दुर्गभ्रमंती करवीरनगरीची भाग-२

Submitted by आशुचँप on 20 May, 2011 - 14:19

भाग १
http://www.maayboli.com/node/25815

=====================================================================

सकाळी लवकर उठून आंघोळी आटपल्या आणि झेंडावंदन करून आलो. पण अर्थातच आमच्या आधीच सगळ्यांनी झेंडावंदन उरकून घेतले होते आणि नाष्ट्याला पळाले होते. आम्हीही आमची पावले प्रसादाकडे वळवली. द्रोणात गरमागरम शिरा समोर आला आणि एकदमच तब्येत खुश झाली.
वाहवा...दिवसाची छान सुरूवात...पण प्रसाद असल्यामुळे एकच द्रोण मिळाला.
मग पटापट काही वानरसेनेचे फोटो काढले.

From kolhapur

शेकोटीची उब घेणारी माकडजोडी

अगेन्स्ट द लाईट प्रकारावरही जर प्रयोग करून पाहिले. हा माझा पहिलाच प्रयोग.

मग उतरताना गडाचे आणखी फोटो

आता वेध लागले होते शिवगडाचे. हा किल्ला राधानगरी-दाजीपूर गवा अभयारण्याने वेढलेला आहे. त्यामुळे करूळी घाट उतरून वैभववाडीवरून पुन्हा घाटावर चढावे लागते. हे दोन्ही घाट अफलातून आहेत. वैभववाडीत मनासारखा ऑक्टोपस मिळाला आणि त्यामुळे मग दोन्ही सॅक एकमेकांना करकचून आवळून त्या माझ्या बाईकवर बांधून टाकल्या. आता ब्येस्ट झाले. दोन सॅकचे वजन हे डबलसीटपेक्षा कमीच होते त्यामुळे मला कसलाही लोड नव्हता. फक्त एकच अडचण होती एकावर एक ठेवल्यामुळे त्या सॅकची उंची चांगलीच झाली होती आणि लांबी-रुंदीपण व्यवस्थित असल्याने मला उजव्या हाताच्या आरश्यात फक्त सॅकच दिसत होत्या. ही मोठीच अडचण होती. पण एक गाडी कायम माझ्या मागे राहून काही वाटलेच तर हॉर्न देऊन सूचना करेल असे ठरून आम्ही मार्गक्रमण सुरु केले.
अभयारण्याच्या सुरूवातीला फारेस्टची चौकी लागते. तिकडे गाड्या लाऊन नेहमीप्रमाणेच मीच पुढे सरसावलो. पत्रकार असल्याचा पुरेपूर फायदा उठवत मी त्याला जणू अभयारण्याची पाहणी करायला आल्याच्या थाटात भरपूर प्रश्न विचारले.
मग इथून शिवगड किती लांब आहे, इथेही गगनगिरी महाराजांचा मठ आहे ना, पाणवठा कुठे आहे, वॉच टॉवर कुठल्या साईडला आहे, मग आम्हाला शिवगडावर जायचे असेल तर काय करावे लागेल इ.इ.
दरम्यान, तिथेच एक इंडियन एक्प्रेसचा रिपोर्टर भेटला. आमच्या व्हीजिटींग कार्डची अदलाबदली झाल्यानंतर त्याने चक्क माझ्या स्टोरीज वाचल्याचे सांगितले. त्यामुळे फॉरेस्टमामांची माझ्याबद्दल खात्री पटली आणि त्यांनी आम्हाला प्रवेशशुल्क माफच करून टाकले.
"गाईड येईल तुमच्यासंगत. त्याचे तेवढे १०० रुपये द्या मंझे झालं..."
असेही अभयारण्यात मुक्काम करण्याची परवानगी नसल्याने सगळ्या सॅक उतराऊन ऑफीसमध्ये ठेवल्या आणि फॉरेस्ट गाईडला घेऊन अभयारण्यात प्रवेश केला.
दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण इतक्या दिवसा ढवळ्या कडकडीत उन्हात गव्यासारखा लाजरा बुजरा प्राणी दिसेल ही शक्यताच नव्हती. त्यात पुन्हा बाईकच्या आवाजामुळे तर अशक्य. त्यामुळे आजूबाजूची हिरवीगर्द वनराई पाहत धूळभरल्या कच्च्या रस्त्यावरून गाड्या घातल्या. हा रस्ता थेट आम्हाला पाथरपुंज ते प्रचितगडाच्या रस्त्याची आठवण करून देत होता.

