(डिस्क्लेमरः ज्यांची मुले अगदी लहान आहेत आणि रोज रात्री आSSई गोष्ट असा तगादा लावतात त्यांनीच वाचण्याचे धाडस करावे :P)
चिंटू पिंटूला नेहमीच बाहेरच्या जगात डोकवून बघायचा मोह होत असतो. सध्या त्याच्या अजेंडावर सानुचं अभ्यासाचं टेबल असतं. पण आई कध्धी कध्धीच त्यांना बाहेर पाठवत नसते. काय तर म्हणे ही माणसं तुम्हाला काठीने धोपटतील नाहीतर काहीतरी खायला देऊन मारुन टाकतील.
"ह्या काहीतरीच बॉ आईचे एकेक तर्क..." चिंटू पिंटूला म्हणतो आणि पिंटूही त्याचीच री ओढतो.
"चिंटूऽऽ आज जायचं का रे आपण तिथे?"
"नऽको रे बाबा, आज आई बाबा दोघपण आहेत घरी. दोघे मिळून ठोकतील आपल्याला"
"उद्या जाऊयात?"
"डन! उद्या बाबा चाललाय शेतावरच्या जत्रेला. तो येणार रात्री उशिरा. आई असेल कामात. उद्याच जाऊयात"
"होऽऽ पण मी इशारा केला रे केला की तय्यार रहा. गेऽट सेऽऽट गोऽऽऽ म्हंटल रे म्हंटलं की सुस्साट सुटायचं. कळ्ळ?"
"हॉ कळ्ळ!"
पिंटू त्याला चिडवतो आणि नेहमी सारखीच दोघांची मारामारी जुंपते पण आतून आईचा "काय चाल्लय रे?" असा आवाज येतो आणि दोघेही गुपचुप टिव्ही वर "वुई आर प्राऊड ऑफ यु - जेरी" नावाची डॉक्युमेंटरी बघायला लागतात. पण नजरेने "उद्याचं नक्की हाऽऽ" असं हळु आवाजात "चिं चिं" करत पक्क करतात.
सकाळ होते. नेहमीपेक्षा लवकरच चिंटू पिंटूला जाग येते. अजून बाहेर अंधारलेलच असतं. बाबा जत्रेला जायची तयारी करत असतो. जत्रेहुन येताना काय काय खाऊ मिळणार ह्याची कितव्यांदा तरी उजळणी चाललेली असते. "मग दहा दिवस तरी ह्या घराबाहेर पडून त्या मांजरांच्या राज्यातून अन्न शोधत जायला नको" हे पण आधीच ९९ वेळा ऐकवून झालेलं पुन्हा एकदा १०० व्या वेळेला ऐकवून होतं.
आईचं सुद्धा बाबांना त्याच त्याच सुचना, काळजी घ्या चे सल्ले देणं चाललेलं असतं. चिंटू पिंटूला मात्र बाबांचा रागच् येत् असतो.
"कित्ती वेळ् आवतायत् बाबा आज्" चिंटू त्याची तक्रार् हळू आवाजात् पिंटूपाशी नोंदवतो.
"हुश्श! बाबा निघाला एकदाचा" चिंटू पिंटूला ऐकवतो.
"श्शुऽऽऽ! हळु बोल आईने ऐकलं वाक्य तर धपाटा मिळेल." चिंटूला टपली मारायची संधी साधत पिंटू म्हणतो.
"चिंटूऽ पिंऽटूऽऽ, इकडे या. हे बघा आज मला भरपूर काम आहे. शहाण्या उंदरासारखे वागा हं आज. पटकन खाऊन घ्या आणि अभ्यासाला बसा. तोपर्यंत मी घरातली कामं संपवते. तुमचा बाबा जत्रेतून बेगमीचा खाऊ घेऊन आला तर साठवणीला जागा नको का तयार ठेवायला?"
आई असं म्हणते आणि त्या दोघांना एक एक चीजचा तुकडा देऊन तिच्या कामाला लागते. तिच संधी साधून चिंटू पिंटू "गेट सेट गोऽऽऽ" म्हणून जे सुंबाल्या ठोकतात ते थेट टेबला पाशीच येऊन थांबतात.
मोठ मोठ्याने श्वास घेत दम खात कोणी येतय का तिकडे ह्याचा कानोसा घेतात. पण सानु नेमकी गेलेली असते अंघोळीला, त्या टेबलावर अर्धवट झालेल्या अभ्यासाचा पुर्ण पसारा तसाच टाकून. नेहमीच्या अंदाजाने ती आता अर्धातास तरी बाहेर येणार नसते म्हणून त्यांना फारशी धास्ती नसते कोणी पकडण्याची. म्हणून मग ते "जय जेरी की" म्हणत टेबल ट्रेकची सुरुवात करतात.
वरती चढतात सर्रसर सर पण मग वर चढल्यावर त्या टेबलावरुन खाली बघताना मात्र चिंटूला चक्करच आल्यासारखी वाटते. पिंटू पटकन पकडतो म्हणून बरं. मग जोडगोळी त्या टेबलावर एकमेकांना सांभाळत पकडापकडी खेळते. त्यांच्या पांघरुणापेक्षा आकाराने कित्येक पट मोठ्या असलेल्या कागदाच्या सुरनळीच्या बोगद्यातून लपाछपी पण खेळून होते.
