औषधी वड - पिंपळ
भारतीय स्त्रीच्या जीवनात वटवृक्षाला विशेष महत्व आहे चिरंतन सौभाग्य साठी भारतीय स्त्रिया वडाची पूजा करतात.
भरपूर छाया देणारा वृक्ष म्हणून हा वृक्ष ओळखला जातो. या वृक्षाचे मुळ स्थान हिमालय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अरण्यात आहे असे म्हणतात. या वृक्षाचा विस्तर प्रचंड असतो. कोलकात्यातील बोट्यानिकल बागे मधील एक वटवृक्ष अति विशाल आहे. या वृक्षाच्या विविध खोडांची संख्या १५०० वर असून शेंड्याकडील परीघ ३७० मीटर पेक्षा जास्त आहे. गुजरात मध्ये कबीरवड म्हणून मोठे झाड आहे. त्याचा परीघ १७५० फूट असून पारम्ब्यांची संख्या ३००० पेक्षा जास्त आहे. या वृक्षाखाली सुमारे ५००० मानसे बसू शकतील.
पुराणात याला संसार वृक्षाचे प्रतिक मानले आहे. गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून ह्याला ओळखतात. याला फुटणाऱ्या अनेक पाराम्ब्यामुळे हा वृक्ष अनेक वर्षे जगतो. म्हणून याला अक्षयवट असेही म्हणतात. हा वृक्ष भरपूर छाया देणारा असल्यामुळे रस्त्याच्या कडेला किंवा देवळाजवळ लावतात. परंतु ह्याच्या बिया पडक्या भिंतीवर पटकन रुजून छोटी रोपे येतात त्यामुळे भिंत दुभंगते म्हणून हा वृक्ष घराजवळ वाढू देत नाहीत. हा वृक्ष अतिशय औषधी आहे. हवा शुद्ध राखण्याचा मोठा गुण ह्यामध्ये असून पावसाळ्यातील अनेक आजारांवर गुणकारी आहे.
या वृक्षाची पाने तोड्ल्यावर जो चीक निघतो त्याचा औषध मध्ये मलामा सारखा उपयोग होतो. या चिकाच्य आसपास किडे, मुंग्या येत नाहीत म्हणून पूर्वी ऋषी मुनी हा चीक आपल्या जटा॑ना लावत असत. विंचवाचे विष कमी होण्यासाठी किंवा पायाच्या भेगा, चिखल्या ठिक होण्याासाठी पण चीक गुणकारी आहे. कोणत्याही अवयवात लचक भरणे किंवा संधिवातामुळे सांधे दुखणे यावर वडाची पाने तेल लावून थोडी गरम करून दुखर्या भागावर बांधल्यास सांधे मोकळे होतात. ताप कमी होण्यास ह्याचा पारंब्यांचा रस देतात. त्यामुळे लगेच घाम येऊन शरीराचा दाह काम होतो. पोटात जंत झाल्यास पारंब्यांचे कोवळे अंकुर वाटून त्याचा रस देतात. आव, अतिसार यावर पारंब्या तांदुळाच्या धुवनात वाटून त्यात ताक घालून देतात. गळू लवकर पिकण्यासाठीही हि पाने गरम करून गळवावर बा॑धतात.
हा वृक्ष विशाल असल्यामुळे शुद्ध हवा आणि सावली देतोच परंतु आकाशातून धावणाऱ्या ढगा॑मधून पाणी खेचून आण्याची ताकद या वृक्षात असल्यामुळे पाउस पडण्यास मदत होते. उन्ह्याळ्यात या वृक्षामुळे हवेत आद्रता सोडली जाते त्यामुळे याच्या छायेत गारवा मिळतो. हा यज्ञीयवृक्ष असून विवाह प्रसंगी या वृक्षाच्य काड्या होमात अग्नीला अर्पण करतात त्यांना समिधा म्हणतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यास आंबा, वड, पिंपळ असे वृक्ष मदत करीत असल्यामुळे हे वृक्ष लावण्याचे व्रत घेतले पाहिजे.
