पाखंड

Submitted by रामकुमार on 5 July, 2011 - 09:02

मनाच्याच उर्मीत निर्माण सारे
मनाच्याच धुंदीत बेभान वारे

मनाच्याच गुंत्यात बंदिस्त धागे
मनोनीत देशी मनस्वी विधाने

मनाच्याच विश्वात विश्वास जागे
मनाच्याच ठायी निराशा विहारे

मनाचा पसारा उभे विश्व सारे
रवीतेज रत्ने मनाचे धुमारे

मनापासुनी जोडले मित्र जैसे
मनानेच हे निर्मिले शत्रु त्वा रे!

मनें पुण्य केले, मनी पाप आले
तयाचेनि भोगे जिवा कष्ट झाले

कसा ठाम राहू, कसा एक सांगू?
मनाचे चतूरस्त्र येती इशारे

कसे शब्द गुंफू,कसे सूर छेडू?
मनी आर्त संगीत अस्थीर चाले

स्वये मार्ग रोधी, स्वये दूर सारी
मनाच्याच डोही मनाचे फवारे

मनाची कहाणी लिहू काय काजी?
मनालाच ठाऊक पाखंड सारे!

गुलमोहर: 

कसा ठाम राहू, कसा एक सांगू?
मनाचे चतूरस्त्र येती इशारे>>

शेर आवडला.

दुसरा शेर या जमीनीतला नाही आहे (विधानेवाला) आणि जीवा कष्ट येथे 'जि' कराल का

खूप शुभेच्छा व अभिनंदन!

Happy

-'बेफिकीर'!

किती लवकर प्रतिक्रिया दिलीत!
स्पष्टीकरण लिहीतच होतो.

दुसरा शेर मुद्दाम त्या क्रमांकावर आहे की
या गझलेत रे हा काफिया नसून स्वरकाफिया ए आहे हे स्पष्ट व्हावे
(आ ही अलामत)

जी हा टायपो होता तो दुरुस्त केलाय

(अवांतर- ही रचना ऑक्टोबर २००२मधील आहे)

सहसा (स्वरकाफियाचे) स्पष्टीकरण मतल्यातच द्यायचे असे ऐकले आहे. Happy

तसेही , गैरमुरद्दफ गझलेत स्वरकाफिया घेत नाहीत हेही ऐकलेले आहे. Happy

असो, अनेक शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

फक्त अ हा स्वरकाफिया नसावा, स्वरकाफिया (अ सोडून) रदीफ असलेल्या किंवा गैरमुरद्दफ गझलेत चालू शकतो
असे ऐकले आहे.
जमीन जी पहिल्या शेरात ध्वनीत होते त्यापेक्षा वेगळी अभिप्रेत असल्यास ती दुस-या शेरात आणखी स्पष्ट करता येते
पहा: http://www.marathigazal.com/node/44
गालिब चे असे शेर ऐकण्यात आले आहेत

असो त्या ३ शेरांशिवाय गझल गृहित धरा आणि कशी वाटली ते कळवा
नाहीतरी ५शेर पुरे होतात ना?

नाही राग नाही
खरं सांगायचं तर मी तुमचा आदर करतो
काही गोष्टी (स्पष्टवक्तेपणा आणि ...) सोडल्यास मला तुमच्या प्रतिक्रिया खूप वाचाव्या वाटतात

Happy

१. नचिकेत यांनी जो लेख तिथे दिलेला आहे त्या गोष्टी भटांनी स्वतःच 'माझ्याकडून या किरकोळ चुका एक दोन गझलेत झाल्या' असे लिहीले आहे व ते वाचायचे असल्यास निफाडकरांचे गझलदीप वाचू शकता.

२. पहिल्या शेरातील जमीन बदलण्यासाठी दुसर्‍या शेरात मुभा असते हे माहीत आहे, पण आपली ही गझल गैरमुरद्दफ आहे. यात काफियाचीच ध्वनी योजना कानात राहणार, त्यामुळे या गझलेत ती सूट दुसर्‍या शेरात घेण्यापेक्षा मतल्यातच घेतलेली (फक्त तांत्रिक दृष्ट्या) योग्य आहे. समजा तुम्ही 'पहा यारहो' अशी रदीफ घेतली असतीत तरः

मनाच्याच उर्मीत निर्माण सारे पहा यारहो
मनाच्याच धुंदीत बेभान वारे पहा यारहो

मनाच्याच गुंत्यात बंदिस्त धागे किती केवढे
मनोनीत देशी मनस्वी विधाने पहा यारहो

असे शेर झाले असते आणि 'रे' व 'रे' आल्यानंतर पुढच्या शेरातील 'ने' खपून गेला असता. सद्य परिस्थितीत तो खपत नाही आहे असे माझे मत आहे.

३. अकारान्त स्वरकाफिया चालत नाही हेही मला ज्ञात आहे. मी आकारान्तबाबतच बोलत आहे, अकारान्त बाबत नाही. गैरमुरद्दफ गझलेत आकारान्तही स्वरकाफिया घेऊ नये असे डॉ राम पंडीत यांनी अभ्यासानंतर नोंदवलेले मत आहे व ते न स्वीकारण्याचे सकृतदर्शनी कोणतेही कारण नाही.

४. गालिबचे असे शेर नाही आहेत असे माझे म्हणणे आहे. मात्र फिराक यांनी असे शेकडो शेर केले ज्यात स्वरकाफिया गैरमुरदफ गझलेत आहे. मात्र गालिब काय आणि फिराकुब्ण, कुणाचाच मला तरी आत्तापर्यंत (माझ्या वाचनात उर्दू गझलेत असे दोनदाच झाले आहे व तो प्रघात नाही आहे) दुसर्‍या शेरात जमीन प्रस्थापित करणारा काफिया आढळलेला नाही. अर्थात, तसे शेर असतीलही, मला आढळले नाहीत इतकेच म्हणत आहे.

५. मी त्या तीन शेरांशिवाय गृहीत धरूनच फीडबॅक दिला होता.

६. पाच काय, आपले अधिक शेर झाले असावेत. मनाच्याच विश्वात विश्वास जागे , मनाच्याच ठायी निराशा विहारे हाही शेर चांगला आहेच. प्ण एकंदर सफाई व काही शब्दांची स्पष्ट रुपांची वानवा तसेच 'मन' या शब्दाची पुनरुक्ती हे खटकले.

Happy

आपल्याला दुसर्‍या शेरात जमीन बदलवणारे उर्दू शेर मिळाले तर जरूर सांगा मला. Happy

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

अर्थातच, ही सर्व चर्चा केवळ विचार शेअर करण्यासाठी! ते तीन शेर त्या जमीनीतले नाहीत असे कुणी म्हणते म्हणून काढून वगैरे टाकू नयेत अशी विनंती! शेवटि शेर रचताना काय बोंब उडते ते माहीत आहेच. Happy कष्ट तसेच प्रकाशित ठेवावेत.

Happy

-'बेफिकीर'!

रामकुमार, तंत्र वगैरे ठीक आहे,पण मलाही ही गझल वाटली नाही.

कसे शब्द गुंफू,कसे सूर छेडू?
मनी आर्त संगीत अस्थीर चाले... हा शेर मात्र नक्की गझलेतला आहे.

आवडला.