तसाच नागमोडी रस्ता, जंगलाच्या मधोमध जाणारा..फक्त त्यावेळी मरणाच्या उन्हात चालत जात होतो आता अगदी आरामात बाईकवर.

शिवगड हा मुख्य डोंगरधारेशी एका निरुंद वाटेने जोडला आहे. त्यामुळे खाली उतरून पुन्हा त्या वाटेने वर चढावे लागते. गाड्या सावलीत उभ्या करून गाईडपाठोपाठ चालू लागलो.

गडावर आता बांधकामसदृश्य काहीच शिल्लक नाही. तुटके फुटके बुरुज, एक बेसुमार झुडपे वाढलेली तटबंदी बास्स एवढेच...

पण वरून देखावा मात्र एकनंबर दिसतो.

डावीकडे हिरव्या गर्दीत लपलेले पांढरेशुभ्र मंदीर उठून दिसत होते तर उजवीकडे राधानगरी जलाशय.

गडफेरी पूर्ण करतानाच मला तिथे कोंबड्यांची पिसे आणि खरकटं दिसलं
"काहो इकडे पार्ट्यापण होतात का...??"
"नाय नाय, परमिशनच नाय.."
"हे काय इथे दिसतंच आहे...चिकन तर दिसतयं, दारूच्या बाटल्यापण असणार..."
"अजाबात नाय, चेकींग होती ना गेटवर.."
च्यायला, काय पण थापा मारतो असे म्हणत मी शोधक नजरेने आजूबाजूला पाहीले. तर एका झुडपाच्या बुंध्यात दडवलेल्या बियरच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टीक ग्लास असे सगळे सामान सापडले. तोपर्यंत अमेय आणि रोहनने अजून दोन-तिन ठीकाणहून बाटल्या गोळा केल्या. तब्बल १०-१२ बाटल्या, डझनानी प्लॅस्टीक ग्लास, प्लॅस्टिकच्या पिशव्या असा सगळा ऐवज त्या फॉरेस्ट गार्डसमोर ठेवल्यावर तो बिच्चारा शरमेनी पाणी पाणी झाला. काय बोलावे तेच सुचेना.
मुकाट्याने त्याने एक मोठी पिशवी घेऊन त्यात सगळ्या बाटल्या भरायला सुरूवात केली. मग मलाही रहावले नाही.
"दुसरीकडून वाट आहे का गडावर यायला.."
"खालच्या गावातून तशी येक वाट हाये पण ती लय अवघड हाय आनी तिथून यायची परमिशनबी नाय."
पण तिथूनच येत असणार हे लोक
असे म्हणत मी त्याला बाटल्या भरायला मदत केली. वाटेत बाकीची झाडे झुडपे विंचारून सगळा कचरा आम्ही पाचजणांनी खाली आणला. तिथून मग गगनगिरी महारांजच्या मठाला भेट दिली. गडावरून दिसणारे ते पांढरे मंदिर हेच.
त्या निबीड रानात ते एकुलते एक मंदिर आणि बाजूला पाण्याची टाकी एवढेच मनुष्यवस्ती होती. त्या निवांत ठिकाणी आल्यावर तिथच रात्र काढून जंगल अनुभवण्याचा विचार मनात आला. त्या गाईडला तर आमच्या सद्भावनेबद्दल खात्री पटली होती त्यामुळे त्याला विचारताच त्याने इथे रहायची परमिशन नाय पण तुमच्यासाठी मी काहीतरी करतो असे आश्वासन दिले.
ते ठिकाण होते भारीच. जेवणखाण्याचे सगळे सामान बरोबर होते पण आत्ताशी दुपार झालेली होती. अर्धा दिवस तिथे काढला असता तर पुढच्या वेळापत्रकाची गडबड झाली असती. त्यावर काय एकमत होईना. शेवटी कोल्हापूरमधील प्रसिद्ध शिवप्रेमी आणि इतिहास संशोधक भगवान चिले यांचा सल्ला घेतला आणि निरुपयाने ते देऊळ सोडून पुन्हा हमरस्ता पकडला.
रस्त्याच्या बाजूला अतिशय रमणीय असा राधानगरी जलाशय दिसत होताच. अमेयला त्यात डुंबण्याची अनावर इच्छा झाली आणि त्याने माझा विरोध मोडीत काढून गाड्या तिकडे वळवायला लावल्याच.
मग आलोच आहोत तर सगळ्यांनीच छान डुंबुन घेतले .

