तृषार्त

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 28 February, 2011 - 12:02

आज वसतिगृहातला शेवटचा दिवस होता.पाच वाजता निरोप समारंभ झाला. भरल्या मनाने,
भरल्या डोळ्याने सर्वांचा निरोप घेऊन सुमित्राबाई निघाल्या.घरी पोहोंचल्या तेंव्हा रात्रीचे नऊ वाजले होते.
पहाटे लवकर निघायचे होते. पाचला ट्रेन होती.थकून जाऊन त्या खुर्चीत बसल्या. सगळ्यांचे रडवेले चेहरे त्यांना आठवत होते. नर्मदा, रुक्मिणी, नादिरा त्यांचे भरलेले डोळे पुन्हा पुन्हा आठवत होते. आणि ती शामला... ती
तर किती लहान आहे. नेहमी घाबरल्यासारखी असते. कुणीतरी सतत जवळ असावसं तिला वाटत.त्यांचा
पाय तिथून निघत नव्हता. मुलीला सासरी सोडून निघताना काय वाटत असेल त्याची जाणिव झाली त्यांना.
पण हे केंव्हा तरी होणारच होते. त्यांच्या मध्ये फार गुंतून रहायला नको म्हणून गेले वर्षभर त्या रात्री
स्वतःच्या फ्लॅटमध्ये झोपायला येत होत्या.एकटं रहायची सवय नसल्याने त्यांनाही सुरुवातीला जड गेलं.
पण आता त्याची सवय झाली होती. आता तर त्यांना हा फ्लॅटही सोडायचा होता. कायमचं कुलुप लावायचं होतं.

मुलगा येणार म्हणून किती आनंद झाला होता. हौसेनं हा फ्लॅट घेतला होता. पण सून बँकेत होती
तिची बदली होत नव्हती म्हणून त्यालाही बदली करून घेता येत नव्हती, शेवटी त्यांनाच मुलाकडे जाण्याचा
निर्णय घ्यावा लागला होता. चाळीस वर्ष झाली.इथला परिसर, हे गाव, इथले लोक हे सगळं सोडून जाताना
जीव गलबलला होता. पण मन मुलाकडेही ओढ घेत होतं.चाळीस वर्ष मुलाला सोडून त्या लांब राहिल्या होत्या.
आता मात्र उरलेले दिवस मुलाकडे आनन्दात घालवायचे ठरवले.. दोन गोजिरवाणी नातवंडं, मुलगा, सून ह्यांच्यासाठी आता सगळं करायचं. चाळीस वर्ष मुलापासून दूर राहून काढले. आता रहावत नाही. आज इतक्या
वर्षा नंतरही त्या आपल्या पाच वर्षाच्या मुलाचा तो रडवेला चेहरा विसरू शकत नव्हत्या.

वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं. एक वर्षातच मुलगा झाला. नवरा दुसर्‍या गावी होता. दर
शनिवारी येवुन रविवारी जायचा. एकदा असाच येत असताना बसला अपघात झाला आणि त्यात तो
दगावला. अवघ्या अठराव्या वर्षी सुमित्राबाईंच्या नशीबी वैधव्य आलं.

फार मोठा आघात होता तो. त्यावेळी मुलगा फक्त सहा महिन्याचा होता.घरात मोठे दीर जाऊ आणि
सासरे. सासरे खचले पण मोठ्या दिराने सावरून घेतले. जाउबाईने धीर दिला.मुलाला त्याच सांभाळायला लागल्या. एक वर्ष झालं. सुमित्राबाई हळूहळू सावरल्या. आता पुढं काय?

