पृथ्वीवर वनस्पति प्राण्यांच्या आधी निर्माण झाल्या. इथे प्राणी हा शब्द मी वनस्पति सोडून बाकी सर्व सजीव, अशा व्यापक अर्थाने वापरतोय. पण नंतर निर्माण झालेले प्राणी, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या अन्नासाठी वनस्पतिंवरच अवलंबून आहेत. भले ते मांसाहारी का असेनात, ते ज्या अन्नसाखळीचा हिस्सा आहे, त्या साखळीचे एक टोक, वनस्पति हेच असते.
निसर्गात अशी देवाणघेवाण एकतर्फी नसते. प्राण्यांची उत्सर्जिते, वनस्पतिंना अन्न पुरवतात हे खरे आहे, पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
वनस्पतिंना जगण्यासाठी हवा, पाणी, प्रकाश आणि काही मूलद्रव्ये लागतात. हवेशिवाय तर कुठलाच सजीव जगू शकणार नाही, पण बाकिच्या घटकांपैकी एकाचा अभाव असल्यास, आपल्यात काहि महत्वाचे बदल घडवून आणून, वनस्पतिंनी परिस्थितीवर मात केलेली आहे.
अशा काही खास वनस्पतिंची ओळख पुढच्या काही लेखातून करुन घेऊ.
मूलद्रव्यांचा अभाव असल्याने काही वनस्पति चक्क मांसाहारी बनल्या आहेत. पुर्वी "विचित्र विश्व" असे एक छोटेखानी मासिक येत असे. त्यामधे चौकटीत अशी काहि सदरे असत, जसे " आफ्रिकेमधील जंगलात काहि नरभक्षक वनस्पति आढळल्यात. कुठलाही प्राणी त्यांच्याजवळ गेल्यास त्यांची पाने सळसळू लागतात. तो प्राणी आणखी जवळ गेल्यास आपल्या फांद्यांच्या विळख्यात .... "
नाही मी असले काही लिहिणार नाही.
उंच डोंगर, तीव्र उतार, दलदल अशा ठिकाणी तिथल्या खास परिस्थितीमूळे झाडांना आवश्यक असलेल्या मूलद्रव्यांचा अभाव असतो. अशा ठिकाणी अनेकवेळा भरपूर पाऊस पडतो. या पावसामूळे जमिनीची प्रचंड प्रमाणात धूप होते. मातीचा वरचा सुपीक थर निर्माण होऊ शकत नाही, आणि जी काही मूलद्रव्ये उपलब्ध असतात, ती वाहून जातात.
पावसाळी ढगांमूळे सूर्यप्रकाशाचा अभाव असतो. अपूर्या सूर्यप्रकाशामूळे तपमान कमी असते. वनस्पतिंना पालापाचोळा कूजल्यामूळे जे विघटन होते, त्यापासूनही मूलद्रव्ये मिळतात, पण या ठिकाणी तपमान कमी असल्याने, हि प्रक्रिया खूपच विलंबाने होते.
अशा ठिकाणी मार्श पीचर नावाची वनस्पति तग धरु शकते, कारण या परिस्थितीवर मात करण्यासाठी एक अनोखा उपाय तिने शोधलेला आहे.
या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Heliamphora असे आहे. मराठीत याला काही नाव आहे का याची कल्पना नाही. खरं तर वरच्या फोटोत दिसणार्या वनस्पति थोड्या वेगळ्या आहेत, मूळ वनस्पति केवळ हिरवट पिवळ्या रंगाच्या असतात. तर जरा आणखी जवळून बघू या.
यातला जो उभा भाग आहे ते पानाचेच रुप आहे. एरवी पाणी शोषणे हे पानाचे काम नसते. उलट पाणी वापरणे हेच पानाचे काम असते. पानाला जे पाणी लागते ते पान स्वतः शोषू शकत नाही. पानावर पडलेले पाणीही ते शोषू शकत नाही. खरे तर पानावर पाणी साचले तर पान गुदमरते. त्यातली रंध्रे मोकळी रहात नाहीत व सूर्यप्रकाश मिळवण्यातही अडचण येते, म्हणून बहुतांशी पाने टोकेरी असतात व त्यावर पन्हळी असतात, जेणेकरुन त्यावर पडलेले पाणी वाहून जावे.
पण हे पान मात्र त्याला अपवाद आहे. याचे साधारण फूटभर उंचीच्या पानाची, चण्याच्या पूडीसारखी गुंडाळी केलेली असते. आणि त्यात पावसाचे पाणी साठवले जाते.
