ठकू आणि लच्छी!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

हा लेख मायबोलीच्याच एका जुन्या दिवाळी अंकासाठी लिहिला होता. थोडा परत एकदा हात फिरवून इथे टाकतेय.
---------------------------------------------------------------------------------------------------------
एकदाची ठकू लिहायला बसली तिनं ठरवलं आपल्या सगळ्यात आवडत्या मैत्रिणीवर, नाचर्‍या लच्छीवर लिहायचं. ठकू लिहायला बसली आणि लच्छी काही नाचून दाखवायला तयार नाही. कंटाळून ठकी तिथून उठायला लागली आणि लच्छी समोर येऊन बसली. "अशी कशी गं तू? लच्छी सापडायची तर लच्छी बनायला नको? ये चल टाक पावलं माझ्याबरोबर.." ठकूचा हात धरून लच्छी घेऊन गेली.

ही लच्छी आहे पु. शि. रेग्यांच्या 'सावित्री' मधे, त्यातल्या एका गोष्टीत. लच्छी आणि मोराच्या गोष्टीत. कांदबरीच्या सुरूवातीलाच ही गोष्ट येते आणि मग पूर्ण कांदंबरीतली सगळी पत्रे म्हणजे लच्छीचा मोर नाचताना पडलेली मोरपिसं व्हायला लागतात.

"... माझ्या नाचण्याचा ताल आता बरा जमायला लागलाय...."

गोष्टीत आहे एक म्हातारी आणि तिची नात लच्छी. त्यांच्या झोपडीशी एकदा मोर येतो. त्याला बघून लच्छी नाचायला लागते मग मोरही नाचायला लागतो. लच्छी हट्ट धरते की ह्याला इथंच बांधून ठेवावं. पण घरात मोराला घालायला काही दाणापाणी नसतो म्हणून म्हातारी नको म्हणते. शेवटी मोरच म्हणतो मी इथंच राहीन, मला दाणापाणी काही नको पण एक अट आहे. मी येईन तेव्हा लच्छीनं नाचलं पाहिजे. ती नाचायची थांबेल तेव्हापासून मी येणार नाही. लच्छी कबूल होते. पण असं हुकुमी नाचायचं म्हणजे सोपी गोष्ट नव्हे. मनही तसंच आनंदी हवं तेव्हापासून लच्छी आनंदीच राहू लागली. मोर कधी केव्हा येईल याचा नेम नसे. पुढे पुढे मोर येऊन गेला की काय याचं तिला भान रहात नसे.

पूर्ण कादंबरी पत्ररूपात आहे. कुण्या एका सावूने कुण्या एका सुहृदाला लिहिलेली पत्रे. यामधे तो सुहृद काहीच बोलत नाही. बोलताना, व्यक्त होताना दिसते ती सावित्रीच. त्यामुळे कादंबरीच्या सुरूवातीलाच आलेल्या या गोष्टीचं प्रयोजन उमजूनच जातं.

".... कसं करतेस तू लच्छी? आधी डावा की आधी उजवा?.. "

लच्छी मोरासाठी नाचत रहाते. मोर येतो आणि जातोही पण ती नाचतच रहाते. हे नाचणंच महत्वाचं होऊन जातं मोर येण्यापेक्षा. मोर यायलाच हवा याची गरज वाटेनाशी होते कारण नाचता नाचता ती स्वत:च मोर होते. हेच तर सावू सांगते कादंबरीत.. 'मोर हवा तर आपणंच मोर व्हायचं. जे जे हवं ते आपणंच व्हायचं. मोराला आपल्यातंच कुठेतरी ठेवून द्यायचं मग तो जाईलच कुठे? पण मोर आत भिनायला हवा तर मग आनंदी राह्यलंच पाहिजे.'

".. छे मला जमतच नाहीये हा तुझा पदन्यास.."
" माझ्या हातात हात दे.. जमेल.."

