एक फ्रेन्डली मॅच- १९८३ वि. २०११ - भाऊ नमसकर

Submitted by विकवि_संपादक on 24 April, 2011 - 09:56

विश्वचषक स्पर्धेत आपला १९८३ चा व आताचा विजय यांची तुलना यापैकी कोणता विजय श्रेष्ठ वा अधिक कौतुकास्पद हे ठरवण्याकरता करणं म्हणजे या दोन्ही विजयांनी दिलेल्या निखळ आनंदावरच विरजण घालणं! पण, अशा तुलनेतून काही आनंदाच्या क्षणांना उजाळा मिळतो का हे पहाणं गंमतीचं व कदाचित बोधप्रदही ठरावं.

२०११ च्या स्पर्धेची नव्याने ओळख करुन घेण्याची गरज नसावी. तेव्हा, प्रथम, १९८३ च्या स्पर्धेची रुपरेषा कशी होती ते अगदी थोडक्यात पाहू -

ती स्पर्धा दोन गटात विभागलेल्या आठ संघांमधे, इंग्लंडमधे पार पडली. प्रत्येक सामना ६० षटकांचा व फक्त दिवसा खेळवला जायचा. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघाविरुद्ध दोन वेळा खेळायचा व त्यावरून गुणसंख्येचा तक्ता मांडून दर गटातून दोन संघ सेमिफायनलला बाद फेरीत पोचायचे. मग, अर्थातच, त्यातून अंतिम फेरीचे संघ पुढे जायचे.

'अ' गटात इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलँड व श्रीलंका आणि 'ब' गटात वेस्ट इंडीज, भारत, ऑस्ट्रेलिया व झिम्बाब्वे अशी संघांची विभागणी होती. 'अ' गटातून इंग्लंड व न्यूझीलँड अन 'ब' गटातून वेस्ट इंडीज व ऑस्ट्रेलिया सेमि-फायनलला जातील अशी सर्वसाधारण अपेक्षा होती, कारण मर्यादित षटकांच्या सामन्यांचा गाढा अनुभव असलेले तेच संघ होते. वेस्ट इंडीज तर निर्विवादपणे त्या वेळचा भलताच बलाढ्य संघ होता. याउलट, भारत हा लिंबूटिंबू संघच गणला गेला होता व भारताच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या तुटपुंज्या अनुभवामुळे ते अगदीच असमर्थनीयही नव्हतं.

'अ' गटातून इंग्लंड व पाकिस्तान सेमि-फायनलला आले. 'ब' गटात भारताने ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडीजला एकेकदा हरवून व कपिल देवच्या १७५ धावांच्या अफलातून खेळीमुळे झिम्बाब्वे विरुद्ध हरता हरता जिंकून सेमि-फायनलमधे प्रवेश केला. पाकिस्तानला सहज हरवून वेस्ट इंडीजने व इंग्लंडला ६ विकेट्सनी हरवून भारताने फायनल गाठली.

फायनलला वेस्ट इंडीजने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. रॉबर्टस्, गार्नर, मार्शल, होल्डींगच्या तुफानी मार्‍यापुढे भारत ५४.५ षटकात केवळ १८३ धावा जमवू शकला (श्रीकांत-३८, मोहिंदर अमरनाथ- २६, संदीप पाटिल-२७ व मदनलाल- १७). ग्रीनीज, हेन्स, रिचर्डस, लॉईड, गोम्स, बॅकस व ड्यूजाँ ही त्यावेळची सर्वोत्तम व बलाढ्य फलंदाजी असलेल्या वेस्ट इंडीजसाठी ही धांवसंख्या पार करणं खरं तर पोरखेळ होता. पण भारतीय गोलंदाजानी हवामान व खेळपट्टी यांचा अचूक उपयोग करून घेत आपल्या कांहीशा संथ मध्यमगती स्विंग गोलंदाजीने व तिला आधारभूत क्षेत्ररक्षणाने वेस्ट इंडीजला फक्त १४० धावांत गुंडाळून क्रिकेटच्या इतिहासात एका आश्चर्यकारक विजयाची नोंद केली. कपिल देवने २० यार्ड धावत जावून घेतलेला रिचर्डसचा अफलातून झेल सामन्याचा 'टर्नींग पॉईंट' ठरला. सचिन, गावस्करही ज्याला सलाम ठोकतात तो रिचर्डस एकहाती हा सामना वेस्ट इंडीजला सहज जिंकवून देऊं शकला असता.

