श्रीराम रानडे

Submitted by परदेसाई on 21 June, 2006 - 16:46

मराठी नाट्य, चित्रपट, रेडियो आणि दूरदर्शन क्षेत्रातले एक अष्टपैलू कलाकार. 'परदेसाई' या माझ्या पुस्तकाचे प्रकाशक, म्हणून त्यांची ओळख झाली, खरं तर त्यांच्या कन्येने करून दिली, पण नंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेला, 'एक होता विदुषक' वर लिहिलेला त्यांचा एक लेख आठवला. सहज म्हणून त्यांना त्याविषयी विचारलं आणि त्यावेळी झालेल्या गप्पागोष्टीतून त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आवाका लक्षात येऊ लागला. आरती रानडे (rar) ही त्यांची कन्या तर आपल्यातलीच मायबोलीकर, तेव्हा त्यांना मायबोली माहीत आहे का? हा प्रश्न आम्हाला विचारावा लागला नाही. सध्या ते न्युजर्सीत आहेत, तेव्हा त्यांची एक छोटीशी मुलाखत घेतली, त्यातला काही भाग.

ShriramRanade.jpg\- आपल्या बालपणाच्या काही आठवणी सांगा.

\- माझं मूळ गांव सांगली. पण वडिलांचं आणि आजोबांचं पटेना, त्यामुळे तिथे फारसं वास्तव्य नसे. आम्ही वाढलो मिरजेला. सुरुवातीला मी म्युनिसीपालिटीच्या शाळेत होतो, म्हणजे १९४६ साली. मधले काही दिवस, वडिलांच्या नोकरीमुळे आम्ही फलटण संस्थानमध्ये होतो, पण तिथे मी दुसरीत नापास झालो, त्याला कारण म्हणजे माझा पाय मोडला होता, आणि पाय मोडायचं कारण म्हणजे आम्ही मारामारी केली होती. आणि पाय बरा होण्यासाठी सात आठ महिने ससून हॉस्पिटलमधे झोपून काढावे लागले होते. त्या दरम्यान वडिलांची नोकरी गेली आणि आम्ही मिरजेला परत आलो. त्यानंतर इंग्रजी पहिली दुसरी करत १९५६ साली मी मिरज हायस्कूल म्हधून SSC झालो.

\- त्यानंतर तुम्ही कॉलेज शिक्षण केलं का?

\- मला SSC ला सायन्सचा शेवटचा पेपर फारच कठीण गेला. पुढचे दोन तीन महिने काय करावं याचा विचार करत काढले, आणि गम्मत म्हणजे त्या विषयात मला सत्तर गूण पडले. तेव्हा पासून माझा परिक्षेवरचा विश्वासच उडाला. मला असंही वाटायला लागलं की मला सायन्स चांगलं येतं. म्हणून मी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला. तेव्हापासून पुढची आठ वर्ष मी नापास होत गेलो. शेवटी कंटाळून पुण्यात येऊन नोकरी धरली, आणि मग चौशष्ठ साली मी B.A. झालो.

\- तुम्ही नोकरी किती वर्षं आणि कुठे कुठे केलीत?

\- एकदा कळलं की सायन्स आपल्याला येत नाही, तेव्हा मग मी शाळेत शिक्षकाची नोकरी धरली. तेव्हा मी फक्त इंटरसायन्स शिकलो होतो. त्यानंतर मी STC शिकलो. तेव्हा निळू फुलेंचा एक तमाशा चालला होता, 'येर्‍या गबाळ्याचे काम नव्हे', तो रात्री करून मी कसा बसा परिक्षेला पोहोचलो, आणि काय लिहिलं ते मला माहीत नाही, पण मी त्याही परिक्षेत पास झालो. Economics च्या सहाही पेपरात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 'भारत हा कृषिप्रधान देश आहे' याने केलेली आठवते. फक्त मी मोठ्ठं अक्षर काढून भरपूर लिहायचो. परीक्षकाने कंटाळून मला पास केला असावा.

\- तुमचा नाटक क्षेत्राशी संबंध कसा काय आला?

\- वयाच्या सहाव्या वर्षापासून नाटक, कीर्तन, तमाशा आणि संगीत याची गोडी लागली. एक तर मिरज हा तालमीचा गाव होता, तिथे संध्याकाळी पोरं रस्त्याऐवजी तालमीत दिसायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 'वसंत व्याख्यान माला' असायची. अगदी टिळकांपासून पु. ल. देशपांड्यांपर्यंत वेगवेगळे लोक तिथे येऊन भाषणं गेऊन गेलेले आहेत. तेव्हा तिथे भाषण ऐकायला जाणं ही पर्वणीच असायची. बरीच मोठी मोठी माणसं तिथे पहायला ऐकायला मिळाली. पुढे गोवा मुक्ती, आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही फार जवळून बघायला मिळाली. त्यात मोठ्या बंधूंकडे मोठ मोठ्या कलाकारांचं जाणं येणं असायचं. आणि मलाही आपल्याला अभिनय थोडाफार येतो असं वाटत होतं. त्यामुळे या क्षेत्राकडे वळणं सहाजिकच होतं.

