काय अर्थ आहे हया उपचाराचा? गोळया, औषधं ह्यानी ह्यांचीच चव रेंगाळते नुसती तोंडात! वरुन इंजेक्शन चा त्रास, पथ्य पथ्य म्हणून कही मनासारखं खायलाही बन्दी. कुठे बाहेर येणं जाणं ही बंद.
मग हे सगळं कशासाठी?
जगण्यासाठी? ह्याला काय जगणं म्हणायचं?
बायको भाग्यवानच म्हणायची लवकरच सुटली ह्या सगळ्या जाचातून.
त्यांना आज खुप जुने जुने मित्र आठवत होते अगदी लहान पणीचे शाळा कॉलेज मधले. त्यांच्या पैकी कित्त्येक खुप आधीच गेले होते अगदी साठ पासस्ठ वर्षा पूर्वीच.
आपण अजुन पर्यन्त आहोत.
त्यांच्या पेक्षा किती तरी जास्त जगलो.
जास्त जगलो म्हणजे नक्की काय केलं?
फक्त जास्त काळ!
वेगळं काही नाही?
नक्की काय केलं?
कधी पर्यंत हे असच चालणार? आज संपणार की उद्या? अजून दहा वर्षं ही असंच सुरु राहू शकतं, बापरे! त्यांच्या मनात विचारांच चक्र सुरूच होतं.असं व्हायचं अधून मधून.
आशा निराशेचा खेळ ही म्हणता नाही येणार त्याला कारण आता आयुष्य उतरणीला लागलं होतं. जे काही व्हायचं ते घडून गेलं होतं.
घडून? की काहीही फारसं उल्लेखनीय न घडताच सगळं काही पार पडलं होतं.
फारशी मोठी स्वप्नं बघितलीच नव्हती कधी, चादर पाहून हात पाय पसरावे ह्या वडीलधा-या लोकांचा उपदेश त्यांच्या मनात कुठेतरी खोलवर उतरला होता.
विकट वाटेनी जायचा विचार कधी केला नाही आणि वहिवाट ही तशी सोपी कुठे होती.
पण जमलं सगळं हळूहळू.
आयुष्य क्रमानुसार व्यवस्थित पार पडलं. शिक्षण, नोकरी ,लग्नं.
थोडं फार स्थिरस्थावर झाल्यावर वेगळा संसार मांडला.
कुणाचं त्यांच्या शिवाय आणि त्यांचं कुणा शिवाय अडलं नाही.
स्वतंत्रते सोबत एकटे पणाही आला, त्यावेळी त्याच फारसं काही वाटलं नाही.
आता मुलं स्वतंत्र झाली होती. त्यांना उतारवयात कुणी एकटं सोडलं नसलं तरी ही मुलांच्या आयुष्यात त्यांचा सहभाग कमीच झाला होता.
मुलं करतात सर्वकाही व्यवस्थित, पण त्यात प्रेम आणि आपुलकी किती? आणि कर्तव्य आणी उपचाराचा भाग किती?
आपण ही आपल्या आई, बाबांचं केलं ते कोणत्या भावनेनी केलं?
खरं म्हणजे आजवर ह्या गोष्टीचा विचार करायला वेळच मिळाला नाही?
इतक्या कोणत्या धुंदीत होतो आपण?
मुलांना किती प्रेम लावलं आपण? नेहमी एका बापा सारखंच वागलो, त्यांच्या विश्वात कधी डोकावलो कधी? त्यांची स्वप्न आकांक्षा ह्याचा कधी विचार कधी केला?
त्यांच सोडून द्या बायको बद्दल तरी काय विचार केला?
लग्न होउन आली बिचारी सगळी कर्तव्य पार पाडून गेली, पण खरंच काही तरी सुख, मायेचा ओलावा देऊ शकलो काय तिला? किंवा मुलांना पण?
आपण फक्त आपलाच विचार केला, त्यांचा विचार फक्त आपली बायको, पोरं म्हणुनच केला. त्यांच्या दॄष्टीकोनातुन कधी बघितलंच नाही.
आता हा विचार येतोय पण आधी हे सगळं का ऊमजलं नाही?
की ह्या बद्दल कधी विचारच केला नाही.
कशात कधी गुंतलो नाही, आपल्यात ही कोणी गुंतले नाही.
घरातही! जगातही!
खुप काही करावंस वाटलं.
पण ते तेव्हढ्या पुरतच.
वाटण्या पलिकडे कधी गेलोच नाही.
आता आपण असलो काय नसलो काय? कुणाचं काय अडणार आहे? त्यांच्या मनात विचार आला.
जग असच सुरु राहील.
