गाथा इराणी

Submitted by दिनेश. on 20 July, 2008 - 00:00

मीना प्रभुंचे " गाथा इराणी " हे नवे कोरे पुस्तक ( मौज प्रकाशन, किंमत ३०० रुपये, पृष्ठे ३७६ ) नुकतेच वाचून संपवले.
खरे तर आम्ही त्यांचे चाहते, रोमराज्यची, गेली दोन वर्षे वाट बघत आहोत, पण हा त्यानी आम्हाला दिलेला सुखद धक्काच आहे.
आर्यनाम क्षेत्रम, असे मूळ नाव असणारा हा देश आणि या पुस्तकाच्या शीर्षकातील, गाथा हा शब्ददेखील, मूळ पारसीच.
इराणी रेस्टॉरंट्स आपल्याला परिचित. त्या कनवाळु लोकांचा देश कसा आहे, याचा अगदी सुंदर आढावा या पुस्तकात आहे. मीना प्रभुंच्या पुस्तकात छायाचित्र कमी असली, तरी त्यांच्या नेमक्या वर्णतून तो प्रदेश, तिथल्या इमारती, शिल्पकला, अगदी डोळ्यासमोर उभ्या राहतात. शिवाय इराणच्या खजिन्यातील ज्या संपत्तीचे मूल्यमापनही होवू शकत नाही, असे काहि नमुने, आपल्याला छायाचित्रातून दिसतात. प्रकाशनमूल्य, अगदी अव्वल दर्ज्याची आहेत.

इराणचे आणि आपले सांस्कृतिक धागे इतके एकमेकात गुंतले आहेत कि, पानोपानी, त्याचा अनुभव येत राहतो. तीनला ते से म्हणतात, आणि एक ला येक. बाकि दोन आणि चार ते दहा, सर्व अंक शब्दात तेच. इतिहासातही सतत आमनेसामने होतीच, ते संदर्भही इथे येत राहतात. औरंगजेबाने, शहा अब्बासला पाठवलेल्या एका पत्रात, आलमगीर अशी सहि केली होती, त्याला उत्तर देताना शहाने लिहिले होते, तुझ्याच देशात, तुझ्या दक्षिणेला असलेल्या शिवाजी नामक काफ़रालाही तू जिंकू शकत नाहीस, तू कसला आलमगीर ( जगाचा राजा )

इराणमधली अप्रतिम वास्तूकला, तर इथे अचंबित करते. निव्वळ प्रकाशाच्या मोराचे, वर्णन तर मूळातूनच वाचायला पाहिजे. एखादा पूल, किती देखणा, असू शकतो. तोही इथे भेटतोच.

पारसी लोकांच्या धर्माची इथे ओळख आहेच पण मुसलमानाच्या प्रतिमक्केला, दिलेली भेटही आहेच.
पण तरिही सगळे आलबेल आहे असे नाही. तिथे स्त्रियाना हिजाबचीच नव्हे तर चादोरची पण सक्ति आहे. लेखिकेला तर अगदी विमानात प्रवेश करण्यापासूनच त्या सक्तिचा सामना करावा लागला. आणि त्याबद्दलचा निषेध, लेखिकेने वेळोवेळी, जो भेटेल त्याच्याकडे केला. एका मुल्लाला सुद्धा त्यानी सोडले नाही. आणि या सर्वाचे परिणामहि त्यानी भोगले.

लेखिकेची देवधर्माविषयी मते, मला अत्यंत प्रिय आहेत. या पुस्तकात ती मते, अत्यंत धारदारपणे व्यक्त झाली आहेत.

आम्ही मस्कतला असताना, इराणी ओले पिस्ते, डाळिंब, केशर, हलवा यांचा मनसोक्त आस्वाद घेतला होता. पण प्रत्यक्ष तिथे मात्र लेखिकेचे जेवणाचे हालच झाले. सारखा क नावाने सुरु होणारा एक पदार्थ खावा लागला. या पदार्थाचा लेखिकेला इतका वैताग आला होता कि शेवटी, त्याचा उल्लेख देखील, त्याना नकोसा झाला होता.

आपल्या कडव्या धार्मिक आणि राजकिय मतानी, इराण जगभर बदनाम आहे. देश असा तर माणसे कशी असतील, असे लोक समजत असतात, पण या समजाला मात्र लेखिकेने पुर्णपणे खोटे ठरवले आहे.

पण या सर्वांपेक्षा पुस्तकभर व्यापून राहिला आहे तो, इराणी लोकांचा जिव्हाळा. हा जिव्हाळा त्यांचा राष्ट्रीयधर्म असावा, इतक्या निष्ठेने ते लोक तो पाळतात. भूता परस्परे जडो, मैत्र जीवाचे, हि ओळ अक्षरशः खरी ठरते तिथे. आपण आपल्या परिचिताना, मित्रमैत्रिणीना सुद्धा जितका जिव्हाळा दाखवू शकत नाही, तितका जिव्हाळा, तिथले लोक, एका परदेशी प्रवाश्याला दाखवतात. ज्या लोकांशी लेखिकेचे वाद झाले, त्यानीदेखील हा जिव्हाळा जपला आणि लेखिकेला शरमिंदे केले. आणि हे सगळे खास मीना प्रभुंच्या निखळ प्रामाणिक लेखनातून आपल्यापर्यंत पोहोचते. हे सर्व प्रसंग मूळातूनच वाचण्याजोगे आहेत. लेखिकेच्याच शब्दात सांगायचे तर,
जीवनाच्या व्यवहारात स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र होण्याच्या नादात मी किती रुक्ष कोरडी झाले आहे. सगळं देणंघेणं किती मोजूनमापून करते आहे या जाणीवेने माझे डोळे उघडले. सारखे पाणावत असले तरी नक्की उघडले. असलं वेडं प्रेम शिकून घ्यायला हवं पुन्हा. ----
या मातीचा हा गूण असलेला हा प्रेमळपणा मला आतून उसवून पिंजून काढतो आहे. आता विचारा मला पुन्हा कुठल्या देशात जावंसं वाटतय ? इराण, निःसंशय इराण.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण पग्या २७३३ वर तर तू म्हणाला आहेस की त्यांचं लेखन तुला आवडतं म्हणून!
सर्वच पुस्तकं काही आपल्याला आवडत नाहीत>> करेक्ट लिहीलंय.
>>>>>>
पौ, उशीरा सुचलेलं शहाणपण म्हणतात ते हेच का ? Proud

