श्री. आत्माराम भेंडे आणि श्रीमती आशा भेंडे यांची रंगभूमीवरील व चित्रपट-जाहिरातक्षेत्रांतली कारकीर्द तशी सर्वांच्याच परिचयाची आहे. उत्तम अभिनेते व दिग्दर्शक म्हणून नावाजले गेलेले श्री. आत्माराम भेंडे यांचं 'आत्मरंग' हे आत्मचरित्र काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं. अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी नाव कमावलं. प्रामाणिकपणे नोकरी करून अनेक मानसन्मान मिळवले. बबन प्रभूंसारख्या मनस्वी कलाकाराबरोबर नाटकं गाजवली, आणि त्यांना आधारही दिला. एक सज्जन कलावंत, असा लौकिक मिळवला.
श्रीमती आशा भेंडे यांचं आत्मचरित्र दोन वर्षांपूर्वी पद्मगंधा प्रकाशनानं प्रसिद्ध केलं. 'माझ्या जगात मी' हे या आत्मचरित्राचं नाव. आत्मचरित्रापेक्षाही आठवणींचं हे एक संकलन आहे. घरातल्या, नातागोत्याच्या, सहकार्यांच्या आणि सहवासात आलेल्या व्यक्तींच्या या आठवणी. अतिशय आपुलकीनं सांगितलेल्या. कटुतेचा लवलेशही नसलेल्या. आशाताईंनी वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात बरंच काही मिळवलं. पण या प्रवासातल्या अडचणींचा, अपमानांचा पुसटसा उल्लेखही न करणं, हे त्यांच्या सुसंस्कृत मनाचं द्योतक आहे.
आशाताईंचा जन्म एका ज्यू घरातला. सुशिक्षित, संयमी असं हे घर. विचारस्वातंत्र्य देणारं. वडील प्रो. मोझेस इझिकेल मुंबईच्या विल्सन कॉलेजात प्राध्यापक होते. नंतर गुजरातेतल्या दोन कॉलेजांत ते प्रिन्सिपॉल होते. आईचं नाव डायनाबाई इझिकेल. डोंगरी परिसरात त्यांनी विजय विद्यालय नावाची शाळा सुरू केली होती. भाऊ निस्सीम इझिकेल हे जगप्रसिद्ध कवी. 'पद्मश्री' या पुरस्कारानं सन्मानित झालेले. दुसरे भाऊ, श्री. हानाह इझिकेल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत भारताचे प्रतिनिधी होते. नंतर त्यांनी 'इकनॉमिक टाइम्स'चं संपादकपद भूषवलं. बहीण डॉ. सेरा अगोदर भारत सरकार आणि नंतर संयुक्त राष्ट्रसंघात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होत्या.
आशाताईंना लहानपणापासूनच संगीतनृत्यअभिनय यांची आवड होती. कुमार गंधर्वांचे गुरू असलेल्या प्रो. देवधरांकडे त्या दोन वर्षं गाणं शिकल्या होत्या. १९४२ साली मुंबईत भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी गांधीजी आणि नेहरूंसमोर गाणं म्हटलं होतं. पुढे गुरू पार्वतीकुमारांकडे त्या नृत्य शिकल्या. मग नाटकं आणि रेडिओवरील श्रुतिका. छोटा गंधर्व, लीला चिटणीस, नंदकुमार रावते, गोपीनाथ सावकार अशा दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी काम केलं. 'तुझे आहे तुजपाशी', 'दिनूच्या सासूबाई राधाबाई', 'झोपी गेलेला झाला जागा', 'पळा, पळा, कोण पुढे पळे तो', 'साक्षीदार' ही त्यांची नाटकं बरीच गाजली.
बी. ए.नंतर त्यांनी शिक्षण सोडलं आणि रेडिओत नोकरी स्वीकारली. आशाताईंनी या काळातल्या अतिशय हृद्य अशा आठवणी लिहिल्या आहेत. नानासाहेब फाटक, शांता आपटे, दुर्गा खोटे, शांता शेळके, दुर्गाबाई भागवत, बाई सुंदराबाई अशा व्यक्तींचा सहवास, आणि त्यातून मिळालेलं जीवनाचं शिक्षण. रेडिओ आणि नाटकांच्या निमित्तानं ओळख झालेल्या आत्माराम भेंड्यांशी त्यांनी विवाह केला, आणि त्यांच्याच आग्रहावरून पुढे शिक्षणही सुरू केलं. मुंबई विद्यापीठातून एम.ए आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची पदविका त्यांनी मिळवली. पुढे फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळवून बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी ’मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ’ ही पदवी मिळवली. भारतात परतल्यावर संयुक्त राष्ट्रसंघानं भारत सरकारच्या मदतीनं स्थापन केलेल्या 'इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्यूलेशन सायन्सेस’ या संस्थेत त्या प्रकल्प प्रमुख म्हणून रुजू झाल्या. पुढे पी. एचडी.साठी संशोधन केलं. नोकरी करत असतानाही त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये भूमिका केल्या. शिवाय अनेक शोधनिबंध, पुस्तक लिहून आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची ओळख निर्माण केली.
निवृत्तीनंतरही आशाताईंनी अनेक जबाबदारीची पदं भूषवली. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेतर्फे केनियात तीन महिने प्रकल्प सल्लागार म्हणून काम केलं. पुढे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडसाठीही काम केलं. एड्सबद्दल फार कोणाला माहिती नव्हती, अशा काळात मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये याबाबत जनजागृती केली. आरोग्यसेवा व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देणार्या 'आशीष ग्रामरचना ट्रस्ट'चं अध्यक्षपद भूषवलं. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या लोकसंख्या शिक्षण सल्लागार समितीच्या सदस्य आणि निमंत्रक म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केलं. 'भारतातील ज्यू' या विषयावर संशोधन करून पुस्तकही लिहिलं. 'ओ. आर. टी' या ज्यू समाजासाठी कार्य करणार्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं हे पुस्तक प्रकाशित केलं. याच संस्थेनं तयार केलेल्या अनेक माहितीपटांसाठी त्यांनी पटकथा लिहिल्या. लोकसंख्याशास्त्रावर अनेक पुस्तकं लिहिली.
या कामाबद्दल बोलताना आशाताई लिहितात - 'आता मी मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येतं की, मी तृप्त आहे, समाधानी आहे. सर्वच आघाड्यांवर. हीच स्थिती शेवटपर्यंत राहावी ही एकच इच्छा, आणखी काही नाही. आमचे पपा शेवटी शेवटी म्हणायचे तसं म्हणावसं वाटतं, "आता फक्त एका टेलिफोनची वाट पाहत आहे..."
