल. हा एकच महीना आहे की तेव्हा फुजीवर जाता येते. इतर वेळी रस्ते बंद असतात. अर्थात वरती थंडी पण खूप असते म्हणतात. मी अजुन गेलो नाही, पण तु येणार असशील तर ऑगस्ट च्या शेवटी जाऊया.

naatyaa,
धन्यवाद रे. पहीलाच प्रयत्न होता काहीतरी 'काळ्यावर पांढरे' करण्याचा.

indra,
ग्रुप तयार वगैरे केला नाही पण समविचारी लोकं एकत्र आली की त्यांना 'तयार' करावे लागत नाही. फोटो टाकतो रे. जरा वेळ मिळू दे. तोपर्यंत हा एक धागा घे. अनिरुद्ध चे फोटो पिकासावर टाकले आहेत. ते बघ.
http://picasaweb.google.co.uk/aniruddhamallik/HachijojimaJuly2008

=== I m not miles away ... but just a mail away ===

कदाचित तुम्हाला आधीच ठाऊक असेल..तोक्योजवळ असलेल्या माउंट ताकाओ (ताकाओसान) लाही ट्रेकिंगसाठी जाता येते. रमणीय आहे. त्यासाठी ताकाओसानगुची स्टेशनला जावे लागेल. मला आठवतं त्यानुसार केईओ लाईनवर आहे ताकाओसानगुची.

छान लिहिलय. वाचायला मजा आली.

sayuri,
हो बरोबर. माऊंट ताकाओ पण आहे. पण तिथे ट्रेक वगैरे करण्यापेक्षा पिकनिक म्हणुन जातात. तिथला दुसरा रुट जरा डोंगरातुन आहे. पण तरी ट्रेकींगची मजा येत नाही. पायलट ट्रेक म्हणुन ठिक आहे.

=== I m not miles away ... but just a mail away ===

अच्छा. मी काही ट्रेकिंगवाली नसल्याने ताकाओ प्रकरण मला 'ट्रेकिंग'च वाटलं होतं. Proud
असो.

चांगलं लिहितोस रे. पण मग तु नेहमीच का नाही लिहित?
पिकनिक / ट्रेकिंग बद्दलच लिहिलं पाहिजे, असा काही इथं नियम नाही. जपान बद्दल, त्या लोकांबद्दल, तिथल्या खेड्यांबद्दल, रीती-पध्दतींबद्दल असं काय काय आम्हाला सांग की. लवकर लिही, वाट बघतो..
***
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!

मस्त रे मिहीर...

आपले नेहमीचे सोपस्कार (म्हणजे पुढे जाउन परत मागे येणे वैगरे..) पण पार पाडलेस :).... पण जेवायला मिळाले म्हटल्यावर तुला ट्रेक ला आल्यासारखे नसेल वाटले ना ??

छान लिहिलेस.. असाच फिरत (आणि फिरवत ;)) रहा...

जीएस१ असता तर नेहेमीचा पडून घेण्याचा सोपस्कारही उरकता आला असता! Happy
बाळा मिहिर्,आम्हाला तुझा अभिमान वाटेल असेच कृत्य तू केले आहेस! Happy
लगे रहो...
_________________________
-Man has no greater enemy than himself

वा मस्त मजा केलीस की ... फोटो लकवर टाक Happy

मी पण जाउन आलोय हाचिजोजिमाला फार वाईट अनुभव आला ताइफुमुळे. अडकुन पडलो होतो..
लिहिन कधीतरी

मिहिर, मी हे आज वाचलं. फोटो टाक ना. आणि तुमचा 'समविचारी' लोकांचा ग्रूप का रे हा? Wink

- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/

गौरी,
अग फोटो नाहीयेत. अ‍ॅनिने काढले होते, पण ते माझ्याकडे नाहीयेत.
आणि समविचारी म्हणशील तर आहोतच. आमच्या पुण्याच्या ग्रूपमधे त्याला एकमत होणे म्हणतात. कुठलाही निर्णय हा 'एकमता'ने घेतला जातो. Wink
=== I m not miles away ... but just a mail away ===