फायनल ऑन द फास्ट ट्रॅक - आगाऊ

Submitted by विकवि_संपादक on 24 April, 2011 - 01:54

विश्वकरंडकाचे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हाच माझ्या चिडचिडीला सुरुवात झाली, कारण बरोबर फायनलच्या संध्याकाळी मी दिल्ली-मुंबई ऑगस्ट क्रांतीत असणार हे स्पष्ट झाले होते. आमच्या शाळेची ट्रीप (सॉरी, सॉरी ट्रीप नाय काय, आउटवर्ड बाऊंड प्रोग्रॅम, इंटरनेशल शाळा हाय म्हटलं!!) बरोबर त्याच काळात निघावी, बॅडलकच खराब दुसरे काय!

श्रीलंका इनिंग सुरु झाली तेव्हा आम्ही ह.नि स्टेशनवर बरोबरीचे रेडिओवाले, पोलिस; जो मिळेल त्याला 'स्कोर क्या हुआ' चा मंत्र जपत अपडेट होण्याचा प्रयत्न करीत होतो.

रेल्वे सुटून स्थिरस्थावर झाल्यावर आमच्या कंपार्टमेंटमधे एक सोडून तीन लॅपटॉप-मोडेमवाले आहेत हा शोध लागला आणि मग अस्मादिक आणि त्यांचे विद्वान विद्यार्थी त्या लोकांना जे चिकटले ते मॅच संपेपर्यंत!

ऑगस्ट क्रांती किंवा राजधानीने प्रवास केलेल्यांना त्यात थोड्या थोड्या वेळाने चालणार्‍या खादाडीची कल्पना असेलच. ते खाणे आणून देणारे पँट्रीवाले, चादरी, उशा, नॅपकिन देणारे अटेंडंट, मधूनमधून चकरा मारणारा टीसी सर्वांनाच हळूहळू फ़ायनलचा फीव्हर चढू लागला. क्रिकेट म्हटले की आपल्याकडे सगळेच एक्सपर्ट असतात आणि ही तर फ़ायनल त्यामुळे; 'संगाकारा जल्दी गया अब तो ये २५० भी नही बनाएंगे', 'आज चावला को खिलाना चाहिए था' इ.इ. ची मतमतांतरांची उधळण चालू झाली. मथुरा मागे पडतापडता आपली बॅटींग चालू झाली, पहिल्याच ओव्हरमधे सेहवाग शून्यावर परतला आणि कंपार्टमेंटमधे एकदम शांतता झाली. थोड्यावेळाने सचिनही परतला आणि त्याच्या विकेटनंतर येणारे पॅन इंडीयन फ्रस्ट्रेशन मला पहिल्यांदाच बघायला मिळाले. करोडो भारतीयांच्या या माणसावर असलेल्या प्रचंड विश्वासाचे ते सँपलच होते. 'आता काय वर्ल्डकप मिळतोय', 'कलकत्त्यात काय झालं आठवतेय ना?' वगैरे हताश उद्गार उमटू लागले आणि त्याचवेळी गाडीही इंटरनेट कनेक्टीव्हिटी नसलेल्या भागात शिरली. तात्काळ मोबाईल बाहेर आले आणि घरातल्या लोकांना एसएमएस पाठवून स्कोर पाठवायची ऑर्डर गेली. पुढचा जवळजवळ तास-दीडतास आम्ही दर १५-२० मिनटानी येणार्‍या मेसेजवरच टांगलेले होतो! पहिल्यांदा कोहली-गंभीर आणि मग गंभीर-धोनी यांच्या भागीदार्‍या होऊ लागल्या तसा सर्वांचाच जीव भांड्यात पडू लागला. विशेषत: धोनीच्या 'कॅप्टन्स इनिंग'चे तर जोरदार टाळ्या वाजवून कौतूक चालू होते.

गाडी कोट्याजवळ आली तेव्हा अचानक इंटरनेटमधे जीव आला, लाईव्ह स्ट्रिमींग पुन्हा सुरु झाले आणि पहिली गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे गंभीरची विकेट! पण आता टार्गेट आवाक्यात आले होते आणि इतक्या दिवसांचा तारणहार युवराज मैदानात होता.

