मागील भाग -
महिकावतीची बखर - भाग १ : प्रस्तावना ...
महिकावतीची बखर - भाग २ : बखरीतील जुनी नावे ...
महिकावतीची बखर - भाग ३ : प्रताप बिंबाची कोकणावर स्वारी ...
महिकावतीची बखर - भाग ४ : बिंब घराण्याची ठाणे - कोकणची राजवट ...
महिकावतीची बखर - भाग ५ : नागरशा आणि बिंबदेव यादवाचे आगमन
महिकावतीची बखर - भाग ६ : नागरशाचा प्रतिहल्ला ...
महिकावतीची बखर - भाग ७ : कोकणात निका मलिकचे आगमन ...
महिकावतीची बखर - भाग ८ : ठाणे - कोकणचे मुसलमानी राज्य ...
महिकावतीची बखर - भाग ९ : कोकणातील फिरंगाण ...
महिकावतीची बखर - भाग १० : देवगिरीच्या लढाईचे सत्य ...
बखरीमध्ये जो ऐतिहासिक कालखंड दर्शवलेला आहे त्यावर आपण गेल्या १० भागांमध्ये नजर टाकली. वि.का.राजवाडे यांनी बखरीला दिलेल्या प्रस्तावनेमध्ये आद्य महाराष्ट्रीक नेमके कोण होते ह्याबद्दल काही विश्लेषण केलेले आहे. आता ते जरा बघुया.
पुरातन काळी महाराष्ट्राच्या उत्तर कोकण भागात गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग, कोळी (कोल), ठाकर, दुबळे, घेडे, वारली, मांगेले (मांगेळे), तांडेले हे लोक वस्ती करून राहत होते. नागवंशीय लोक समूहाने कोकणात वस्त्या करत होते. आर्यादी भाषा बोलणारे जे लोक उत्तरेकडून आले त्यांचा नागांशी झालेल्या शरीर संबंधातून आजचे जे 'मराठे' ते उदयास आले.
महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर दुबळे आणि घेडे या जाती आहेत. ह्या दोन्ही जाती गुजराती बोलतात आणि शेती करून जगतात. भाषेवरून ते उत्तरेकडून आल्याची सहज अनुमान काढता येते. मुख्य व्यवसाय शेती असल्याने ह्या जाती समुद्राकडे कधी सरकल्या नाहीत आणि वर रानात देखील चढल्या नाहीत. ह्याच समकाळात वारली हा सह्याद्रीच्या जंगलात आपले स्थान राखून होता. वारली हे उत्तम मराठी बोलतात आणि ते सूर्य उपासक आहेत. इतर जातींच्या मनाने वारली हा बराच प्रगत होता असे दिसते. पण तो नेमका कुठून आला हे निश्चित सांगता येत नाही. तो बहुदा उत्तरेकडून म्हणजे सध्याच्या विंध्योत्तर भागातून आला असावा असा कयास राजवाडे यांनी मांडलेला आहे. समुद्रापासून साधारण १५ मैल अंतरावर असलेल्या रानात त्याचे वास्तव्य होते.
समकाळात मांगेले हे मुळचे आंध्रप्रदेशातून आलेले लोक समुद्र किनारी वसले. गोदावरीच्या सुपीक खोऱ्यातून त्यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे वाटचाल केली आणि येताना ते स्वतःचा मासेमारीचा धंदा येथे घेऊन आले. समुद्राशी निगडीत उपजीविका असल्याने त्यांनी समुद्र किनाऱ्यापासून अर्धामैल पर्यंतच्या टापूत वस्ती केली आणि आजही ते तेवढाच टापू बाळगून आहेत. समुद्र सोडून ते कधी डोंगराकडे सरकले नाहीत. आजही उत्तर कोकणातील समुद्र किनाऱ्यावर मांगेले मासेमारीचा धंदा करतात.