गेल्या वर्षी श्रीमती आशा भेंडे यांचं निधन झालं. त्यांचं आत्मचरित्र त्याआधीच प्रसिद्ध झालं होतं. आपलं कुटुंब, रेडिओ आणि नाटकचित्रपटजाहिरातींतले दिवस, नोकरी आणि सामाजिक क्षेत्र यांबद्दल त्यांनी लिहिलंच, पण मनात घर करणार्या अनेक व्यक्तींबद्दलही लिहिलं. कैरोला भेटलेले डॊ. सोहनसिंग आणि दिल्लीला भेटले डॉ. शूलनेल हे जर्मन विद्वान आशाताईंना कायम स्मरणात राहिले. आशाताईंनी सांगितलेल्या त्यांच्या आठवणी या पुस्तकाला खूप उंचीवर नेऊन ठेवतात. संस्कारक्षम मन कसं असतं, हे शिकवणार्या या आठवणी आहेत.
'माझ्या जगात मी’ या आत्मचरित्रात आशाताईंनी 'आईं'बद्दलही लिहिलं. आत्माराम भेंडे यांच्या या आई. आंतरशाखीय विवाहही जेव्हा होत नसत, त्या काळी ज्यू सुनेला आनंदानं आपलंसं करणार्या आई अतिशय कणखर आणि तितक्याच प्रेमळ होत्या. आधुनिक विचार सहजगत्या आपलेसे करणार्या, आणि ते तितक्याच सहजपणे आचरणात आणणार्या आईंचं हे सुरेख शब्दचित्र, 'माझ्या जगात मी' या पद्मगंधा प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातून...
हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Mazya-Jagat-Mee.html
आम्ही दोघांनी लग्न करायचं तर ठरवलं, पण भारतीय संस्कृतीत एका लग्नामुळे दोन कुटुंबं एका विशिष्ट नात्याने बांधली जातात याचं भान आम्हांला होतं. मुलीच्या बाबतीत तर तिला या आपल्या नवीन कुटुंबात पूर्णपणे सामावून घ्यावं लागतं. मला काही जगावेगळं करावं लागणार आहे, असं मला कधीच वाटलं नाही. मी परधर्मीय, तेव्हा ह्या भेंडे कुटुंबात माझा स्वीकार होईल की नाही अशी शंकासुद्धा त्या वेळी माझ्या मनात डोकावली नाही. कारण माझा ह्याच्यावर पूर्ण विश्वास होता आणि सर्व काही सुरळीत होईल, याबद्दल मला खात्री होती.
एक दिवस हा मला म्हणाला, "आईला तुला भेटायचं आहे". ह्याच्या आईबद्दल मला आधीच याने एवढं सांगितलं होतं की, मी कुणा परक्या बाईला प्रथमच भेटते आहे, असं मला वाटलंच नाही. पतीच्या निधनानंतर आत्मविश्वासाने घर चालवणारी कर्तबगार कुटुंबप्रमुख, वृद्ध, अपंग सासर्याची सेवा करुन त्यांच्याकडून 'आई' हे संबोधन मिळवणारी भाग्यवान सून, आरोंदा गावात कुणाच्याही मदतीला धावून जाणारी वहिनीबाय. ह्याचा पाय फ्रॅक्चर झाला तेव्हा वर्षभर ह्याला घरी बसून राहावं लागलं, तेव्हा त्याला अनेक कामांत गुंतवून ज्याला आज आपण ऑक्यूपेशनल थेरपी म्हणतो, त्याचा उपयोग करणारी आणि ह्याला कुबड्या वापरायला लाज वाटू नये म्हणून मुंबईबाहेर अनोळखी ठिकाणी जागा घेऊन राहणारी समजूतदार आई, एकेकाळी अंगावर ढीगभर दागिने मिरवणारी, परंतु नंतर परिस्थितीमुळे हे दागिने विकावे लागले तरी त्याबद्दल कधी एक चकार शब्दाने कुरकुर न करणारी, अलिप्त वृत्तीची धीरोदात्त बाई, अशा किती तरी रूपांत त्यांची माझी ओळख झाली होती.
आमची पहिली भेट ५७ वर्षांपूर्वीची. मला चांगलीच आठवते. त्या अगदी शांतपणे माझी चौकशी करत होत्या. अगदी नेहमी बोलल्यासारखं - मुद्दाम जास्त गोड नाही की जास्त कडवटपणे नाही. सर्व कसं नैसर्गिक वाटावं असं. त्यानंतर लग्नापूर्वी दोनदा भेट झाली. एकदा त्या गावाहून आल्या तेव्हा स्टेशनवर त्यांना आणायला मी गेले तेव्हा - हा बाहेरगावी गेला होता म्हणून - आणि दुसर्या वेळी माझ्यासाठी, मंगळसूत्र बनवण्यासाठी मुगभाटातल्या पुरुषोत्तम कंपनीकडे मला त्या घेऊन गेल्या तेव्हा. मला आठवतं, स्टेशनवरून त्यांनी मला त्यांच्या घरी नेलं - खंडेराव चाळीत. खरं म्हणजे ती जागा बघून मला धक्का बसायला हवा होता. आम्ही चाळीत कधीच राहिलो नव्हतो. ही चाळीतली माळ्यावरची दीड खोलींची जागा. तिथे यांचा भाऊ, त्याची पत्नी, त्यांची तीन छोटी मुलं, आई आणि हा, सगळे कसे राहत असतील? मला वाटते मी त्या वेळी कुठलीही परिस्थिती स्वीकारायच्या मन:स्थितीत होते. मुख्य म्हणजे ह्याचा तर आधार होताच, पण आता मला आईंचासुद्धा आधार वाटायला लागला. होय, मी त्यांना 'आई' म्हणायला सुरुवात केली तेव्हापासूनच.
आमचं लग्न पार पडलं - अगदी साधेपणाने - रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये. साक्षीदारांमध्ये ह्याचे मोठे भाऊ दादा, माझा मोठा भाऊ ज्यो आणि आम्हां दोघांचे रेडिओवरील सहकारी नारायण देसाई. हे तिघे, शिवाय माझे आईवडील, माझी बहिण, माझी मैत्रीण मधुबाला कशाळकर, ह्यांच्याकडली त्यांची वहिनी आणि दोन छोटे पुतणे, एवढीच माणसं होती. आई हजर नव्हत्या. मला वाटलं ह्याचे भाऊ टायफॉइडने आजारी होते, हे कारण असेल, पण बर्याच वर्षांनी कळलं की, मुलाच्या लग्नविधीला त्याच्या आईने हजर राहता कामा नये; असा रिवाज आहे. का? ते मला अजूनही कळलेलं नाही.
