कोकण ते कॅलिफोर्निया
साधारणपणे कोकण हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित झाले नव्हते, कलमी आंब्यांना कीटक नाशकांचा स्पर्श झाला नव्हता. आंब्याच्या झाडावरच्या उंबीलानी चावू नये म्हणून आंबे उतरवणारा गडी पाणचुलीतली रखा(राख) अंगाला फासून झाडावर आंबे उतरवायला चढत असे. लांब कळकाला(बांबूला) घळ(बांबूची टोपली) लावून कलमाचे ठराविकच आंबे उतरवीत असे.
आंबे निगुतीने अढीत घालून अंधाऱ्या खोलीत किमान आठवडाभर ठेवले जात.
आंबे उतरवताना खाली पडलेला आंबा चेचका म्हणून आधीच बाजूला काढून ठेवला जात असे. प्रत्येक झाडाच्या आंबे जून होण्याच्या काळात थोडा बहुत बदल असे. त्यानुसार आंबे उतरवले जायचे. काही आंबे केवळ लोणच्यासाठी तर काही साठांसाठी असत. सरसकट सर्व कलमे एकदम उतरवून त्यावर पिकण्याचे औषध मारून बाजारात पाठवायच्या आधीच्या कोकणात जाणे म्हणजे एक दिव्यच असायचे.
फेब्रुवारी/मार्चमध्ये बॉम्बे सेन्ट्रलला जाऊन रांगेत उभे राहून रिझर्वेशन करायचे. त्या साठी चार/पाच तास खर्च करायचे.
तिकिटे मिळाली की लगेच कोकणात कार्ड टाकायचे.
घरासाठी काय काय हवे आहे याचे उलट टपाली पत्र यायचे. त्यात हमखास चहा पावडर, फरसाण, पंचे, अँनासीनच्या गोळ्या, अमृतांजन, हिंग, साखर याचा समावेश असायचा. घरात लहान मुले असतील तर ग्राईप वॉटर हवेच. प्रथम ट्रंकेत हे सर्व सामान भरायचे.
सतरंजीच्या वळकटीत जुन्या सोलापुरी चादरी आणि कपडे ठेवायचे. वळकटी बांधायचे काम मात्र माझे वडीलच करायचे.
त्या वळकटी बांधण्या मागचे रहस्य बरेच वर्षांनी उलगडले. कोकणात घरी पोहोचल्यावर आमचे काका ती वळकटी आपल्या ताब्यात घेत. चादरींच्या आत लपवलेल्या नोटा त्यांनाच ठाऊक असत.
सर्व सामान घेऊन एस टी स्थानकावर पोचलो, की पहिला टप्पा म्हणजे स्वच्छता गृहात जाणे.
जर काही कारणाने बस उशिरा सुटणार असेल तर परत त्या दिव्यातून जावे लागे.
एकदा का, “मुंबई राजापूर बस क्रमांक बी एम के ११३४ फलाट क्रमांक ९ वरून सुटेल.” ही घोषणा ऐकली कि आमची वरात फलाट क्रमांक ९ कडे निघायची.
आमच्या बसची वाट पाहताना एक घोषणा हमखास ऐकू यायची,"मुंबई सावंत वाडी सटाणा मार्गे जाणारी एस टी सुमारे अर्धा तास उशिरा सुटेल.”
हे सटाणा कुठे आहे ते बघण्याची मला अजूनही उत्सुकता आहे.
एस टी फलाटाला लागल्यावर सामान चढवण्याची सगळ्यांनाच घाई सुटलेली असायची.
हमालांच्या बरोबरची घासाघीस हा दुसरा टप्पा,"समजून द्या" हे आज पर्यंत न उलगडलेले कोडे आहे.
समजून दिलेल्या पैशात कधीच समाधान व्हायचे नाही.
