स्वगत एका मध्यमवर्गीय गार्गीचे

Submitted by विनीता देशपांडे on 21 July, 2011 - 06:45

मी गार्गी, माझ्या संसाराची चौकट चार चौघंसारखीच, नवरा विजय, मुलगा अक्षय आणि मुलगी अनया.या संसारातच माझ विश्व..समाधान आणि आनंद...........पण एक क्षण असा माझ्या आयुष्यात येईल अस कधीच वाटलं नव्हतं.....
" माझी आजची संध्याकाळ रोज सारखीच होती. तसं संध्याकाळी घरी एकटं रहायचा खुप कंटाळा आला होता. पण करणार तरी काय ? जो तो आपआपल्या विश्वात रमलेला. मुलं ..कॉलेज, क्लास आणि मग मित्र-मैत्रीणीं -ते रात्रीच परत यायचे, आल्यावर ते आणि त्यांच कंप्युटर, नाही तर मोबाइलवर गप्पा.यामधुन ते वेळ काढुन माझी विचारपुस करत मग आमच्या थोड्याशा गप्पा. गप्पा म्हणजे आजचा मेनु आणि नवीन फरमाइश..आणि आमचे अहो अर्थात श्री.विजयराव...त्यांचा आनंद तर मुलांना गणित शिकवण्यात.... वर्गातल्या मुलांच्या आठवडी परिक्षाचे पेपर काढणे..नंतर ते तपासणे.. यातच आठवडा कसा जायचा कळायचा नाही. आधी संसाराला हातभार ,मुलांच्या शिक्षणासाठी म्हणुन नोकरी सांभाळत यांनी क्लासेस सुरु केले. नंतर ती सवयच होउन गेली."
आज कित्येक वर्षांनी मी स्वत;बद्दलच विचार करत होते..माझ मलाच आश्चर्य वाटलं. कित्येक वर्षांपासुन माझी संध्याकाळ एकटीच होती. खरतर हे एकटेपण मला हळुहळु आवडायला लागलं होत.काही वर्ष टि.व्ही. ने सोबत केली नंतर भटकंती ने. भटकंतीचा पण कंटाळा आला होता. कंटाळा नाही..म्हंणता येणार पण येता जाता ते ओळखीच्यांच भेटण...तेच प्रश्न तेच उत्तर याचा विलक्षण कंटाळा आला होता. एकाकीपणाच्या वलयात मी अनाहुतपणे गुंतली आणि मला ही गुंतायला आवडलं. खरतर खुप मैत्रीणी...गप्पा...मी यात कधी गुंतलेच नव्हते.कॉलेज मधली मैत्री.. कॉलेज संपल आणि मैत्रीही, माझी मैत्री होती पुस्तकांशी.त्या वाचनात मी इतके दंग होत असे की मीही त्यातलीच एक पात्र होउन जात असे आणि आई-बाबा नेहमीच या व्यासंगाला माझे व्यसन म्हणत.हे व्यसन मी लग्नानंतरही जपले होते. स्मृतींची पाने चाळता चाळता इंदिरा संत यांची "मध्यमवर्गी गार्गी" कविता उगीच आठवुन गेली.
एक दगड कष्टाचा
एक दगड काळाचा
एक दगड त्यागाचा
वात्सल्याचा थर घाटासाठी वापरायचा
अशी सुरेख चूल घरोघरी असलेली
घर सांभाळणारी ...घर जोपासणारी
तिचेच नाव गृहस्वामिनी. गृहलक्ष्मी
घरधनीण.अशी गृहघराने वेढलेली.जखडलेली
घरभर घुमणारी भोवर्यासारखी
दंग आणि अतृप्त.............................
आणि मग कुकर,मग पोळ्या,मग फोडण्या
थोरापोरांच्या मनधरण्या.नोकरांच्या काचण्या
कितीतरी धागे घट्ट जखडून ठेवणारे
सगळाच शिणवटा.शिजवणारी तीच
आणि शिजणारीही तीच.
आज माझी नेमकी हीच अवस्था होती.इतक्या वर्षांचा शिणवटा.....कसा अन कुठे काढु ?या विचारात मी गॅस बंद करुन गच्चीवर आले तोच तिथे बसलेली चिमणी उडुन गेली.आणि आवडीच जुनं पुस्तक हाती लागाव तसे जुन्या आठवणी पानं पलटत आल्या.......कधी मला कविता खुप आवडायच्या...कितीतरी कविता मी टिपुन ठेवल्या होत्या....त्यावर आई -बाबांशी ,मैत्रीणींशी चर्चा कधी कधी वाद सुध्दा.... आवडीच्या कविता गुणगुणत अभ्यास..कामं सर्व त्याच ठेक्यावर....मग हे सारं केव्हा हरवुन गेलं माझ मलाच कळलं नाही.
" आई ए आई . ..काय झालं बर नाही वाटत का? अक्षय
अरे! एवढ्या लवकर आलास? मी
" अग ! सर गावाला गेलेत..कोणी नात्यातलं गेलं, म्हणुन मग काय सुट्टी...
निलु,अमेय म्हणे की सिनेमाला जाउ पण तिकिट नाही मिळाले"म्हणुन सरळ घरी आलो...जाम कंटाळा आला बघ....मस्त शिरा कर, मी टि.व्ही.बघणार खुप दिवस झाले......."अक्षय.
आठवणी झटकुन मी कामाला लागले...दिवस आला आणि गेला.

