दशकपूर्तीच्या निमित्ताने - ५ (Forbidden City - पार्ले)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

Forbidden City

माझ्या गावात » Greater Mumbai and Konkan » Mumbai » Where in Mumbai » Parle हा पूर्वीच्या पार्ल्याचा पत्ता. स्थलांतर होण्यापूर्वी शेवटच्या दिवशी तिथे नव्या पार्ल्याचे नाव काय ठेवावे यावरुन आणि इतर काही उद्बोधक चर्चा आहे. गुच्छ, ताटवा, मोळी, थवा ते गट, टोळी, चमू अशी नावे सुचवलेली दिसतात. शेवटी आद्य पार्लेकर उपासने "नाक्यावरील टोळके" सुद्धा म्हटलेले आहे. यावरुन नवीन मायबोलीपूर्व पार्ल्याची थोडी कल्पना येईल.

मी पार्ल्यात नक्की कधीपासून जायला लागले ते मला आठवत नाही. पण "आम्ही कोल्हापुरी" फारसे नसत. त्यानंतर मी पुण्यात नसलेल्या 'पुण्यातल्या पुणेकरां' मध्ये शिरकाव केलेला होता. अमेरिकेतल्या सोयीच्या वेळेत वर्दळ असणारे अजून दोन बाफ म्हणजे न्यूजर्सी आणि पार्ले.

न्यूजर्सीत मी अधूनमधून जात असे. तिथे बुजुर्ग आणि काही त्यावेळची तरुण मंडळी असत. पार्ल्यात तेव्हा आद्य आद्य पार्लेकर योगीबेअर (yogibear), sami, उपास, सायो, ट्युलिप, अमेय, सशल ही मंडळी असायची. योगीबेअर तेव्हा पार्ल्याचा लीडर, द्वारपाल जे काय म्हणायचे ते होता. तो 'कुठे आहेत पार्लेकर, अजून उठले नाहीत वाटतं','येत असतील हलत-डुलत' अशी निरुपद्रवी, स्वगत-टाईप पोस्ट्स टाकायचा. कोणाचाही अनुल्लेख नाही, सर्वांच्या, अगदी सहज टाकलेल्या फुसक्या प्रश्नालाही उत्तर देणार. अश्या सौजन्यपूर्ण वातावरणात माझा पार्ल्यात प्रवेश झाला. तेव्हा पुपु आणि क्वचित न्यूजर्सीही चालू होतेच. थोडक्यात काय, तर जिथे गप्पा मारायला कोणी आहे, तिथे जायचे. बरीचशी मंडळी अशी २-३ ठिकाणी फिरत असायची पण योगीबेअरनी पार्ले कधी सोडले नाही. नंतर मात्र असे सोडले की वर्षानुवर्षे फिरकला नाही...

योगीबेअर पार्ल्यातून जायला कारण झाल्या त्या समि आणि सशल.या दोघींनी खाण्याबद्दल बोलायला सुरुवात केली आणि सशलने रोजचा मेन्यू टाकायला सुरुवात केली. या प्रकाराबद्दल योगीने काही दिवस तीव्र नापसंती व्यक्त केली पण तो प्रकार वाढत चालला आणि दिवसेंदिवस इतर लोक त्यात सहभागी होऊ लागले त्यामुळे कंटाळून त्यांनी पार्ल्याचा राजिनामा दिला! तेव्हा पार्ल्याला 'पार्ले' याशिवाय पहिले वेगळे नाव मिळाले होते, 'खानावळ'. Happy

या खानावळीत मग अजून काही लोक सामिल झाले. चाफा, प्रिया, आर्च हे पुपुकर. कोल्हापुरी सीमा. नंतर पुपुवरचे बरेचसे उसगावकर अधूनमधून पार्ल्यात डोकावू लागले. एकेकाळी पुपुवर अमेरिकेतल्या टीव्ही बघणार्या बायकांचा अड्डा जमलेला असे. या एकताच्या हिंदी टीव्ही मालिका पहात, 'सात फेरे' वगैरे. कोण कसा/कशी दिसते, मागच्या एपिसोडमध्ये काय झाले इ अपडेट्स तिथे मिळत. आणि मग एक दिवस पुपु बंद पडला! म्हणजे अॅडमिननी धागा बंद केला. (या बायकांमुळे नव्हे.) त्याआधी नेमके काय झाले होते ते मला आत्ता शप्पथ आठवत नाही आहे. पण वर उल्लेखलेल्या बायांचा किंवा माझा काही संबंध नव्हता. झक्कींचाही नसावा.

