शापित वरदान

Submitted by aappa_d on 17 June, 2008 - 14:57

"आई गं" गेल्या अठ्ठेचाळीस तासांनंतर मधुकरच्या कंठातुन निघालेले हेच दोन शब्द. पण तेही डोळ्यात प्राण आणुन त्याच्या प्रत्येक श्वासाकडे लक्ष ठेउन असलेल्या त्याच्या आईसाठी अमृतवाणी ठरले.
मधुच्या अपघाताची बातमी कानावर पडल्यापासुन त्या माउलीच्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता की डोळ्याचे पाणी खळले नव्हते. त्याचे हे शब्द कानावर पडताच तिच्या चेहर्‍यावर पसरलेला आनंद वर्णन करायला शब्द कमीच पडले असते.
" बाळा, खुप दुखतय का रे ?" त्याच्या बॅंडेज बांधलेल्या डोक्यावर हलकेच हात फ़िरवत तिने विचारले.
" अं हो, पण मी नक्की कुठे आहे? आणि माझे डोके ईतके जड जड का झालेय?" हाताना सलाईनची बंधने असल्याने त्याला डोक्यावरच्या बॅंडेजची कल्पना येणे शक्य नव्हते.
"मधु, बाळा अरे देवानेच माझे ऐकले बघ त्या जिवघेण्या अपघातातुन तु थोडक्यात बचावलास" डोळ्यात तरळणारे पाणी सावरत आई म्हणाली.
" अं, कधी? कुठे ? मला अपघात झाला?"
आता मात्र त्याच्या आईचा जिव टांगणीला लागला अपघाताने याच्या स्मरणशक्तीला तर काही................. तिने तडक डॉक्टरांकडे धाव घेतली तसेही तो शुध्दीवर आल्यावर ताबडतोब कळवा असे त्यांनी सांगीतलेही होतेच. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेली नर्स नेमकी यावेळी कुठेतरी गायब होती.

आई बाहेर जाताच मिळालेल्या शांततेमुळे मधुकरचा मेंदु हळू हळू काम द्यायला लागला. कुणी आपल्या आयुष्यातले दोन दिवस अचानक पुसुन टाकले तर आपलीही अवस्था वेगळी होणार नाही नाही का? विचारांचा गुंता सुटत जाताच त्याला झालेला तो अपघात आठवला.

मधुकर म्हणजे तुमच्या आमच्या सारखाच सरळ साधा माणुस. आयुष्याकडुन काही सनसनाटी अपेक्षा न ठेवणारा. लहानपणीच वडीलांचे छत्र गेले आणी त्याची जबाबदारी त्याच्या आईने दोघांच्यावतीने उचलली सुरुवातीला लहान सहान ठीकाणी शिक्षीका म्हणुन नंतर एकाच शाळेवर पुर्णवेळ शिक्षीका म्हणुन नोकरी करत तिने त्याचे शिक्षण केले. आता त्याने एखादी नोकरी पाहून आईच्या उपकारांची किंचीतशी परतफ़ेड करण्याची तयारी दाखवताच तिने त्याला होकार दिला. आणी इकडचे तिकडचे टक्के टोणपे खात तो एका कंपनीत एकदाचा सुपरवाईझर म्हणुन कामाला लागला.
कंपनी फ़ारशी मोठी नव्हती पण पगार दोघांना पुरुन उरेल इतका होता आणी आता आईचे नोकरी करण्याचे वयही राहीले नव्हते म्हणुन मधुकरने तिला हट्टाने नोकरी सोडायला भाग पाडले.
घर-आई-नोकरी ही त्याची चाकोरी झाली होती त्यात गेले कित्येक वर्षे बदल नव्हता लग्न वगैरे गोष्टींना आजुन वेळ होता. पण दैवाला काही वेगळेच म्हणायचे असु शकेल.
........ तो नेहमी सारखाच एक दिवस होता. मधुकर कंपनीत आपल्या हाताखालच्या कामगाराला काहीतरी कामाविषयी सुचना देत होता. इतक्यात समोरचा कामगार ओरडला "साब बचो".
नक्की काय झाले हे पहाण्यासाठी मधुकरने त्याच्या नजरेच्या रोखाने दृष्टी फ़िरवली आणि डोक्यावरुन पोलादी खांब वाहून नेत असलेल्या अजस्त्र क्रेनच्या हुक मधुन सुटलेली एक पोलादी कांब आपल्या रोखाने येत आहे ही त्याच्या स्मरणात असलेली शेवटची जाणिव. त्या सेकंदभरात मनात आयुष्य संपल्याची जाणिव आल्याखेरीज राहीली नव्हती. तरीही त्यातुन तो वाचला होता, आज इथे इस्पितळात आहे म्हणजे तो नक्कीच वाचला होता.