वारली जेंव्हा सह्याद्रीच्या डोंगररांगात वस्त्या करून राहू लागला तेंव्हा तेथे खूप आधीपासून कातकरी (कातवडी), ठाकर आणि डोंगरकोळी लोकांच्या वस्त्या होत्या. कातकरी हा सर्वात जुना. कातकरी हा शब्द कृतीपट्टीन ह्या शब्दावरून आला असावा असे अनुमान राजवाडे मांडतात. कृती म्हणजे कातडे आणि पट्ट म्हणजे वस्त्र. हे लोक मुळचे रानटी असून त्यावेळी प्राण्यांचे कातडे पांघरून राहायचे म्हणून त्यांना हे नाव पडले असावे. कातकरी जेंव्हा जंगलात राहत होते तेंव्हा त्याहीपेक्षा निबिड अशा डोंगर कपाऱ्यात गुहाशय राहत होते. कातकरी किमान कात तरी पांघरी मात्र गुहाशयाला ती कला देखील अवगत नव्हती. ह्या दोघांत कातकरी टिकला. गुहाशयामागून रानात नाग, ठाकर, कोळी आणि मग वारली आले.
ठाकर हे वारल्यांच्या आधीपासून सह्याद्रीची राने राखून होते आणि त्यांचे अस्तित्व फक्त उत्तर भागात नाही तर सर्वत्र पसरलेले होते. ठाकर लोकांच्या थोडे खालच्या रानात कोळी लोकांची वस्ती होती. ह्यांच्या मधलेच समुद्र कोळी हे मासेमारी वर जगत आणि समुद्र किनारयाने राहत. कोळी जातीचे मूळ वंशज कोल हे होते.
कातकरी लोकांच्या मूळ अनार्य भाषेचे रूप कसे असेल ह्याबद्दल आता पत्ता लागण्याचा जरा सुद्धा संभाव राहिलेला नाही. मांगेल्यांचे आणि वारली लोकांचे तेच. राजवाडे यांनी ह्याबद्दल बराच खेद व्यक केला आहे. परंतु त्यांनी बरीच मेहनत घेऊन अंदाजे स्थळ-काल दर्शवणारा एक तक्ता तयार केला आहे. तो असा...
अतिप्राचीन लोक - गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग : शकपूर्व २००० च्या पूर्वी (अंदाजे शकपूर्व ५०००)
मध्यप्राचीन लोक- ठाकर, कोळी, वारली : शक पूर्व २००० ते १०००
प्राचीन लोक - दामनीय, महाराष्ट्रिक : शकपूर्व ९०० ते ३००
पाणिनिकालीन लोक - मांगेले, सातवाहन, नल, मौर्य : शकपूर्व ३०० ते शकोत्तर २००
जुने मराठे - चौलुक्य, शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकुट : शकोत्तर ३०० ते ११००
जुने मराठे - बिंब, यादव : शकोत्तर ११०० ते १२७०
मुसलमानी राज्य - मलिक, अमदाबादचे सुलतान : शकोत्तर १२७० ते १४६०
युरोपियन - पोर्तुगीझ :शकोत्तर १४२२ ते १६६०
अर्वाचीन मराठे - भोसले : १६६० ते १७२५
युरोपियन - इंग्रज : शकोत्तर १७२५ ते १८६९
ह्या नोंदी घेताना त्यांनी 'इसवी सन'चा वापर न करता 'शक' वापरला आहे.
अपेक्षा आहे की येथे मांडल्या गेलेल्या अल्प माहितीमुळे आपल्या ज्ञानात काहीतरी भर निश्चित पडली असेल... पुन्हा भेटू एक नवीन ऐतिहासिक विषय घेऊन...
........................................ समाप्त .......................................
म्हणजे मराठी लोक व्यापारात
म्हणजे मराठी लोक व्यापारात नव्हतेच का ? जुन्नर/पैठण आधी भागातून, नाणेघाटमार्गे व्यापार चालला होता, तो कुणाचा ?
