मृत्यो...

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

आदिम गाभारा वितळत जाऊन त्याची नितळ वलये सर्व प्रतलांमध्ये पसरत आहेत...
ते एककेंद्री शून्याकार, जे व्यापू पाहतायत अस्तित्वाच्या सर्व मिती...
ते खोल शून्याकार, जे साकार होतायत अंतिम आकर्षणाच्या धूसर रेषांमधून...
ते शून्याकार, हे मृत्यो, तुझीच चाहूल का ?
समष्टीच्या कणाकणातून होणारा सत्याचा निखळ साक्षात्कार,
त्या कणाकणात स्वतःला वाटून टाकताना
निघणारा उबदार वेदनेचा चित्कार
हे मृत्यो, ते तुझेच वरदान का ?
यज्ञकुंडात शेवटच्या समिधा पडत असतात अन्
'स्वाहा'चा रौद्रघोष घुमत असतो सर्वत्र
तसे काहीसे....
मिलनोत्सवाच्या चौघड्यांचा नाद टिपेला पोहोचला आहे अन्
मग त्या नादावर अंथरून सावकाश
चालत येत आहेत शांततेचे घनगंभीर सोहळे
देहकणात
तसे काही...
श्वास आणि उच्छवास यांतील अंतर पुसट झालंय अन्
प्रत्येक क्षण एक सण झालाय
तसेही काही...
आता दिसतंय
चेतनसीमेपलिकडील ते आश्वासक शून्य.
त्या शून्याने मला वचन दिलं होतं
भेटण्याचं जन्मतःच...
ते भेटेल मला लवकरच.
माझ्या संपूर्णत्वाची नांदी आता गातो.
.
साजिराचा प्रतिसाद वाचला आणि आठवलं, त्याने जणू आपण कधीतरी वाचलेल्या एका कवितेचंच वर्णन केलंय. कविता करण्याच्या काळात एक चांगली सवयसुद्धा लागली होती की आवडलेल्या कविता वहीत उतरवून ठेवायच्या. ही कवितासुद्धा त्या वहीत टिपलेली... मग त्या वहीचा शोध... तो शोध लागला एकदाचा, तर ती आता इथे देतो. कवीचे नाव नोंदवले, परंतु या कवितेचे नाव काय, कुठल्या काव्यसंग्रहातून घेतली आहे, अनुवादित आहे की नाही, अनुवादित असेल तर कोणी अनुवाद केलाय, मी कुठे वाचली होती... हे काहीही न नोंदवण्याचे करंटेपण मात्र पीळाचे, चांगली सवय येऊन गेली, पण ते गेले नाही. कोणाला या कवितेबद्दल अधिक माहिती असेल कृपया द्या. मनापासून आभारी राहीन.
.
मला असे मरायचे नाही...
की सर्वजण मरताहेत
हेच मला पहावे लागेल
तोंडात नळी घातली आहे...
श्वासोच्छवास वेगाने सुरु आहे
नाकातही नळी
हाताची नसही नळीत...
सगळेजण यंत्रांकडे पाहतायेत...
किती मात्रा आहे...
ठेका बराय ना ?.... वगैरे
एखाद्याच्या हातातून चिल्लर पडावी त्याप्रमाणे किंवा...
रागारागात एखादी नोट फाडून टाकावी त्याप्रमाणे
शेवटचा श्वास घ्यायचा नाही.
खरे तर मला असे
उडून जायचे आहे की
उचकी देत दवबिंदूने जावे...
फुलाच्या श्वासाची गरज म्हणून
पाकळीवरचा दवबिंदू विरावा...
सकाळ झाली म्हणूनही
दवबिंदूने अलगद निघून जावे...
एखादी कविता म्हणता म्हणता
वृत्तछंदात काहीतरी
कमी असावे तसे...
स्वप्न लिहीता लिहीता
शाईच संपावे तसे...

    -- गुल़जार

    विषय: 
    प्रकार: 

    प्रत्येक क्षण एक सण झालाय >>>>
    चेतनसीमेपलिकडील ते आश्वासक शून्य.
    त्या शून्याने मला वचन दिलं होतं >>>>
    .
    हे खास आवडल Happy
    .
    जबरदस्त Happy

    मृत्यूचं सौंदर्य अधोरेखित करणार्‍या प्रत्येक लिखाणाचं एक गुढ आकर्षण पहिल्यापासून वाटत आलंय. 'अंतिम आकर्षणाच्या धुसर रेषा', 'शांततेचे घनगंभीर सोहळे', 'प्रत्येक क्षण एक सण', 'चेतनसीमेपलीकडलं आश्वासक शुन्य' अशा तुझ्या शब्दांवर नजर घोटाळत राहिली.
    चार वर्षांपुर्वीचं माझ्या वडिलांचं मरण आठवलं. आम्ही आक्रोश करत होतो, पण ते मात्र चेहेर्‍यावर स्मित ठेऊन मिटल्या डोळ्यांनी एकेका श्वासाला निरोप देत होते. कमालीच्या शांतपणे.
    तुझे शब्द वाचून वाटलं- असं मरावं. अगदी शांतपणे. पण एखादा सण साजरा केल्यागत. संपूर्णत्वाचा सण!

    त्या शून्याने मला वचन दिलं होतं
    भेटण्याचं जन्मतःच...
    ते भेटेल मला लवकरच.
    माझ्या संपूर्णत्वाची नांदी आता गातो.
    >> आवडलं खूप. Happy
    सगळं सगळ्यांना माहित असतं ..पण ते स्वीकारण्याचं धाडस फार कमी लोकांत असतं...
    Happy
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
    पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

    छान ! नेहेमीप्रमाणेच..