विकेंडला मुश्किलीने मिळालेली शनिवारची सुट्टी कुठे कामाला लावायची ह्या विचारात होतो. २ पर्याय होते. हरिश्चंद्रगड किंवा राजमाची बाईक ट्रेक. ऑगस्ट मधील सुट्ट्या लक्षात घेता हरिश्चंद्रगड तेव्हा करायचा ठरवला आणि राजमाची साठी तयार झालो. शनिवारी सकाळी निघायचे ठरले. बाईकवाले मित्र अंबरनाथला राहत असल्याने सकाळी लवकर उठून तिथे जाणे आले तर रात्रीच संदीपचा फोन आला कि सकाळी त्याला आयकर कार्यालयात जायचे आहे त्यामुळे सकाळी थोडा उशिरा आला तरी चालेल. मला काय ट्रेक नसेल तर सुट्टीच्या दिवशी १२ शिवाय न उठणारा मी , हे ऐकून खुश झालो. असेही बाईक ने जाणार होतो त्यामुळे बराच वेळ वाचणार होता. सकाळी ११-११:३० पर्यंत येतो सांगून झोपलो.
सकाळी जाग आली तीच ८:३० ला. आईला!! आता झाले वांदे. मित्र शिव्या घालणार हे नक्की होते. मालाड ते अंबरनाथ कमीत कमी २:३० तास तरी लागणार हे नक्की होते. पटापट आवरून ९ ला निघालो. पावसाचा तडाखा २ दिवसापासून चालू असल्याने ट्रेन चा भरवसा नव्हता. स्टेशन वर जाऊन बघतो तर ट्रेन बर्यापैकी उशिरा चालू होत्या. पश्चिम रेल्वे जिंदाबाद! मधेच प्रशांतचा फोन आला आणी त्याने अंबरनाथ ऐवजी बदलापूरला उतर असे सांगितले, ठीक आहे बोलून फोन ठेवला. माझ्या पाठपिशवीमुळे ट्रेनमध्ये अनेकांनी मला मनातल्या मनात शिव्या दिल्या असतील.
बदलापूरला पोहचता पोहचता १२ वाजले. फटाफट बाकीची तयारी करून मी आणि प्रशांत कल्याण - कर्जत रस्त्यावर संदीप आणि खोप्याची वाट बघू लागलो. १० मिनिटामध्ये दोघे आले आणि पुढचा प्रवास चालू झाला. घड्याळात बघितले तर काटा दुपार १ ची वेळ दाखवत होता. मधले मधले टप्पे सोडले तर रस्ता बाईकसाठी तरी चांगला आहे. तास-दीडतासाभरात आम्ही चौक फाट्याला पोहोचलो. दुपारच्या जेवणाऐवजी काही तरी खाउन पुढे जायचे ठरले. लगेच मिसळपाव, वडापाव, भजीप्लेटाची ओर्डर सुटली. भरपेट खाल्ल्यावर बाईक पुढे पळायला लागल्या, ND स्टुडिओ पासून मुंबई-पुणे महामार्ग घेण्याऐवजी खोपोली फाट्याला वळलो. आणि तिथून लोणावळा गाठले.
लोणावळ्यात भुशी-धरणाची ट्राफीक मिळाली. ती पार करून राजमाची फाट्याला आलो. मधेच एक चिकन शॉप दिसले, आमावस्या असल्याने लगेच एका कोंबडीला मोक्ष दिला. रात्रीच्या जेवणाची चांगलीच सोय करून ठेवली.
इथून पुढे जास्त काही सांगण्याऐवजी फोटोंचा आस्वाद घ्या.
जसे जसे सह्याद्रीच्याच्या रांगेजवळ सरकू लागलो तस-तसे धुके वाढू लागले. फोटो काढत, गप्पा मारत पुढचा प्रवास करत होतो.
गुडघाभर चिखलामधून बाईक चालवत(कमी) आणि ढकलून(जास्त) बाहेर काढत आमचा प्रवास चालू होता.
मधेच एका ठिकाणी मायबोलीकर आशुचँप भेटला.
गावात पोहोचायला ६:३० झाले. तिथेच उभ्या-उभ्या प्रशांतने आणलेली चटणी-चपाती खाउन गावात भटकायला निघालो(गाव काही मोठे नाही आहे). दुपारपासून बाईकबसून खडबडीत रस्त्यावर प्रवास करून बुड दुखायला लागले होते.
दिवसभर भिजल्यामुळे चांगलेच गारठलो होतो. चुलीजवळ बसून उब घेत घेत काकड्या खात होतो.
चिकनचा मस्त सुगंध सुटला होता. जेवायला बसल्यावर आडवा हात मारून खायला सुरुवात केली. प्रशांतचा उपवास असल्याने बिचारा शाकाहारी जेवण घेत होता.जेवण करून झोपायला ११ वाजले. अंथरुणावर पडल्या-पडल्या कधी झोप लागली ते कळलेच नाही.
