अशीही प्रित !

Submitted by कवठीचाफा on 21 July, 2011 - 09:06

स्मिताली,

कालची तुझी भेट आठवली की अजुनही नजरेसमोर तो प्रसंग उभा रहातो.
तुफानी पाउस.. आगदी एखाद्या गुन्हेगाराला पोलीसांनी झोडपुन काढावा तसा, आख्या शहराला झोडपत सुटलेला पाउस, त्यात कार्पोरेशनच्या कृपेमुळे तृप्त होऊन तुडुंब भरुन वहाणारी गटारं. मला आठवतयं तु माझ्या या उपमांमुळे खळाळुन हसली होतीस, पण मला दुसरी उपमा वेळेवर सुचलीच नाही त्याला मी काय करणार ? माझी जगाकडे पहाण्याची नजरच जरा उपहासपुर्ण आहे हे खरं.
असो, त्या साठलेल्या गुढघाभर पाण्यात तु बंद पडलेली स्कुटी घेउन उभी, तुझा भांबावलेला चेहरा अजुनही मला आठवतोय. मी तुझ्या मदतीला आलो खरा पण तुझ्या मनात संशय दाटलेला, पण कदाचीत माझ्या बावळट ध्यानाकडे बघुन तुझा विश्वास बसला असेल. तुझी स्कुटी ढकलत आपण निघालो, मोरपिशी पंजाबी सुट मधली आपल्या रेनकोटमधे दडलेल्या केसांची हळुच पुढे येणारी बट हातानं मागं सारणारी आपल्या सौंदर्याची मोहीनी घालणारी तु, आणि विटक्या जिन्सवर झब्बा घातलेला कदाचीत बावळट वाटणारा मी, आपण गॅरेजकडे निघालो.
गाडी गॅरेजपर्यंत नेईपर्यंत आपल्या ज्या काही गप्पा झाल्या त्याच, त्यातुन मला इतकंच कळलं तुझं नाव स्मिताली आहे आणि तु वाणिज्य शाखेत पहील्या वर्षाला आहेस.
गाडी दुरुस्त झाल्यावर तु तिथुन निघुन गेलीस पण मी घरी कसा पोहोचलो ते माझं मलाच आठवत नाही.

विनीत,

==================

स्मिताली,

एकाच आठवड्यात दुसर्‍यांदा आपली भेट होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं पण कदचीत नशीब माझ्यावर खुष असावं. माझ्या नेहमीच्या बसस्टॉपवर मी नेहमीसारखाच बसची वाट पहात उभा आणि भर्रकन तुझी स्कुटी माझ्या समोर येउन थांबली. तु मला लिफ्ट ऑफर केल्यावर बसच्या रांगेत असलेल्या तरुण चेहर्‍यांवरचे ते हेवादर्शक भाव पाहुन मला खरंतर गंमत वाटली. आपण कॉफीशॉपमधे गेलो
यावेळी तु माझ्याशी खुप बोललीस, पण काय बोललीस पण काय बोललीस हे विचारलंस तर आजही मला सांगता यायचं नाही, कारण तुझ्या चेहर्‍यावर येणार्‍या त्या अल्लड बटेकडे पहाताना माझं भान हरपलेलं. याच भेटीत आपण एकमेकांच्या मैत्रीचा धागा पक्का केला आणि एकमेकांना फोन करण्याची वचनं देत आपण निरोप घेतला.
अनेकदा तुझा नंबर डायल करण्याचा प्रयत्न केला खरा, पण माझी बोटं मला साथ देईनात, बोलताना शब्द स्फुरतीलच याची मलाही खात्री देता आली नसती. तुला फोन करायचं मनात असुनही राहुनच गेलं.