" काय मधुकरराव? काय म्हणते तब्बेत?" डॉक्टरांच्या प्रश्नाने तो पुन्हा भानावर आला. पण नुसत्या हुंकाराखेरीज घशातुन दुसरे शब्द बाहेर पडले नाहीत. इतक्या काळानंतर जागृत होण्याचा काहीतरी दृष्य परीणाम तर नक्कीच असणार ना ?

एकंदरीतच डॉकटरांच्या बोलण्यावरुन त्याच्या इतके तरी लक्षात आले की तो फ़ारच सुदैवी ठरला होता. त्याच्या डोक्यात पडू शकणारी पोलादी कांब मधेच कशावर तरी आदळल्याने त्याच्या डोक्यावर निसटता धक्का देउन गेली होती. तरीही डॉकटरांना त्याच्या जगण्याविषयी शांशकता होतीच त्यांनी हरप्रयत्न करुनही त्याचे जगणे दैवाच्या भरवश्यावर टाकले होते. आणि कदाचीत दैव त्याच्या बाजुचे असावे तो शुध्दीवर आला,डॉक्टरी प्रयत्नांना त्याच्या गलितगात्र शरीराने साथ दीली.
" मधुकरराव आता महीनाभर आराम बरं का ! " डॉक्टर सांगत होते.
पण मग माझी नोकरी? पगार ? त्याच्या मनात उठलेले प्रश्नही सर्वसामान्यच होते. वास्तविक त्याला आपला जिव वाचला या कल्पनेने आनंदाचे भरते यायला हवे होते.
"कसली काळजी करायची नाही" हाताला रबरी पट्टा गुंडाळत डॉक्टर म्हणत होते. "इथे तुम्ही कंपनीच्या खर्चाने आहात आणि सध्या कंपनीच्या सेवेतच आहात, तुमच्या इलाजाचा आणी सुटीचा पुर्ण खर्च तुमची कंपनी सोसणार आहे. तेंव्हा आता फ़क्त आराम" त्यांच्या आवाजात आश्वस्तता होती.
मधुकरचा ताण जरा हलका झाला.
" पण नक्की कीती दिवस ठेवणार तुम्ही मला ईथे?" आत्ता प्रथमच त्याच्या मुखातुन एक पुर्ण वाक्य बाहेर पडत होते.
" फ़ार फ़ार तर आणखी एखादा आठवडा तोही फ़क्त प्रिकॉशन म्हणुन"
मधुकरच्या तोंडातुन एक सुस्कारा बाहेर पडला.

यथावकाश पुर्ण बरा होवुन मधुकर आता इस्पितळातुन डिस्चार्ज घेउन घरी आला होता. घरी स्वस्थपणा मिळण्याची शक्यताही तितकीच कमी होती, कारण जरी मधुकर कोणी प्रसिध्द व्यक्ती नसला तरी अजातशत्रु माणुस होता. त्याला भेटायला येणार्‍या लोकांची संख्या कमी नव्हती. पार कंपनीच्या जनरल मॅनेजर ते त्याच्या हाताखाली काम करणारे कामगार येउन त्याची हालहवाल विचारुन जात होते. पुष्पगुच्छ भेटकार्डे फ़ळे यांनी त्याचे टेबल रोज भरुन जात होते. या भेटी घेणार्‍या लोकांच्या मनात जरी चांगल्या भावना असल्या तरी तासनतास तो त्यांच्या मनापासुन केलेल्या विचारपुशीला उत्तरे देता देता थकुन जात असे. कधी कधी थकवा इतका येत असे की त्याच्या डोक्याच्या मागच्या भागात तिव्र वेदना उसळत असत. एकदोनदा त्याने ही बाब डॉक्टरांच्या कानावर घातलीही पण " मधुकरराव पुर्ण आराम, मी सांगीतले आहे ना? " असे बोलुन त्यांनी त्याला शांत झोप काढण्याची सुचना केली.
विचारपुस करणारे लोक येतच राहीले कधी कंपनीतले तर कधी ओळखीतले तर कधी नातेवाईक अश्याच एका भेटीत तो त्याच्या नातेवाईकांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. आणि आपापल्या परीने ते ही त्याला तर्‍हेतर्‍हेचे सल्ले देत होते. हळूहळू मधुकरच्या डोक्यात ती नेहमीची कलकल सुरु झाली आता पुन्हा आपल्या डोक्यातुन असह्य कळा येणार हे त्याला अनुभवाने माहीत झाले होते. त्याने सुचक नजरेने आईकडे पाहीले.
" चल रे मधु तुझ्या गोळ्या घ्यायची वेळ झाली ना ! आणि आता गोळ्या घेउन जरा शांत पड पाहू" आईने अर्थ बरोबर ओळखला
तिच्या बोलण्यात दडलेल्या गर्भीत सुचनेने आजुबाजुला बसलेल्या नातेवाईकांनी हळू हळू मधुकरचा निरोप घेतला.

