फलश्रुती भाग ३ - केळे

Submitted by दिनेश. on 4 May, 2011 - 01:39

मामाची बायको सुगरण,
रोज रोज पोळी शिकरण..

माझ्या वयातील बहुतेक मूलांचा लहानपणीचा आवडता प्रकार म्हणजे शिकरण. शाळेतून आल्यावर
किंवा शाळेत जाताना. संध्याकाळी मधेच भूक लागली कि, भाजी तिखट असली, नावडती असली
वा झालेली नसली, कि शिकरण चपाती पुढे ठेवली जायची.

घरात केळी असायचीच. त्यापैकी एखादे कुस्करुन त्यात दूध साखर घातले कि झाले, शिकरण तयार. केळी बारा महिने उपलब्ध असायची, घरोघरी ती असायची देखील. खरे तर बाकी फळे सामान्य लोकांच्या आवाक्यातली क्वचितच असायची, पण केळी मात्र प्रत्येकाला परवडायची.
अगदी डझनानी नाही तर नगावर ती विकत घेता यायची आणि दोन तीन केळी खाउन अनेक कामगारांचे दुपारचे जेवण भागायचे. मुंबईची केळेवाली, हि त्यानेच तर फ़ेमस झाली.

मी या मालिकेत केळ्याचा समावेश केलाय खरा, पण एक तांत्रिक अडचण आहे. कारण केळे हे तांत्रिकदृष्ट्या फळ नाही कारण त्याचे झाड, हे ही तांत्रिकदृष्ट्या झाड नाही.
थोड्या सोप्या शब्दात सांगायचे तर केळीच्या झाडाची गणना, हर्ब या प्रकारात होते. याचे कुळ म्हणजे, आले, हळदीचे. पण या वर्गात भरभक्कम "खोड" असणारा हा एकमेव वाण.

केळ्याचे झाड तसे सर्वांच्या परिचयाचेच. जमिनीखाली असलेल्या गड्ड्यातून हे झाड उगवते
याचा हिरवागार आणि पुष्ट बुंधा खूप मजबूत दिसतो. पण तो म्हणजे आतील पांढर्‍या गाभ्यावर असलेला अनेक आवरणांचा थर असतो. ही आवरणे तंतूमय असतात.
या बुंध्यातून सभोवार पाने तयार होतात. पानांच्या मधोमध तंतूमय तरीही मजबूत असलेला दांडा असतो. पान आठ ते दहा फूट देखील लांब होऊ शकते. पण तरीही ते संयुक्त पान नसून एकसंध असते.

यथावकाश, त्याच्या मधल्या भागातून किरमिजी रंगाचे केळफ़ूल बाहेर पडून जमिनीच्या दिशेने वाढू लागते. (काही जंगली प्रकारात, केळफ़ूल वरच्या दिशेनेही वाढते. असा वाण मी प्रत्यक्ष बघितलेला आहे. पण विकिपिडियावर सर्वच केळी अशी वरच्या दिशेने वाढतात, असा चुकिचा उल्लेख आहे. )

या केळफूलाची एकेक फणी उकलत जाते व आतील पांढरी फूले दिसू लागतात. अश्या काही
फण्या उकलल्यानंतर केळफ़ूल नूसतेच खाली घसरू लागते.

त्या फूलांचे परागीवहन पाकोळ्या, खारी वगैरे करतात आणि यथावकास त्यापासून छोटी केळी तयार होतात. एका फ़णीत बारा ते वीस केळी असू शकतात, आणि अशा अनेक फण्यांचा एक घड होतो.पहिल्यांदा केळे हे साधारण त्रिकोणी असते मग ते गोल होत जाते.

बाजारात पाठवण्यासाठी, केळ्यांचा घड या अवस्थेत उतरवला जातो. एकदा घड येऊन गेल्यावर त्या झाडाला दुसरा घड येत नाही, आणि ते झाड मरुन जाते. म्हणून घड काढताना, आधी झाडच तोडले जाते. असे तोडले गेले तरी, जमिनीखालच्या कंदापासून नवीन रोपे उगवतातच.

