रसग्रहण स्पर्धा - झुळूक अमेरिकन तोर्‍याची - लेखक - शरद वर्दे

Submitted by मंजूडी on 4 August, 2011 - 03:49

आधी शिक्षणानिमित्त, संशोधनानिमित्त, व्यवसायानिमित्त एखादी सदिच्छा भेट, नोकरीसाठी असलेल्या तुरळक संधीतील एखादी पटकावून वगैरे परदेशी जाणार्‍यांच्या तुलनेत, आता ग्लोबलायजेशनमुळे प्रचंड वाढ झाली आहे. आयटीक्षेत्राने तर परदेशवारीची दारे सताड उघडलेली आहेत. त्यामुळे गेल्या दोन तीन दशकांपासून परदेशवारी दुर्मीळ राहिलेली नाही. तरीही आपल्याकडे अजूनही 'फॉरीन रीटर्न्ड' माणसाकडे भक्तीभावाने पाहिलं जातं. यूरोप पादाक्रांत करून येणार्‍याला तिरुपती-बालाजीसम देवत्व प्राप्त होतं, ऑस्ट्रेलिया-न्युझीलंडवारी करणार्‍याला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं, सिंगापूर-मलेशिया करणार्‍याला प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं, बाकी आफ्रिका, ब्राझील इत्यादींसारख्या सटरफटर देशात जाऊन येणार्‍याला अगदीच काही नाही तर निदान कोपर्‍यावरच्या मारुतीचं देवत्व बहाल केलं जातंच, आणि अमेरिकावारी करणार्‍याच्या पायावर तर काशीयात्रेचं किंवा मक्का-मदिनायात्रेचं पुण्य लाभल्यागतच डोकं ठेवलं जातं.

अमेरिकेच्या अश्या या अपूर्वाईची दखल घेतली आहे शरद वर्दे यांनी, आपल्या 'झुळूक अमेरिकन तोर्‍याची' या पुस्तकात. शरद वर्दे यांनी दीपावली, चारचौघी, मोहिनी, किस्त्रीम, लोकमत, माहेर, श्री तशी सौ यांसारख्या दिवाळी अंकात केलेल्या ललित लेखांचे संकलन या पुस्तकात केलेले आहे. खुमासदार शैलीत लिहिलेल्या या लेखांचं थोडक्यात वर्णन करायचं झालं तर 'अमेरिकेच्या समाजजीवनाचा अभ्यास' असे करता येईल. पण या अभ्यासाला अस्सल आणि रसरशीत विनोदांच्या खमंग फोडणीची जोड मिळाल्याने हे लेखन अतिशय रसभरीत आणि रोचक झाले आहे.

भारतात कुठेही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा कचरा टाकणे या कृतीमागे 'त्यात काय झालं?' ही बेफिकिरी दडलेली असते. पण अमेरिकेत मात्र 'इथे अलाऊड नाहीये' हे अवघे तीनच शब्द दहशत बसवतात. निमूटपणे आपण कचरापेटी शोधून आपला कार्यभाग साधतो. याला कारण तिथले कडक नियम आणि कायदे. अमेरिकेत राहणार्‍यांना 'कायदा कशासाठी?' हा प्रश्न पडत नाही. पण ते कायदे - नियम कितीही जटील, जाचक असले तरी ते पाळायचेच अशी त्यांची पक्की मनोधारणा झालेली असते. आपल्या चारचाकीमधे 'चाइल्ड सेफ्टी सीट' नसेल तर कुठल्याही लहान मुलाला ते गाडीत बसू देत नाहीत, घराला चाइल्ड प्रोटेक्शन सर्टिफिकेट नाही म्हणून अगदी पाहुण्याचं लहान मूल अल्प काळासाठीही घरात घ्यायला काचकूच करतात. चाइल्ड प्रोटेक्शन असलेल्या घरात बारा वर्षाखालील मूल एकटं राहू शकत नाही. गाडीच्या मागच्या सीटवर तसेच टपावर बॅगा ठेवण्यावर अमेरीकेचा कायदा बंदी घालतो. अश्या या कायद्यांच्या कचाट्यात स्वतःला स्वखुशीने सापडवून घेणारा, आणि त्यामुळेच, दरवर्षी पाच रुपयांची राखी पाचशे रुपयांच्या कुरीअरने पाठवणार्‍या बहिणीचं स्वागत करू न शकणारा भाचा, वर्दे आपल्या डोळ्यांसमोर अचूक उभा करतात. याउलट, भारतातील काय - द्याच्या स्वातंत्र्याबद्दल लिहिताना वर्दे म्हणतात, 'आमच्या मातृभुमीत बघा. कायदे करणारे कायदा करतात. त्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यावर मात्र स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरीकच काय पण कायदे करणारे पुढारीही तो पाळायच्या भानगडीत पडत नाहीत. कायदेरक्षक सरकारी अंमलदार काय देता ते द्या आणि हवं ते करा असं म्हणून कानडोळा करतात. कायदेशीर नसलेली बाब काय देशील? या प्रश्नाचं सधन उत्तर मिळालं की कायदेशीर होते हे खरं काय - द्याच राज्य.'