ही लच्छी आनंदभाविनी (रेग्यांचाच शब्द पण किती चपखल). मोरासाठी का होईना पण कायम आनंदात असणं हेच तिचं प्राक्तन. आणि मोर हवासा झाला की त्या आनंदातच आपणच नाचून आपल्यातल्या मोराचा पिसारा फुलवणं हे ही. हे तिचं आनंदभाविनीपण खूप काही सांगून जातं. सुंदर आयुष्याच्या सुंदर तालावर डौलात पावलं टाकत जगणं हे खरं जगणं. असं जगता यायला हवं. असं सगळ्यांनीच जगायला हवं हेच तर लच्छी सांगत रहाते. अर्थात यासाठी खूप मोठं बळ लागतं. लच्छी हे बळ मिळवते मोराच्या आशेमधे. पण नंतर या बळाला, आशेला कसलाच अर्थ उरत नाही. एकदा नाचायची, तालाची सवय होण्यापुरतं हे बळ. मग नाचण्याची नशाच तुम्हाला पुढे घेऊन जाते. यामधे नशा आहे पण ती उन्मत्त नाही. काहीही जिंकण्याची ओढ, मिळवण्याची लसलस नाही. जी काय आशा आहे ती आपल्या मोराची जी पुढे गळून जाते. असं जगणं जमलं पाहिजे.

".. अशी सुंदर लवलवते लच्छी. मला कधी जमेल?.."
"थांबू नकोस! पावलं टाकत रहा... "

"आयुष्याला सुंदर नाच म्हणणं सोपं आहे गं बये पण ताल बिघडायला काय वेळ?"
"तुमचा ताल तुम्हीच ठरवायचा, मग इतर कोण कशाला बिघडवेल तो?"

आपलं जगणं हे काही सतत सुंदर कुठे असतं? ते तसं करणं हे आपल्या हातात असतं. या जगण्याला कसं सामोरं जायचं हे महत्वाचं. शेवटी ताल कधीच सुटता कामा नये.

"... पावलामागून पावलं.. कित्ती मज्जा!!.."

माझा माझा मीच ठरवलेला ताल तो जपत मापत नाचत रहायचं. सतत तालाकडे लक्ष. काळाचा एक ठराविक तुकडा संपला की मगच पाय पडला पाहिजे. आधी नाही आणि नंतरही नाही. किती लक्षपूर्वक केलं तरी चुकतोच, सटकतोच ताल, तुटतेच लय. मग लयीचे तुटलेले छोटे छोटे तुकडेच आयुष्यात उरतात.

"..पावलांच्या या उचलण्याला नी परत टाकण्याला पदन्यास म्हणतात का?.."
"जास्त विचार करू नकोस मार एक गिरकी. नको करू काळाच्या तुकड्यांची काळजी!.."

जगण्याची लय शोधायची नाही, आपणच बनवायची आणि मग सोडून द्यायचं स्वत:ला त्या लयीबरोबर. लयीचं ओझं नाही होऊ द्यायचं. ते भान सुटलं पाहिजे. भान विसरता आलं पाहिजे तरंच लय सुटणार नाही. आयुष्याचा ताल चुकणार नाही. म्हणजे भान सुटलं तरी नाचत रहायचं..

".. जमायला लागलंय का गं मला?.."
"विचारतेस म्हणजे नसावंच जमत अजून!"
"..मग कसं करू आता?.."
"मी कसं सांगणार? तुला लच्छी व्हावं लागेल त्यासाठी."
"............."
"अगं नाचाकडे का लक्ष तुझं?"
"..मग?.."
"कुठे आलीस बघ तरी तू! कसं वाटतंय आता?"
"... अरे हो!.."
"आनंदभाविनी हा तुलाच आवडणारा शब्द ना?"

तसं पाह्यलं तर खुद्द मोराला तरी नाचता कुठे येतं. एक पाय उचलला की तोल जातो. तो सावरायला म्हणून तो लगेच पाय खाली टेकतो आणि दुसरा पाय उचलतो. पुन्हा तीच तर्‍हा... असं add infinitum. बघणारे त्यालाच नाच म्हणतात...

