बोका - गुरव बोका है

Submitted by बेफ़िकीर on 19 February, 2011 - 10:23

नाट्यगृहातील स्टेजचा पडदा हळूहळू खाली पडू लागला आणि संपूर्ण भारताची धडकन ठरलेल्या मालविकाच्या मादक नृत्य अदा आता परत कधी पाहता येतील या विचाराने निराश होत असलेल्या आणि अजूनही थिरकतच असलेल्या मालविकाकडे बेभान होऊन पाहणार्‍या प्रेक्षकांनी टाळ्यांचा अक्षरशः सहा ते सात मिनिटे सातत्याने कडकडाट केला.

दोन तास! दोन तास मालविका एका क्षणाचीही उसंत न घेता कन्टिन्युअस नाचत होती. विविध हिंदी चित्रपट गीते, काही इतर भाषिक गीते, काही नुसत्याच ट्युन्स तर शेवटी आयटेम सॉन्ग्ज!

आणि नाट्यगृहातले शेकडो डोळे पापणी लवायची असते हेही विसरून गेल्याप्रमाणे केवळ मालविकावर रोखलेले होते.

मालविका जैन!

एका बलाढ्य उद्योगपतीची ही पंचविशीची कन्यका सध्या स्वतःच्या अत्याकर्षक नृत्याने देशाला खुळे बनवत होती. जेथे पाहावे तेथे मालविकाची होर्डिंग्ज, पोस्टर्स, जाहिराती आणि कार्यक्रम! मात्र तिने एक गोष्ट कटाक्षाने पाळलेली होती. ती म्हणजे चित्रपट क्षेत्रात जायचे नाही. याचे कारण तेथील स्पर्धा, स्पर्धेमुळे पडणारा भयानक ताण, त्यातून येऊ शकणारे नैराश्य, स्त्रीसाठी अल्पकाळच असलेले करीअर आणि एक भोगवस्तू होण्याकडे असणारा प्रवास या बाबी तिला व्यवस्थित माहीत होत्या. अगदीच काही निर्माते तिच्या घरासमोर रांग लावून उभे होते अशातला भाग नव्हता. पण ऑफर्स सतत येतच होत्या. मात्र मालविकाने एका गीतकाराला गाठून विविध नृत्य करण्याजोगी गीते स्वतःच बनवून घेतली होती. पहिला अल्बम उद्योगपतीच्या ताकदीमुळे खपला. मात्र तिची वाहवा फारशी झाली नाही. पण जेव्हा दुसरा अल्बम निघाला तेव्हा त्यातील दोन गाणी अचानक गाजू लागली. त्यावरचे तिचे नृत्यही अप्रतिमच होते! आणि हे झाले तीन वर्षांपुर्वी! तेव्हापासून आत्तापर्यंत तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही. सन्मित्र जैन यांना जेव्हा लोक 'हे मालविकाचे वडील बर का' असे म्हणू लागले तेव्हा ते अवाकच झाले. कारण त्यांचे इतरत्र लक्षच नसायचे. आणि अचानक समजले की घराघरात आपली मुलगी नृत्यांगना आणि अदाकार म्हणून सुप्रसिद्ध झालेली आहे. मग काय विचारणार? त्यांचा पैसा, संपर्क आणि सत्ता यांचे पाठबळ मिळाल्यावर तर तिचे कार्यक्रम सर्वत्रच होऊ लागले. आता तिला सेक्रेटरी ठेवावा लागला. वकील नेमावा लागला. सी ए नेमावा लागला. दोन बॉडीगार्ड्स नेमावे लागले. एक सोबतीण म्हणून पायल नावाची एक चुणचुणीत मुलगीही बरोबर ठेवली. आणि एवढे करून आत्तापर्यंत एकाही चित्रपटाच्या करारावर तिने सही केली नाही. स्टेजवर लाईव्ह डान्स करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणे यातील नशाच काही और असे तिचे स्पष्ट मत होते. आता तिची तिच्या वडिलांशी भेटही होणे अवघड झालेले होते. आधी ते सतत कार्यमग्न असतात म्हणून तीच फुरंगटून बसायची. हल्ली वडील तिला फोन करून तिची चौकशी करायचे. कारण ती सतत कार्यक्रम करायची. आणि दोन दोन तास सतत नाचू शकायची. वन्स मोर धरून तर अनेकदा अडीच तासही! एवढे नाचूनही तिच्या चेहर्‍यावर कुठेही दमल्याच्या खुणा दिसायच्या नाहीत. अद्भुत एनर्जी लाभली असल्याप्रमाणे वावरत असायची. आठवड्यातून असे तीन तीन कार्यक्रम करायची. याचा ताण जरी मनावर आणि शरीरावर पडत असला तरी आत्ताचेच वय होते हे सगळे करण्याचे! आणि खरे तर या एक प्रकारच्या सातत्याच्या व्यायामामुळे मालविका बेहद्द आकर्षक आणि जिम्नॅस्टप्रमाणे झालेली होती.

आजचा कार्यक्रम अंधेरीला होता.

हा कार्यक्रम संपताना प्रेक्षक बेभान झाले होते. फॉर्म्युला नेहमीचाच होता. सुरुवातीला क्लासिकल डान्स, त्यानंतर हिंदी चित्रपटातील उडत्या चालीची गाणी आणि शेवटी आयटेम सॉन्ग्ज! तिला त्याच त्याच गाण्यांवर नाचून खरे तर वैताग आलेला असायचा. पण प्रेक्षकांसाठी हे नवीन असायचे. प्रत्यक्ष मालविका?? इतक्या कमी अंतरावर? मालविका सोबतीला कुणीही डान्सर ठेवायची नाही. याचे कारण सर्व फोकस सतत आपल्यावरच राहावा असा तिचा हेतू असायचा. प्रत्येक कार्यक्रमात ती दोन नवीन गाणी पेश करायची. कारण प्रयोग करत राहिल्याशिवाय आणि नवीन देत राहिल्याशिवाय आपले आत्ताचे स्थान अबाधित राहणार नाही हे तिला माहीत होते. तिचा जो ठरलेला गीतकार होता तो तर आता पगारीच झाल्यासारखा झाला होता. दिवसातील सोळा सोळा तास तो पेटी घेऊन त्यावर चाली लावत बसायचा. हे म्हणजे आधी ट्यून आणि नंतर गीत असा प्रकार होता. पण तोच आवश्यक होता. अनेक लहानमोठे गीतकार मालविकाच्या मागे लागलेले होते आपापली गाणी घेऊन! ती ऐकायची सगळ्यांचीच गाणी, पण शेवटी ठरलेल्या गीतकाराचीच गाणी स्वीकारायची. हेही करण्याचे एक कारण होते. आज या जोडीला कुणी हात लावू शकत नव्हते. त्यात कमिटमेन्ट असल्याप्रमाणे झालेले होते. आणि या गीतकाराच्या प्रतिभेची पूर्ण क्षमता वापरून झालेली आहे असे मालविकाला वाटत नव्हते. ती आपल्याशिवाय कुणाचे गीत घेईल की काय या भीतीने तो सतत नवनव्या ट्यून्स द्यायचा प्रयत्न करत राहायचा.

पडदा पडू लागला तसे मात्र नाराजीने प्रेक्षकांना उठावेच लागले. मालविकाने मात्र तेव्हाव्ही नाचता नाचता एकदाचा सुटकेचा श्वास घेतला. पुढचा संपूर्ण आठवडा ती दिल्लीत मैत्रिणीच्या लग्नासाठी घालवणार होती. एकही कार्यक्रम नाही. खरे तर त्या लग्नात मालविका येणार हे त्या लग्नाचे एक मोठे आकर्षणच होते. मालविकाला आता कंटाळा आलेला होता सतत कार्यक्रमांचा! त्यामुळे कधी एकदा आजचा कार्यक्रम संपतोय आणि मी मोकळी होतीय असे तिला वाटत होते.

एकदाचा पडदा पडला तशी ती हुश्श करून तिथेच बसली स्टेजवर! कुणीतरी धावत येऊन थंडगार पाण्याची एक काचेची बाटली तिच्यापुढे धरली. त्या माणसाकडे एकही दृष्टीक्षेप न टाकता तिने ती बाटली घेऊन तशीच तोंडाला लावली. सहा मोठे घोट घेतल्यावरच तिने ती बाटली बाजूला सरकवली. काहीसे फ्रेश वाटल्यावर तिने सेक्रेटरी गुजरला सांगीतले की मी आता कुणालाही भेटू शकत नाही आणि ताबडतोब हॉटेलवर जायचे आहे मी आवरून आल्या आल्या! सेक्रेटरीची मुंडी होकारार्थी हालतीय की नकारार्थी हेही न बघता ती तशीच स्वतःच्या मेकअप रूमकडे धावली आणि मागून पायलही!

मेकअप रूममध्ये आल्या आल्या पायलने आतून दार लावून घेतले. मालविका आरश्यासमोर बसली. रूम फार मोठी नव्हती. मालविकाला खरे तर वैताग आलेला होता. शक्य असते तर इथेच पहुडली असती ती! पायलने एसीचा झोत मालविकाकडे केला आणि मालविकाला मदत करायला तिथे धावली.

आणि दोनच मिनिटात....