"चल अनया .. आटप लवकर.. अक्षय उशीर होइल रे..
"चल गार्गी..निघालो..मी आज बहुधा यायला उशीर होइल,वाट नको पाहु.."विजयराव
म्हणे वाट नको पाहु..अस कस शक्य आहे मी दुसंर करणार तरी काय..मीच पुटपुटले
"बा..य बाय आई..." अक्षय.अनया. बाय
" चला परत मी आणि माझ एकटेपण ".
झाडांना पाणी टाकतांना गच्चीत कालचीच चिमणी दिसली.
मात्र आज ती उडाली नाही, जणु ओळख असावी त्या ऐटीत बसली होती.
आठवणींच मळभ परत दाटुन आलं.चिमणी अजुनही तिथेच बसली होती.
आणि अनेक विचारांचे तरंग मनाच्या तळ्यात उठले. विचित्र मनस्थितीत मी गुंतत गेले,विचारांचा हा गुंता सोडवायचा होता.यात दंग असतांना माझे मन कधी पक्षी होउन गेलं कळलेच नाही.

काही केल्या, काही केल्या
निळा पक्षी जात नाही
प्रकाशाचे पंख सान
निळी चोच, निळी मान
निळे डोळे, निळे गान
निळी चाल, निळा ढंग
त्याने चढे आकाशाला
निळा रंग.
विचारांना झटकण्याचा प्रयत्न विन्दांसारखा मी पण करुन पाहिला पण तो निष्फळ ठरला .हा पक्षी जणु माझ्या अंतर्मनातील द्वंद्वाचे प्रतीकच.,जो विचार बुद्दी झट्कुन टाकण्यच प्रयत्न करते.. मन त्याचा तेवढाच विचार करायला लावते. माझे आयुष्य इतरांसारखेच.. माहेर चार चौघींसारख..शिक्षण दोघीतिघीं सारख..संसाराची हौस माझी...नवरा माझ्या आवडीचा..मुलांची गरज माझी...तडजोड माझ्या स्वखुशीची...
घर माझ्या आवडीच...घरातली प्रत्येक वस्तु माझ्या आवडीची...हौस मौज माझी....तरी पण या सर्वात एक धागा सापडत न्हवता. यासर्वात मी असले ..तरी...कुठेतरी "मी "पण..हरवले होते .....
या विचारात आजचा दिवस कसा निघुन गेला कळलच नाही....
रात्री माझा अलिप्तपणा सर्वांनाच जाणवला.
" काय गार्गी तब्येत ठीक आहे ना ? " विजयराव
"ए आई,तु एवढी शांत का आहेस ?"अनया
"हं काय झाल ग आई" अक्षय
या प्रश्नांनी मी तात्पुरती भानावर आले..पण विचारांचा दंगा काही संपत न्हवता.
“ प्लीज़ आई तु अशी उदास नको ना राहु अख्ख घर उदास वाटत ग ". अनया
"अरे , असच काही झाल नाही मला " मी भानावर येत म्हणाले.
हा पण दिवस आला आणि गेला.
पुन्हा तोच निळा पक्षी आला.आता मी एकटेपणाची आणि त्या चिमणीची वाट पाहु लागले.
आज या विचारांची गर्तता गहन होती.
"असली ही जात न्यारी,
बसे माझ्या निंबावरी;
पृथ्वीमध्ये पाळे खोल;
तरी सुध्दा जाई तोल....अनंताचा खड्डा खोल"
विचारांच्या खोल गर्ततेत हा अनुभव प्रत्येकाच मन घेत असेलं, विन्दांना या ओळीतून नेमक काय सुचवाच होतं? मनावरचा ताबा आधी ढळतो, की विचारांवरचा?
इतके वर्ष मी काय केलं ? घर आणि घरपण जपण्यातच गुंग होते. तोच माझा छंद...तोच माझा नाद. पण मला आयुष्यात एवढच साधायच होत ? याच इच्छा याच आकांक्षा होत्या. घरातल, घरच्यांच समाधान मी साधल होतं पण माझ ..? माझ समाधान यातच होतं तर एवढ सगळ साधुन मला कशाची हुरहुर लागली आहे ? एवढे प्रश्न स्वत:ला विचारुन माझा मन आणि विचार या दोघांवरचा सयंम सुटला होता.
" मी सर्वसामान्य..माझ आयुष्य सर्वसामान्य...सार काही सुरळीत चालु असतांना मन अस्थिर का? हा धागा काही केल्या सापडत न्हवता. मी या वर जेवढा विचार करायची तेवढी अस्वस्थता वाढत होती."
