आमच्या पिढीने गांधी पाहिलेलेच नाहीत. आमच्या पिढीने आणीबाणीही पाहिलेली नाही. इतकंच काय, पण देशाने पहिलावाहिला क्रिकेट वर्ल्डकप जिंकला तेव्हाही आम्ही एकतर पाळण्यात खेळत होतो, किंवा मग अजून जन्मालाच यायचो होतो. आम्ही फाळणी पाहणं तर सोडाच, त्याचे पडसादही थेट अनुभवलेले नाहीत. "मजबूरी का नाम" असंच ज्यांच्याबद्दल ऐकत आलो ते गांधी आम्हाला कळले असं आम्हाला वाटलं ते दिलीप प्रभावळकरांनी चेहर्याला रंग लावला आणि सोनूने गायलेलं ’बंदे मे था दम’ काळजापर्यंत पोहोचलं तेव्हा! जेव्हा अजयने ’लिजंड...’ मध्ये फासामध्ये मान अडकवत डोळे आमच्यावर रोखले तेव्हा भगतसिंग ही काय चीज होती हेही आम्हाला कळलं! ’कोई देश पर्फ़ेक्ट नही होता, उसे परफेक्ट बनाना पडता है’ हे आम्ही शिकलो तेही रुपेरी पडद्यावर! आम्ही सर्व हुकुमशहांच्या क्रूर कहाण्या वाचल्या आणि तहांची कलमं लिहिली ती केवळ स्वतःचा नम्बर पदच्च्युत होऊ नये म्हणून! सत्याग्रह, अहिंसा, उपोषण वगैरे शब्द आम्ही शिकलो ते पुस्तकात! परकीयांपासून कष्टाने मिळवलेलं स्वातंत्र्य आम्ही जन्मापासूनच भोगत आलोय. त्याउपर आमच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे आईबाबांनी सुट्टीत हवं तेवढं हुंदडायची दिलेली परवानगी किंवा फारफार तर घरच्यांचा डोळा चुकवून नदीवर एकट्याने पोहायला जाण्याचा केलेला पराक्रम एवढंच! खर्या युद्धाचा अनुभव नसलेले आम्ही क्रिकेटमधला विजय म्हणजे युद्धातला विजय अशी समजूत आजही करून घेत असतो!
अगदी सुखी, आलिशान नसली तरी, मागच्या पिढीने सर्व स्थित्यंतराचे चटके अनुभवल्यामुळे आपोआपच त्यातल्या त्यात सुरक्षित वातावरणात वाढलेली ही आमची पिढी! दंगे झाले की एका राजकीय पक्षाच्या धाकामुळे रस्त्यावर पसरणारा सन्नाटा म्हणजे आमच्यासाठी ’दहशत’ होती! बाबरी मशिद पडल्यावर बिल्डिंगमधल्या एका मुसलमान कुटुंबासाठी लपूनछपून केलेली मदत म्हणजे आमच्यासाठी ’सर्वधर्मसमभाव’ होता! गावकुसाबाहेर आयुष्य काढायचं आहे हे आमच्यापैकी काहींना खूप लहानपणीच कळलेलं वास्तव ही त्यांच्यासाठी ’लोकशाहीची’ ओळख होती!
बंद, संप, मागण्यांसाठी लढे हे आम्ही पाहिले ते आपल्याच माणसांचे, आपल्याच माणसांविरुद्ध! by the people, for the people म्हणतात तसं! दहा वर्षं चालणार्या खटल्यामध्ये भ्रष्ट मंत्र्यांना शिक्षा झाल्या, दंगलीमधल्या गुन्हेगारांना सजा झाल्या, लाचखोरी, करबुडवेगिरी, स्टिंग ऑपरेशन्स या सगळ्या आणि अशा अनेक प्रकरणांमध्ये आत कुठेतरी ’अरे ही आपलीच माणसे आहेत’ हेही माहित असायचं... नात्यातले नसले, ओळखीचे नसले तरी ’स्वातंत्र्योत्तर काळातले भारतीय म्हणजे आपलेच’ हे कुठेतरी शिक्षणाने मनावर ठसवलेलं होतंच.. त्याचमुळे मग टेबलाखालून, पेटीमधून, फाईलींमधून सरकवले जाणारे गांधींचे फोटो असलेले कागद, सर्व प्रकारचे भ्रष्टाचार, लोकशाहीच्या सर्वात ताकदवान स्तंभांचे - पांढर्याशुभ्र कपड्यातील काही गलिच्छ माणसांचे - ताकदीच्या जोरावरचे भलतेच प्रयोग, हे सगळं सगळं स्वीकारत गेलो.. अगदीच असह्य झालं तर मग ’खाल्लेला पैसा पचत नाही’ ही सर्व प्रकारच्या गुन्ह्यांवरची आमची हुकुमी उत्तरे असत!