.... धप्प!

भयानक दचकून किंचाळल्याच दोघी! त्या व्यक्तीने केवळ तीन ते चार सेकंदातच मालविकाचा मोबाईल फोन उचलला आणि खिशात टाकला. पायलकडे मोबाईल नव्हताच. रूममधील इन्टरकॉम त्या व्यक्तीने आधीच कापलेला होता. भयाने दोन्ही हात तोंडावर ठेवत दोघी किंचाळत होत्या. ही रूम साऊंडप्रूफ असल्यानेच ती व्यक्ती निवांतपणे दोघींकडे पाहात शांत बसलेली होती. ती व्यक्ती अ‍ॅक्च्युअली काहीच धोका पोचवत नाहीये हे जसे काही सेकंदांनी लक्षात आले तशा दोघी किंचाळायच्या थांबल्या. दाराकडे धावण्याच्या वाटेतच ती व्यक्ती उभी असल्यामुळे बाहेरही धावता येत नव्हते.

"क.... कोण...??????"

मालविकाचा घुसमटता प्रश्न ऐकून मात्र ती व्यक्ती बोलू लागली.

"घाबरू नका दोघी... मी बोका आहे.. मी इथे का आहे ते सांगतो... तुला किडनॅप करणार आहेत.. आत्ता तू ज्या गाडीतून हॉटेलला चाललेली आहेस त्या गाडीचा ड्रायव्हर नेहमीचा नाही.. तो त्या गॅन्गचा ड्रायव्हर आहे... तुझा सेक्रेटरी गुजर त्या संघटनेने दिलेल्या आमीषाला बळी पडलेला आहे... तो तुझ्या बरोबर गाडीत असताना तुला धोका होणारच नाही असे तुला वाटत असणार.. या गोष्टीवरच त्यांचा प्लॅन अवलंबून आहे.. ते तुला पळवून पुण्याला नेणार आहेत आणि अनेक कोटी रुपयांची खंडणी वसूल करणार आहेत.. आणि मी... ते होऊ नये म्हणून इथे आलेलो आहे.. मी तुला वाचवणार आहे.."

"आय विल कॉल पुलिस...."

मालविकाने किंचाळून उच्चारलेले हे वाक्य ऐकून बोक्याला जाणवले की तिचा त्याच्यावर अजिबात विश्वास बसलेला नाही.

"तुझा विश्वास नाही ... हो ना?? ... हे घे... हा मोबाईल घे आणि सेक्रेटरीला नुसतेच सांग बरं??... की म्हणाव तुला आत्ताच कुठल्यातरी मैत्रिणीचा फोन आला... आणि तिने तुला तिच्या घरी बोलावले आहे.. त्यामुळे तू निघून गेलास तरी चालेल..."

मालविका समोर पडलेल्या सेलफोनकडे आणि बोक्याकडे आळीपाळीने पाहात होती. काही क्षणातच तिने फोन उचलून गुजरचा नंबर डायला केला..

"येस मॅडम???"

"गुजर... इथे रूममध्ये...."

बोक्याकडे पाहात हे शब्द उच्चारल्यावर मालविका थांबली.. कारण आता बोक्याच्या हातात एक लखलखता सुरा आलेला होता.. बोका हळूच पुटपुटला..

"जे सांगीतलं तेच विचार..."

"गुजर... मला.. मला मैत्रिणीचा फोन आला होता.. मी तिच्या घरी चाललीय... तू जा..."

"मॅडम???... अहो.... "

"काय झालं??"

"नाही नाही... काही नाही... पण... आत्ता कशाला जाताय?? दमलायत तुम्ही..."

"छे छे.. मला जायलाच हवं..."

"सॉरी मॅडम... पण मी आत्ता तुम्हाला जाऊ देणार नाही.. "

"गुजर... डू यू नो व्हॉट यू आर सेयिंग??"

"व्हेरी सॉरी मॅडम.. म्हणजे .. बोलताना चूक झाली.. पण.. तरी... नाहीच जाऊ देणार मी..."

"का???"

"मॅडम.. दिवस वाईट आहेत.. तुमच्यावर अनेकांचे लक्ष आहे.. अशा परिस्थितीत..."

"म्हणजे काय??"

"मला परवाच असे कळले की... काही लोक कदाचित... तुमच्यावर हल्लाही करतील.."

हातातून फोन गळून पडता पडताच वाचला मालविकाच्या! थंड आणि निर्जीव नजरेने तिने बोक्याकडे पाहिले. बोका खरे बोलत असणार हे तिला जाणवले. सेक्रेटरी गुजर हाच धोका देणार होता.

"ओके.. एक दोन मिनिटांनी परत फोन करते तुला... तिच्याशी बोलून.."

"शुअर मॅम.. पण त्यांना सांगा.. म्हणाव आज नाही येऊ शकत..."

मालविकाने खटकन फोन बंद केला आणि बोक्याकडे पाहिले. बोका म्हणाला..

"सॉरी... तुला सुरा दाखवून घाबरवायचे नव्हते... पण मी तुझ्या मदतीसाठी धावपळ करत असताना तू मलाच पकडून द्यावेस हे मी कसे काय होऊन देईन??"

"तू.... तू आहेस कोण??"

"बोका.."

"बोका म्हणजे??"

"बोका नावाचा माणूस..."

"कोण आहेस पण तू??"

"मी खरे तर एक खबर्‍या आहे पोलिसांचा.. पण बराच... म्हणजे बराच मोठा खबर्‍या आहे मी..."

"तू हे जे काय सांगतोयस... ते तुला.. कसं समजलं??"

"काही प्रकरण असले की ते मला आपोआप कळते.. डिपार्टमेन्टकडून.."

"म्हणजे.. तू पोलिस आहेस??"

"नाही.. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या पोलिसांना करताच येत नाहीत.."

"म्हणजे?"

"आता समजा तुला पळवलं.. तर सन्मित्रांच्या मुलीला पळवलं ही बातमी सन्मित्रांना कधीच पब्लिश झालेली आवडणार नाही..."

"मग??"

"मग पोलिसांना जाहीररीत्या काहीच करता येणार नाही.. हात बांधलेले राहतील.."

"का??"

"कारण तुझे वडील पैशाचे प्रेशर आणून बातमी न फोडताच तुला पकडायला सांगतील.."

"हो पण.. मग तू काय करणार??"

"मी स्वतःचा जीव धोक्यात घालणार आणि तुला वाचवणार.."

"कसा काय??"

"मी....मी मालविका सन्मित्र बनणार..."

थक्क झालेल्या चेहर्‍याने मालविका आणि पायल या आगंतुकाकडे पाहात होत्या. त्याने आत्तापर्यंत तरी काहीही धोका केलेला नसल्यामुळे किंचितशी तरी का होईना मगाचची भीती कमी झालेली होती. पण तरी अजूनही हा प्रकार अजिबात झेपत नव्हता.

"तू पहिल्यांदा बाहेर जा... नाहीतर खडी फोडायला जाशील... इथे येतोसच कसा??"

"मला बाहेर काढणं सन्मित्रांनाही शक्य नाही.. आत्ता तुम्ही दोघी माझ्या ताब्यात आहात.."

"तू एक पाऊल पुढे सरकलास तरी जीवे जाशील..."

"मी एक काय... सहा पावले पुढे सरकून त्या आरश्यासमोर बसणार आहे... "

"कशाला???"

"माझा मेकअप करायचा आहेत तुम्ही दोघींनी... तोही फास्ट..."

"मी एक फोन केला तर जन्मठेप होईल तुला..."

"नक्कीच होईल.. पण फोन करण्यासाठी फोन कुठे आहे तुझ्याकडे??"

मालविकाने पटकन आपल्या सिक्युरिटीला फोन लावण्यासाठी नंबर डायल करायला सुरुवात केली. पण क्षणार्धात बोक्याने झडप घालून तो फोन हातात घेतला तशा दोघी पुन्हा किंचाळल्या.

"यडचापसारख्या बोंबलू नका.. अक्कल नसली तर निदान मी सांगतो ते ऐका.. "

"गेट लॉस्ट यू..."

"ठीक आहे.. मी गेलो की तुला नेतील... आणि मग बसा बोंबलत... तिथलं पब्लिक इतकं वाईट आहे ना??"

बोका तसुभरही हालला नाही. उलट एका खुर्चीवर निवांत बसला तेवढ्यात मालविकाचा फोन, जो त्याच्या हातात होता, तो वाजला. गुजरने पुन्हा फोन केला होता.

"मॅम... कळवलंत ना त्यांना.. येत नाही म्हणून??"

"नाही... अजून विचार करतीय मी.. तू डिस्टर्ब करू नकोस.."

मालविका आणि पायल नखशिखांत हादरून या अजब प्राण्याकडे पाहात होत्या. बोक्याने सहीसही मालविकाचा आवाज काढून उत्तर दिले होते फोनवर! हा माणूस असा असला तर फारच भारी असणार हे मालविकाला समजले.

"बस तिथे.."

बोक्याने आपल्याला आपल्याच रूममध्ये ऑर्डरी सोडाव्यात हे आवडलेले नसले तरीही चरफडत मालविकाला बेडवर बसावे लागले.