या लग्नामुळे आम्हां दोघांना कुठल्याच टीकेला तोंड द्यावं लागलं नाही. मित्रमंडळींनी मेजवान्या दिल्या, घरी बोलावून शुभचिंतन केलं. टीकेची झेल सहन करावी लागली ती माझ्या आईला - जी अगदी ज्यू वस्तीत शाळा उघडून शिक्षण कार्य करीत होती आणि ह्याच्या आईला. लग्नानंतर बर्याच वर्षांनी मला कळलं की, आईंना एक प्रश्न सतत विचारला जाई - विशेषतः बायकांकडून, "काय हो तुम्हाला सारस्वतांत सून मिळाली नाही का?" त्यावर त्या म्हणायच्या, "दोन करून बघितल्या". हे मी सांगते आहे ते माझ्या दोन मोठ्या जाऊबाईंना कमीपणा देण्याच्या दृष्टीने नव्हे, तर आईंच्या हजरजबाबीपणाचं आणि टीकेला चोख उत्तर देण्याच्या पद्धतीचं एक उदाहरण म्हणून. शिवाय आपल्या मुलाची निवड कधीच चुकणार नाही यावद्दल त्यांना पूर्ण विश्वास होता.
सुरुवातीला तीन महिने आम्ही ठाकूरद्वारच्या नॅशनल हॉस्टेल नावाच्या एका गेस्ट हाऊसमध्ये राहिलो. माझं म्हणणं होतं, स्वतंत्र जागा मिळेपर्यंत खंडेराव चाळीत राहायला मी तयार आहे. पण ह्याने मला समजावलं. हा म्हणाला, "एकदा का आपण तिथे राहिलो की स्वतंत्र जागा मिळाल्यावर आपण 'वेगळे' झालो असंच म्हटलं जाईल आणि त्याचा सर्व दोष तुला दिला जाईल". मला हे असलं काही सुचलंच नव्हतं. ह्याला समाजजीवनाचं ज्ञान माझ्यापेक्षा अर्थातच अधिक होतं. पण आम्ही रोज संध्याकाळी आईंना भेटायला खंडेराव चाळीत जात असू. खंडेराव चाळीत त्या बायका रोज माझी वाट पाहत चाळीच्या गॅलरीत गर्दी करत आणि मी खाली मान घालून, त्यांच्या नजरा चुकवून, सरळ जिना चढून वर जात असे. या रोजच्या प्रकारात खंड पडे तो माझं रेडिओवर श्रुतिका, नभोनाट्य वगैरे असलं तरच (तेव्हा मी रेडिओवर स्टाफ आर्टिस्ट म्हणून नोकरी करत होते आणि रेकॉर्डिंगची सोय नसल्यामुळे सर्व कार्यक्रम लाइव्हच होत असत). ह्या जवळजवळ रोजच्या फेरीमुळे माझे-आईंचे प्रेमाचे संबंध दाट होत गेले.
आमचं लग्न झालं जून १९५०मध्ये. त्यानंतरचा पहिला मोठा सण म्हणजे गणेशचतुर्थी. भेंड्यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असे. आईंनी मला सांगून ठेवलं, "दर्शनाला बायका येतील त्यांना फुलं, अत्तर वगैरे तू द्यायचं. मुळीच लाजायचं नाही". मी हिंदू नाही हा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवला नव्हता आणि फुलं, अत्तर वगैरे द्यायला मला मजा वाटली. माझा त्या घरात पूर्णपणे स्वीकार झाला होता हे सगळ्यांना कळायला लागलं होतं. मी ह्याच्या भावाला 'अप्पा' म्हणायला लागले, वहिनीला 'वहिनी'. भाऊ, बाळ, जयंत आणि नंतर झालेल्या उषाला मी परकी राहिले नाही. त्या सर्वांची मी 'काकी' झाले.
लग्नानंतर तीन महिन्यांनी आम्ही अंधेरीला दोन खोल्यांत संसार थाटला. म्हणजे आईंनीच थाटून दिला. मला घरकामाची सवय आणि आवडसुद्धा नव्हती हे ओळखून आईंनीच आम्हांला खेडेगावातून आलेली विमल नावाची मुलगी आमच्या सोबतीला आणि कामाला मिळवून दिली. निमाच्या जन्मानंतर माझ्या माहेरी बारसं झालं. त्यानंतर आईंनी ह्याच्या हाती मला निरोप पाठवला, "आता तू अंधेरीला आपल्या घरी ये. तुझी आई दिवसभर तिची शाळा सांभाळण्यात गुंतलेली असते. मी इथे मोकळीच आहे". ममीला वाईट वाटलं, पण मी तिला पटवून दिलं आणि तिची समजूत घातली. अंधेरीला निमा आजारी पडू लागली तेव्हा ममीने सुचवलं, "इथं कुलाब्याला ज्योचा फ्लॅट खूप मोठा आहे. तुम्ही सर्वच इथं या, निमाला बरं वाटेल". आणि मग निमा तीन महिन्यांची असताना आम्ही सर्व, अगदी आई आणि विमलसकट कुलाब्याला येऊन दाखल झालो आणि चांगले चारपाच महिने राहिलो. त्या काळात आईंची आणि ममीची चांगलीच मैत्री जमली ती अगदी शेवटपर्यंत. गंमत म्हणजे आई ममीला 'ममी' म्हणायच्या तर ममी आईंना 'आई'!
माझ्या सासूबाई सर्वार्थानेच माझी आई झाल्याचा अनुभव मला लाभायला लागला जेव्हा त्या आमच्या घरी गिरगावात स्वतःहून राहायला आल्या तेव्हा. एखाद्या माहेरी आलेल्या लेकीसारखे त्या माझे लाड करीत. मला काय आवडतं, आवडत नाही, याकडे लक्ष पुरवीत. मग मी संध्याकाळी स्वयंपाकघरात लुडबुड करायचा प्रयत्न करु लागले की त्या म्हणत, "अगं तातू आत्ताच ऑफिसमधून आलाय. त्याच्याकडे जाऊन बस. इथं तुझं काय काम? मी आहे, विमल आहे".