केळ्याचे अनेक प्रकार आकारावरुन आणि रंगावरुन पडलेले आहेत. पण केळ्याचे दोन मुख्य गट म्हणजे साधी केळी (बनाना) आणी राजेळी केळी (प्लांटेन). या दोघातला मुख्य फरक म्हणजे राजेळी केळी हि शिजवूनच खावी लागतात. त्यातला स्टार्च हा त्याशिवाय पचण्याजोगा नसतो. पण साधी केळी मात्र पिकल्यावर तशीच खाता येतात. प्लांटेनचे झाड काहि वेगळे नसते. तसेच त्याच्याही केलफूलाची भाजी होते.

आपल्याकडे साधारण मिळतात ती हिरव्या सालीची. पण आता पिवळ्या सालीची देखील मिळू लागली आहेत. त्यापेक्षा जरा लहान आकाराची पिवळी मिळतात पण ती चवीला जरा आंबट असतात. आणि त्याहून लहान, ती वेलची केळी. यांची साल फिक्कट पिवळी असते. आणि पातळही असते. आता दुर्मिळ झाली असली तरी वसईची लाल सालीची, लोखंडी केळी पण पुर्वी प्रसिद्ध होती. पुर्वी वसई केळ्यासाठी खुप प्रसिद्ध होते. तिथली माती केळीसाठी अत्यंत पोषक होती. पण अतिबांधकामामूळे त्या बागा आता बर्‍याच कमी झाल्या आहेत.
बाकी जगभरात मात्र, जरा जाड सालीची, पिवळी धम्मक पण देठाकडे हिरवी असलेली, केळीच जास्त लोकप्रिय आहेत.
आपल्याकडे जळगावची केळी देखील प्रसिद्ध आहेत. बाहेरील देशांत चाखलेली पण तरीही अप्रतिम चवीची अशी काही केळी म्हणजे, युगांडातल्या मबाले गावची. तिथे फ़ूटभर लांब केळी मिळतात. आपल्यासारख्याला एक संपवणे कठीण जाते.

केनयाच्या किसुमू गावात पण खास केळी होतात. त्यांना तिथे स्वीट बनाना म्हणतात. अगदी बोटभर आकाराची पण खुपच गोड असतात हि केळी. अगदी आठ दहा देखील सहज खाऊ शकतो आपण एका वेळी. तिथे या केळ्यांपासून बियर करतात.

ओमानमधल्या सलालाह गावात पण उत्तम केळी होतात.

राजेळी केळी आपल्याकडे कमी वापरली जातात. पण गोव्यातली रसबाळी केळी (हि फक्त तिथेच मिळतात) खासच. त्याचा हलवा केला जातो. केरळमधील केळ्यांचे चिप्स, तेसुद्धा खोबरेल तेलातील असले तर, मस्तच.

ही प्लांटेन मध्य आफ़्रिकेत आवडीने खातात. थेट निखार्‍यावर भाजून, तळून वा उकडून खातात. इथल्या बहुतेक तान्ह्या बाळांचा तो पहिला घन आहार असतो.

सध्या आपण जी केळी खातो, त्या बहुतेक सर्व विकसित केलेल्या जाती आहेत. त्यातल्या बिया जवळजवळ नष्टच झाल्या आहेत. त्यामूळे या जातींची लागवड मानवी हस्तक्षेपाशिवाय शक्यच नाही.
निसर्गात मात्र जी केळी आढळतात, त्या फळात मोठ्या बिया असतात, आणि त्यांचा प्रसार बियांमार्फ़तच होतो.
आपल्याकडे सह्याद्रीत चवईची अनेक झाडे पावसाळ्यात उगवतात. याची पाने जरा जाड असतात आणि गरज वाटल्यास पावसापासून संरक्षण देऊ शकतात. याचे केळफूलही मोठे असते पण केळी मात्र आकाराने लहान असतात. ती पिकल्यावर मधुर लागतात. पण ती आपल्या हाती सहजासहजी पडत नाहीत. कारण ती एकतर निसरड्या कड्यांवर उगवलेली असतात आणि माकडांना ती फार आवडतात.
त्यात बिया असतात आणि त्यांचा प्रसार बियांमार्फतच होतो.