अमेरिकन खाद्यसंस्कृतीचं चपखल वर्णन 'वन कोक प्लिज' या लेखात आपल्याला वाचायला मिळतं. गिर्‍हाइकांनी आपली तहान कोक-पेप्सीने शमवावी असा अलिखित नियम असणार्‍या अमेरीकन खाद्यगृहांमधे काकुळतीच्या विनंतीनंतर पाणी मिळतं, तेदेखिल 'बर्फ घालून पाणी, बेसुमार बर्फ घालून आणि बर्फाचे खडे न घातलेलं बर्फाचं पाणी.' साधं पाणी मिळवायचं असेल 'वॉर्म फ्लॅट वॉटर' अशी आज्ञा सेविकांना करावी लागते. 'वॉर्म वॉटर' म्हणजे 'रूम टेम्परेचरचं पाणी', 'फ्लॅट वॉटर म्हणजे स्टील वॉटर, म्हणजेच सोड्यासारखं न फसफसणारं, जागीच संथ राहणारं पाणी' ह्यासारख्या संज्ञा वाचकही आपल्या डोक्यात नोंदवून ठेवतात.

याच लेखातून आपल्याला समजलेली, 'पिझ्झा हा इटालियन खाद्यपदार्थ नव्हे, ते अमेरिकन फास्ट फूडच आहे. इटलीत सुद्धा अमेरीकन टूरीस्टच पिझ्झा खातात. कुठल्याही इटालियन फाईन डायनिंग रेस्तराँमध्ये पिझ्झा हा पदार्थ मेनूकार्डावर नसतो' ही माहिती मित्रमंडळींच्या तोंडावर फेकत आपण भाव खायला हरकत नाही.

अमेरिकन फास्टफूडविषयी लेखकाच्याच भाषेत सांगायचं तर, 'झालंय काय, की दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेची वायुवेगाने जी आर्थिक प्रगती झाली त्याबरोबर आलेल्या सुबत्तेचे हे परीणाम आहेत. खाणंपिणं इतक्या मुबलक प्रमाणात, इतक्या विस्तीर्ण प्रकारात आणि इतक्या स्वस्त दरात चहूकडे उपलबध झालंय की खाता किती खाऊ एकमुखाने अशी स्थानिक प्रजेची अवस्था झालीय. मग आकारमान प्रसरण पावणारच.'

हे फास्टफूड खाऊन सुदृढ झालेल्या अमेरीकनांचे अवाढव्य देह याविषयी फारच मजेशीर टिप्पणी आपल्याला वाचायला मिळते, 'जशी अमेरीका भव्य तसे अमेरीकन्सही भव्य. अमेरीकेत भव्य ते सुंदर. आमच्या नद्या रुंद आणि लांब. आमचे धबधबे प्रचंड, जंगलं विस्तीर्ण. कारखाने, घरं, हॉटेल्स, मॉल्स, टेलीव्हिजन, रेफ्रिजरेटर्स, गाड्या, रस्ते, विमानतळ, विद्यापीठं, कुत्री, मांजरं, खारी, झुरळं सगळ्या सगळ्यांचे आकार मोठे.'