आणि मग पुढे काही वर्षांनी, ऐन तारुण्यामध्ये, आता काहीतरी करून दाखवू असं म्हणत हात शिवशिवत असताना आणि काय करायचं ते नक्की ठरत नसताना, हे सगळं भ्रष्ट वातावरण आज ना उद्या आपल्यालाही घेरणार असं अचानकच वाटायला लागलं... आणि तेव्हाच अण्णा हजारे नावाच्या एका माणसाने दिल्ली गाठली. अण्णा उपोषणाला बसले काय आणि चोवीस तासांत दुसरे गांधी अशा किताबाला पोहोचले काय! आमची पिढी अवाक! अण्णांचा सगळा इतिहास-भूगोल पुढच्या बहात्तर तासात जगभर पोहोचला आणि पंच्याऐंशीव्या तासाला सरकार त्यांच्या सर्व मागण्या मान्य करतं झालं!!!
महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर अण्णा आपल्याला नवीन नाहीत. राळेगणसिद्धी हा एकच शद्ब अण्णांची ओळख करून द्यायला पुरेसा आहे. गेली कित्येक वर्षं अण्णा या ना त्या कारणाने उपोषणं करत आहेत, वेळोवेळी आपल्या मागण्या मान्य करून घेत आहेत. तेव्हा कधीच आम्हाला ’हे दुसरे गांधीच की हो!’ असा साक्षात्कार झाला नव्हता! उत्तर उघड आहे, यावेळचे अण्णा हे मीडीयाने मोठे केलेले आमचेच जुने अण्णा होते!
अण्णांच्या मागण्या योग्य होत्या की नव्हत्या, त्या मान्य झाल्यामुळे लोकतंत्रामधले संभाव्य बदल कोणते, लोकपाल विधेयक नक्की काय आहे, त्याची जरूरी आहे की नाही, हा या लेखाचा उद्देशच नाही. युवा पिढी ज्या वेगाने यात सामील झाली, एखाद्या पहाडासारखी अण्णांच्या पाठीशी उभी राहिली त्यामुळे मी चकित झालोय. आनंदी झालोय की नाही ते माहित नाही . मूळच्या विषयाकडे (लोकपाल विधेयक) फारसे लक्ष न देता, त्याच्या सार्थतेची खात्री करून न घेता इतिहासातील अजरामर व्यक्तिरेखेशी साधर्म्य वाटणारा एक माणूस उपाशी बसला हे पाहताच त्याच्या भजनी लागली. नव्या युगामधल्या सर्व तंत्रांचा वापर करून अत्यंत कमी काळात अण्णांचे उपोषण जगभर पोहोचले. हे विस्मयचकित करणारे आहे! भूतकाळातील प्रवास, सध्याचं चित्र आणि भविष्यावर होणारे परिणाम याचा सखोल विचार सोडाच, पण वरवरचाही विचार या तमाम तरूण पिढीने केला असेल असं वाटत नाही. सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थेचा अतोनात तिटकारा हे त्यामागचं प्रमुख कारण वाटतं! आणि म्हणूनच अण्णांच्या पास्ट परफॉर्मन्सवर फिदा होऊन या रिझल्ट ओरिएण्टेड तरूणाईने त्यांना पाठिंबा दिला! जवळजवळ सर्व मीडीयाने स्वतंत्र भारतामधला हा सर्वात मोठा लोकशाहीचा विजय आहे असे या घटनाक्रमाचे वर्णनही केले!
त्या दिवशी रात्री मी पाहिलेल्या एका "LIVE" चर्चेमध्ये, अण्णांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत हे सांगताना तो सूत्रसंचालक अक्षरशः एक्साईट झाला होता! इतरही यत्र तत्र सर्वत्र हीच परिस्थिती होती! कायदेशीर, नैतिक सर्व विरोधांना न जुमानणारे आणि दररोज नवीन भ्रष्टाचारामध्ये अडकत जाणारे सरकार एका नि:शस्त्र माणसाच्या उपोषणापुढे चक्क सर्व मागण्या मान्य करते हे माझ्या तरूण पिढीसाठी खूप मोठे आश्चर्य होते! ओघातच मग ७३ वर्षांच्या अण्णांना अंतिम कागद हातात देण्यासाठी अजून १२ तास ताटकळत ठेवून सरकारने काय साधले हीसुद्धा चर्चा मीडीयाने केली. छोट्या छोट्या घटनांनाही ग्लोरिफाय करत पेश करणाऱ्या मीडीयाने अण्णांच्या कर्तृत्त्वाबद्दल तर अशा प्रभावीपणे बुलेटिन्स आणि बाईट्स दिल्या की खरोखर अण्णांच्या मागण्या मान्य झाल्या म्हणजे भ्रष्टाचार भारतातून कायमचा संपला असे चित्र क्षणभर उभे राहिले होते.