आमच्या लग्नापूर्वी 'सशाची शिंगे' या नाटकाच्या निमित्ताने सुरू झालेला आमचा एकत्र नाट्यप्रवास चालूच होता. आईंचा त्याला कधी विरोध असेल असं माझ्या मनातसुद्धा आलं नाही अणि तसा विरोध नव्हताच. खरं म्हणजे मी करीत असलेल्या कुठल्याच गोष्टीला त्यांनी विरोध केला नाही. अगदी मी ह्याला त्याच्याच सांगण्यावरून अरे-तुरे करीत असे, त्यालासुद्धा. आईंनी मला सर्व बाबतीत उत्तेजनच दिलं. त्यामुळे मला कधीच काही जड गेलं नाही. या बाबतीत व्यंकटेश वकील यांच्या 'सारेच सज्जन' नाटकाची आठवण मी विसरणं शक्य नाही. नंदू महिन्याचा झाला त्या दिवशी घरीच तालमी सुरु झाल्या. अर्थात मला त्यात भूमिका होती म्हणून तालमी घरीच घेण्यात येत होत्या. नंदू दोन महिन्यांचा व्हायच्या चार दिवस आधीच राजहंस कला मंदिराच्या महोत्सवात कुर्ल्याला पहिला प्रयोग झाला. मी त्यावेळी नंदूला अंगावर पाजत असे. त्याला सांभाळायला आईंना बरोबर घेऊन जावं तर प्रयोग ओपन थिएटरमध्ये, म्हणजे उघड्यावर. शिवाय जानेवारी महिना, थंडीचे दिवस, तेव्हा तो पर्याय आईंना नापसंत होता. मग त्यांनी स्वतःच एक मार्ग सुचवला, "सगळे काही व्यवस्थित होईल, तू काळजी करू नकोस", असा मला धीर दिला आणि सर्व काही व्यवस्थित पार पाडलं. नाटकाचा पहिला प्रयोगही पार पडला आणि नंदूची भूकही आईंनी सुचवलेल्या उपायाने भागवली गेली.
आई धार्मिक वृत्तीच्या होत्या की नाही याकडे माझं कधीच लक्ष गेलं नाही. पण गणेशचतुर्थी, देवकार्य, श्रावणी सोमवार वगैरे त्या आप्पांकडे जाऊन साजरे करत असत. गिरगावात आमच्या शेजारीच असलेल्या देवळात एका नामवंत कीर्तनकाराचं सत्र चालू होतं. त्याला त्या निमा, नंदूला घेऊन नियमितपणे जात असत. मुलंसुद्धा गोष्ट ऐकायला, गाणी ऐकायला खुशीने जात.
एकदा आईंकडे आरोंद्याच्या काही नातेवाईक स्त्रिया भेटायला आल्या. घरभर फिरून 'छान घर आहे' असं प्रशस्तिपत्रसुद्धा दिलं. तेव्हा त्यातल्या एक बाई म्हणाल्या, "घरात देव नाही?" मी तिथेच होते. माझ्या हे कधी लक्षातच आलं नव्हतं. ज्यू धर्मात मूर्तिपूजा वर्ज्य आहे आणि नाही म्हटलं तरी धर्माचे संस्कार होतातच कुणावरही. पण आईंनी घरात देव ठेवले असते तर मी कधीच विरोध केला नसता. तेवढं स्वातंत्र्य त्यांना स्वतःच्या घरात निश्चितच होतं. हासुद्धा त्याबाबतीत कधी काही बोलला नाही, याचं मात्र आश्चर्य वाटलं. आरोंद्याच्या घरातले देव आप्पांच्या घरी होते, हे नंतर कळलं. पण माझ्या दृष्टीने अडचणीच्या वाटणार्या या प्रश्नाला आईंनी लगेच उत्तर दिलं. निमा-नंदू आईंच्या जवळच घुटमळत होते. त्यांना जवळ घेऊन आई म्हणाल्या, "हेच माझे देव". ह्या त्यांच्या बोलण्यात कुठलाही नाटकी आविर्भाव नव्हता. थेट हृदयापासून आलेला प्रतिसाद होता. मी धन्य झाले, आईंबद्दलचं माझं प्रेम, माझा आदर सगळं काही उफाळून आलं.
आमच्या नाटकवेड्या मित्रमंडळींच्या तर त्या आईच होत्या. पुष्कळदा तर नाटकाविषयीच्या गप्पा इतक्या रंगत असत की, दोन वेळा त्यांनी दिलेला चहा पिऊन झाल्याचंसुद्धा कुणाच्या लक्षात येत नसे. कधीकधी तर जेवणाची वेळ झाली आणि डायनिंग टेबलाकडेच सर्व मंडळी बसलेली असली की त्या येऊन म्हणत, "आज जेवायला कोण कोण थांबणार आहे?" आमच्या मित्रमंडळींत त्या एकदम पॉप्युलर. आम्ही दोघं घरी नसलो, तरी पुषकळदा बबन प्रभू, मुकुंद कोठारे, रमेश चौधरी अशी आतल्या गोटातली मंडळी त्यांच्याबरोबर गप्पा मारीत बसत. बबन तर त्यांचा खूपच लाडका म्हणून हक्काने त्या त्याला रागेसुद्धा भरीत. बबनला त्या ह्याचा धाकटा भाऊच मानीत आणि तेच त्याचं आमच्या घरी स्थान होतं. 'बबन आंघोळ कर', 'बबन, नीट जेव', अशी फर्मानं त्या सोडीत आणि बबन ही प्रेमळ फर्माने मुकाट्याने ऐकून घेत असे. त्याप्रमाणे वागत असे की नाही हा प्रश्न कुणी विचारु नये.
आईंना नाटकाचा शौक होता, हे मला माहीत होतं. त्यांनी आपल्या पतीबरोबर अगदी बालगंधर्वांची नाटकंसुद्धा पाहिली होती, हे मी ह्याच्याकडून ऐकलं होतं. माझ्या घरी जुनी नाटकं बघायची कधी संधीच मिळाली नव्हती. मग गिरगावात राहायला आल्यानंतर आई आणि मी समोरच असलेल्या साहित्य संघात जाऊन नाटकं बघू लागलो. हा घरी मुलांबरोबर. एकदा भारतीय विद्या भवनमध्ये सुधीर फडके यांच्या 'गीतरामायण'च्या कार्यक्रमालासुद्धा आम्ही दोघी गेलो होतो. मी जेव्हा पुन्हा माझं शिक्षण सुरू केलं तेव्हा तर त्यांनी मला जो पाठिंबा दिला त्याला तोडच नाही. लग्नाच्या वेळी मी बी.ए. झालेली होते आणि आईंच्या वर्तुळात मी 'खूप शिकलेली' असा उल्लेख केला जाई. मी एम.ए.ला प्रवेश मिळवला तेव्हा त्यांनी मला उत्तेजनच दिलं. "तू अभ्यास कर, मुलांची काळजी करू नकोस", असं बजावून सांगितलं. सकाळी चार वाजता उठून अभ्यास करण्याची माझी सवय. मी उठले की आई माझ्यासाठी चहाचा कप तयार करून ठेवील. मी म्हणे, "मी करुन घेईन ना चहा, तुम्ही कशाला उठता?" तर त्या म्हणत, "अग मी जागीच होते. तुझा अभ्यासाचा वेळ फुकट घालवू नकोस".