आणि मग इतके अंतर धावून दमलेल्या आमच्या बाईकांना पण छान आंघोळ घातली.

कशी दिसतीये माझी बाय... Happy

आंगुळी-पांगुळी होईपर्यंत सूर्यमहाराज विश्रांती घ्यायला पळाले आणि मग बाहेर आल्यावर मस्त गारठून जायची पाळी आली. जर्कीन, ग्लोव्ज पांघरून पुन्हा एकदा गाड्यांवर स्वार झालो आणि गारगोटीच्या दिशेने सुटलो. वाटेत मध्येमध्ये उसाचे भलेमोठे मळे लागत होते तिथे तर थंडीचा कडाका असह्य व्हायचा. रोहनच्या मागे बसलेला अमेय मजेत होता पण चालवणाऱ्यांची वाट लागली होती.
रात्री नऊच्या सुमारास गारगोटीला प्रवेशते झालो. एका ठिकाणी थांबून मी पहिल्यांदा कानपट्टी घेतली. हेल्मेट असले तरी गार वारा त्यातूनही कानात घुसत होता. त्या आख्ख्या दुकानात केवळ एक कानपट्टी शिल्लक असावी का..तिथून निघणार तोच दुकानदाराने कर्णाचा आव आणत मला ती कानटोपी देऊन टाकली.
आता त्याला दया आली का काय कोण जाणे..
घेऊन जा म्हणाला...आयला हा काय प्रकार...
आधी माझा बाणेदारपणा आड आला..पण म्हणलो मरूंदे आत्ता आवश्यकता आहे..त्यामुळे कानपट्टी डोक्यावर आणि बाणेदारपणा खिशात टाकून पुढे सुटले. वाटेत गारगोटी शब्दावर अनेक कोट्या करून हसून झाले आणि रात्रीच्या जेवणासाठी एका हॉटेलात थांबलो.
हॉटेलचे नाव अजूनही लक्षात आहे हॉटेल सचिन..
आमच्या अवजड सॅक, जर्किन आणि कानपट्टी, रायडींग ग्लोव्ज पाहून परग्रहावरून आल्यासारखे सगळे लोक आमच्याकडे टकामका पहायला लागले.
हॉटेल होते लहानसेच..पटापट आत शिरून दाटीवाटीने टेबलवर बसलो. अंडाकरी दिसल्यावर पहिली ऑर्डर तिच गेली.
काही वेळातच गरमागरम रोटी, अंडाकरी, कांदा असे ताट समोर आले. दरम्यान मालकांनी खास पाहुणे म्हणून आमच्यासाठी टीव्ही लावला.
पिच्कर लागला होता मोहरा आणि मादक रविना टीप टीप बरसा पानी करत अक्षयला घायाळ करत होती. Happy आहा...काय बेस्ट वाटले त्यावेळी. त्या कडाक्याच्या थंडीत ते गाणे, ती रविना, ती अत्यंत रुचकर अंडा करी आणि गरमागरम रोट्या हे अफलातून कॉम्बीनेशन होते. त्यामुळे अंमळ जरा दोन घास जास्तच गेले.
तुडुंब भरलेल्या पोटाने पुन्हा गाड्यावर स्वार झालो आणि थोडे अंतर पार करून भूदरगडावर स्वारी केली. गाड्या पार गडावर जात असल्याने काळजी नव्हतीच. पण थेट मुक्कामाच्या मंदिरापर्यंत पोहचू ही कल्पना नव्हती. गाड्या सुस्थळी पार्क केल्या आणि पटापटा तंबू लावला. तोपर्यंत गारढोण वार्‍याने पुरती वाट लागली होती. कसेबसे सगळे सामान नीट लावले आणि स्वेटर-बिटर चढवून उबदार तंबूत गुडपलो.