त्यानंतर मात्र अधूनमधून पार्ल्यात येणार्‍या त्यावेळच्या पुपुकरांनी म्हणजे मैत्रेयी, दीपांजली, रचना, हह, मिलिंदा, असामी सगळे पार्ल्यात स्थलांतरित झाले. पार्ले असे सर्वांना सामावून घेणारे आहे.

न्यूजर्सी(एन्जे) वाल्यांनी मात्र दोन्ही दगडांवर पाय ठेवला. त्यांच्यातले काही ७०% वेळ पार्ल्यात देऊ लागले. (सध्या एन्जे म्हणजे एक अतिशय कंटाळवाणा बाफ असून तो बंद करावा असे माझे वैयक्तिक मत आहे. नाहीतरी तो मूठभर पार्लेकरांच्या जोरावर जिवंत आहे. त्याऐवजी उरलेल्या एन्जेकरांनी पार्ल्यात यावे, ते सर्वसमावेशक आहेच.)

पार्ले आणि मेन्यू हे समीकरण इतके पक्के झाले की मेन्यूविरहीत पोस्टबद्दल पार्लेकर चाफा यांनी कळकळीने व्यक्त केलेली ही चिंता -
--
"अरेरेरेरे काय ही दुरावस्था! पार्ले बीबीच्या थोर, उज्ज्वल व दैदिप्यमान अशा परंपरेचा हा होत चाललेला र्‍हास! मन ढवळून निघाले ही विन्मुख विनामेन्यू भुकेली पोस्टस पाहून कार्याध्यक्षा श्रीमती सशल, खाद्यमंडळाच्या एक आद्य संस्थापिका म्हणून तुम्हाला वाटत असलेला विषाद तुम्ही न सांगताच तुमच्या अल्पाक्षरी पोस्टमधून भरभरुन व्यक्त होतो आहे. मोठ्या धडाडीचे नवीन सदस्य श्रीयुत अमेय यांनीही काहीच खाऊ नये? दोनच दिवसांपूर्वी दुसर्या आद्य संस्थापिका समि यांनी सेक्रेटरी नसल्याची सबब सांगून इथे मेन्यू लिहिण्याचा कंटाळा येतो हे सांगितले. ते ऐकून झालेल्या यातना वर्णनातीत अशाच आहेत. तत्पूर्वी काही आठवडे श्रीमती लालू यांनी इथे काय खाणार आहे ते न लिहिता काय खाल्ले तेच लिहावे असा उपप्रस्ताव मांडल्याने इथे येणार्‍या नवीन उत्सुक मेन्यूकरांच्या उत्साहावर थोडे विरजण पडले असण्याची कुणकुण मंडळाला होतीच. त्यात सन्माननीय सदस्या ट्युलिप यांनी काय खाल्ले किंवा काय खाणार आहे हे न लिहिता तिसरेच (तिसरे हा प्राणी नव्हे, संख्या या अर्थाने) म्हणजे काय खावेसे वाटत आहे हे लिहायची नवी कल्पना सुरु केली. पार्ल्याच्या खाद्यसंस्कृतीला या सर्व खाण्याच्या 'पोट'शाखांचा आनंदच आहे. पण मेन्यू न सांगताच इथे पोस्ट टाकणे म्हणजे अगदीच शो. ना. हो.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या निमित्ताने या विषयावर त्रिस्तरीय खाद्य कार्यकारी मंडळ नेमून परिसंवादात्मक चर्चासत्र आयोजित केले जावे ही आमची मागणी अनाठायी वाटू नये. मी कार्याध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी 'जातीने' पुढाकार घेऊन 'भरपूर' खाण्यापिण्यावरच्या चर्चेसाठी हा परिसंवाद आयोजित करुन सर्व सभासदांना कळवावे. आणि त्या चर्चासत्रात मिळणार्या जेवणाचा मेन्यू निमंत्रणपत्रिकेत जरुर कळवावा."
--
त्यावर सशलने तयार केलेली ही निमंत्रणपत्रिका-
|| श्री अन्नपूर्णा देवी प्रसन्न ||

स. न. वि. वि.

