तशी माझी मीच रिक्षा फ़िरवतच असतो म्हणा. मी गेली अनेक वर्षे टिव्हीवरच्या मालिकाच काय, टिव्हीच बघणं सोडून दिलय. त्यामूळे वाचनाला, मित्रांच्या संपर्कात रहायला, इतर छंदांना भरपूर वेळ मिळतो.
श्रीयुत गंगाधर टिपरे हि मन लावून बघितलेली शेवटची मालिका. त्या आधी, तू तू मै मै पण बघितली होती. भारत एक खोज ची तर वाट बघत असायचो.
यावेळच्या भारतवारीत, पावसामूळे कधी कधी घरी बसावे लागायचे. आई कुठलीतरी मालिका बघत बसलेली असायची. त्यावेळी जाणवलेले हे काही.
अर्थात मला हे माहित आहे, कि माझ्या या लेखनाने इतर कोण, माझी आईदेखील मालिका बघणे सोडणार नाहि. त्यमूळे हे स्वगतच समजायचे.
१) विषय
मालिकांचे विषय हे एका ठराविक वर्तूळातच फ़िरताना दिसताहेत. कौटुंबिक ताणतणाव याचे नुसते गुर्हाळ चाललेले असते. आताशा अभावानेच दिसणारे एकत्रित कुटुंब या मालिकांत असते. आणि ते गुण्यागोविंदाने एकत्र नांदताना क्वचितच दिसते. ताणतणावात काही खास कारणे दिसली नाहीत, तरी कुठल्यातरी सूनेला घराबाहेर नक्की काढलेले असते आणि प्रॉपर्टीच्या पेपर्सवर कुणाकडून सह्या नक्कीच हव्या असतात. नुसत्या पेपर्सवर सह्या करुन, तेसुद्धा घरातल्या घरात असे कायदेशीर दस्ताऐवज तयार करता येतात का ? घटस्फोटाचे कागद पण असेच तयारच असतात, त्यावर नुसती सही करायची असते. तीसुद्धा घरच्या घरी. धन्य रे बाबांनो. तमाम गृहिणींना उत्तम जी.के. मिळतय म्हणायचे.
२) बिझिनेस
प्रत्येकाचा काहितरी बिझिनेस नक्कीच असतो, पण तो कसला ते मात्र शेवटपर्यंत कळत नाही. ऑफ़िसेसमधले वातावरण तर काय वर्णावे ? या दिग्दर्शकांना स्वत:ची ऑफ़िसेस पण नसतात का ? एका टिपिकल दिवसात ख-याखु-या ऑफ़िसात जे काही घडू शकते, त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे, पण या लोकांना ते माहितच नसते.
३) घरातला वावर
पुर्वी आशा काळे कशी स्वत:च्या पदराने नवरोबाचे बूट पुसून द्यायची, तसे आता होत नाही. (त्याच पदराने चहाचा कप पण पुसायची ती !) पण मालिकांतल्या बायकांना घरात काही काम असते, असे कधी जाणवतच नाही. अगदी घरात नोकर चाकर असले तरी, घरातील माणसांना अनेक कामे स्वत:च करावी लागतात. दोघे नवराबायको नोकरी करणारे असले तरी, दोघांनाही घरातली कामे उरकावीच लागतात. पण मालिकातल्या माणसांना मात्र तसे काहिही काम नसते. म्हणून तर कटकारस्थाने करत असतात.
मला आवर्जून नातीगोती नाटकातल्या आईच्या घरातील वावराचा उल्लेख करावासा वाटतो.
त्यात ती आई, घरातील इतक्या वस्तू हाताळते, त्यांची ने आण करते कि ते घर आणि ती आई अगदी खरीखुरी वाटते. पण मालिकेतल्या बायका मात्र कचकड्याच्या बाहुल्याच वाटतात.
