कडूनिंब
हिंदूंचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरु होते .चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो. उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढून त्यामुळे नाना प्रकारचे आजार होतात. अश्या आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारशक्ती वाढावी, आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडूनिंबाचे पूजन सांगितले आहे. धार्मिक दृष्टीने गुढीपाडवा हा महत्वपूर्ण दिवस आहे. साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आणि वर्षारंभचा दिवस.
या दिवशी आंघोळीच्या पाण्यात डहाळी टाकून त्या पाण्याने स्नान करण्याची प्रथा आहे. तसेच गुढीला कडूनिंबाची डहाळी लावून त्याची पूजा करतात. कडूनिंबाची पाने आणि मीठ, मिरे, हिंग, ओवा, चिंच, आणि गूळ घालून केलेली चटणी सेवन करतात. ती पाने खाऊनच दिवसाची सुरवात करावी असे शास्त्र आहे.
कडूनिंब कडू असूनही आपल्या सणउत्सावात त्याला मानाचे स्थान आहे कारण त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. अनेक आजारांचे मूळ नष्ट करणे हा महत्वाचा गुणधर्म कडूनिंबात आहे.
हा वृक्ष म्हणजे ब्रम्हदेव आणि जग्गनाथाचे प्रतिक आहे तसेच कालीमाता आणि दुर्गामाता यांनाहि तो प्रिय आहे.
या वृक्षात त्याच्या परिसरातील हवा शुद्ध आणि आरोग्यपूर्ण राखण्याचे सामर्थ्य आहे. दक्षिणेकडील सर्व मंदिरांच्या आवारात हा वृक्ष असतोच. हे झाड तोडणे म्हणजे एकाद्या तरुण मुलीची हत्या करण्या इतके अशुभ मानतात. ग्रामदेवतेच्या पूजेत या वृक्षाच्या दहाल्य्ना विशेष महत्व आहे.
या वृक्षाला वर्षभर पाने असतात म्हणून त्याला सदपर्णी वृक्ष असेही म्हणतात. या झाडाचे पान, फळ, फुल, साल, खोड आणि काडया सर्व काही औषधी आहेत .
अंगात मुरलेली उष्णता किंवा कडकी कमी करणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हा महत्वाच गुणधर्म कडूनिंबात आहे. उन्ह्याल्यामुळे गोवर, कांजिण्या, देवी( पूर्वी) ह्या सारखे रोग उद्भवतात, अश्यावेळी रोग्याला कडूनिंबाच्या पानांच्या अंथरुणावर झोपवून मंत्र म्हणत असत. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.
उष्णतेमुळे अंगावर पित्त उठत असल्यास कडूनिंबाची पाने तूप किंवा आवळकाठी बरोबर खावीत. शरीरावरील जखमा भरून येण्यासाठी हि पाने बारीक वाटून त्याचा लेप जखमेवर घालतात किंवा हा पाला दारूहळद व जेष्ठमध ह्यांच्या चूर्णात तूप व मध घालून केलेले मलम जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून येते. रक्तशुद्धीसाठी हि पाच/ सहा पाने चावून खावून त्यावर भरपूर दूध प्यावे. याच्या काड्यांनी दात घासल्यास दातातील कीड मरते. मधुमेह असणाऱ्यांनी कडूनिंबाच्या पंचांगाचा काढा करून प्यावा. कडूनिंबाच्या फुलांचे चूर्ण सारक म्हणूनहि घेतात.
पूर्वी स्त्रियांना प्रसूती नंतर तीन दिवस जेवणाच्या आधी कडूनिंबाच्या पानांचा रस देत असत. त्यामुळे बाळंतरोग होण्याची भीती नसे आणि मातेला दूध हि जास्त येत असे. व्यालेल्या गायीला हि कडूनिंबाचा पाला खाण्यास देत असत.
या झाडाचे सरपण करून त्यावर शिजवलेले अन्न खाणाऱ्या माणसाला सापाचे विष चढत नाही असे म्हणतात.
या झाडाच्या बियांपासून मार्गोसा नावाचे तेल काढतात. त्याचा उपयोग जंतुनाशक म्हणून होतो. तसेच सांधेदुखीवर या तेलाने मालिश करतात.