- नी

विषय: 
प्रकार: 

सुंदर तालात केलेलं लिखाण आहे. भुरळ घालून गेल्या काही ओळी.
एखादी कळी उमलत जावी आणि त्या कळीचं एका सुरेख फुलात रुपांतर व्हाव अश्याच त्या ओळी आणि त्या ओळींचं ललित ! कुपीतला सुगंध जपून आणि जपवून वापरण्याच्या पलिकडे जाऊन काल सुंग्धखाणीची सफर वाचायला मिळाली आणि आज हे चक्क तालात बेभान करणारं लिखाण.

खरोखर एखादी गोष्ट मनापासुन करायची ठरवली कि लय महत्वाची आणि ती लय ठरवताना आपलं नाजुक पाऊल खंबीरपणे पडायला हवं पण सावरण्यासाठी ते गाडायला लागत नाही. ते पाऊल हळूवारच ठेवावं लागतं मग एकसंथ आणि संतुलित ताल यांची योग्य सांगड घालताना आपलं पाऊल कधी यशस्वीपणे पडत जातं हे कळंतच नाही. पण तरीही कधी कधी एखादा ताल किंवा नाद आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरतो पण कधी कधी त्या तालात दंग होता आपल्याला कशाचेही भान उरत नाही? आपल्याच नादात वाहवत जाणे किंवा त्या तालात दंग होऊन स्वतःला विसरणे हे आपल्या दृष्टीने तालच असला तरी इतरांच्या दृष्टीने तो बेताल का ठरतो? तो ठरणं हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं कि ते बेताल ठरवणार्‍यांवर ? शेवटी माझं आयुष्य हे आरश्यात बघुन जगण्यापेक्षा मी माझ्या स्व:तामधे डोकावून बघण्यातच आयुष्याचं सार आहे हे प्रत्येकाला जाणून घेता आलं पाहीजे.

या विषयी माझ्या गुरुमाऊली म्हणजे आईने काही सांगितलं होत ते आठवलं.

आपल्या भगवंतानं आयुष्य दिलं आणि त्याचा कार्यभाग संपवला असं नाही. त्यानं प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी अनुभुती या दिल्याच पण त्या आजमावणं सगळ्यांनाच जमलं असं नाही. काहींना त्या शोधता आल्या पण आजमावता आल्या नाही.काहींना शोधता आलं आजमावता आलं पण सुखाच्या व्याख्या क्षणोक्षणी बदलणार्‍यांना ते सांभाळणं जमलच नाही. काही अजूनही शोधतायेत आणि जगतायेत. काही मात्र खुप दुर क्षितीजावर उभे राहून हसमुखाने त्या अनुभुतींना आणि स्वत:ला आभार आणि आभिनंदन करणारे तुला दिसतील. पण काही मात्र अश्याच भरकटलेल्या आणि दिशाहीन मळकटलेल्या देहाने आपले आयुष्य कुरतडताना का होईना पण जगणारे तुला दिसतील. आता यात तुच ठरव तु स्वतःला कुठे पहायचं ! आणि स्वतःला कुठे रमवायचं. तालानुसरून एकदा का ठेका,सुर पकडलास कि तु ही दंग आणि तुला पाहणारे ऐकणारे सुद्धा केव्हा मंत्रमुग्ध होऊन जातील हे तुलाही कळणार नाही.

कदाचित असंच एक आनंदी वलय या लेखाच्या/ललितच्या निमित्ताने माझ्याभोवती निर्माण झालंय यात काही वादच नाही. लेखाचं आणि लेखिकेचं यश यापेक्षाही नामंनिराळं इथे काही असेल तर ते म्हणजे एक सुरेख "आत्मचिंतन" करायला लावणारा लख्ख प्रकाश.