बृहन् पार्ले खाद्यमंडाळाच्या माननीय खाद्यजनहो आणि इतर खाद्येच्छूक जनहो, आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की लवकरच एक अखिल हितगुज खाद्य सम्मेलन आयोजित करण्याचे योजिले आहे.
आपल्या मंडळाचे शुध्दखाद्यपान प्रमुख चाफ़ा ह्यांनी 'जातीने' केलेल्या परिसंवादात्मक चर्चासत्राच्या मागणीतूनच आम्हाला या अखिल हितगुज खाद्य सम्मेलनाची कल्पना सुचली. या संम्मेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगीबेअर ह्यांनी हे आमंत्रण स्वीकारावे अशी मी त्यांना विनंतीवजा धमकी देते.

तर अशा या खाद्यपरंपेच्या समृध्द भरभराटीस खाद्य ठरू शकेल अशा या संम्मेलनाची रुपरेषा खाली देत आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून योगीबेअर उद्घाटना च्या हेतूपुर्तीसाठी breakfast चा मेनू जाहीर करतील. त्यानंतर सशल " खाणे हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच " हा चमचमीत 'एकपात्री' प्रयोग सादर करतील. ह्या कार्यक्रमामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी एक छोटा snack break ठेवून मग त्यानंतर हितगुज वरच्या आद्य खाद्यपरंपरेचा इतिहास आणि आजच्या हितगुज मध्ये करायचे खाद्यबदल ह्याबद्दल चाफ़ा एक खमंग व्याख्यान देतील. हे व्याख्यान आणि त्यानंतर होणारा प्रश्नोत्तरांचा V&C ह्यांनी वातावरण बरेच तप्त होण्याची शक्यता लक्षात घेऊन अधून मधून थंड किंवा शीत आणि अगदीच कुणाचा आग्रह असल्यास रंगीत पेये पुरवली जातील. त्यानंतर अर्थातच जेवणाचा चविष्ट आणि खुमासदार कार्यक्रम होईल. जेवणानंतरचा थोडा वेळ शक्तीवर्धक डुलकी साठी राखून ठेवण्यात आला आहे. पुढच्या कार्यक्रमांचा अस्वाद घेण्याची शक्ती आमंत्रितांना मिळाली की लगेच समि ह्यांचा " खाऊन आणि टाईपून मीही दमले, सेक्रेटरी कधी रे येशील तू " ह्या मधूर आणि रसाळ आळवणीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर वेळ असेल चहापानाची. पुढचा कार्यक्रमाचा भार सांभाळतील ट्युलिप आणि अमेय, अनुक्रमे " रूचिरा नंतर काय? " आणि " सख्खे खाद्यशेजारी " सादर करून. सगळ्यांत शेवटी लालू ह्यांचे झणझणीत भाषण आणि स्वाती ह्यांचे चटपटीत काव्यवाचन होऊन सम्मेलनाचा समारोप होईल.

तर अशा या समाधानाचा / ची तृप्त ढेकर द्यायला लावणार्या बहारदार संम्मेलनाला आपण सर्वांनी 'जातीने' अगत्य खाण्याचे नव्हे येण्याचे करावे ही विनंती.

आपलेच,
पार्ले खाद्यमंडळ.

वि. सू. : प्रत्येकाला इच्छाभोजन करता यावे यासाठी मुद्दामच कसलाही मेनू ठरवलेला नाहि. प्रत्येकाने स्वतःला हवे ते, खाल्ले असेल ते, खावेसे वाटणारे ते सर्व खावे.

ता. क. वरील रुपरेषेत एका महत्वाच्या कार्यक्रमाची नोंद राहून गेली त्याबद्दल मंडळ आपली सखेद माफ़ी मागत आहे. वर नमूद केलेल्या पूर्वनियोजीत कार्यक्रमांच्या अधून मधून उपास ह्यांचे " करंजी असो वा सूतरफ़ेणी, तूच माझी राणी " हा सुमधूर गीतगायनाचा कार्यक्रम होईल.
--