िंपपळ
हा अलौकिक सामर्थ्याचा पवित्र वृक्ष आहे. वेद काळापासून हा वृक्ष पूजनीय आहे. प्रथम हा वृक्ष प्रजापतीचे प्रतिक मानले जाई. परंतु नंतर विष्णूचे प्रतिक मानले गेले. भगवान विष्णूचा जन्म या झाडाखाली झाला असे पुराणात लिहिले आहे. या वृक्षाला दैवी महत्व आहे. गौतम बुद्धांना याच वृक्षाखाली ज्ञाना प्राप्ती झाली होती म्हणून याला बोधी किंवा ज्ञानी वृक्ष म्हणतात. भगवान श्री कृष्ण या झाडाखाली बसले असताना व्याधाचा बाण लागून निजधामास गेले असा उल्लेख आहे. भग्वदगीतेतील विभूती योगा मध्ये वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे असे भगवंतानी म्हंटले आहे.
हा वृक्ष अतिशय औषधी असून दमेकरी लोकांना हा वृक्ष कामधेनु सारखा आहे. या झाडाचा प्रत्येक भाग औषधी आहे. दिवसा व रात्री दोन्ही वेळा हा वृक्ष हवेत प्राणवायू सोडतो हे याचे खास विशेश आहे. पिंपळ बुद्धीवर्धक, शक्तिवर्धक, रक्तशुद्धीकारक आणि रोगनाशक आहे. पोटाच्या विकारापासून दम्यासारख्या असाध्य विकारांमध्ये हा वृक्ष गुणकारी आहे.
या झाडाच्या सालीचे चूर्ण पाण्यात चांगले उकळवून त्याचा चहा नियमित घेतल्यास शक्तिवर्धक व रक्तदोष दूर करणारा आहे. अंगाला खाज, पुरळ, त्वचा काळी होणे अश्या विकारात हा काढा उपयुक्त आहे. कडुलिंबाच्या तेलात या सालीचे चूर्ण मिसळून केलेले मलम त्वचा रोगात बाह्य उपचारासाठी अतिशय गुणकारी आहे.
संतान प्राप्तीसाठी या झाडाची कोवळी पाने किंवा सुक्या फळांचे चूर्ण घेतात. वसंत ऋतूत येणारी ताजी फळे खाल्यास स्मरणशक्ती वाढते. मानसिक श्रम करणार्या व्यक्ती आणि आणि विद्यार्थ्यांना हि फळे गुणकारी आहेत.
अशक्त माणसाने नियमित पणे पिंपळाला प्रदक्षिणा घातल्यास त्याचे आरोग्य सुधारते कारण त्याला भरपूर शुद्ध हवेचा पुरवठा होतो. लहान मुलांची वाचा सुधारावी किंवा बोलण्यातील तोतरेपणा कमी व्हावा म्हणून या झाडाची पिकलेली फळे खाण्यास देतात. तसेच या झाडाच्या पानाच्या पत्रावळीवर गरम भात, तूप आणि मीठ कालवून मुलांना खायला देतात. या वृक्षाच्या सहवासात राहिल्यास मानसिक बल प्राप्त होते. असा हा महान वृक्ष भारत आणि श्रीलंकेत सापडतो. हा वृक्ष गावात, रानात सर्व ठिकाणी आढळतो आणि खूप वर्ष जगतो. श्रीलंकेतील एक झाड २००० वर्षापूर्वीचे जुने आहे. प्राण्यांमध्ये बुद्धिवान समजल्या जाणार्या हत्तीला या झाडाची पाने खूप आवडतात.
हा वृक्ष आरोग्यदायी आहे त्याच प्रमाणे धार्मिक कार्यात आणि व्रतांमधेही याला महत्व आहे. श्रावणात दर शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ असणार्या मारुतीचे पूजन करतात तसेच शनिवारी या झाडाला पाणी घालून त्याला प्रदक्षिणा घालणे पवित्र मानतात. श्रावण आणि कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी पासुन अमावास्ये पर्येंत या वृक्षाला पणी घातल्यास पितर संतुष्ट होतात अशी समजूत आहे. शनिवारी भगवान विष्णू आणि लक्ष्मी या वृक्षावर वास करतात अशीही समजूत आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी या वृक्षाचे पूजन केल्यास संतती आणि संपत्ती चा लाभ होतो.
पुरणकाळात एक कथा आहे. परमेश्वराने जीवसृष्टी निर्माण केली आणि त्यांचा कारभार नीट चालावा म्हणून प्राण्यांमध्ये निरनिराळे प्रतिनिधी नेमले परंतु झाडांचा कारभार पाहण्यासाठी प्रतीनिधी नेमायचे राहून गेले म्हणून सर्व वृक्ष हेमगिरी पर्वतावर एकत्र जमले. प्रत्रेक झाडाला जोराचा धक्का देऊन त्याची ताकत आजमावण्यात आली. त्यात चिंच, वड आणि पिंपळ हे जास्त ताकतवान ठरले. म्हणून चिंचेला वृक्षांचा राजा , वडाचा विस्तार मोठा म्हणुन त्याला मंत्री आणि पिंपळाला पहारेकरी नेमले आणि त्याला सांगितले की जोराचा वारा सुटल्यावर तुझी पाने खूप सळ्सळ्तील आणि इतर झाडे सावध होतील
पिंपळाच्या ५ प्रकारच्या पानांचे पूजन स्त्रिया करतात.