आपले दोन्ही हात शाबूत असताना अमेरीकेतील बाथरुमांत इलेक्ट्रिक टूथब्रश आणि ऑटोमॅटीक टूथपेस्ट डिस्पेन्सर कशासाठी? असा प्रश्न तुम्हा-आम्हा सर्वांनाच पडतो. दोन माणसांच्या स्वयंपाकासाठी ऑटोमॅटिक श्रिंप डिव्हिनर स्वयंपाकघरात पाहून अचंबा वाटतो. अमेरीकेतील यंत्रवेड्या लोकांची गंमतजंमत आपल्याला वाचायला मिळते 'सारं कसं स्वयंचलित' या लेखात.

पण कामं करण्यासाठी मशीन असली तरी ती माणसालाच चालवावी लागतात. अमेरिकेत मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्येकजण दरदिवशी दहाबारा तास तरी काम करतो. एक-दोन तासांचं ड्रायव्हिंग, शिवाय रजाही कमीच. त्यामुळे प्रत्येक वीकेंड व्यवस्थित प्लॅन करावा लागतो. हाती मिळणारा वेळ काटेकोरपणे वापरूनच अमेरीकेत येणार्‍या पाहुण्याचे आदरातिथ्य पार पाडावे लागते, तरच पाहुणे आणि यजमान समाधानी होऊ शकतात. या लेखाचे शीर्षक 'अतिथी न येवो भव!' हे जरी तिरकस असले तरी त्यात अजिबात उपहास नाही. उलट पाहुण्याच्या स्वागतात कुठलीही कसूर राहू नये यासाठी यजमानांनी केलेल्या धडपडीची जाणीव दिसून येते.

अमेरिकन उच्चार, अर्थातच 'अ‍ॅक्सेंट'.. या 'अ‍ॅक्सेंट' शब्दातल्या 'ट' चा उच्चार करायचा की नाही? कारण अमेरिकेत इंटरनॅशनलचा उच्चार इन्नरनॅशनल, इंटरफिअरचा इन्नरफिअर, इंटरसेक्शनचा इन्नरसेक्शन, इंटरपोलचा इन्नरपोल होतो.

'शॅल वी कॉल हर इन इमिजिएटली अ‍ॅन्ड टेक हर इन्नर व्ह्यू?' यातील 'इन्नर व्ह्यू' काय असेल याची कल्पना तुम्ही करून शकता का?
शरद वर्दे लिहीतात, 'इंटरव्ह्यू या सोज्वळ शब्दाचा इन्नरव्ह्यू असा उच्चार हा सौ. आनंदीबाई रघुनाथराव पेशवे, मुक्काम शनिवारवाडा, पोस्ट पुणे, ४११०३० ह्यांच्या 'ध' चा 'मा' या खाडाखोडीपेक्षाही सनसनाटी होता.'

संपूर्ण पुस्तकात जागोजागी अश्या चुणचुणीत विनोदांची पेरणी आपल्याला वाचायला मिळते. लेखकाने आपल्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीने टिपलेले बारकावे आपल्याला थक्क करून सोडतात.
संख्याशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेल्या शरद वर्द्यांनी आंतराष्ट्रीय स्तरावर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांतून काम केलेले आहे. व्यवसायानिमित्त जगभर फिरताना गोळा केलेल्या अनेक समृद्ध अनुभवांचे सार त्यांच्या लेखणीतून उतरते. अमेरिकेविषयी हे लेख लिहिताना, नर्म विनोदी शैलीत भाष्य करताना कुठेही खिल्ली उडवलेली नाही. त्यांच्या खुसखुशीत विनोदांमागचा उपहास जाणवतो पण पुस्तकातील भाषा कुठेही खटकत नाही. केवळ टीकाच करायची म्हणूनही हे लेख लिहिलेले नाहीत. एकंदरीतच त्रयस्थपणे, पण तरीही चौकस आणि मार्मिक नजरेने केलेले अमेरिकेविषयीचे हे निरीक्षण वाचताना आपण वाचक म्हणून त्यातील टवटवीत विनोदांना दाद देतोच, पण त्याचवेळी एक भारतीय म्हणून अंतर्मुख होऊन विचारही करू लागतो. शरद वर्दे यांच्या लेखनशैलीचे हे कसब खरोखर वाखाणण्याजोगे आहे.

मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दिला जाणारा 'जयवंत दळवी स्मृती पुरस्कार' पटकावणारं 'झुळूक अमेरिकन तोर्‍याची' हे पुस्तक म्हणजे अमेरिकेतल्या अमेरिकनांचं, अमेरिकेतल्या भारतीयांचं आणि भारतातल्या भारतीयांचं एक लिखित व्यंगचित्रच म्हणायला हरकत नाही.

-

झुळूक अमेरिकन तोर्‍याची
लेखक - शरद वर्दे
प्रकाशक - मॅजेस्टिक प्रकाशन
प्रथम आवृत्ती - फेब्रुवारी २००९
किंमत - रुपये २००/-
पृष्ठसंख्या - १९५.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय. Happy
मी हे पुस्तक चाळलंय, संपूर्ण वाचलेलं नाही. लोकसत्तात आलेलं याचं परिक्षण पण वाचलं होतं. शरद वर्देंची भाषा सोपी, सरळ, खुसखुशीत आहे.

(पण मलाही राहून राहून एक शंका येतेच आहे - याच लेखाबद्दल असं काही नाही, पण पुस्तक परिचय आणि रसग्रहण यात नक्की फरक कसा करायचा?)

पुस्तक परिचय आणि रसग्रहण यात नक्की फरक कसा करायचा?)
याबाबत मायबोलीवर पूर्वीच लिहिण्यात आलेले आहे. रसग्रहण हे फॉसिलायझेशन, त्रिज्या, मध्य, कक्षा असे शब्द वापरून लिहीले जाते. परिचयात एव्हढे सगळे लिहीत नाहीत! तसेच कवितांच्या रसग्रहणात गुण देऊन, त्यांची सरासरी, स्टँडर्ड डेव्हिएशन इ. काढून करतात!!

असे आपले मी वाचले होते हो, पण मला त्यातले काय कळते? Happy Proud

रसग्रहण हे फॉसिलायझेशन, त्रिज्या, मध्य, कक्षा असे शब्द वापरून लिहीले जाते. परिचयात एव्हढे सगळे लिहीत नाहीत! तसेच कवितांच्या रसग्रहणात गुण देऊन, त्यांची सरासरी, स्टँडर्ड डेव्हिएशन इ. काढून करतात!!>>>

Lol

रसग्रहण छान झालंय.
पुस्तक वाचायची इच्छा नाही कारण मराठी संस्थळांवर अशा प्रकारचे ढिगांनी लेख सापडतील.

मंजूडीने लिहिलेलं रसग्रहण, पुस्तक ओळख काय असेल ते आवडलं.

मनीष+१. पुस्तक घेऊन वाचण्याबद्दल स्वाती+१. अगदीच कुणाकडे मुक्काम आहे आणि ती मंडळी मला आणि ह्या पुस्तकाला घरीच सोडून कुठे गेली तर वाचेन Happy

रच्याकने, "नियम कितीही जटील, जाचक असले तरी ते पाळायचेच अशी त्यांची पक्की मनोधारणा झालेली असते" >>>> अमेरिकेत नियम पाळले जातात कारण त्याची अंमलबजावणी कडक आहे नाही तर कुच्चर हरभरे काही कमी नाहीत.

मंजू,
छान लिहिलं आहेस.

रसग्रहण = appreciation. Appreciation = a written review of a book, etc, esp when favourable.
स्पर्धेच्या घोषणेत प्रशासकांनी लिहिलंय त्याप्रमाणे इथे परीक्षण favourable नसलं तरी चालणार आहे बहुधा.