एखाद्या दिवशी मेन्यूची चर्चा न होण्याचे कारण म्हणजे या सुमारास कदाचित पार्ल्यात 'साहित्या'बद्दल बोलणे सुरु झाले असावे. मेधा(शोनू) चा यामागे हात आहे असा माझ्या संशय आहे. ट्युलिप, बाई त्यात भाग घ्यायच्या. एकदा तर 'पार्ले (खा)' आणि 'पार्ले (सा)' अशी विभागणी करा म्हणण्यापर्यंत वेळ आली होती. यापूर्वीही काहीतरी 'साहित्य' वाचणारे/कळणारे(?) लोक पार्ल्यात नव्हते असे नाही.(पण त्यावर पार्ल्यात चर्चा होत नसे.) ओळीने चार 'मुसं' पार्ल्याने दिले ते उगाच नाही! बाकीच्यांनी हे होऊच कसे दिले हा प्रश्न येऊ शकतो. पण २००६ च्या दिवाळी अंकापासून 'मुसं' सुरु झाल्यावर मी, चाफा, मेधा(शोनू) आणि बाई (स्वाती_आंबोळे) असे ओळीने चार मुसं पार्ल्याचे होते. पण 'मुसं' जबाबदारी स्वीकारली आहे असे जाहीरपणे प्रशासनाने शोनूच्या वेळेपासून सांगायला सुरुवात केली त्यामुळे आधीचे दोन लोकांना माहीत/लक्षात नाहीत. Wink पुन्हा बाईंना काही लोक एन्जेच्या मानतात (पण त्या पार्लेकरच आहेत).

मग पार्ल्यात खाणे सोडून दुसर्‍या चर्चा होत नसत का? तर, होत असत. सिनेमा, गाणी, टीव्ही शोज, राजकारण ज्या त्या वेळच्या "चालू घडामोडी" यावर गप्पा होत. मायबोलीवरच्या चालू घडामोडीही यातून सुटल्या नाहीत. याला मुख्य कारण 'विषयाला धरुन बोला' हे धोरण होते. एखाद्या विषयावरच्या चर्चेसाठी बाफ निघाला आणि कोणाला टवाळी करण्याची इच्छा झाली आणि तिथे असे पोस्ट आले की बाफ वळण बदलून भलतीकडेच जाई आणि मूळ विषय बाजूला रहात असे. अश्यावेळी बाफ उघडणार्‍याला खरोखर गंभीर चर्चा करायची असेल, माहिती हवी असेल तर तो उद्देश पूर्ण व्हायचा नाही. मग तक्रारी, मॉडरेटर्सची साफसफाई इ. गोष्टी होत. हे सगळं टाळण्यासाठी कोणाला काही वाचून विनोद करण्याची लहर आलीच तर त्या धाग्याची/पोस्ट्ची लिंक देऊन (पूर्वी आकडे नव्हते, आणि ठराविक पोस्ट्ची लिन्क देता येत असे.) "हलकीफुलकी चर्चा" पार्ल्यात होत असे. याने दोन्ही गोष्टी साध्य होत.

हा झाला पार्ल्याचा इतिहास. माझ्या नजरेतून आजचे पार्ले कसे आहे? तर मूळ पार्ल्यातल्या मुख्य गोष्टी अजूनही चालू आहेत. नावाबद्दल एवढी चर्चा होऊनही नवीन मायबोलीत पार्ल्याचे नाव आधी नुसतेच 'पार्ले' होते मग वेगळा ग्रूप झाल्यानंतर ते 'पार्ल्यातल्या गप्पा' असे झाले. आत्तापर्यंत येऊन गेलेल्या आयडीजच्या नावांपेक्षा अनेsssक नवीन नावे आज पार्ल्यात दिसतात. व्यक्ती आणि प्रकृतींनुसार पार्ल्यात थोडाफार बदल झाला असेल. पण अलिकडे बरेच समज-गैरसमज ऐकायला मिळतात. त्यासाठी ही पुढची उठाठेव-

वॉशिंग्टन पोस्टमध्ये रविवारी 'आउट्लुक' सेक्शनमध्ये एक सदर येते. Five Myths About..या नावाचे. aiming to dismantle myths, clarify common misconceptions and make you think again about what you thought you already knew. (यावेळचा विषय आहे ओसामा.) तर या धर्तीवर आपण पार्ल्याबद्दल असलेले काही myths पाहू. याहून वेगळे/अधिक असू शकतील पण हे मुख्यतः जे वाटतात ते-

१. पार्ल्यात मुंबईच्या 'पार्ले' या उपनगरात रहाणारे लोक येतात.