१. हिरवी पाने- सौंदर्यासाठी. २. कोवळी पाने- संतती प्राप्ती साठी. ३. पिकलेले पाने- पतीच्या दीर्घआयुष्यासाठी.
४. वाळलेली जाळीदार पाने- सुख समृद्धी साठी. ५. फाटलेले पान- धन प्राप्ती साठी.
या वृक्षाच्या अलौकिक महत्वामुळे याचा सरपण म्हणून उपोयोग करणे निषिध्ध मानले आहे तसेच असा वृक्ष कोणीही तोडीत नाही. तोडल्यास ब्रम्हहत्तेचे पातक लागते अशी समजूत आहे. असे वृक्ष आपल्या संस्कृतीचे वैभव आहेत.
लेखिका- अर्चना दातार
ह लेख माझी वाहिनी मासिकात जुन २०१० मधे प्रकाशित झाला आहे.
छान लेख. त्या पिंपळाच्या
छान लेख. त्या पिंपळाच्या पानावरच्या तूपभाताची, मी अलिकडेच आठवण काढली होती.
अर्चनाताई, >> दिवसा व रात्री
अर्चनाताई,
>> दिवसा व रात्री दोन्ही वेळा हा वृक्ष हवेत प्राणवायू सोडतो हे याचे खास विशेश आहे.
याबद्दल जरा सविस्तर सांगाल का? प्राणवायू प्रकाशसंस्लेषणाच्या प्रक्रियेमुळे उत्सर्जित करतात ना झाडं? मग पिंपळ रात्री कसा निर्माण करतो?
तुमच्या लेखांसाठी जे संदर्भ तुम्ही अभ्यासले असतील त्यांचीही यादी लेखांसोबत दिलीत तर ज्यांना या विषयात रस आहे त्यांना उपयोग होईल.
रआकाशातून धावणाऱ्या ढगा॑मधून
रआकाशातून धावणाऱ्या ढगा॑मधून पाणी खेचून आण्याची ताकद या वृक्षात असल्यामुळे पाउस पडण्यास मदत होते. उन्ह्याळ्यात या वृक्षामुळे हवेत आद्रता सोडली जाते त्यामुळे याच्या छायेत गारवा मिळतो. >.
या दोन्हींबद्दल अधिक संदर्भ किंवा माहिती देता येईल का ? सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात जर हवेतली ह्युमिडिटी / आर्द्रता वाढली तर जास्त त्रास होतो असं मानतात, मग आर्द्रतेमुळे या वृक्षाच्या छायेत गारवा मिळतो हे कसे काय ?
मला एकच प्रश्ण विचारायचा आहे,
मला एकच प्रश्ण विचारायचा आहे, तुम्हाला हि माहीती कुठून मिळते?
(प्रश्ण मी माझ्या साठी विचारतेय कारण मला दुसर्यांच्या ह्या विषयाच्या आवडीची चिंता नाही पण तुम्हाला हि माहीती कुठून मिळते ह्याची उत्सुकता आहे(कुत्सिकता म्हणून नाही ) म्हणून.. )
अर्चनाताई,खूप छान माहिती देत
अर्चनाताई,खूप छान माहिती देत आहात.
तुमच्या आधिच्या लेखांची लिंक नविन लेखांबरोबर देत जाल का? म्हणजे पाहिजे तेव्हा शोधायला सोपे जाईल.
स्वातिताई, मेधा आणि मीरा, मी
स्वातिताई, मेधा आणि मीरा,
मी ही सर्व माहीती संस्क्रुतीकोश( विविध भाग), श्री नगरसेकर(निसर्ग उपचार तज्ञ), १०० प्र्श्न्य उत्तरे व काही धार्मिक पुस्तके ह्यातुन संकलीत केली आहे.
काही माहीती श्री. काचंनगंगा गंधे ह्याच्या पुस्तकातून घेतलि आहेत. ह्यात माझे मोठेपण काहीच नाही.
