आणि दरवाजा तोंडावर बंद झाला.. नवी दिल्लीचा किस्सा.

Submitted by शशिकांत ओक on 6 July, 2011 - 13:29

गोष्ट हवाईदलातील ...

असे अनेक प्रसंग येतात कि तेंव्हा काय करावे सुचत नाही. धीर धरून त्यातून मार्ग काढला तर अनपेक्षित परिणाम होतो. माझ्याबाबत असे अनेकदा घडले.

पैकी एक किस्सा...

वेस्टर्न एयर कमांडचे एक विहंगम दृष्य...

हवाईदलाच्या पोलिसांची व्हॅन. पुढे मी, वेस्टर्न एयर कमांड कँपसचा सिक्युरिटी ऑफिसर म्हणून. मागे दोन रिव्हॉल्वर धारी बळकट एयर वॉरियर साथिदार. नवी दिल्लीतील रिंग रोड वरून डिफेंन्स कोलोनीच्या एका कोठीपाशी आम्ही थांबलो. कडक गणवेष, वर पीक कॅप, हातात व्हीआयपीची ब्रीफकेस मागे दोन हत्यारबंद सहकारी, असा मी ऐटीत घराची घंटी वाजवून दरवाजा उघडायची वाट पहात उभा.

किलकिला दरवाजाकरुन आतल्या व्यक्तीने अंदाज घेतला. 'कोई एयरफोर्सवाले लगते है', वर्दी आतवर गेल्याचे ऐकायला आले.

'हकाल दो..---.चोदों को' सणसणीत गालीत उर्मटपणा कूटून कूटून भरला होता.

तरीही दरवाजा उघडला. तो बंद करायच्याआत 'आपसे कोई नही मिलना नही चाहता' बोल सुनावले गेले. दरवाज्याने माझ्या नाकाचा वेध घेत आपले तोंड धाडकन बंद केल्याने मागे उभा सार्जंट, 'सीआयडी' सिरियल मधील 'दया टाईप' आवाजात म्हणाला, 'सर, लात मारकरे तोडता हूँ . साले की ऐसी की तैसी.'

मी काही न बोलता पुन्हा बेल खणकावली. चांगली दोनदा.

आता दरवाजा झपकन उघडला. 'क्या है' म्हणत. वेशावरून त्या घरमालकीण होत्या हे मी ताडले. आताच मौका होता. अभी नही तो कभी नही. असे निर्वाणीचे म्हणत मी म्हणालो, 'मॅडम, मैं आपसे मिलने आया हूं. सर से नही.
'क्यो हमारे पीछे आप पडे है?' म्हणत त्या बाईंनी रागाचा स्वर धरला. गोऱ्यापान, सुंदर, सलवार खमीज, केसांचा बॉब. कानाच्या पाळ्यांवरून लटकणारी काश्मीरी कर्णभूषणे.

'कुछ डॉक्युमेंट्स आपसे चाहिए थी. आपण आमच्या अनेक पत्रांना उत्तर देत नाही आमच्याकडून पत्ता तर चुकीचा नाही याची खात्री करायला आलोय. ठंडा पानी मिलेगा क्या?'

त्या आत गेल्या. थंडपाणी आले. तो वर पिंजारलेल्या केसांचा ,गॉल्फच्या हाफपँटमधील झुपकेदार मिशांचा विंग कमांडर प्रवेशला.

चेहऱ्यावर तुच्छतेचा भाव ओसंडत होता. मी पटकन उभा.

'सर, गुड आफ्टरनून, करत. मी हस्तांदोलनाला पुढाकार घेतला. ओके, ओके म्हणत नाईलाजाने पोकळ हाताने तो स्वीकारला. तोवर पाणी आल्याने मला बसायची खुण केली.

ग्लास खाली ठेवायच्या पर्यंत मी दिवाणखाना न्याहाळला. उदासवाणे वातावरण, मळके सोफे, जुनाट फर्निचर, जळमटे लटकतायत.

'देख स्क्वाड्रन लीडर ओक, माझ्या छातीवरील नेमप्लेट वाचत तो म्हणाला, 'आय हेट एयर फोर्स. प्लीज गो अवे.' दरवाज्याने आपटून जे सांगितले तेच सौम्य शब्दात मला पुन्हा सुनावले गेले.