येणार्‍या पार्लेकरांपैकी कोणीही सध्या पार्ल्यात रहात नाही. मूळचे पार्लेकर असलेले काही १-२ लोक सोडल्यास कोणाचाही पार्ल्याशी संबंध नाही. तिथे येणारे बहुतांशी लोक अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर रहातात. कामानिमित्त computer समोर बसण्याच्या त्यांच्या वेळा जुळतात. काही चुकीच्या किनार्‍यावरचे लोक येतात ते ३ तास उशीरा येतात आणि पूर्वेकडचे लोक गेले तरी असतात. काही पूर्वेकडचे लोक बघेल तेव्हा असतातच. या दोन्ही लोकांच्या वेळेत जागे राहू शकणारे भारतातील व क्वचित इतर देशातील लोक तिथे येतात. अर्थातच हे अॅक्टिव्ह सदस्यांबद्दल म्हटले आहे. २७४ ग्रूप सदस्यांपैकी किती लोक खर्‍या पार्ल्यात असतात माहीत नाही.

२. पार्ल्यातील सदस्य बाकी लोकांना पार्ल्यात येऊ देत नाहीत.

पार्ले कसे सर्वसमावेशक आणि सहिष्णू आहे ते तुम्ही वर वाचलेच आहे. ते नवीन लोकांना येऊ देत नसते तर आज जी अनेक नवीन नावे तिथे दिसतात ती कुठून आली? पार्ल्याला Forbidden city म्हटलंय ते या कारणासाठी की तो एकमेव 'माझ्या गावात' मधला गावाचा बाफ आहे जो 'फक्त ग्रूप सदस्यांपुरता' आहे. 'त्यांच्यातलेच व्हा आणि पार्ल्यात जा' असा संदेश प्रशासनाला त्यातून द्यायचा असेल Light 1 म्हणजे 'त्यांच्यातलेच एक झालात तर तुमचे स्वागतच होईल' या अर्थाने. यायचा मार्ग तर मोकळा आहे मग पुढे संहिता पाळून आल्याबरोबर मेन्यू टाकलात तर सशल चहाही आणून देईल किंवा कोणीतरी तिला "आण" म्हणून सांगेल तरी! तिथे प्रवाहाबरोबर जावे लागते. डीजे पंजाबी लग्नांच्या गंमती सांगत असताना कोणी 'मला चेकॉव्हची पुस्तके सुचवा' विचारत आले तर कोण लक्ष देईल (टण्याशिवाय)?

पूर्वी 'सहकारनगर' नावाचा एक धागा होता, म्हणजे अजूनही आहे. फक्त पूर्वीइतकी वर्दळ आता तिथे नसते. पूर्वी तिथे तरुण, संसार सुरु केलेल्या, नवीनच परदेशात आलेल्या मुली येत. त्या एकमेकींना 'सख्यांनोsss' अशी हाक मारत. तेव्हा आम्ही पार्लेकर या सर्वांना (आणि या प्रकारच्या सर्वांना) 'सख्या' म्हणत असू. त्या आम्हाला टवाळ समजत. क्रांतीनंतर तिथे वर्दळ कमी झाली, आता तर त्यातल्याच काहीजणी बस्के, prady, सावनी, संपदा (मृ सुद्धा एकेकाळी नगरात असायची) आता पार्ल्यात येतात. आणि 'सहकारनगर' चालू असता तर तिथे अगदी फिट्ट बसली असती अशी 'प्रज्ञा९' पार्ल्यातच असते आणि परवा तिने पार्ल्याक्कांना 'सख्यांनोsss' अशी हाक मारली. पार्ल्याच्या मनमिळावूपणाचे आणि सर्व संस्कृतींना आपलेसे करण्याचे याहून उत्तम उदाहरण कय असू शकते?

३. पार्ले हा एक कंपू आहे

पार्ले हा एक कंपू नसून पार्ल्यात अनेक दृश्य-अदृश्य कंपू आहेत. तेही कायमस्वरुपी नाहीत, विषयानुसार बदलतात. आमिर खान कंपू(मी, सशल), नऊवारी हेट क्लब(मी, सायो), बिरडे कंपू(मी, आर्च. इथे मृ ला घेतले असते पण ती बिरड्यात टोमॅटो घालते त्यामुळे ती नाही). 'ल' कारांती ब्रेकफास्ट कंपू(मी, बाई. विरुद्ध कंपू मृ.)

४. कोणता बाफ बंद करायचा, कोणाला कश्या प्रतिक्रिया द्यायच्या हे पार्ल्यात आधी ठरवले जाते.