तुझा विनीत,

================

प्रिय स्मिताली,

फोनची रिंग वाजली आणि पलीकडून तुझा आवाज ऐकला आणि काय सांगु ? मनात जणु फुलपाखरं बागडायला लागली. ओठांनी पुन्हा बंड पुकारलं आणि माझ्या मनातले शब्द मनातच अडकुन बसले.
मला माहीत आहे तुझीही अवस्था कदाचीत माझ्यासारखीच असेल, फोनवरची ती मिनीटभराची शांतता काही न बोलता बरंच काही सांगुन गेली. माझ्या छातीचे वाढलेले ठोकेही कदाचीत तुला ऐकायला येत असतील, कारण माझ्याच कानात त्यांचा एखाद्या पडघमासारखा आवाज घुमत होता. मात्र तुझ्या शांततेचा अर्थ काय घ्यावा हे न समजल्यानं मी गडबडलेलो पण पुढच्याच क्षणी आलेल्या तुझ्या त्या निर्मळ हास्यात सगळ्याच शंका पुसुन गेल्या.

तुझ्याशी बोललो, आगदी मनावरचं ओझं दुर होईपर्यंत बोललो पण अजुनही बोलत रहावसं वाटत राहीलं वेळ कधी पुरणार नव्हताच. तुझ्या फोन नंतर मात्र रात्रीत मला निटशी झोप आलीच नाही. डोळ्यासमोर सतत तुअ दिसत होतीस. आपल्या उजव्या हातातल्या ब्रेसलेटशी चाळा करणारी तु, कपाळावर येणार्‍या चुकार बटेला मागे सारणारी तु, आपल्या पाणीदार डोळ्यांनी एकटक माझ्याकडे पहाणारी तु, माझ्या लहानश्या विनोदावरही मनसोक्त हसणारी तु.... तु ,तु आणि फक्त तुच, यालाच प्रेम म्हणतात काय ? आणि जर म्हणत असतील तर मी तुझ्यावर प्रेम करायला लागलोय.

तुझा विनीत,

===============

प्रिय स्मितु,

जमेल तितकं आवसान गोळा करुन मी तुला माझ्या प्रेमाची कल्पना दिली खरी, पण मनातुन तुझ्या प्रतिक्रीयेची भिती साकळुन येत होती. मला तुला गमावायचं नव्हतं एक प्रेयसी म्हणुन नाही पण मैत्रीण म्हणुन तरी मला तुझी गरज होती.
तु फक्त एकच कटाक्ष टाकलास, काय नव्हत त्यात ! काळीज कापत जाणारा एक धारदार वार होता, आकाशीच्या चांदणीनं केलेल्या स्मिताचा साक्षात्कार होता, पापण्यांच्या उघडझाप होण्यात आलेली विलक्षण आलेली लय होती , जगापलीकडली अशी काहीतरी स्वर्गीय अनुभुती होती ती.
कितीतरी वेळ आपण शांतच होतो जणु आपल्यात मौनांची मक्तेदारी होती पण तुझ्या गालावर आलेल्या रक्तीमा सांगत होत्या या मौनातच तुझे हजारो हजारो होकार आहेत.
तु मला दिलेला होकार, आपल्या प्रितीची ती पहीलीच भेट, मी जणु तरंगतच घरी आलो .

तुझाच विनीत,

================

प्राणप्रिय स्मितु,
आपल्या प्रेमाच्या भेटी सुरु होऊन आता जवळपास दोन महीने उलटलेत तरी प्रत्येक क्षण मला जणु नवाच प्रितीचा अविष्कार वाटतो. तुझ्या भेटीतला प्रत्येक क्षण मनाच्या सोनेरी पेटीत जपुन ठेवावासा वाटतो. तुझ्या पायातल्या पैंजणांची नाजुक छनछन मला माझ्या ह्दयाच्या ठोक्यांपेक्षा जास्त अनमोल आहे. तुझ्या मांडीवर विसावलेल्या माझ्या डोक्यावरच्या केसांतुन फिरणारा तुझ्या हातांचा मोरपंखी स्पर्श मला आत्ताही जाणवतोय, तुझ्या ओठांतुन उसळणारे ते हस्याचे कारंजे मनात अजुनही गारवा आणतयं. बागेतल्या एकांतात तु माझ्या मिठीत विसावल्यावर येणारा तुझ्या केसांचा मंद सुवास अजुनही मनात दरवळतोय.
प्रेमाचा सागर जरी अफाट असला तरी त्याच्या लाटा कश्या नकळत मनात प्रवेश करतात नाही ?
` माझ्या नातवंडांची आजी होशील का ?' या माझ्या लग्नाच्या अजब मागणीने क्षणभर विस्फारुन मग पापण्यांच्या मखमली पडद्यांच्या आड दडलेले तुझे भावदर्शी नेत्र, तुझे फुरंगटणे आणि पुन्हा माझ्या मिठीत सामावणे सारे काही माझ्या त्या सोनेरी पेटीत मी जपलेय.
नदीच्या प्रेमाखातर डोंगरदर्‍यांची तमा न बाळगता धावणार्‍या त्या खळाळत्या निर्झरासारखी माझी अवस्था आहे, ज्याला आता कुणीही रोखु शकत नाही कुणीही नाही आगदी काळही.