\- तुमचा पहिला नाट्यप्रयोग कोणता?

\- मी पुण्याला आलो तो सिनेमालाईन डोक्यात घेतलेली होती. नोकरी वगैरे सगळं निमित्त होतं. दुर्दैवाने मी पुण्याला गेलो आणि सिनेमावाले सगळे कोल्हापूरला गेले. मग 'दुधाची तहान ताकावर' म्हणून मग नाटकाच्या मागे लागलो. सुरुवातीला तिकडेही कुणी उभं केलं नाही, पण राष्ट्र सेवादलात हळू हळू शिरकाव मिळाला. पुढे तर मी निळूभाऊंचा asistant होतो. 'बिनबियांचं झाड', 'पुढारी पाहिजे', 'चीनी आक्रमणाचा फार्स' असे बरेच प्रयोग आम्ही केले. तिथे काम करताना एक अशी सवय लागली की सगळ्यांच सगळं नाटक तयार. भुमिका ठरलेल्या नसायच्या, आणि आयत्या वेळी जो हजर असेल त्याने ती भूमिका करायची. त्यामुळे आता कुठलंही काम करताना दडपण येत नाही. मग समोर पाच प्रेक्षक असोत, किंवा पाच हजार असोत.

B.Ed करताना आमच्या एका मित्राने जब्बार पटेलांशी ओळख करून दिली. आणि मग ७२ साली Progressive Dramatic Association तर्फे घाशीराम कोतवाल हे नाटक उभं राहिलं. त्याचे पहिले १९ प्रयोग अगदी छान झाले, पण नंतर जे वादळ उठलं ते आमच्या संस्थेच्या चिंध्या चिंध्या करून गेलं. नाटकाच्या सुरूवातीपासूनच थोड्या फार कुरबुरी चालू झाल्या होत्या, आणि त्यातल्या मंडळींचे त्यात दोन गट झाले होते. पहिले काही प्रयोग होईपर्यंत सगळे एकत्र होते, पण नंतर त्यांचं पटेना. आम्हाला पु. ल. देशपांडे, शरद पवार, डॉ. लागू अश्या लोकांचा पाठिंबा होता. मग पुन्हा Theater Acedemy च्या नावाखाली ते नाटक उभं राहिलं ते १९७४ ला. पहिला प्रयोग फ़िल्म इंस्टिट्युटला झाला आणि मग मात्र ते नाटक थांबलंच नाही. सुरुवातीच्या प्रयोगाना मात्र बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवावा लागायचा, आणि आपल्याला कधीही मार खावा लागेल हे माहित होतं. खरं तर कर्तारसिंग थत्त्यानी तेंडुलकराना मारलं ही होतं.

त्यानंतर १९८० मध्ये जर्मनीला आमंत्रण आलं, तेव्हा दोन नाटकं जर्मनीला गेली, घाशिराम आणि सखाराम बाईंडर. इकडे गणपती विसर्जनाची मिरवणूक चालू असताना, आम्ही गुपचुप सटकलो आणि जर्मनीला गेलो. जाताना जरी लपत छपत गेलो असलो तरी येताना मात्र आम्हाला अगदी Red Carpet Treatment होती, आणि गम्मत म्हणजे जे लोक आम्हाला विरोध करत होते, त्यातल्या एकाच्या कँसरच्या शल्यक्रियेसाठी आम्ही 'घाशीराम' चा प्रयोग केला होता. त्यापुढे मग घाशिरामचे सातशे प्रयोग झाले. त्यानंतर महानिर्वाण, तीन पैशाचा तमाशा बेगम बर्वे अशी बरीच नाटकं केली. मग मोरूची मावशी, रामशास्त्री, नाथ हा माझा अशी काही व्यावसाईक नाटकं ही केली.

\- मग तुम्ही सिनेमाकडे कसे काय वळलात?

\- हातात तेंडुलकरांचं स्क्रिप्ट आणि डोळ्यासमोर डॉ. लागू, निळू फुले अशी नटमंडळी एवढ्या भरोश्यावर जब्बर पटेलांना सामना करता आला. तेव्ह्या त्यांच्याच गटातून आम्ही रुपेरी पडद्यावर आलो. जब्बारची खासियत अशी की प्रत्येकाची कूवत ओळखून ते लहान मोठी कामं देतात. त्यांच्या चित्रपटातून मी काही कामं केली. त्या नंतर 'जैत रे जैत', 'उंबरठा' असे काही चित्रपट केले. तुम्ही ज्याविषयी वाचलंत त्या 'एक होता विदुषक' मध्ये एक तमासगिराची भूमिका केली. मग 'कथा', 'एक डाव भुताचा' असे काही इतर चित्रपट केले.