४) अभिनय
समजा दोन बायका बोलत असतील, तर एकीच्या तोंडावर, बये तूला भाजून खाऊ की तळून खाऊ असे भाव, तर दुसरीच्या तोंडावर, धरणीमाय पोटात घेईल तर बरं, असे भाव. यापेक्षा वेगळे काही दिसते का कधी ? कायम चढ्या आवाजात बोलणे, (लाऊड) सदैव डोळे रोखून वा वटारून बोलणे म्हणजे यांचा अभिनय. रडायचे म्हणजे गळा काढूनच रडायचे. कधी कधी तर ते रडणे मला बघायलाच काय, ऐकायला सुद्धा असह्य होते. पापण्यांनी रोखून धरलेले पाणी, डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू... असे उत्तम
क्लोज अप्स आठवताहेत मालिकांमधले ?
अभिनयाची उस्फुर्तताच जाणवत नाही. सुप्रिया चा अभिनय म्हणजे उस्फ़ुर्तता, असे समजले तरी चालेल. एरवी असा नैसर्गिक अभिनय करणारे कलाकारही, मालिकांचा अतिरेक झाल्याने यांत्रिक अभिनय करताहेत, असे वाटायला लागलेय.
५) आवाजाची फ़ेक
एकच एक ठराविक पट्टीतला आवाज, म्हणजे सीमा. परवा भरतच्या, निलम प्रभुंच्या बीबीवर मी, त्यांच्या महानंदा या नभोनाट्याची आठवण काढली होती. कधीचे आहे ते नभोनाट्य, काही कल्पना ? ते किमान १९७२/७३ सालातले असणार. आज जवळ जवळ ४० वर्षे झाली (ते परत कधी ऐकलेच नाही) तरी त्यातले संवाद विसरलेलो नाही. ते चार भागात प्रसारित झाले होते. त्यातल्या दुस-या भागातील संवांदाची उत्कटता तर गुंतता ह्रुदय हे, या नाटकात पण जाणवलेली नव्हती.
मराठीत एके काळी उत्तम आवाज कमावलेल्या कलाकार होत्या. आशा पोतदार, फ़ैयाज, भक्ती बर्वे, लालन सारंग, रिमा, सुधा करमरकर, आशालता, सुमन धर्माधिकारी, विजयाबाई..
नुसत्या आवाजावरुन त्या एखादी व्यक्ती उभी करू शकत असत. (आठवा जाणता राजामधली, जिजाबाई)
या थोर कलाकारांचे मार्गदर्शन आजच्या मालिका कलाकारांना लाभायला हवे होते.
बहुतेक मालिका घरातल्या घरातच असतात. आपण एकमेकांशी बोलायला, फ़ोनवर बोलायला, स्वत:शी बोलताना एकाच पट्टीत बोलतो का ?
६) कपडे
कपड्यांच्या बाबतीत पण ठराविक भडक रंगाचेच कपडे दिसतात. सेटच्या रंगसंगतीशी ते जूळतीलच असे काही नसतेच. आणि असा विचारही केलेला नसतो. शिवाय ते कपडे, नुकतेच इस्त्री केलेले, पदर पण व्यवस्थित पिन अप केलेला !
त्या कपड्यात बहुतेक कलाकार अवघडलेलेच वाटतात. मला आठवतय, बॅरिष्टर नाटकाच्या वेळी सुहास जोशींनी, असे सांगितले होते, कि विजयाबाईंनी त्यांना नाटकातल्या साड्या, घरी नेसायला लावल्या होत्या. वापरुन जुन्या झालेल्या साड्याच नाटकात वापरल्या होत्या. असा विचार कुणी करतं या मालिकांसाठी ?
७) प्रकाशयोजना
भगभगीत प्रकाश हाच कायम. सकाळची, संध्याकाळची वेळ, घरात कधी जाणवतच नाही. कायम टळटळीत दुपार. अनेक मराठी नाटकांत, प्रकाशयोजनेचा उत्तम विचार केलेला दिसतो. पण मालिकेत रात्रीच्या अंधारात सुद्धा, प्रत्येक झाडामागे प्रखर पांढरा दिवा लावलेला दिसतो. अपु-या प्रकाशात उत्तम चित्रीकरण करणारे कॅमेरे आता नक्कीच उपलब्ध आहेत.
