वात आणती या मालिका ! (स्वगत )

Submitted by दिनेश. on 21 July, 2011 - 08:05

तशी माझी मीच रिक्षा फ़िरवतच असतो म्हणा. मी गेली अनेक वर्षे टिव्हीवरच्या मालिकाच काय, टिव्हीच बघणं सोडून दिलय. त्यामूळे वाचनाला, मित्रांच्या संपर्कात रहायला, इतर छंदांना भरपूर वेळ मिळतो.

श्रीयुत गंगाधर टिपरे हि मन लावून बघितलेली शेवटची मालिका. त्या आधी, तू तू मै मै पण बघितली होती. भारत एक खोज ची तर वाट बघत असायचो.
यावेळच्या भारतवारीत, पावसामूळे कधी कधी घरी बसावे लागायचे. आई कुठलीतरी मालिका बघत बसलेली असायची. त्यावेळी जाणवलेले हे काही.

अर्थात मला हे माहित आहे, कि माझ्या या लेखनाने इतर कोण, माझी आईदेखील मालिका बघणे सोडणार नाहि. त्यमूळे हे स्वगतच समजायचे.

१) विषय
मालिकांचे विषय हे एका ठराविक वर्तूळातच फ़िरताना दिसताहेत. कौटुंबिक ताणतणाव याचे नुसते गुर्‍हाळ चाललेले असते. आताशा अभावानेच दिसणारे एकत्रित कुटुंब या मालिकांत असते. आणि ते गुण्यागोविंदाने एकत्र नांदताना क्वचितच दिसते. ताणतणावात काही खास कारणे दिसली नाहीत, तरी कुठल्यातरी सूनेला घराबाहेर नक्की काढलेले असते आणि प्रॉपर्टीच्या पेपर्सवर कुणाकडून सह्या नक्कीच हव्या असतात. नुसत्या पेपर्सवर सह्या करुन, तेसुद्धा घरातल्या घरात असे कायदेशीर दस्ताऐवज तयार करता येतात का ? घटस्फोटाचे कागद पण असेच तयारच असतात, त्यावर नुसती सही करायची असते. तीसुद्धा घरच्या घरी. धन्य रे बाबांनो. तमाम गृहिणींना उत्तम जी.के. मिळतय म्हणायचे.

२) बिझिनेस
प्रत्येकाचा काहितरी बिझिनेस नक्कीच असतो, पण तो कसला ते मात्र शेवटपर्यंत कळत नाही. ऑफ़िसेसमधले वातावरण तर काय वर्णावे ? या दिग्दर्शकांना स्वत:ची ऑफ़िसेस पण नसतात का ? एका टिपिकल दिवसात ख-याखु-या ऑफ़िसात जे काही घडू शकते, त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे, पण या लोकांना ते माहितच नसते.

३) घरातला वावर
पुर्वी आशा काळे कशी स्वत:च्या पदराने नवरोबाचे बूट पुसून द्यायची, तसे आता होत नाही. (त्याच पदराने चहाचा कप पण पुसायची ती !) पण मालिकांतल्या बायकांना घरात काही काम असते, असे कधी जाणवतच नाही. अगदी घरात नोकर चाकर असले तरी, घरातील माणसांना अनेक कामे स्वत:च करावी लागतात. दोघे नवराबायको नोकरी करणारे असले तरी, दोघांनाही घरातली कामे उरकावीच लागतात. पण मालिकातल्या माणसांना मात्र तसे काहिही काम नसते. म्हणून तर कटकारस्थाने करत असतात.
मला आवर्जून नातीगोती नाटकातल्या आईच्या घरातील वावराचा उल्लेख करावासा वाटतो.
त्यात ती आई, घरातील इतक्या वस्तू हाताळते, त्यांची ने आण करते कि ते घर आणि ती आई अगदी खरीखुरी वाटते. पण मालिकेतल्या बायका मात्र कचकड्याच्या बाहुल्याच वाटतात.