अपवाद फ़क्त एकच.

समोरच्या सोफ़्याच्या एका टोकाला बसलेले ते गृहस्थ. त्यांच्या चेहर्‍यावरचे ते ममत्व त्याला जाणवत होते. हा चेहरा आपल्या ओळखीचा आहे याचीही त्याला जाणिव होत होती. पण ते नक्की कोण हे त्याला आठवे ना; बरं नातेवाईक म्हणावे तर ते आधी कधीही भेटल्याचे त्याला आठवत नव्हते. आणि आता त्याला अंधुकशी आठवण यायला लागली की हे गृहस्थ या आधीही इथे होते आपल्याकडे असेच पहात पण त्यांनी त्याची कधी चौकशी केल्याची आठवण मात्र होत नव्हती. ते नक्की कोण असावेत ते आईला माहीत असायला हवे म्हणुन त्याने आईला हाक मारली.
"आई हे कोण गं" त्याने कुतुहलाने विचारले.
" कोण रे मधु? मघाशी आलेले ते का?" आईनेही कुतुहलानेच विचारले.
" अग ते सोफ़्याच्या एका कडेला बसलेत ते गं?"
" कुठे कोण? तिथे कुणीच नाही रे बाळा" आता आईच्या आवाजात चिंता होती.
" अरे तु थकलायस ना त्यामुळे तुला भास होत असेल"
" असेलही कदाचीत, " मधुकरने मनाची समजुत काढली कारण आता खरोखरच सोफ़्यावर कुणी नव्हते. पण मनात कुठेतरी जाणवत होते की आपण ह्या व्यक्तीला पुर्वीही पाहीले आहे. विचारांच्या कोलाहलात झोप केंव्हा लागुन गेली ते कळलेच नाही.

डॉक्टरांनी ऑलक्लियर चा इशारा दिल्यावर मधुकर पुर्ववत आपल्या कंपनीत जायला लागला. हळुहळु त्याने आपल्या पुर्वीच्या जबाबदार्‍या संभाळायला सुरुवात केली. सगळ्या रुटीनमधे त्याला आपल्या अपघाताचा विसरही पडायला लागला होता. आणि पुन्हा एक अशी घटना घडली की पुन्हा त्याला ती घटना आठवलीच.