जंतरमंतरवरच्या अलीकडच्या काळातल्या त्या अभूतपूर्व अशा उपोषणानंतर सुरू झाली नुसत्या प्रश्नांची रांग! तरूणाईला नक्की काय हवंय? नेमकं असा कुठला फॅक्टर अण्णांमध्ये होता की ज्यामुळे ही तरूणाई बर्याच वर्षांनी स्वकीय व्यवस्थेविरुद्ध इतक्या मोठ्या संख्येने उभी राहिली? सगळ्या मागण्या मान्य करायच्याच होत्या तर मग उपोषणाची वेळ का आली? आधी अण्णांना स्पष्ट विरोध करणारं सरकार मागण्या मान्य केल्यावर "we are also happy to see the response of youth, and we are not on the other side, we are with you, we thank Anna Hajareji" अशा अर्थाची मखलाशी का करू लागलं? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लोकपाल विधेयक संमत झाले तरी प्रत्यक्ष भ्रष्टाचार नियंत्रणात यायला कधी ना कधी स्वत:लाही यात उतरावं लागणार आहे हे अण्णांना एका क्लिकवर पाठिंबा देणारी आणि कधीही अशा उपोषणांचा अनुभव नसलेली समस्त नेटीझन आणि सिटिझन युवा पिढी लक्षात घेईल का? व्यवस्था पोखरलेली आहे हे मान्यच, पण त्याविरूद्ध लढणार्या दुसर्या बाजूचं असाधारण उदात्तीकरण करून आपण आपल्याच अपेक्षा वाढवतो नाही आहोत का?
काही प्रश्नांची उत्तरं द्यायला काळ स्वत:चा वेळ घेतो. त्यामुळे लोकपाल विधेयकाच्या निमित्ताने लोकप्रिय झालेले अण्णा हजारे नावाचे मीडीयाच्या भाषेतले ’दुसरे गांधी’ किती काळ तरूणाईवर आपला प्रभाव ठेवू शकतील याचे उत्तर काळच देईल. पण अगदी वैयक्तिक आयुष्यापर्यंत येऊन पोहोचलेल्या या भ्रष्टाचार नावाच्या राक्षसावर उपाय म्हणून अण्णांकडे समस्त तरूणाई पाहते आहे हे नक्की! अण्णांवर होणाऱ्या आरोपांकडेही प्रसंगी दुर्लक्ष करायची तिची तयारी दिसते! "गांधी" या नावाचा प्रभाव पन्नास वर्षांनंतरही आजच्या भारताला अत्यंत भावनिक बनवू शकतो हे निर्विवाद!
- नचिकेत जोशी (११/४/२०११)
वरील लेख e-sakal मध्ये ही प्रकाशित झालेला आहे. लिंक - http://72.78.249.107/esakal/20110415/4798584052180811553.htm )
सुंदर लेख. या लेखाचा इंग्रजी
सुंदर लेख.
या लेखाचा इंग्रजी अनुवाद करून तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला हवा. कृपया कुणी हे काम करू शकत असल्यास नक्की करा! (माझं इंग्रजी इतकंही चांगलं नाही याचं आज पहिल्यांदा वाईट वाटतंय... )
नेमकं लिहलयं. युवा पिढी काम
नेमकं लिहलयं. युवा पिढी काम करण्यासाठी तयार आहे, नेत्रुत्वासाठी नाही.
It is looking for someone to look up to and lead them.
(स्वातंत्र्य लढ्यातही भारतीयांना "एक" वंदनीय नेता पक्षी गांधीजी मिळाल्यावर लढ्याची व्यापकता वाढली, असं मला व्यक्तीशः वाटतं. त्यामागे आपली भारतीयांची काय मानसिकता आहे, याचं पूर्ण आणि समाधानकारक विश्लेषण माझ्याकडे नाही.)
मस्तच लिहीले आहेस.. विषय छान
मस्तच लिहीले आहेस.. विषय छान मांडला आहेस..
नि अभिनंदन लेख ईसकाळमध्ये आल्याबद्दल.. किप इट अप !
अतिशय सुंदर लेख. तरूणाईच्या
अतिशय सुंदर लेख. तरूणाईच्या विचारांचं प्रतिबिंब उमटलय..
छान लिहिलय.
छान लिहिलय.
सर्व प्रथम या विषयावर
सर्व प्रथम या विषयावर तुम्हाला लिहावे असे वाटणे हे महत्वाचे आहे म्हणुन प्रथम तुमचे अभिनंदन.
छान लिहीलय... झाड यांच्याशी सहमत, जास्तित जास्त लोकांपर्यंत हे विचार पोहोचवा.