४) अभिनय
समजा दोन बायका बोलत असतील, तर एकीच्या तोंडावर, बये तूला भाजून खाऊ की तळून खाऊ असे भाव, तर दुसरीच्या तोंडावर, धरणीमाय पोटात घेईल तर बरं, असे भाव. यापेक्षा वेगळे काही दिसते का कधी ? कायम चढ्या आवाजात बोलणे, (लाऊड) सदैव डोळे रोखून वा वटारून बोलणे म्हणजे यांचा अभिनय. रडायचे म्हणजे गळा काढूनच रडायचे. कधी कधी तर ते रडणे मला बघायलाच काय, ऐकायला सुद्धा असह्य होते. पापण्यांनी रोखून धरलेले पाणी, डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू... असे उत्तम
क्लोज अप्स आठवताहेत मालिकांमधले ?
अभिनयाची उस्फुर्तताच जाणवत नाही. सुप्रिया चा अभिनय म्हणजे उस्फ़ुर्तता, असे समजले तरी चालेल. एरवी असा नैसर्गिक अभिनय करणारे कलाकारही, मालिकांचा अतिरेक झाल्याने यांत्रिक अभिनय करताहेत, असे वाटायला लागलेय.

५) आवाजाची फ़ेक
एकच एक ठराविक पट्टीतला आवाज, म्हणजे सीमा. परवा भरतच्या, निलम प्रभुंच्या बीबीवर मी, त्यांच्या महानंदा या नभोनाट्याची आठवण काढली होती. कधीचे आहे ते नभोनाट्य, काही कल्पना ? ते किमान १९७२/७३ सालातले असणार. आज जवळ जवळ ४० वर्षे झाली (ते परत कधी ऐकलेच नाही) तरी त्यातले संवाद विसरलेलो नाही. ते चार भागात प्रसारित झाले होते. त्यातल्या दुस-या भागातील संवांदाची उत्कटता तर गुंतता ह्रुदय हे, या नाटकात पण जाणवलेली नव्हती.

मराठीत एके काळी उत्तम आवाज कमावलेल्या कलाकार होत्या. आशा पोतदार, फ़ैयाज, भक्ती बर्वे, लालन सारंग, रिमा, सुधा करमरकर, आशालता, सुमन धर्माधिकारी, विजयाबाई..
नुसत्या आवाजावरुन त्या एखादी व्यक्ती उभी करू शकत असत. (आठवा जाणता राजामधली, जिजाबाई)
या थोर कलाकारांचे मार्गदर्शन आजच्या मालिका कलाकारांना लाभायला हवे होते.
बहुतेक मालिका घरातल्या घरातच असतात. आपण एकमेकांशी बोलायला, फ़ोनवर बोलायला, स्वत:शी बोलताना एकाच पट्टीत बोलतो का ?

६) कपडे
कपड्यांच्या बाबतीत पण ठराविक भडक रंगाचेच कपडे दिसतात. सेटच्या रंगसंगतीशी ते जूळतीलच असे काही नसतेच. आणि असा विचारही केलेला नसतो. शिवाय ते कपडे, नुकतेच इस्त्री केलेले, पदर पण व्यवस्थित पिन अप केलेला !
त्या कपड्यात बहुतेक कलाकार अवघडलेलेच वाटतात. मला आठवतय, बॅरिष्टर नाटकाच्या वेळी सुहास जोशींनी, असे सांगितले होते, कि विजयाबाईंनी त्यांना नाटकातल्या साड्या, घरी नेसायला लावल्या होत्या. वापरुन जुन्या झालेल्या साड्याच नाटकात वापरल्या होत्या. असा विचार कुणी करतं या मालिकांसाठी ?

७) प्रकाशयोजना
भगभगीत प्रकाश हाच कायम. सकाळची, संध्याकाळची वेळ, घरात कधी जाणवतच नाही. कायम टळटळीत दुपार. अनेक मराठी नाटकांत, प्रकाशयोजनेचा उत्तम विचार केलेला दिसतो. पण मालिकेत रात्रीच्या अंधारात सुद्धा, प्रत्येक झाडामागे प्रखर पांढरा दिवा लावलेला दिसतो. अपु-या प्रकाशात उत्तम चित्रीकरण करणारे कॅमेरे आता नक्कीच उपलब्ध आहेत.