"आता नीट ऐक मी काय म्हणतो ते... तुला पळवून खंडणी मागणार आहेत... अनेक कोटी रुपयांची... ही खंडणी तुझे वडील सहज देऊ शकतीलही.. तो प्रश्न नाही... पण फुकाफुकी पैसे का घालवायचे धोका आधीच माहीत असताना?? धोका टाळण्याचा प्रयत्न तर करायला पाहिजे ना?? दुसरे म्हणजे आज तुला पळवतायत... उद्या आणखीन कुणाला तरी पळवतील.. हे गुन्हे थांबवायला पाहिजेत.. बर... हे सगळं करण्यात मला तुझी काहीच मदत नकोय... मी तुला इतकंच म्हणतोय की तू वेगळ्या गाडीतून दुसरीकडे निघून जा.. तुझ्याजागी मी जाणार... मला वाचवायला संपूर्ण डिपार्टमेन्ट प्रयत्न करेलच... तुलाही वाचवायला करेल.. पण तुला वाचवण्याचा प्रयत्न जाहीररीत्या करता येणार नाही कारण ते तुझ्या वडिलांना जाहीर व्हावेसे वाटणार नाही.. दुसरे म्हणजे... मी ज्या क्षेत्रात काम करतो त्यात मी असले अनेक प्रसंग अनुभवतो.. मला त्याचे काही वाटत नाही.. पण तुझ्यासाठी हा अनुभव थरारक आणि वाईट असेल.. तुला त्रास देऊ शकतील ते लोक.. तुझ्या वडिलांचे रेप्युटेशन पाहता काही असले तसले करणार नाहीत.. पण छेडछाड करतील.. उपाशी ठेवतील.. घाबरवतील.. बरेच काही करतील. हे सगळे करत असताना तुला ते असह्य होईल.. आता प्रश्न राहिला माझे म्हणणे तू का ऐकावेस.. जो सेक्रेटरी तुझ्याबरोबर गेले दिड वर्षे आहे त्याचे म्हणणे का ऐकू नयेस... तर हा प्रश्न मी तुझ्यावर सोडतो.. अजूनहीतुला असे वाटत असले की मी तुला धोका पोचवणार आहे तर मी इथून ताबडतोब निघूनही जायला तयार आहे.. पण नीट विचार कर.... आत्ताच त्या गुजरचा परत फोन येऊन गेला.. असा आग्रहीपणे या आधी तो कधी वागला होता का तुझ्याशी?? "

मालविकाने शुन्यात पाहिल्यासारखे करत नकारार्थी मान डोलावली.

"बर मी जे करायला सांगतो आहे त्यात तुला तर काहीच धोका नाही... मी तुझा वेष धारण करून किडनॅप होणार आणि तू वेगळ्या गाडीतून तुला जिथे जायचे तिथे जा... आत्ता हे दार आतून बंद आहे.. माझ्या अंगात इतकी ताकद नक्की आहे की तुम्हाला दोघींना मी दार उघडू देणार नाही.. इथले सगळे फोनही माझ्या ताब्यात आहेत... इथे आल्यापासून मी तुम्हाला काहीतरी त्रास दिलेला आहे का?? तुम्ही घाबरलात ते मला अचानक पाहून.. पण मला असेच उजेडात येणे शक्य होते.. तुझी अपॉईंटमेन्ट मागून मी येऊ शकलोच नसतो इथे... तेव्हा विचार कर आणि मला सांग... दुसरे म्हणजे ही निरागस मुलगी तुझ्याबरोबर उगाचच पळवली जाईल.. आणि हिचे वडील काही सन्मित्र नाहीत... हिला कुणीही वाचवणार नाही... "

तब्बल तीन ते चार मिनिटे दोघीही बोक्याकडे आणि एकमेकींकडे आळीपाळीने पाहात होत्या. बोका सभ्यपणे लांबवर बसून नुसता बघत होता. गुजरचा फोन पुन्हा आला तसा मात्र बोक्याने फोन मालविकाला दिला.

"मॅडम.. येताय ना लवकर??""

"गुजर?? मी तुझी सेक्रेटरी आहे की तू माझा सेक्रेटरी आहेस?? सारखा फोन करू नकोस.. मी जरा विश्रान्ती घेणार आहे... "

चरफडत गुजरने फोन कट केला तशी मालविका बोक्याला म्हणाली..

"तुला माझा मेकअप कसा काय करता येईल??.. तू स्त्रीसारखा कसा दिसशील??"

"माझी उंची कमी आहे.. साडे पाच फूटच आहे...तुझ्यापेक्षा एखादाच इंच जास्त"

"अरे पण..."

"एक मिनिट.. तुझ्याकडे एखादे ढगळ जर्कीन आहे का??"

"अं?? नाही.. पण... एक मोठा कुर्ता आहे बहुतेक.."

"मग तोच घालतो..."

"हो पण तो मी रात्री झोपताना घालते.."

" अगं मग एक दिवस काहीतरी वेगळं घाल ना??"

"अरे मठ्ठ माणसा... पण तो घालून मी बाहेर हिंडायला लागले तर गुजरला डाउट नाही का येणार??"

बोक्याला अक्कल आली. बावळटासारखा तो दोघींकडे पाहू लागला.

"पायलकडे काय पाहतोस?? तिला नाही सोडणार मी माझ्या जागी... ती काय म्हणुन जाईल??"

"मी कुठे म्हणतोय हिने जावं??"

"मग बघतोयस काय??"

"तिच्याऐवजी मी आलो तर???"

सगळेच विचारात पडले. म्हणजे मालविका किडनॅप होणारच! पण बरोबर बोकाही जाणार, पायल म्हणून!

"पण... हिच्याऐवजी... हिच्याऐवजी तरी तू कसा काय येशील??"

"ही पण तुझ्याचसारखी माझ्याएवढी उंच आहे.."

"हो पण कपडे काय घालणार तू??"

"काहीही... हिने कोणत्या कपड्यात असावं याबाबत गुजरचं काही म्हणणं नसणार ना??"

"अरे पण चेहर्‍याचे काय??"

"ओढणी घ्यायची तोंडावर... सांगायचं गालांची आग होतीय.. कशानेतरी..."

"हो पण संपूर्ण तोंडावर??"

अचानक पायल म्हणाली..

"मॅडम.. मी नाही तुम्हाला जाऊ देणार.. मी आणि हेच जातो..."

"का??"

"मला माहीत असताना तुम्हाला धोक्यात घातलं हे कळलं तर माझं काय होईल??"

"हो पण मीच सांगीतलं होतं असं म्हंटले तर काही होणार नाही..."

"नाही... मीच जाणार.. मी आणि हे..."

बोक्यालाही स्वतःचा गोंधळ जाणवला. तो उद्गारला..

"ही म्हणते ते बरोबर आहे.. मुळात प्लॅन तुला वाचवण्यासाठी आहे.. हिला नाही.."

" पण मग आता करायचं काय??"

"काय करणार??..... नटवा मला अन काय!"

मालविका आणि पायल खुदकन हासल्या. बोक्याने उठून आपला टीशर्ट काढला. या किरकोळ दिसणार्‍या माणसाचे शरीर इतके दणकट आणि कमावलेले असेल असे वाटत नव्हते दोघींना आधी! नक्कीच हा या असल्या क्षेत्रात बरेच काही करून असावा. अचानक मालविका म्हणाली...

"अरे?? खरच की... माझ्याकडे एक ब्लेझर आहे की???"

बोका लबाड हासला.

सर्वात पहिल्यांदा पायलने बोक्याच्या डोक्यावर मालविकाच्या केसांसारखा एक विग ठेवला आणि सटासट तो विग कापत कापत मालविकाच्या केसांसारखा अधिकाधिक करायला सुरुवात केली. इकडे मालविकाने तीन ड्रेस बाहेर काढून बोक्याला दाखवले. त्यातील अर्थातच ब्लेझर बोक्याने सिलेक्ट केला. ब्लेझर होता हे बरे झाले अस सगळ्यांनाच वाटले. कारण तो ब्लेझर मांड्यांपर्यंत होता चांगला! त्याखाली बोक्याची आहे ती ट्राऊझर घातली तरी चालण्यासारखे होते. कारण मुळात मालविका रिप्लेस होईल असे कुणाला वाटलेच नसते. त्यात बोक्याला मालविकाचा आवाज सहीसही जमत होताच! आता फक्त चेहरा झाकला की झाले. मात्र शूजचा प्रश्न आला. बोक्याचे शूज सरळ सरळ पुरुषी थाटाचे होते. मालविका असले शूज घालणे शक्यच नव्हते. आणि तिचे शूज बोक्याला होणेही शक्य नव्हते. शेवटी सरळ स्लीपर्स घातल्या ब्लेझरवर! बोका उठून उभा राहिला तशा दोघी हसायला लागल्या त्याही अवस्थेत! साडे पाच फुट उंची, ब्लेझर, ट्राऊझर, स्लीपर्स आणि बायकी विग! एवढे करूनही त्याच्या पाठीचा व्ही शेप जाणवतच होता.

"तू मला जरा चालून दाखव बरं??? म्हणजे नेहमीसारखं हा?? वेगळं काही नाही..."