एवढ्या उंचीच्या नरसाळ्यात जर पाणी साठवले तर त्या वजनाने हि रचना कोसळू शकते. म्हणून हा पेला काठोकाठ न भरता, वर थोडी जागा सोडली जाते. ही जागा राहण्यासाठी या पुडीची गुंडाळी वरच्या बाजूने थोडी सैल असते, तिथून जास्तीच्या पाण्याचा निचरा होतो. काही जातीत तर ठराविक उंचीवर छिद्रेच असतात, ज्यातून जास्तीचे पाणी बाहेर पडते.
आता जरा आणखी जवळून या पानांची रचना बघू.
या पानाची वरची रचना खास असते. या पानाच्या वरच्या भागातून किंचीत साखरपाण्याची निर्मिती होते. त्याला भूलून काही माशा आणि डास भूलून या पानावर येतात. त्यांना अपेक्षित असते तेवढे साखरपाणी काहि तिथे नसते. आणखी खाद्याच्या शोधात ते याच्या आत जातात.
आतमधे थोडा चिकट आणि केसाळ भाग असतो. हे केस खालच्या दिशेने वळलेले असतात. त्यावरून तो किटक खाली घसरतो, आणि तसाही या रचनेमूळे त्याला परत वर चढणे अशक्यच असते.
आणि ते किटक पाण्यात पडतात. आजूबाजूला आधाराला काहीच नसल्याने यथावकाश ते पाण्यात बुडतात.
मूळ मार्श पीचर वनस्पति यानंतरचे काम पाण्यातील बॅक्टेरियांकडून करुन घेतात. त्या बॅक्टेरियांनी त्या किटकाची विल्हेवाट लावली कि मूक्त झालेली मूलद्रव्ये हे पान शोषून घेते.
वरच्या फोटोत दिसताहेत ते आहेत ट्रंपेट पीचर. यात असे चमकदार रंग असतात. वरच्या फोटोतली रंगसंगती मांसाच्या रंगाशी मिळतीजूळती असल्याने काही खास किटक आकर्षित केले जाऊ शकतात. दूसरे म्हणजे यातील पाणी हे साधे पाणी नसून खास पाचक रसांनी युक्त असते. त्यात पडलेले किटकांचे देह कुठल्याही बॅक्टेरियांच्या मदतीशिवाय विघटीत केले जातात.
आता या झाडाच्या या खास योजनेचा फायदा काही छोटे बेडूक घेतात. ते यांच्या काठावर बसतात आणि आकर्षित झालेले किटक गट्टम करतात. पण हा खेळ त्यांच्या अंगाशी येऊ शकतो, कारण ते जर का या सापळ्यात पडले, तर त्यांनाही बाहेर पडणे शक्यच नसते आणि आतले जहाल रसायन त्यांचा खातमा करते. बेडूक असून बुडाला, असे काहिसे होते खरे.
या झाडांची चापलुसी बघा. परागीभवनासाठी यांना किटकांचीच मदत घ्यावी लागते. त्यासाठी फूलांची रचना, अगदी वेगळी केली जाते.
या फूलात कुठलाही खोलगट भाग नाही. यातही साखरपाणी असतेच. शिवाय ही फूले स्वतंत्र देठावर येतात आणि पानांपेक्षा उंचही असतात.
कीटक तसे शहाणे असतात. जर त्यांना कळले कि या पानातले अमिष फसवे आणि जीवघेणे आहे, तर ते या पानांच्या वाटेला जाणारच नाहीत. पण त्यांच्या पहिला अनुभव हाच शेवटचा ठरतो. आणि शहाणपणा पुढच्या पिढीत पोहोचवायला ते जिवंतच रहात नाहीत.
आपण वरची जी झाडे बघितली ती व्हेनेझुएला, दक्षिण अमेरिका भागातली होती. याचाच एक प्रकार दक्षिण पूर्व आशियात आढळतो, आणि त्याचे नाव घटपर्णी. (आपल्याला फक्त हे नावच माहित असते, आपण क्वचितच ही वनस्पति बघितलेली असते. )
(सिंगापूर विमातळावरच्या टर्मिनल ३ वर मी हे बघितले होते. पण फोटो काढायचा राहिला होता. योगायोगाने वर्षूच्या एका लेखात मला हे फोटो दिसले. मागणी केल्यावर तिने ते तत्परतेने दिलेच शिवाय मला हवी असलेली जादा माहिती पण कळवली. त्याबद्दल तिचे आभार मानायचा उपचार मी पाळणार नाही. )
वर्षूला चिनी नववर्षाच्या बाजारात या वनस्पति दिसल्या होत्या.