सकाळी सकाळी ६:१५ ला संदीप ने सर्वाना उठवले. आवरून घर मालकिणीच्या परवानगीने खोप्याने चुलीचा ताबा घेतला. मॉगी-खिचडी बनवायला सुरवात केली. खाउन झाल्यावर लगेच गडावर जायचा निघालो.
मनरंजन किंवा श्रीवर्धनला पहिले जायचे यावर चर्चा चालू झाली, आणि दान श्रीवर्धनच्या पदरात पडले.
२०-25 मिनिटात बालेकिल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यात पोहोचलो. कंबरभर पाण्यामधून गडावर प्रवेश घेतला. वाघबीळ कडे जायचा विचार दाट धुक्यामुळे सोडवा लागला. उंचावरील भगव्याला मुजरा करून गड फिरू लागलो.
पावसाची उघडीप जराही नव्हती. दाट धुक्यामुळे आणि पावसाच्या वाढत्या जोरामुळे मनरंजनला न जाता परत फिरायचे ठरले. रात्रभराच्या पावसाने मधल्या ओढ्याचे पाणी नक्कीच वाढलेले असणार हे माहिती होते. परत गावात येऊन पोह्यांची ओर्डर देऊन मंदिर बघायला गेलो.
मंदिरापाशी आणी तलावात थोडे फोटोसेशन करून परत फिरलो. या फोटोंसाठी बिचाऱ्या प्रशांतला आम्ही १०/१२ उड्या मारायला लावल्या आणि २/३ वेळा पाण्यात फेकले.
गरमागरम पोहे तयार होते. सकाळची खिचडी पोटात कधीच गायब झाली होती. ४ च्या जागी ८ प्लेट पोहे झाले.
१२ च्या आसपास गावातून माघारी फिरलो. परतीच्या रस्तात तर रात्रभराच्या पावसामुळे अजून चिखल वाढला होता आणी आमचा त्रास पण. अपेक्षेप्रमाणे ओढ्याचे पाणी गुडघ्याच्या वर होते. डिस्कवर बाईकला ओढा पार करायला त्रास नव्हता. डोक्याला ताप अवेन्गर पार करताना होणार होता.
कशीबशी अवेन्गर ओढा पार केली. पुढचा रस्ता आदल्यादिवशी अंदाज आल्याने जास्त तापदायक वाटत नव्हता. जिथे पहिल्यांदा काल ढकलगाडी केली होती, तिथे काही ४ चाकी आल्या होत्या आणी चिखलाचे खड्डे अजून रुंद करत वर चढत होत्या.
आमचा सर्वाचा अवतार बघण्या सारखा होता. माने पासून खाली पाया पर्यंत चिखलाने माखलेलो. ) लोणावळा जवळ करताना १ ओढा लागला तिथे सर्व साफ केले. गर्दी दिसली म्हणून सहज डोकावून बघितले तर वॉटरफॉल रॅपलिंग चालू होते. मनात विचार आला होता कि चला करुया, मागच्या वर्षीचा विहीचा अनुभव होताच. पण घड्याळचा काटा परत फिरायला सांगत होता. तसेही त्यांच्या सभासदांचे झाल्याशिवाय आमचा नंबर लागला नसता.
परत लोणावळा मध्ये थोडे ट्राफिक लागले, पण लवकरच सुटलो. घाटामध्ये एवढे धुके वाढले कि बाईक खूप हळू उतराव्या लागत होत्या. घाट उतरल्यावर सुसाट सुटलो. अंबरनाथला पोहोचता पोहोचतो ६ वाजले. संदीपकडे जेवण करून परत मालाड रात्री ११ ला गाठले.
................................................................................................................................................
पावसाचा जोर जास्त असल्याने कॅमेरा वाचवत फोटो काढणे त्रासदायक होत होते. किल्ल्यावर तर जास्त फोटो काढायला मिळालेच नाही. जे त्यातल्यातात चांगले होते ते इथे आहेत. बाकीच्या फोटोंवर थोडे काम करावे लागेल. ते नंतर अपलोड करेन.
हा बाईक ट्रेक थोडा वेगळा अनुभव देऊन गेला. भविष्यातील काही कार्याक्रमासांठी हा अनुभव गरजेचा होता. लवकरच गोवा बाईक ट्रेक करायचा आहे.
नॉर्मल ट्रेकपेक्ष्या या बाईक ट्रेकमुळे जास्त हात-पाय दुखत होते. सुट्टी टाकू शकत नाही म्हणून जबरदस्ती सोमवारी कामावर गेलो.
@ प्र-साद >> धन्यवाद.
@ प्र-साद >> धन्यवाद.
Pages