तुझाच विनीत,

================

प्राणप्रिय स्मितु,

कॉलेजच्या सुट्या म्हणुन तुझे ममी पपा तुला त्यांच्यासोबत पाचगणीला नेताहेत हे ऐकुन माझ्यावर जणु मणामणाचे ओझे पडले. महीनाभरासाठी का होईना तुझा विरह मी कधीच गृहीत धरला नव्हता. कल्पनेनंच जिव कासावीस झाला गं ! शक्य असतं तर पक्ष्यासारखी उत्तुंग भरारी घेत मी ही तुमच्या कारसोबत येत राहीलो असतो, पण कविकल्पना या अखेरीस मिथ्याच ना ! किमान एक महीन्यासाठी का होईना, शेवटी मलाही माझं आयुष्य पहायलाच हवं ना , आपल्या दोघांसाठी ! तुलाही काहीतरी मागे राहील्याची भावना होत राहील पण त्याला सध्यातरी आपला इलाज नाही.
तुझ्या विरहाची कल्पना म्हणजे मला तरी कृष्णपक्ष सुरु झाल्यासारखी वाटतेय, कणाकणानं मी माझं झिजत रहाणार आहे तुझ्या आठवणींच्या धाग्याला अडकुन माझ्या मनाचा इवलासा पतंग आता महीनाभर भिरभीरत रहाणार आहे. या विरहातही एक आनंद लपलाय तुच म्हणालीस ना ! आपल्या पुनर्भेटीचा, कधीतरी अवचीत तुझा आवाज माझ्या कानावर पडेल अनं माझ्या मनात पुन्हा एकदा फुलपाखरं बागडायला लागतील. तुझ्या भेटीचा गोडवा अजुन शतपटीन वाढेल, तुझीही अवस्था याहुन वेगळी नसणारच तेंव्हा आता आपण वाट पहायची ती फक्त हा युगासारखा भासणारा महीना संपायची.

तुझाच विनीत,

================

प्राणप्रिय स्मितु,

महीना उलटायला जरी युगायुगांचा काळ लोटला असला तरी तो संपुन गेला, येणारा प्रत्येक दिवस मला आता आयुष्याचा अंत पहाणारा वाटतोय, अद्याप ना तुझी भेट झालेय ना तुझा आवाज कानी पडलाय. माझी अवस्था काय असेल याची तुला कल्पनाच येणार नाही. उगवणारा प्रत्येक सुर्य माझ्यासाठी आशेचा एक सोनेरी किरण घेउन येतो, `कदाचित आज तु भेटशील' अन बाहेर येणारा चंद्र अपेक्षाभंगाची काळी कुट्ट रात्र घेउन माझ्यावर धडकतो, जिव कासाविस होतोय गं !
तु तरी का अशी निष्ठुर वागतेस ? मला तु चंद्र म्हणायचीस मग या चंद्राला एकटं सोडून चांदणी का लपुन बसलेय ? आपल्या दोन शरीरांचा आत्मा एकच असं तुच म्हंटलेलस मग हे अर्धवट जिवन पुर्ण करायला कधी गं येणार तु ?
तुझ्या आठवणीत रात्र रात्र जागुन काढल्यात मी, तुझ्या एका शब्दासाठी प्राण कानात गोळाकरुन ठेवलेत मी. तुला काहीच जाणवत नाही का ? तुझ्या भेटीसाठी जिव असुसलाय गं ! प्रीये लवकर ये.