बोक्याने दिलेली आज्ञा पाळत मालविकाने नॉर्मली चालते तसे चालू दाखवले. पुढच्या फेरीला बोकाही तिच्यामागे चालू लागला. आणि फेरी संपल्यावर मालविकाने वळून पाहिले तर पायल तोंडावर हात ठेवून अवाक होऊन बोक्याकडे पाहात होती.

मालविकाने तिला विचारले.

"काय गं?? काय झालं??"

"मॅम... अहो खरच तुम्हीच चालताय असं वाटतंय... असे चालतायत..."

"ए .. मला दाखव की चालून माझ्यासारखा..."

बोक्याने खोलीला एक राउंड मारली. मालविका पोटावर हात धरून हासत होती. बोक्याचे चालणे लाजवाब होते. इतके नजाकतदार चालणे आपल्याला तरी जमेल की नाही असा मालविकालाच प्रश्न पडावा असे! बोक्याची निरिक्षणशक्तीच अफाट होती. तेवढ्यात मालविकाला दिसले.. बोक्याचे मनगट ब्लेझरमधून बाहेर आले होते आणि त्यावर दाट केस होते..

"ई... ते केस काप आधी... "

बोक्याने सरळ हात खिशातच घातले..

"बायका असे खिशात घालतात हात??"

"मग करू काय??"

"चेहरा कसा झाकणार आहेस??"

"ओढणीने.."

"मग ओढणी हातांनीच धरावी लागेल ना??"

"हां! ओढणीतच गुंडाळतो हात.."

"हं.. पायल.. दे गं याला एक ओढणी??"

अत्यंत विचित्र ध्यान दिसत होतं ते! पण एक मात्र खरं! बोक्याच्या लाजवाब अभिनयामुळे ती स्त्री नाही असे वाटणे शक्यच नव्हते.

"मी काय करू आणि इथे??"

आपण गेल्यावर मालविका इथेच राहणार म्हणून ती तसे विचारतीय हे बोक्याला समजले..

"तू साधारण एक तासाभराने निघ.. "

"एकटीच??"

"मग त्याला काय झालं??"

"अन तेव्हाच कुणी पळवलं तर??"

"तुला कशाला पळवतील??? ते मालविकाला पळवणार आहेत.."

बोक्याने मालविकाच्याच बायकी आविर्भावात आणि आवाजात वाक्य टाकल्यावर मात्र दोघी भयंकर हासल्या.

"तू महान माणूस आहेस..."

"मला माहीत आहे ते... काहीतरी नवीन बोल तू..."

"मला वाचवतोयस म्हणून शहाणपणा करू नकोस.. हवे तर मीही जाईन तुझ्याऐवजी..."

"बेटा मालविका.. मीच तुझ्या'ऐवजी' चाललोय... पळवायचंय तुलाच.. मला नाही.."

"तुझं नाव काय आहे रे??"

"बोका..."

"नाही नाही.. खरं नाव..."

"खरं नावच बोका आहे... आणि मला खोटं नाव नाही... गुजरला फोन लावून सांग तू येतीयस म्हणून.."

मालविकाने तसे फोनवर सांगीतले आणि मग...

... पायलने बॅगा उचलल्यानंतर बोका तिथून निघताना मात्र मालविका काहीशी इमोशनल झाली..

"बोका.. मला माहीत नाही तू खरे बोलतोयस की खोटे.. पण.. मला वाचवण्यासाठी तू धोक्यात जाणार असशील तर... यू आर रिअली अ ग्रेट मॅन... आणि.. थॅन्क्स म्हणने योग्य नाही... आय अ‍ॅम.. आय अ‍ॅम ग्रेटफुल.. अ‍ॅन्ड सॉरी.. की सगळे माहीत असतानाही तुला धोका स्वीकारू देतीय.."

"इट्स ओके मालविका.. मी हे रोजच करतो.. यू डोन्ट वरी नाऊ.."

"बोका... इन केस... यू एव्हर नीड माय हेल्प... डू कॉल मी... हं?? .. "

"शुअर... आय नीड यूअर सेल फोन ... इट शुड बी विथ मी... नं??"

मालविकाने स्वतःचा फोन, पर्स आणि काही किरकोळ गोष्टी, जसे हातातील घड्याळ, चेन वगैरे बोक्याकडे दिल्या. आणि...

... जवळपास पाऊण तासाने जेव्हा मालविका नाट्यगृहातून बाहेर येऊन टॅक्सी थांबवत टॅक्सीवाल्याला मालाडच्या मैत्रिणीच्या घराचा पत्ता सांगत होती.....

... तेव्हा बोका ज्यात बसला होता ती मालविकाची गाडी सुसाट वेगाने पुण्याकडे निघालेली होती... आणि जवळपास पनवेलपर्यंत पोचलेलीही होती...

====================================

"हं.... मालविका जैन.... यू आर नथ्थिंग... जस्ट नथ्थिंग.... "

ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला सेक्रेटरी गुरव तुच्छपणे हासत म्हणत होता. मगाशीच त्याने मागे बसलेल्या मालविका 'मॅडम' आणि पायल यांना जे सॉफ्ट ड्रिन्क प्यायला दिले त्यात गुंगीचे औषध होते. पायल खरोखरची बेशुद्ध झालेली होती तर बोका चांगला शुद्धीत होता. आणि बोक्याच्या खिशात एक शक्तीशाली रेकॉर्डरही होता लहानसा!

"करण... गाडी लोणावळ्याला थांबवू नकोस.. नाहीतर गोळ्या घालीन तुला..."

"नाही साहेब... अशी कशी थांबवीन???... साहेब... ही... दुसरी पोरगी नको होती गाडीत.."

"का रे??"

"उगाच लोढणं.. तिची उगाच काळजी घेत बसावी लागणार..."

"खरंय... मधे उतरवायची का??"

"बेशुद्ध आहे.."

"आणू शुद्धीवर..."

"मळवलीपाशी उतरवू..."

"मला वाटतं आर के शी बोलावं आधी.."

"हं.. आत्ताच विचारा साहेब साहेबांना..."

गुरवने कुणालातरी फोन लावला.

"सर गुरव..."

"हं"

"सर मी काय म्हणतो.. ती दुसरी पोरगी... ती हवीय का?? नाहीतर उतरवली असती.."

"अक्कल विकत मिळत असती तर तुझ्यासाठी घेतली असती मी..."

"सॉरी सर... पण.. काय झालं??"

"त्या दुसर्‍या मुलीनेच सन्मित्रला फोन करायचेत ना??"

"नाही.. म्हणजे मी म्हणत होतो की आपणच फोन केले तर??"

"सांगतो काय मी.. तुला गाढवांच्या बाजारातही किंमत येणार नाही..."

"सॉरी सर... ठेवतो फोन..."

"आणि दोन तासांच्या आत इथे पोचला नाहीत तर जिवंत जाळीन..."

"सर पनवेल मागे टाकलंय.."

"पनवेल मागे टाका नाहीतर खोपोली उरावर घ्या.. दोन तासात पोचा इथे..."

गुरवने फोन ठेवला. बोक्याला फक्त गुरवचेच बोलणे ऐकू आलेले होते. गुरवने फोन ठेवून आर के च्या नावाने एक शिवी हासडली.

"काय झालं साहेब??"

गुरवने दुसर्‍या शिवीत आर के ची आई व डुक्कर या प्राण्याचा घनिष्ट संबंध प्रस्थापित केला.

"काय झालं काय??"

"मला म्हणतो तू गाढव आहेस..."

ड्रायव्हर हासला तशी गुरवने एक खाडकन त्याच्या कानाखाली वाजवली. ड्रायव्हर गप्प बसला.

"पण साहेब... या मुलीचं काय म्हणाले ते??"

"नाही उतरवायची म्हणाला..."

"का??"

"तुझ्यायला तुझ्या... तू कोण बे मला सवाल करणारा?? आ???"

"नाही नाही... पण... साहेब जरा झंगडच आहे आपला..."

"झंगड?? तिच्यायला मी तर गोळीच घालणार आहे एक दिवस.. चार बापांचा आहे तो.."

"मीही नोकरी सोडणार आहे साहेब.. या असल्या माकडांबरोबर कोण राहणार??"

गाडीत शांतता पसरली तसे बोक्याने एक झोप काढायचे ठरवले. नाहीतरी गाडी सुसाट चाललेलीच होती. मालविकाचा मोबाईल गुरवने जप्त केलेला होता.

हायवेवरून गाडी सुसाट वेगाने पुण्यात घुसणार होती. बोक्याची झोपही सावधच असायची. प्रत्येक ब्रेक, प्रत्येक अक्षर, प्रत्येक सुस्कारा त्याला जागे करायला पुरेसा होता. आणि नंतर क्षणात झोपवायलाही!

शेवटी बरेच खड्डे आणि ब्रेक्स असे अनुभव यायला लागले तसे बोक्याला समजले. पुण्यात आलो आपण! डोळे किलकिले करून त्याने इकडेतिकडे पाहिले.

गाडी नगर रोडला लागलेली होती. मधेच एकदा बोक्याच्या पुण्यातील 'काही' घरांपैकी सध्याचे एक घरही येऊन मागे पडले. बोक्याला वाटले आत्ता आपण मोकळे असतो तर घरात निवांत झोपलो तरी असतो.