अजुनही सर्व काही जिंकले म्हणुन गाफिल रहायला नको. नाकर्त्यांनी हार मान्य केली आहे पण काहीच उपाय शिल्लक ठेवला नव्हता म्हणुन.
इंग्रज गांधीगिरीला घाबरून
इंग्रज गांधीगिरीला घाबरून गेले कि पुलं म्हणतात तसं कंटाळून गेले ?
छान लेख! विचार करायला लावणारा
छान लेख! विचार करायला लावणारा !
वंदना-
भारतीयांना नेते, आणि वंदनीय नेते कमी मिळाले नाहीत,
पण इंग्रजांनी गांधींना उचलून धरले, इतरांना नाही.
नचिकेत,
विषयांतराबद्दल क्षमस्व !
नचिकेत, मागण्या मान्य हा डाव
नचिकेत,
मागण्या मान्य हा डाव होता. अण्णांच्या आंदोलनातली हवा काढुन घ्यायचा. इकडे अण्णांचे समर्थक विजय उत्सव साजरा करत आहेत तोवर मसुदा १५ ऑगस्ट पर्यत तयार होणे शक्य नाही ही बातमी झळकते.
आज तर कहर झालाय. अमरसिंह नावाच लुब्र कुत्र आता मसुदा समितीच्या खासदार नसलेल्या सदस्यांची संपत्ती जहिर करतय.
'गांधी' या नावाची जादू आज
'गांधी' या नावाची जादू आज इतक्या वर्षांनीही कायम आहे ! भारताच्या संदर्भात केलेली कुठलीही चर्चा- सकारात्मक किंवा नकारात्मक अर्थाने गांधीपर्यंत जाऊन पोचते, हे परत एकदा दिसले.
नचिकेता, तुला पडलेले हेच आणि असेच प्रश्न माझ्याही मनात आले होते. माझ्याच भावनांना शब्दबद्ध केले आहेस, धन्यवाद.
भारताने विश्वचषक जिंकल्यावर तीनच दिवसात सुरू झालेले आणि आयपील सुरू होतांना भरात असलेले हे उपोषण संपूर्ण देशाला हलवू शकले, हा खरोखर एक सुखद धक्का होता. 'इस थप्पड की गूंज' पुढे अनेक वर्षे आपल्याला सुनाई देणार आहे, इसमे माझ्या मनात कोई शक नाही.
---------------------------------------------------
@किरण्यके- हवा तापवू नका. आम्ही तुम्हाला ओळखले आहे.
सुंदर लिहीले आहे. आत्ताची
सुंदर लिहीले आहे. आत्ताची एकूण स्थिती आणि त्यात अण्णांनी निर्माण केलेले 'रिपल्स' - याचे वर्णन आवडले.
असंख्य लोकांपर्यंत पोहोचायची ताकद गांधीजींप्रमाणेच अण्णांचीही दिसते आहे. बाकी अजून त्यांचा प्रवास कसा होतो ते दिसेल पण या एका मुद्द्यावर सहमत.
मस्त लिहले आहे... पण आज
मस्त लिहले आहे...
पण आज जाहीर झालेली अण्णा सोडुन त्या इतर कमिटी मेंबर्स ची संपत्ती पाहुन मनात संशयाची पाल चुकचुकली.:(
अण्णाना सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधी हवे होते ना?? १४० कोटी रुपये संपत्ती असलेला मनुष्य सर्वसामान्य???
ह्या विषयावर लिहिण्याचे मनात
ह्या विषयावर लिहिण्याचे मनात होते. तेवढ्यात तुमचा लेख पाहिला.
तरूणाईला नक्की काय हवंय? नेमकं असा कुठला फॅक्टर अण्णांमध्ये होता की ज्यामुळे ही तरूणाई बर्याच वर्षांनी स्वकीय व्यवस्थेविरुद्ध इतक्या मोठ्या संख्येने उभी राहिली?>>>>>>
सशस्त्र क्रांती झाली तर त्यात किती सहभागी होतात ? ०.१ टक्का देखील नाहि. स्वातंत्र्यायुद्धाच्या काळात देखील करोडोंच्या भारत देशात हातावर मोजता येतील इतकेच क्रांतीकारक झाले. सर्वसामान्य माणसाला टोकाची भुमिका न घेता (याची कारणे काहि असोत - टोकाची भुमिका न घेण्याची इच्छा वा घेण्याची हिम्मत ) ज्यात सहभागी होता येइल अशी चळवळ गांधी़जींनी सुरु केली. दुर्देवाने त्या चळवळीची आजही चेष्टा केली जाते. आणी हे वरच्या काहि प्रतीसादावरुनही दिसुन येते. पण जी माणसे चेष्टा करतात ती सशस्त्र क्रांती करण्याची हिम्मत दाखवीत नाहित. पण गांधी़जींच्या काळात काय वातावरण निर्माण झाले असेल याची अण्णांच्या आंदोलनाने थोडी झलक दाखवली हेही नसे थोडके.
