'सरकार राज' बघितला.. आणि अपेक्षेप्रमाणे अपेक्षाभंग झाला.
ढणाण पार्श्वसंगीत, सतत हलता कॅमेरा, विचित्र angles, टाईट close ups या सगळ्यांचा पहिल्या दहा मिनिटांनंतर त्रास व्हायला लागतो. हे सगळं 'कौन', 'भूत'मध्ये ठीक होतं, पण इथे मात्र रामूच्या या तंत्राचा अतिरेक झाला आहे.
बरं नवीन सिनेमा आहे, तर त्याला नवी पटकथा लिहायला हवी, हे रामू विसरला. थोडे तपशीलातले फरक, संघर्षासाठी नवी पार्श्वभूमी, आणि पहिल्या भागातले व्हिलन सरकारने पहिल्या भागातच मारल्याने ३-४ नवीन व्हिलन एवढाच काय तो फरक. आणि जे काही चित्रपटात घडतं, तेसुद्धा बच्चन फॅमिलीला विविधगुणदर्शनाची संधी मिळावी म्हणूनच.
मराठवाड्यातल्या ठाकरवाडी भागात एक पॉवर प्लांट उभारण्यासाठी ऐश्वर्या भारतात येते, आणि संघर्ष पेटतो.. पण सिनेमात गावकर्यांचं पुनर्वसन इ. प्रश्न फारसे येतच नाहीत. हाणामारीसाठी (आणि सूनबाईंना सिनेमात आणण्यासाठी) ते आपलं एक निमित्त.
आणि ऐश्वर्या अक्षरशः डोक्यात जाते. एका बड्या MNC ची CEO ती अजिबात वाटत नाही. तिची आणि अभिषेकची अपेक्षित असलेली अनोळख कुठेच जाणवत नाही. अभिनयाची नेहमीप्रमाणे बोंब. चक्क तनिशा तिच्यापेक्षा खूप सुसह्य.
चेहरा मख्ख ठेवून खर्जात बोलणे म्हणजे अभिनय असा अभिषेकचा समज झालाय बहुतेक. पण अमिताभ मस्त. अनेक प्रसंगांत त्याचे डोळेच खूप बोलून जातात. काही दु:खद प्रसंगांनंतर त्याचं कोसळून जाणं, सावरणं, आपण 'सरकार' आहोत या जाणिवेबरोबरच कोणाचेतरी बाप, कोणाचेतरी शिष्य आहोत हे भान ठेवत अनेक प्रसंगात प्रत्यक्ष वावर नसतांनाही तो आपलं अस्तित्व जाणवून देतो.
पण सगळ्यात उत्तम कास्टिंग म्हणजे आपले दिलीप प्रभावळकर, रवी काळे, उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे हे कलावंत. अनेक प्रसंगात ही मंडळी बच्चन कंपनीला कच्चं खाऊन टाकतात. सगळ्यात वाईट म्हणजे सुप्रिया पाठकसारखी भन्नाट अभिनेत्री १-२ प्रसंगांत आणि ते सुद्धा फक्त आपली मागे उभी राहते.
'सरकार राज'पेक्षा मला 'सरकार' बराच बरा वाटला. उगीच मोठे साहेब, धाकटे साहेब, मुख्यमंत्री, एन्रॉन असली साम्यं शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा रामूने जरा पटकथेकडे लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं...
सरकार राज - अपेक्षाभंग
Submitted by चिनूक्स on 7 June, 2008 - 00:00
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
सरकार
सरकार राज.....
बकवास....
पहिला अर्धा भाग कासवाच्या आणि नंतरचा अर्धा भागगोगलगाईच्या गतीनी सरकतो या सिनेमात....
सतत अंधार, (एका खोलीत दिवा लावायचा आणि शेजारच्या अंधार्या खोलीत बसायचं)
सतत टाईट क्लोज्-अप्स...
कथेच्या नावानी तर बोंबच आहे...
मनात येइल तसं वाकवलंय... आणि शेवटी तर चक्क मोडलय....
अमिताभ बरा आहे पण शेवटी तो ही पकवतो...
अभिषेक ला सांगा कि मख्खं चेहेरा ठेउन खर्जात बोलणं म्हणजे अभिनय नाही...