८) चित्रीकरण
तेच ते ठराविक अँगल्स. त्याबद्दल काहीही विचार नाही. दर दोन मिनिटांनी झूम इन करत तीन वेळा घेतलेला क्लोज अप. वर्षानुवर्षे यात काही म्हणुन बदल झालेला नाही. एखादया दृष्याचा, रचनात्मक नजरेतून विचार केलाय असे जाणवतच नाही.
दूरदर्शनच्या पहिल्या वहिल्या कॅमेरामन्सच्या तूलनेत आज काही फ़ार पुढे आलो आहोत असे वाटतच नाही.

९) मेकप
याचा तरी काही विचार केलेला असेल, अशी अपेक्षाच करता येत नाही. चेहर्‍यावर थापलेले रोंगण, रंगवलेले केस, लावलेला विग सगळे सगळे कळून येते. टिकल्यांच्या जागी गोंदण, एकावर एक चढवलेल्या टिकल्या, दंडावरचे गोंदण, कोरलेले डोळे... यक.

१०) शरीर ठेवण
बहुतेक हिरो हे ठराविक साच्यातून काढलेल्या शरिराचेच नव्हे तर चेहरेपट्टीचे पण. अगदी नगाला नग. एकाला काढावा आणि दुस-याला झाकावा. म्हणून तर मालिकेत बदलत असावेत.
सिनियर कलाकारांनी, कामाचा अतिरेक करुन चेहर्‍याची, शरीराची लावलेली वाट पण बघवत नाही. अशा शरीराने व चेहर्‍याने, ते बरा अभिनय करतील, अशी अपेक्षा तरी कशी बाळगायची ?

आधी मला वाटायचे कि आपण हिंदीचे अनुकरण करतोय. (एक उदाहरण देतो, आपल्याकडे एखाद्याला हाक मारायला म्हणजे सांत्वनाला जाताना, पांढरेशुभ्र कपडे घालायची रित होती का, कधी ?) पण आता कळले कि इंग्रजी मालिकांत पण फारसे काही वेगळे नसते.

चला मन मोकळे करुन टाकले. काहि ओझरती दृष्ये बघून जर मला इतका ताप होत असेल, तर नियमित मालिका बघणार्‍यांच्या सहनशीलतेचा, हेवाच करायला हवा मी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख पूर्ण पटला. मीही मालिका बघत नाहीच. तेच तेच ढँण ढँण म्युझिक आणि एकाच टाईपचे, एकाच स्टाईलचे संवाद वात आणणात. माझी आई जेव्हा रहायला येते तेव्हा जाता-येता कंपलसरी बघायला मिळते ते सुध्दा नकोसं होतं. हिंदी मालिकातर ... नक्कोच रे बाबा!

अगदि बरोबर्....खरच वात आणतात्...घरात कोणाला फोन केला तरि मागे टि.व्ही चा आवाज असतोच्....

(माझी तुमची ओळख नाही, तरी) तुमच्याकडून हा विषय अपेक्षित नव्हता Wink Light 1
पण सगळं अगदी बरोबर! ह्या मालिका लोकं का बघतात तेच कळत नाही Sad
पण "इंग्रजी मालिकांत पण फारसे काही वेगळे नसते." हे तितके बरोबर नाही... शेवटी मालिकांचे देखिल विविध प्रकार (genre) आहेत. daily soaps बकवास असतात.. कुठल्याही भाषेत का असेना. पण sitcoms (situation comedy) सही असतात.
टिपरे, देख भाई देख, हम पांच, तू तू मै मै, ऑफिस ऑफिस, L.O.C., साराभाईvsसाराभाई या काही आपल्याकडील sitcoms.
Everybody Loves Raymond, Seinfeld, Malcolm in the Middle, Scrubs, The Office, Modern Family, Rules of Engagement, The Big Bang Theory, Two and a Half Men, How I Met Your Mother या काही (मला आवडणार्‍या) अमेरिकन sitcoms. यांचे वर्षाला साधारण फक्त २०-२५ भाग असतात. आणि प्रत्येक भाग बघताना त्यामागील मेहनत कळून येते.