८) चित्रीकरण
तेच ते ठराविक अँगल्स. त्याबद्दल काहीही विचार नाही. दर दोन मिनिटांनी झूम इन करत तीन वेळा घेतलेला क्लोज अप. वर्षानुवर्षे यात काही म्हणुन बदल झालेला नाही. एखादया दृष्याचा, रचनात्मक नजरेतून विचार केलाय असे जाणवतच नाही.
दूरदर्शनच्या पहिल्या वहिल्या कॅमेरामन्सच्या तूलनेत आज काही फ़ार पुढे आलो आहोत असे वाटतच नाही.
९) मेकप
याचा तरी काही विचार केलेला असेल, अशी अपेक्षाच करता येत नाही. चेहर्यावर थापलेले रोंगण, रंगवलेले केस, लावलेला विग सगळे सगळे कळून येते. टिकल्यांच्या जागी गोंदण, एकावर एक चढवलेल्या टिकल्या, दंडावरचे गोंदण, कोरलेले डोळे... यक.
१०) शरीर ठेवण
बहुतेक हिरो हे ठराविक साच्यातून काढलेल्या शरिराचेच नव्हे तर चेहरेपट्टीचे पण. अगदी नगाला नग. एकाला काढावा आणि दुस-याला झाकावा. म्हणून तर मालिकेत बदलत असावेत.
सिनियर कलाकारांनी, कामाचा अतिरेक करुन चेहर्याची, शरीराची लावलेली वाट पण बघवत नाही. अशा शरीराने व चेहर्याने, ते बरा अभिनय करतील, अशी अपेक्षा तरी कशी बाळगायची ?
आधी मला वाटायचे कि आपण हिंदीचे अनुकरण करतोय. (एक उदाहरण देतो, आपल्याकडे एखाद्याला हाक मारायला म्हणजे सांत्वनाला जाताना, पांढरेशुभ्र कपडे घालायची रित होती का, कधी ?) पण आता कळले कि इंग्रजी मालिकांत पण फारसे काही वेगळे नसते.
चला मन मोकळे करुन टाकले. काहि ओझरती दृष्ये बघून जर मला इतका ताप होत असेल, तर नियमित मालिका बघणार्यांच्या सहनशीलतेचा, हेवाच करायला हवा मी.
हो हो, डीडी भारतीवरचे
हो हो, डीडी भारतीवरचे कारेक्रम भले जुने असोत, बघायला बरे वाटतात. सध्या लेकीच्या सुट्टीत आम्ही रात्री बराचवेळ टिव्हीपुढे असायचो, तेव्हा जाणवले.
दिनेशदा, वाक्यागणिक अगदी
दिनेशदा, वाक्यागणिक अगदी अगदी!!! मी गेल्या २० वर्षात एकही मालिका बघितली नाहीये!
मी एक मालिका अवडीने बघते....
मी एक मालिका अवडीने बघते.... लापतागंज........
मस्त आहे..... एका छोट्याशा गावात राहणार्या साध्या लोकांच्या गोष्टी असतात......
सध्या झी मराठीवर 'मधू-चन्द्र'
सध्या झी मराठीवर 'मधू-चन्द्र' अश्या नावाची मोजक्याच भागांची मालिका चालू झाली आहे.
अगदी साध्या विषयांनवर कुठलेही ढॅणढॅण म्युजिक न देता छान वाटते ही!
मी एक खूप साधा नियम केला आहे कोण्ता कार्यक्रम बघावा याबद्दल...
" जर ढॅणढॅण म्युझिक आनी फिरता क्यामेरा असेल तर बिलकुल टाळावा तो कार्यक्रम"!
ठीक आहे मान्य. पण मग दुसरा
ठीक आहे मान्य. पण मग दुसरा पर्याय तरी काय आहे ?
आणि क्रिकेटबद्दल काय ? दिवस दिवसभर तोच तो रटाळ खेळ पाहता तेव्हां ?
सांजसंध्या, पर्याय अनेक आहेत.
सांजसंध्या,
पर्याय अनेक आहेत. मी निवडक उत्तम सीडीज बघतो. नेटवर अनेक क्लीप्स, जूनी सुश्राव्य गाणी उपलब्ध आहेत. हे केवळ बघण्याचे पर्याय.