मंजूडी यानी पुस्तक परिचय [किंवा अधिकचे म्हणायचे झाल्यास रसग्रहण] चांगल्या पद्धतीने सादर केले आहे. पुस्तक वाचावे इतपत मोह होतो तो ज्या पद्धतीने त्याची ओळख करून दिली आहे त्यावरून म्हणत आहे. अर्थात लेखक वर्दे यानी अमेरिकन उच्चारासंदर्भात जे काही (पुस्तकात) लिहिले आहे त्याचा योग्य तो समाचार इथल्या काही प्रतिसादकांनी घेतला आहेच. खरं तर त्या त्या देशाची लिखित आणि मौखिक भाषा यात महदंतर असू शकते, किंबहुना तेच तर ज्या त्या जमिनीचे कल्चर ठरते. "Ain't no nothing" असे शिकागोतील स्थानिक सर्रास म्हणत असतात. एका छोट्या वाक्यात तीन निगेटिव्ह शब्द. त्याचा अर्थ आपण तर्खडखर संस्कृतीत वाढलेले कसा करणार ? ती तिथली ढब असल्यामुळे मग Interview ऐवजी InnerView असे ऐकायला आले म्हणून आनंदीबाईना त्यात ओढायची खरे तर गरज नव्हती; पण होते असे की जगभर विविध क्षेत्रात नोकरी करून अनुभवसंपन्न झालेले शरद वर्दे 'अमेरिकन आणि भारतीय संस्कृती' तुलना करण्यापासून स्वतःला रोखू शकत नसल्याने मग अशी उच्चारांची थट्टा पुस्तकात येणे क्रमप्राप्तच असते. त्यामुळे काय साध्य होते हे लेखकच जाणोत.

शरदराव राहू देत, पण अनिल अवचट यांच्यासारखा ज्येष्ठ लेखकही या तुलनेच्या मोहापासून स्वतःला दूर ठेऊ शकलेला नाही. 'अमेरिका' नावाच्या पुस्तकात त्यानी अमेरिकन कल्चर, तिथले मॉल्स, रस्ते, कार्स, पार्किंग सेन्स, ट्रॅफिक आदीवर भरभरून लिहिले ते ठीक आहे, पण मग तिथे केवळ चार महिने काढून पुण्यात आल्यावर त्यानी लेखात लिहिले....हे प्रकरण 'अमेरिका' पुस्तकात आहेच : 'भारतात परत आलो. सकाळी पार्ल्याहून कुर्ल्याच्या ट्रॅफिकमधून आमची गाडी चालली होती. वाहनं समोरनं येऊन आदळणार असं वाटत होतं. हा असा कसा गेला रॉन्ग साईड्नं, याने कशी गाडी पार्क केलीय....या गोष्टी मला क्षणोक्षणी खटकत होत्या. मग पुणे. इतकी वाहनं, आणि इतके छोटे अरुंद रस्ते. काय करणार आपण? " इ.इ.

का खटकतात या आणि अशा बाबी या अमेरिकेल्या तीनचार महिन्यासाठी जाऊन आलेल्या लेखकरावांना ? ५० ते ५५ वर्षे तुम्ही इथे काढली आहेत ना ? मग ५ महिनेही झाले नाही तर झटदिशी या बाबी खटकायला सुरुवात. शेवटी कितीही आणि कसाही मोडकातिडका असला तरी आमचा गाव तो शेवटी आमचाच ना ?

त्यामुळे शरदराव असोत वा अन्य कुणी...अमेरिकाच काय पण जगात कुठेही असला तरी फक्त तेथीलच जीवनशैली त्यानी पुस्तकरूपाने उघडून दाखवावी असेच म्हणेन ...तुलनेच्या मोहात पडले नाही तर फार उत्तम.

मंजु डी , पुस्तक ओळख आवडली.
पुस्तक मात्र नाही वाचणार. लेखकाने लिहिलेल्या बर्‍याच गोष्टी पटल्या नाहीत.