येरवडा मागे टाकून केव्हाच पुढे आलेली गाडी आता खराडी फाटाही ओलांडून पुढे निघालेली होती. तिच्यायला नगर बिगरला नेतायत की काय? पण नाही.

वाघोलीच्या आधी गाडी एका अरुंद कच्या वाटेला लागली डावीकडे वळून!

आणि पायलच्या तोंडातून आवाज आला तसा बोका गपचूप झाला. गुरवले वाक्य टाकले.

"ए.. अरे फटाफट पोचव तिथे.. ही दुसरी पोरगीच शुद्धीवर येतीय आधी.. च्यायला त्या आर के च्या.. जिला पळवायचे तिच्या बापाला फोन करण्यासाठी तिच्या मैत्रिणीलाही पळवायचे म्हणे.. अक्कलशुन्य साला.. त्याला एकदा असल्या कामगिरीवर पाठवून बघितलं पाहिजे काय करतो ते..."

ड्रायव्हर त्या खडकाळ वाटेवर बेभानपणे गाडी हाकू लागला तशी मात्र पायल चक्क पूर्ण शुद्धीवर आली.

तिला 'हे काय चाललेले आहे' ते समजायला साधारण चार पाच सेकंद लागले असावेत.

त्यानंतर तिने प्रश्न विचारला..

"कोण??? कोण आहात तुम्ही?? "

गुरवने वैतागून मागे पाहिले.

"मला ओळखत नाहीस का??? आ??"

"गुरव?? गुरव आपण कुठे चाललोयत??"

"इकडे बॅन्गलोरच्या वृंदावन बागेची प्रतिकृती आहे... ती बघायला..."

"गुरव.. स्टॉप द कार... आय से स्टॉप द कार..."

"एक थप्पड दिली तर तुझेच तीन दात हातात येतील तुझ्या... चूपचाप बसायचं.. "

"मॅम... अहो मॅम.. उठा... मालविका मॅम..."

"ती आता दोन तासांनी उठेल..."

"गुरव.. माइन्ड युअर लॅन्ग्वेज... काय बोलताय.. धिस इज क्राईम.."

"ए... चोSSSSSSप???... तोंड उघडू नको आता..."

पायलने एक किंकाळी फोडली. ऐकायला होतं कोण?? पण पायलही नाटकच करतीय हे गुरवला माहीत नव्हतं! पायल आता 'मालविका मॅडम'ना जागे करायचा घनघोर प्रयत्न करू लागली.

बोका ढिम्म!

पाच एक मिनिटांनी गाडी एका अंधार्‍या घरापाशी पोचली. गाडीचे लाईट डीमच ठेवलेले होते. बेदी ड्रायव्हर आणि गुरव गाडी बंद झाल्यावर गाडीच्या बाहेर आले.

गुरव - ए पोरी... तू हो बाहेर..

पायल - गुरव ... यू आर गोईन्ग टू पे फॉर धिस..

गुरव - बडबड बंद केली नाहीस तर मुलगी असलीस तरी फटके पडतील..

पायल चुपचाप खाली उतरली.

गुरवने बोक्याची बखोटे धरून गाडीबाहेर ओढून त्याला खाली पाडले. बोका आरामात बेशुद्ध असल्याप्रमाणे धप्पकन आपटला. बेदीने गाडीची दारे बंद केली आणि बोक्याला उचलायला धावला. तोवर पायलने गुरवचे हात धरून त्याला परावृत्त करायचा प्रयत्न केला. त्यामुळे ढकलाढकली करत दोघे बोक्याच्या पायाकडे आले. गुरवने पायलला एक फटका लावला आणि ती हेलपाटून खाली पडली.

गुरव - बेदी... उचल

बेदीने बोक्याच्या काखेतून हात घालून बोक्याला उचलले. तिकडून गुरवने बोक्याचे पाय उचलले. 'मालविका मॅडमनी' असले कसले शूज घातले आहेत ते गुरवला समजले नाही. पण तो विचार करण्याची ही वेळ नव्हती. अती झाले होते अती! एक तर आर के वाट्टेल तसा पाणउतारा करत होता. त्यातच मालविकासारख्या सुप्रसिद्ध नृत्यांगनेला पळवल्याचे टेन्शन! त्यातच पायलचा विरोध! आणि रात्रीचा हा अती वेगवान प्रवास! यामुळे गुरव आता सगळ्याच गोष्टींना वैतागलेला होता.

त्यातच बेदीने प्रश्न विचारला. त्याला बोक्याला खांद्याकडून उचलल्यानंतर स्त्रीच्या शरीराचा जो स्पर्श अपेक्षित होता तो झालाच नाही त्यामुळे तो गोंधळला आणि म्हणाला..

"गुरव साब... ये है कौन ये???"

अती झाले अन हसू आले या उक्तीप्रमाणे गुरवने बोक्याचे पाय दिले सोडून आणि खाली मातीत बसत तो वेड्यासारखा हसू लागला. गेले दोन महिने मालविकाला पळवायचा प्लॅन डिस्कस होत होता. आणि योजनेप्रमाणे आज मालविकाला पळवलेलेही होते. असे असूनही लास्ट मोमेंटला बेदी विचारतो की हे आहे कोण!

कपाळाला हात लावून गुरव हासतोय हे पाहून क्षणभर बोक्यालाही हसू आले होते. पण त्याने ते आवरले. तिकडे पायल धूळ झटकत उभी राहिली अन तिला मंद प्रकाशात काय दिसले तर बेदीच्या हातात बोक्याचे खांदे आणि पाय जमीनीवर असल्यामुळे बोका तिरका झालेला आहे आणि बेदी कसाबसा बोक्याला सावरतोय तर गुरव वेड लागल्यासारखा हासतोय.

पायल - ए गुरव... हासतोस काय?? सोड मॅडमना..

गुरव - कोण मॅडम? कसली मॅडम?

गुरवने हासत हासतच विचारलेल्या या प्रश्नावर पायल अधिकच गोंधळून म्हणाली..

पायल - म्हणजे काय?

तिला वाटले हा बोका आहे हे समजले की काय? आणि ते समजल्यामुळे त्याचा बॉस त्याला फाडून खाणार असे वाटून वेड लागून गुरव हासत असावा.

गुरव - इथे कुणी मॅडम नाहीच्चे.. सगळे बेदी आहेत बेदी... हा बेदी.. त्याने धरलंय आणि तिरका झालाय तो बेदी.. मी वाळूत बसून हासतोय तो बेदी... आणि तूही बेदी..

पायल - बेदी... गुरव मॅड झालाय... तू मॅडमना सोड... नाहीतर गजाआड दिसशील..

बेदी अजूनही चाचपतच होता बोक्याला! त्याला हन्ड्रेड परसेन्ट वाटत होते की ही व्यक्ती स्त्री नाही.

बेदी - गुरव साब.. ये औरत नही है..

आता गुरव मातीत लोळला. ते पाहून पायललाही हसू आले. तिच्या हासण्याचा आवाज आल्यावर तर गुरव सगळाच प्रकार बिनडोकपणाचा असावा असे वाटून मातीवरच हात आपटत हसू लागला.

बेदी - साब.. आप हसो मत.. ये आदमी है..

तेवढ्यातच गुरवचा मोबाईल वाजला.

"अबे घनचक्कर... यहा पहुंच गया है ना?? तो अंदर क्युं नही लाता उसे??"

आर के चा आवाज ऐकूनही गुरवचे हासणे थांबेना! गुरव उत्तरला.

"सर... हम वापस जा रहे है... "

"दिमाग ठिकानेपर है क्या??"

गुरव अजूनही हासतच होता.

"सर... मालविका आदमी है... औरत नही है..."

"गुरव...पैसा मिलनेके बाद तुझे उल्टा लटकाके नीचेसे जलानेवाला हुं मै.. अंदर आ स्साले..."

गुरवला इतके हसू येत होते की या धमकीचेही त्याला काही वाटले नाही. पण त्याने बोक्याचे पाय उचलले आणि वरात आत निघाली. जातानाही बेदी पुटपुटत होताच. 'कुछ गडबड हुवी है.. किसी औरहीको उठाके लाये है हम लोग..'! आणि गुरव हसू दाबत तळघराच्या पायर्‍या उतरत होता.

तळघरात मात्र बर्‍यापैकी लाईट होता. आत तिघे जण होते. स्वतः आर के, बबलू आणि झकिर!

आर के - गुरव... तेरी मय्यत उठवानेवाला हूं मै.. भोसडीके... क्या हुवा क्या... हस क्युं रहा है??

गुरव - सर... बेदी कहता है... ये औरत नही है..

आर के - बेदी.. तुझ्या मेंदूची भजी करून खाईन मी...

ते ऐकून आणखीनच जोरात हासत गुरव म्हणाला..

गुरव - मतलब भूखे रहेंगे आप... क्युंकी दिमाग तो है ही नही इसका..

गुरववर चिडून आर के ने हातातला काचेचा ग्लास फेकला.. तो गुरवने हवेतच झेलला.

आर के - ये कौन है??

गुरव - ये पायल है.. इसकी पी ए..

आर के - पी ए??..... तो तुम कौन हो??

गुरव - मै सेक्रेटरीका काम करता हूं सर.. पी ए और सेक्रेटरीमे फर्क है..