नाणेघाटावर सातवाहनांची सत्ता
नाणेघाटावर सातवाहनांची सत्ता होती... तिथून होणाऱ्या व्यापारावर त्यांचा ताबा जवळ-जवळ ५०० वर्षे होता..
छान माहिती. ह्या नाग लोकांचा
छान माहिती. ह्या नाग लोकांचा उत्तरपूर्वेतील नाग लोकांशी काही संबंध होता का?
नागवंशीय लोक समूहाने कोकणात
नागवंशीय लोक समूहाने कोकणात वस्त्या करत होते. आर्यादी भाषा बोलणारे जे लोक उत्तरेकडून आले त्यांचा नागांशी झालेल्या शरीर संबंधातून आजचे जे 'मराठे' ते उदयास आले.
>>> हे नाग वंशीय लोक कोठुन आले होते .
.
मुळातच ह्या आर्यन इन्व्हॅजन थियरीचा परत अभ्यास करायला हवा ....फारच फ्लॉज आहेत तीत .
.
नाणेघाटावर सातवाहनांची सत्ता होती>>> सातवाहन मराठीच होते ना ? आपला शालिवाहन मराठीच होता ना ???
हे नाग वंशीय लोक कोठुन आले
हे नाग वंशीय लोक कोठुन आले होते .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>> उत्तरेतून आले होते ते पण बहुदा. पण मला नक्की माहिती नाही. वरदा आणि ज्योती ताई कदाचित अधिक माहिती देऊ शकतील प्राचीन - अर्वाचीन काळाबद्दल..
सेनापती, छान अभ्यास करून
सेनापती, छान अभ्यास करून माहिती दिली आहेस!
बा द सातोस्करांनी गोव्याच्या इतिहासाचा अभ्यास करताना साहजिकच महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इतिहासपूर्व कालात महाराष्ट्रात निबिड अरण्य होतं. तिथे पहिली वस्ती करणारे प्रोटो-ऑस्ट्रेलाईड वंशाचे लोक होते. मग नाग-कोल-मुंड लोक आले असावेत. याचं कारण म्हणजे कोंकणी भाषेत या कोल मुंडांच्या भाषेचे काही अवशेष अजून आहेत. या कोल शब्दापासून 'कूळ' 'कोळी' वगैरे शब्द आले. त्यांच्या (सातोसकरांच्या) म्हणण्याप्रमाणे ईशान्येकडच्या नाग लोकांशी हे नाग संबंधित होते. छोटा नागपूर पठारावरून हे सगळ्या भारतभर पसरले असावेत अशी एक विचारधारा आहे. त्यांच्या पूजा अर्चनेच्या पद्धतींशी साधर्म्य दाखवणार्या पद्धती जसे की वारूळांची, धरित्रीची पूजा करणे अजूनही आपल्या गावोगावी टिकून आहेत.
मग आर्य आले. अगस्ती आणि परशुरमाच्या कथा हेच सागतात. आर्यांनी त्या मूळ रहिवाशांना आणि त्यांच्या दैवताना आपल्या राहणीत सामावून घेतले. आर्य लढवय्ये होते पण त्यानी मूळ रहिवाशांचा नाश केला नाही. द्रविड लोक हे दक्षिण भारतातच वस्ती करून होते. त्यांची संस्कृती स्वतंत्रपणे वाढली. या सगळ्या संस्कृतींचा थोडाफार तरी संघर्ष झालाच असेल, पण रेड इंडियन्सचं झालं तसं भारतात कोणाचंही झालं नाही. सगळ्या वंशांच्या लोकांचं मिश्रण मुख्यतः महाराष्ट्र् आणि काही प्रमाणात कर्नाटकात बघायला मिळतं. मराठी लोकांची शारीरिक ठेवण आर्य आणि प्रोटो ऑस्ट्रेलॉईड्स या दोन्हींची वैशिष्ट्य दाखवणारी दिसते.