अनु, मी अंबा, कडुनिबा वर लेख लिहीले आहेत ते पहावे. आणि पुढे तुळ्स, बेल, दुवा आणि आवळा ह्याचे संकलन लिहीणार आहे. जरुर वाचा आणि कळ्वा.
स्वाती, खालील संदभ मदद करु
स्वाती, खालील संदभ मदद करु शकतो-
Some plants such as Peepal tree can uptake CO{-2} during the night as well because of their ability to perform a type of photosynthesis called Crassulacean Acid Metabolism (CAM).
रात्रभर सतत प्राणवायु सोडु शकत नाही पण काही प्रमाणात सोडतात.
अर्चनाताई, धन्यवाद. CAMची
अर्चनाताई, धन्यवाद. CAMची माहिती शोधून वाचते आहे. (त्यात दिवसा ही झाडे कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जित करतात असे लिहिले आहे, तसेच अशा प्रकारचे photosynthesis करणार्या झाडांचा पर्णविस्तार फार नसतो असेही, त्यामुळे पिंपळ त्यात असावा याचे आश्चर्य वाटते. परंतु मी आणखी माहिती मिळवेन.)
अर्चनाताई तुमच्च्या कडे पिंपळ
अर्चनाताई तुमच्च्या कडे पिंपळ वृक्षाची आणखीन माहीती (धार्मीक) आहे का आमच्या घराच्या बाजूलाच पिंपळाचे झाड आहे आणि एक व्यक्तीने ते आम्हास कापण्याचा सल्ला दिला आहे कारण घरावर पिंपळाची सावली पडणे चांगले नसते असे ते म्हणाले.
विमिनल्,घरावर पिंपळाची सावली
विमिनल्,घरावर पिंपळाची सावली प॑डू नये ही समजूत सर्वत्र आहे. आता वटपौर्णिमा आलीय तर सर्वत्र वटवृक्षाचे महत्त्व सांगणारे लेख प्रसिद्ध होतील.माझ्या मते वड,पिंपळ,उंबर यांसारखी स्वतःची मुळे जमिनीत खोल पसरवणारी झाडे दाट लोकवस्तीच्या ठिकाणी अजिबात लावू नयेत.त्यांच्या मुळांच्या मार्गामध्ये जे जे काही येते ते सर्व ही मुळे फोडून उद्ध्वस्त करून टाकतात.मग त्या हेरिटेज इमारती असोत की पूल्,रस्ते,गटारे,कमानी,काहीही. शिवाय ही झाडे कुठेही रुजतात.अगदी अठराव्या मजल्यावरच्या संडास-बाथरूमच्या ड्रेन पाइपवरही. आणि मग ती उखणून काढणे दुरापास्त होऊन जाते. ती खणून काढायला मजूरही धार्मिक समजुतीमुळे अजिबात तयार होत नाहीत. पुण्यात सूस रस्ता मुंबई बाह्यवळण रस्त्याला मिळतो तेथे टेकडीवर एक छोटीशी पण सुंदर बाग केली आहे.पण दुर्दैवाने तिथे जमिनीच्या अगदी छोट्या तुकड्यात जवळजवळ पंधरा वडाची झाडे लावली आहेत.उद्या मोठी झाल्यावर ती लगतच्या रस्त्याला आणि मुख्य म्हणजे हायवे वरच्या पुलाला धोका निर्माण करणार हे निश्चित.अशी झाडे उजाड डोंगरउतारावर लावून जगवली तर ठीक.
छान माहीती. माझ्या कुंडीतला
छान माहीती.

माझ्या कुंडीतला वड. वटपौर्णिमेची पुजा करण्यासाठी एक दिवस कुंडीत फांदी रोवली होती ती जगली आहे व आता त्याला छान फळे पण येतात.
अर्चनाजी, छान आणि खुप उपयुक्त
अर्चनाजी,

छान आणि खुप उपयुक्त माहिती !
हिरा आपल्याला धन्यवाद आमचे घर
हिरा आपल्याला धन्यवाद आमचे घर गावात असल्यामुळे आसपास वाडी आहे तो वृक्षही वाडीतच आहे आणि आमच्या अगदी घरा लगद असला तरी त्याची मुळे घराजवळ येणार नाहीत एवढया दुर तो आहे पण त्याच्या फांदया घरावर येत आहेत. माहीती बददल आभार.
जागु तुमचा वड घरामधे
जागु तुमचा वड घरामधे लावन्याचा उपक्रम फारच छान आहे.