१९८३ व २०११ या दोन स्पर्धांतले वा विजयातले महत्वाचे मला जाणवलेले तुलनात्मक फरक (व साम्यही) असे आहेत -

१. २०११ च्या आपल्या संघात मुख्य भरवसा फलंदाजांवर होता तर १९८३ ला 'ऑल राऊंडर्स' हे भारताचे शक्तीस्थान होते.

२. २०११ चा संघ हा स्पर्धेत 'फेव्हरीट' म्हणून उतरला होता, तर १९८३ चा संघ विजयाची बिलकुल अपेक्षा न ठेवता व दडपण न घेता उतरला होता.

३. आता आपण आपल्या उपखंडातल्या चांगल्याच परिचयाच्या व आपल्याला सोईस्कर खेळपट्ट्यांवर खेळलो तर १९८३ चा संघ वेगळ्या हवामानात व 'स्विंग' व बाऊन्समुळे आपल्याला अवघड वाटणार्‍या अशा इंग्लंडमधल्या खेळपट्यांवर खेळला होता.

४. कपिल देवचा 'ऑल राऊंडर' म्हणून दरारा असला तरी धोनीसारखा धूर्त कप्तान म्हणून त्याचा नावलौकिक व इतर संघांवर दबाव नव्हता.

५. १९८३ च्या संघाला २०११ च्या संघासारखं घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचं प्रोत्साहन नव्हतं व दडपणही नव्हतं.

६. जागतिक क्रिकेटमधे प्रचंड दबदबा असणारे व विरुद्ध संघावर दडपण आणणारे सचिन, सेहवागसारखे फलंदाज १९८३च्या संघात नव्हते (गावसकर संघात होता असला तरी त्याचा 'मर्यादित षटकां'च्या क्षेत्रात निश्चितच खास प्रभाव नव्हता); तरी पण वेळ आलीच तर कोणत्याही गोलंदाजीचा समाचार घेऊं शकणारे यशपाल शर्मा, संदीप पाटिल व मदनलाल असे ऐन मोक्याला चमकणारे फलंदाज कपिलच्या हाताशी होतेच.

७. जागतिक क्रमवारीत आपण अव्वल दर्जाचा संघ असल्याचा दिलासा व आत्मविश्वास घेऊन स्पर्धेत उतरण्याचं भाग्य १९८३ च्या संघाच्या नशीबी नव्हतं; उलट, लिंबूटिंबू संघ म्हणून हिणवल्यामुळे तेजोभंग होण्याचं सावटच त्या संघावर असावं.

यावरुन थोडंसं असं वाटतं की स्पर्धेत उतरताना तरी एकंदर परिस्थितीचं काहीसं झुकतं माप १९८३ च्या तुलनेत २०११ च्या संघाच्याच पारड्यात पडलं होतं. पण स्पर्धा सुरू झाल्यावर मात्र दोनही संघाना बलाढ्य संघांवर मात करूनच विजेतेपद मिळवतां आलं. १९८३ चा विजय हा आश्चर्यजनक असला तरी 'फ्ल्यूक' किंवा 'रामभरोसे' मात्र निश्चितच नव्हता; कारण, फायनलला पोचण्यासाठी साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडीज या नामांकित संघांचा आपण पराभव केला होता व इंग्लंडला त्यांच्याच देशात सेमिफायनलला हरवलं होतं!