बाकी जोपासाल तेवढे छंद कमीच. माझ्या पूतण्याला काही वर्षांपूर्वी व्यसन लागले होते, त्यावेळी मी त्याला म्हणायचो, तू टिव्ही बघत नाहीस, तर टिव्ही तूला बघतोय.
घराघरात पुर्वी गोलाकार पंगतीत रात्रीचे जेवण होत असे, आता सगळ्यांची तोंडे टिव्हीकडेच असतात.
रच्याकने, मी क्रिकेटही बघत नाही. घरी टिव्हीच नाही माझ्या !
हा एक स्क्रीन अॅडिक्षन चा
हा एक स्क्रीन अॅडिक्षन चा प्रकार आहे. टीवी, मॉनिटर, लॅप्टॉप, नाहीतर फोनचा स्क्रीन नाहीतर आयपॉड.
मी खूप टीवी बघते किंवा बघत बघत कामे करते. कसे बुवा वावरतात फॅमिली सेटिंग मधले लोक व इतक्या बांधलेल्या परिस्थितीतल्या बायका ते बघण्यासाठी. आज प्रतिग्या मध्ये एका बाईची होम डिलीवरी कशी करायची त्याचा वस्तुपाठ दाखिवला. गावोगाव घरोघरच्या स्त्रीयांना त्याचा नक्की उपयोग होइल.
शिवाय एक गंमत आहे सीरीअल्स प्रचंड खेड्वळ वातावरणात असतात पण मधल्या जाहिराती सर्व वर्ल्ड क्लास उत्पादने, चिनी चेह र्याच्या फेक गोर्या स्त्रीयांचे गोरेपण जपणारी क्रीम्स वगैरे.
मराठी मालिका बघत नाही. पण कुकरी प्रोग्राम बघते. दोघी जणी स्टार वर्ल्ड, टीएल सी, झी कॅफे जास्त व सर्व चित्रपट चॅनेल्स. रेसलिन्ग क्रिकेट, टेनिस नक्की बघतो. तेलुगु बातम्या बघतो( उद्या बंद आहे का ते कळायला) तमीळ गाणी ऐकतो. अॅक्टिव किड्स वरचे क्विझ सोडवितो, कथा ऐकतो. कुकिंग वरून रेसिपी घेतो. टाटा स्कायचे प्रोमोज मी बघते, रामदेव बाबा बघत नाही. इन्फोमर्शिअल्स नक्की बघते. स्पाय पेन
डर्मा सेटा अन काय काय फार विनोदी असते. होम शॉपिन्ग चॅनेल बघतो. स्वस्तात ज्वेलरी, स्टील सेट,
बादल्या ट्मरेल्स अन टब. डिस्कवरी, एन जी बघतोच, फॉक्स बीबीसी नेट्वर्क पण मस्त शोज दाखिवतात.
मस्त एसी लावून रजईत शिरून एच डी सिनेमे बघणे, मध्येच उठून चकली- दही घेऊन येऊन खाणे यासारखे सूख नाही. कोणी गेस्ट आलेच तर मी त्यांना लंच ला बाहेर नेते. घरी का बरे? प्रायवसी रॉक्स.
इसको लगा डाला तो लाइफ झिंगालाला.
अश्विनी, बरंच बघतेस की. मी
अश्विनी, बरंच बघतेस की. मी रेसिपी प्रोग्रॅमसाठी नालायक झालोय. घटक पदार्थ बघून, याचे काय करतील ते आधीच कळते !!
फुड फुड नावाचा नवा चॅनेल दिसायला लागलाय !
अरे तसे नाय ते कशातून काय
अरे तसे नाय ते कशातून काय बनवितील ते अति विनोदी असते. कालचीच गोष्ट कोबी रबडी, कोबी किसून वाफविला, मग त्यात नारळाचे दूध, शहाळे क्रीम, सुका मेवा अन काय काय. कोबी ची रबडी कोन करेल व का?