ट्रंका लई भारी होत्या, बावळे(खांदे) लई भरून आले, पोरांनसाठी कष्ट करताव. त्यांच्या तरी पोटावर मारू नोका. अशी त्यांची वक्तव्ये ऐकली की मुकाट्याने अजून पैसे काढून द्यायचे.
एस टीत चढण्याची सगळ्यांनाच घाई लागलेली असायची. आत ठेवायच्या पिशव्या हातात घेऊन सगळ्यांची एकच झुंबड दाराशी उडायची.
कंडक्टर का कोण जाणे एका विशिष्ट लयीत टाण टाण घंटा वाजवत असायचा. एकदा का आत जाऊन बसलो की खिडकीतून बाहेर, लेमन लेमन, आलेपाक, वेफर्स घ्या वेफर्स असे आवाज ऐकू यायचे. फेरीवाल्याकडचे सगळेच विकत घ्यावेसे वाटायचे.
वडिलांनी बाहेरच्या खाण्याबद्दल आधीच दटावलेले असायचे.
इतक्या अनंत अडथळ्यातून एकदा का आरक्षित आसनावर टेकलो की भूकेची जाणीव व्हायची.
तेव्हा रातराणी सुरु झालेली नव्हती.
पहाटे उठणे ते ही परीक्षा झाल्यावर, झर झर आंघोळी आटपून टॅकसीत बसायचे. ती मात्र पर्वणी वाटायची.
एस टीची घंटा टणा टण अशी वाजली की खाली उभे असलेले लोक, जपून जा, विचारलाय म्हणून सांग रे असे म्हणून बस पासून जरा दूर जात.
बस डेपोतून बाहेर पडली की कंडक्टर प्रत्येकाचे आरक्षणाचे कागद पाहून त्यांना तिकिटे द्यायचा. "गाडी परळ डेपोला धा मिनिटे थांबेल कोणी उतरू नका." असे ओरडून सांगायाचा. हमखास कुणाला तरी निसर्गाचे बोलावणे यायचे वा चहा प्यायची हुक्की यायची.
कंडक्टरची नजर चुकवून तो खाली उतरायचा. ह्या स्टॉपची माणसे चढली की परत कंडक्टर टणा टण घंटा वाजवायचा. अगदी बस सुटणार, तोच किरटा आवाज यायचा, "आमची मानसा खाली उतरलेली हत, ती अजून येयाची हत."
अगो पन म्हातारे आधीच सांगला होता उतरू नुको, पन ऐकूचा नाय. आता लेट झाला तर डेपो म्यानेजर आमची सालडी काढता. पुढच्या प्रत्येक बस थांब्यावर "तुमची मानसा" चढली काय ? चा उद्धार व्हायचा.
वडखळ नाक्याला वडा आणि चहा मात्र आम्हाला मिळायचा. महाडला बस पेट्रोल भरून घ्यायला डेपोत जायची तेव्हा बस डेपोच्या
जवळपास आडोसा शोधायला लागायचा. रातराणी सुरु झाल्यावर काळोखामुळे बरीच सोय झाली. कोकण प्रवासातली हि सगळ्यात मोठी दुःखाची बाब होती. संगमेश्वरला “मुळे” नावाचे गृहस्थ हॉटेल चालवत. त्यांच्या हॉटेल मधली राईस प्लेट आम्ही घ्यायचो. फणसाची भाजी, कोकमाचे सार, भात, एखादी जाड पोळी, लोणचे आणि ताकाची वाटी असा तो थाट असे.
हॉटेलमध्ये कसेही का असेना खायला मिळते ह्याचाच आनंद असायचा. कधी कधी खूपच हट्ट केला तर सोडा लेमन मिळायचे.
बाकी घरातून निघताना घेतलेला चिवडा, केळी, खजूर, तिखट मिठाच्या पुऱ्या असा मेनू असायचाच. ज्या मोठ्या माणसाकडे हे खाण्याचे जिन्नस असायचे त्याचे आम्हाला देताना भाव असे असायचे, "किती खाता, एकदाच काय ते मागा, सत्रांदा मी पिशवी उघडणार नाही. सांडायचे नाही. पोट बिघडली तर औषध देणार नाही. बस थांबल्याशिवाय शी शू ला जाता येणार नाही. मुलांना खायला देणे ह्यामागे एक कटकटीची भावना असायची.