असे करता येत असते तर फार बरे झाले असते. पण नाही. बंद करायची थोडीफार पॉवर झक्कींना आहे, पण ते पार्ल्यात येत नाहीत. आणि एवढी ठरवाठरवी करायला वेळ कोणाकडे आहे? माझ्याकडे तरी नाही. ठरवून एकाच प्रकारची प्रतिक्रिया द्यायची तर सगळे एकाच बाजूला (कंपूत) तरी पाहिजेत ना आधी! पार्ल्यातले लोक म्हणजे काय एकाच व्यक्तीचे डु आय आहेत का, की सगळेजण कुठेतरी एका कथेवर जाऊन 'छान'च म्हणतील?

५. पार्ल्याचे काही खरे नाही... Proud

अलिकडे अशांतता माजवायला काही असंतुष्ट जीव येतात. मग येईनासे होतात किंवा शांत होतात. त्यांना त्या दिवशी 'दिवस वाईट चाललाय, बॉस रागावला, गाडी ठोकली/चुकली, भाजी करपली, द्राक्षे आंबट' अशी काहीही कारणे पार्ल्यात येऊन पार्ल्यावर तणतण करायला पुरत असावीत असे वाटते. पार्ले वहातच रहाते..

अलिकडेच योगीबेअरचे पाय पुन्हा पार्ल्याला लागले. 'सुबहका भूला' समजून सर्वांनी त्याचे स्वागत केले. पार्ल्याचे भविष्य उज्ज्वल आहे.

मी पार्ल्यात का जाते? तो माझा विरंगुळा आहे. फारसा विचार न करता, टाईमपास म्हणून, कामातून ब्रेक म्हणून पार्ल्यात डोकावून काही लिहिले की बरे वाटते. तिथल्या माझ्या पोस्टबद्दल खुलासे मागितलेले मला आवडत नाही, आणि द्यायलाही आवडत नाही. वेळोवेळी मिळणारे आकडे आणि लिन्कांमधून वेळ मिळाला की काय (इन्टरेश्टिन्ग) वाचायचे ते कळते. पूर्वीपासून येणारे काही लोक अजूनही तिथे येतात. कित्येकदा मला न आवडणारा, कंटाळवाणा विषय चाललेला असतो. तेव्हा वाट पहायची. अगदीच थांबले नाही तर हळूच जाऊन विषय बदलायचा मग तुमच्यासारखेच कंटाळलेले जे रोमात असतात, ते येतात. Wink हे बोअर (की बोर, जे काय असेल ते) करणारे लोक नेहमी तेच असतील असे नाही, प्रत्येकजण कधी ना कधी बोअर करतो. Proud अपवाद सशल आणि हहचा. हल्ली तिथे बरेचदा लेकुरवाळ्या गप्पा चालतात. मला फार कंटाळा येतो, पण सांगणार कोणाला? जिव्हाळ्याचा विषय.. चेष्टाही करता येत नाही. हे म्हणजे तोंड दाबून.. एक पार्ले (ले) सुरु करावे की काय असे वाटते.

पार्ल्यातले सगळे माझे मित्र-मैत्रीण आहेत का? नाही. सर्वांशी माझे चांगले पटते का? नाही. पण गप्पा मारायला म्हणून माझ्यासारखेच काही इतरही तिथे येतात. मायबोलीवरच्या बाकी गंभीर, जडशीळ चर्चा वाचल्यावर जरा हलकेफुलके(टवाळ) बरे वाटते. मग बाकी गोष्टी चालून जातात..

खूपदा परिपक्वतेने(?) वावरावे लागते
येउनी पार्ल्यामध्ये उंडारते मी शेवटी Happy
ते जसे आहे तसे स्वीकारते मी शेवटी..

तुम्हीही येऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता. पार्ल्याचा पत्ता (आकडा) आहे १६१४.

यानंतर आता उरलंसुरलं (बरंच आहे) ते दशकपूर्तीच्या (२१ मे) सुमारास कल्लोळाहून परतल्यानंतर लिहीन. "मंडळ आभारी आहे!"

प्रकार: 

पार्ल्यात का जातिस ते लिहिलेलं आवडलं. आंतरजालावर वावरताना ते खूप महत्वाचं आहे..
मिथबस्टर्स भारी आहेत Happy

खूप दिवस झाले पार्ले बाफ शोधत होतो. आज तुझ्यामुळं आपसूकच सापडला.. धन्स Proud

पण आधिच्या लेखांएवढी मजा नाही आली हे वाचून..

लालू मस्त मस्त मस्त! लईच नॉस्टॅल्जिक झालं.