तसेच बटाटे उकडून स्मॅश करणारी एक तरी माउली असतेच. ज्वारीची पालक घालून भाकरी, सर्व पदार्थ " मग मुले नाहीत ना भाज्या खात म्हणून असे करायचे. " " मग पालक गाजर घातलेय ना आनि मस्त तळून घेतले आहे पौष्टिक व झटपट असे असंख्य पदार्थ असतात. त्यात अँकर लै विनोदी. मेजवानी मधे एक मिसरूड वाले पोरगे येते ते तर कशालाही छानच म्हणते. साध्या पालक घातलेल्या भाकरीचे किती अच्च्च्च्च कौतुक करायचे पण नाही. एका बैने साधे घरी चुरमुरे लावून खातो तसे करून वर पीठ चट्णीचे गोळे ठेवले होते.
अ नि अ असते सर्व.
जे लेनो शो मस्त असतो. हहपुवा.
दिनेशदा.. मस्त लिहीलय !!
दिनेशदा.. मस्त लिहीलय !!
अश्वीनि, कोबीची रबडी खरेच छान
अश्वीनि, कोबीची रबडी खरेच छान लागते. पण कालनिर्णयमधली अनेक वर्षांपूर्वीची विजेती कृती आहे ती.
अनुमोदन.. थोड वेगळ बघायच असेल
अनुमोदन..
थोड वेगळ बघायच असेल तर, सोनि टीवी वर, बडे अछे लगते हे आणी झी मराठि वर, गुन्तता ह्र्य्दय हे..
चांगल्या वाट्त आहेत, अजुन तरि, पुढच माहित नाहि
@ साक्षी, लापतागंज चांगली
@ साक्षी,
लापतागंज चांगली वाटते त्याचे कारण आहे. ते म्हणजे त्या कथा शरद जोशीं सारख्या हिंदीतल्या एका श्रेष्ठ व्यंग लेखकाच्या आहेत. ज्याला संदर्भ ठाउक असतात त्याला त्यात काढलेले चिमटे बरोबर कळतात. कधी काळी दूरदर्शन वर खजाना, कथासागर या सारख्या मालिकां मधून देशभरच्या श्रेष्ठ साहित्यिक-लेखकांच्या कथा दाखवत . मराठीत ही हे होते. पण आता अभावानेच असे काही पहायला मिळते. मी आपला हा माझा मार्ग एकला म्हणत पुस्तक काढून आडवा पडतो, डोळे मिटू लागले की पुस्तक नाकावर पडतं. सुदैवाने मुलालाही पुस्तकांची आवड लागतेय. सीरीयल्स? ते काय असत?
दिनेशदा खुप छान लिहिलत. खरंच
दिनेशदा खुप छान लिहिलत.
खरंच हे लोकं मालिका काढताना काही विचार करत नाहीत असं वाटतं.
तुम्ही लिहिलय ते एखाद्या सेंसिबल मालिका निर्मात्याने वाचावं आणि एखादी तरी बरी मालिका बघायला मिळो..
अगदी अगदी! एखादा संवाद
अगदी अगदी!
एखादा संवाद म्हणून झाला की तिथे उपस्थित असणार्या प्रत्येकाचा चेहरा किमान दोन तिनदा तरी दाखवायचा मग पुढचा संवाद.
अगदी असह्य.
ह्या असल्या लांबलचक आणि रटाळ मालिकांची सुरवात 'शांती'पासून झाली का?
जून्या मालिकांमधल्या बर्याच मालिका मला आजही नक्कीच पहायला आवडतील.
ह्या मालिका रटाळ असतात पण
ह्या मालिका रटाळ असतात पण मध्यमवयीन आणि थोड्या वयस्कर बायका मुख्यत्वे ज्या घरी असतात ह्याम्चा वेळ चांगला जातो.पुण्या मुंबैमधे आज traffic इतके वाइट आहे की काही काम असेल तरच बाहेर पडावे ,इतर गोष्टी कराव्यात असा त्यांचा approach असतो.गाणी/पुस्तकांच्या आवडीची सक्ती नाही करता येत त्यांच्यावर.चांगल्या इंग्रजी मालिका,सिनेमे बघायला इंग्रजी समजणे त्यापुढे जाउन त्याची आवड असणे हे २ महत्वाचे घटक उपल्ब्ध नसल्याने ह्या मालिकाम्चे भविष्य उत्तम आहे.
addiction तर आहेच पण मी observeकेलेली गोष्ट म्हणजे ह्या मालिका पुढे काय होणार ह्या stage ला आणुन episode संपवतात, त्यामुळे अरे आज काय होणार म्हणुन माणुस पुन्हा TV लावतोच.
