गुणबाचं कालिज !

Submitted by vaiddya on 18 February, 2011 - 23:28

माझं आजोळ ही माझ्यासाठी एक मोठी खाणच होती. माणसं, झाडं, जनावरं, पक्षी, आगळे-वेगळे खेळ, अत्रंग साहसं, वेगवेगळे अनुभव आणि त्या सगळ्यांमधे समरस होताना मिळणारा नि त्यानंतर अगदी आजवरही टिकणारा आनंद यांची ती खाण !

आजोळी जायचा रस्ता अवघड होता. एस्टीतून लोटेमाळावर उतरून मग सहा-साडेसहा किलोमीटर चालायचं. त्यामधे दोन चढणी आणि मग खाडीकिनार्‍याला असलेल्या माझ्या कोतवलीकडे जायला घाणेखुंट गावाच्या डोंगरामधली उतरणीची पायवाट किंवा डाग. कधीही मुंबईला परत येताना पहाटे चार वाजता पेट्रोमॅक्स बत्तीच्या उजेडात ही डाग चढावी लागत असे. आम्ही अगदी लहान असताना आमचे मामा आमची खास सोय करत असत. आमची सवारी मामाकडे कामाला येणारे काही आजुबाजूचे लोक होते त्यांच्या खांद्यावर असे.

काही वर्षं मी हे सगळं भोगलंय ते सगळं अगदी माझं वैभव असल्याच्या थाटातच. मला ज्याच्या खांद्यावर बसायला आवडत असे तो गुणबामामा. खरं नांव गुणा किंवा गुणाजी कांदेकर पण सकाळी आजी तिचा पहिला चहा करायची तेव्हा गुणबामामाचा दूध न घातलेला चहा तिच्यासोबत गाळायची. गुणबामामा पहाटे उठून यायचा. गुरांना चारापाणी करायचा. गायींची आचळं धुवायचा. मामा मग दूध काढून आणायचा आणि पुढले व्यवहार सुरू व्हायचे. कधी मामा त्याच्या कामासाठी किंवा परिक्षेसाठी चिपळूण, पाटण नाहीतर खेडला जायचा तर तेव्हा गुणबामामाच दूध काढून आणायचा.

शांत स्वभावाचा, छोट्या चणीचा, काटक, हसर्‍या पण पिचक्या डोळ्यांचा, दिवसातून सात-आठ वेळा तंबाकू चोळताना दिसणारा गुणबामामा नावाला जागत होता जणू. सगळी कामं त्याला यायचीच. मग मावशीच्या मोतीमाळेचा नाजुक चाप दुरुस्त करण्यापासून ते शेतातला भला मोठा दगड नांगरणीच्या आड येतो म्हणून एकट्याने उलथून टाकेपर्यंत आणि गायी-म्हशींना पाण्यावर नेऊन आणण्यापासून पोफळीवर चढून वरच्या-वरच एका झाडावरून दुसर्‍या झाडावर जात ढीगभर पोफळं गोळा करेपर्यंत सगळी कामं तो करायचा.