अण्णांच्या मागे लोक उभे रहाण्याचे हेच कारण होते. लोकांनी काय विशेष केले ? candle मारच केले, शहरात शांततामय मोर्चे काढले, सह्या मोहिम राबवली, नेटवरुन पत्रे पाठविली. यात कोणताही कायदा मोडला गेला नाहि, बसेस जाळल्या गेल्या नाहित, दगडफेक झाली नाहि, हातावर पोट असलेल्यांचे नुकसान झाले नाहि. तरीहि जो परिणाम दिसुन आला तो अभुतपुर्व होता.
अण्णांच्या मागण्या मान्य असोत वा नसोत, लोकपाल बिलाने भ्रष्टाचार लगेच निपटुन निघो वा ना निघो पण
राजकारणी लोकांच्या मनमानीविरुद्ध आपण विरोध करु शकतो हा जो आत्मविश्वास भारतीय सामान्य जनतेला एका आठवड्यात आला त्याचे मोल नाहि!
सर्वात महत्त्वाचा प्रश्न
सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लोकपाल विधेयक संमत झाले तरी प्रत्यक्ष भ्रष्टाचार नियंत्रणात यायला कधी ना कधी स्वत:लाही यात उतरावं लागणार आहे हे अण्णांना एका क्लिकवर पाठिंबा देणारी आणि कधीही अशा उपोषणांचा अनुभव नसलेली समस्त नेटीझन आणि सिटिझन युवा पिढी लक्षात घेईल का? >>> हा अगदी मोलाचा विचार मांडलाय नचिकेत.
राजकारणी लोकांच्या मनमानीविरुद्ध आपण विरोध करु शकतो हा जो आत्मविश्वास भारतीय सामान्य जनतेला एका आठवड्यात आला त्याचे मोल नाहि!>> ही फार मोठ्ठी 'अचिवमेंट' आहे या आंदोलनाची. "बिल्डर्स" आणि "उद्योगपती" यांच्या फायद्यकरता पाणीवाट्पाचे अधिकार स्वतःकडे घेणार्या महाराष्ट्र सरकार विरोधात असं आंदोलन छेडण्याची वेळ आली आहे.
"बिल्डर्स" आणि "उद्योगपती"
"बिल्डर्स" आणि "उद्योगपती" यांच्या फायद्यकरता पाणीवाट्पाचे अधिकार स्वतःकडे घेणार्या महाराष्ट्र सरकार विरोधात असं आंदोलन छेडण्याची वेळ आली आहे. >>> अगदी अगदी!
अण्णांना पाठिंबा मिळाला याचं
अण्णांना पाठिंबा मिळाला याचं कारण म्हणजे नेते विवेक सोडून वागताहेत. थोडक्यात गुंडांच्या तावडीतून सोडवणारा अनोळखी त्या वेळेपुरता महात्माच वाटतो.
अण्णांना जवळून ओळखणारे त्यांच्याबद्दल फारसं छान बोलत नाहीत. अनेक चांगली माणसं त्यांना सोडून गेली किंवा अण्णा माणसं टिकवू शकले नाहीत.
त्यांचा हेतू निर्मळ आहे याबद्दल त्यांचे टीकाकार देखील शंका घेणार नाहीत.
पण हेकेखोर वृत्ती आणि मी म्हणेन तेच योग्य हे लोकशाहीत बसणारे नाही. मला लोकपाल बिलात काय आहे हे माहीत नाही. ते योग्य असेल असं वाटतं. पण ही पद्धत मला योग्य वाटत नाही. हे सरकार आपणच निवडून दिलेलं आहे. माझ्या मते अण्णांच उपोषण हे मीडीयाचं शक्तीप्रदर्शन होतं. जयप्रकाश नारायण किंवा महात्मा गांधी यांनी खेडोपाडी जाऊन संघटना बांधणी द्वारे आंदोलन लाँच केलं होतं. अण्णांच्या प्रत्येक उपोषणाला मीडीयाने आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. कार्यकर्ते आपल्यापर्यंत आलेले नाहीत. जोवर मीडीयाला अण्णा सोयीचे आहेत तोवर या आंदोलनात ते हवा भरणार, जेव्हां नकोसे होतील तेव्हां हवा काढून घेणार. अशा नावेवर स्वार झालेलं आंदोलन तग धरेल असं मला वाटत नाही.