अश्विनीमामी खरच ती भाकरी इतकी
अश्विनीमामी खरच ती भाकरी इतकी बोर होती कि चॅनल वाले असे पदर्थ करायला पण बोलावतात हा प्रश्न पडला ( ना धड त्या भाकरी ला आकार ना फुगली). माझ्या मुलीपण फार कार्टुन बघतात, सध्यातरी मी एक उपाय काढलाय , आठवडयातुन १ दिवस नो TV day. दिवस मुली सांगतील तो, पण मुलींनी लगेच बाबांकडून पण कबुल करून घेतलं कि तुमच्या पण बातम्या/ मॅच बंद. मी पण १, २ बघते सिरयल त्यामुळे टीव्ही पुर्ण बंद करायचं ठरत नाही, पण लवकरच पुर्ण बंद करणार आहे (बघुया कधी ठरतं ते?)
नायीकांनी तरी मेकअप साठी थोडे
नायीकांनी तरी मेकअप साठी थोडे वास्तववादी राहीले तर काय हरकत आहे? नाटकात वेळेनुसार मेकअप असतो..तसा का करत नाहीत सिरिअल मधे? ४ जणान्ना पुरुन उरेल एवढी लिप्स्टीक का लावायला लागते ह्यांना?
ह्या मालिका रटाळ असतात पण
ह्या मालिका रटाळ असतात पण मध्यमवयीन आणि थोड्या वयस्कर बायका मुख्यत्वे ज्या घरी असतात ह्याम्चा वेळ चांगला जातो>> अगदी अगदी. कामावरून आल्यावर अंगात परत बाहेर जायचे त्राण नसते. मग काय उचल रिमोट न लाव टीवी. त्यात जे आपल्या लाइफ मध्ये कधीच होणे नाही अश्या गंमती इथे बघायला मिळतात. जसे मोठ्या परिवारात घरी होणारे लग्न, एका माणसाच्या नजरचुकीने दोन बायका ( हे कसे काय होउ शकते?) गुंतता ह्रदय मधली काय ती चार कोटीची चोरी? चित्रविचित्र पदार्थ, जिथे कधीच जाणार नाही अश्या जागांची मस्त टूर जसे हिमालयाज म्हणून येते बीबीसीवर. नैतर मोरोक्कन फूड सफारी. असले बघत बघत काहीतरी जेवण बनवायचे नाहीतर ऑर्डर करायचे. कंटाळवाणे घरकाम पण सुसह्य होते. मी कायम कपडे इस्त्री करताना टीवी बघत असते. काल काय पदार्थ पाहिला म्हॅते? सांजोरी विडा -- मटार घालून उपमा बनविला तो विड्याच्या पानात घातला मग ते विडे बेसनात बुडवून तळले? का का का?
माझे तर दोन रिमोट मोडले वापरून वापरून. टीवीचा एक रिमोट कुत्र्याने चावून टाकला. तसाच वापरते.
वरील सगळ्यान्ना
वरील सगळ्यान्ना अनुमोदन!
हल्ली हल्ली लिम्बीच्या देखिल हे लक्षात येऊ लागलय, खास करुन "पुतळे टेक्न्नॉलॉजी", जेव्हा बघाव तेव्हा पात्रान्चे पुतळे वेगवेगळ्ञा अॅन्गलने बघावे लागतात, कण्टाळा येईस्तोवर, जोडीला ढाण ढाण म्युझिक, याकरता खास करुन "उतरन" ही हिन्दी मालिका बघा, बाकी मालिका तर विचारायलाच नकोत.