त्या दिवशी मधुकरकडे काम जरा जास्तच होते, आज त्याचा सहकारी सुपरवायझर आजारी असल्यामुळे सुटीवर होता. दिवसभराच्या कामात मधुकर पार थकुन गेला होता. आणि जरा आराम करावा म्हणुन आपल्या खुर्चीत विसावला दिवसभराच्या थकावटीने डोके बधीर झाल्यासारखे वाटत होते, आता एखादा कप चहा घ्यावा असा विचार करुन मधुकर उठणार इतक्यात त्याच्या डोक्याच्या मागच्या भागातुन असह्य कळ आली, क्षणभर त्याला काही सुचेनासे झाले, कपाळावरुन घामाच्या धारा लागल्या, डोळ्यातुन पाणी घळघळायला लागले. दोन्ही हातात डोके आवळुन तो तसाच बसुन राहीला. अचानक जशी आली तशी ती कळ नाहीशी झाली. जरा बरे वाटायला लागताच उठुन चहा घेण्याकरीता मधुकर टी मशीन कडे जायला निघाला, सर्वसाधारणपणे बर्‍याचशा इंजीनियरींग कंपनी प्रमाणे त्याचीही केबीन वर्कींग प्लेसपासुन थोडी उंचावर होती. जाताजाता लक्ष गेले तर मधुकरला समोरच्या चिररपरीचीत देखाव्यात काही फ़रक जाणवला. मध्यभागी असलेल्या ब्लो मोल्डींग मशीनचे कव्हर उघडे होते आत मेंटनन्स डिपार्टमेंटचा माणुस शिरलेला दिसत होता.त्याच्या अंगावरच्या निळ्या कपड्यांमुळे ते सहज समजुन येत होते. इथपत तरी वेगळेपणा असा काही म्हणता येत नव्हता, पण या पलीकडे खटकणारी बाब म्हणजे मशीन चालु होते नेहमीप्रमाणे त्यातुन प्रोडक्शन निघत होते. आणि हे कधीही शक्य नव्हते कारण मशीनचे बाजुचे कव्हर मशीन बंद केल्याशीवाय उघडणारच नव्हते तशी सोय होती.
आपला सगळा थकवा विसरुन मधुकर त्या मशीनकडे धावला.
" शिंदे, मेंटनन्सचे काम करायला मशीन चालु असताना कोणी परवानगी दिली?" मशीनच्या मुख्य ऑपरेटरला खडसावत मधुकर म्हणाला.
" मास्तर, ते कसंकाय शक्य आहे? मेंटेनन्स कव्हर तर बंद आहे " शिंदे ने वास्तव परिस्थीतीच सांगीतली.
" शिंदे , मी माझ्या डोळ्याने पाहीलय तिथे मेंटेनन्सचा माणुस काम करताना" मधुकरचा आवाज जरा चढलाच होता.
" नाय मास्तर, कोणी नाय तिकडे कव्हर बंद आहे विचारा ना या दळवीला" मशीनवरच्या आपल्या सहकार्‍याकडे निर्देश करत शिंदे म्हणाला.
दळवीनेही शिंदेच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
" साहेब तुम्हाला कदाचीत भास झाला असेल" दळवीने शंका काढली. पण यावर शिंदे मात्र जरा विचारात पडल्यासारखा दिसला.
वास्तविक शिंदे त्या कंपनीतला जुना कर्मचारी म्हणजे त्याने अशी चुक त्याच्याकडुन घडण्याची शक्यता नव्हतीच. पण मधुकरला जे दिसत होते त्याचे काय? इतक्यात आत काम करणारा माणुस मशीनच्या खोक्यातुन बाहेर आला, ' कमीत कमी याला तरी विचारायलाच हवे ' मनात म्हणत मधुकर त्याच्याकडे वळणार इतक्यात तो त्या तिघांच्या मधुन सरळ निघुन गेला तो ही वर्कशॉप कडे न जाता भलतीकडेच निघाला होता जाता जाता त्याच्या धक्क्याने दळवीच्या हातातली पाण्याची बाटली सांडली.
" काय दळवी हे, हा माणुस आत्ता माझ्या समोरुन गेला की जाता जाता तुझ्या हातातली पाण्याची बाटली सांडवली तरी लक्ष नाही?" आता मात्र मधुकर चिडला.
" आईशप्पत कोणी नाय हो मास्तर इथुन गेला, माझ्याच हातातुन बाटली पडली खरी पण ती सटकली असेल, तुम्हाला नक्की भास झाला.
यावर आणखी काही बोलण्यासारखे न वाटल्याने जास्त वाद न घालता मधुकर आपल्या केबीनच्या दिशेने निघुन गेला. 'मेंटेनन्स सुपरवायझरशी या बद्दल बोललेच पाहीजे' मनातल्या मनात तो म्हणाला.