एकदा आमचा एक गडी राजा भेकरे जबर जखमी झाला. म्हणजे एक कडक वासा मधोमध चिरताना कुर्‍हाड सटकून त्याच्या स्वतःच्या पायावरच बसली आणि कुर्‍हाडीच्या पात्याच्या मापाची एक खोल जखम एखाद्या उंपळणार्‍या झर्‍यासारखी भसभस रक्त बाहेर टाकू लागली. ओरडा झाला. तिथेच जवळ काम करत असलेल्या अंबी, बाया अश्या दोघी ओरडू लागल्या. गुणबामामा विळ्या आणि कोयत्यांना सहाणेच्या दगडावर धार काढत बसला होता. तो काय झालंय ते जाणून घेत थांबला नाही. धार काढलेला एक कोयता घेऊन तो निघाला. धावतच त्या जागी पोहोचला. काय झालंय ते तिथे जाईपर्यंत त्याला समजलं होतं. आणि त्याची योजना मनात तयार झाली होती. जाता जाता तो मधेच थांबला .. तिथेच बाजूला असलेल्या एका हिरव्या गार बांबूवर त्याने घाव घातला. दोन तीन घावात तो बांबू त्याच्या हातात होता. मग त्याने तो छाटला आणि काही मिनिटातच त्याचे मधोमध दोन तुकडे करत करतच तो त्या जागी आला. मग खिशातून चुन्याची पुडी काढत त्यातला बराचसा चुना हातावर मळून हात डोक्याला गुंडाळलेल्या फडक्याला पुसत तो फडका त्याने थेट राजाच्या पायावरच्या जखमेत घातला. तो तसाच जरावेळ दाबून ठेवत दुसर्‍या हाताने त्याने बांबूच्या आतला सफेद गर काढत तो बराच जमा केला. आणि साधारण त्या जखमेच्या आकाराएव्हढा बोळा त्या बांबूच्या गराचा जमल्यावर जखमेतून फडकं काढून क्षणाचाही विलंब न करता त्याने तो बांबूचा गर त्या जखमेत कोंबला. सिमेंट घालून एखादी भेग बुजवावी तशी त्याने ती जखम अक्षरशः लिंपून काढली. रक्त थांबलेलं पाहून मला बरं वाटलं. मी हसलो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणीही होतं ते त्यानेच टिपलं आणि मग मला हसत मी कसा घाबरलो होतो त्याचं वर्णन दिवसभर सगळ्यांना सांगू लागला.

पण त्या दिवशी मला हे समजलं की गुणबामामाला जंगलातल्या आणि आसपासच्या औषधी वनस्पतींची किंवा झाडांच्या औषधींची खूप माहिती आहे. गुळवेल, तुळस, गोकर्ण, बाभूळ, आपटा, तेरडा अश्या बर्‍याच झाडांची त्याने मला बरीच माहिती कधीकधी दिलीही. विंचूदंशावर त्याच्याकडे रामबाण उतारा होता म्हणे. माझी एक मावसबहीण प्रथमच मुंबईहून तिथे गेली असता तिला विंचूदंश झाला पण तेव्हा मला गुणबामामाचा तो उतारा पाहायची वेळ आली नाही, कारण मलाच सगळे उपाय तेव्हा माहित होते. त्या दिवशी तो बाहेरगावी गेला होता म्हणून तिथे नव्हता.

एकंदरीतच मी मेडिसिनचा अभ्यास करतो हे कळल्यावर मात्र तो मला टाळेल की काय हे माझं वाटणं त्याने चूक ठरवलं होतं. एकदा तो, मी आणि माझा संस्कृत पंडित भाऊ सदादादा असे बसलो होतो. तर गुणबामामा शरीराच्या आत आम्हाला बघू देतात याबद्दल विशेष कुतुहल घेऊन बसला होता. त्याला आधी वाटत होतं की हिंदूंची प्रेतं जाळावी लागतात त्यामुळे आम्हाला मुसलमान नि ख्रिस्चनांचीच प्रेतं मिळत असावीत. पण मग त्याला हिंदूंचीही प्रेतं आम्हाला मिळतात, काहीजण तर देहदान करतात वगैरे माहिती दिली मी. मग जरावेळ गप्प बसला. देहदानाची कल्पना पचवत असावा असं मला वाटलं डोळ्याचं नि रक्ताचं दान कसं करतात ते त्याने विचारून घेतलं. मग त्याची गाडी स्वतःच्या रक्ताकडे वळली. खूप तंबाकू खाऊन आपलं रक्त आता बिघडलंय आणि ते कोणी घेणार नाही याची त्याला खात्री होती. तर मी तो समजही दूर केला. पण तो आताशा अगदी बारीक आणि अशक्त दिसू लागला होता तर हे ही सांगून ठेवलं की तुझ्या वजनामुळे किंवा अ‍ॅनिमियामुळे तुझं रक्त नाकारलं जाऊ शकतं. मग जरा वेळाने धीर करून तो बोलू लागला. तो जीव जगतो म्हणजे काय आणि मरण म्हणजे काय याचं त्याच्या विचाराने तयार झालेलं एक मॉडेल लाजत लाजत पण हे असंच असणार अश्या विश्वासातून मला सांगू लागला. आपल्याच नाही तर सर्व जिवांच्या छातीतल्या जगत राहाण्याच्या ते काळिज या एका अवयवाचं हे मॉडेल होतं. गुणबामामाच्या मते काळिज काम करेपर्यंत सगळं ठीक नाही तर मरण.

