त्याला नेहमी पासूनच खूप खूप मोठं होण्याची इच्छा होती, पहिले त्यानी धंद्यात धडपड करून बघितली, पण जमलं नाही. मग काव्य, साहित्यात खटपट करून बघितली, पण त्याच्या मुक्तछंदाना कोणी काव्य म्हणेना, आणि यमकाला ही दाद मिळेना. स्वतः शिवाय कधी दुसरा विचारच केला नसल्या मुळे कथेचा ही विषय सुचेना.
मग राजकारणात हातपाय चालवून बघितले आंदोलन, धरणे, उपोषण वगैरे भानगडी त्याला कधी पटल्याच नाहीत, त्याला स्वतःलाच प्रस्थापित व्हायचे होते. प्रस्थापितांशी लढण्यात त्याला आपली शक्ती घालवायची नव्हती. क्रांती झालीच तर ती त्याच्या जीवनात व्हायला हवी होती, उगाच लष्कराच्या भाक-या भाजण्याचा त्याच पिंड नव्हता.
त्याने वेगवेगळ्या नेत्यांच्या घरी पाणी भरले, वेगवेगळ्या पक्षात प्रयत्न करून बघितले पण संधी मिळेना.
मग अचानक एकदा तो एका निराश क्षणी तो त्याच्या समजाच्या मेळाव्याला गेला अन तिथे त्याला स्वतःचा शोध लागला. त्याला मोठं होण्याचा नवा मार्ग सापडला अन एकदम सारं बदललं. समाजाचं किती अन काय भलं झालं कुणास ठाऊक? पण त्याच्या जीवनात मात्र क्रांती झाली. इथल्या साठी त्याच्या जवळ जन्मजात योग्यता होतीच. एकट्या ने संघर्ष करणे किती कठीण असते हे त्यानी अनुभवले होते. यशस्वी व्हायचं तर समाजाच पाठबळ हवंच हे त्याला कळून चुकले होते. अन इरेला पेटून त्याने मागच्या सगळ्या अपयशा चा अनुभव इथे पणाला लावला अन इथे त्याची अपेक्षे पेक्षा भरभर प्रगती झाली. तो समाजाचा मोठा नेता बनला. काही वर्षातच सारं बदललं. मग मात्र त्याला माफ करा हं आता त्यांना! कधीही मागे वळून बघावं लागलं नाही. आता सगळं सुरळीत सुरु आहे. आता व्यवसाय ही सूरू झालेत दोन चार कंत्राटं नेहमी खिशात असतात. आजकाल ते निरनिराळ्या पक्षांच्या कार्यक्रमात स्टेज वर असतात. इंडस्ट्रीज असोसिअशन, चेंबर ऑफ कॉमर्स सारख्या संस्थां मध्ये नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करतात. विविध साहित्य आणि काव्य संमेलनात गंभीर विचार मांडतात आणि नवोदित साहत्यीकांना प्रोत्साहन देतात. आता त्यांच्या काही कविता ही प्रकाशित झाल्या आहेत. आत्म चरित्र लिहिण्याचा विचार ही त्यांच्या मनात घोळतोय, पण सध्याच नाही कारण पुढच्या निवडणुकी साठी त्यांना काही पक्षांकडून तिकीटाची ऑफर आहे, पण कोणत्या पक्षाकडून उभं राहायचं ह्याबद्दल अजून निर्णय अजून त्यांनी गुलदस्त्यातच ठेवलाय. आजवर जगानी त्यांना खूप झूलवलं आहे. आता ते झुलववणार आहेत.
(समाप्त)
टीप - वरील लेखन कोणत्या ही एका व्यक्ती किंवा समाजा वर टिप्पणी करण्याच्या उद्देशाने लिहिलेले नाही.
कथा एका यशोगाथेची - लघुकथा - जयनीत दीक्षित
Submitted by जयनीत on 20 June, 2011 - 07:45
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे लेख,पण त्याच्या
छान आहे लेख,पण त्याच्या बद्द्ल थोड सविस्तर लिहायला हवे.