\- आता तुम्ही काही चित्रपटात काम करताय का?

\- गौतम जोगळेकरांचा 'पक पक पकाक' मध्ये मी काम केलंय. आता तो नवीन चित्रपट काढतोय त्यातही मी आहे. 'दहावी फ' मध्ये मी शिक्षकाची भूमिका केलीय. 'नितळ' हा 'कोड' या विषयावर बेतलेला, 'बाधा' हा धनगरांचं जीवनावर बेतलेला चित्रपट असे काही वेगळे चित्रपटही मला मिळाले. पण चित्रपटात भूमिका ही माझी मीठभाकरी कधीच नव्हती. माझी नोकरी होती, बायकोची नोकरी होती, त्यामुळे या कामावर मला अवलंबून रहावं लागलं नाही.

\- TV सिरीयलशी तुमचा संबंध कधी व कसा आला?

\- ते फार उशीरा सुरू झालं. एक तर TV Center मुम्बईला आणि आम्ही पुण्याला. आम्हाला पुण्याहून मुम्बईला मुद्दाम न्यावं इतका आमचा भाव नाही. पण तरीसुध्दा विनय आपटे, स्मिता तळवलकर अशी मंडळी मधनं मधनं बोलावतात. पूर्वी कधीतरी त्यांच्याबरोबर काम केलेलं असल्यामुळे त्यांनाही आमची आठवण होते.

\- मोठ्या कलाकारांबरोबर काम करताना दबाव येतो का?

\- मोठे काय आणि छोटे काय, काम करताना नटावर दबाव येतोच, आणि तो यावाच. निळूभाऊंच उदाहरण घेतलं तर मग तो नाटकाचा पहिला प्रयोग असो किंवा ५०० वा असो. पहिला प्रवेश संपेपर्यंत आणि आवाज लागेपर्यंत त्यांचे पाय थरथरत असतात. याचाच अर्थ कुठेतरी त्या भुमिकेचा विचार चालू असतो. हे त्या नटाच्या प्रगतीचं लक्षण आहे. नाटकात तुमचं प्रेक्षकांशी एक नातं जोडावं लागतं. सिनेमाला रीटेक असतो पण नाटकात ती सोय नसते. एकदा बाण सुटला की सुटला. आत्ताचं आमचं नाटक घेतलंत तर 'लालन सारंग' यांचा मला फोन येतो 'रामभाऊ आपले संवाद परत म्हणूया का?' श्रीधर फडके अजूनही प्रेक्षकांपुढे जाण्यापूर्वी तासभर रियाज करतात. सुधीर फडके तर 'अ आ इ ई अशी' बाराखडी म्हणायचे.

\- घाशीराम मध्ये तुम्ही काही गाणी म्हटलीत तेव्हा त्यासाठी तुम्ही संगीताचा अभ्यास केला होता का?

\- मला संगीतातलं काहीही कळत नाही. फक्त मला कुठेतरी संगीताचा sense आहे, आणि सेवादलामुळे लोकसंगीताशी परिचय आहे. जब्बार पटेलांनी माझ्यातलं जे काही होतं ते घेऊन प्रेक्षकापुढे आणलं, आणि जे नव्हतं तो भाग रविंद्र साठे, आणि चंद्रकांत काळे याना दिला. मूळ नाटकात सूत्रधार एक होता, पण त्याचे तीन सूत्रधार करून त्यांनी प्रत्येकाकडून योग्य ते काम करून घेतलं आहे. जब्बारचा यात हातखंडा होता. चाळीस टक्के नटाला त्याच्या लायकीचं काम देऊन त्याचे पन्नास टक्के कसे करायचे ते त्यांना बरोबर जमतं. 'उंबरठा' मध्ये तर त्यानी एका मेकपमनच्या बायकोला भूमिका करायला लावली आहे. मिटींगमध्ये बसून स्वेटर विणणे एवढंच काम ती करते, पण भूमिकेत चपखल बसली आहे.

\- तुमच्या आत्ताच्या नाटकाबद्दल म्हणजे 'शेजारी' बद्दल काही सांगा.