परळ, पेण, पनवेल, वडखळ नाका, महाड, खेड, संगमेश्वर, हातखंबा, पाली, लांजा, राजापूर
असा प्रवास करून आमची वरात आजोळी जायला राजापूरला उतरायची.
जर भाऊंच्या गावाला जायचे असेल, तर पालीनंतर कंडकटरला विनंती करून खानूमठ नावाचे गाव मुंबई गोवा रस्त्यावर आहे, तिथे उतरायचो. याला भाऊंच्या गावची माणसे सपाटी म्हणत.
भाऊ म्हणजे माझे वडील, सरपोतदार.
तिथून साधारण २ ते ३ मैल खाली दरीत हे "आंजणारी" गाव आहे. ह्या गावात पूर्वी सर्व सरपोतदारांची घरे होती.
हे सर्व सरपोतदार एकमेकांचे भाऊबंद आहेत. कोकणातल्या माणसाना तसं थोड फटकळ कम हजरजबाबीपणे बोलायची सवय असते. पण भाषेवर प्रभुत्व असल्याखेरीज ते शक्य नाही.
आमच्या घरातून सामान घेऊन डोंगराची घाटी चढून वर मुंबई गोवा रस्त्यावर येणे म्हणजे एक दिव्यच असे. त्यात रात्र असेल तर पाहायलाच नको. एक तर एखाद दुसरीच एस. टी. तिथून जायची. वीज नसल्याने मिट्ट काळोख. सपाटीवरून आमचे गाव एखाद्या विवरासारखे दिसायचे.
माणूस चंद्रावर गेल्याचे कळल्यावर माझ्या वडिलांचे एक काका पटकन म्हणाले, "मेले रांडीचे, चंद्रावर जातायत. इथे सपाटीवर उतरले असतील नी चंद्र चंद्र म्हणून नाचले असतील. विवरे होती म्हणे चंद्रावर? शेणकीचे डबरे त्यांना विवरे वाटली असतील. सपाटीवरने डोकवलेनी. दिसणार काय? काळोखच ना? तसाही खड्ड्यांना इथे काय तोटा?"
माझे मोठे काका शिक्षक, वयाच्या १६ व्या वर्षापासून त्यांना शिक्षकाची नोकरी करावी लागली. अतिशय लहान वयात त्यांना संसाराची जबाबदारी घ्यावी लागली. त्यांच्या बोलण्यात कायम एक खोचक बोचरा भाव असे.
त्यांचा मुलगा १९६६ साली अमेरिकेला आला. त्याचे पत्र आले की आम्हाला पत्र वाचायची खूप उत्सुकता असे. एकदा त्याचे पत्र वाचण्यासाठी मी हट्ट धरला. तर ते म्हणाले, अगो कसली अमेरिका नी कसले काय, कुळवाडी नी अमेरिकन सारखेच, धूत नाहीत पुसतात.
मे महिन्यात कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि शेतात भाजावळी करणे, पावसाळ्यात सरपणाची सोय करणे, शेताला वई घालणे, गडगे दुरुस्त करणे, आंबे उतरवणे, यासाठी बरीच माणसे कामाला यायची. त्यांना कुळवाडी म्हणत असत. रानात काम करताना निसर्गाच्या हाकेला ओ द्यायची वेळ आलीच तर पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि सोय यासाठी ऐनाची पानें काम करणारी माणसे वापरत.
याच्या उलट माझ्या आजोळी चुना कोळवणला बारमाही वाहणारी नदी, इथला बीडई नावाचा प्रकार पाहिल्यावर माझ्या मामाला मी उत्साहाने त्याबद्दल सांगितले, तर तो म्हणाला, "मज कसले त्याचे कवतिक, आपण नदीच्या खालच्या धारेवर कार्यभाग उरकावा, नी वरच्या धारेवर धुवावे.
