मेथीचे लाडू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 August, 2011 - 14:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

मेथीचे पिठ १ वाटी (१०० ग्रॅम)
५ वाट्या गव्हाचे पिठ
२ वाट्या रवा
१०० ग्रॅम डिंक
५० ग्रॅम हालिम (अळीव)
२ वाट्या सुके खोबरे
५ १/२ वाट्या गुळ
१ चमचा सुंठपावडर
अडीच ते ३ वाट्या साजुक तुप
खारीक बदामचे बारीक तुकडे

क्रमवार पाककृती: 

मेथिचे पिठ आदल्या दिवशी तुपात भिजवत ठेवा. त्यामुळे कडूपणा कमी होतो.
सुके खोबरे किसुन मंद आचेवर खरपुस भाजुन घ्या.
खारीक व बदाम बारीक करुन घ्या.
तुपात थोडा थोडा डिंक घालुन तळा व थंड झाल्यावर तो कुस्करुन बारीक करा.

चमचाभर तुपात हालिम (अळीव) तळून घ्या.

भांड्यात दिड वाटी तुप घालुन रवा व गव्हाचे पिठ मंद गॅसवर खरपुस भाजुन घ्या व भाजल्यावर एका परातीत काढा.

त्या पिठात भिजत घातलेले तुप भाजलेल्या पिठा घाला व हाताने चांगले फेसुन मेथिच्या पिठाच्या गुठळ्या मोडा.

आता त्यात भाजलेले खोबरे जरा कुस्करुन घाला. बारीक केलेले बदाम व खारीक घाला. सुंठपावडर व डिंक घाला व चांगले मिसळा.

आता एका मोठ्या भांड्यात १ चमचा तुप टाकुन गुळ चिरुन टाका. आता गॅस एकदम मंद ठेवा व गुळ विरघळेपर्यंत ढवळा. गुळ विरघळला की लगेच गॅस बंद करा.
From Methi ladu

भांडे गॅसवरुन काढून त्यात लगेच पिठाचे मिश्रण घाला व चांगले ढवळा.

आता पटापट लाडू वळून घ्या.

झाले लाडू तयार.

वाढणी/प्रमाण: 
वरच्या प्रमाणात ४५ ते ५० लाडू होतात.
अधिक टिपा: 

हे लाडू पौष्टीक असतात.
हे लाडू थंडीत खातात.
बाळंतीणीसाठी हे लाडू खुपच उपयुक्त ठरतात.

पाक करताना गॅस मोठा मुळीच ठेउ नका. एकदम मंद ठेवा नाहीतर पाक पक्का तयार होइल इ लाडू कडक होतील.

लाडू वळताना मिश्रण थंड झाले आणि भांड्याला चिकटले किंवा लाडू वळता येत नसतील तर पुन्हा मंद गॅसवर २-३ मिनिटे ठेवावेत म्हणजे मिश्रण ओले होउन लाडू वळता येतील.

माहितीचा स्रोत: 
आई व पुस्तक.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या सा.बा. हे लाडु पिठीसाखर घालुन करतात अर्थात थंडित खायला गुळ घालुनच चांगले लागतिल.

सिंडरेला गोडंब्या म्हणजे काय ?
वरच्या लाडूतही डिंक आणि मेथि आहे.
माझी आई गुळाचा पाक करत नाही. गुळ बारीक चिरुन घेउन एकत्र करुन करते. ते लाडू खासच होतात. मला तेवढा चिरण्याचा ताप वाटतो म्हणुन मी पाक करुन घेतला.

छान.
तरीच म्हंटलं, आता कुठले मेथीचे लाडू.
मी मेथी तूपात तळून ती थोड्या भाजलेल्या रव्यासोबत
मिक्सरमधे वाटतो.
तसेच यात थोडी शतावरीची पावडर पण घालतो.

पिहु, दिनेशदा धन्स.
अखी अग नणंदेची डिलिव्हरी झालेय. ती घरी आहे माझ्या तिच्यासाठि केलेत. ज्यादिवशी उरण गटग आमच्या घरी झाला त्याच दिवशी तिची डिलिव्हरी झाली होती. तो दुहेरी आनंदाचा दिवस माझ्या चांगला स्मरणात राहील.

मस्त. Happy
मृणला अनुमोदन. जागू ग्रेट आहेस. Happy

माझी आईही गूळ चिरूनच घालते. पिठं गरम असली की चांगला मिसळला जातो.
पण मी अळीव तळून घेतल्याचं प्रथमच ऐकलं. भिजवून वापरलेले पाहिले आहेत.

तुमच्या पाकक्रिया सांगण्याच्या शैलीत पदार्थ खावासा वाटावा असे वाटवण्याची अलगद क्षमता आहे.