धन्स सगळे.
गोजिरी तुमचं पोस्ट समजून घेते आहे. मी स्वतः कणभरपण अध्यात्मिक नसल्यामुळे मला अवघड जातं हे समजायला.

नीरजा.... भन्नाट.
".. जमायला लागलंय का गं मला?.."
"विचारतेस म्हणजे नसावंच जमत अजून!"
..... भान न सुटल्याचं लक्षण.

गोजिरीची पोस्ट... खास आहे!

भान अन बेभान... बेभान म्हणजे बेताल नव्हे. ताल्/लय महत्वाचं. एकदा अंगात भिनले की आपल्या असण्याचा भाग होतात... मग त्यांचं भान आपल्यापुरतं नुरतं. गोम आहे ती, "आपला" ताल अन "आपली लय" मिळण्यात.
नाहीतर आयुष्यं दुसर्‍याच्या तालावर अन न झेपणार्‍या लयीत घुमण्यात जातं....

सुंदर लेख, नीरजा...

गोम आहे ती, "आपला" ताल अन "आपली लय" मिळण्यात.
नाहीतर आयुष्यं दुसर्‍याच्या तालावर अन न झेपणार्‍या लयीत घुमण्यात जातं....<<<<
क्या बात कही दाद!!
एकदम तिरकिटधा... Happy

नी,
अतिशय अप्रतिम आहे हे!!
खूप खूप खूप आवडलं!

जे जे हवं ते आपणंच व्हायचं. मोराला आपल्यातंच कुठेतरी ठेवून द्यायचं मग तो जाईलच कुठे? पण मोर आत भिनायला हवा तर मग आनंदी राह्यलंच पाहिजे.>>>अगदी अगदी पटलं!

जगण्याची लय शोधायची नाही, आपणच बनवायची आणि मग सोडून द्यायचं स्वत:ला त्या लयीबरोबर. लयीचं ओझं नाही होऊ द्यायचं. ते भान सुटलं पाहिजे. भान विसरता आलं पाहिजे तरंच लय सुटणार नाही. आयुष्याचा ताल चुकणार नाही. म्हणजे भान सुटलं तरी नाचत रहायचं..

>>>>>खासच!!!

Happy सुंदर.. आधीही वाचलेलं.. Happy त्यानिमित्ताने परत साऊ आठवली. Happy पण हे मस्तच..

दाद, तुमचे प्रतिसादही आवर्जून वाचावे असेच असतात नेहमी.. Happy

गोजिरी, Happy सुंदर लिहिलय.

नी, आधी वाचलेली, आवडलेली... आज पुन्हा वाचली, नव्याने समजली आणि खूप आवडली.... Happy
लिहीत राहा गं... विचारांना नवीन खाद्य पुरवतेस नेहमी!

गोजिरी मस्त लिहीलयंस, तुझ्या आईने सांगितलेलं म्हटलं तर सोप्प आहे म्हटलं तर अवघड! Happy पुन्हा वाचेनच, कुणी सांगावं, हरवलेले संदर्भ नव्याने सापडतील कदाचित... Happy
तुच ठरव तु स्वतःला कुठे पहायचं ! >> हे बाकी १०००% पटलं.. आत्मपरीक्षण नी सिंहावलोकन महत्वाचं!!!

दादची दाद म्हणजे मन मोराचा जसा पिसारा फुलला Happy

भान अन बेभान... बेभान म्हणजे बेताल नव्हे. ताल्/लय महत्वाचं. एकदा अंगात भिनले की आपल्या असण्याचा भाग होतात... मग त्यांचं भान आपल्यापुरतं नुरतं. गोम आहे ती, "आपला" ताल अन "आपली लय" मिळण्यात.
नाहीतर आयुष्यं दुसर्‍याच्या तालावर अन न झेपणार्‍या लयीत घुमण्यात जातं....>>
क्या बात है, दाद ! मूळ लेखाइतकाच सुंदर प्रतिसाद...कायम मनात जपून ठेवावा असा.