ऐश्वर्या तर उगाच आहे... ती नागरे फॅमिली मधली असल्यासारखीच कुठेही वावरते....
बघायचाच असेल तर DVD येई पर्यंत थांबा...
आणि ती DVD 2x speed ला बघा...
सरकार राज
सरकार राज पाहू नका. अति फालतू आहे. राम गोपाल वर्मा अंधारात शूटींग करून करून वेडा झालाय वाटते.
सरकार राज
सरकार राज पाहुन वीकेंड खराब केला, अगदि सेम सरकार सारखाच, सेम ओल्ड विस्कि इन अ न्यु ग्लास.
इतक्या
इतक्या सगळ्यांनी सांगूनही काल मी "सरकार राज" पहाण्याचा (नसता ) शहाणपणा केला!!
अमिताभ असला की मन अपने आप खींचा चला जाता है.. न जाणो चुकूनमाकून भेटलाच कधी तर सांगता यावं त्याला की असले सिनेमे करत जाऊ नकोस बाबा! आमच्याही इभ्रतीचा सवाल आहे!
खरतर रामूने..इंटरवल च्या आधी सरकार आणि नंतर सरकार राज असा सिनेमा काढला असता तरी चालले असते. म्हणजे उगाच जास्तीचे पैसे त्याच त्याच लोकांना देणे, त्यांच्या मिनतवार्या करून तारखा घेणे , महाराणींचा १० लाखांचा "आयगियर" का काय म्हणतात त्याला त्याचे बिल पाहून ते चुकते करणे असले फालतू मनस्ताप वाचले असते!! पुन्हा आम्हालाही एकाच तिकीटात ३ तासात जो काय रक्तपात आणि अंधार बघायचा असता तर ते ही पुण्य त्याच्या गाठीला मिळाले असते..पुढच्या "चीकू सरकार" साठी!!
शंकर्यासाठी इतक्या जणांना मारताना बघून असं म्हणावसं वाटलं की आता आम्हालाही मारून टाका सरकार हा सिनेमा पाहायला आल्याबद्दल!
आणि ती ऐश्वर्या सारखी एकाच डोळ्याने का बरे रडते? त्या डोळ्यात ग्लिसरीन जास्त पडले असावे... आणि फु़कट मिळालेल्या
"आयगियर" च्या आनंदात तिच्याही ते लक्षात आले नसावे!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...
आमच्या
आमच्या बिल्कुल खात्री न देता येणार्या सूत्राकडून आलेल्या माहिती नुसार....
|
चीकू सरकार (पात्रपरिचय)
|
चीकू सरकार / छोटे सरकार-
चहा च्या ऐवजी चिकू मिल्कशेक पिणारा आणि 'गोविंदा गोविंदा' च्या तालावर नाचणारा गोविंदा
काळजीवाहू सरकार / राणीसरकार-
विना मेक्-अप ची आणि जाड भिंगाचा 'आयगिअर' लावणारी ऍश
सरकार / बडे सरकार-
१ महिना अंघोळ आणि जेवण न केलेला पण मानेपर्यंत सोनेरी डाय केलेले केस असलेला अमिताभ
छोटे सरकार चा computer / P C सरकार-
(ही या सिनेमा ची खास concept आहे... हा computer निर्णय कसे घ्यायचे आणि काय logic वापरायचं आणि इंद्रजाल कसं निर्माण करायचं हे छोटे सरकार ला शिकवतो...).. खास भूमिकेत... जादूगार पी. सी. सरकार... (फक्त आवाज)
|
सध्या एवढीच माहिती मिळाली आहे... आणखी माहिती मिळाली की त्वरित पोस्ट करण्यात येईल...
|
|
त.टी.- ज्या सूत्राकडून माहिती मिळालेली आहे ते वर उल्लेखल्याप्रमाणे काडीमात्र विश्वासार्ह नाही... त्यामुळे उपरोक्त माहितीचा पुनर्वापर सतःच्या जबाबदारीवर करावा... माहिती असत्य सिद्ध झाल्यास आम्ही जबाबदार नाही...
पी सी
***
The facts expressed here belong to everybody, the opinions to me. The distinction is yours to draw.