अशाप्रकारे माझ्या मामा आणि काकांनी अमेरिकेची अगदी ऐशी कि तैशी करून टाकली.
अशी माझ्या वडिलांची काकू अगदी अलीकडेच ९२ व्या वर्षी गेली. मला सर्व मिळून १४ सख्खा, चुलत आणि आते भाऊ . आम्ही फक्त तीन बहिणी. त्यात माझा प्रेमविवाह, तिला एक उत्सुकता होती की प्रेम कसं जमत? मी म्हटलं अग आम्ही एकमेकांशी खूप बोललो, आमच्या आवडी निवडी जमल्या, स्वभाव आवडले, मग ठरवलं लग्न करायचं. तरी भांडता कसे? तिच्या प्रश्नाला उत्तर न देता, मी म्हटलं, " तुझ लग्न कसं जमल?"
तर ती म्हणाली, "अगो, आमच्या अप्पांनी बघितलेनी, मुलगा खात्या धुत्या हाताचा आहे, अजून काय हवे. झाला हो संसार त्या तेवढ्यावर.
मी अवाक, खरेच किती साधी सरळ विचारसरणी, खायला मिळाले तरच धुता येईल. त्यावेळी मात्र हसून हसून मेले.
साधारण २५ ते ३० वर्षांपूर्वी कोकणात कोणत्याही गावाला जायला दिवसातून एखादी एस. टी. असायची. माझ्या धाकट्या मामेभावाचे लग्न ठरले. आम्ही सर्व मुलाकडची वऱ्हाडी मंडळी आदल्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या गावी पोहोचलो.
मुलीच आडनाव गगनग्रास. माझा मामा बेलवलकर.
मुलीकडच्यानी आमची झोपायची सोय शाळेच्या पटांगणात केली होती.
लग्नाहून परत चुना कोळवणला गेल्यावर माझ्या मोठ्या मामेभावाला कोणीतरी विचारलं,"काय बेलवलकर, लग्न कसे झाले?" माझा मामेभाऊ म्हणाला, "झक्क, अहो लाखो रुपयांची मालमत्ता गुलाल बुक्क्या प्रमाणे
उधळणाऱ्या बेलवलकर घराण्यातले आम्ही.
थंडी लागली म्हणून नवऱ्या मुलीचा शालू पांघरून झोपलो.
काय सांगता काय? कुठे झोपलात?
अहो कुठे काय? वर गगन आणि खाली ग्रास. शाळेच्या पटांगणात.
कोकणातला घरटी एक माणूस मुंबईला नोकरी करीत असे. त्याच्या मनी ऑर्डरीवर घर अवलंबून असे. त्याला चाकरमनी म्हणत. एक तर मुंबईत येणे, राहायला जागा मिळवणे, नोकरी मिळवणे सगळेच कठीण. महानगर पालिका, गिरण्या अशा ठिकाणी टेम्परवारी नोकरी कशीतरी मिळवली की तो फक्त मनीऑर्डरीचा धनी असायचा.
ही नोकरी जर गेलीच तर, गावाला उघड्या पोस्ट कार्डावर, मी सध्या बस कंपनीत आहे, त्यामुळे कर्जत लोकल धरायला लागत आहे, असे कोड्यात लिहून माझा मामे भाऊ मामाला कळवत असे.
माझ्या लहानपणाच कोकण सर्वार्थाने हिरवं होत.