आणखी जरा जवळून बघू या.
या वनस्पति मुद्दाम जोपासलेल्या आहेत. निसर्गात यांची वाढ होते त्यावेळी पानचे टोक, एखाद्या तणाव्याप्रमाने वाढत जाते, योग्य तो आधार सापडला, कि त्याभोवती एक विळखा घालून हा घट निर्माण केला जातो.
या घटाचे अनेक आकार असू शकतात. यात अर्थातच एक द्रव भरलेला असतो. एका जातीत (हो त्याचे नाव राजा असे आहे ) तर लिटरभर द्रव असू शकतो.
या घटांना आतून किंचीत मेणचट पापुद्रा असतो. हा पापुद्रा सुटून त्या भक्षाच्या पायाना चिकटतो, आणि त्याचे सुटकेचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात.
त्या द्रवात पडलेल्या प्राण्याच्या धडपडिने या झाडाच्या ग्रंथी उद्दीपीत होतात आणि जास्तीत जास्त तीव्र रसायने त्या द्रवात सोडली जातात. निव्वळ छोटे किटकच नव्हेत तर झुरळे, विचू आणि उंदिरही स्वाहा केले जातात.
आता असे झाड, चिनी लोक तरी शुभ मानत असतील का अशी मला शंका आली होती. आणि वर्षूने कळवल्याप्रमाणे, हे झाड काही तिथे शुभ मानले जात नाही. तसेच पारंपारीक रित्या काही ते नववर्षाचे प्रतीकही नाही, केवळ शोभेचे म्हणून तिथे ते होते.
वरच्या लिखाणावरुन असा समज होऊ शकतो, कि किटकांना सुटकेचा काही उपाय नाही. पण निसर्गात बदल हे नेहमीच घडत असतात. काही किटकांच्या अळ्यांनी या झाडाच्या जहाल पाचक रसांपासून स्वतःचे रक्षण करणारी यंत्रणा, अंगी बाणवली आहे. त्या अळ्या या पाण्यात राहून त्यात पडलेल्या किटकांवर ताव मारतात. पण त्या अळ्यांच्या उत्सर्जनाने त्या झाडाचा फायदा होतो.
काहि जातीत तर मुंग्यांसाठी एक वेगळा कप्पा असतो. पण इथेही दोन्ही पार्टींचा फायदा आहेच. मुंग्या मोठ्या किटकांचा फडशा पाडतात. त्यापैकी काही भाग त्या खातात तर उरलेला झाडासाठी सोडतात. मुंग्यांना पण भक्ष मिळते आणि झाडाला त्या किटकांचे पचवायला सोपे असे छोटे भाग करुन मिळतात.
यापेक्षा आणखी काही वनस्पति किटकभक्षी असतात. त्यापैकी एक आपल्याकडे (कासच्या पठारावर ) दिसू शकते. तिचे मराठी नाव दवबिंदू (सनड्यू ) नावाप्रमाणेच तिच्यावर दवविंदू असतात पण ते फसवे असतात. त्यावर बसलेल्या किटकांना सापळ्यात अडकवणारा तो चिकट द्रव असतो.
व्हीनस फ्लायट्रॅप म्हणून एक वनस्पति असते. ती आपल्याकडे सापडते का याची कल्पना नाही. यात तर चक्क सापळाच असतो, आणि मोठा किटक त्यावर बसला, कि त्याची दोन दले, मिटतात. अगदी छोटा किटक असेल तर त्याच्या काटेरी सापळ्यातून सुटू शकतो, पण मोठा किटक मात्र सुटू शकत नाही. वरच्या दोन्ही वनस्पतिंचे माझ्याकडे, मी काढलेले फोटो नाहीत. म्हणून इथे देता येत नाहीत.
आणखी अशा काही अनोख्या वनस्पतीची पुढे ओळख करुन घेऊच.
मेधा छान माहिती
मेधा छान माहिती मिळाली.ऊन्हाळ्यात सापड्तील का ही अर्टिक्युलेरिया.
फोटो मिळाला तर टाकच.
दिनेशदा मी तूम्हालाच निवडक दहा मढे टाकतॉ.
मेधा..तुझी माहिती पण छानै..
मेधा..तुझी माहिती पण छानै.. असच आमच्या नॉलेज मधे भर घालत राहा..