अशोक, तुलना करू नये या मुद्यास अनुमोदन.
पण या पुस्तकात भारताशी तुलना केली आहे का की केवळ अमेरिकेत पाहिलेल्या गोष्टींचे नुसतेच विनोदी वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे हे लक्षात घेऊन, मग रसग्रहण केल्यास, बरोबर होईल.

'नेहेमीपेक्षा वेगळे' असणे हा विनोदाचा विषय असणे हे फार पूर्वीपासून चालत आले आहे. भारताच्या अनुभवांपेक्षा हे अनुभव लेखकाला विनोदी वाटले असावेत. त्यांनी असे म्हंटले आहे का की, या पुस्तकातील अक्षर नि अक्षर खरे आहे, भारत नि अमेरिका यांच्यात तुलना करण्याच्या हेतूने हे पुस्तक लिहीले आहे' असे? तसे असेल तर वरील सर्व टीका अत्यंत रास्त आहे. नाहीतर उगीचच बिचार्‍यांवर टीका असे म्हणेन मी.

सगळ्यांना धन्यवाद. रसग्रहण लिहिण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे.

पिझ्झा-इटलीबद्दलः ते 'कुठल्याही फाईन डायनिंग रेस्तरॉंमधे' असे शब्द आहेत हे कृपया ध्यानात घ्या. जसा मुंबईतला जगप्रसिद्ध वडापाव तारांकित हॉटेलांमध्ये शक्यतो मिळत नाही तसंच पिझ्झ्याचं असावं असा अर्थ मी लावला. शिवाय ही माहिती लेखकाला अस्सल इटालियन आणि जातीवंत खवैय्याने पुरवलेली आहे.

उच्चारांच्या बाबतीतः मराठीत होकाराचा उच्चार 'हो', 'होय', 'हांss', 'हम्म्', 'व्हय' इत्यादी निरनिराळ्या प्रकारे केला जातो. इंग्रजी 'yes'चा 'yeah!' असा उच्चार तर इतका बोकाळलाय की मूळ शब्दच विसरायला व्हावा.

शेवटी हे पुस्तक म्हणजे 'अनुभव लेखन' आहे. अशा तऱ्‍हेचं लेखन ढीगाने प्रसिद्ध झालेलं असलं तरी लेखकाच्या शैलीमुळे हे पुस्तक मला विशेष आवडलं.

ज्यांना हे पुस्तक मिळवून वाचावंसं वाटतंय त्यांनी याच लेखकाचं 'फिरंगढंग'ही जरूर वाचावं असं मी सुचवेन.

मायबोली आणि कृषीवलचे मनःपूर्वक आभार! या स्पर्धेच्या निमीत्ताने मी रसग्रहण लिहिण्याचे धाडस करू शकले Happy

झक्कास लिहिलय मंजुडे ! पहिल्यांदाच रसग्रहण लिहिलय असे वाटत नाही. छान लिहितेस तू.
पुस्तक मिळवुन वाचेन. फिरंगढंग पाहिलय पण अजुन वाचलं नाहीये.

येस्स! कालपासून मी आठवण्याचा प्रयत्न करत होते ते पुस्तक - फिरंगढंग. ते मी वाचलंय. मला आवडलं होतं ते खूप. Happy

पिझ्झा-इटलीबद्दलः ते 'कुठल्याही फाईन डायनिंग रेस्तरॉंमधे' असे शब्द आहेत हे कृपया ध्यानात घ्या. जसा मुंबईतला जगप्रसिद्ध वडापाव तारांकित हॉटेलांमध्ये शक्यतो मिळत नाही तसंच पिझ्झ्याचं असावं असा अर्थ मी लावला. शिवाय ही माहिती लेखकाला अस्सल इटालियन आणि जातीवंत खवैय्याने पुरवलेली आहे.

>>>>

मंजूडीला अनुमोदन.. मला वाटते फाइन डायनिंग हा शब्द लक्षात घेत नाहिये कुणी इथे.. माझ्या माहितीनुसार व फारच तोकड्या अनुभवानुसार रोममध्येतरी फाइन डायनिंङ रेस्तराँमध्ये पिझ्झा मेनुमध्ये नव्हता. तो बहुतेकरुन सर्व गायरोज/पिझ्झेरियामध्ये उपलब्ध होता.