नंतर टाटा इन्स्टिट्यूटमधला अभ्यासक्रम पुरा करताना पुष्कळदा घरी यायला उशीर होत असे. पण त्या घराची आणि मुलांची व्यवस्था इतकी चोख बघत असत आणि तेसुद्धा काहीही न बोलता की घर अगदी सुरळीत चालत असे. त्यांचं एकच म्हणणं होतं की, पैशाचा व्यवहार मी बघावा, त्यांच्याकडे खर्चाला पैसे द्यावे, पण नेहमी हिशेब घ्यावा. मला 'हिशेब घेणे' हा प्रकार नकोसा वाटे, विशेषतः आईंकडून. "पैसे संपले, संपत आले की सांगा, मी आणखी देईन, मला तुमच्याकडून हिशेब नको", असं मी त्यांना म्हणे. पण त्या माझं ऐकत नसत. मग आमचं, माझ्या दृष्टीने, एक अतिशय विनोदी सेशन सुरू व्हायचं. त्या एकेका वस्तूवर झालेला खर्च सांगत. मी तोंडी बेरीज करीत जाई. कुठल्यातरी एका क्षणाला त्या थांबत आणि म्हणत, "बाकीच्या पैशाचं काय झालं आठवत नाही". पण हिशेब सांगण्याचा त्यांचा हट्ट काही त्या सोडत नसत. का? ते त्यांचं त्यांनाच माहीत.
लग्नाच्या वेळी ममीने मला बजावलं होतं, "हे बघ, तुझ्या सासुबाईंच्या अंगावर अजिबात दागिने नाहीत. हातातसुद्धा काचेच्या बांगड्या. स्वतःकरिता सोन्याचा कसलाही दागिना करण्याआधी सासुबाईंच्या अंगावर मिनिमम दागिने चढव. तुझ्या नवर्याला याचं महत्त्व वाटणार नाही. पुरुषांना ह्या गोष्टी कळत नाहीत".
निमाच्या वेळी मी गरोदर होते तेव्हा माझं डोहाळजेवण करायचं असं आईंनी ठरवलं, पण असल्या सगळ्यांच समारंभांना ह्याचा विरोध! लग्न समारंभालासुद्धा! मग आई म्हणाल्या, "हे बघ तातू, डोहाळजेवणासाठी तुझा विरोध असला तरी मी तुला खर्च करायला लावणारच आहे. तिकडे पैसे खर्च न करता, त्या पैशांच्या आशासाठी सोन्याच्या बांगड्या करू आपण". माझ्या हातातल्या काचेच्या बांगड्या त्यांना नक्कीच खुपत असाव्यात. मला ममीचे शब्द आठवले आणि मग सासू आणि सून, दोघींच्याही हातात एकाच वेळी सोन्याच्या बांगड्या झळकल्या.
मला नेहमी वाटायचं की, आईंना स्वतःचे असे पैसे असावेत. त्यांना कुणाला न विचारता खर्च करता येतील असे. म्हणून मी ह्याला सुचवले की, आपण आईंना पॉकेट मनी देऊ. त्याला ते सुचलेच नव्हते, पण कल्पना आवडली आणि आम्हांला परवडेल अशी रक्कम आम्ही त्यांना देऊ लागलो. त्यांनी लगेच सारस्वत बँकेत खातं उघडलं आणि त्यानंतर त्या पैशातूनच त्यांनी स्वतःला हवा तो खर्च केला - अगदी शेवटपर्यंत.
मी शिष्यवृत्ती मिळवून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायला निघाले, ती त्यांच्यावरच सगळा भार सोपवून. त्यांना माझा केवढा अभिमान. त्याच वेळी ह्याचा एक चुलतभाऊ इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी जाणार होता. आई अभिमानाने सगळ्यांना सांगत, "आमची आशासुद्धा परदेशी जातेय". माझ्याकरिता तर त्यांनी एक बनारसी शालूपण आणला. त्यांच्या प्रेमाने मी भारावले.
आईंना नवनवीन गोष्टी वापरून बघायची खूप हौस. त्या कधी शाळेत गेल्या नसाव्यात, पण त्यांना लिहितावाचता येत असे. आमच्या घरी येणारी मराठी वृत्तपत्रे त्या नियमित वाचत आणि विमल, सावित्री अशा आमच्या निरक्षर स्वयंपाकिणींना वाचून दाखवीत. त्यामुळे जगात आणि आपल्या देशात काय चाललं आहे याचं जुजबी ज्ञान त्यांना नक्की होतं आणि बाजारात नव्याने आलेल्या वस्तूंबद्दलसुद्धा. फ्रिज तर अगदी सराईतपणे त्या वापरीत. १९५०च्या दशकात माझ्या बहिणीचा नवरा भारतीय नौदलातला. तो सिंगापूरला गेला असताना आमच्याकरिता प्रेशरकुकर घेऊन आला. तेव्हा लगेच त्या तो प्रेशरकुकर वापरायला लागल्या. त्यानंतर भारतात प्रेशरकुकर तयार होऊ लागले, पण तरीही त्यांच्या वयाच्या त्यांच्या मैत्रिणी प्रेशरकुकरमधला स्वयंपाक रुचकर लागत नाही, असं म्हणत राहिल्या. पण आईंनी त्या साधनांचा स्वीकार केव्हाच केला होता. तोच प्रकार मिक्सरचा. मी अमेरिकेहून परतताना ज्या अनेक गोष्टी आणल्या त्यांत एक मिक्सर होता. त्या काळात आपल्याकडे मिक्सर बनत नव्हता आणि म्हणून सर्वसामान्यपणे वापरात नव्हता. मला आई म्हणाल्या, "इंग्लिशमध्ये लिहिलेल्या सूचना वाच, मला समजावून सांग. मला मिक्सर वापरायचा आहे". आणि त्यानंतर आमच्या घरातून पाटावरवंट्याचं उच्चाटन झालं. सर्व काही मिक्सरमार्फत. कोकणी घरात स्वयंपाकातलं खोबर्याचं स्थान लक्षात घेतलं की, 'मिक्सरचं महात्म्य' सहज लक्षात येईल. स्वयंपाकाचा गॅस जेव्हा विक्रीला आला, पन्नासेक वर्षांपूर्वी, तेव्हा हा मला त्यांच्या ऑफिसमध्ये प्रात्यक्षिकासाठी घेऊन गेला. मला गॅसचे फायदे पटले. आईंना येऊन सांगितले आणि निर्णय ठरला. तेव्हा आईंनी ज्या सफाईने घासलेट स्टोव्हचा त्याग करून गॅसचा स्वीकार केला त्याचं मला तरी मुळीच आश्चर्य वाटलं नाही. त्यांच्या 'मॉडर्न' मानसिकतेची मला सवय झाली होती ना.