केबिन मधे येउन दहा मिनीटेही झाली नसतील तर दरवाजावर टकटक झाली मधुकरने मान वर करुन पाहीले तर शिंदे "आत येउ का?" म्हणुन विचारत होता.
" या की शिंदे, काय काम काढलत?"
"मास्तर ते मघाशी के एटी मशीनवर जे झालं त्याबद्दल थोडं बोलायचं होतं"
" जाउ दे हो शिंदे, जास्त वर्कलोड आल्यामुळे मला खरच भास झाला असेल, असे निष्काळजी वागणारे तुम्ही नाहीत" त्याची समजुत काढत मधुकर म्हणाला.
" नाही साहेब ते नाही........... " शिंदे कचरला.
" काय झालं शिंदे कोण काम करत होतं का खरंच?"
" तसं नाही मास्तर पण.......... तिथे तुम्ही यायच्या आधी वर्षभर के एटी वर एक मेंटेनन्स टेक्निशीयन खलास झाला होता"
" काय बोलताय शिंदे? " हा मात्र मधुकरला धक्काच होता.
" होय मास्तर, मेंटेनन्स कव्हर ओपन करुन तो काम करताना चुकुन मशीन चालु केले एकाने त्यात हिटरच्या ओपन वायर्सच्या गुंत्यात अडकुन तो जागीच गेला, वाचवायची संधीही मिळाली नाही तुम्हाला माहीताय ना तिथे किती हाय व्होल्टेज असते ते "
एव्हाना मधुकरला कानात उकळते तेल ओतल्या सारखे वाटायला लागले होते नेमक्या हिटर वायरचेच काम करताना त्याने मघाशी पाहीले होते.
"शिंदे तेंव्हा नेमके काय झाले होते ते जरा निट सांगु शकाल का? "
या नंतर शिंदे झालेल्या अपघाताचे वर्णन न जाणे कितीवेळ सांगत होता पण मधुकरच्या कानातुन शब्द जणु आरपार जात होते.

" मास्तर, जाउ मी?" शिंदे विचारत होता. त्याच्या प्रश्नाने मधुकरला भानावर आणले.
मघाशी आपण बघत होतो ते नक्की काय? भास ? स्वप्न? की शिंदे म्हणतो तसं...............? पण तसं असतं तर मग दळवीच्या हातातली पाण्याची बाटली? ती तर नक्की पडली होती, आणि तिला लागलेला धक्का त्याने स्वतः पाहीला होताच की.
विचाराने डोके पुन्हा दुखायला लागले.

घरी परतायला उशिर झालेलाच होता, आई वाट पहात होती तिच्या कानावर आजचा प्रकार घालावा असा एक विचार मधुकरच्या मनात चमकुन गेला ! पण तरीही तो गप्प राहीला.
" मधु आलास? दमला असशिल ना बाळा ! हातपाय धुवुन घे! आणि चहा घेणारेस की सरळ पानेच घेउ थोड्यावेळाने? " आईच्या त्या प्रेमळ विचारपुस करण्याने मधुकरला जरा बरे वाटले. तो सोफ़्यावर जरा आरामात बसला.