हा प्रश्नं होताच. सुमित्राबाईंच शिक्षण फक्त सातवी पर्यंत झालेलं होतं. त्यांच्या गावांत शाळा सातवी पर्यंतच
होती. दुसर्‍या गावी मुलीने एकटे राहून शिक्षण घेणे त्यांच्या वडिलांना आवडत नव्हते. त्यामुळे शिक्षण
अर्धवटच राहिले होते. कांहीतरी निर्णय घेणे भाग होते. दिराने खूप विचार करून निर्णय घेतला.त्यांनी
सुमित्राबाईना समजावले. त्यांना मुलींच्या शाळेत घातले.शाळेत मुली लहान होत्या.त्यांना खूप अवघडल्यासारखं
वाटायच. एक अवघड परीक्षाच होती ती.हळू हळू सवय झाली. शाळेत शिक्षिकाही चांगल्या होत्या.बघता बघता तीन वर्ष संपली. मॅट्रीक झाली.आता पुन्हा नोकरी शोधणे सुरु झाले.नोकरी आवश्यक होती. शेवटी दिराच्या प्रयत्नाला यश आलं. त्यांना एका मुलींच्या खाजगी वसतिगृहात वॉर्डनची नोकरी मिळाली.पण गुजरातमध्ये सुरतला.गरीब मुलींचं वसतिगृह होतं ते. कांही अनाथ मुली, तर काहींच्या पालकांची मुलं सांभाळायची
ऐपत नव्हती अशा मुली तिथे होत्या. तिथे त्यांना मुलाला जवळ ठेवण्याची परवानगी नव्हती.मुलाला सोडून
इतक्या दूर जावे लागणार. या विचारानेच त्या व्यथित झाल्या.

पुन्हा एकदा जाउबाई मदतीला आल्या. त्यांना मुलबाळ नव्हतं त्यांनी मुलाला जवळ
ठेवण्याचे कबूल केले. पण जरी तो आईजवळ जास्त रहात नव्हता तरीही त्याला सोडून त्या निघाल्या तेंव्हा
तो रडवेला झाला होता. जेमतेम पाच वर्षाचं त्याच वय. त्याला कांहीच समजत नव्हते,सुमित्राबाईना गलबलून आलं. वडील तर नाहीतच पण आईपासूनही त्याला दूर रहावे लागत होते. हृदयावर दगड ठेवून त्या नोकरीच्या गावी गेल्या.आणि थोड्याच दिवसात त्या गरीब, अनाथ मुलींची आई झाल्या. प्रत्येक मुलीत आपला
मुलगा शोधत सगळी माया, ममता त्या मुलींच्यावर ओतत राहिल्या.

पूर्ण चाळीस वर्ष. निवृत्त होउन दोन वर्ष झाली होती पण तरीही वसति गृह त्यांना सोडायला तयार नव्हतं.
पण आता मात्र त्यांना उरलेले आयुष्य मुलाबरोबर घालवायचे होते. दिराने मुलाचे शिक्षण चांगले केले
होते. त्याही सुट्टी लागली की जायच्या. मुलगा आनन्दात आहे हे पाहून त्यांना खूप बरे वाटायचे.पण
तरीही त्याच्या सहवासाचं सुख आपल्या नशीबात नाही म्हणून सतत खंत वाटायची. तिथे गेल्यावर
मुलाला भेटल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचा तो भरभरून आलेला आनन्द आणि त्याला सोडून येताना त्याचा
कोमेजलेला चेहरा, भरलेले डोळे, घट्ट मिटलेले ओठ आणि" आई परत कधी येणार? " हा प्रश्नांकित तृषार्त
भाव त्या कधीच विसरल्या नव्हत्या.

दिवस जात होते. मुलाचे शिक्षण झाले त्याला चांगली नोकरी लागली. लग्न झालं. मुलगीही बँकेत
नोकरी करणारी मिळाली. एका वर्षातच दीर जाऊ एकामागोमाग दोघेही गेली. आता मात्र त्यांना एकदम
पोरकं झाल्या सारखं वाटलं. काळ पुढे जात होता. मुलगा सून सावरले होते. त्यांना पहिला मुलगा झाला
दुसरी मुलगी झाली. आता मात्र प्रत्येक सणावाराला त्या रजा काढून यायला लागल्या. मुलं लहान होती.
म्हणून जावेसे वाटे. आता नातवंडं शाळेत जात होती. आजी येणार म्हट्ले की त्यांना आनन्द व्हायचा.

हळू हळू जाणे कमी होत गेले. प्रत्येक सणाला जाणं होत नव्हतं. मुलं मोठी झाली होती.मुलांना
शाळेला फारशा सुट्ट्या मिळत नसत.सूनबाई बँकेत गेल्यावर एकटं रहायला नको वाटायचं. पण मुलाच्या
नातवंडाच्या ओढीने सुट्टीत मात्र जावसं वाटायचं.आजही त्यांना तोच आनन्द झाला होता. त्या पट्कन
उठल्या. सकाळी लवकर निघायचं होतं.सगळा फ्लॅट एकदा डोळे भरून बघून घेतला आणि मनाला
कुलुप लावले.