आता तुझी दशक्पूर्ती उलटी वाचायला सुरुवात करते Proud

ते रोज काय खाल्ल हे टाकण्याचे आता ऑलमोस्ट बंद झाले आहे, लै कंटाळवान्या पोस्ट. नाहीतरी मी त्या पोस्टचा अनुल्लेख करायचो. Proud

गब्बर फॉर्बिडन गल्लीत या, तिथे चमचमीत, चावट, उद्बोधक, पांचट हे सर्व वाचायला मिळेल.

मायबोलीवर मुख्य धागे भरकटतात आणि 'त्यानिमित्ताने' पार्ल्यात झालेल्या चर्चाच अधिक मुद्देसूद आणि उद्बोधक होतात असा माझा तरी अनुभव आहे. (हवं तर केजोला विचारा. फिदीफिदी) >>> हो. तिथे अतिप्रेमळ लोकं येऊन एकाच जागी सुई अडकल्यासारखे भांडण चालू करत नाहीत.

>>मजा नाही आली
मनीष, मजा इथे नाही. पार्ल्यात आहे. Proud

लेख माझ्या दृष्टीकोनातून आहे. ज्यांना इतर "मजा" दिसते त्यांनी ती लिहावी. Wink

>>रोज काय खाल्ल हे टाकण्याचे आता ऑलमोस्ट बंद झाले आहे
कोणी सांगितले? Proud

तिथे अतिप्रेमळ लोकं येऊन एकाच जागी सुई अडकल्यासारखे भांडण चालू करत नाहीत.
<<<< केदार, कसली उपमा वापरलीस. डोळ्यापुढं आलं अगदी. Rofl

ओळीने चार 'मुसं' पार्ल्याने दिले ते उगाच नाही! बाकीच्यांनी हे होऊच कसे दिले हा प्रश्न येऊ शकतो. >> कंपूबाजीचा यापेक्षा जास्त चांगला पुरावा कुठला Proud
असामी पण पार्लेकरच , तो ही संपादक होता ना ?

मस्त लिहिलंयस!

स्वातीला अनुमोदन .

ला पि, व्यासंगी तलवारी, ज्येना, फळी भगिनी या पार्ल्यात जेनेसिस असलेल्या शब्दांचा अनुल्लेख का बरं ?

असामी पण पार्लेकरच , तो ही संपादक होता ना ?>>मी संपादक आधी होतो, पार्लेकर नंतर झालो Happy

लालूने लिहिलाय ह्याचा विश्वास बसत नाहि, शीर्षक वगळता Lol

अय्या!! माझा उल्लेख! आवडलाच! Proud

आता सहकारनगरात डोकावून बघायला पाहिजे!
पुढचा भाग लवकर येऊदेत. वाट बघतेय. Happy

" असे उल्लेख आहेत तसे यात "तेव्हापासून त्याच्याशी/तिच्याशी माझी दुष्मनी झाली..." असे काही वाचायला मिळण्याची अपेक्षा होती
<<< बरोबर ह.ह.. काहींची साक्षीदार पण आहे मी Proud
तरी आवडला हा पण भाग, मिथ आणि फॅक्ट्स जबरीच Happy

मस्त! मस्त!!

पण लेख किंचित प्रेमळ झाल्यामुळे फॉरबिडनसिटीतल्या 'फॉरबिडन'चा फ्लेवर आला नाही. Proud

बाय द वे, मातोश्री बिरड्यात टामाटू घालतात म्हणून मी पण. तुमच्या कंपूत मी नको असेन तुम्हाला तर तसं सांगा, पण म्हणून हे फुसकं टोमॅटोचं कारण काही पटलं नाही. Proud

लालू मस्त मस्त मस्त! लईच नॉस्टॅल्जिक झालं.
आता तुझी दशक्पूर्ती उलटी वाचायला सुरुवात करते >>>

हे मी दशक्पुर्ती(ची) उलटी असे चुकुन वाचले... मग वाटले इतके मेन्य वाचुन वाचुन एखाद्याला पार्ल्यावर आली नाही उलटी तरच नवल.

पण हा लेख जाम मिळमिळीत .. रच्याकने लालुचा आयडी हॅक झाला आहे का? लालू म्हणुन आजकाल सानी तर लिहित नाही ना ? Light 1

पर्ल्याला विशिष्ठ शहराचे पाणि लागले आहे असे ऐकुन होतो .. पण ते विशीष्ठ शहर एन.जे असेल असे वाटले नव्हते. Happy

मी हे 'मळमळतं' असे चुकून वाचले.