\- 'शेजारी' एक Challenge होतं. मी १९९८ पासून नाटक केलं नाही. मुम्बई पुणे मुम्बई पुणे प्रवास करणं मला जमेना. बाकी बहुतेक सगळे मुम्बईचे आणि मी एकटा पुण्याचा. त्यामुळे प्रवासाचं Tension . पण मग विचार केला की आपण किती दिवस घाबरून बसायचं? कारण हत्यार जसं वापरलं नाही तर गंजून जातं तसं काहीसं कलेचं आहे. हे नाटक आलं, आणि त्यात दोनच पात्रं होती. कुठेतरी माझ्या अभिनयाला challenge होतं. म्हणून मग तालमी सुरू केल्या, आणि नाटक उभं राहिलं. मला त्यात एक Confidence आला, आणि आता मी कोणतही नाटक करू शकेन असं वाटायला लागलंय. डॉ. लागूनी 'लमाण' मध्ये म्हटल्याप्रमाणे वाजवणारा ही तूच आहेस, आणि वाद्य ही तूच आहेस. त्यामुळे हे वाद्य मीच वाजवायचं असं ठरवलंय. दुसरी एक गोष्ट त्यानी त्यात म्हटलीय, की नाटकाला एक विशिष्ठ पातळी असायलाच हवी. त्यापेक्षा चांगला प्रयोग झाला तर चांगलीच गोष्ट आहे, पण प्रयोग त्या पातळीच्या खालच्या दर्जाचा होता कमा नये. मी यावर विचार करतोय. नाटक, सिनेमाच्या बाबतीत दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला Switch on Switch off होता आलं पाहिजे. उद्या नाटक आहे म्हटल्यावर आज पासून Tension , मग त्यामुळे होणारा त्रास असं करून चालत नाही. नाटकाच्या आधी किंवा कॅमेरा सुरू होईपर्यंत, अगदी Relaxed रहावं, आणि एकदा काम सुरू झलं मी मनापासून करावं, आणि पुन्हा Relax होता आलं पाहिजे. 'श्वास' चा बाल कलाकार 'अश्विन चितळे' त्याला हे जमतं तर मला का जमू नये? मी आता मला हे शिकवतोय. आपण खरं तर एका प्रयोगासाठी तीन तीन महिने तालीम करतो, कष्ट घेतो, तेव्हा प्रयोग हा तर ठणठणीत झालाच पाहिजे. मग त्या प्रयोगाच्याच Tension मुळे तो बिघडून काय फायदा?

\- तुमचे पुढचे प्लॅन?

\- आता कितीही उड्या मारायच्या म्हटल्या तरी शरीर फार उड्या मारायला देणार नाही. तेव्हा मला काय करता येईल तर हातात लेखणी धरता येईल. त्यातून मी खलनायक निर्माण करू शकेन, लहान मूल निर्माण करू शकेन, आणि प्रेयसीही निर्माण करू शकेन. तेव्हा मी हाती लेखणी नक्कीच धरेन. दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतः मनाच्या रंगमंचावर मी कित्येक खेळ करू शकेन. आपलं काय असतं, 'नटसम्राट' म्हटला की आपल्या डोळ्यासमोर डॉ. लागू उभे राहणार. स्वतःला कधीतरी विचारा, मी का नाही 'नटसम्राट'? प्रेक्षकांपुढे उभा राहून नटसम्राट होणार नाही मी, पण त्याला मनाच्या रंगमंचावर उभा करीन. त्या भूमिकेचा विचार करीन, उलगडून बघीन. त्यातून कितीतरी पैलू मला कळतील की नाही? मी श्री. ना. पेंडश्यांचं 'लेखक आणि माणूस' वाचतोय. वयाच्या नव्वदाव्या वर्षी हा माणूस अजून एवढं चांगलं लिहू शकतो, तर मी तर अजून तरूणच आहे, मी का लिहू शकत नाही?

\- आता लिहिण्यावरून आठवलं, की ज्या तुमच्या व्यवसायामुळे आपली ओळख झाली, तो प्रकाशन व्यवसाय तुम्ही केव्हा, कधी आणि कसा सुरू केलात?