माझी काकू केर काढल्यावर, काटक्या, वाळकी पाने पाणचुलीत टाकायची. बारीक दगड गडग्याच्या बुंधात आणि बारीक माती, रेव परसातल्या केळी, अळूच्या खाचरात टाकायची. जेवलेली केळीची पाने म्हशीच्या आम्बोणात बारीक चिरून टाकायची. गोठ्यातल शेण शेणखतासाठी, नंतर काही वर्षांनी गोबर गॅससाठी, तर गुरे चरायला सोडल्यावर पडलेले शेण गोवऱ्या थापण्यासाठी असे. शेण आणि लाल वस्त्र गाळ मातीचे रोज पोतेर घातलं जात असे. देव घराला हात सारवण असे. कोणतीही गोष्ट नुसती फेकून दिली असे मी कधी पाहिलंच नाही. फळांच्याच्या साली काम्पोस्टसाठी तर आंघोळ केलेले पाणी परसातल्या झाडांसाठी, आंब्याच्या कोयींची वाळवून राखुंडी, आजीच्या पातळाच्या गोधड्या, तुटलेले कौल गरम करून शेकण्यासाठी तर पानगळीची पाने खत, भाजावळीसाठी. कंदिलाच्या काचा भाताच्या वाळक्या तुसानी पुसल्यानंतर ती तुसे चुलीत जात. त्यांना लागलेलं ऱॉकेल वाया जाऊ नये हा त्या मागचा हेतू.
नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात हे आपल्या सर्वाना ठाऊक आहेच.
भाताच्या रोपांवर डोलणारे,
डोंगरलाटांचे, हिरव्या वाटांचे,
काळ्या करवंदांच्या जाळीचे,
पाटाच्या, पर्ह्याच्या पाण्याचे
माझे कोकण
कुठेतरी आता हरवून गेले आहे.
जांभ्या दगडाच्या घराचे
काप्या, बरक्या फणसाचे
लाल, पिवळ्या काजूच्या बोंडाचे
लाल तांदळाच्या खिमटाचे
नाचणीच्या भाकरीचे
कुळथाच्या पिठल्याचे
माझे कोकण
कुठेतरी आता हरवून गेले आहे.
वाऱ्याच्या झुळकी बरोबर
प्राजक्त, केवडा, पांढरा चाफा
याचा सुगंध देणारे
गदगदणाऱ्या वाऱ्यावरती
आंब्याचा सडा पाडणारे
नात येणार म्हटल्यावर
आजीला जात्यावर भाजणी
दळायला लावणारे
माझे कोकण
कुठेतरी आता हरवून गेले आहे.
विचारलेल्या प्रश्नांना प्रश्नानेच
उत्तर देणारे
श्रावणातल्या सरींनी
माहेरवाशणीना न्हाऊ घालणारे
काकाकाकू, मामामामी
आत्यामावशी दादा ताई
आजो आजी सोयरे सगे
घट्ट नाते बंध असणारे
माझे कोकण
कुठेतरी आता हरवून गेले आहे.
Padmini Divekar
खुप छान लिहीलय लहानपणीच्या
खुप छान लिहीलय लहानपणीच्या कोकण ट्रिपा आठवल्या आम्हाला तर आधी लाल डब्बा, मग तर आणि शेवटी बैलगाडी अशी सफर करायला लागायची. पण मज्जा ययची
(No subject)
>इथे सपाटीवर उतरले असतील नी
>इथे सपाटीवर उतरले असतील नी चंद्र चंद्र म्हणून नाचले असतील.
>>वर गगन आणि खाली ग्रास.
टीपीकल कोकणी. भाषेच्या हेलासकट टिपण्या ऐकू आल्या.
मस्त लिहिलं आहे, खूप आवडलं.
मस्त लिहिलेय एकदम! सगळे हेल
मस्त लिहिलेय एकदम! सगळे हेल अगदी ऐकायला आले
सहीच !
सहीच !
मस्तच ! कधी बोटीन नाय गेलांव
मस्तच !
कधी बोटीन नाय गेलांव ?
आवडलं.. गावाच्या नावासारखे
आवडलं..
गावाच्या नावासारखे थोडे-बहुत तपशील बदलले तर हे लिखाण माझी मे महीन्यातील सुट्टि म्हणुन सहज खपेल..