>> अशी चूक होण्यास कारणही आहे सबळ .. आधीच्याच वाक्यात "उलटी" ह्या शारिरीक वेदनेबद्दलची नोंद वाचून अशी चूक होण्याची शक्यता जास्त आणि रास्त आहे .. Happy

अगदी अगदी पण अधीचे उलटिचे वाक्य आद्य म्हणतात तशा पर्लेकरणिचे(च) आहे हो सशल Happy पण मला नवल वाटते पार्लेकरांना आपल्या चुकांसाठी सबळ कारणे द्यायची गरज कधी पासून वाटू लागली.? आणि त्याहून महदाश्चर्य पार्लेकर चुका कधी पासून करू लागले Happy

पेशवे, तुम्ही पार्ल्याचे सदस्यत्व घेतलेले नाही. तेव्हा जरुर घ्या. आपले स्वागत आहे. मेन्यू वाचून काय वाटते ते प्रत्यक्षच अनुभवा. Happy एकदा तिथे आलात की असे प्रश्न पडणार नाहीत. Happy

स्वागता साठी धन्यवाद लालू. पण पर्ल्यावर तुम्ही असामीला सहन करताय ते पुरे नाही का? या अधी अम्ही एकत्र आलो तेंव्हा "त्या वळणावरचे" दळण घातले होते पुन्हा आलो तर पर्ल्याचे नामांतर करून "गिरणी" किंवा "फोरबिडन गिरणी" करावे लागेल... तेंव्हा नकोच तो लोभ Happy

ह्यावर नीधप नावचे पार्लेकर कर्णपिशाच्च "जया घातलिस शेपुट" असे माझ्य कानशी म्हणेलच Happy

पेशवा, भारी टिकल्या देतोस बुवा तू .. पण,

>> पण मला नवल वाटते पार्लेकरांना आपल्या चुकांसाठी सबळ कारणे द्यायची गरज कधी पासून वाटू लागली.? >>>

हा गैरसमज दूर व्हावा ह्याचसाठी हा पोस्टप्रपंच .. पार्लेकर चुका करतच नाहीत आणि त्यातूनही झाल्याच तर प्रामाणिकपणे कबूल करतात .. पार्ल्याविषयी आडून आडून टिका करणार्‍यांत (तू आताच पहिल्यांदा उघडपणे बोललास, आडून आडून टिका करणारे आहेत बरेच .. :)) आणि तुम्ही समजता तसे असणार्‍या पार्लेकरांत काय फरक? Happy

हा गैरसमज दूर व्हावा ह्याचसाठी हा पोस्टप्रपंच >> एका गैरसमजाने दुसरा गैरसमज जाऊ शकतो का? ह्या वर एक नवा बीबी काढायला हवा.

बाकी पार्ल्यावर आडुन आडुन टिका होते वैगेरे ही इन्सिकुरिटि समजायचि का जु.जा. पर्लेकरांची ? आणि मी पार्ल्यावर टिका करतोय असा तुझा का समज झाला ?

झक्किंचा विशिष्ठ शहर जसा स्ट्रॉ मॅन आहे तसच बर्‍याच लोकांचा पर्ले आहे. तेंव्हा आता पार्ले धर्माला जागून एक थंड पेयाची रेसीपी टाक

(तुला ह्यात "लागतील" अशा टिकल्या टाकून घे गो )

बरं मग आता मी हेमाशेपो म्हणते नी गप्प बसते .. कारण उत्तर दिलं तर ते 'इन्सिक्युरिटी' असं क्लासीफाय होईल ..

>> झक्किंचा विशिष्ठ शहर जसा स्ट्रॉ मॅन आहे तसच बर्‍याच लोकांचा पर्ले आहे.

>>> ह्यातच काय ते आलं .. Happy

पण काही म्हणा, त्या विशिष्ठ शहराच्या एक दशांश सुद्धा सर पार्ल्याला, पार्लेकरांना येणार नाही!
असे आपले मला वाटते हो! नसेल तुम्हाला वाटत तर गेलात उडत!
Light 1

ही माझी खाजगी जागा आहे. इथे दुसरेच लोक एकमेकांशी भांडत आहेत, हे चालणार नाही. माझ्याशी भांडलात तर चालेल.
धन्यवाद.

Pages