केळ्याच्या काही शोभिवंत जाती आता तयार करण्यात आलेल्या आहेत. बंगळुरुच्या लालबागेत, अशी झाडे बघितली होती. मुंबई विमानतळाच्या बाहेरही काही लाल देठ असलेल्या, पानांच्या जाती लावलेल्या आहेत.

केळ्यातील पोषक द्रव्ये.

केळ्यामधे २३ % पिष्टमय पदार्थ आणि २ टक्के प्रथिने असतात. ३ टक्के चोथा असतो.
जीवनस्त्वांपैकी फ़ोलेट, नायसीन, पॅंटोथेनिक ऍसिड, पायरीडॉक्सीन, रिबोफ्लेवीन, थायमीन, ए, ई, सी व के असतात. सोडीयम नगण्य असून पोटॅशियम मात्र भरपूर असते. खनिजांपैकी चुना, तांबे, लोह, जस्त, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फोरस, सेलेनियम यांच्या मात्रा समाधानकारक असतात.

केळे अगदी सूक्ष्म प्रमाणात किरणोत्सार करते. पण ते प्रमाण अजिबात धोकादायक नसते.

या सर्व घटकामूळे पोटभरीचा तरीहि पोषक असा आहार आहे तो. शिवाय केळी हि निसर्गत:च एका खास आवरणात येतात. त्यामूळे स्वच्छतेच्या दृष्टीने पण ती सुरक्षित असतात.

केळ्याची पावडर हि पण फार पोषक असते. अनेक बालान्नात ती वापरतात तसेच केचप्सना दाटपणा येण्यासाठी पण वापरतात.

केळ्याचे पदार्थ.

वर काही उल्लेख आलेले आहेतच. तरीपण यादी आणखी वाढवायची तर, भरली केळी, केळ्याची उंबरे (राजेळी केळी उकडून त्यात सारण भरुन तळलेले.) केळ्याची पुरणपोळी, केळ्याचे बन्स, बनाना केक, कच्च्या केळ्याची भाजी, उकड, काचर्‍या, कापे, पाकातल्या काचर्‍या असे अनेक प्रकार करतात.

अनारसा व मालपुवा करताना पण पिकलेले केळे घालतात, गोडाचे आप्पे करताना पण केळे वापरतात. सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद तर केळ्याशिवाय होऊच शकत नाही.

कच्च्या केळ्याच्या भाजीप्रमाणे, सालाचीही भाजी करतात. केळीच्या मधला गाभा,(सोप) वापरुन पण भाजी करतात. हि भाजी बंगाल आणि कर्नाटक भागात आवडीने खातात.
केळीच्या काल्याचे पाणी वापरुन, पापडाचे पिठ भिजवतात. असे पापड जास्त हलके होतात. केळफूलाची भाजी तर डेलिकसी असते. ती काळजीपूर्वक निवडावी लागते.
केळफ़ूलाचे तूरीची डाळ घालून वडे करतात तसेच भरितही करतात. ही फूले सुकवूनही ठेवता येतात.
केळीच्या गड्ड्यात भरपूर पाणी असते आणि ते तहान भागवण्यासाठी वापरताही येते.
केळीच्या पानाचा थेट खाण्यासाठी नसला तरी इतर खाद्यपदार्थ करताना छान उपयोग होतो. पानगी करण्यासाठी केळीचे पान लागते. मोदकासारखे पदार्थ करताना, केळीचे पान वापरता येते. वडे थापण्यासाठी पण त्याचा छान उपयोग होतो. पानपोळी हा दक्षिणी पदार्थ करायला पण केळीचे पान लागते. त्या पदार्थाला, या पानाचा छान स्वाद येतो.

पुर्वी वसई अर्नाळा भागात, सुकेळी करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालायचा. बांबूच्या खास सांगाड्यावर हि केली रचून वाळवत असत. अशी केळी सुकवताना, त्यातून मधासारखा स्त्राव गळत असे. याच मधात रात्रभर हि केळी बूडवून ठेवत असत. अशी सुकवलेली केळी, चवीला अप्रतिम लागतात. आता ती शोधावी लागतात.

झाडाचे इतर उपयोग.