तुझाच विनीत,

================

प्राणाहुन प्रीय स्मितु,

कीती हा विरह ? प्रत्येक दिवस माझ्यासाठी नकोसा होत चाललाय, तु मला विसरली तर नाहीस ना ? मी तुला फोन करु ? भेटशील मला ?

तुझाच विनीत,

================

प्राणाहुन प्रीय स्मितु,

हिरवळींच्या मोहात पडुन,
मी माझा कोष सोडून आलो
सुरक्षीत त्या कवचामधला
माझा श्वास सोडुन आलो.
नाही केली पर्वा, ओरबाडणार्‍या काट्यांची
नाही बाळगली तमा, त्या ठेचाळणार्‍या धोंड्यांची
तुझ्यासाठी जगण्याचा मी,
हव्यास सोडून आलो.
माहीत नव्हते मला, ते मोहजाल हिरवळीचे
मखमलीत लपलेल्या, त्या काटेरी तृणांचे
यासाठीच का मी दुनीयेवरला
विश्वास सोडून आलो ?
होती अपेक्षा हिरवळीची, होरपळून निघालो
एकटाच होतो आधीही, अन एकटाच उरलो
याच साठी का आयुष्यातला
प्रत्येक पाश तोडून मी आलो ?

तुझाच एकटा, विनीत

================

प्राणाहुन प्रीय स्मितु ,

मी कवी नाहीये हे तुलाही माहीताय पण तरीही मला काव्य स्फुरलं, तुझ्या विरहात होणार्‍या माझ्या होरपळीचा अजुन काय पुरावा हवा तुला ? विरह वेदना इतक्या जाळत राहील्या की शब्द आपोआप जुळत गेले. तु असं नको समजु की मी तुझ्यावर आरोप करतोय पण माझ्याही मनाची अवस्था तु समजुन घे.
किती दिवस झाले तुझं उत्तरच नाही, मी समजु तरी काय ? माझ्या तडफडीला तुझ्यालेखी काहीच किंमत नाही का ? तुझ्या एका नजरभेटीसाठी असुसलेल्या या डोळ्यांना तृप्ती नाहीच का ? नाही ! मला अजुनही वाटतय तु येशील, आपल्या प्रेमाचं बंधन इतकंही नाजुक नाहीये ना ? की थोडं अंतर पडलं आणि ते पार तुटून गेलं.
आजही तुझी वाट पहातोय, तुझ्या कपाळावरची वार्‍याबरोबर अवखळपणा करणारी बट मला नजरेत भरुन घ्यायचीय, तुझ्या पैजणांची नाजुक छनछन कानात साठवायचेय, तुझ्या स्पर्शातला उबदारपणा पुन्हा एकदा अनुभवायचाय पण तु.. तुच का रुसलीयेस. आता तरी उत्तर दे, नाहीतर मी नक्की समजेन की तु मला विसरलीस, आणि जर तुच माझ्या आयुष्यात नसशील तर कशाला हवं हे आयुष्य तरी ? मला तुझी गरज आहे गं, तु उत्तर देशील ना ? प्लिज ?

तुझाच (एकटा होत चाललेला) विनीत

===============

माझी नसलेली स्मितु ,

तुझा संपर्क नाही, तुझी भेट नाही मला वाटत असलेली भीती शेवटी खरी ठरवलीस तर तु ! तु मला विसरलीस भरल्या दुधाच्या भांड्यातुन अलगद माशी बाहेर काढून टाकावी तसं तु तुझ्या आयुष्यातुन मला कायमचं बाहेर काढुन टाकलंस,
तु माझं विश्व होतीस, तुझ्यातच माझी दुनीया सामावलेली होतीम, माझ्या मनाच्या प्रत्येक कोपर्‍यात तु आणि फक्त तुच होतीस. कमळाभोवती भ्रमरानं भिरभीरत रहावं तसं माझं आयुष्य तुझ्याभोवती रुंजी घालत होतं, मग तु मला का परकं केलंस ?
मी जर तुझ्या लायकीचा नव्हतोच तर, मला आधीच जवळ केलं नसतस ! माझ्या जळत्या मनाची आचही तुला जाणवत नाही ? एका क्षणात माझ्या आयुष्याचं रणरणतं वाळवंटच जर करायचं होतं तर त्यात आधी प्रेमाचं नंदनवन फुलवलंसच का ?
तु.. तु कदाचीत प्रेम नसशील केलं पण मी तुझ्यात माझं अस्तित्व हरवुन बसलेलो गं ! किती सहजतेनं तु त्याच्या चिंधड्या केल्यास. माझ्यासोबत जगण्यामरण्याच्या शपथा घेताना तुझं मन कधीच थरथरलं नाही का गं ? विरहाच्या या आगीत मला भिरकावताना एक क्षणही तुझं मन विचलीत झालं नाही ?
माझ्या अवतीभवती मी तुझ्या सहवासाचं सोनेरी चित्र चितारलेलं, तुझ्या सहवासात माझ्या आयुष्याचं अमॄत झालेलं किती सहजतेनं तु त्यात विष कालवलंस गं !