झक्कास लिहिलय मंजुडे ! पहिल्यांदाच रसग्रहण लिहिलय असे वाटत नाही. छान लिहितेस तू.>>> अनुमोदन Happy

<<हे लोक कवितांचे रसग्रहण वाचत असतील तर 'माझे हृदय चोरले' वगैरे वाचून म्हणतील, छे:, हृदय कसे चोरता येईल?>> हे हे ! :). जबरी.
बाकी रसग्रहण आवडलं. पुस्तक अगदी सहजासहजी (उधार) मिळाल तर नक्कि वाचावेसे वाटेल.

मला वाटते फाइन डायनिंग हा शब्द लक्षात घेत नाहिये कुणी इथे..
नीट वाचण्यापूर्वीच प्रतिसाद देणे हे तर मायबोलीवरील वैशिष्ठ्य. चुकून दुसरा(दुसरी) कुणि शहाणा(शहाणी) ठरली तर आपला शहाणपणा कसा लोकांना कळणार? जो (जी) दुसर्‍यांच्या चुका काढेल तो(ती) जास्त शहाणा(शहाणी) हे फार जुने तत्व आहे. म्हणूनच मला बरेच लोक शहाणे म्हणतात. नाहीतर मी एक तरी गोष्ट, कविता लिहीली आहे का? Happy

<'शॅल वी कॉल हर इन इमिजिएटली अ‍ॅन्ड टेक हर इन्नर व्ह्यू?' > Rofl

<मंजुडी, छान परिचय करून दिलास. > + १.

<आपले दोन्ही हात शाबूत असताना अमेरीकेतील बाथरुमांत इलेक्ट्रिक टूथब्रश आणि ऑटोमॅटीक टूथपेस्ट डिस्पेन्सर कशासाठी? असा प्रश्न तुम्हा-आम्हा सर्वांनाच पडतो. दोन माणसांच्या स्वयंपाकासाठी ऑटोमॅटिक श्रिंप डिव्हिनर स्वयंपाकघरात पाहून अचंबा वाटतो. अमेरीकेतील यंत्रवेड्या लोकांची गंमतजंमत आपल्याला वाचायला मिळते 'सारं कसं स्वयंचलित' या लेखात.>
हे सगळं जपानातही डिट्टो! म्हणजे बहुतेक " फर्स्ट्वर्ल्डमधे, घरोघरी स्वयंचलित चूली... " म्हणता येईल.
टॉयलेट्स मधेही स्वयंचलित गोष्टी. म्हणजे दार उघडलं की एकदा ऑटो फ्लश. वगैरे वगैरे बरेच काही!

<हे लेख लिहिताना, नर्म विनोदी शैलीत भाष्य करताना कुठेही खिल्ली उडवलेली नाही. त्यांच्या खुसखुशीत विनोदांमागचा उपहास जाणवतो पण पुस्तकातील भाषा कुठेही खटकत नाही. केवळ टीकाच करायची म्हणूनही हे लेख लिहिलेले नाहीत. एकंदरीतच त्रयस्थपणे, पण तरीही चौकस आणि मार्मिक नजरेने केलेले अमेरिकेविषयीचे हे निरीक्षण वाचताना आपण वाचक म्हणून त्यातील टवटवीत विनोदांना दाद देतोच, पण त्याचवेळी एक भारतीय म्हणून अंतर्मुख होऊन विचारही करू लागतो. शरद वर्दे यांच्या लेखनशैलीचे हे कसब खरोखर वाखाणण्याजोगे आहे.>
अनबायस्ड पुस्तक आहे असं वाटतं आहे. पण लगेच विकत घेणार नाही बहुधा Sad चला लायब्ररीत शोधावे Wink

बहुतेक प्रतिसादांशी सहमत. रसग्रहण छान झाले आहे.
मात्र लेखकाची काही मते फारशी पटली नाहीत.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा. Happy

Pages