सुंदर! Happy

जागूतै, ___/\___

पत्ता पाठवते, क्रिप्या खालीले पदार्थ पाठवावेत-
हे लाडू
थोडा रोजच्या जेवणाचा मसाला
मोदक
Light 1
पण मस्त दिसतायत लाडू. Happy

जागू, काय उरक आहे! खरंच शि. सा. न. ! Happy

फोटो मस्त!

पराग, वर कारण वाचलंस ना, जागू ने लाडू का केले त्याचं? तुला कशाला पाठवा? :p

मस्त! मला फार आवडतात हे. मागच्या वर्षी केले होते, पण मेथ्या न घालता. आई ह्या लाडवांसाठी खास थोडं जाड्सर दळुन आणते गव्हाचं पीठ.
पराग, वर कारण वाचलंस ना, जागू ने लाडू का केले त्याचं? तुला कशाला पाठवा? >> युवती, वर लिहिलंय ना थंडीत खावे, पौष्टिक असतात. Proud

अखि, बिल्वा, सशल, वत्सला, रोचिन धन्यवाद.

मृण्मयी मोदकांवर मी तुझी काकी होते आता मामी, पुढच्या रेसिपीत कदाचीत आज्जी ? नही$$$$$$$$$$$$$$$$$ अग ताई तरी म्हण किंवा नुसत जागु म्हण. अजुन पस्तिशी पण नाही उलटली. :हाहा:.

लालू, प्रज्ञा, पराग आमच्याकडून डिलिव्हरी होत नाही. डिलिव्हरीसाठी आमच्याकडे येतात. Lol . घरी येउन आस्वाद घेउन जावा.

स्वाती ताई माझी आई पण नाही तळत नुसता थोडासा भाजुन घेते. मिच तळला. आणि चिरलेल्या गुळाचा लाडू अप्रतिम होतो. मला खुप आवडतो.

बेफिकिर तुमच्या शैलीदार उत्तराबद्दल धन्यवाद.

राखी अग मी थेंबे थेंबे तळे साचत हे लाडू केले आहेत. एक दिवस सामान आणले. एक रात्री डिंक फुलवले. एक रात्री खोबर भाजले सर्व पॅक डब्यात ठेवले आणि मग एक रात्री हे लाडू केले.

मिनी माझी आई प्रत्येक थंडीत हे लाडू पौष्टीक म्हणून सगळ्यांसाठी करते.

अहाहाहाहा! जागू, तोंपासु Happy

तुमच्याकडे बाळंतीण एक, आणि बाळंतोबे किती? Wink
आमच्याकडे मी बाळंतीण असताना आई आणि मावशीने तब्बल दहा भांड्यांचे मेथीचे लाडू केले होते. सगळ्या बाळंतोबांनी (भाचरं/ सुना/जावई) सांगून ठेवलेलं की मेथीचे लाडू केलेत की आम्हाला नमुना पाठवा. दोन तास दोघीही जणी लाडू वळत होत्या. मोजले तर 135 लाडू झालेले.. आणि सगळ्यांच्या पिशव्या भरून झाल्यावर माझ्यासाठी उरले फक्त 22 लाडू Lol

जागुतै मायबोलीच्या मास्टरशेफ. धन्स मामी पण असे काही नाही इथे खुप मास्टरशेफ आहेत.

पौर्णिमा धन्यवाद.

मंजुडी २२ लाडू फक्त ? Lol आमच्याइथे पण काही प्रमाणात तसाच प्रकार आहे.

अरे वा... आजच मेथीचा लाडू खाऊन आले आणि मनात विचार आलाच मा.बो. वर मेथीच्या लाडूची कृती अजून कशी कुणी टाकली नाही , ऑफिसात येऊन बघते तर कृती समोर... Lol
मंजुडी २२ लाडू फक्त ? Lol

<<त्या पिठात भिजत घातलेले तुप भाजलेल्या पिठा घाला >> याऐवजी तुपात भिजत घातलेले मेथीचे पीठ असे पाहिजे ना जागूताई Happy

जुई मैने तेरे मन की बात छिन ली. Lol अशी आपली मने जुळली आहेत.

चुकीचे वाक्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. दुरुस्त करते.

अहाहा! यम्मी Happy
मी ही गूळ चिरूनच घालते. तो पाक-बिक करायचा म्हणजे जरा जास्तच अटेंटिव्ह रहावं लागतं ब्वा!
मेथी न घालता डिंक-खोबरं-खारीक-खसखस घालून केलेले पण यम्मी लागतात...
डिंक-बिंक नसेल तर नुसत्या कणकेचे पण आवडतात...
श्या! थंडी पडायला अजून तब्बल ३-४ महिने आहेत Proud

Pages