बघता बघता एक महिना झाला येऊन. दिवस कसे भराभर गेले कळलेच नाही. पण आता मात्र त्यांना
एकटं एकटं वाटायला लागलं. चौघं चार दिशेला निघून गेले कि मग त्यांना अस्वस्थ वाटे. करमत नसे.
त्यांनी मग थोडे घर आवरायला सुरुवात केली. मुलांचे कपडे, पुस्तकं,अस्ताव्यस्त पडलेले असत. स्वयंपाक
घरातही सून घाईने स्वयंपाक करून गेल्यावर घेतलेल्या वस्तु जिथल्या तिथेच पडलेल्या असत. हे सगळं
बघून त्यांना वाटलं आपण आवरावं. दोन दिवस कोणी कांही बोलले नाही. पण नंतर मात्र कुरकुर सुरु
झाली.एके दिवशी नातवाला कुठलेतरी पुस्तक सापडत नव्हते. त्याने आरडाओरड सुरु केली.तशा त्या म्हणाल्या,

" अरे किती पसारा पडला होता पलंगावर, म्हणून मीच आवरून ठेवली पुस्तकं." .
" आजी आम्हाला सारखी पुस्तकं लागतात. प्रत्येक वेळेला शिस्तीत ठेवणं आम्हाला जमत नाही.
आणि कोण येणार आहे आमची खोली बघायला?" तो म्हणाला.
" अरे कोणी बघणार नसतं म्हणून कसाही पसारा पडू द्यायचा का?.काही शिस्त म्हणून आहे
की नाही" त्या म्हणाल्या. त्यांचे वाद ऐकत असलेली त्यांची नात एकदम म्हणाली,
" आजी हे मुलींचं होस्टेल नाही आहे सतत शिस्त पाळायला. "

त्यांचा चेहरा उतरला. त्यांनी अपेक्षेने मुलाकडे पाहिले. मुलाने शांतपणे त्यांना म्हट्ले,
"आई जाऊ दे ना, तू कशाला तिच्या नादी लागतेस?"

त्यांना वाईट वाटलं. काय बिघडलं असतं त्याचं, जर तो मुलीला म्हणाला असता की 'आजीला
उलटं बोलू नकोस' म्हणून.

मुलं सुट्टीच्या दिवशी अगदी १०,११ वाजता उठायची.हे त्यांच्या शिस्तीत बसत नव्हतं. नातीचं
असं एवढ्या उशीरा पर्यंत झोपणं त्यांना कसंतरी वाटत होतं. पण त्या बोलू शकत नव्हत्या.त्यांना वाटलं,'जाऊ
दे ही आजकालची मुलं आहेत. आपणच थोडं बदलायला हव.' मुलगाही जास्त बोलत नसे. ऑफिसमधून
आला की कांहीतरी काम करत बसे. नाहीतर सून बँकेतून आली की दोघ कुठंतरी बाहेर जात. कधी पार्टी, तर
कधी सिनेमा, तर कधी अजून कुठं.मुलही त्यांच्या विश्वात मग्नं होती. त्यांची फार पंचाइत होत असे.त्यांना करमत नव्हतं. कधी त्यांना वाटे स्वयंपाक करून ठेवावा.कधी कधी त्या करतही असत. सुरुवातीला ठीक
चाललं पण हळू हळू वातावरण बदलायला लागलं. सगळे बाहेर गेल्यावर स्वयंपाक करावा तर आल्यावर
सून आमची वाट न पाहता स्वयंपाक करून ठेवला म्हणून कुरकुर करी. न करावा तर बाहेरून आल्यावर मलाच करावं लागतं म्हणून त्रागा करी. कसं वागावं तेच समजत नव्हतं.सारखंच कांही ना कांही कारणाने खटके
उडायला लागले.खरं तर त्या सहनशील होत्या. भांडण करणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं.