आईंनी दुसर्याचं मन कधी दुखावलं नाही. याबद्दल त्या खूप जागरूक असत. मला आठवतं, एक प्रसंग असा घडला की, रीतीरिवाजाप्रमाणे त्या वागल्या असल्या तरी त्यांना कुणीच दोष दिला नसता. म्हणजे झालं काय, एके दिवशी हा ऑफिसच्या दौर्यावरून परत आला आणि नेहमीप्रमाणे आम्हां सगळ्यांना त्यानं बोलावून घेतले. भेट म्हणून काहीतरी आणायची त्याची सवय होती आणि नेहमीच आम्ही ह्या गुपिताची वाट बघत असू. त्याने बॅग उघडली आणि एक लुगडं आईंच्या हातात दिलं. "आई, हे तुझ्यासाठी खास भेट". मी बघतच राहिले. लुगडं हिरव्याकंच रंगाचं होतं. आई फक्त एवढंच म्हणाल्या, "छान आहे". मी नंतर ह्याला म्हटलं, "तुला काहीच कसं कळत नाही? आई हिरवं लुगडं कशा नेसतील? अरे, मी हिंदू नसूनसुद्धा मला हे माहीत आणि तुला हे कसं लक्षात राहिलं नाही?" हा बिचारा अगदी खजील झाला आणि म्हणाला, "माझ्या नाही लक्षात राहत अशा गोष्टी आणि माझा त्यांच्यावर विश्वासही नाही". पण दुसर्याच दिवशी आई ते हिरवं लुगडं नेसल्या, घरच्या घरीच. जणू काही आई त्याला 'धन्यवाद' म्हणत होत्या - त्यांच्या पद्धतीने. नंतर त्यांनी ते लुगडं माझ्या मधल्या जाऊबाईंना दिलं, त्या खूश. त्या पुष्कळदा नऊवारी लुगडं नेसत असत आणि हे लुगडं तर इतकं सुंदर होतं की त्यांना ते खूप आवडलं.
आई अतिशय सुगरण होत्या. दिवाळीच्या आधी तर त्यांच्या उत्साहाला उधाण येत असे आणि आता या उत्साहाला बांध घालण्याचं काही व्यावहारिक कारण उरलं नव्हतं. उलट त्या उत्साहाला खतपाणी घालून वाढवणारी सून घरात आली होती. मग सगळ्या नातलगांच्या घरोघरी डबे पोचवले जात. माझ्या माहेरी सर्वांत मोठे डबे त्या पाठवीत. त्यात काय नसे? बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, बुंदीचे लाडू, चिवडा, चकल्या, करंज्या, शंकरपाळी. मग ममी त्या सर्व फराळाच्या वाटण्या करून माझ्या भावंडांत देत असे. शिवाय माझ्या दोन मावसबहिणी - ज्यांना आम्ही आमच्या थोरल्या बहिणीच मानत असू - त्यांच्याकडेसुद्धा त्यांच्या हक्काचा वाटा ममी पोहोचवत असे. सर्वांनाच या सर्व फराळाच्या विविध प्रकारचं खूप अप्रूप होतं आणि आईंचं कौतुक.
आईंचा आणखी एक गुण अगदी लक्षणीय होता. त्या विशेष गाजावाजा न करता कुणाला काय आवडतं हे बरोबर लक्षात ठेवायच्या आणि त्या व्यक्तीची खाण्यातली आवड पुरी करायच्या. माझा एक भाऊ अमेरिकेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत नोकरीला होता. त्याचा मोठा मुलगा सुट्टीत पपा-ममीकडे येत असे. अशीच एकदा मी त्याला भेटायला निघाले असताना आईंनी माझ्या हातात डबा ठेवला आणि म्हणाल्या, "निम्मीला दे. त्याला बेसनाचे लाडू खूप आवडतात. मुद्दाम त्याच्याकरिता केले". मी निम्मीला भेटल्यावर त्याला म्हटलं, "अरे, तुझ्याकरिता आजीने काही तरी पाठवलंय". तो एकदम उडी मारून ओरडला, "बेसनाचे लाडू". आणि डबा उघडून त्याने दोन लाडू फस्त केले, मी बघतच राहिले. कारण त्याला बेसन लाडू इतके आवडतात हे मला, त्याच्या आत्याला माहीत नव्हतं. पण ते आईंना माहीत होतं आणि ते त्यांना माहीत असणारच हे निम्मीला माहीत होतं. आहे की नाही मजा?
आईंना दुसर्यांची काळजी करण्याची सवय होती. मग ते माणूस फार जवळचं असो की नसो. टाटा इन्स्टिट्यूटचा कोर्स पुरा झाल्यावर, मी मध्यवर्ती शासनाने नव्याने स्थापन केलेल्या कुटुंब नियोजन प्रशिक्षण आणि संशोधन केंद्रात नोकरी करू लागले. हे केंद्र आमच्या घरापासून फार दूर नव्हतं. तिथं माझी एक सहकारी होती. नवा वासवानी नाव तिचं. फाळणीच्या वेळी कराचीहून निर्वासित म्हणून आलेली, सधन व्यापारी कुटुंबातली. तिचं लग्न जरा उशिराच झालं. तिला दिवस गेले तेव्हा ती मला एकदा म्हणाली, "मला आमचं सिंधी पद्धतीचं तेलातुपाने भरलेलं जेवण अजिबात जात नाही. पण माझ्या सासरच्या मंडळींना माझा प्रॉब्लेम समजत नाही". माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, संध्याकाळी घरी परतल्यावर चहा पितापिता आईंना दिवसभरात सेंटरमध्ये काय काय झालं हे सांगत असताना, हे पण सांगितले, तर त्या लगेच म्हणाल्या, "अगं, तुझ्या त्या नवाला आपण डबा पाठवू, ह्या अवस्थेत तिनं नीट जेवलं पाहिजे". झालं! दोनचार दिवसांत सर्व व्यवस्था झाली आणि आमच्या घरून नवाला डबा जाऊ लागला. घर जवळ असल्यामुळे मी दुपारी घरी जेवायला येत असे आणि नवासाठी मात्र डबा सेंटरमध्ये जात असे. नवाचा मुलगा दीडदोन वर्षांचा झाला तेव्हा नवा एकदा मला म्हणाली, "अगं आशा, अशोक मराठी बोलतो". मी म्हटलं, "तू त्याला सांभाळायला ठेवलेली बाई मराठी आहे ना; म्हणून". ती म्हणाली, "छे, छे, अशोक माझ्या पोटात असताना मी तुझ्या सासूबाईंच्या हातचं मराठी पद्धतीचं जेवण जेवत असे ना; म्हणून तो मराठी बोलतो". मी घरी येऊन आईंना हे सांगितलं. त्या खूप हसल्या. खरं म्हणजे त्यांची आणि नवाची कधीच भेट झाली नाही - आधीही नाही आणि नंतरही नाही. आईंना तशी गरजच वाटली नसावी.