पुढचा क्रम तू दिल्याप्रमाणेच सातोसकरांनी ठरवला आहे. महाराष्ट्रिक म्हणजेच महरट्ट. यांचे पूर्वज रट्ट लोक. या लोकांच्या बोलीवरूनच 'मराठे' आणि 'मराठी' ही लोकांची आणि भाषेची नावे आली असं म्हणतात.
यानंतर सातवाहन, मौर्य यांच्या सत्ता येऊन गेल्या. मग यादव, शिलाहार, चालुक्य इ. या सगळ्यांची राज्यं कोकण आणि गोव्यात असल्याचं सिद्ध करणारे शिलालेख आणि पट्ट कोकण आणि गोव्यात सापडले आहेत.
ही माहिती मी आठवणीने लिहिते आहे. काही राहिलं असेल किंवा चुकलं असेल तर सावकाशीने परत एकदा तपासून लिहीन!
senapati, vipu vachali
senapati, vipu vachali attach
maza comp crash zalay. Tewha online paratale kee uttare dein
लोकहो, राजवाडेंनी जेव्हा हे
लोकहो,
राजवाडेंनी जेव्हा हे सगळं लिहिलं तेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासपूर्व कालाबद्दल आपल्याला काहीही पुरावा माहित नव्हता आणि म्हणून विविध वंशाच्या लोकांचे स्थलांतर, आपापसातल्या लढाया वगैरे तर्क तेव्हा केले जात (राजारामशास्त्री भागवतही वाचा).
या नागवंश वगैरे तर्काला कुठलाही पुरावा नाही. स्वातंत्र्योत्तर काळातील पुरातत्वीय संशोधनामुळे आता महाराष्ट्राचा वसाहतींचा इतिहास जवळजवळ सलगपणे साडेचार-चार हजार वर्षे मागे जातो. (त्यावरच/ पौराणिक मते महाराष्ट्रेतिहासाच्या उगमाविषयीच्या मताचं पुरातत्वीय दृष्ट्या खंडन करण्यासाठीच मी महाराष्ट्राचा आदिम इतिहास हा लेख लिहिला होता). त्याच्याही आधी प्रागैतिहासिक मानवाचे अस्तित्व इथे होतेच.
शिवाय आता जैविक वंश (biological race) ही संकल्पना अॅन्थ्रोपॉलॉजी या विद्याशाखेने जवळपास रद्दबातलच ठरवली आहे म्हणा ना! मग उरला तर्क वेगवेगळ्या जमाती, टोळ्या, मानवसमूह यांचे स्थलांतर वगैरेचा. तर पुरातत्वाला असा कुठलाही पुरावा सापडत नाहीये अजूनतरी. आणि भाषा आणि मानवसमूह हे कायमच एकास एक अशा गुणोत्तरात नसतात. समूह बदलतात, भाषा संक्रमित होत असतात, वेगवेगळ्या समूहांत स्वीकारल्या जातात, इ. इ.
शिवाय आपण ज्यांना आज आदिवासी जमाती म्हणून ओळखतो त्या इतिहासाच्या पूर्वीपासून आदिवासीच आहेत असा आपला एक समज असतो. तेही खरं नाही. आदिवासी आणि अॅबॉरिजिन्स यांच्यात फरक आहे. आजच्या आदिवासी जमाती या कधी काळी स्थायी शेतकर्यांचे समूह होते अशीही शक्यता असू शकते. महाराष्ट्राच्या इतिहासात मानवसमूहांनी एका उपजीविकेकडून दुसर्या उपजीविका पद्धतीत, किंवा भटक्या जीवनाकडून अर्ध भटक्या किंवा स्थायी किंवा उलट अशीही स्थलांतरं केलेली दिसतात.(यावर सुमित गुहांचं environment and enthnicity नावाचं एक खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे ते वाचा)
उदा: कातकरी हे पहिल्यापासून याच नावाने प्राचीन काळापासून ओळखले जायचे असं काही नाहीये. तसा पुरावा कुठे नाहीये. शिवाय राजवाड्यांनी मांडलेली सगळी गृहितकं/ व्युत्पत्ती ग्राह्य धरता येत नाहीत. बर्याचशा ओढूनताणून आहेत. तेव्हा कोण कुठून आलं वगैरे तपासणं पुराव्याशिवाय अशक्य आहे. शिवाय प्राचीन आणि मध्ययुगीने भारतात अशी लोकसमूहांची स्थलांतरं असंख्य वेळा घडली आहेत. आताही घडतात. त्याची तपशीलवार नोंद कशी असेल? तेव्हा ती सगळी शोधून काढून कुणात किती प्रमाणात काय मिसळण झाली हे कळणं कदापिही संभव नाही! त्यामुळे राजवाडे, सातोस्कर, डिकसळकर, इ. अनेक थोर आणि विद्वान संशोधकांची यासंबंधीची विधानंही स्वीकारता येत नाहीत.