तर्काच्या या गोफणीने, फेकितसे काही जड ;
आणि पाने आघाताने करतात तडफड;
टिकाळीला निळा पक्षी, जसा धड तसा धड
... ...उंच जागा अवघड.
विन्दांप्रमाणेच माझी विचार शक्ती आज मनाच्या अधीन झाली होती. कसली ही तगमग, अतृप्ततेची बोच का म्हणुन मला छळत होती काहीच कळत नव्हते. खरच ही जागा उंच आणि अवघड होती. अंतर्मनाचा आवाज बुध्दीपर्यंत पोहचवण्याचा माझा मीच प्रयत्न करायलाच हवा.गोफणीने वार करायलाच हवा.मी या द्विधा मनस्थितीतुन बाहेर पडायलाच हवे.
याचे गान याचे गान,अमृताची जणू सुई
पांघरुण घेतो जाड,तरी टोचे,झोप नाही
जागविते मेलेल्याला ,जागृतांना करे घाई
याचे गान याचे गान,स्वरालाच नुरे भान
नाही तार नाही मंद्र ,चोची मधे धरी चंद्र
काही केल्या निळा पक्षी जात नाही
या मनस्थितीत, या परिस्थितीत मला गोफणी ने नेम साधता येइल का ? पण प्रयत्न तर करायलाच हवा. गच्चीवर निळा पक्षी परत आला, म्हणाला "खुप झाले घर माझे घर.. जरा घराबाहेर डोकावुन बघ..माझ्यासोबत उडुन बघ..या अवजड विचारांना झटकुन टाक...बघ जरा जगाची वाटचाल कुठल्या दिशेला आहे.बघ तुझ्या सारख्या कित्येक गार्गी याच विळख्यात अडकल्या आहेत...त्यांना हा निळा रंग देउन बघ..

आजचा हा क्षण आला आणि खुप काही देउन गेला. आजचा दिवस ही निळा रात्र ही निळीच होती.मला कितीतरी नवीन कविता शोधुन टिपुन घ्यायच्या होत्या...नवीन पुस्तकं वाचायची होती...शेजारच्या मंगलाकाकुंसोबत अनाथआश्रमात जायचे होते...शारदावहिनींच्या महिला मंडळाची सदस्य व्हायच होतं.. अनयाच्या रुखवंताची सुरवात करायची होती........एखाद नव नाटक यांच्या सोबत बघायच होतं....
काही केल्या काही केल्या
निळा पक्षी जात नाही.
प्रकाशाचे पंख सान
निळी चोच, निळी मान
निळे डोळे, निळे गान
निळी चाल, निळा ढंग
त्याने चढे आकाशाला
निळा रंग.

गुलमोहर: 

ही ज्याची कुणाची कथा असेल त्यांना सांगा. आयुष्य अजुन आनंदी, समाधानी बनवता येऊ शकेल. कस ते मी नाही सांगु शकणार. पण हे शक्य आहे.

छान

खुप छान............ Happy
कित्येक गार्गी अश्या एकटया असतात दिवसभर. प्रत्येकीला असा निळा रंग मिळायला हवा Happy

केवळ अप्रतिम... सुंदर साकरलय द्वंद्व.
<<विचारांना झटकण्याचा प्रयत्न विन्दांसारखा मी पण करुन पाहिला पण तो निष्फळ ठरला .हा पक्षी जणु माझ्या अंतर्मनातील द्वंद्वाचे प्रतीकच.,जो विचार बुद्दी झट्कुन टाकण्यच प्रयत्न करते.. मन त्याचा तेवढाच विचार करायला लावते. माझे आयुष्य इतरांसारखेच.. माहेर चार चौघींसारख..शिक्षण दोघीतिघीं सारख..संसाराची हौस माझी...नवरा माझ्या आवडीचा..मुलांची गरज माझी...तडजोड माझ्या स्वखुशीची...
घर माझ्या आवडीच...घरातली प्रत्येक वस्तु माझ्या आवडीची...हौस मौज माझी....तरी पण या सर्वात एक धागा सापडत न्हवता. यासर्वात मी असले ..तरी...कुठेतरी "मी "पण..हरवले होते ....>>
विंन्दांच्या कवितांचा वापर सुरेखच... त्याहुनही ओघ.