नेतृत्वाचा विचार केला तर कपिलच्या काहीशा रांगड्या प्रतिमेमुळे त्याच्या 'क्रिकेटींग ब्रेन' चं लोकाना पूर्ण आकलन होऊ शकलं नव्हतं (ह्याच कपिलने पाकिस्तानचा भन्नाट फलंदाज झहीर अब्बाससाठी यशस्वी व्यूहरचना केली होती व त्याला नामशेष केलं होतं, हे गावस्करनेही मान्य केलंय!). धोनीच्या नेतृत्वात प्रकर्षाने जाणवणारे स्थितप्रज्ञता व धूर्तता हे गुण कपिलच्या बाबतीत जाणवले नाहीत. तरी पण, कपिलचं खेळात सर्वस्व झोकून देणं, खेळाच्या सर्व अंगांत परिणामकारक सहभाग असणं संघासाठी खूपच प्रेरणादायी होतं; पण माझ्या दृष्टीनं सर्वात महत्वाची होती ती कपिलची अत्यंत पारदर्शी व खेळाचा मनसोक्त आनंद घेण्याची प्रवृति! विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी मैदानावर जाताना आपल्या सहकार्‍याना 'चलो, ऐसा दिन बार बार नही आता; Come on, let us enjoy this and do our best!' काहीशा अशा प्रकारच्या कपिलच्या शब्दांनी व वृत्तीने संघातल्या सहकार्‍याना ' पॉझिटीव्हिटीच्या' घोड्यावरच नेऊन बसवलं; मग मैदानावर त्यांनी घोडदौड केली नसती तरच नवल होतं! (२०११च्या स्पर्धेत कपिलची ही वृत्ती काही प्रमाणात फक्त न्यूझीलंदच्या व्हेटोरीमधे मला जाणवली).

२०११ ला जसा चतुरस्र खेळाने युवी हा बव्हंशी आधारस्तंभ ठरला, तसा मोहिंदर अमरनाथ १९८३ ला (मोहिंदरने दोनदा, फायनल धरून, 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळवला व अंतिम सामन्यात भेदक गोलंदाजीचा सामना करत २६ धावा व नंतर ७ षटकात १२ धावा देऊन ३ बळी मिळवले). तिथंही फरक असा कीं मोहिंदर हा खरा कसलेला कसोटीपटू व एकदिवसीय सामन्यासाठी तसा नवखाच, तर युवी मर्यादित षटकांच्या सामन्यांचं बाळकडू प्यालेला व कसोटीचं दार अजूनही ठोठावत बसलेला! पण दोघांनीही परिस्थितीनुसार अप्रतिम फलंदाजी केली, स्वतःच्या गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्ट्यांचा अचूक व पुरेपूर फायदा उठवला व विश्वचषक जिंकण्यास मोलाचा हातभार लावला.

वाडेकरच्या संघाने इंग्लंडमधे भारतीय फिरकी गोलंदाजीच्या जादूने सर्वाना भारावून टाकलं होतं. चंद्रशेखर, बेदी, प्रसन्ना, वेंकट यांच्या तोडीच्या गोलंदाजांच्या अभावी, कपिलच्या संघाने निव्वळ मध्यमगती व संथ मध्यमगती गोलंदाजांच्या जोरावर भर फॉर्मात असलेल्या बलाढ्य वेस्ट इंडीजची फलंदाजीची फळी मोडून काढली व प्रेक्षकाना आणखी एक धक्का दिला! ग्रीनीज व हेन्स ही वेस्ट इंडीजची त्या काळातील सलामीची अभेद्य जोडी; ग्रीनीजसमोर केवळ बच्चा असणार्‍या संधूने त्याचा तो एकवर असताना त्रिफळाच उडवला! मदनलालने मग तीन बळी घेतले व बिन्नीने लॉईडची 'प्राईझ विकेट' मिळवली. कपिल व मोहिंदरने मग वेस्ट इंडीजच्या शेपटाला वळवळूच दिलं नाही. ते सर्वच संथ मध्यमगती गोलंदाजीचं एक 'मेस्मरायझिंग' प्रात्यक्षिकच होतं ! २०११ च्या स्पर्धेत असं गोलंदाजीचं जादूई वर्चस्व क्वचितच पहायला मिळालं.