केळीच्या पानाचा पुर्वापार पत्रावळीसारखा वापर होतो. प्रसाद देण्यासाठी, खास करुन चैत्रातली आंबाडाळ देण्यासाठी केळ्याचे पान वापरले जाते.
पुर्वी भाजलेल्या व्यक्तीला झोपवण्यासाठी व झाकण्यासाठी केळीची पाने वापरत असत.
आपल्याकडे डोंगरावर केळ्याची आणखी एक जात उगवते. त्याला चवई असे म्हणतात. या चवईची पाने जास्त जाड व मजबूत असतात. या पानांचा आदीवासींना पावसापासून संरक्षण करण्यासाठी छान उपयोग होतो.

केळीच्या सालापासून मजबूत धागा निघतो. पालेभाज्या बांधण्यासाठी, गजरे वळण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. केळीच्या ओल्या व सुकलेल्या पानांचाही, पॅकिंग मटेरियल म्हणून छान उपयोग होतो. विड्याची पाने खास करुन केळीच्या पानातच बांधली जातात.
कोकोच्या बिया आंबवण्यासाठी पण केळीची पाने वापरतात.
केळीच्या झाडाचे बाकिचे भाग, गुरांना खाद्य म्हणून देता येतात. केळ्याच्या सालीतही बरेच पोटॅशियम असते, त्यामूळे त्यापासून झाडांना उत्तम खत मिळते.

सांस्कृतिक महत्व

केळीचे झाड हे तसे काही खास निगा न घेता, सांडपाण्यावर पण वाढू शकते, त्यामूळे पुर्वी घरोघर परसदारी केळीचे बन असायचे. केळीपासून निघणारे केळफूल आणि त्याचा मोहक आकार, याचा सबंध सृजनाशी लावण्यात आला आहे.

लग्नादी शुभकार्यात प्रवेशद्वारी दोन लेकुरवाळी केळीची झाडे रोवण्याचा प्रघात आहे. त्यनारायणासारख्या पूजेतही चौरंगाच्या चारी बाजूने, केळीचे लहान खांब रोवतात. मोठ्या केळीच्या खोडापासूनच पुर्वी कोकणात पूजेची सजावट केली जात असे. थर्मोकोल वापरण्यापेक्षा ते कधीही योग्य.

मधुबनी चित्रांमधे, रागमालिकांमधे, शिल्पात, कपड्यावरील भरतकामातही केळीच्या झाडाचे आकार वापरले जातातच.

शिल्पकलेतील स्त्री सौष्ठवाचे जे मानदंड आहेत त्यापैकी पायांसाठी, केळीच्या बुंध्याचा मानदंड वापरला जातो.

(आणखी माहिती येतेय.)

गुलमोहर: 

भाग- २ कुठला होता.मिसला मी.
मस्तच झाला आहे लेख दिनेशदा. बरीच नवीन माहिती कळली.
एका झाडाला एकच केळफूल येते का ?

रुणुझुणू
भाग २ आंबा होता,
हो केळ प्रसवली (हो हाच शब्द वापरतात) कि केळ मरते. याला फांद्या वगैरेही फूटत नाहीत.

अप्रतिम माहीती.
केळफुलाचे वडे छान होतात.

हे झब्बु घ्या
kele1.JPGkele.JPGkele3.JPG

रंगपंचमीच्या रंगामध्ये केळीच्या दांड्याचा रस पिळून घातला की रंग जात नाही असे म्हणतात.
केळीच्या सालीचीही भाजी करतात.

छान माहिती.
केळे हे झाड नाही हे वाचून आश्चर्य वाटले.

कच्च्या केळाचे कबाब उत्तर भारतात आवडीने खाल्ले जातात.

दिनेशदा, त्रिवार सलाम ! अप्रतिम लेख व प्र.चि. !! धन्यवाद.
<< केळीच्या झाडाचे बाकिचे भाग, गुरांना खाद्य म्हणून देता येतात > माझ्या गांवच्या अनुभवावरून, गुरांसाठी तर ती एक 'डेलिकसी'च असावी असं वाटतं !