आता इथेच न थांबता अजुन ही लिहा. जमल्यास बदललेल्या कोंकणाबद्दल देखिल लिहा.. पु.ले.शु.
ओह्ह एकदम खास.. अगदि
ओह्ह एकदम खास.. अगदि लहानपणीची गावची फेरी आठवली. खुप खुप छान लिहिल आहे..
छान लेख..
छान लेख..
खूप खूप छान. विशेषतः कोकणी
खूप खूप छान. विशेषतः कोकणी तिरकसपणा सही. पुलेशु
सही लिहिलंयत! मला माहित नाही
सही लिहिलंयत!
मला माहित नाही पूर्वीचं कोकण फारसं पण सासू-सासरे आणि नवरा जे काय सांगत असतात ते ऐकून जे काय मस्त वाटतं तसंच वाटलं हा लेख वाचून.
पूर्वीचं सगळं तसंच रहाणार नाही पण बरंच काही टिकवता येण्यासारखं आहे. अगदी नेत्यांनी कोकण विकून खायचं ठरवलेलं असलं तरी बरंच काही चांगलं काम चालू आहे तिकडे. ज्यांना कोकणाचं वैभव रहावं तसंच किंवा निदान यापुढे अजून वाट लागू नये असं वाटतंय त्यांनी तरी अशी कामं समजून घेणं आणि तिथे आपल्याकडून थोडी आहुती वेळ, कल्पना, पैसा कुठल्या ना कुठल्या पातळीवर तरी टाकणं गरजेचं आहे. (कोणाला काही शिकवायला म्हणत नाहीये हे!)
मस्त तपशील लिहिले आहे. बस
मस्त तपशील लिहिले आहे. बस प्रवासाचे चित्र उभे राहिले
पुर्वी दिवसा प्रवास करत असल्याने भौगोलिक अभ्यास आपोआप व्हायचा. आजकाल रात्रीच्या बंद काचेच्या व्हाल्वो प्रवास किंवा ३ टायर एसीच्या प्रवासामुळे वाटेत लागणारी वेगवेगळी गावे, त्याची वैशिष्ठे याचे बाळकडू छोट्यांना मिळणे कमी झाले आहे.
असो लेखन आवडले
अमोल केळकर
----------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा
मस्त लिहिलय. टिपिकल कोकणातली
मस्त लिहिलय. टिपिकल कोकणातली बोचरी वाक्य अगदी ऐकायला आली
चुना कोळवण म्हणजे ओणीजवळ का? माझे माहेरचे मूळ गाव शिवणे. मुंबई-गोवा महामर्गावरून ओणीजवळून फाटा फुटतो. माझे वडील राजापूरलाच वाढले. राजापूर, हर्डी, कोदवली या भागात नेहेमी सुट्टीत जात असू.
माझ्या वडीलांनी त्यांच्या रिटायरमेंटनंतर ओणीजवळ कळसवलीला जागा घेवून कलमांची बाग केली होती. सगळ्या सुंदर आठवणी एकदम जाग्या झाल्या. धन्यवाद
अतिशय सुरेख लिहीलं आहेत.
अतिशय सुरेख लिहीलं आहेत. आवडलं :).
मस्त लिहिलं आहे
मस्त लिहिलं आहे
माणूस चंद्रावर गेल्याचे
माणूस चंद्रावर गेल्याचे कळल्यावर माझ्या वडिलांचे एक काका पटकन म्हणाले, "मेले रांडीचे, चंद्रावर जातायत. इथे सपाटीवर उतरले असतील नी चंद्र चंद्र म्हणून नाचले असतील. विवरे होती म्हणे चंद्रावर? शेणकीचे डबरे त्यांना विवरे वाटली असतील. सपाटीवरने डोकवलेनी. दिसणार काय? काळोखच ना? तसाही खड्ड्यांना इथे काय तोटा?" >>>
काय आठवणी आहेत... अगदी कोकणातल्या माती सारख्या मनमोहक!
सुरेख !
सुरेख !