एकदा चॅनल फिरवताना चुकून सीआयडीतलं मालिकेतलं एक दृश्य बघितलं. त्यात एक बाई पोलिसांना जबानी देत असते की रात्री दोन वाजता झोपेतून उठून ती पाणी प्यायला स्वयंपाकघरात आली तेव्हा तिने अमुक अमुक ऐकलं.
इथे फ्लॅशबॅक पद्धतीने हे दृश्य दाखवलं आहे तेव्हा तिच्या अंगावर जी साडी असते ते बघून ती रात्री दोन वाजता पाणी प्यायला नव्हे तर दिवसाढवळ्या एखाद्या कार्याला उपस्थित रहायला चालली आहे असे वाटते Proud

मी सिरिअल बघणे कधीच बंद केलेय.

कि माझ्या या लेखनाने इतर कोण, माझी आईदेखील मालिका बघणे सोडणार नाहि>> आपण समदु:खी आहोत दिनेशदा!!! सुट्टीत घरी आलो की हा अत्याचार नेहमीच सहन करावा लागतो.

अगदि मनातल बोललात दिनेशदा! मी सुद्धा पुर्वीच मालिका बघणे सोडून दिलेय. तो वेळ मी ईथे मायबोलिवर सत्कारणी लावते. Happy

दिनेशदा
अगदी अगदी! मी एकही मालिका बघत नाही. त्याऐवजी इतर अनेक कामे आनंदात करता येतात. मालिका बघून आनंदातला जीव दु:खात कशाला टाकायचा?

दिनेशदा

दु:खाला वाचा फोडलीये तुम्ही.

हमलोग या मालिकेने आपल्याकडे सोप ऑपेरा सुरू झालं. पण हम लोग हे कुठल्याही भारतिय घराचं चित्रण होतं. आताच्या हिंदी / मराठी मालिका या प्रग्रहवासीयांच्या वाटाव्यात इतकं परकं वातावरण असतं.

घरातदेखील भरजरी कपडे, भडक मेक अप आणि ज्वेलरी घालून बसणा-या बायकांचं घर अजून पाहण्यात नाही. पुरूषही मागे नसतात. एरव्ही आपण लग्नादि प्रसंगांनाही ओव्हरड्रेसड होईल या भीतीने जे कपडे घालायचं टाळतो ते कपडे हे घरगुती गप्पांसाठी वापरतात.

कटकारस्थांनाशिवाय घरगुती गप्पा असू शकत नाहीत असं मालिका बनवणा-यांचं मत असावं. विशेष म्हणजे हिंदी मालिकांमधले कित्येक प्रसंग इतके सारखे आहेत कि चुकून एखाद्या मालिकेचा एखादा एपिसोड दुस-या मालिकेच्या एपिसोडच्या ऐवजी दाखवला गेला तरी काहीच फरक पडत नाही.

सुरभी, ऐसा भी होता है, देख भई देख, ये जो है जिंदगी , स्वामी, मालगुडी डेज, व्योमकेश बक्षी, द्विधाता अशा मालिका दिसतच नाहीत.

दिनेशदा, हे 'स्वगत' आहे म्हणून वाचलात; मोठ्याने बोलाल तर महागात पडूं शकतं हे !! घरोघरी ह्यालाच तल्लीन होऊन डुलणारे आहेत म्हणून तर हे सगळं असं जोरात चाललंय !!!

एकदा चॅनल फिरवताना चुकून सीआयडीतलं मालिकेतलं एक दृश्य बघितलं. त्यात एक बाई पोलिसांना जबानी देत असते की रात्री दोन वाजता झोपेतून उठून ती पाणी प्यायला स्वयंपाकघरात आली तेव्हा तिने अमुक अमुक ऐकलं.
इथे फ्लॅशबॅक पद्धतीने हे दृश्य दाखवलं आहे तेव्हा तिच्या अंगावर जी साडी असते ते बघून ती रात्री दोन वाजता पाणी प्यायला नव्हे तर दिवसाढवळ्या एखाद्या कार्याला उपस्थित रहायला चालली आहे असे वाटते

>>>> सीआयडी वास्तवतेपासून कैच्याकै भरकटत असते. मध्येच ते सीआयडी इन्स्पेक्टरांनाही गुन्ह्यात गुंतल्याचे दाखवून मालिकेतला गुंता अधिकच वाढवून आपल्या मेंदुला गुंता आणतात. डॉ साळुंखेच्या लॅबमधले रंगिबेरंगी द्रव नक्की कशाला वापरतात हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल.