दमलेला चिंटू मग एका जागी हाश्श हुश्श करत "टाइम प्लीज" म्हणत बसतो. त्याच्या बाजुला टेकता टेकता पिंटूचं लक्ष जातं एका आधी कधीही न पाहिलेल्या गोष्टीकडे. बाहेरून गोल आणि आरशा सारख्या दिसणाऱ्या त्या गोष्टीला धरायला एक दांडा असतो.
पिंटूचं कुतुहल वाढतं. तो चिंटूलाही ती वस्तू दाखवतो.
चिंटू म्हणतो "हा तर आरसाच असणार पिंट्या"
"तुला आठावतं गेल्या वेळी आपण इथे आलेलो तेव्हा तू तो मोठावाला आरश्यात् बघून कसला समोर् कोणी आपल्याच् सारखा आहे समजून् हाका मारत सुटलेलास?" पिंटूला चिडवायची संधी साधत चिंटू म्हणतो.
"ऍऽहॅऽऽ रे, तुलापण आधी असच वाटलेलं हॅ. आईने सांगितलं तेव्हा कळ्ळ तुलाही की तो आरसा आहे ते" पिंटूने लग्गेच स्वत:ची बाजू सावरुन घेत म्हंटलं.
"चिंट्या, हा पण आरसाच असेल काय?"
"चल बघुयात"
जोडगोळी निघते तो आरसा उचलायच्या कामगिरीवर. कसा बसा जोर लावून ते दोघे तो आरसा उचलतात आणि त्या मोठाल्या वहीच्या गठ्ठ्याला टेकवून ठेवतात.
"वहीवर चढून बघता येईल बघ चिंटू" पिंटू ओरडतो.
"पण वहीच्या गठ्ठ्यावर तरी कसं चढायचं रे पिंट्या?" चिंटू काळजीने विचारतो.
"चल तू माझ्या पाठीवर चढ आणि मग मार उडी त्या गठ्ठ्यावर. आईने लपवून ठेवलेलं चीज काढताना कसं करतो आपण तस्सच.." पिंट्या त्याच्या मते उपाय योजतो त्या समस्येवर
"पिंट्या द ग्रेट लाईक जेरी द हिरो" टाळ्या पिटत चिंट्या त्याला शाब्बासकी देतो.
पिंट्याच्या पाठीवरुन चिंट्या तिथे उडी मारतो आणि त्या आरश्यात बघतो तर काय? त्याला त्याचा चेहराच दिसत नाही. तेव्हढ्यात त्याला एकदम राक्षसी चेहरा समोर आलेला दिसतो. तसा तो घाबरतो नी उडी मारुन धुम्म पळत सुटतो. पळता पळता पिंट्यालाही आपल्या बरोबर ओढत पळायला लावतो. पिंट्याला काही कळतच नाही.तो बिचारा चिंट्याच्या पाठोपाठ पळायचं काम करतो. घरात येऊन बसल्यावर सुद्धा चिंट्याची धडधड कमी झालेली नसते. तेव्हढ्यात कामं आटपून आई येते. आईला बिलगून चिंट्या "राक्षस बघितला" असं म्हणून रडायलाच लागतो.
"कधी? कुठे?" आई विचारते पण पिंट्या फक्त "काय माहित" असं खांदे उडवून म्हणतो.
चिंट्याला कुशीत घेऊन आई थोपटते तेव्हा कुठे तो शांतं होतो. शांत झाल्यावर "राक्षस बघितल्याची गोष्ट" अथ पासून इती पर्यंत तो आईला ऐकवतो.
"हात्तीच्या येव्हढच ना!" म्हणत आई हसत सुटते आणि त्यांना मॅग्नीफाईंग लेन्सची माहिती माऊससायक्लोपेडीयातून वाचून दाखवते.
आता ह्यापुढे चिंट्याने "आरशाच्या किश्श्यावरुन चिडवलं" की पिंट्या त्याला "राक्षसाच्या गोष्टीची" आठवण देऊन फिट्टंफाट करायचं मनाशी ठरवून टाकतो.
---------------------------
"ईऽऽऽऽऽ आईऽऽऽऽऽऽऽऽऽ!" स्वत्:चं आवरुन अभ्यासाच्या टेबलपाशी येताना सानु, उंदीरमामाच्या दोन पिल्लांना तिच्या मॅग्निफाईंग लेन्सशी खेळताना बघून घाबरुन ओरडत पळत जाऊन आईला बिलगते.
कवे मस्त आहे गोष्ट (पण मी
कवे मस्त आहे गोष्ट
(पण मी वेगळ्या कारणाने धाडस केलय वाचायच :फिदी:)
कवे आवडली.. डिस्क्लेमरः
कवे आवडली..

डिस्क्लेमरः
कवे, गोष्ट छान आहे! पण घरात
कवे, गोष्ट छान आहे! पण घरात सध्या सांगता येणार नाही कारण आजच 'घरात फिरणारे उंदीर माझे पेट आहेत. त्यांना मारु नका!' असा मोठ्ठा भोंगा वाजवुन झालाय!
मस्तय..अवडली
मस्तय..अवडली
धन्स लोक्स वत्सला तू एडीट
धन्स लोक्स
वत्सला तू एडीट करुन सांग आणि एडीटलेल मलाही सांग
मला जनरली गोष्टीत 10 कॅरेक्टर (ते ही ठरलेले) असले पाहिजेत अशी standing instruction असते