मस्त लिव्हलय
मस्त लिव्हलय
अप्रतिप लेखन. सगळ्या जुन्या
अप्रतिप लेखन. सगळ्या जुन्या आठवणी जागृत झाल्या. लाल डबा, तिकिटांसाठी एस्टीतल्या नातेवायकांच्या ओळखी, शाळेतल्या विद्यार्थ्यांना मिळणारे कन्सेशन, सकाळी एस्टी कॅन्टीनमध्ये केलेला नाश्ता, मोठा प्रवास असल्याने पोहोचल्यावर सुद्धा बसमध्येच असल्याचं फिलींग...... एक ना दोन, किती आठवणी
परवा किरुबरोबर येताना हाच सगळा पाढा म्हंटला होता. आज परत घोकला. आता परत ये सगळ त्याच असोशीने अनुभवता येईल ?
सुरेख लिहीले आहे. आज ती एसटी
सुरेख लिहीले आहे. आज ती एसटी वगैरेची मजा गेली पण जुन्या घरांमधे अजुनही प्रत्येक गोष्ट टाकाऊ न समजता टिकाऊच समजली जाते व वापर केला जातो. मस्त वाटले पण वाचुन.
अतिशय सुंदर लिहिलेय...
अतिशय सुंदर लिहिलेय... जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
जाताना वाटेत जेवणे म्हणजे अगदी पर्वणीच वाटायची तेव्हा. लोकांची हॉटेल्सही ठरलेली असायची. माझ्या वडलांचे एक मित्र हातखांब्याच्या स्टॉपला चिकन खायचेच खायचे.
सर्व सामान घेऊन एस टी स्थानकावर पोचलो, की पहिला टप्पा म्हणजे स्वच्छता गृहात जाणे.
जर काही कारणाने बस उशिरा सुटणार असेल तर परत त्या दिव्यातून जावे लागे.
अगदी अगदी... केवळ ह्या एकाच कारणामुळे एस्टी प्रवास नकोसा वाटायचा.
सगळं डिट्टो. खुप खुप आठवणी
सगळं डिट्टो. खुप खुप आठवणी जाग्या झाल्या.
मस्तच लिवलास!
मस्तच लिवलास!
Amazing!!! Even I am from
Amazing!!! Even I am from Rajapur, Vilaye.
I have gone through same experience, and feelings..but still I love that place.
My husband is Sindhi and he has not been to such village, so when ever he asks that he want to visit Kokan, i tell him that there is no washroom concept in the house..its always out of the house, and then he burst into laugh..
Ajun khup memories ahet..
Let see if i can pen down here..
Deepa
अ..प्र...ती...म... मी मुळचा
अ..प्र...ती...म...
मी मुळचा ठाण्याचा त्यामुळे पद्धती जरा वेगळ्या. पण तरीही सर्व डोळ्यासमोर उभे राहिले...
सुरेख..
सुरेख..
बर्याच दिवसात काहीतरी मस्त
बर्याच दिवसात काहीतरी मस्त वाचायला मिळालं. अगदी नॉस्टल्जिया.
फारच सुंदर लेख पद्मिनी
फारच सुंदर लेख पद्मिनी
तुमचा हा लेख आणि ज्योती_कामतचा लेख वाचून कढ दाटून आलेत. जरा भावनावेग आवरला की झब्बू देईन कदाचित.
खुप आठवणी जाग्या झाल्या. हे
खुप आठवणी जाग्या झाल्या.
हे क्रमशः आहे ना ?..... कोकण ते कॅलिफोर्निया अजुन सुरु नाही झाला.....
अजुन वाचायला आवडेल.
मस्त. कोकण स्वतः अनुभवले
मस्त.
कोकण स्वतः अनुभवले नसले तरी पुलंच्या कथाकथनामधुन अंदाज आहे भाषेचा.
त्यावरुन मलाही ऐकू आलं बरोबर हेल वगैरे..
@अंतू बर्वा.
Pages