या झाडाच्या लाकड्याच्या आतील गाभ्याला खोड असे म्हणतात. हे चंदनासारखे सुवासिक असते. या खोडाचे गंध अंगाला लावल्यास शरीतील कडकी नाहीशी होते.
या झाडाचे लाकूड टिकाऊ असून ते इमारत बांधकामात वापरतात. तसेच शेतीची अवजारे तयार करण्यासाठी वापरतात. या झाडापासून साबण आणि पेस्ट तयार करतात. झाडाच्या फळांपासून तेल काढतात आणि उरलेले पेंड झाडांना कीड लागू नये म्हणून खत मातीत मिसळतात. धान्याला कीड लागू नये म्हणूनही ह्याची पाने धान्यात घालतात. हि पाने जाळल्यास त्या धुराने डास मरतात. घराच्या बांधणीत दारे किंवा खिडकीच्या चौकटीत या लाकडाचा उपयोग करतात कारण त्यामुळे भूतबाधा होत नाही अशी समजूत आहे.
या झाडाच्या पानांच्या अति सेवनामुळे कामवासना कमी होते म्हणून साधू, संन्याशी, योगी आणि ब्रम्हचारी लोक हि पाने खावून राहतात.
अश्या विविध आणि असामान्य गुणधर्मामुळे आपल्या नवीन वर्षाच्या सुरवातीला या वृक्षाचे पूजन आणि सेवन करणे योग्यच आहे.
ज्ञानेश्वर महाराज या वृक्षाची महती सांगताना म्हणतात कडूनिंब इतका उपयुक्त आहे मग त्याच्या कडूपणाला कंटाळून कसे चालेल?
आपणही या दिवशी कडूनिंबाची झाडे लावून ती टिकवण्याचा संकल्प केला पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यच्या कामाला हातभार लावला पाहिके. तसेच उन्ह्याल्याच्या दिवसात मधून मधून हि पाने खावून (चार/पाच) आरोग्य टिकवले पाहिजे.
लेखिका : अर्चना दातार , सहकारनगर , पुणे.
हा लेख माझी वाहिनी ह्या मासिकात मार्च २०१० मध्ये प्रकाशित झाला आहे.
छान.
छान.
छान माहिती, अर्चना. धन्यवाद.
छान माहिती, अर्चना. धन्यवाद.
छान माहिती. कडुलिंबाची फुलं
छान माहिती.
कडुलिंबाची फुलं स्वयंपाकातही वापरतात.
धन्यवाद सावली, चिन्नु आणि
धन्यवाद सावली, चिन्नु आणि जागोमोहन प्यारे.
सावली आपल्या माहिती बद्द्ल धन्यवाद.
छान माहिती
छान माहिती
अर्चनाजी, लेखाची मांडणी
अर्चनाजी,

लेखाची मांडणी अप्रतिम वाटली, माहिती तर भन्नाट्च !
याची पाने पावसाळ्यात्,हिवाळ्यात खाल्ली तरी चालतील ना ? साधारण एका माणसाला, वर्षातील प्रमाण काय सांगता येईल ?
आपणही या दिवशी कडूनिंबाची झाडे लावून ती टिकवण्याचा संकल्प केला पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यच्या कामाला हातभार लावला पाहिके.
अनुमोदन !
इतका उपयोगी वृक्ष आहे, जिथे ही झाडे खुप प्रमाणार आहेत, जिथे जास्त माहिती हवी तिथे ,ग्रामीण भागात लोकांना बरीच माहिती नसते, जुन्यां लोकांकडुन त्याम्ंच्या कडे असणार्या माहितीची देवाणघेवाण खुप कमी होताना दिसते, हे खर तर बदलायला हवं, यामुळे आपलं खुप नुकसान होईल अस मला वाटतं.
अनिल जी, पाने कधीही खाल्लई
अनिल जी, पाने कधीही खाल्लई तरि चालतात.॓रोज २-३ पाने खाल्ली तरी चालतात.
धन्यावाद प्रतिसादा बद्द्ल.