मॉडेल खूप इंटरेस्टिंग होतं. नवल हे होतं की ते गुणबामामाच्या स्वतंत्र विचारातून तयार झालेलं होतं. प्रथम होती अ‍ॅनॅटॉमी .. रचना .. छातीच्या पिंजर्‍याची रचना त्या नाजुक काळजाला ठेवण्यासाठीच आहे. हे म्हणजे आपण नाजुक झाडाला कुंपण घालतो तसं होतं. पिंजर्‍याच्या एका म्हणजे डाव्या बाजूला विड्याच्या पानाच्या आकाराचं आणि मध्यम मापाचं पान असतं तेव्हढं लाल-गुलाबी रंगाचं, म्हणजे वस्तुकी नावाची करवंदाएव्हढी फळं तिथे आसपास मिळायची त्यांच्या रंगाचं, हे काळिज नीट ठेवलेलं असतं. आता होती फिजिऑलोजी .. म्हणजे कार्यप्रणाली - आपण श्वास घेतला की त्या वार्‍याने हे काळिज हलतं .. आणि ते हलतं राहायचं तर ते ओलं-भिजलेलं असावं लागतं. आणि ते भिजलेलं राहावं यासाठी तिथे एक शीर आणून सोडलेली असते. तिच्यातून थेंबथेंब रक्त त्या काळजाला भिजवत ठेवण्यासाठी सांडत असतं .. मग त्या रक्तात त्या ओल्या काळजातला प्राण शिरतो म्हणून तो सगळीकडे पसरतो. ज्या दिवशी हे रक्त “ठिपिक ठिपिक पडनं” थांबेल त्या क्षणी मृत्यू. मी त्यानंतर त्याला काहीही शिकवत बसलो नाही. त्याची गरजच नव्हती असं मला वाटलं. सदादादालाही शरीराची खरी रचना कॉलेजपर्यंत शिक्षण झाल्यामुळे माहित होती पण त्याचंही मत हेच पडलं की मी गुणबामामाला काही शिकवत बसलो नाही हेच बरं होतं.

त्यानंतर मात्र माझं कोतवलीला जाणं थांबलं. अगदी लहान असताना मी त्याचे जे केस धरून त्याच्या खांद्यावर बसत असे ते पुर्णपणे जाऊन टक्कल पडलेला म्हातारा गुणबामामा मला एका लग्नात भेटला होता. चांगला होता. स्वयंपूर्ण वाटत होता. त्याच्या मुलाचं सगळं उत्तम चालल्याचं मला कळलं तव्हा बरं वाटलं होतं. पण गुणबामामाच्या घरातल्या कोणाशीही माझा विशेष परिचय नव्हताच. खरंतर तो स्वयंभू आणि स्वतंत्र असाच मला भासायचा.

एक दिवस सदादादाचा फोन आला. आणि सदादादा म्हणाला, “प्रदीप अरे, गुणबामामाचं काळिज सुकलं हो ..” गुणबामामाची आठवण कधीच सुकणार नाही आणि त्याने त्याचं काळिजाचं जे मॉडेल माझ्या डोळ्यांपुढे उभं केलं होतं ते कधीच मिटणार नाही .. अर्थात ... माझं काळिज सुकेपर्यंत !

गुलमोहर: 

गुणबामामाचं काळिज सुकलं हो ..” गुणबामामाची आठवण कधीच सुकणार नाही आणि त्याने त्याचं काळिजाचं जे मॉडेल माझ्या डोळ्यांपुढे उभं केलं होतं ते कधीच मिटणार नाही .. अर्थात ... माझं काळिज सुकेपर्यंत !

अशी काळजं सुकत नाहितच ती पुन्हा पुन्हा पालवी फुटून अंकुरतात म्हणूनच माणुसकी अजुन जिवंत आहे. सुरेख लेखन. आवडलं.

जबरी आहे रे, प्रदीप. तुझी शैली अन गुणबा मामाही...
अशी माणसं निव्वळ आपलं नशीब चांगलं म्हणून भेटतात नाही रे?
छान उतरलय.