<< पुर्वी वसई अर्नाळा भागात, सुकेळी करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालायचा >> आमची एक मावशी अर्नाळ्याला रहायची व फणस, आंबापोळी यांच्या तोंडात मारेल असा 'सुकेळी ' हा प्रकार मी चाखला आहे. [ दिनेशदा, कुठून गोळा केलीत ही बारीकसारीक पण महत्वाची माहिती !];

जेम्स मिशेनेरच्या "हवाई" बेटांवरच्या कादंबरीवजा इतिहासग्रंथातल्या संदर्भाची आठवण झाली; समुद्र प्रवासाची संवय नसलेली मिशनर्‍याची पहिली टीम अठराव्या शतकात [?]त्या बेटांवर गलबतातून जात असताना उलट्या होऊन बेजार झालेली असते. अचानक बेटांकडून येणारं मालवहातुकीचं गलबत समोरून येतं व प्रथेप्रमाणे दोन्ही कप्तान भेटवस्तू घेऊन शुभेच्छा व घरच्या/ बेटावरच्या बातम्यांची देवाण घेवाण करायला भेटतात. मिशनर्‍यांची हालत ऐकून बेटाकडून आलेला कप्तान त्याना आदरपूर्वक भेटतो व तिथून आणलेला केळ्यांचा घड त्याना देऊन समुद्रप्रवासात हे फळ खाणं उपयुक्त असल्याचं सांगतो. पण मिशनर्‍यानी प्रथमच केळीं पाहिलेली असतात व त्यामुळे त्यांच्या आकार, रंगांच्या विचित्रपणामुळे आधीच बेजार झालेले मिशनरी किळसच व्यक्त करतात. मग तो कप्तान स्वतः एक केळं खाऊन दाखवतो व त्यांचं केळ्याविषयींचं मतपरिवर्तन करतो. अभ्यासपूर्वक लिहीलेल्या त्या ग्रंथात केळ्यांचा [ निदान एका मोठ्या केळ्यांच्या जातीचा तरी] उगम 'हवाई' बेटांवरचा आहे, असं सुचवलं आहे !

<< मामाची बायको सुगरण,रोज रोज पोळी शिकरण.. >> आणि हो, या मालिकेतील लेखाना दिलेल्या कल्पक शीर्षकांबद्दल दिनेशदा तुमचं खास अभिनंदन !

भाऊसाहेबांशी सहमत!

अप्रतिम जबरदस्त लेख!

(ही मालिका लेख या सदरात असायला हवी.)

(अवांतर - आपण म्हणालात की 'माझ्या वयाच्या मुलांची लहानपणची आवडती गोष्ट म्हणजे पोळी शिकरण'! आपले वय किती आहे? सांगाल का? सहज विचारतोय.)

उत्तम लेख, उत्तम !

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

केळाची पावडर कशी करतात? पुर्वी मुलांना द्यायचे असे ऐकले आहे. आताही मिळते का? मला माहिती नाही.

भाऊ, करिबियन किंवा आफ्रिकेतील देशांत खास केळींची वाहतुक करण्यासाठी बोटी असतात. त्याना बनाना बोट असेच म्हणतात. उगम वगैरे लिहितोच. आणि सुकेळी आता अगदी मोजक्या ठिकाणी मिळतात. क्वचित दादरला आणि वसई स्टेशनच्या बाहेर, एका दुकानात.
अगदी अर्धे केळे, तोंडात ठेवून चघळत चघळत खायचे. मस्त चव !

बेफी, करा बघू अंदाज माझ्या वयाचा !

मोनालिप, काहि बालान्नात केळ्याची पावडर असते. इथे आफ्रिकेत, केळी, रताळी यांची पिठे मिळतात. रुचिरामधे लिहिल्याप्रमाणे, कच्च्या केळ्याच्या काचर्‍या करुन त्या वाळवल्या आणि कूटल्या कि त्याचे पिठ होते. ते कटलेट्स, थालिपिठात वापरता येते. पण लहान मूलांना देण्यासाठी, ताजे केळेच सोलून द्यावे.

व्वा.. खूपच छान माहिती मिळाली.. केळ्याचे झाड झाड नसते.. हे तर आताच कळले..
इन्डोनेशियाला फुटभर लांबीची किंचीत तुरट चवीची ,वॅनिला चा वास असणारी केळी खाऊन पाहिली होती..
थायलॅण्ड मधे ही निखार्‍यांवर भाजलेली स्वादिष्ट ,छोटी छोटी केळी मिळत असत.
केळफुलाची भाजी,चटणी पण छान लागते Happy
अजून माहितीच्या प्रतिक्षेत..