सातवाहन काळात (इ.स पूर्व पहिलं शतक ते इ.स. चं तिसरं शतक) आपल्याला पहिला पुरावा मिळतो तो महारठि या स्थानिक कुळाचा. सातवाहन राणी नागणिका ही महारठिंची कन्या होती. सातवाहन इथले का आंध्रातले यावरून लई मारामार्या आहेत. कुठलेही असले तरी पेनिन्सुलर इंडियातले म्हणजे दक्षिणापथातले हे नक्की. (या कुलात शालिवाहन नावाचा कुठलाही राजा नव्हता) त्यांनी महारठिंशी सोयरिक करून राज्य बळकट केले असावे असा संशोधकांचा कयास आहे. पण त्याबरोबरच त्यांनी त्यांचे स्पर्धक गुजरात-उत्तर दख्खन मधील क्षत्रप राजे यांच्याशीही सोयरिक केली होती असा शिलालेखीय पुरावा उपलब्ध आहे.
महाराष्ट्राची इतिहासाची कालरेखा उद्या टाकेन. वरचे कालखंड जसेच्या तसे ग्राह्य धरू नयेत.
जुने मराठे- नवे मराठे असंही काही नाहीये. ती जुनी राजकुळं होती. ज्यांचे वंशज आजच्या मराठा जातीचे भाग आहेत. पण मराठा जातीची उत्पत्तीही इतकी सरळसोट/ लिनीअर नाही. त्यात अनेक कुलसमूह एकत्र येऊन मध्ययुगात एक समाजविभाग म्हणून उदयाला आलेत (रजपूतांसारखेच पण रजपूतांशी यांचा संबंध नाही दिसत)
आर्य समूहाचा आणि या आद्य कुलांचा दूरान्वयानेही परस्पर संबंध नाही. सातवाहन आणि वैदिक आर्यांमधे किमान हजार वर्षांचं अंतर आहे. आर्यन इन्व्हेजन थिअरी ही डेड थिअरी आहे. फक्त पोलेमिक्स करणारी लोकं ह्यावर टिप्पणी करत रहातात. पुरातत्व आणि प्राचीन इतिहासाच्या संशोधकांसाठी ही जुन्या जमान्यातली/ बासनात गुंडाळून ठेवलेली थिअरी आहे. पण तो स्वतंत्र विषय आहे आणि मला विषयांतर करायची इच्छा नाहीये.
राजवाड्यांना जाऊन आता शंभरावर जास्त वर्षं उलटली. त्यानंतर इतिहास आणि पुरातत्वाच्या अभ्यासाने गगनभरार्या घेतल्या आहेत. तेव्हा राजवाडे जे लिहितात ते तसंच्या तसं स्वीकारार्ह नाहीच नाही. त्याने राजवाड्यांचं मोठेपण लेशभरही कमी होत नाही. ते मोठेपण आहे त्यांच्या विचारपद्धतीत, त्यांच्या कार्यपद्धतीत, त्यांच्या अफाट आकलनशक्तीत, त्यांना असलेल्या इतिहाससंशोधनाच्या दूरगामी दृष्टीत (व्हिजन फॉर द डिसिप्लिन) आणि उभं आयुष्य या खटाटोपामागे, अस्सल साधनं गोळा करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करण्यात!