सोफ़्यावर बसल्या बसल्या कदाचीत त्याची डुलकी लागली असावी कारण डोक्यातुन उसळलेल्या त्या तिव्र वेदनेने त्याला जाग आणली. पुन्हा एकदा वेदना पुन्हा जिवाची घालमेल. पण जशी आली तशी ती थांबली सुध्दा. डोळ्यांवरचा पाण्याचा पडदा सरल्यावर त्याची प्रथम नजर गेली असेल तर खिडकी जवळच्या आरामखुर्चीत बसलेले ते गृहस्थ.
हे तेच होते ज्यांना आधीही तो आजारी असताना त्याने पाहीले होते आणि ते अचानक निघुनही गेले होते, आज मात्र तो त्यांना त्यांची चौकशी करणार होता.
" मधु, अरे हात पाय धुवुन घे ! आणि अश्या तिन्ही सांजेला आडवं नाही पडायच हं" आईने त्याचे लक्ष वेधले.
" आई ते कोण गं?"
" कुठे कोण आहे? काय बोलतोयस तु ? " आईच्या आवाजात पुन्हा काळजी.
" अग, ते समोर नाही का बसलेत आरामखुर्चीत? नाही आता ते तिथुन उठले आणि बाहेर गेले"
" कुणी नाही मधु तिथे, तुला भास झाला असेल"
" भास कसा असेल आई ? समोरची रिकामी खुर्ची हलताना दिसतेय का तुला आणि हा हॉलचा दरवाज तोही हलतोय ना ?"
"मधु, अरे हवेची झुळुक आली असेल, तु फ़ार हळवा झालायस आजकाल" आई समजुतीने म्हणत राहीली पण मधुकरच्या मनात काहीतरी चमकले.
" आई, बाबांचा एकही फ़ोटो घरात नाहीये का ? "
" का रे बाळा आजच अचानक का विचारतोयस?"
घरात बाबांचा एकही फ़ोटो न लावण्यामागे असलेले कारण त्याला माहीत होते.
मधुकरचे वडील तो एकदम लहान असतानाच गेले, पण नैसर्गीक मृत्युने नाही तर त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. आणि ते इतक्या वाईटरीत्या भाजल्या गेले की त्यांना पहाताच आई जी बेशुध्द पडली ती चार दिवस शुध्दीवर आली नव्हती. त्यानंतरही बाबांच्या आठवणीने ती आपली शुध्द गमावुन बसत असे. याच कारणाने घरात त्यांचा फ़ोटो नव्हता, मधुकरला आपले बाबा कसे दिसत असत हेही माहीत नव्हते आणि नंतर आईला त्या बद्दल विचारण्याची त्याची हिंमत झाली नव्हती.
पण आजची वेळ वेगळी होती. आज त्याला बाबांचा फ़ोटो पहायचाच होता.
" आई आहे का गं त्यांचा एखादा फ़ोटो?"
" आहे तुझ्या मामाकडुन मी तो घेतला होता अलिकडेच, घरात लावण्यासाठीच पण त्यात तुझा......" आणि तिने जिभ चावली.
" मग, आत्ता लगेच दाखव मला तो"
" मधु अरे आधी खाउन घे ! पानं घेतेच आहे मी इतक्यात"
" नको आधी मला तो फ़ोटो दाखव" हट्टाने मधुकर म्हणाला त्याच्या मनात आता एक शंका आली होती.
शेवटी सगळ्याच आयांसारखी त्याच्यापुढे हार मानत तिने कपाटातला फ़ोटो काढुन त्याच्या हातात दिला.
हातातल्या फ़ोटोकडे नजर टाकताच त्याने मघाच्या त्या गृहथांना ओळखले.

त्या दिवशी काहीही न बोलता मधुकर जेउन झोपी गेला.
दिवसां मागुन दिवस जात होते मधुकरला आपल्यातल्या वेगळेपणाची जाणिव होत होती. एका मित्राच्या सांगण्यावरुन त्याने एका मानसोपचार तज्ञाचा सल्लाही घेतला ! पण तो ही काही मार्ग काढु शकला नाही काहीतरी जाडजुड शब्द वापरुन त्याने त्या प्रकाराची वसालात लावली.

एव्हाना बसलेल्या धक्क्यातुन मधुकर सांभाळला होता. डोकयातुन वेळी अवेळी निघणार्‍या त्या जिवघेण्या कळा आणि त्यांचा संबंध त्याने ओळखला होता. त्या जिवघेण्या अपघातातुन वाचताना त्याचा मृत्युला निकटचा स्पर्श झाला त्यामुळे कदाचीत आपल्याला अनोळखी असलेली आपल्या मेंदुची कवाडे मधुकरच्या बाबतीत उघडली असतिल. एरवीही आपण मानव आपल्या मेंदुच्या क्षमतेचा वापर पावपट सुध्दा करुन घेत नाही, हे शास्त्रिय सत्य आहे. मग त्या डार्विनच्या नियमानुसार आपला मेंदु आजुनही प्रमाणापेक्षा जास्त का आहे? शास्त्रद्यांना आजुनही मानवि मेंदुचे सगळे कप्पे कसे माहित नाहीत?

आपल्या नव्या क्षमतेला सरावत असतानाच मधुकरला आणखि एक गोष्ट लक्षात आली ति ही अशीच योगा योगाने.