आर के - ए लडकी... चूपचाप उधर बैठ... और तमाशा देख... बकबक की तो जानसे जायेगी..

पायल आता मात्र खरच घाबरलेली होती. आर के एक अवाढव्य आणि हिंस्त्र दिसणारा माणूस होता. झकिर आणि बबलू तसे किरकोळ होते.

आर के - ये उठती क्युं नही??

गुरव - बेहोष किया है..

आर के - होष मे ला..

बेदीने तांब्याभर पाणी घेऊन बोक्याच्या चेहर्‍यावरची ओढणी बाजूला केली आणि भूत पाहावे तसा दचकून विचित्र आवाज करत मागे सरकला चार फूट!

आर के - क्या बे??

बेदी - सर.. ये कौन है??

आर के - च्युतियो.. भगाके लाते हो तुम.. और मुझेही पूछते हो???

तोवर गुरव बोक्यापाशी पोचला होता. त्याने तो चेहरा पाहिला आणि तोही हादरलाच! त्याने सरळ बेदीच्या कानाखाली खाडकन आवाज काढला.

आर के ला हा सिक्वेन्सच समजेना!

बेदी - मैने क्या किया??

गुरव - ये कौन है??

बेदी - ये कौन है मै क्या जानू?? उठाके लाये आप..

गुरव - मै मालविकाको लाया था..

बेदी - तो क्या सफरमे उसका औरतसे आदमी हो गया??

आत्ता आर के ला समजले. एक पुरुष पळवण्यात आला होता. आर के बेभान होऊन बोक्यापाशी पोचला. बोक्याचा चेहरा पाहून त्याने एक कचकचीत शिवी हासडली आणि गुरवला खणखणीत कानाखाली ओढली. हेलपाटलेला गुरव भिंतीवर जाऊन आपटतोय तोवर बेदीच्या पोटात ढवळून निघेल असा एक प्रहार केला आर के ने! आता आर के च्या शिव्या सुरू झाल्या. दोघेही मार खात होते. झकिर आणि बबलू नुसतेच हादरून पाहात होते. मधेच आर के चे लक्ष पायलकडे गेले. जमीनीवर खाली बसून घाबरलेल्या सश्याप्रमाणे बघणार्‍या पायलपाशी तो गेला तशी ती दचकून उभी राहिली. तिला वाटले आपणही मार खाणार! आर के दरडावत म्हणाला..

आर के - ये कौन है???

पायलने बोक्यापाशी जाऊन त्याचा चेहरा पाहिला आणि दचकल्यासारखे करत तोंडावर हात दाबत मागे वळली.

आर के - अबे कोई मुझे बतायेगा कि ये है कौन???

बेदीच्या पोटातील वेदना आत्तापर्यंत जरा कंट्रोलमध्ये आलेल्या होत्या. तो उठला आणि बोक्यापाशी येऊन बोक्याला निरखत आर के ला म्हणाला...

"सर... ये मालविका तो हैही नही..."

हे अनावश्यक ज्ञान पाझळल्यामुळे आणखीन मार खाल्ला त्याने! तोवर गुरव कंट्रोलमध्ये आलेला होता.

गुरव - सर.. ये क्या हुवा.. कैसे हुवा.. कुछ समझमेही नही आ रहा है..

आर के - अच्छा.. मतलब तुम किसीकोभी उठा लाओगे.. देखोगेही नही की है कौन??

आर के खवळणे साहजिकच होते. पण गुरव आणि बेदी कमालीचे हादरलेले होते. तेवढ्यात झकिरने बोक्याच्या तोंडावर पाणी ओतून त्याला शुद्धीत आणले. मुळातच शुद्धीत असलेला बोका शुद्धीत आल्याचा अभिनय करू लागला.

बोका - तू आर के का??

बोक्याने अत्यंत अनपेक्षितरीत्या आणि डायरेक्ट आर के कडे पाहात विचारलेला हा प्रश्न ऐकून यच्चयावत पब्लिक दचकले. पायल सोडून!

आर के ही हादरून बोका आणि गुरव यांच्याकडे पाहात होता. आणि गुरव आणि बेदी हादरून बोक्याकडे!

आर के - गुरव... तुझ्या पोटावर बैल नाचवीन मी... याला मी कसा माहीत??

गुरव - अहो पण आधी हा कोण आहे ते तर कळूदेत..

आर के या वेळेस चिडला नाही. कारण त्यालाही ते महत्वाचे वाटले.

आर के - कोण बे तू??

बोक्याच्या पोटात एक सणसणीत लाथ घालत आर के ने विचारले. अशा वेळेस स्नायू कडक केले की प्रहार जाणवत नाही हा बोक्याचा अनुभव होता. त्याने पोटाचे स्नायू क्षणार्धात कडक केल्यामुळे आर के ची लाथच बाऊन्स झाली.

बोक्याने निष्पापपणे गुरवकडे पाहिले.

बोका - तू जो सुव्वरकी औलाद म्हणत होतास तो हाच का??

आता बोक्याला मारावे की गुरवला हे आर के ला समजेना!

गुरवची तर हवाच टाइट झालेली होती.

आर के - तू कोण बे??

बोका - ए तू गप रे जरा.. काय रे गुरव???.. हाच का तो अक्कलशुन्य हिजडा तू म्हणत होतास तो??

आर के - हिजडा?????

गुरव लांब पळाला. बोका ताठ उभा राहिलेला होता आता! आणि त्याने टेप ऑन केला. गुरव आणि बेदीचे प्रवासातील बोलणे ऐकू येऊ लागले. आर के च्या चेहर्‍यावरचे भाव इतके हिंस्त्र होऊ लागलेले होते की 'मालविका इथे आलीच नाही' हा विषयच बाजूला राहिला. पायल मात्र बोक्याच्या त्या हुषारीकडे अविश्वासाने पाहात होती.

आर के संतापातिरेकाने गरजला...

"बबल्या... धर त्या *****ला... "

बबलू आणि झकीर गुरवला धरायला धावले. काही क्षणातच गुरवला आर के समोर आणण्यात आले. आर के ने अंगातल्या सर्व शक्तीनिशी गुरववर प्रहार केले. गुरव किंचाळत होता. आर के बेभान होऊन शिव्या देत होता. पायलला ती मारहाण पाहवतही नव्हती. बोका एका खुर्चीवर बसून शांतपणे एक सिगारेट ओढत होता. बेदी मांजरासमोर सापडलेल्या उंदरासारखा घाबरून स्टॅन्डस्टिल झालेला होता. झकीर आणि बबलूने आता बेदीला धरून ठेवलेले होते.

गुरवला मनाप्रमाणे मारल्यानंतर आर के ने बेदीकडे मोहरा वळवला. पाच एक मिनिटात बेदीची अवस्था गुरवपेक्षा भयंकर झाली. गुरव आणि बेदी जमीनीवर तडफडू लागल्यानंतर मग आर के बोक्याकडे आला. हा माणूस शांतपणे बसून बिड्या कशा काय ओढतोय हेच आर के ला समजेना!

आर के - तुला कधी स्वतःचा लगदा करून घेण्याचा अनुभव आलाय का??

बोका - नाही... सर्वसाधारणतः मी इतरांचा लगदा करतो...

आर के - मग आता मिळेल तुला तो अनुभव..

बोका - मला वाटले फक्त या दोघांनाच अक्कल नसेल... गुरव अन बेदीला..

आर के - म्हणजे??

बोका - तू तर त्यांचा बाप आहेस.. अक्कलशुन्यपणात..

आर के - जीभ हासडून मांजरांना खायला घालीन...

बोका - मग तुला माझा उपयोगच व्हायचा नाही...

आर के - तुझा आता कुणालाच उपयोग होणार नाहीये.. बबल्या... धर ***ला..

बबलू पुढे झाला तशी बोक्याने बसूनच एक लाथ इतकी खच्चून त्याच्या छातीत मारली की आधी काय झाले तेच आर के ला समजले नाही. समजल्यावर तो स्वतःच बोक्याच्या दिशेने धावला तसा बोका ओरडत मागे पळाला आणि घाईघाईत म्हणाला..

"गधड्या... तू अडकू नयेस म्हणून मुद्दाम मी मालविकाला पळवलं..."

धावता धावता आर के थांबला आणि धक्का बसून बोक्याकडे पाहू लागला.

बोका - अरे पिशाच्चा.. मलाच मारतोयस?? कुठे फेडशील हे पाप?? या तुझ्या दोन गाढवांचे बोलणे मी ऐकले.. की त्या आयटेमला पळवायचे आहे म्हणून.. यांना इतकीही अक्कल नाही की हळू बोलावे.. पण मी ते ऐकले तेव्हा डिपार्टमेन्टचे चार जण होते आसपास... मीही याच व्यवसायात आहे.. म्हणून यांना फसवून मी मालविका होऊन बसलो गाडीत.. हे बघ.. हे बघ माझे खोटे केस.. मालविकाला मी सेफ ठेवलंय.. तू बिनधास्त खंडणी माग तिच्या बापाकडे..."

आर के चा विश्वास बसणारच होता. कारण बोक्याचा इन्टरेस्ट तोच होता जो त्याचा स्वतःचा होता.

आर के - एक मिनिट एक मिनिट... तू आहेस कोण??