माझी बहीण, सेरा, हिला त्या मुलगी मानत. तिच्या नवर्याला, श्रीनिवास रावला, आमच्या घरात जावयाचा मान दिला जाई. तो शाकाहारी म्हणून आई त्याच्यासाठी छानछान शाकाहारी पदार्थ करीत. त्याला लसूण आवडत नाही, म्हणून त्या दिवशी स्वयंपाकात लसूण वर्ज्य. आम्ही दोघं अमेरिकेत असताना आई आजारी पडल्या तर सेरानेच त्यांचं सगळं काही केलं. ती डॉक्टर. तीन महिन्यांकरिताच अमेरिकेला आलेल्या ह्याला "बापू, तुम्ही घाई करून परत येण्याची गरज नाही. मी आणि डॉ. फडके सर्व काळजी घ्यायला समर्थ आहोत. डॉ. फडके यांनीही तसा निरोप तुम्हांला द्यायला सांगितलाय", असं तिनं पत्र पाठवलं. सेराने आपला संसार, तीन मुलं, नोकरी, सगळं सांभाळून आईंचं ऑपरेशन, हॉस्पिटलमधील त्यांचा मुक्काम, त्यांचं औषधपाणी सगळं सगळं सांभाळलं आणि आईंची मुलगी असल्याचं सिद्ध करुन दाखवलं, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता.
त्यानंतर दोन वर्षांनी सेराला जेव्हा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला वर्षभर जाण्याची संधी मिळाली तेव्हा मोठ्या दोन मुलांना, विजय, गीता यांना उटीला बोर्डिंगमध्ये ठेवायचं ठरलं. धाकटी तीन वर्षांची राधिका. ती बहुधा ममीकडे राहील असं मी गृहीत धरलं होतं; पण एक दिवस आई मला म्हणाल्या, ''सेरामावशीचं आणि माझं ठरलंय, राधिका वर्षभर आपल्याकडेच राहणार आहे". आईंचा हा निर्णय त्यांनी अगदी विचारपूर्वक घेतला होता. ह्या राधिकेने नंतर वर्षभर आमच्या घराचा, घरातील सर्वांचा, येणार्याजाणार्यांचा कसा ताबा घेतला याबद्दल एक वेगळंच प्रकरण लिहावं लागेल, पण ते वर्ष आमचं राधिकामय झालं हे मात्र खरं.
मुलगा-मुलगी म्हणून कधीच आईंनी निमा-नंदूला वाढवण्यात भेदभाव केला नाही. आम्ही दोघं करत नसू, तसाच. पण त्यांच्या मुलं वाढवण्याच्या पद्धतीतला एक दृष्टिकोन मला पसंत नव्हता. घरातल्या सर्वात धाकट्या मुलाचे जास्तीत जास्त लाड आणि सर्वात मोठ्या मुलाकडून भरमसाट अपेक्षा. हा भेदभाव मात्र नक्कीच मला खटकत असे. त्यामुळे आमचा नंदू तसा लाडवलेलाच झाला. मी त्याला अजूनही चिडवते, ''आजीने तुला लाडावून ठेवला". त्या उलट माझा पुतण्या भाऊ, हा चार भावंडातला सर्वांत थोरला. तो आठदहा वर्षांचा असताना आई एकदा माझ्याकडे त्याच्याबद्दल तक्रार करत होत्या, '' एवढा मोठा झाला तरी..'' या चालीवर. मुख्य अपेक्षा होती ती भाऊने आपल्या धाकट्या भावंडाच्या बाबतीत करण्याच्या कर्तव्यासंबंधी. मग मी त्यांना म्हटलं,'' अहो, तोसुद्धा लहानच आहे. तो सर्व भावडांत थोरला आहे. हा काय त्याचा दोष आहे का?" मोठा झाल्यावर भाऊने थोरल्या भावाची सर्व कर्तव्ये आपली पत्नी अनिताच्या सहकार्याने योग्य प्रकारे पार पाडली आणि अजूनही ती तो पार पाडतो आहे. हे पाहून आईंना निश्चितच खूप आनंद झाला असता. मला आनंद आणि आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं, शेंडेफळ असून आणि आईच्या लाडात वाढलेला असून हा 'लाडावलेला' कसा नाही? अत्यंत जबाबदारीनं स्वतःची आणि इतरांबाबतची कर्तव्ये नित्यनियमानं पार पाडीत असतो. सतत दुसर्यांची काळजी घेणं, नेहमीच्या वयापेक्षाही प्रौढ पद्धतीनं वागणं, हा त्याचा स्वभावधर्म. असा हा नसता तर माझ्यासारख्या 'लाडावलेल्या' मुलीचं काय झालं असतं?
मला एक वाईट सवय आहे. प्रश्न उपस्थित करायचे आणि त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करायचा. कधी उत्तरं सापडतात, पण ती मनाची शांती घालवतात - कधी समाधान देतातही.
मी अभ्यासक्रमात कधी मानसशास्त्र विषय घेऊ शकले नाही, तरी मला त्या विषयात रस होता. मला आठवतं माझा भाऊ निस्सीम, 'सायकॉलॉजी टुडे' या नावाचं मासिक घरी आणत असे आणि मी ते वाचत असे. 'इडिपस कॉम्प्लेक्स' या संकल्पनेची ओळख मला झाली होती. ज्या मुलाचं आपल्या आईशी अत्यंत जवळंच नातं असतं, तो मोठा झाल्यानंतर दुसर्या स्त्रीशी वेगळ्या प्रकारचं नातं प्रस्थापित करु शकत नाही. त्याच्या जीवनातलं आईचं प्रथम स्थान कधीच बदलत नाही आणि आईसुध्दा मुलावरला आपला हक्क सोडायला तयार होत नाही. थोडक्यात असा काहीतरी मी त्याचा अर्थ लावला होता.
हा लहानपणापासून आईचा लाडका. दहाअकरा वर्षांचा होईपर्यंत आईच्या कुशीत झोपणारा, मातृभक्त. अजूनसुद्धा आईबद्द्ल बोलताना त्याचा कंठ दाटून येतो. पण आमच्या पती-पत्नीच्या नात्यात त्यामुळे कधीच कुठल्याच प्रकारे व्यत्यय आला नाही. बरं, आईंचं म्हणावं तर त्यांनी आपलाच पहिला हक्क असावा असा
आग्रह कधीच धरला नाही. हे कसं काय घडलं? तसं घडलं असतं तर मात्र कठीण प्रसंग उद्भवला असता.