तर लिम्बीला आपण फसवले जातोय हे लक्षात आल्यावर असे पुतळे आले की ती मधेच जम्प मारुन म्युझिकच्या च्यानेलवर जाते, मस्त जुनी हिन्दी गाणी लागलेली अस्तात!
पण या सगळ्यात मला बातम्या अन इन्ग्रजी शिनेमे बघायलाच मिळत नाहीत.
साताठ इन्ची टीव्ही घ्यावा काय दुसरा?
दिनेशदा, १००००० मोदक.
दिनेशदा, १००००० मोदक. सगळ्यांच्या दु:खाला वाचा फोडलीत. मी त्या दूरदर्शनचं शक्यतो दूरूनसुद्धा दर्शन घेत नाही. कधीतरी झी टीव्हीवर शुक्रवारी व शनीवारी रात्री १०.०० वाजता लागणारा 'सा रे ग म लिटिल चॅम्प' कार्यक्रम पहाते. तो छान आहे.
<<<<सुरभी, ऐसा भी होता है, देख भई देख, ये जो है जिंदगी , स्वामी, मालगुडी डेज, व्योमकेश बक्षी, द्विधाता अशा मालिका दिसतच नाहीत.>>>>अगदी खरं. काय सुंदर मालिका होत्या त्या. आताच्या मालिका पहाणे, म्हणजे आपल्या डोळ्यांवर आणि मनावर अत्याचार करणे आहे.
खर आहे टि.व्ही मुळे फायदा
खर आहे टि.व्ही मुळे फायदा काहीच नाही.
आम्ही कधिचाच टि.व्ही ला राम राम केला आहे. कोपर्यात एकटाच पडलेला असतो कोणी पहात नाही त्याच्याकडे
राजे, या तुमच्या उपक्रमाबद्दल
राजे, या तुमच्या उपक्रमाबद्दल अभिनंदन!!
दिनेशदा अगदी सत्य लिहिलंत!
दिनेशदा अगदी सत्य लिहिलंत! कुठली ही मालिका पहिले १० एपिसोड पाहिली आणि मग वर्ष भर चुकवली तरी खूप काही मिस केलंय असं वाटत नाही.
राजेश्वर तुमचा उपाय आमच्या घरात अवलंबू तो सुदिन कधी येइल अशी पुसटशीही आशा वाटत नाहिये सध्या तरी.
दूरदर्शनच्या आठवणींनी
दूरदर्शनच्या आठवणींनी नॉस्टेल्जिक होणार्यांसाठी :
http://ddnational.blogspot.com/
आईचे पण हेच कारण असते. अरे
आईचे पण हेच कारण असते. अरे जरा करमणुक.. असे म्हणते.
२० वर्षांनी कथानक पुढे नेणे, दुसर्या मालिकेतील कलाकार पाहुणे म्हणून आणणे, कलाकार बदलणे, महा एपिसोड... या ट्रिक्स सुद्धा जून्याच वाटतात.
फूड चॅनेलवर सगळे म्हणताहेत तसे तेच तेच दाखवले जाते. इतकी वर्षे प्रोग्रॅम्स बघून, साधा हिंग कसा तयार करतात याची माहिती, कुणा गृहीणीला असेल याची शक्यता कमी आहे. आपल्याकडच्या एकेक मसाल्यावर अभ्यासपूर्ण कार्यक्रम होऊ शकेल. पण त्याला स्पॉन्सर कोण करणार ?