तेव्हा राजवाड्यांचे (आणि नंतरच्या विद्वान संशोधकांचेही) लेखन प्रत्येक ओळीगणिक शिरोधार्य न मानता त्यांनी दाखवलेल्या संशोधनाच्या वाटांवरून चालायचा प्रयत्न करूयात. आणि त्यांच्याइतका त्याग न करता पण निदान थोडे कष्ट घेऊन या विद्याशाखांकडे चांगले विद्यार्थी कसे जातील याचा प्रयत्न करूयात. तीच त्यांची खरी आठवण जपणे ठरेल.
सुंदर पोस्ट.. राजवाड्यांना
सुंदर पोस्ट..
राजवाड्यांना जाऊन आता शंभरावर जास्त वर्षं उलटली. त्यानंतर इतिहास आणि पुरातत्वाच्या अभ्यासाने गगनभरार्या घेतल्या आहेत. तेव्हा राजवाडे जे लिहितात ते तसंच्या तसं स्वीकारार्ह नाहीच नाही. त्याने राजवाड्यांचं मोठेपण लेशभरही कमी होत नाही. ते मोठेपण आहे त्यांच्या विचारपद्धतीत, त्यांच्या कार्यपद्धतीत, त्यांच्या अफाट आकलनशक्तीत, त्यांना असलेल्या इतिहाससंशोधनाच्या दूरगामी दृष्टीत (व्हिजन फॉर द डिसिप्लिन) आणि उभं आयुष्य या खटाटोपामागे, अस्सल साधनं गोळा करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करण्यात!
तेव्हा राजवाड्यांचे (आणि नंतरच्या विद्वान संशोधकांचेही) लेखन प्रत्येक ओळीगणिक शिरोधार्य न मानता त्यांनी दाखवलेल्या संशोधनाच्या वाटांवरून चालायचा प्रयत्न करूयात. आणि त्यांच्याइतका त्याग न करता पण निदान थोडे कष्ट घेऊन या विद्याशाखांकडे चांगले विद्यार्थी कसे जातील याचा प्रयत्न करूयात. तीच त्यांची खरी आठवण जपणे ठरेल.
>>>> प्रचंड अनुमोदन..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि हो..
महाराष्ट्राची इतिहासाची कालरेखा उद्या टाकेन. वरचे कालखंड जसेच्या तसे ग्राह्य धरू नयेत.
>> लवकर दया.. म्हणजे मला नवीन पुरावे ग्राह्य धरून पोस्ट बदलता येईल..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वरदा , वरील पोस्ट आवडली !!
वरदा , वरील पोस्ट आवडली !!
वरदा | 20 February, 2012 -
वरदा | 20 February, 2012 - 23:38
महाराष्ट्राची इतिहासाची कालरेखा उद्या टाकेन.
सहा महिने होत आले
लवकर वेळात वेळ काढून लिहा. वाट पहात आहे!
सेनापति ...अतिशय छान लेख
सेनापति ...अतिशय छान लेख माला...... अजुन असे काहि लिहिले असेल तर जरुर कलवा.............
वरदा | 20 February, 2012 - 23
वरदा | 20 February, 2012 - 23:38
महाराष्ट्राची इतिहासाची कालरेखा उद्या टाकेन.
सहा महिने होत आले Happy लवकर वेळात वेळ काढून लिहा. वाट पहात आहे!>>>>
वाट पाह्तोय
अतिशय छान लेख माला
अतिशय छान लेख माला
आजून वाचायला आवडेल यावर, आपण
आजून वाचायला आवडेल यावर, आपण अनपेक्षितरीत्या लेखमाला खंडित झाली.. कृपया कुणाकडे आणखीं माहिती अथवा संदर्भ साहित्य असल्यास माहिती पुरवावी ... @वरदा