\- आमचे वडील हे अतिशय कष्टाळू होते, पण दुर्दैवाने त्याना कधीही यश मिळालं नाही. राम गणेश गडकरी, वि. स. खांडेकर हे त्यांचे जवळचे मित्र. गडकर्‍यांचा पहिल्या पुण्यतिथीला त्यानी गडकर्‍यांच्या सहा कविता पुस्तक रूपाने प्रकाशित केल्या. ते भारद्वाज प्रकाशनाचं पहिलं पुस्तक. त्यानंतर त्यांनी श्री. कृ. कोल्हटकर आणि न. चि. केळकर यांचं एक पुस्तक प्रकाशित केलं. दुर्दैवाने त्यांना कुठेही यश मिळालं नाही आणि अत्यंत विपन्नावस्थेत ते १९६० साली वारले. १९९६ हे त्यांच शताब्धीचं वर्ष. त्यांची आठवण म्हणून एकाद्या संस्थेला देणगी देण्यापेक्षा 'भारद्वाज' प्रकाशन पुन्हा चालू का करू नये असा एक विचार आला आणि आम्ही ते चालू केलं. त्यांच्यावर माहीती लिहावी तर पुस्तक अगदी लहान झालं असतं. मग पु. ल. ना जऊन भेटलो. त्यानी त्यांचा एक लेख छापायला दिला. त्यांचे बडोद्याचे मित्र रामभाऊ जोशी म्हणून, त्यांनी गडकर्‍यांबद्दलची इतर लेखकांची मतं असा एक लेख लिहिला होता तो ही हाती आला. मग आचार्य अत्र्यानी गडकरी गेल्यावर त्यांच्यावर केलेली कविता असं सगळं गोळा करत करत एक शंभर पानी पुस्तक तयार झालं. त्यात ९६ पानं गडकर्‍यांवर आणि चार पानं आमच्या वडिलांवर होती. ते पुस्तक आम्ही प्रथम प्रकाशित केलं. त्यानंतर मग दिलीप प्रभावळकरांनी आपल्या दहा एकांकिका मला दिल्या. मग इतर काही तुमच्यासारखे लेखक मिळाले. त्यांची पुस्तकं आली. असं करत करत आम्ही प्रकाशन चालू ठेवलं आहे. आता म्हणजे २००५ साली आम्ही 'माऊली' हे आमच्या आईच्या शताब्धीच्या निमित्ताने काढलेलं आहे. खरं तर १९०३ साली जन्माला आलेल्या स्त्रिया अश्या विषयावर ते पुस्तक काढायचं होतं पण त्याला फार काही प्रतिसाद मिळाला नाही. गेल्यावर्षी 'गोडी अपूर्णतेची' हे एका डॉक्टरच्या जीवनावर त्यांच्या बायकोने लिहिलेलं पुस्तक, आणि यावर्षी 'हरवले ते' हे जुन्या जुन्या वस्तूंची आठवण करून देणारं एक पुस्तक आम्ही काढलं आहे.

\- आता तुम्ही जे जे काही केलंत ते तुम्ही न ठरवता करत गेलात हे दिसतंच आहे. पुन्हा तुम्हाला ही इंनिंग खेळायला मिळाली तर तुम्हाला काय करायला आवडेल?

\- फिल्म डिरेक्टर. ते माझं स्वप्न आहे. अगदी राजा परांजपेंच्या पठडीतला फिल्म डिरेक्टर.

\- काही वर्षांपूर्वी रंगभूमीची फार वाईट अवस्था होती, प्रेक्षक येत नव्हते, नाटकांचा Trend पण बदलला होता, त्याचं कारण काय असेल?

\- या गोष्टीचा थोडा चुकीचा अर्थ लावला गेलाय. एक असं मत आहे, की TV त काम करण पाप, मी फक्त नाटकातच काम करेन, असं करून चालणार नाही. शास्त्रीय संगीत तेवढं चांगलं, लावणी वाईट असं म्हणता येत नाही. जे जे तुमच्या समोर येतील त्यात तेव्ढ्याच तयारीने करणं महत्वाचं आहे. एक वेळ एकादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर द्या सोडून पण म्हणून ते वाईट आहे हे म्हणणं चुकीचं आहे. आता TV माध्यमाचं काय आहे, की साडेचार वाजता तुम्ही सेटवर येता, पावणेपाच वाजता तुम्हाला गरम गरम कागद हातात दिले जातात, आणि ते लगेच पाठ करून पाच वाजता एका टेक मध्ये तुम्ही तो शॉट देता. दुसरा टेक लागला की ते तुम्हाला हाकलून लावतात. हे काम म्हणावं तेवढं सोपं नाही. त्यांचं काय असतं, की दिवसाला ठरलेले वीस शॉट त्यांना घ्यायचे असतातच. 'छापते रहो' हे त्यांचं धोरण असतं. नाटक असलं की आपण तालमी करतोच, पण काळाप्रमाणे तुम्हाला बदलता आलं पाहिजे तरच तुम्ही टिकू शकाल असं मला वाटतं.

\- तुमच्या आत्तापर्यंतच्या भूमिकेतली सर्वात आवडती भूमिका?

\- अजून नाही सापडलेली मला.