लेख नुसताच पाहिला. अजुन वाचायचाय पण निवांतपणे वाचेन...

केळ प्रसवली लिहिलेय वर ते वाचुन प्रतिसाद द्यायचा मोह आवरला नाही म्हणुन लिहिते.. Happy

आमच्या ओळखीतल्या एकानी बेळगावी केळ्याची बाग केलेली. बागेत जेव्हा पहिल्यांदा केळफुल यायची लक्षणे दिसायला लागली तेव्हा त्यांनी चक्क डोहाळजेवणासारखा कार्यक्रम केलेला बागेसाठी खास.

आमच्या गावी केळ एकदा लावली की तिला फळ लागेपर्यंत तोडत नाहीत. आणि कोणी मुद्दाम जर तोडली तर खुप अशुभ समजतात.

केळे हे फळ आधी खुप स्वस्त होते पण आता इतर फळांसारखेच महाग झालेय. याचे प्रमुख कारण म्हणजे लोकांना आता पिवळी केळी आवडतात. केळी लवकर पिवळी करण्यासाठी पावडर वापरणे हा अनधिकृत मार्ग आहे आणि गॅस वापरणे हा अधिकृत मार्ग आहे. व्यापारी मंडळी दोन्ही मार्गांचा वापर करतात. पण अधिकृत मार्ग वापरण्यासाठी एसी चेंबर असणे आवश्यक आहे आणि त्यामुळे फळाची किंमत भरमसाठ वाढलीय. शेतक-याला तेवढी किंमत मिळत नाही कारण तो हिरवीच केळी विकतो. (सुरवातीला दुकानात केळी ठेवत होते तेव्हा ही सगळी माहिती मिळालेली)

बरीच माहीती मीळाली.

केळीच्या झाडाची गणना, हर्ब या प्रकारात होते. याचे कुळ म्हणजे, आले, हळदीचे. पण या वर्गात भरभक्कम "खोड" असणारा हा एकमेव वाण.>> ही माझ्यासाठी नविन माहीती. धन्यवाद दिनेशदा Happy

खुपच उपयुक्त लेख (मालिका) आहे हा.

दिनेश,
अप्रतिम लेख, सुरूवात, माहीती.. प्रकाशचित्रं... सगळंच सुरेख जमून गेलंय.
माझ्या आवडत्या १० त.

बेफी, करा बघू अंदाज माझ्या वयाचा >>> ४८ ते ५५ च्या दरम्यान? Uhoh इतके वयस्कर नाहीयेत हो ते...

व्वा! बरीच नवीन माहिती मिळाली! (काय काय शिकलो ते सांगायला अर्धा लेख प्रतिसादात द्यावा लागेल Wink )

मनिमाऊ परवानगी दिली. पण संदर्भ म्हणून माझे नाव न देता, मायबोलीचे द्यावे. अशी विनंती !

रावी, पानपोळी हा पदार्थ मी नेहमीच चेंबूरच्या सरोज हॉटेलमधे खाल्लाय. त्यात गूळ खोबर्‍याचे केळे घालून केलेले सारण असते. याचे गोळे करुन, केळ्याच्या द्रोणात ठेवतात आणि त्यात तांदळाचे भिजवलेले पिठ ओततात आणि मग हे पार्सल वाफवतात. पण तयार पदार्थ अनेकवेळा खाऊन, मी केलेला हा अंदाज आहे.