जगाचं तर सोडून द्या इथे आपल्याच शहरात हजारो लाखो लोकं राहतात, त्यांच्या खिजगणतीत तरी होतो का आपण कधीतरी?
म्हणजे आपण त्यांना नसल्या सारखेच, मग काय फरक पडणार आहे त्यांना?
पुढे मागे मित्र, आप्तांना कळल्या वर काही वेळ वाटेल त्यांना काहितरी, बस तेवढंच.
आपल्याला तरी किती वाटतं?
शेजारी पाजारी येतील, जे आपण तशा वेळी करतो तेच तेही करतील.
एकदोन दिवस उपचारा पुरत्या दुखवट्या शिवाय अजून काय जास्त वेगळं होणार आहे?
कोण आहे आपल्या साठी दुखी होणारं?
जुन्या मित्रां पैकी एकदोघां शिवाय कोण कुठे आहे जिवंत आहे की मेले आहे हे सुद्धा त्याना माहीत नव्हते. म्हणजे विसरलोच की त्याना आपण! तसे तेही आपल्याला विसरले असतील.
आपण मेलो तर अजून काय होणार?
लवकरच विसरून जाणार आपल्याला सर्वजण.
आपण लोकांना आणि लोक आपल्याला आताही विसरले आहेतच की म्हणजे दूस-या अर्थानी मेलेलोच आहो की.
म्हणजे फक्त तिरडीच उठायची आहे तर!
स्मशानात नेण्याची क्रिया कर्माची औपचारिकताच बाकी आहे म्हणायची.
औपचारिकता! उपचारच बाकी आहे म्हणायचा!
पण नक्की कशाचा?
मरणाचा की जगण्याचा?
विचार करता करता त्यांचा डोळा लागला.
सकाळी त्यांना जाग आली.
अजून तिरडी उठली नाही हा विचारही त्यांच्या मनात आला नाही.
नवीन दिवस उजाडला होता.
दिनक्रम मात्र नित्यनेमा प्रमाणेच सुरु होता.
अगदी रोजच्या सारखाच.
सवयीने त्यांनी स्वतःच औषध ही घेतले.
उपचार सुरूच होता.
(समाप्त)
उपचार
Submitted by जयनीत on 13 July, 2011 - 06:40
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सर्व काही १०० टक्के खरे आहे
सर्व काही १०० टक्के खरे आहे जे त्यांना वाटते ते.
मी पण जवळपास त्याच अवस्थेत पोचलो आहे. आता विचार करायचा की हे सगळे जर दु:खमय वाटते, तर आनंददायी असे काय हवे आहे?
अजूनहि वासना शिल्लक आहेत? काही खायचे राहिले आहे, बघायचे राहिले आहे? शरीर तर साथ देणारच नाही.
उरले काय? मन? त्यामुळेच हे दु:खी विचार येतात ना? मग मनाला शांति वाटेल, समाधान वाटेल असे काय आहे, त्याचा विचार केला तर?
आजकालच्या जगात मनाला आनंददायी असे काही सापडत नाही? साहित्य, कला, तंत्रज्ञान यापैकी कशाचाहि विचार केला तर? काही आठवणी? आता तर दिवास्वप्ने बघत बसला तर काय फरक पडणार आहे? कुणाला त्रास होणार आहे? काही काम थोडीच करायचे आहे? अगदी आडवे पडून सुद्धा करता येतात हे विचार. परत दुसर्या कुणाची मदत नाही लागत यात.
न का येईनात तुमच्याकडे? आले तर येतील, करायचे ते करतील. काही केले तरी त्याने काही तुम्ही पुनः पूर्वीसारखे तरुण, सशक्त, बुद्धिमान होणार आहात का? त्यांनी काही केले, नाही केले तरी शेवटी मरायचेच आहे. मग तर सुख दु:ख दोन्ही नाहीसे होणारच आहे. हे समजायला काय देव धर्मावर विश्वास असायची गरज नाही. इतक्या वर्षात तेव्हढी अक्कल तरी आली असावी! मग वाईट वाटते तर दु:ख कशाला करता?
देवावर विश्वास, श्रद्धा या नुसत्या गप्पा. ज्यांची खरच श्रद्धा असते, विश्वास असतो त्यांना हे प्रश्न पडत नाहीत. जो कुणि प्रयत्न करतो की कदाचित् देवाचे नाव घेत राहिले तर श्रद्धा उत्पन्न होईल, त्यालाहि हे प्रश्न पडत नाहीत.
जर मनात हे दु:खी विचार येतात, तर त्याच मनात चांगले विचार येऊ शकणार नाहीत? तसा प्रयत्न केला आहे का?