त्यापेक्षा ती 'क्राईम पेट्रोल' नावाची सत्यघटनांवर आधारित मालिका चांगली आहे. खूप वास्तववादी चित्रण, माहित नसलेले पण गुणी कलाकार, त्या त्या लोकेशनवर जाऊन केलेलं चित्रीकरण आणि आटोपशीर. नाही म्हणता काही काही दृष्य फारच अंगावर येतील अशी दाखवतात.

@शोनु-कुकु,
>>घरात कोणाला फोन केला तरि मागे टि.व्ही चा आवाज असतोच्...>>याहुन कहर म्हणजे भारतभेटीमधे लोक भेटायला, जेवायला बोलावतात. मग भेट जी होते ती हॉलमधे टि. व्ही. समोरच. काहीही झाल तर हे महाभाग या फालतु मलिका सोडत नाहीत. मग ना धड बोलण होत ना धड एखादा चांगला कार्यक्रम.
कोणाला भेटायला बोलावल तर काही बेसिक नियम पाळावेत की. पण या मालिका पार वेडावुन सोडतात. बर आम्हाला इंटरेस्ट नाही हे कळत नाही का, दुसरे दिवशी पुनःप्रक्षेपण होतच. ते पहा. पण विचार कुणी करत नाही Sad
परत आम्ही भेटच नको म्हणालो तर काय शिष्टपणा, NRI, इ. इ. गुर्‍हाळ असतच. Happy

हाहाहा.. आशा काळे..पदर..बूट्..कप.. Rofl
गेल्या २०,२५ वर्षात सिरिअल्स पाहण्यापासून मी वाचलेय.. हुश्श्श्य!!!!!!!!
कधीमधी भारतात कुणाकडे गेलं ,खास रात्री ८ ते ९ च्या दरम्यान..तेंव्हा फक्त ब्रेक मधेच यजमान संभाषण करण्यास मोकळे असतात.. Happy
दिनेश दा.. मस्त लिवलय

घरोघरी ह्यालाच तल्लीन होऊन डुलणारे आहेत म्हणून तर हे सगळं असं जोरात चाललंय !!!>>> मी बघितले त्या बर्‍याच जणांकडे हे टुकार आहे असे म्हणतात, पण तरीही बघतात :).

या एकाच छापाच्या सिरीज सोडून इतर बर्‍या सिरीज नाहीत का? एक दोन मोठी कुटुंबे, त्यातील कारस्थानी बायका किंवा पुरूष किंवा वेळेवर काही बोलल्या तर पुढचे आख्खे ४-५ एपिसोड लिहायची गरजच पडणार नाही अशा पण कमालीच्या कष्टी चेहर्‍याने नुसत्या पाहात बसणार्‍या बायका, आगापीछा नसलेले कॉस्च्युम्स, कॅमेरा जर्क्स असे काही न घालता एखादी अर्धा तास "वर्थ" असलेला कथाभाग दाखवणारी एकही नाही का?

मामींनी वरती उल्लेख केलाय तशा काही चांगल्या सिरीज असतील तर सांगा. जरा मुलांसमोर बघता येतील अशा ही. सिरीज, चित्रपट बरे असतील तर त्यामधल्या जाहिराती मुलांना बघण्यासारख्या नसतात. काल नाईट अ‍ॅट द म्युझियम चालू असताना इतक्या हॉरिबल जाहिराती दाखवत होते.

विनोदी मधे फू बाई फू बद्दल ऐकले आहे. बघून चेक करायला पाहिजे. बाकी बर्‍याच तथाकथिक विनोदी टोटल सिरीज पांचट् वाटल्या होत्या.

दिनेश, फार विषयांतर झाले असेल तर सॉरी!