बेफी, करा बघू अंदाज माझ्या वयाचा >>> ४८ ते ५५ च्या दरम्यान? इतके वयस्कर नाहीयेत हो ते...>>
दक्षिणा, त्यांच्या अगाध ज्ञानावरुन व इत्क्या मोठ्या माहिती संकलनावरुन बेफिकीर यांनी तो अंदाज केला असणार. (ज्याला हवे त्याने दिवे घेणे)

च्छा
केळी , अंबा, रताळी , गाजर ,अननस , फनस , अंजीर , पेरु , नारळ , चिंच , कवठ , मोसंबी , संत्रा , काळी मैना , लाल मैना , लींबु , बोर , जांब , ( वड / पिंपरी /पिपळ - उबंर ) या बद्दल सर्व माहीती माझ्या गावतला आप्पा पण सांगेल , आणी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी पण आपण जे लिह्तांना तेच सांगेल कोणता ही अभ्यास न करता . नविन काय ? लिहयाचेच झाले तर न खानार्या फळा बद्दल लिहा , ते का खात नाहीत , त्यात कोणती तत्वे कमी असतात , व ते फळ प्राण्यांना चालते पण माणवाला का चालत नाही या बद्दल लिहा . व ती फळे कोणत्या झाडाला येतात , त्यांचा रंग , चव , गंध , आकार , या बद्दल लिहा आणी हो आशी फळे महाराष्ट्रात कोणत्या भागात आहेत ते पण सांगा .
महाराष्ट्रातील नविन फळांची माहीती सांगा की उगीच आपल नाराळाचे उपयोग , केळी चे उपयोग , अंबा आणी चव हे काय विषय झाला .

लक्ष्या .

दिनेश अपुरा का ठेवलाय लेख? इथपर्यंत आवडला. दुसरा भाग मी वाचला नाही वाटतं कारण नारळानंतर एकदम हाच वाचतेय. शोधना पडेगा.

लक्ष्मण, अहो इथे असे बरेच लोक आहेत ज्यांचं जवळजवळ सगळं आयुष्य शहरात गेलय. त्यांना यातल्या बर्‍याच गोष्टींची माहिती नसते. दिनेशच्या आवडीचाच विषय आहे त्यामुळे काय सांगता येतं, जरा वाट बघितलीत तर 'न खाता येणारी' फळंही त्याच्या यादीत असतील.

मस्त लेख दिनेशदा!

@जागू
रंगपंचमीच्या रंगामध्ये केळीच्या दांड्याचा रस पिळून घातला की रंग जात नाही असे म्हणतात
आम्ही करायचो लहानपणी हा उद्योग! Happy आमच्या कडे लाल आणि पिवळ्या दोन्ही सालींच्या केळी होत्या.

नेहमीप्रमाणेच अतिशय अभ्यासपूर्ण लेख.

केळे अगदी सूक्ष्म प्रमाणात किरणोत्सार करते. >> हे खुपच इंटरेस्टिंग वाटलं. कधी कल्पनासुध्दा आली नसती. फळ? की झाड? हे कसं काय होतं? आणि हे कसं आणि कोणी शोधून काढलं असेल. इतरही अशी किरणोसर्गी झाडं आहेत का?

मामी, किरणोसर्ग बर्‍याच गोष्टीतून निघत असतो. अगदी आपले शरीर देखिल अल्प प्रमाणात किरणोसर्गी असते. मुख्यतः potassium-40 आणि carbon-14 या radioactive isotopes मुळे.
अधिक माहिती: Natural radioactivity, Banana equivalent dose

(अरे वा, लक्ष्मण - उर्फ लक्ष्या - फारच प्रेरित झालेले दिसतात, आता ते पण एक अभ्यासपूर्ण लेखमालिका लिहिणार बहुतेक Wink )

केळीच्या दांड्यांचा रस>>>

माझ्या युनिफॉर्मवर डाग पडला होता त्या रसाचा! Sad जाता जाईना. चिमुकला होता डाग, नि युनिफॉर्मचा रंग डार्क होता म्हणून चालून गेलं.

दिनेशदा, मस्त माहिती. ती वेलची केळी म्हणजेच सोनकेळी ना?

दिनेशदा, आज बहुतेक माझा वेंधळेपणाचा दिवस दिसतोय. Lol
मिटक्या मारत मारत आंब्याचा लेख वाचलाय, पण मी त्यालाच पहिला समजले होते...नारळ लक्षात आला नाही.
<<बागेत जेव्हा पहिल्यांदा केळफुल यायची लक्षणे दिसायला लागली तेव्हा त्यांनी चक्क डोहाळजेवणासारखा कार्यक्रम केलेला बागेसाठी खास.>> सो क्युट !

Pages