आंदोलन उभारण्याचा एकमेव मार्ग कष्टाचा आणि खडतर आहे. स्वतःचं नेटवर्क तयार करणे ! या नेटवर्कधून अण्णा स्वतःच कायदे बदलवू शकतील. कालची गोष्ट, शिवसेना रांगत होती. आज बघा ना.. मग नि:स्वार्थी वृत्तीने चालणा-या अण्णांना माणसं मिळणार नाहीत का ?
अण्णा क्षणिक आंदोलन नकोय. माणसं घडवा , तुमच्यानंतरही ही ज्योत तेवत रहायला हवी. कायदे करून प्रश्न सुटत असते तर मी माझं सर्व किडूकमिडूक विकून तुमच्या मांडीला मांडी लावून बसलो असतो.
नचिकेत छान लिहिले आहेस रे
नचिकेत छान लिहिले आहेस रे
सदर लेख ईसकाळमध्ये आल्याबद्दल अभिनंदन!!!!
जयप्रकाश नारायण किंवा महात्मा
जयप्रकाश नारायण किंवा महात्मा गांधी यांनी खेडोपाडी जाऊन संघटना बांधणी द्वारे आंदोलन लाँच केलं होतं. अण्णांच्या प्रत्येक उपोषणाला मीडीयाने आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. >>>
अण्णांनी (आणी किरण बेदी, अरविंद केजरीवाल) वगैरे लोकांनी देखील ते केले. गेले तीन महिने ते खेडोपाडि पोहिचुन लोकपाल बिल म्हणजे काय हे सांगत होते. आंदोलन सुरु झाले त्यावेळेस अण्णांबरोबर सुरवतीला खेड्यापाड्यातील लोक होते. नंतर शहरी लोक आले मिडियातुन प्रसिद्धी मिळाल्यावर.
दुसरे म्हणजे उपोषणाला मीडीयाने आपल्यापर्यंत पोहोचवलं तर ते चांगलेच आहे ना! मिडियाची ताकद आज खुप आहे आणी तीचा चांगला उपयोग झाला तर त्यात वाइट ते काय ?
शिवाय जयप्रकाश नारायण किंवा महात्मा गांधी यांच्या आंदोलनाची अण्णा हजारेंच्या आंदोलनशी तुलना कराची गरजच नाहि. तो काळ वेगळा होता, माध्यमे वेगळी होती, जग एवेढे गतिमान झाले नव्हते.
कायदे करून प्रश्न सुटत असते तर मी माझं सर्व किडूकमिडूक विकून तुमच्या मांडीला मांडी लावून बसलो असतो.>> तुम्ह्लाला फरक समजला नाहि. केवळ कायदा करुन नव्हे तर कायद्याची योग्य अमलबजावणी होते की नाहि हे पहाणारा कायदा करुन प्रश्न सुटु शकतो. RTI act झाला नसता तर आज जे घोटाळे बाहेर आले आहेत ते कधीच आले नसते. त्यामुळे कायदे करुन पश्न जरु सुटतील. पश्न फक्त योग्य कायदे करण्याचा आणी त्याची अमलबजावणी होते की नाहि हे पहाण्याचा आहे. लोकपाल विधेयकाने हेच साध्य होइल.
हे सरकार आपणच निवडून दिलेलं
हे सरकार आपणच निवडून दिलेलं आहे >> पण आपलं त्यावर नियंत्रण नाही हे देखिल एक क्लेषकारक सत्य आहेच की.
वर नचिकेतनी म्हटल्यानुसार "राजकारणी लोकांच्या मनमानीविरुद्ध आपण विरोध करु शकतो हा जो आत्मविश्वास भारतीय सामान्य जनतेला एका आठवड्यात आला त्याचे मोल नाहि!" हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण होणं आणि 'सुस्त भासलेली आम जनता' संघटीत होऊ शकते हा ईशारा सरकारला जाणं, एवढ फलित तरी आपण मान्य करु शकतो नां? कायदे करुन प्रश्न सुटत नाहीत हे अगदी खरयं, त्यांची अंमलबजावणी योग्य रितीने करणं हाच उपाय आहे. पुढारीमधिल अग्रलेखामधे टी.एन. शेषन यांच उदाहरण दिलण होतं. त्यांनी निवडणुक कायद्यांमधे सुधारणा केली नाही, फक्त त्यांची अंमलबजावणी योग्य रितीने केली अणि मग अपेक्षित निकाल मिळालेच. ही अंमलबजावणी सरकारई यंत्रणेने करणे अपेक्षित आहे आणि ती करत नसेल तर जनमताचा रेटा लावावाच लागेल, नाही कां??
लेख आवडला. या आंदोलनाच्या
लेख आवडला.