वेगवेगळ्या भुमिकांमधून वावरणारे आपण, कधीतरी आत आत आपण नक्की कोण आहोत? जे कोणी आहोत ते आणी तसे सुखी अहोत का? वगैरे प्रश्नं पडले की सुरू होतो हा "माझं मी पण" शोधण्याचा जीवघेणा खेळ.
गार्गीला सापडलेला निळा रंग अन तो सापडण्याची ही कथा...
विनिता, खरच खूप खूप आवडलं. मायबोलीवर नवीन आहात का? तुमचं मनापासून स्वागत आहे... लिहा, लिहीत रहा. सुंदर लिहिता आहात.

विनिता..खूपच सुरेख मांडलयस गार्गीच्या मनातलं द्वंद्व. पोचलं खोलपर्यन्त!!
बहुतेक मध्यमवयीन स्त्रियांची गार्गीच झालेली असते ,अचानक 'मीपण' हरवल्याची जाणीव होते .पण प्रत्येक गार्गी ने तिचा निळा रंग शोधून ,तो जपून ठेवालायच हवा Happy

सु. रे. ख. विंदांच्या ओळी काय वापरल्यात तुम्ही! प्रचंड ताकदवान लिखाण. लघुकथा एकदम प्रकर्षाने प्रकट झाली.

> झाडांना पाणी टाकतांना गच्चीत कालचीच चिमणी दिसली.
> मात्र आज ती उडाली नाही, जणु ओळख असावी त्या ऐटीत बसली होती.

हे का कोण जाणे पण फार भावलं दृश्य.

ऊत्तम लिखाण........अश्या अनेक ''गार्गी'' आहेत......निळा रन्ग जवळ असतोच्,,,,,त्या तो जपत नाहीत एवढच!,,,,,,,,,,हे वाचुन तरी त्याना हरवलेले ''मी पण'' सापडेल आणि आता त्या ते जपतील अशी आशा वाटते! Happy

पु.ले.शु........फ्रेण्डली Happy

केवळ अप्रतिम... सुंदर साकरलय द्वंद्व
मनाची अशी अवस्ता प्रतेकाच्या जिवनात कधिनाकधि येतेच. अचानक 'मीपण' हरवल्याची जाणीव होते त्यातुन मार्ग कसा निघेल आयुष्य अजुन आनंदी, समाधानी कसे बनवता येऊ शकेलहे महत्वाचे

प्रामाणिकपपणे व्यक्त केलेल्या या स्वगतामध्ये ताकत आहे.अन हे लिहायला स्वतःच्या विचाराशी प्रामाणिक रहावे लागते.
अनेक गार्गींची व्यथा छान मांडली आहे. ही शक्ति जोपासा अन आणखी लिहा,त्यातच कदाचित आनंद पावाल

इतके वर्ष मी काय केलं ? घर आणि घरपण जपण्यातच गुंग होते. तोच माझा छंद...तोच माझा नाद. पण मला आयुष्यात एवढच साधायच होत ? याच इच्छा याच आकांक्षा होत्या. घरातल, घरच्यांच समाधान मी साधल होतं पण माझ ..? माझ समाधान यातच होतं तर एवढ सगळ साधुन मला कशाची हुरहुर लागली आहे ? एवढे प्रश्न स्वत:ला विचारुन माझा मन आणि विचार या दोघांवरचा सयंम सुटला होता.

>>> मस्त! नेमके वर्णन केले आहे... मनातील उदास पोकळीचे/एकटेपणाचे.

असे प्रश्न, प्राणिकपणे मनालाच विचारल्यास तिथुनच प्रामाणिक उत्तरं येतात्....शक्य असल्यास तसे जगुन घ्यावे.. Happy

फार छान लिहिले आहे........खूप आवडले.
"मी कोण" हा प्रश्न प्रत्येकालाच पडत असणार - इथे तो सुंदररित्या मांडलात.

SuperB....................!
Every one wants to be like this................Me Too.

पु.ले.शु.