काही पात्रे तर झोपेत पण मेकप ठेवुन झोपतात बहुतेक..>> अगदी खरं... झोपेत यांची कपड्यांची इस्त्री ही मोडत नाही आणि मेकप ही जात नाही... कस काय, काय माहीत.. Uhoh

दा,

याला कारण अनेक आहेत.

पुर्वी चॅनल्स नव्हते त्यामुळे रंगभुमिवरचे कलाकार यात काम करत. त्याचे अभिनय कौशल्य अप्रतिम होते.

आता अनेक चॅनल्स, स्पर्धा, नविन कलाकार, अनेक सिरियल्स, आठवड्यातले सगळे वार एकच मालिका यात अभिनय, नेपथ्य, कला, दिग्दर्शन सगळ हरवलय.

शिल्ल्क आहे फक्त प्रॉडक्शन बस.

सर्वात जास्त कहर म्हणजे बालिका बधु सारख्या मालिका.... तिथे पुर्ण वेळ बायका ५-६ किलोचे दागिने, त्याच्या दुप्पट वजनाचे घागरे घालून दिवसरात्र घरात वावरताना दाखवतात.

मलाही मालिकांचा भयंकर म्हणजे फारच जास्त संताप येतो. आणि लोक त्या कशा काय बघू शकतात हेच समजत नाही. मी स्वतः गेल्या ६ वर्षात एकही मराठी/हिंदी सासू-सून टाईप मालिका किंवा डेली सोप बघितलेल्या नाहीत. फक्त डान्स शोज, लहान मुलांचे गाण्याचे कार्यक्रम बघते, जेव्हा मूड असेल तेव्हा.
मला तर त्या मालिकांच्या बॅकग्राउंड म्युझिक पासून प्रत्येक गोष्टीनेच डोके उठते, त्यातल्या रडक्या बायका बघून तर त्यांना बदडून काढावेसे वाटते. असह्य वैताग आहे या बिनडोक मालिका.
माझ्या घरी आई आली तरी मी तिला एकही मालिका बघू देत नाही, साबा मात्र ऐकत नाहीत, पण त्यांनाही मुलींसमोर बघायला नकोच म्हणते, मुली झोपल्यावरच. पण तेवढ्यानेही माझे डोके लिटरली दुखायला लागते.

दिनेश दा.. खरेच आहे ................पण यासाठी काही उपाय असेल न की केबलच काढुन टाकावे ....म्हणजे नकोच तो वात Happy

बालपणी जेव्हा दुरदर्शन नव्हते तेव्हा माझ्या आजीचा प्राईम टाईम मधिल आवडता विरंगुळा म्हणजे किर्तन... भगंवताचे थेट दर्शन. /\

चला मन मोकळे करुन टाकले. काहि ओझरती दृष्ये बघून जर मला इतका ताप होत असेल, तर नियमित मालिका बघणार्‍यांच्या सहनशीलतेचा, हेवाच करायला हवा मी. >>> अगदी अगदी दा... एखाद दिवशी जर प्राईम टाईम मधे मालिका बघायची राहुन गेली... तर तीच मालिका आठवणीने दुसर्‍या दिवशी दुपारी बघून कोटा पुर्ण केला जातो.

तेच तत्व लहान मुलांनीही अंगिकारले आहे याचे वाईट वाटते... शाळेतून घरी आले की थेट CN, Pogo, Hungama Sad

पुर्वी मी भारतात असताना आमच्या घरात एक नियम होता. मी घरात असताना या मालिका लावल्या जात नसत. पण आता आई जूमानत नाही मला !
घरी मावशी वगैरे आली कि त्या दोघींच्या दिवसभर गप्पा चालू असतात. किती बोलू आणि किती नको असे होते, पण मालिका सुरु झाली, कि दोघी गप्प !!

माझ्या आजोळी भरपूर काम असते. सगळ्या माम्या पहाटे ४ ते रात्री ११ पर्यंत राबत असतात. पण खास मालिका चालू असेल तर लँडलाईनवरच्या फोनची बेलही ऐकू जात नाही त्यांना.

भारत एक खोज, सारखी सर्वच दृष्टीने (कथा, अभिनय, संगीत) सुंदर मालिका आता सीडी संचात उपलब्ध आहे. मूलांना दाखवायला उत्तम.

Pages