'सर, मला आपल्याला प्रत्यक्ष भेटायला यायचे कारण असे की आपण आयडेंटिटी कार्ड, फ्लाईंग क्लोदिग व कार्ड वगैरे जमा केलेले नाही. मला वरिष्ठांकडून तगादा होतोय की ते मिळवा. नाहीतर माझ्यावर एक्शन घेतली जाईल.
शिवाय मला उत्सुकता आहे की आपण कोण? हवाईदलावर इतके का खार खाऊन का आहात?

'तू अभि बच्चा है. मेरी बॉससे नही बनी. मला कोणाचे उगीच ऐकायची सवय नाही. चुकीचे असेल तर कधीच नाही' म्हणून काही वर्षांपुर्वी एक दिवशी मी वेस्टर्न एयर कमांडच्या चीफशी भांडून परत त्याठिकाणी न जाण्याच्या निश्चयाने पेपर टाकले व डिस्चार्ज मिळवून घरी बसतोय.'

'आय केअर टू हूट्स फॉर एयर फोर्स' तणतणत ते म्हणाले.

'वेल सर, यु मे बी राईट, पण माझी काय चुक त्यामुळे मला वरिष्ठांचा दट्या बसतोय? मी आपल्याला विनंती करायला आलोय की आपण आपल्याकडील आयडेंटिटी कार्ड तरी मला द्या. कारण ती डिसिप्लिन केस होतेय म्हणून मी सिक्युरिटी ऑफिसरम्हणून आपल्याला प्रत्यक्ष भेटायला आलोय'

'यू कॅन अंडरस्ट्रॅंड माय पोझिशन सर'.

त्यांनी मान हलवली. ते आत गेले. कार्ड घेऊनच परतले. माझ्यापाशी पोहोचेल अशा बेताने दुरून टाकत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

'थँक्स' म्हणत मी उठलो. म्हणालो, 'सर हे काम तर झाले पण एक विचारु का?'

आपला राग हवाईदलावर नाही. त्यात असलेल्या व्यक्तींवर आहे. पण आपण आपल्याला ती शिक्षा का करून घेता आहात?

'मैं समझा नही?' ते म्हणाले, 'सर, माझा प्रोफेशन अकाऊंट्सचा आहे. मी आपले नाव दर महिन्याच्या आऊटस्टँडींग केसेसच्या रिव्हूमधे पहातो. आपला पी एफ तसाच पडलाय तो आपण क्लेम का करत नाही?

ते काही बोलले नाहीत.

सर, ते पैसे तुमचे, स्वतः कमावलेले आहेत. त्याचा एयर फोर्सशी काही एक संबंध नाही. ती रक्कम आपण का नाकारता आहात?'

'आय से', म्हणत त्यांच्या मिसेस पतीला संबोधून माझ्याशी बोलू लागल्या.
'एके, विल नेव्हर रिअलाईज धिस. मी आज सेंट्रल स्कूल मधे शिकवते म्हणून आम्ही कसेबसे घर चालवतोय.प्रॉव्हिडंट फंडाचे पैसै, पेन्शन काहीच घ्यायला हा तयार नाही.'
आता मिसेस बोलत होत्या व मी ऐकत होतो.
'काय करायचे सांगा. नवऱ्याकडे पहात म्हणाल्या, 'ठीक, तू बरोबर आहेस, पण आता आपली परिस्थिती पहा. मुलांच्या कडे पहा... कितीदा सांगून पाहिले तर ऐकायला तयार नाहीस.... आता तरी समजून घे....

'स्क्वाड्रन लीडर ओक, यु मे गो नाऊ.' असे म्हणून त्या विंग कमांडरने माझ्यासमोर पत्नीने केलेल्या कागाळ्यांमुळे परेशान होत आपला पत्नीवरील राग आवरत मला सुनावले.

मी ही प्रसंगाची नजाकत ओळखून म्हटले, 'सर इफ यू डोंट माइंड, मी एक कागद आणला आहे. त्यावर आपण सही केलीत तर मी आपल्या प्रॉव्हीडंडं फंडाचे पैसै मिळवून देऊ शकतो. माझेच मित्र सेंट्रल एकौंट्सला आहेत. मी त्यांच्याशी संपर्क करीन. रेव्हेन्यू स्टँप सकट तयार ब्लँक क्लेमवर त्याने घुश्सात सही केली व तो आत निघुन गेला....