रस्त्याने जाताना मधुकरच्या डोक्यात पुन्हा ती चिरपरीचित कळ आली. डोळ्यासमोरचा पाण्याचा पडदा सरला तेंव्हा त्याने पाहीले की एक जुन्या पध्दतीचे कपडे घातलेला मध्यम वयीन मनुष्य(?) समोरुन चालत येत असलेल्या एका तरुणीला थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. त्या गडबडीत त्याचा धक्का लागुन एका बुटपॉलीशवाल्याची पॉलिशची डबी उडाली आणि त्या पोराने वार्‍याच्या नावे एक वाइट शिवी हासडली. पुस्तकांचा स्टॉल मांडुन बसलेल्या एकाच्या पुस्तकांना धक्का बसला आणि पुस्तके विखुरली,त्याने कुणाच्या नावे अपशब्द उच्च्चारले ते कळले नाहीत.
एकंदरीत तिला थांबवण्याची त्याची निकड मधुकरच्या लक्षात आली त्याने हाक मारुन त्या तरुणीला थांबवले आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वेळ काढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात ती ज्या फ़ुटपाथ वरुन चालत होती त्या फ़ुटपाथवर एक ट्रक, चालकाने ताबा गमावल्याने चढला आणि भिंतीवर आपटला. जर यावेळी ती तरुणी तिथे थांबलेली नसती तर? कदाचीत हेच त्याला करायचे होते. कारण एव्हाना ति व्यक्ती नाहीशी झालेली होती.

आणखीही असे अनेक, कंपनीच्या बाहेर पडुन रस्त्याला लागताना त्याला नेहमी एक बिल्डींग वाटेत येत असे तिथुन जात असताना पुन्हा एकदा त्याच्या डोक्यातुन ती परीचित कळ आली आणि त्याने इमारतीच्या पहील्या मजल्यावरच्या गॅलरीत एका म्हातार्‍या बाईला खिडक्या उघडण्याचा प्रयत्न करताना पाहीले. खिडकी उघडण्याच्या गडबडीत तिच्या हातुन गॅलरित वाळत घातलेली साडी खाली पडली. शोभेसाठी लावलेली झाडे हलायला लागली. मधुकर ताबडतोब तिकडे धावला, 'त्या' फ़्लॅटचे दार ठोठावल्यावर दार उघडणार्‍या स्त्रीने त्याच्या कडे कन्टाळलेल्या नजरेन पाहीले. ति नुकतीच झोपेतुन उठत होती हे स्प्ष्ट होते. पण त्याला जाणवला तो घरात भरुन राहीलेला कुकिंग गॅसचा वास......
"तुमच्या कडे गॅस लिक आहे"
" अगो बाई, खरच हो," तिने पटकन रेग्युलेटर बंद केला आता तिच्या चेहर्‍यावर आश्चर्याचे भाव होते पण ते पहायला मधुकर तिथे थांबला नाही. त्याने तडक आपला रस्ता धरला.

अश्या बर्‍याच अनुभवानंतर मधुकरने नोकरी सोडली कारण या गोष्टी षटकर्णी व्हायला वेळ लागत नाही. आणि आपला समाज आहे ना, तो एकतर अश्या लोकांना साधुवगैरे म्हणुन गौरवतो किंवा चेटक्या म्हणुन नाकारतो मधुकरला दोन्ही व्हायचे नव्हते.

आजकाल मधुकर कुठे असतो ते कुणालाच ठाउक नाही, पण एक मात्र नक्की आपल्या आजुबाजुला आपल्याला दुर्लक्ष करण्याजोग्या ज्या घटना जाणवतात वारा नसताना झाडाची पाने सळसळतात, एखादा दरवाजा आपोआप उघडतो, चालता चालता न दिसणार्‍या अडथळ्यावर आदळल्यासारखे वाटते. ते कुणाच्या धडपडीचे,प्रयासाचे परीणाम असु शकतात का? याचा मात्र विचार करा.

माझा मधुकरला शोधायचा प्रयत्न चालु आहेच.

-- अप्पा

गुलमोहर: 

पण एक आठवलं, मधुकरला भविष्याची चाहुल लागणे आणि लोकांना वाचवणे, अगदी हाच विषय प्रदीप दळवींच्या "कालांकीत" या कादंबरीत आढळतो.
अगदी तो गॅस लीकेज चा प्रसंग पण त्या कादंबरीत अगदी तस्सा च्या तस्सा आहे.

असो...

सुरुवातीपासून कथा संपेपर्यंत "बेशुद्ध" होतो !!

अप्पा, छानच आहे कथा. अप्रतीम.

कथा छान आहे...............