क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत खास अभिमानास्पद कामगिरी नसलेल्या भारतीय संघांसाठी १९८३ व २०११ ही दोन वर्षं मात्र अपवाद होती; किंबहुना, उत्तम क्षेत्ररक्षणाचा या दोनही विजयात ' मॅन ऑफ द सिरीज' मिळण्याइतपत महत्वाचा वाटा असावा !

२०११चा विजय हा अत्यंत कौतुकास्पद, अभिमानास्पद व प्रत्येक भारतीयासाठी १९८३ सारखाच आनंददायी होता हे निर्विवाद. तो १९८३ च्या विजयासारखा ऐतिहासिक व आश्चर्यकारक होता का हे मात्र विवाद्य ठरू शकतं. बिमलदांचा 'देवदास' पाहून भारावलेल्या व झपाटलेल्या मला आमच्या खूप सिनीयर सहकार्‍यानी एकदां म्हटलं होतं, "अरे, सैगलसाबचा 'देवदास' पाहिलेल्या आम्हाला बाकीचे 'देवदास' म्हणजे कचराच आहेत!" म्हणून मुद्दाम सैगलचा 'देवदास' पाहून, निराश होऊन आलो व मनात वैतागूनच म्हटलं, त्या सिनेमाची व बिमलदांच्या 'देवदास'ची तुलनाही कोण, कशी करू शकतो ! थोडं वय वाढल्यावर लक्षात आलं की ठराविक वयात, परिस्थितीत व मनस्थितीत अनुभवलेला सिनेमा, खेळ इ.ची वस्तुनिष्ठ तुलना वेगळ्या वयात, मनस्थितीत पाहिलेल्या सिनेमा, खेळ याच्याशी करणं जवळ जवळ अशक्यप्राय आहे. १९८३ च्या विजयाचा आमच्यासारख्यानी अनुभवलेल्या आनंदाचंही तसंच आहे. म्हणूनच, १९८३ ला आम्ही नाचलो व, वयपरत्वे काहीसं जपून का होईना, २०११ला सुद्धा. तरी पण, २०११ ची झिंग अगदी शिगेला पोचली असतानाही मन १९८३ कडेही ओढ घेतंच होतं!

१९८३ची आणखीही एक खासियत आहेच जिचा फक्त हेवा वाटण्यापलीकडे २०११ कांहीच करू शकणार नाही! नुकतंच एक दिवसीय खेळाचं मिसरूड फुटलेल्या भारतानं कांहीसं लाजत-बुजत १९८३ला घेतलेलं विश्वचषकाचं ते चोरटंसं 'पहिलं चुंबन', पुढच्या सर्व विजयाना वाकुल्या दाखवत सदाबहार, एकमेव "पहिलं चुंबन" तर रहाणारच ना !

grandpa.JPG- भाऊ नमसकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण १९८३ चा कप जिंकल्यावर काय संतापाने लॉईडचा संघ भारतात आला आणि चारीमुंड्या चीत केले आपल्याला!!

पण १९८५ चा बेन्सन हेजेस मात्र & वर्ल्ड चँपियनच्या थाटात जिंकला! Happy

<< पण १९८३ चा कप जिंकल्यावर काय संतापाने लॉईडचा संघ भारतात आला आणि चारीमुंड्या चीत केले आपल्याला!!>> बुंदसे गई वह हौदसे नही आती !! Wink
<< एक कार्टून येऊ द्यात २०३५ च्या वर्ल्ड कप विजयावर! >> आपकी फर्माईश म्हणून एक प्रयत्न -

fifthworldcup.jpg

Pages