या आंदोलनाच्या निमित्त मनात उमटलेले प्रश्न : आपणच निवडून दिलेल्या संसदेने निवडलेले सरकार आपल्या भल्यासाठी काम करीत नाही, त्यासाठी काही विशिष्ट व्यक्तींना कायदे बनविण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे लागते (या व्यक्ती त्या विषयातल्या तज्ञ म्हणून आलेल्या असत्या तर हरकत नव्हती) हा लोकशाही व्यवस्थेचा पराभव मानावा का? याला जबाबदार आता या आंदोलनाच्या मागे आपण उभे आहोत या समाधानात मग्न असलेली मंडळीही आहेत का?
लोकपाल विधेयकाचा रोख भ्रष्टाचारी राजकारण्यांवरच राहणार आहे का? भ्रष्टाचाराची विषवल्ली नाही असे एकही क्षेत्र नाही..मग यात खाजगी कंपन्या येतात, सहकारी गृहसंस्था येतात किंवा अगदी शिक्षणसंस्थाही. आणि यात आपल्यातुपल्यातलेच लोक असतात. या आंदोलनाने कोणत्याही क्षेत्रातला भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, केला जाणार नाही, असा निश्चय सामान्य जनांना करावासा वाटेल का? अर्थात मुळावर घाव घातले तर फांद्या खाली येतात हेही मान्य.
<<पण इंग्रजांनी गांधींना उचलून धरले, इतरांना नाही. >> भारतीयांचा (किमान बहुसंख्य भारतीयांचा) नेता इंग्रजांनीच ठरवून दिला होता का?
गणू. च्या बर्याच मुद्द्यांशी
गणू. च्या बर्याच मुद्द्यांशी सहमत.
यात कोणताही कायदा मोडला गेला नाहि, बसेस जाळल्या गेल्या नाहित, दगडफेक झाली नाहि, हातावर पोट असलेल्यांचे नुकसान झाले नाहि. >>> हे सर्वात महत्त्वाचे.
भ्रमर - योगायोगाने आत्ता ईलेक्शन कमिशन सुद्धा आणखी सुधारणा आणत आहेत निवडणुकीच्या प्रोसेस मधे.
या आंदोलनाच्या निमित्त मनात
या आंदोलनाच्या निमित्त मनात उमटलेले प्रश्न : आपणच निवडून दिलेल्या संसदेने निवडलेले सरकार आपल्या भल्यासाठी काम करीत नाही, त्यासाठी काही विशिष्ट व्यक्तींना कायदे बनविण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे लागते (या व्यक्ती त्या विषयातल्या तज्ञ म्हणून आलेल्या असत्या तर हरकत नव्हती) हा लोकशाही व्यवस्थेचा पराभव मानावा का? >>>>
मला तर हे लोकशाही परिपक्व झाल्याचे लक्षण वाटते. आपणच निवडून दिलेल्या संसदेने निवडलेले सरकार आपल्या भल्यासाठी काम करीत नाही हे कळल्यावर त्या प्रोसेस मधे सुधारणा होत आहे. अमेरिकेत तर बर्याच कायद्याबद्दल निवडणुकीसारखे मतदानही घेतले जाते.
मला वाटते की जरा घाई होते
मला वाटते की जरा घाई होते आहे.
या आंदोलनाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद माझ्या दृष्टिने 'रिव्हेंज ऑफ अर्बन मिडलक्लास' आहे. या वर्गाला (ज्यात मी देखील आहेच) मताच्या राजकारणात काही स्थान नाही, आर्थिक उदारीकरणने आलेल्या सुबत्तेने त्याची हाव प्रचंड वाढली आहे पण त्यातही एका पातळीपुढे आपल्याला खेळायला घेत नाहीत याची निराशाही आहे. सर्व सत्ताकारण आणि राजकारणाबद्द्ल आत्यंतिक सिनिसिझम हेही यांचे वैशिष्ठ्य.
या गटाला हे आंदोलन म्हणजे सरकारचे आर्म ट्विस्टींग करुन आपली ताकद दाखवायची नामी संधी होती जी त्यांनी साधली.
आरामात बसून मेसेज, ट्विट, मेल केल्याने 'क्रांती'त सहभाग घेतल्याचे भाकड समाधान नक्कीच मिळते पण अशाने मूलभूत बदल होत नाहीत. त्यासाठी जो प्रदिर्घ आणि कष्ट्प्रद लढा द्यावा लागतो त्यासाठी हा वर्ग तयार आहे का? गांधी म्हणतात म्हणून सामान्य भारतीयाने आपल्या दैनंदिन जीवनात प्रचंड बदल घडवला आणि तो स्वातंत्र्यलढ्याचा भाग बनला. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनासाठी असा बदल करायची आपली तयारी आहे का?