मेधा अगदी याचवेळेत नेरळ
मेधा अगदी याचवेळेत नेरळ माथेरान ट्रेक केलाय २/३ वेळा, पण पावसाळ्यात नाही. तेव्हा माहित असायला हवे होते. नक्कीच शोधली असती. त्यावेळी आम्ही ते तूरे गोळा करत असू.
अप्रतिम खजिना!!!!! माझ्या
अप्रतिम खजिना!!!!! माझ्या निवडक दहात.
इतकी सुंदर, सचित्र माहिती जर शालेय अभ्यासक्रमात असती तर नक्कीच विज्ञान विषयात जास्त मार्क मिळाले असते.
कड्यावरून वाहणार्या पाण्यातले बारिक कीटक , अळ्या यात अडकतात अन झाड त्यातील प्रोटीन शोषून घेते. इतकं बारीक अन नाजूक झाड कीटकभक्षी असेल असं वाटत सुद्धा नाही. >>>>अगदी अगदी
अशाच मांसाहारी वनस्पती कासच्या पठारावर आढळतात. ड्रॉसेराचा फोटो ललिता-प्रितीकडे पाहिला होता.
आहेत ती "सीतेची आसवं". नाव जरी करूण असलं तरी हि फुलं पक्की बदमाष आहेत. वाहत्या पाण्याबरोबर येणार्या किटकांचे शोषण करणारी.
लेख आणि फोटो मस्त! आवडले.
लेख आणि फोटो मस्त! आवडले.
छान माहिती.
छान माहिती.
दिनेशदा,तुम्ही ज्या व्हीनस
दिनेशदा,तुम्ही ज्या व्हीनस फ्लायट्रॅप बद्दल लिहिले आहेना त्यावर अॅनिमल प्लॅनेटवर सर डेव्हिड अटेन्बरो यांचा एक प्रोग्रॅम झाला होता.तुमच्या माहितीमुळे ती आठवण ताजी झाली.आणि तुम्ही दिलेले फोटो पण खूपच छान! इतके क्लोजअप्स बघायला मिळत नाहीत.तुमचा कॅमेरा आणि लेन्स फारच भारी आहे.कुठ्ल्या अँगलने फोटो चांगला येईल हे तुम्हाला बरोबर माहित आहे.सही फोटो!Utricularia amenthystina चे फोटो गूगल वर हे नाव टाईप केले की दिसतात.डॉ संदीप श्रोत्री यांचे पुष्पपठार कास या पुस्तकात या बद्दल माहिती आहे.खर पापणी,सीतेची आसवे,निळी पापणी,पान पापणी आणि चिरे पापणी अशा पोटजाती आहेत.अशी त्यात माहिती दिली आहे. आणि ह्या सर्व वनस्पती कास पठारावर बघायला मिळतात.
शांकली, मला तर माझे अनेक
शांकली, मला तर माझे अनेक अवतार एकाचवेळी झाल्यासारखे वाटतेय. आपण सगळे एकच आवड जोपासणारे, जिथे मी जाऊ शकलो नाही, तिथली माहिती, फोटो सगळे बघायला मिळताहेत. यापेक्षा जास्त काय मागू ?
अटेन्बरो साहेब तर माझा आदर्श आहेत.
मस्तच माहिती..
मस्तच माहिती..
खूप सुंदर फोटो आणि माहिती.
खूप सुंदर फोटो आणि माहिती. शाळेत असताना या वनस्पतींबद्दल अभ्यास केला होता पण पाहिल्या नाहीत अजूनही.
खुपच छान लेख !
खुपच छान लेख !
छान.. घटपर्णी आणि ड्रोसेरा ची
छान.. घटपर्णी आणि ड्रोसेरा ची माहिती ९ वी की १० च्या जीवशास्त्राच्या पुस्तकात होती..
खुप छान माहीती.
खुप छान माहीती.
खूप मस्त माहिती मिळाली,
खूप मस्त माहिती मिळाली, दिनेशदा, मनापासून आभार. अॅडमिनना सांगायला हवं की आवडत्या लेखक-लेखिकांनी लेख टाकले की इमेल यायची सोय प्लीज करून द्या म्हणून.
स्वप्ना, यापेक्षा आनंद देणारी
स्वप्ना, यापेक्षा आनंद देणारी प्रतिक्रिया असूच शकत नाही. पुर्वी माझ्या रंगीबेरंगी पानावर लिहित असे, पण आता ललित विभागात लिहितोय.
माझ्याकडेच लिंक्स नाहि राहिल्या त्याच्या.
छान लेख! खुप छान माहिती
छान लेख! खुप छान माहिती मिळाली..
Pages