क्रमश
भाग ३
http://www.maayboli.com/node/26163

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा.. मस्तच.. त्या वानरसेनेचे फोटो (अगेन्स्ट लाईटवाला), शिवगड नि जलाशयाचे फोटो.. सॉल्लिड !!
छान सफर घडवत आहेस.. पुढील भाग Happy

मस्त वर्णन आणि फोटो.
राधानगरी, दाजीपूर भागातून अनेकदा गेलोय. पण शिवगड माहीत नव्हता. एस्टी चालकात गव्याच्या अनेक कथा प्रचलित आहेत त्यामूळे त्या घाटात न थांबता भन्नाट वेगाने गाड्या नेतात. त्याच घाटात जिथे कोल्हापूर विभागाची हद्द संपते, तिथून कोकणाचा अप्रतिम नजारा दिसतो.
आणि गारगोटी तर माझ्या आजोळच्या वाटेवरचे. तिथे बोरपाडळे ला एक छोटेसे हॉटेल आहे. पिंजरा चित्रपटातला, आमास्नी नगं तूमची मिसळ, आमास्नी शिर्रा पायजे, हा प्रसंग तिथे चित्रीत झाला होता.
त्याच वाटेवर तूम्हाला कासवाचे देऊळ पण दिसले असेल (जर पावनखिंडीकडे गेला असाल तर.)
पुढच्या भागात कायकाय दिसणार आहे, त्याची उत्सुकता लागलीय.

धन्यवाद सर्वांना...
दिनेशदा - नाही, आम्ही पावनखिंडीकडे नायी गेलो. भूदरगडावरून पुढे रांगण्याला गेलो.
कासवाचे देऊळ बघायला मज्जा आली असती.

आशू, पानखिंडीकडे फारसे लोक जात नाहीत. पण त्या जागी उभे राहिल्यावर अंगावर रोमाच उभे राहतात एवढे नक्की. विशाळगडाच्या वाटेवरच लागते, रस्त्यापासूनही जवळच आहे. पण पावसाळ्यात खिंडीत पाणी साचते.

विशाळगडावर आपले काय उरलेय आता ?
खरंय...:(

भुंग्या - आरे हे या जानेवारीत केले आहे. त्यावेळी तू बिझि होतास.

मुक्तेश्वर - धन्स्

स्मिता काय करणार अगं...नाईलाज आहे...
घरच्यांनी वार्‍यावर सोडलय मला...
कुठे जाऊ..कुणी थारा देत नाही..म्हणून आपला बिच्चारा रानावनात भटकतो Happy

अरे स्वप्नील होता तुझ्या बरोबर??? मस्तच चालली आहे भटकंती... भाग जरा भरभर टाक... Happy एका ठिकाणी किती दिवस राहायचे आम्ही... Happy

विशाळगडावर आपले काय उरलेय आता ?
>>>> खरे बोललास दिनेशदा... अवस्था वाईट आहे.. पण अजूनही एक शंकर मंदिर आहे... १ ब्राह्मण कुटुंब पूजा-अर्चा बघताय. २-४ हिंदू कुटुंबे तग धरून आहेत... राजांचा गड टाकून नाही जाणार असे सांगतात. आम्ही गेलेलो तेंव्हा सर्वांनी मिळून मदतही केली. वर्षातून लोक फक्त गुरुपोर्निमेला विशाळगडावर जातात. बाकी........ शून्य..

दिनेशदा, हे कासवाचं देऊळ नेमकं कुठे?? ..आणि कुठून पावनखिंडीच्या वाटेवर आहे?? कारण राधानगरीच्या आग्नेयेला गारगोटी नि उत्तरेकडे बावडा त्याच्यावर पावनखिंड.
आशु, पहिला फोटो मस्तच..शिवगडाचा इतका व्यवस्थित फोटो मी पहिल्यांदा पाहिला. अवशेषांचे फोटोही सुसंदर्भित..आता मी आपला रांगण्याची वाट पहातोय...!!!!

हाही भाग मस्तच रे आशु. फोटो जबरदस्त Happy

कुठे जाऊ..कुणी थारा देत नाही..म्हणून आपला बिच्चारा रानावनात भटकतो>>>>> Happy

दिनेशदा, हे कासवाचं देऊळ नेमकं कुठे?? >>>>>मलकापूरात आहे ना??