बोका - माझं नाव त्र्यंबक! मला सर म्हणतात...

आर के - सर म्हणतात म्हणजे??

बोका - आदराने.. या क्षेत्रातील सगळे लोक..

आर के - कसलं क्षेत्र??

बोका - किडनॅपिंग! मी भल्याभल्यांना किडनॅप करतो.. मीही आज मालविकाला किडनॅप करणार होतो..

आर के - ती कुठंय?

बोका - नाशिक!

नाशिक हा शब्द ऐकून गुरव आणि बेदीची आणखीनच पाचावर धारण बसली. आर के भडकून त्या दोघांकडे पाहात होता.

आर के - नाशिक?? नाशिकला कशी गेली?

बोका - बाय रोड..

आर के - अरे हरामखोर .. पण गेली कशी? नेलं कुणी तिला??

बोका - तिची तीच गेली..

आर के - म्हणजे काय? मालविका सुटली?

बोका - बुद्धी हा शब्द कधी तुझ्या कानावर पडलाय का?

आर के - म्हणजे??

बोका - नाशिकला ती माझ्या ताब्यात येईल...

आर के - कशी काय?

बोका - कारण तिला माहीत आहे.. की ती पुण्याला आली तर किडनॅपर्स तिला ताब्यात घेतील.. मुंबईतच राहिली तर तिथेही तिला धोकाच आहे.. त्यामुळे माझ्या सांगण्यावरून ती नाशिकला एका बंगल्यावर जाणार आहे...

आर के - काहीही फेकतोस का? ती स्वतःहून नाशिकला जाईल होय?

बोका - हो... कारण ड्रायव्हरला मी पैसे दिले आहेत..

आर के - मालविका तुझ्याशी बोलली?

बोका - न बोलायला काय झालं?? हिला विचार की! काय गं ए पायल??

पायल - नालायक.. मला वाटलं तू त्यांना वाचवणार आहेस.. तूही पळवलंसच शेवटी..

पायलने हजरजबाबीपणे योग्य उत्तर दिले याचा बोक्याला गुप्त आनंद झाला.

आर के - नाशिकला ती तुझ्या ताब्यात येईल??

बोका - अर्थातच..

आर के - मग? मग नंतर तू काय करणार?

बोका शांतपणे पुन्हा खुर्चीवर बसला. सगळेच आता बोक्याकडे हादरून पाहात होते.

बोका - सन्मित्र जैनला खंडणी मागणार.. तू किती मागणार होतास रे??

बोका असे अचानक प्रश्न विचारायचा. त्यामुळेच पब्लिकला सिक्वेन्स न समजल्यामुळे ते उत्साहाच्या भरात उत्तरे द्यायचे.

आर के - पाच लाख..

पोटावर हात ठेवून गडबडा लोळत बोका हसू लागला. हा का हासत असावा ते आर के ला समजले नाही.

आर के - ए... ए... उठ.. काय झालं?? आ?? अरे झालं काय?? हसतो काय??

बोका काही क्षणांनी हासणे आवरून पुन्हा खुर्चीत बसला.

बोका - पाच लाखासाठी ही पायल पुरेशी आहे की.. चल .. मी निघतो... हिच्या बापाला माग पाच लाख..

आर के - म्हणजे??

बोका - आपण कुणाला पळवतोय याचीच तुला अक्कल नसली तर पळवण्याचा फायदाच काय??

आपल्याच अड्यावर आपली अक्कल इतक्या वारंवारतेने काढली जाऊ शकते याचे आश्चर्य व्यक्त करणे टाळत आर के म्हणाला..

आर के - तू किती मागणार आहेस??

बोका - जाऊदेत... तू हिच्या बापाकडे माग..

आर के - अरे ही गेली खड्यात.. त्या मालविकाचं काय??

बोका - कोण मालविका??

आर के - म्हणजे काय?

बोका - ही मालविका कोण??

आर के - **** तू जिला नाशकात ठेवलीयस ती..

बोका - तिला तू पळवलंस की मी??

आर के - तू..

बोका - मग तिच्या बापाकडे किती खंडणी मागायची याच्याशी तुझा संबंध काय??

आर के - हातपाय मोडून घ्यायचेत का?

बोका - कल्पना बरी आहे... पण अंमलात येणं शक्य नाही..

आर के - का?

बोका - मला मारलंस तर मालविका आयुष्यात सापडायची नाही..

आर के - परत उचलीन रे तिला... ए झकीर.. धर याला..

बोक्याने टुणकन उडी मारली आणि तो एका कोपर्‍यात गेला आणि ओरडला..

बोका - मालविकाच्या बापाकडून पाच लाख घेऊन मी तुला देईन..

आर के - तू किती मागणार आहेस ते सांगतोस की कुदडून काढू??

बोका - दोन कोटी...

आर के - आणि मला पाच लाख??

बोका - गुरव आणि बेदीने गाडीतून कुणाला आणलं??

आर के - तुला..

बोका - आणि माझ्या गाडीतून कोण पळवलं गेलं??

आर के - मालविका..

बोका - मग तू मला पळवल्याची खंडणी मागायचीस.. आणि मी तिला.. त्यामुळे तुला पाच लाख बास..

आर के - तुला कोंबडीसारखा सोलून या खुंटीला लटकवून ठेवीन..

बोका - एक मिनिट.. मला सांग.. तुझी रास मीन आहे का??

आर के - नाही.. सिंह.. का??

बोका - तरीच..

आर के - काय ?? तरीच काय??

बोका - मीन आणि सिंहचे दिवस सध्या ब्येक्कार आहेत..

आर के - बबल्या... याला उलटा टांग आणि खाली जाळ कर...

बोका - गुरव... आपलं ठरलं होतं ते आता बोलून टाकतोच मी..

हे वाक्य तिसरंच होतं! आर के ला काही समजेना!

गुरव - आपलं काय ठरलं बे *****?????

बोका - की याला सांगायचं की मालविका नाशिकला आहे..

गुरव - सर.. तुम्ही मला हवं तितकं मारा.. पण हा माणूस बकवास करतोय..

आर के - तुझं अन गुरवचं ठरलं का असं? आ? आता मी तुझं काय ठरवतो ते ऐक..

बोका - गुरव... जरा अक्कल चालव.. मालविका तुझ्या अन माझ्या ताब्यात आहे.. आपण याला हवा तसा खेळवू शकतो..

गुरव - अबे चूप??? सर.. याला कुत्र्यासारखा मारा तुम्ही.. मी सांगतोय..

बेदी - लेकिन ये आदमी है कोन??

बोका - बेदी... तूही उलटलास?

बेदी - क्या बोला ये??

बोका - आर के.. मी तुला मालविका देतो... माझे एक कोटी काढ..

आर के - एक कोटी?? मी अडाणी, अक्कलशुन्य, बिनडोक आणि गाढव आहे का?

बोका - मालविका नाशिकलाही नाही आणि मुंबईलाही.. ती केव्हाच आली पुण्यात..

आर के - झकीर.. आता तू याला धरलं नाहीस तर तुला उलटा लटकावेन मी..

झकीर आणि बबलू धावले बोक्याकडे! बोक्याने तुफान ताकदीने दोघांना धडक दिली आणि एकदम उडी मारून आर के पाशी आला आणि आर के च्या सेन्टरमध्ये लाथ घालून पायलला म्हणाला..

बोका - पायल... धाव.. तू धाव हायवेकडे..

पायलला काहीच समजत नसल्यामुळे ती बाहेर धावली. इकडे बोका ओरडू लागला.

बोका - गुरव, तुझ्यात प्रामाणिकपणा नसेल.. पण माझ्यात आहे.. आपले तिघांचे जे ठरले ते ठरले.. याला धर आणि उलटा लटकव... मालविकाच्या बापाकडची खंडणी आपण तिघे वाटून घेऊ..

आर के घुसमटत्या स्वरात वेदना सहन न झाल्यामुळे जमीनीवर लोळत होता आणि झकीर आणि बबलू कसेबसे सावरत उभे राहात होते. हे दृष्य पाहिल्यामुळे गुरवला हेच ठरवता येईना की आत्ता ऐकायचे कुणाचे? त्याने सरळ येऊन पहिल्यांदा आर के च्या पाठीत लाथ घातली. आणि बोक्याला म्हणाला..

गुरव - माझे मुंडके तुझ्या पायांवर .... सर.. या क्षणापासून मी तुझा माणूस..

बोका - बेदी.. इकडे ये.. धर याला..

तोवर झकीर आणि बबलूला हे समजेनासे झालेले होते की आपण आर के ची साथ द्यायची का या तिघांची!

पण बेदी आणि गुरवने आर के ला कसेबसे उठवले आणि एका चौथर्‍याकडे नेले. झकीर आणि बबब्लूला समजले की आता आर के लाच टांगतायत हे! ते धावले.

बोक्याने दोघांना वाटेत धरले आणि अचानक बबलूचे पाय धरून तो आक्रोश करू लागला.

बोका - बबलू.. आईशप्पथ... आईशप्पथ मला माहीत नव्हते की तू इथे असतोस... केव्हाचा तुला शोधतोय मी..

बबलू - मला??.. कशाला??