मी आता ग्ली मलिका बघत आहे
मी आता ग्ली मलिका बघत आहे मस्त गाणी चालू आहेत. क्वालिटी मालिका जसे ग्ली, कॅसल, हाउ आय मेट युअर मदर, फ्रेंड्स, सिंप्सन्स, मॉडर्न फॅमिली, ह्या फार उत्तम बजेट मधे बनविल्या जातात. तसेच उत्तम गायक, कलाकार वापरले जातात. साधे फ्रेंड्सचे अर्ध्या तासाचे स्क्रिप्ट लिहिण्यातही फार मेहनत व उत्तम प्रतीचे काम असते. टाटा स्काय शोकेस मध्ये आपल्याला हवे ते सिनेमे कमी पैशात घरबसल्या व तीन दा बघता येतात. पॉप कॉर्नचा तो काय खर्च. टीवी बघाच असे नाही पण खूप मजा पण येते कधी कधी. लाइफ झिंगालाला.:)
मला माहेराहून सक्त ताकिद आहे
मला माहेराहून सक्त ताकिद आहे की, साडेसात ते आठच्या दरम्यान अजिबात म्हणजे अजिबात फोन करायचा नाही... मझे आईबाबा कुठली तरी कौटूंबिक (?) मालिका बघत असतात त्या दरम्यान. मी याबद्दल विचार करते तेव्हा मला वाटतं की हे दोघे इतके अॅडीक्ट कसे बुवा झाले? याआधी असा कोणताच कार्यक्रम नव्हता जो ते इतक्या ईंटरेस्टने पहात असत. असं फेव्हीकॉलसारखं काय आहे त्या मालिकेत कोण जाणे.
रच्याकने, आज सर्फ करताना सिआयडीचा एपिसोड दिसला.त्यातला संवादः
दुतर्फा जंगल असलेल्या रस्त्यावर सिआयडीची टीम उभी आहे.
असिस्टंटः सर, मुझे ये समझ मे नही आ रहा है की खुनी ने मनोज को जंगल मे ले जा कर क्यू मारा... वो तो उसे सडक पे भी तो मार सकता था.
शिवाजी साटम(आजन्म सिआयडी) : (खुप म्हणजे खुपच विचार केल्याचा अविर्भाव करत) वो इसलिये क्यो की उसे सडक पे कोई देख लेता.
असे बिनडोक प्रश्न विचारणारे असिस्टंट आणि त्या गहन प्रश्नांची मोठ्या विचारवंताचा आव आणून उत्तरे देणारे सुपिरीयर खर्याखुर्या सिआयडीत नसावेत, अशी मनाची समजूत काढत मी चॅनल बदललं.
दु:खाला वाचा
दु:खाला वाचा
भारतभेटीच्यावेळी हा एक महत्वाचा मुद्दा नातेवाईकांना भेटायला जाताना ध्यानात घ्यावा(च) लागतो. तरीही त्यांनी दिलेल्या वेळीच जातो तरीही काहीनाकाहीतरी चालूच असतं टीव्हीवर... कुंकू... फुंकू... काय वाट्टेल ते.
कित्येकदा एकाचवेळी दोन्-तीन मालिका वेगवेगळ्या चॅनेलवरच्या बघतात हे लोक. इथे जाहिराती सुरू झाल्या की तिथे, तिथे सुरू झाल्या की पुढे... एकाच प्रकारचे सेट, तसलेच भपकेबाज कपडे, भंपक संवाद, तेच तेच कल्लाकार...
मागे एकदा कुणाच्या तरी घरी गेले होते. चहाच्या पहिल्या घोटाला दोन कलाकार भाऊ-बहीण आणि मी चहाचा शेवटचा घोट घेईपर्यंत प्रियकर्-प्रेयसी. मला फेफरं यायचं बाकी होतं... मग कळलं की, त्या घरातल्या आज्जी सिरियल सर्फिंग करतायत
मनोरंजनाचा(???) दुसरा उपाय काय असेल आपल्या देशातल्या वयोवृद्धांना? तीच गत आता काँन्क्रिटच्या जंगलात आणि क्लासेसच्या जंजाळातल्या आपल्या पुढल्या पीढीची आहे.
दिनेशदा गैरसमज नसावा. मी
दिनेशदा
गैरसमज नसावा. मी सुद्धा टीव्ही बघत नाही. पण आपल्या देशात सर्वसामान्यांना टीव्ही वरचे कार्यक्रम ही चांगली करमणूक आहे. पण कुठल्याही चॅनेलवर हेच कार्यक्रम असतील तर त्यांनी काय करावं ? आहे त्यात वेळ घालवला जातो. नाईलाज आहे असं मला म्हणायचं होतं. क्रिकेटच्या दिवसात जास्त टीव्ही बघितला जातो असं ऐकलं होतं .
Pages