\- पण सर्वात गाजलेली भूमिका, म्हणजे घाशीराम मधला सूत्रधार

\- नाही. नाही म्हटलं तरी ती सर्कस आहे, त्यात मुक्त अभिनयाला वाव नाही, ते सगळं संगीताच्या तालावर बसवलेलं आहे. एक गम्मत सांगतो, की हे सगळं चालू असताना मला वाटलं की शिक्षकी पेशा बास झाला, म्हणून मी १९९० साली निवृत व्हायचं ठरवलं. तेवढ्यात मला निरोप आला की आत्ता सोडू नका, तुम्हाला नॅशनल अवार्ड मिळणार आहे, आणि ते मला मिळालं आदर्श शिक्षक म्हणून. म्हणजे शिक्षणाची काय अधोगती बघा, मी ते अवार्ड आजही परत द्यायला तयार आहे, कारण मी मुलांना काहीही शिकवलं नाही, उलट त्यांच्याकडून मी बरंच काही शिकलो. पण अजूनही मला कशातही यश मिळवलेलं नसलं तरी मी मस्तीत जगतोय. बायकोला सांगितलं आणि नोकरी सोडली. एक मात्र खरं, की मी सगळ्या क्षेत्रात मित्र मात्र मिळवले.

\- मी पुण्यात आलो असताना मला हे जाणवलं, की नुसते मोठ मोठ्ठे कलाकारच नाही, तर आताचे नवीन उगवते कलाकारही तुम्हाला माहीत असतात.

\- हे माझं भाग्य आहे, आणि मी सांगण्यापेक्षा ते सांगतात की हा माझा मित्र आहे.

\- तुमचा आत्ताचा उद्योग?

\- ग. दि. माडगुळकर माझे अत्यंत आवडते, सुधीर फडके हे एक आवडते गायक. लहानपणापासून यांचे संस्कार आमच्यावर झाले. गेल्या दोन तीन वर्षांपासून मला असं जाणवलं की मी चांगल्या रचना करू शकतो. मागच्या वर्षी आनंद माडगुळकरांबरोबर एका शुटिंगला सातार्‍याला गेलो. दोन शुटिंगच्या मध्ये त्यानी काही गोष्टी मला सांगितल्या. मुळात ग. दि. मांची छप्पन गाणी आहेत 'गीत रामायणात'. पण रामायणात असे अनेक प्रसंग आहेत ज्यावर गाणी होऊ शकतील. दोन शॉटमधल्या वेळात मी कागद घेऊन बसलो, आणि काही ओळी लिहिल्या. घरी आल्यावर ते गाणं पूर्ण केलं. मग ६ अप्रिलला रामनवमीला गीत रामायणाला पन्नास वर्षं पूर्ण झाली. गीतरामायण हा हिमालय आहे, पण त्याभोवती कितीतरी अशी गाणी आहेत, जी रामायणावर आहेत पण गीत रामायणात नाहीत. अशी पंधरा गाणी मी एकत्र केली, त्यात पाच सहा गाणी माझी होती, आणि काही इतरांची होती, एक माडगुळकरांच होतं. त्यावर आम्ही एक कार्यक्रम केला. काहीतरी नवनवीन करतोच आहे. वरती गेल्यावर त्यांनी आम्हाला विचारलं की 'तुम्ही काय केलंत?' तर आम्हालाही सांगता आलं पाहिजे.

.... समाप्त ....

Yog

Wednesday, June 21, 2006 - 5:13 pm:

विनयभाऊ,
चान्गली जमलीये मुलाखत. गम्मत म्हणजे Rar च्या pittsburg च्या घरी तिच्या वडीलान्शी भेट झाली अन बरोबर माझी देशातून आलेली छोटी भाची देखिल होती. त्याना पहाताच तीच्या आईला (माझ्या बहिणीला)"ते बघ आदितीचे(का आवन्तीकाचे) बाबा"(मालिकेच नाव मला आठवत नाही आता!)असे तिने कानात सान्गितले अन रानडे काकानाही त्या चिमुरडीकडून मिळालेल्या पावतीच कौतुक वाटल.
खर तर तोपर्यन्त रानडे काका इतके मोठे (अन तरिही विनम्र) कलावन्त आहेत हे अजीबातच माहीत नव्हत. त्यानी रचलेल्या अन मला दिलेल्या गीत, भजन वगैरेच पुस्तक अजूनही जपून ठेवल आहे!
( off the record, आमच्या आईलाही त्यान्च TV वरील ते गाजलेल पात्र माहित होत. तेव्हा पडद्यावर "इतका खाष्ट बाप रन्गवणारा" मनुष्य प्रत्त्यक्षात इतका soft spoken आहे याचच जास्ती आश्चर्य वाटल. किम्बहुना रानडे काकान्ची प्रत्त्येक भूमिकेत समरस होवून काम करायची वृत्ती त्यातून दिसून येते असे म्हणायला हरकत नाही)

Chinnu

Wednesday, June 21, 2006 - 8:55 pm:

विनय, मस्त झालिये मुलाखत. तुमची प्रश्न आणि श्री. रानडेंची दिलखुलास उत्तरे पाहुन छान वाटले. इतक्या महान लोकांमध्ये वावरलेल्या माणसाला तुम्ही भेटलात, बोललात आणि आमचीही भेट मायबोलीच्या सांवादातुन घडवुन आणलीत! धन्यवाद.