फायनलची ती शेवटची १५ मिनीटे मी आयुष्यात कधीही विसरु शकणार नाही. कोण, कुठले, वेगवेगळ्या प्रांतातले, वयाचे, आधी कधीही न भेटलेले परत कधीही भेटायची सुतराम शक्यता नसलेले, केवळ नशिबानेच त्यादिवशी त्या डब्यात एकत्र आलेले आम्ही अठरापगड लोक. १९८३ मधे टीनएजर असलेले आणि त्या विजयाच्या आठवणी सांगणारे पंजाबी चाचाजी, मुंबईत मुलाखतीला चाललेला आणि आपले इंटरनेट सतत चालू ठेवलेला तामिळ इंजिनिअर, प्रत्येक बॉलआधी कुठल्याश्या देवीचा धावा करणारा बिहारी वेटर, सुरुवातीला 'काय पोरखेळ चालवलाय' अशा चेहर्‍याने वावरणारे आणि नंतर प्रत्येक फटक्यावर ओरडणारे आमचे बंगाली ग्रंथपाल, आपले काम विसरुन आमच्याच डब्यात ठाण माडलेले गुजराती टिसी साहेब ......... असे कितीतरी.

विजयाच्या जवळ नेणार्‍या प्रत्येक चेंडूबरोबर आमच्यामधले हे सारे भेद दूर होत गेले. आणि धोनीने विजयी फ़टका मारताच सर्व डबा 'भारतमाता की जय', 'हिप हिप हुर्रे', 'वंदे मातरम' च्या घोषणांनी दणाणून गेला. लोक हसत होते, रडत होते, एकमेकाला मिठ्या मारत होते, शेकहँड्स चालले होते. आपण जिंकलो होतो, आम्हीच जिंकलो होतो!

'क्रिकेट इज द रिलिजन, द ग्रेट लेव्हलर' हे घासून गुळगुळीत झालेले वाक्य असे अनुभवायला मिळणे खरेच भाग्याचे होते.

जय हिंद!

- आगाऊ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

आग्ग्गाऊ !!!!!!!!!!!!!!!!!!!
मस्त लिहिलसं.

मस्त Happy

आगाऊजी, छान लेख. तुम्ही क्रिकेट, किंवा खेळांच्याच, खासियतवर नेमकं बोट ठेवलंय. आमचे शाळेतले क्लास टीचर कसोटी सामना सुरू असेल तर मला मधेच विनाकारण दम भरल्यासारखं करून वर्गाबाहेर घालवत; मी कुठूनतरी स्कोअर ऐकून त्याना दिसेल असा वर्गाबाहेर उभा रहायचो; मग मला आत बोलावून त्यांचं माझं हळू आवाजात स्कोअर सांगणं/ ऐकणं होई व मला ताकीद दिल्यासारखं करून बांकावर बसायला सांगण्यात येई !! नंतर नंतर सर्वांसाठी तो एक विनोदच झाला होता.
एकदा तर एका अटीतटीच्या सामन्याच्या वेळीं मला आमच्या एम.डीं.ने कंपनीच्या महत्वाच्या बोर्ड मिटींगमधे बोलावून एखादी इमर्जन्सी आल्यासारखं नाटक करून हळू आवाजात सामन्याची त्यावेळची सद्यस्थिती दहा मिनीटं बोर्ड मिटींग खोळंबवून माझ्याकडून समजून घेतली होती !
<< 'क्रिकेट इज द रिलिजन, द ग्रेट लेव्हलर' >> आगाऊजी, तुम्ही म्हटल्याप्रमाणे गुळगुळीत झालं असलं तरी अजूनही हे खरंय !!

आगावा,
एकदम सुपर्फास्ट Happy मस्त!

(उपांत्यपूर्व सामन्याच्या शेवटच्या दहा षटकांदरम्यान आमचेही काहीसे असेच झाले होते.. भारताच्या विमानात चेकीन करत होतो दुबई विमानतळावर. आणि गम्मत म्हणजे पोर्टर पासून ते अगदी चेकीन डेस्क च्या मागचा कर्मचारी, सगळे "क्या स्कोर हुवा, क्या पोझिशन है"... वगैरे विचारत होते.. माझे अर्धे लक्ष मोबाईल/सामन्या मध्ये होते.. शेवटी रैना ने ब्रेट ली ला तो फेमस षटकार ठोकल्यावर आम्ही चेकीन केले.. तोपर्यंत नुसते वेळ काढणे चालू होते त्या कर्मचार्‍याचे :). पोर्टर केरळाचा होता, कर्मचारी ऊत्तर भारतीय, आणि पट्ट्यावर बॅग टाकणारा आंध्राचा होता... तेव्हा "'क्रिकेट इज द रिलिजन, द ग्रेट लेव्हलर".. अगदी सत्य आहे!)

Pages