श्र.. Lol

सिंडे, प्रतिसाद का खोडलास ? योग्य लिहिलं होतस की.. लेखन आवडत नाही तर त्यावर टिका करा...उगीच केलेली पर्सनल कमेंटच आहे ती.. साहित्यिक ग्रुपातल्या बाफावरही अशीच एक पर्सनल कमेंट आहे आणि लोकं त्याच्यावर गडबडा लो़ळत हसली पण आहेत. !

मी पण गीतुसारखी उत्साहाच्या भरात ५ का ७ पुस्तके घेतली यांची. आता कुणाला हवी असली तर फुकट द्यावी म्हणते. एकदा वाचू शकले. परत अवघड आहे.

पुस्तक प्रकाशन व वाचनाचा कालावधी साधारणतः एकच...

नेट लावून पुर्ण करायला लागले असते ते पुस्तक वाचायला मजा आली कारण त्याच सुमारास बरोबर काम करणारी (आपल्या सर्वसाधारण भारतीय फूट्पट्टीने देखिल आधूनिक रहाणीमान पक्षी - केशरचना (हिजाब बिजाब तर जाऊदेतच), कपडेलत्ते, हस्तांदोलन, मिळून मिसळून वागणे, ईत्यादी ईत्यादी.) असणारी एक इराणी कलीग. ती पुण्यात पदव्युत्तर शिक्षण घेताघेताच आर्थिक आधारासाठी अर्धवेळ काम करायची.

पुस्तकातील इराणी स्थितीबाबतचे वर्णन वाचून रोज रोज तिची मस्करी करायच्या एकापेक्षा एक संधी मला या पुस्तकाने पुरवल्या. अर्थातच गंभीर व सखोल अशा चर्चा देखिल... (माझ्या इराणी कलीगशी झालेल्या चर्चेनुसार) माझ्यापुरता निष्कर्ष - 'मराठीत लिहीलेला इराणी स्लमडॉग' असेच ह्या पुस्तकाचे स्वरुप आहे. मला दिसलेला म्हणण्यापेक्षासुद्धा 'मी पाहीलेला' इराण असेच या पुस्तकाचे स्वरुप आहे.

पण ह्या पुस्तकातले 'फारसी आणि मराठी या भाषेमधे जमीन अस्मानाचा फरक आहे' या मराठी वाक्यातील जमीन, अस्मान व फरक हे तीनही शब्द फारसीमधून मराठीत आले आहेत, हे वाक्य व ह्या वाक्याने मिळालेले ज्ञान व जोडलेपणाची भावना हा एक मोठाच लाभ....:)

एकापेक्षा एक संध्या (माबो पद्धतीने संधीज) <<<
संध्या हे चूक आहे आणि संधीज असं माबोवर म्हणायची पद्धत नाही.
संधी या शब्दाचे अनेकवचन संधी असेच होते.

Loks, dhans vagaire vachun mat banle asel tyanche tase. HH - अगदी बरोबर ओळखलंत...:)

संधी या शब्दाचे अनेकवचन संधी असेच होते. नीधप - चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! चूक सुधारत आहे. पुढच्या वेळेस नाही मिळायच्या अशा संधी.

मी त्यांची सर्व पुस्तकं वाचलीत...मस्त आहेत.... पण मुखवट्यांमागचे चेहरे नाही वाचलय......त्यांची लिहिण्याची शैली अफाट आहे...आणि मला तरी बोरिंग अस काहीच वाटलं नाही... Happy

मलापण मीना प्रभूंची सर्वच पुस्तके आवडली आहेत, तिबेटबद्दलचे वाचायचे आहे अजून. त्या अगदी आपण त्यांच्याबरोबर फिरतोय असे वाटते, इतके चांगले लिहितात त्यांची एखाद्या देशाचा इतिहास, भूगोल, समाज, चालीरीती सर्वाबद्दल माहिती घेऊन सांगण्याची पद्धत मलातरी आवडते तसेच त्यांना एखाद्या क्षणी बाहेर फिरतांना मधेच भारतातल्या एखाद्या जागेची, माणसांची आठवण येते त्याबद्दलपण त्या लगेच मांडतात, तेपण मला भावते.

साधारण दोन गट आहेत एक मीना प्रभूंचे लिखाण खूप आवडते आणि काहीना नाही त्या तितक्या आवडत. मला खूप आवडतात.

माझं लंडन,तुर्कनामा,ग्रीकांजली,इजिप्तायन,गाथा इराणी ही पुस्तके वाचली आहेत.आवडली आहेत.ज्या स्थळाला भेट द्यायची त्याची नीट माहिती करून घेणं हा प्रकारच आवडला.एकापाठोपाठ एक वाचली म्हणून असेलही,पण गाथा इराणी वाचताना त्यातलं मी-मी अंगावर आले.

Pages