एकदा असंच त्या नातवाला काहीतरी सांगायला गेल्या तर तो लगेच चिडून म्हणाला,

" आजी हे मुलींच होस्टेल नाही सतत वॉच करायला. आणि तू आमच्या रूममध्ये येतेसच कशाला?
आणि आमचा जर त्रास वाटत असेल तर तू जा परत होस्टेलमध्ये "

फार लागलं त्यांच्या मनाला. "मी होस्टेलध्ये चालले म्हट्ले की 'आजी तू का जातेस गं?' आमच्या
बरोबर इथे कां नाही रहात' असं रडवेला चेहरा करून म्हणणारा हाच का तो?" त्यांनी मनाशीच प्रश्न केला.
ही मुलं सारखा होस्टेलचा का उल्लेख करताहेत.? त्यांच्या चेहर्‍यावर असे काही भाव असतात की जणू काही
मी ह्यांचं स्वातंत्र्य हिराऊन घेतले आहे.

त्यांना नर्मदाचा चेहरा आठवला. एकदा तिने लवकर आंघोळ केली नाही म्हणून त्या तिला रागावल्या. तेंव्हा तिने आकाशपाताळ एक केले होते. कमरेवर हात ठेऊन ती बोलली होती,

" तिथे माझ्या बापाने स्वातंत्र्य हिराऊन घेतले होते आता इथे तुम्ही आहात ह्यापेक्षा
कैदखाना बरा."

सुमित्राबाईना वाईट वाटले होते. त्यांनी तिला जवळ घेतले,समजावले तेंव्हा तिचा बांध फुटला.
कदाचित तिला असे कोणी जवळ घेतले नव्हते. प्रेम केले नव्हते. तेंव्हापासून ती त्यांची लाडकी झाली
होती. कितीतरी मुलींची लग्नं झाली होती.पण अजूनही त्या भेटायला येतात. त्या मुलींना प्रेमाची उणिव
होती. त्या प्रेमासाठी आसुसलेल्या होत्या. पण ही मुलं अशी ऐकणार आहेत का? त्यांना प्रेमाची गरजच
नाहीये. त्या मनाशीच दचकल्या.

गरज नाही, खरंच गरज नाहीये. मुलाला, सुनेला, नातवंडाना माझी गरज नाही. त्यांचं मुलाच्या,
नातवंडांच्या सहवासात राहण्याचं स्वप्नं पार विरून गेलं होतं. चार दिवस पाहुण्यासारख्या यायच्या तेंव्हा
सून मागेपुढे करायची. नातवंडही लहान होती. आईवडील दिवसभर घरी नसत त्यामुळे आजी आली की
त्यांना आनन्द व्हायचा. पण आता त्यांना कळलं होतं कि आजी कायमची राहायला आली आहे. आठ
पंधरा दिवस ठीक चाललं पण स्वतंत्र राहिलेल्या या कुटुम्बाला आपली आता अडचण होते आहे ह्याची
त्यांना जाणीव झाली. जाणीव करून देत आहेत असं वाटत होतं." मग मी का रहातीये इथे?"

त्यांच्या डोळ्यासमोर वसतिगृहातल्या मुली उभ्या राहिल्या. पाणावलेल्या डोळ्यानी निरोप देणार्‍या, कमरेला मिठी मारून ओक्साबोक्शी रडणार्‍या त्या छोट्या मुली. त्यांना मायेची गरज आहे.शामला, चन्दा,
पारू,आयेशा, सगळ्यांचे चेहरे त्यांच्या डोळ्यासमोर फेर धरू लागले. त्यांना असं वाटलं कि ह्या सगळ्या मुली त्यांना हांका मारत आहेत. हात पसरून याचना करीत आहेत. त्यांनी घट्ट डोळे मिटले त्यांच्या डोळ्यातून
अश्रू ओघळले.. कांहीतरी निश्चय केल्यासारख्या त्या उठल्या.त्यांना खूप बरं वाटत होतं, खूप हलकं हलकं
वाटत होतं

रात्री सगळे जेवायला बसले. त्यांनी मुलाला सांगितले,"मी उद्या सुरतला परत वसतिगृहात जाणार
आहे".

"का" मुलाने दचकून विचारले.सून आणि नातवंडं प्रश्नार्थक मुद्रेने बघु लागले.

"हो मी परत वसतिगृहात जाणार आहे" त्या शांतपणे उत्तरल्या.

"आई काय बोलतेस, आता इतक्या दिवसांनी आली आहेस आता पुन्हा का जायचं म्हणतेस."