Itsme

Thursday, June 22, 2006 - 1:14 am:

विनय मस्तच झाली आहे मुलाखत ...
खरे सांगायचे तर 'रानडे' काकांची मुलाखत तुम्ही घेणार हे वाचुन थोडेसे वाईट वाटले होते. संवाद सदर सुरु केले तेंव्हाच रानडे काकांचे नाव माझ्या यादीत होते. त्यांच्याशी गप्पा मारण्याची एक छान संधी हुकली.

खरच रानडे ककांशी (आणि काकुंशी सुध्दा) गप्पा मारणे हा खुप छान अनुभव असतो. प्रत्येक भेटीत खुप कही नविन ऐकायला मिळते. 'दिलखुलास' हा शब्द अगदी फ़िट्ट बसतो तिथे.

Bee

Thursday, June 22, 2006 - 6:05 am:

मागे रारनी घाशीरामबद्दल लिहिताना रानडे काकांचा उल्लेख केला होता. तेंव्हा वाटलं होत त्यांच्याबद्दल अजून काही वाचाव. आज विनयमुळे छान माहिती मिळाली. विनय खूपच छान.

Milindaa

Thursday, June 22, 2006 - 8:43 am:

विनय, चांगल्या झाल्या आहेत गप्पा.

Vinaydesai

Thursday, June 22, 2006 - 9:53 am:

या गप्पा मारताना मला अनिलभाई, उपास, अजून एक मित्र (प्रशांत) आणि हजर नसलेल्या NJ कर मायबोलिकरांनी, नेहमीप्रमाणे हजर न राहून खूप मदत केली आहे....

Ninavi

Thursday, June 22, 2006 - 10:06 am:

कसचं कसचं विनय!

छान झाल्ये रे मुलाखत.

Lalu

Thursday, June 22, 2006 - 10:16 am:

छान झाल्या आहेत गप्पा.

Dineshvs

Thursday, June 22, 2006 - 12:45 pm:

विनय छान मुलाखत. आणि तशी हि व्यक्ती ओळखीची होतीच, आता अजुन ओळखीची वाटु लागली.

Saurabh

Thursday, June 22, 2006 - 1:05 pm:

अरे! ह्यांचं नाव श्रीराम रानडे आहे होय! मला त्यांच्या 'एक डाव भुताचा', 'पक पक पकाक' मधल्या गावरान भुमिका आणि 'जैत रे जैत' मधली भुमिका चांगलीच लक्षात आहे. आणि मी नेहेमी विचार करायचो की जब्बार पटेलांच्या आसपासची चेहेर्‍याची ठेवण असणारी ही व्यक्ती कोण? छान वाटली मुलाखत!

Champak

Thursday, June 22, 2006 - 5:52 pm:

अहा, सही च एकदम!

स्पष्टवक्तेपणा मात्र मनाला भावला!

माझ्या वडिलांना एकदा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्या साठी संस्थेने ¨ तुम्ही आज पावेतो केलेल्या कामांची यादी अन त्यावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रीय बातम्यां चे संकलन करुन संस्थेला पाठवा ¨ , असे कळवले होते. अश्या पुरस्काराबद्दल वडिलांना ईतकी चीड होती कि, ¨ संस्थेतील कर्मचार्‍यांच्या चांगल्या कामाची दखल घेणे हे संस्थेच्या व्यवस्थापनाचे काम आहे, कर्मचार्‍याचे नव्हे, सबब मी स्वतः माझी स्तुती करणार नाही! ¨ असे उत्तर पाठवले होते!

अर्थातच त्यांना कधीही कोणताही सरकारी पुरस्कार मिळाला नाही!

Raina

Friday, June 23, 2006 - 11:38 am:

मस्त. गप्पा छान रंगल्यात !

Sayonara

Friday, June 23, 2006 - 3:22 pm:

पक पक पकाक मध्ये कोणती भूमिका होती यांची? कित्तीतरी वेळा पाहिलाय पिक्चर. पण डोळ्यासमोर येत नाहीये.

Giriraj

Saturday, June 24, 2006 - 6:02 am:

विनय,मलाही त्यांच्याशी गप्पा मारायची हौस आहे... त्यन्च्याविषयी तुमच्याकडून आणि आरतिकडून इतकं ऐकलय की जेव्हा मुलाखत होणार तेव्हा आपण जाऊच असे ठरवले होते.. असो.
नन्तर भेट होईलच कधीतरी.

मुलाखत मात्र उत्तम झालिये...