नंतर काही दिवसांनी ...

माझ्या ऑफिसचे दार खटखटले म्हणून मी वर पहिले. तो एक अनोळखी व्यक्तीमत्व उभे.
' हाय, आय एम एके , यू हॅव कम टू माय हाऊस, म्हणत त्याने हस्तांदोलनाला हात पुढे केला. हाच तो विंग कमांडर? केस पिंजारलेला ... दाढी वाझलेला... माझा विश्वास बसेना...
'प्लीज हॅव अ सीट' म्हणताच तो बसला. पुन्हा हातात हात घट्ट धरत म्हणाला, 'स्कावाड्रन लीडर शशिकांत ओक तू जर त्या दिवशी आला नसतास तर मी आज कदाचित तुला दिसलो नसतो.'
'थँक्स, माझे पैसे मला मिळाले. आता पेन्शनचे पेपर ही तयार झाले. तुझ्यामुळे मी खाल्लेली कसम मात्र मला तोडावी लागली.
'मी या वेस्टर्न एयर कमांडच्या इमारतीत कधीही पाऊल ठेवणार नाही' म्हणून शपथ घेतली होती. पण मी फक्त तुला प्रत्यक्ष भेटायला आलोय. तू वेळीच भेटून मला लक्षात आणून दिलेस की ऑर्गनायझेशन वाईट नसते त्यातील काही व्यक्तींमुळे रागावून आमच्यासारखे आपल्या पायावर धो़डा पा़डून घेत असतात. आज तुझ्यासारखे लोक मान-अपमानाची पर्वा न करता हवाईदलात काम करतात. त्या दलाचा एक प्रतिनिधी म्हणून मला सहानुभूतीने भेटलास. थँक्स.'

त्याच्या हाताची मुठ माझ्यावरील निर्व्याज भावना व्यक्त कराये काम करत होती. ..
मी ही गहिवरलो. एक दरवाजा तोंडावर बंद होतानाच्या वेदनांना काबूत करत...

गुलमोहर: 

a href="shashioak.weebly.com" title="At A Glance - Shashikant Oak

>> "पान हरवलेलं दिसतंय" असं येतंय.

ओकसाहेब , ग्रेट ...
चुकुन सुटले होते बरे झाले वर आले.
सरकारी यंत्रणा अवाढव्य , फेसलेस असतात त्यात अनेक संवेदनाशील माणसे चिरडली जातात. मध्यन्तरी पोलीसातील अ‍ॅडिशनल डी जी र्‍रँकच्या ऑफिसरने विभागातील त्रासाला कंटाळून आत्महत्या केली . कोणी श्रद्धांजली देखील वाहिली नाही ऑफिसात. त्याचे तुमच्यासारखे कोणी मानसिक कौन्सेलिंग केले असते तर त्याचा जीव वाचला असता आणि विभागाचा २५-३० वर्षे तयार झालेला अनुभवसमृद्ध अधिकारी राहिला असता.....

रॉबिनहूड व अन्य मित्रांनो,
सेनादल हे अत्यंत संवेदनशील लोकांच्याशी बांधलेले नाते असते. गाठ जीवाशी असते.
अती गतीशील विमानातून थरारक हवाई कसरती करताना पाहून आपले मन आनंदते. त्या विमानातील कॉकपीट मधे बसलेला मात्र ज्या टेक्निशियन्समुळे ते विमान एयर वर्दी ठेवले जाते त्याला आभार देत असतो.
युद्धात धाडसाचे काम करायला एक प्रकारचे वेड यावे लागते. पण त्यामुळे शांतता काळात काहींची डोकी बिथरतात.
त्यांचा सांधा जुळवायला लागतो.
ऑपरेशन ब्लू स्टार नंतर 3 हजार सरदार विविध बरॅक्स मधून 'सुवर्ण मंदिराला धोका' असे म्हणत धावले होते. पण नंतर खरी परिस्थिती कळल्यावर ते परतले. त्यांना 'भगोडे' न मानता पुन्हा परत सामावले गेले. वगैरे आपल्या वाचनात आले असेल...

छानच...अजून अनुभवपुरस्सर,आपल्या प्रोफेशनमधील लिखाण वाचायला आगत्याने आवडेल. Happy
ध.

Pages