" इतके दिवस मी नाइलाजाने राहिले. कारण मला त्यांची गरज होती. मला नोकरीची गरज होती.
पण आता त्यांच्यासाठी जायचय. त्या मुलींना माझी गरज आहे. माझ्या प्रेमाची, मायेची गरज आहे.
इतके दिवस त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. आता मी त्यांच्यावर प्रेम करणार आहे. मी उद्याच निघणार
आहे." असे म्हणून त्या उठल्या.

हात धुताना त्यांनी पाहिलं. सुनेनं सुटकेचा श्वास टाकला आहे,मुलांच्या चेहर्‍यावर गोंधळ दिसतो
आहे. अन मुलाचा चेहरा दु:खाने विदिर्ण झाला अहे. पण त्या मात्र खुशीत होत्या. त्यांना उद्याचे दृष्य
दिसत होते.मुलींचे हसरे चेहरे, शामलाच्या छोट्या हाताची मिठी, वसतिगृहाच्या चेअरमनची कृतज्ञता.

सकाळी लवकर उठून त्यांनी सगळं आवरून घेतलं. सात वाजता निघायचं होतं आठची बस
होती. घरात आज सगळेच लवकर उठले होते. वातावरण तंग होतं. नातवंडानी बोलण्याचा प्रयत्न केला.
पण सुमित्राबाईनी त्यांना हातानेच गप्प बसवले. कोणाला कांही बोलण्याची संधी न देता त्या जायला
निघाल्या. मुलगा तयार होऊन त्यांना सोडण्याच्या उद्देश्याने आला.सगळे त्यांच्या मागे निघाले पण
जिन्यापाशी येताच त्यांनी सगळ्यांना थांबवले.

त्या चार पाच पायर्‍या उतरून आल्या आणि मागे वळून मुलाकडे पाहिले. तोच चेहरा. पाच
वर्षाचा असताना होता तो, भरलेले डोळे, घट्ट मिटलेले ओठ. चेहर्‍यावर मात्र "आई तू परत कधी
येणार?" हा प्रश्न नव्हता, ती तृषार्तता नव्हती, तर होती एक वेदना. " आई परत कधीच येणार नाही"
याची. त्यांनी झरकन मान वळवली. भरलेल्या डोळ्यामुळे पायर्‍या दिसत नव्हत्या तरीही त्या
पायर्‍या झरझर उतरून गेल्या.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सर्वाना मनापासून धन्यवाद.

कृपया मला कुणि सांगाल का? मी जेंव्हा कथा लिहून संपवते त्याच्यानंतर मी पुन्हा वाचते.चुका
दुरुस्त करते. व्यवस्थित सेट करते आणि नंतर सेव करते.पण नंतर पहाते तर कथा काही
तरी विचित्रच येते. परिच्छेदाच्या सुरुवातीला जागा सोडलेली नसते. संवाद व्यवस्थित नसतात.
अर्ध्या, तुटक ओळी येतात. असं का होत? मला कोणी सांगितल्यास मी अभारी राहीन.
पुन्हा एकदा सर्वाना धन्यवाद.

कथा आवडली.

     परिच्छेदाच्या आधी नुसती रिकामी सोडलेली जागा दिसत नाही, तिथे रिकाम्या जागेसाठी & n b s p; (मध्ये जागा न सोडता) लिहिलेत तर दिसेल या परिच्छेदात दिसते आहे तशी. बाकी सगळे ठीक दिसते आहे. फक्त तुम्ही प्रत्येक ओळीच्या शेवटी Enter प्रेस करु नका. तसे केल्यामुळे शेवटी कमीजास्त जागा राहिली आहे असं वाटतं. इथल्या चौकटीत फक्त टाइप करत जा, लेखन आपोआप खालच्या ओळीला जाते.

छान

"होती एक वेदना. " आई परत कधीच येणार नाही"
याची. त्यांनी झरकन मान वळवली. भरलेल्या डोळ्यामुळे पायर्‍या दिसत नव्हत्या तरीही त्या
पायर्‍या झरझर उतरून गेल्या."

मनाला स्पर्श करून गेला हा शेवट.
छान लिहिली आहे कथा...... सहज आणि वास्तव वाटावी अशी.

Pages