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनासाठी
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनासाठी असा बदल करायची आपली तयारी आहे का? >> ते येणारा काळच ठरवेल. पण सुरवात तर वाइट नाहि. आणी केवळ आरामात बसून मेसेज, ट्विट, मेल केले गेले असे मला वाटत नाहि. लोक रस्त्यावर उतरले होते.
इजिप्त मध्ये देखील मेसेज, ट्विट, मेल यांचे मोठे योगदान होते. ते नाकारुन चालणार नाहि.
लोक करत आहेत ते पुरेसे आहे का
लोक करत आहेत ते पुरेसे आहे का हा मुद्दा बरोबर आहे पण येथे केवळ अण्णांचा पडलेला प्रभाव या दृष्टीने लेख बरोबर आहे असे वाटले.
आगाऊंना अनुमोदन
आगाऊंना अनुमोदन
या निमित्ताने जी मतं पुढे आली
या निमित्ताने जी मतं पुढे आली त्यांचा विचार करायला लावणारा लेख.
सकाळ मध्ये आल्याबद्दल अभिनंदन..!
भ्रष्टाचाराचा, मोठमोठ्या
भ्रष्टाचाराचा, मोठमोठ्या स्कॅम्स - घोटाळ्यांचा बसलेला तिटकारा, त्याविरूध्दचा रोष आणि स्वतःची त्याबद्दलची हतबलता यांतून मोकळे होण्याचा, व्यक्त होण्याचा मार्ग अण्णांच्या उपोषण व लढ्याद्वारा आजच्या तरुणाईला दिसला व त्यांनी तो उचलला. फक्त घरांमधून, नाक्यांवर, गप्पांमध्ये किंवा तुरळक लिखाणातून प्रकट होणारा रोष उघडपणे, एका टार्गेटला अनुसरून, एकत्रितपणे व्यक्त झाला.
अण्णांची गांधींशी तुलना करून मीडियाने जनरल पब्लिकच्या आशा अपेक्षा आकांक्षा उगाचच उंचावून ठेवल्या आहेत असे मला वाटते. जरी अण्णा गांधींचा मार्ग अनुसरत असले तरी त्यांचे कार्य त्यांच्या स्थानी आहे व गांधीजींचे कार्य त्यांच्या स्थानी. तुलना करून एखाद्याचे खूप उदात्तीकरण करायचे आणि मातीचे पाय दिसले की बोंबा ठोकायच्या ही प्रवृत्ती घातक आहे. तसेच प्रत्यक्ष लोकपाल विधेयक संमत होऊन त्याबद्दलचे बिल पास होण्याला बराच अवकाश आहे, त्यात एक मोठी प्रक्रिया आहे, आणि ह्या सर्व प्रक्रियेचे ''बाइट्स'' मिळवण्यात व सतत लोकांच्या नजरेत अण्णांचे आंदोलन, त्यांची स्टेटमेंट्स ठेवण्यात मिडिया यशस्वी होईल ह्यात शंकाच नाही.... कारण त्याला टी आर पी जास्त आहे. सर्व लोकांचे हितसंबंध त्यात गुंतले आहेत.
तरुणाईला प्रेरणा द्यायला, ध्येय द्यायला अण्णांचा लढा भविष्यात कितपत पुरेसा पडेल हे काळच सांगेल.... परंतु खरोखर भ्रष्टाचाराचा नि:पात करायचा असेल तर त्यासाठी सुरूवात स्वतःपासून करण्याला पर्याय नाही. सरकारी ऑफिसेस, ट्रॅफिक पोलिस, हवालदार, प्रशासन इत्यादी कोठेही लाच द्यायची नाही - घ्यायची नाही, स्पेशल फेवर्स द्यायच्या / घ्यायच्या नाहीत, वशिले लावायचे नाहीत इत्यादींपासून सुरुवात करायला लागेल. माझी हे सर्व करायची तयारी आहे का? नियम पाळायची तयारी आहे का? इतरांनी नियम पाळले/ न पाळले तरी मी ते पाळणार, असा निर्धार मनाशी आहे का? हे प्रश्न लढ्यात सहभागी झालेल्या किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधात असलेल्या प्रत्येकाने स्वतःला विचारावेत. सध्या अण्णांच्या लढ्याने प्रेरित झालेल्या तरुणाईने ह्याचीही प्रतिज्ञा घेतल्यास व त्या प्रतिज्ञेच्या अंमलबजावणीचा श्रीगणेशा केल्यास मुळातून किंवा ''आम आदमी''पासून भ्रष्टाचार संपविण्याची ती सुरुवात असेल.
छान लिहीलाय लेख.. आगाऊ,
छान लिहीलाय लेख..
आगाऊ, अरूंधती ह्यांच्या पोस्ट्स पण आवडल्या..
मस्त योग्य शब्दात मांडलयस
मस्त योग्य शब्दात मांडलयस नचि.
Pages