आणखी एक कूट प्रश्न मला अजूनपर्यंत सतावतोय. सासू म्हणून आईंबद्दलचा माझा अनुभव इतका सुखद होता की त्या जाऊन इतकी वर्षं झाली - चाळीस वर्षांहून जास्त - तरी ते दिवस मला अजूनही चांगले आठवतात. मग त्यांच्या पहिल्या सुनेबाबतीत काय बिघडलं? शिवाय त्यामुळे मोठा मुलगा दुरावला, हे कटुसत्य त्यांना पचवावं लागलं होतं. या सर्व अनुभवांबद्दल त्या कधी माझ्याकडे बोलत नसत. ह्याला विचारलं, तर हा त्याचा वहिनीलाच दोष देई, साहजिकच होतं. अशावेळी याचं आईवरील प्रेम अगदी उफाळून येई. मी हे अंतर मिटवण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला. माझं दादांच्या घरी चांगलंच स्वागत होत असे. मी एकदोनदा आईंना बरोबर घेऊन गेले, तर दादांचा ह्याला फोन, '' आशाला म्हणावं, तू ये, आईला सोबत आणू नको". मला खूप राग आला. मी ह्याला म्हटलं, "दादांना फोन करुन सांग, मी माझ्या सासूशिवाय कुठे जात नाही". ह्याने माझा निरोप दादांना कळवला नसणार. पण त्यानंतर मी दादांकडे जाणे शक्यतो टाळू लागले. मला माझा तो प्रश्न सतत सतावीतच राहिला. आई तेव्हा
काही वेगळ्या होत्या का? मोठ्या वहिनींचा अनुभव माझ्यापेक्षा इतका वेगळा असू शकेल का? अलीकडेच दादांची मुलगी- सुलभा- जी आता स्वतःच आजी झाली आहे, ती अमेरिकेहून आमच्याकडे आली होती. खूप गप्पा झाल्या. शेवटी मी तिला विचारलं,''काय गं सुलू, तुझ्या आईचं आणि आजीचं असं का बिघडलं?'' ती
हसली आणि म्हणाली,'' काही नाही गं, सासू-सुनेचं नातं? दुसरं काय?'' अर्थात या तिच्या उत्तरानं माझं काही समाधान झालं नाही.
आई कॅन्सरने शेवटच्या अवस्थेत होत्या. असह्य वेदनांनी तळमळत होत्या. ममीने जे काही त्यावेळी केलं, ते तिच्या समजूतीप्रमाणे केलं. आम्हांला न विचारता, न सांगता. तिला असं वाटत होतं की, आईंचा जीव दादांच्या भेटीसाठी घुटमळत आहे. दादाचे एक मित्र तिच्या ओळखीचे होते. त्यांना ती जाऊन भेटली आणि ''माझ्या वतीने दादांना आईला भेटायला यायला सांगा'', अशी विनंती केली. अपेक्षेप्रमाणे नकार मिळाला. मग एक दिवशी ह्यानेच दादांना फोन लावला,फोनवर वहिनी होत्या. ह्याने अगदी निर्वाणीच्या भाषेत त्यांना बजावून सांगितलं, ''आईला जिवंत पाहायचं असेल तर आता या. नंतर काही ती भेटायची नाही". त्या रात्री दादा-वहिनी दोघेही आले. काहीच घडलं नाही, असं बोलले. तीन दिवसांनी आईंचा, आमचे फॅमिली डॉक्टर तेंडुलकर त्यांना उठवून
बसवण्याचा प्रयत्न करीत असताना देहांत झाला.
एका प्रेमळ जीवाचा अंत. माझा तर आधारच संपला. त्या रात्री नातेवाईक वगैरे जमल्यानंतर अंत्यविधी कसा करायचा यावर चर्चा झाली. विद्युतदाहिनी नुकतीच सुरु झाली होती, चंदनवाडीत. एक पोक्त नातेवाईक म्हणाले, ''छे, छे, त्यांना मुळीच आवडलं नसतं". तेवढ्यात निमा म्हणाली,''सावरकरांबद्दल आजीने पेपरमध्ये वाचलं होतं. त्यांच्या इच्छेप्रमाणे सावरकरांचं इलेक्ट्रीकि क्रीमेशन केलं होतं. आजी तेव्हा मला म्हणाली होती, मलासुद्धा
असंच आवडेल". निमाच्या या बोलण्यामुळे सगळाच प्रश्न सुटला. आई त्यांच्या नेहमीच्या स्वभावानुसार 'मॉडर्न' पद्धतीने वागल्या. जग पुढे जात होतं, त्या मागे राहिल्या नाहीत.
***
माझ्या जगात मी
आशा भेंडे
पद्मगंधा प्रकाशन
पृष्ठसंख्या - १४३
किंमत - रुपये ११५
***
टंकलेखन साहाय्य - अश्विनी के, श्रद्धा, अनीशा
***
छान ओळ्ख करून दिलीयेस
छान ओळ्ख करून दिलीयेस नेहमीप्रमाणे.
खुप सुंदर ओळख
खुप सुंदर ओळख
सुरेख ओळख! धन्यवाद.
सुरेख ओळख! धन्यवाद.
सुरेख ओळख. इतक्या
सुरेख ओळख. इतक्या वर्षांपूर्वी परधर्मातल्या सुनेला इतक्या सहजपणे सामावून घेणार्या सासूचं कौतुक !
छानच ओळख. बहुदा त्या गेल्या
छानच ओळख. बहुदा त्या गेल्या तेव्हा या पुस्तकातले अजुन काहीतरी वाचल्याचे आठवते.
नेहमीप्रमाणेच मस्त ओळख.
नेहमीप्रमाणेच मस्त ओळख.
अतिशय सुंदर ओळख. "आई" बद्दलचा
अतिशय सुंदर ओळख.
"आई" बद्दलचा चॅप्टर खूप भिडला आणि आवडला.
मस्तच. घेतलं पाहिजे हे
मस्तच. घेतलं पाहिजे हे पुस्तक. धन्यवाद चिनूक्स!
खूपच छान लिहिले आहे. अतिशय
खूपच छान लिहिले आहे. अतिशय सुंदर ओळख करुन दिली आहे.
सगळे कुटुंबीय फारच प्रेमळ
सगळे कुटुंबीय फारच प्रेमळ आहेत.
पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद
सुंदर आणि प्रांजळ लिखाण
सुंदर आणि प्रांजळ लिखाण