बोका - कशाला?? आठवत नाही?? चार वर्षे झाली.. तुझे पाऊण लाख माझ्याकडेच आहेत.. चल आमच्याबरोबर तूही.. तुझे ते पाऊण लाख आणि मालविकाच्या खंडणितला वाटा दोन्ही देतो बबलू..

बबलू - झकीर.. अरे हे पोचलेलं बेणं आहे.. हे सगळ्यांना **बनवतंय..

तोवर प्रचंड विरोध करूनही शेवटी आर के उलटा टांगला गेला.

बोक्याने अचानक चेहरा बदलला आणि भाषणच सुरू केले.

बोका - मित्रांनो.. आज या ठिकाणी.. मला सांगायला आनंद होतो की.. माझे खूप जुने साथीदार गुरव आणि बेदी यांनी माझी मोलाची साथ देऊन शेवटी माझा एकमेव शत्रू आर के याला एकदाचा टांगलाच.. या बदल्यात मी खंडणीपैकी फक्त दहा टक्के, म्हणजे वीस लाख इतका माझा भाग कमी करत असून बाकी सर्व पैसे तुम्ही चौघांनी आपापसात वाटून घ्यावेत.. चला.. चला मुंबईला..

गुरवला 'आपण या माणसाचे जुने साथीदार नाही आहोत' हे समजत असले तरी पंचेचाळीस लाख मिळणार या आनंदात समजलेच नाही नीटसे!

बबलू - मुंबईला कशाला??

बोका - मालविकाला मी माझ्या फ्लॅटवर बांधून ठेवलंय.. तिथेच खंडणी मिळणार आहे..

गुरव - सर.. आम्हाला कॅश कुठे मिळणार??

बोका - जुहू..

गुरव - जुहू??

बोका - जुहू..

गुरव - पण तू आमचे बोलणे टेप का केलेस??

बोका - या नालायक आर के ला फसवण्यासाठी... आजवर ज्याने तुम्हाला कुत्र्यासारखे वागवले त्याला..

अचानक बबलू आणि झकीरलाही साक्षात्कार झाला की एकरकमी ४५ लाख रुपये हे आर के वर निष्ठा दाखवण्यापेक्षा महत्वाचेच होते. आर के किंचाळत होता. बेदी त्याला फटके लावत होता. आता चौघांनीही आर के ला त्याच अवस्थेत धुवायला सुरुवात केली.

बोका - मारा... मारा त्या नालायकाला.. आणि चला ताबडतोब.. बबलू आणि गुरव.. तुम्ही गाडीत बसा.. बमी ड्राईव्ह करेन.. बेदी.. तुम और झकीर यहीं ठहओ और इस हरामीको मारते रहो.. ती पोरगी कुठे गेली??

गुरव - तूच धाडलंस की मगाशी तिला..

बोका - हो पण ती गेलेली नसणार.. तिच्याच मदतीमुळे मालविका किडनॅप होऊ शकली.. तिला शोधा.. ती अत्यंत महत्वाची मुलगी आहे..

आर के ला सोडून सगळे बाहेर जाऊन पायलला शोधायला लागले. बोक्याने अंधारातच त्यांच्या गाडीची दोन चाके पंक्चर केली. पुन्हा आत जाऊन गुरवने टेबलवर फेकलेला मालविकाचा सेल फोन खिशात टाकला आणि उलट्या आर के कडे लबाडपणे हसून बघत बोका बाहेर आला. आर के चे डोळे भयानक झालेले होते.

तेवढ्यात बाहेर कुणालातरी पायल सापडली. तिला धरून बोक्यासमोर सादर करण्यात आले.

बोका - ताबडतोब गाडीत बस.. बबलू.. तू अन गुरव पण बसा.. चला.. मी गाडी चालवतो..

सगळे गाडीत बसले आणि काही फूट गाडी पुढे येईपर्यंतच समजले की चाके पंक्चर आहेत. तरी बोक्याने गाडी तशीच दामटली एक किलोमीटर! आर के च्या स्पॉटपासून लांब आल्यानंतर बोक्याने गाडी थांबवल्यावर सगळे उतरले.

गुरव - आता काय?? स्टेपनी पण नाहीये..

बोका - इथे पंक्चरवाला कुठे आहे??

गुरव - इतक्या रात्री कसला उघडा असणार तो??

बोका - रिक्षा?? रिक्षा मिळेल का?

गुरव - आणि??

बोका - सरळ स्टेशनवरून मुंबई... एशियाडने...

चौघे रिक्षा शोधू लागले. बर्‍याच वेळाने तीन चार रिक्षा पॅशिंजर नाकारून गेल्यानंतर एक रिक्षावाला यायला तयार झाला.

बोका - पायल.. तू गुरवबरोबर जा..

पायल - अन तुम्ही??

बोका - नाहीतर असं कर.. बबलू.. तू अन पायल पुढे व्हा..

बबलू - चालेल..

बोका- नाहीतर एक काम करा सरळ.. आमच्या फ्लॅटवर जाऊन काय चाललंय ते बघायला पाहिजे.. फ्लॅट फक्त मलाच माहितीय.. गुरव.. तू बस.. तू अन मी जाऊ..

बबलू - आम्हाला रिक्षाच नाही मिळाली तर??

तोवर रिक्षावाला वैतागलेला होता.

गुरव - अरे बसा पटकन कुणीतरी..

बोका - ही असली की मालविका बोलेल तरी..

गुरव - मला वाटतं सर.. तू आणि ही जा..

बोका - हो पण तुम्हाला रिक्षाच नाही मिळाली तर??

गुरव - मिळेल ना??

बोका - पायल??.. बस .. चल चल पटकन बस.. ए. लवकर या रे.. आणि माझा नंबर लिहून घे..

बोक्याने दिलेला एक बोगस मोबाईल नंबर दोघांनी सेव्ह केला. बोक्याने त्या दोघांचा आणि आर के चा! बोक्याची रिक्षा निघून गेली.

हे रिक्षेची वाट पाहात होते. दहा एक मिनिटांनी दुसरी रिक्षा आली. त्यात बसून हे स्टेशनला आले आणि अटकच झाली यांना!

त्याच वेळेस बोका उलट्या टांगलेल्या आर के चा फोन हातात धरून बसलेल्या झकीरला सांगत होता..

"गुरव और बबलूने हमे फसाया.. हमे अ‍ॅरेस्ट करवाया.. तुम दोनो भागो.. आर के को अ‍ॅरेस्ट करनेके लिये पुलीस आ रही है..."

"ये कैसे हुवा??"

" क्युंकी गुरव बोका है.. आर के को ये पताही नही था..."

गुलमोहर: 

बोका पुनरागमन. वा. मस्तच. बोका खुपच आवड्ला. ह्याचे तुम्हाला बरेच भाग लिहीता येतील. मी फक्त तुमच्या लि़हण्याला दाद देण्यासाठी सभासद झाले आहे मायबोली ची. खुप छान कथा असतात तुमच्या.

बोका पुनरागमन.... मस्तच....

<<सुरुवातीला गुजर ऐवजी गुरव पाहिजे का?>> हो मला ही तेच म्हणायच आहे

नाही आवडली, कै च्या कै लिहिलंय,
बोक्याला भेटणारे सगळे गुंड इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या बाळबोध मुलासारखे सारखे वाटतात.
थरार कमी विनोदीच वाटली हि गोष्ट

बोक्याने नटीचे कपडे घालणे , आणि ते कोणालाही न समजणे हा प्रसंग तर खूपच खोटा वाटतो

बाकी, पुढच्या गोष्टीची वाट बघतोय..
ओवर ओल ठीक ठाक

चांगली आहे..
किमान पुढच्या वेळी बोक्याची अड्डयावर जाउन फसवण्याची स्टाईल फार वेळा आली... आता जरा वेगळी स्टाईल हवी

नाही आवडली, कै च्या कै लिहिलंय,
बोक्याला भेटणारे सगळे गुंड इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या बाळबोध मुलासारखे सारखे वाटतात.
थरार कमी विनोदीच वाटली हि गोष्ट
बोक्याने नटीचे कपडे घालणे , आणि ते कोणालाही न समजणे हा प्रसंग तर खूपच खोटा वाटतो >>> +१११११११

हा भाग नाही आवडला

अगं मग एक दिवस काहीतरी वेगळं घाल ना?? >>>
एवढा हुशार बोका असला खुळचट प्रश्न विचारतो ? नाही पटल

या किरकोळ दिसणार्‍या माणसाचे शरीर इतके दणकट आणि कमावलेले असेल असे वाटत नव्हते दोघींना आधी! >>> कैच्या काई .
दणकट आणि कमावले ल्या शरीराचा अंदाज यायला shirt काढावाच लागतो का?
शेवटी बरेच खड्डे आणि ब्रेक्स असे अनुभव यायला लागले तसे बोक्याला समजले. पुण्यात आलो आपण

बेदी अजूनही चाचपतच होता बोक्याला! त्याला हन्ड्रेड परसेन्ट वाटत होते की ही व्यक्ती स्त्री नाही.>>
चेहर्यावरची ओढणी बाजूला केली असती तर दिसलं नसतं का?
आपल्याकडे मराठी मालिकांत जसं कैच्या की दाखवतात तसं

रिक्षामध्ये ३ माणसे बसतात . मग एवढा गोंधळ कशाला?