Limbutimbu

Saturday, June 24, 2006 - 6:25 am:

छान व्यक्तीची छान मुलाखत!
साधी साधी दिसणारी माणसे अफाट कष्टातून आणि सतत कार्यरत राहुन केवढी मोठ मोठी कामे करीत असतात नाही?
त्यामानाने आपण काहीच करीत नसतो!
विनय भाऊ, त्यान्ना आमचा दन्डवत कळवा!
ता. क. शक्य असल्यास व दिल्यास अशा व्यक्तीन्ची जन्मवेळ, जन्म दिनान्क व ठीकाण घेता आले तर पहावे!

Gajanandesai

Saturday, June 24, 2006 - 6:50 am:

विनय, चांगली झाली आहे मुलाखत. त्यांचं निगर्वी व्यक्तिमत्व खूप आवडलं. काका, तुम्ही डिरेक्ट केलेल्या फिल्मची आतुरतेनं वाट पाहत आहोत. त्याच्यासाठी आणि तुमच्या लिखाणाकरता खूप शुभेच्छा!

Ajay

Saturday, June 24, 2006 - 4:06 pm:

विनय छान झालिये मुलाखत. त्यांच्या आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांची ओळख झाली आहे.

Paragkan

Sunday, June 25, 2006 - 12:10 am:

छानच. पण खूपच आटपती झाली असं वाटलं. त्यांचा विविध क्षेत्रातला वावर पाहता गप्पांना अंत नसणार.

Lopamudraa

Monday, June 26, 2006 - 10:43 am:

मनाला भावली अगदी, वाचुन आंनद झाला.. अशी पण साधी मानसं असतात.... ^^^^^ता. क. शक्य असल्यास व दिल्यास अशा व्यक्तीन्ची जन्मवेळ, जन्म दिनान्क व ठीकाण घेता आले तर पहावे!
लिम्बु भाउ ला अनुमोदन..!!!

Prashantkhapane

Tuesday, June 27, 2006 - 4:30 pm:

Limbutimbu,
Very well said. Maayboli var etke kahi navin kalaate. Mirajechya Sanglichya khup athvani jaagyaa zaalyaa.

Seema_

Wednesday, June 28, 2006 - 12:44 am:

सुरेख झाली आहे मुलाखत . स्पष्ट आणि निर्भिड व्यक्तिमत्व वाटल एकदम . विनय नी प्रश्न पण नेमके निवडलेत एकदम .

Vinaydesai

Wednesday, June 28, 2006 - 5:24 pm:

लिम्बू, अरे त्यांना तुमचा दण्डवत कसा सांगावा...

'तुम्हाला लिम्बुटिम्बुचा दण्डवत... ' यातून काही अर्थबोध होईल असे वाटत नाही..

तुम्हाला आवडली मुलाखत, आनंद झाला

Limbutimbu

Wednesday, June 28, 2006 - 11:30 pm:

>>>> यातून काही अर्थबोध होईल असे वाटत नाही..
का नाही होणार? अन होणार नसेल अर्थबोध तर आमचा हा असा दन्डवत छापुन त्यान्ना पोचता करा!

Saee

Friday, June 30, 2006 - 4:07 am:

विनय, छान झाली आहे मुलाखत. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे एकदम. सगळा चकमकाट असलेल्या क्षेत्रात मनसोक्त विहार करुनही त्यांचं जमिनीवर राहणं कौतुकास्पद आहे. ते म्हणतात यश मिळालं नाही असं, तो त्यांचा मोठेपणा आहे, पण ते एक यशस्वी कलावंत आहेत याबद्दल कुणाला दूमत नसावं. मजा आली वाचायला.

Roma

Monday, July 03, 2006 - 6:42 pm:

मुलाखत अगदी दिलखुलास झाली आहे. प्रश्न अतिशय योग्य आणि नेमके आहेत आणि उत्तरेपण सहज आहेत. असेच संवाद वारंवार वाचयला मिळोत ही सदिछा.

रानडे सर, म्हणजे आमच्यासाठी मराठीचे शिक्षक! त्यांच्या कडून शिकायचं भाग्य आम्हाला मिळालं. कधी कधी सर कुठल्याशा सिनेमात किंवा सिरिअल मधे दिसले कि आम्ही मोठेपणानी सगळ्याना ओरडून ओरडून सांगायचो..की हे आमचे सर, हे आमचे सर. मी तसा बाकी विषयांत ढ होतो पण मराठी मधे मला चांगले मार्क पडायचे, आता ते पडायचे, कि सर द्यायचे कि खरोखरच मी मिळवायचो हे सरांनाच विचारायचे आहे. खुप वर्षांनी त्यांच्याबद्द्ल ऐकुन खरंच खुप छान वाटलं.
सरांचा सध्याचा काही पत्ता किंवा इमेल मिळू शकेल का?
आशिष दामले
वरीष्ठ सल्लागार, मानवाधिकार मंच, अफगाणिस्तान

आशिश.. माफी असावी.. तुमचे हे पोस्ट मी पाहिले नव्हते..

विनय