एकदा जरी म्हणाली असतीस तर हे जग तुझ्यासाठी सोडून दिलं असतं, तुझ्यासोबत जगण्यातच माझ्या आयुष्याचा स्वर्ग होता आता तुच माझ्याकडे पाठ वळवलीस तर या नरकात राहुन मी काय करु ?

चारच दिवस मी वाट पहाणार आहे, जर तुझं उत्तर नाहीच मिळालं तर मात्र मी हे जिवन संपवणार आहे तुझ्याशीवाय आता मला त्यात काहीच स्वारस्य दिसत नाहीये.

कायम तुझाच असलेला विनीत,

================

पत्र संपवुन त्याने ते निट घडी घालुन पाकिटात ठेउन दिलं आणि ते पाकीट उचलुन एका पेटीत ठेवलं. आधीच त्या पेटीत आणखीही काही पाकिटं ठेवलेली दिसत होती. त्या पाकिटांखालुन एका वर्तमानपत्रातल्या बातमीचा मथळा अर्धवट दिसत होता.
.
.
.
.
..
.
.

`.. कडून पाचगणी़कडे जाणार्‍या सँट्रोला अपघात संपुर्ण कुटुंब गाडीसहीत दरीत कोसळले'

गुलमोहर: 

स्मितालीपासून कायम तुझाच असलेला पर्यंतचा प्रवास व्हाया प्राणप्रिय स्मितू, एकटा होत चाललेला...................

क्या बात है चाफ़्या! जियो........
चाफ़ा चक्क प्रेमकथा आणि तीही प्रेमपत्राच्या स्वरुपात लिहीतोय........ ऐतेन Wink
सॉल्लीड जमलीये रे...........
मी पण एक लिहू का अशीच? Proud

मस्त जमलीय... तुम्हा लोकांच्या कथा वाचुन वाचुन शेवट असाच काहितरी असेल याची सवय झालीय... पण लिहिण्याची स्टाइल आवडली... Happy

मी पण एक लिहू का अशीच?>>>> नको लिहुस विशाल, परत ती पण क्रमश: ठेवशील Happy Light 1

सर्वात आधी धन्यवाद मित्रमंडळ Happy मला लिहायचीच होती एखादी प्रेमकथा, मागे एकदा प्रयत्न केला तर लोकांना गोडगोड शेवट नाही आवडला म्हणुन आता बदलला, तरी तुम्हालोकांचे प्रतीसाद वाचुन बरं वाटलं.
आणखी एक कथा आहे ती ही कथा लिहीताना झालेल्या गोंधळाची पण ती पुन्हा केंव्हातरी Happy

मी पण एक लिहू का अशीच?>>>> नको लिहुस विशाल, परत ती पण क्रमश: ठेवशील
>>>>>> चिमुरी आता तो नक्कीच लिहील, त्याच्या शेपटावर पाय दिलास तु Proud पण विशाल तुझी प्रेमकथा वाचायला मी उत्सुक आहे बरं अर्थात क्रमश: नसेल तरच

स्मितालीपासून कायम तुझाच असलेला पर्यंतचा प्रवास व्हाया प्राणप्रिय स्मितू, एकटा होत चाललेला................... मस्त वर्णन.

खरंच गुंतवलेस मित्रा तिच्यात... Wink

शवट तर निव्वळ अनपेक्षित्......अशात मजनुचा 'राधे' झाल्याशिवाय राहत नाही. Sad