अरे स्वप्नील होता तुझ्या बरोबर???

अरे स्वप्नीलच लीड करत होता. खरंतर आम्ही भगवान चिलेंसोबतच करणार होतो हा ट्रेक. पण त्यांना काही कारणाने नाही जमले. पण पूर्ण ट्रेकभर स्वप्नील आणि त्यांची फोनाफोनी चालली होती रूट बाबत. पण मी काही ठिकाणी त्यांना प्लॅन बदलायला लावलाच.

भाग जरा भरभर टाक... स्मित एका ठिकाणी किती दिवस राहायचे आम्ही... स्मित

लिहायचा कंटाळा रे मित्रा...दिवसभर माझा बातम्या टायपून टायपून हात जातो कामातून..मग परत मराठी टाईप करायला अगदी जीवावर येते...
प्रत्यक्ष भेट घडाघडा सगळा ट्रेक सांगेन...
पण लिहण्याच्या बाबतीत मात्र कामाचा लोड कमी असेल तेव्हाच पुढचा भाग

शिवगडाचा इतका व्यवस्थित फोटो मी पहिल्यांदा पाहिला. अवशेषांचे फोटोही सुसंदर्भित
हेमू धन्स रे...:)
आता मी आपला रांगण्याची वाट पहातोय...!!!!

येणार पुढचा भाग रांगण्यावरच

जिप्सी - खूप खूप धन्यवाद

भगवान चिलेंसोबत.. वा...

मी आणि स्वप्नील किती महिने झाले एकत्र ट्रेक करायचा प्लान करतोय.. पण योग येत नाही अजून... Sad

>>> गडफेरी पूर्ण करतानाच मला तिथे कोंबड्यांची पिसे आणि खरकटं दिसलं
"काहो इकडे पार्ट्यापण होतात का...??"
<<<

प्रचितगडावर तुम्हाला "वनखात्या"ने नाहक त्रास दिला. आणि इथे त्यान्चाच मेहर्बानि वर जन्गलात पार्टि!!!

विशाळगडावर जी काही हिंदू कुटुंबे आहेत त्यात एक माझ्या आजीचे नातेवाईक आहेत. त्यांच्या घरात शुभकार्य निघाले कि आवर्जून सगळ्यांना निमंत्रण देतात. तेवढाच गोतावळा जमला कि त्यांना आधार वाटतो. आम्ही काही वर्षांपुर्वी गेलो होतो, त्यांना भेटायला.
विशाळगडावर जे देऊळ आहे त्यातच मुसलमानांचे देवस्थान आहे. मटणाचा वगैरे नेवैद्य दाखवतात.
आंध्र, कर्नाटक मधून सुद्धा मुसलमान कुटुंबे तिथे येतात. थेट वरपर्यंत एस टी जात असल्याने, चढण फारशी नाही. तिथे कोंबड्या बकर्‍याचा बळी दिला कि मटण शिजवून द्यायची सोय आहे. अगदी वाटण वाटायला मिक्सरसुद्धा मिळतो. त्या गल्ल्याकूच्यातून बाहेर पडलो तर छान विस्तीर्ण परिसर आहे. विलोभनीय नजारा दिसतो. पण तिथे फारशी वर्दळ नसते. रस्त्यावरच (मलकापूर - रत्नागिरी रस्त्यावर तो फाटा आहे ) पावनखिंड लागते. वाटेत एक धरण पण लागते. छान आहे तो भाग. मारुतीसारखी छोटी गाडी पण जाऊ शकते. तूम्ही लोकांनी पण नियमित जायला पहिजे तिथे.
गडाच्या वाटेवर शिकेकाई आणि तमालपत्राची भरपूर झाडे आहेत. तिथे विकतही मिळतात.

कासवाचे देऊळ म्हणजे त्या आकारात बांधलेले देऊळ, ते कोल्हापूर मलकापूर मार्गावर आहे.

प्रचितगडावर तुम्हाला "वनखात्या"ने नाहक त्रास दिला. आणि इथे त्यान्चाच मेहर्बानि वर जन्गलात पार्टि!!!

अगदी अगदी

बाजीराव-अवि, कविता नवरे धन्स Happy

Pages