मिर्चीवाले पनीर

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 16 February, 2011 - 04:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पनीर : २०० ग्रॅम
हिरव्या मिरच्या पेस्ट करून : ८-१० (कमी घेतल्या तरी चालतील)
लाल सुक्या मिरच्या भिजवून पेस्ट करून : २-३
कांदे : २ बारीक चिरून
टोमॅटो : २ बारीक चिरून
आले-लसूण पेस्ट : १ ते २ टीस्पून
गरम मसाला : १ टीस्पून
जिरे : १ टीस्पून
तेल : २ टेबल स्पून
हळद : अर्धा टीस्पून
मीठ : चवीप्रमाणे
कोथिंबीर, लिंबाच्या फोडी वरून सजवायला.

क्रमवार पाककृती: 

पनीरचा झणझणीत काहीतरी प्रकार करावा असे बर्‍याच दिवसांपासून डोक्यात होते. काल रात्री माझ्या रेसिपीज उतरवून घेतलेल्या वहीत सात-आठ महिन्यांपूर्वी आंतरजालावरून उतरवून घेतलेली एक तिखट झणझणीत पनीर रेसिपी सापडली. आज तीच करून पाहिली. मस्त झाली होती. अगदी नाकाडोळ्यांतून पाणी काढण्याइतपत! Proud

कृती :

तेलावर जिरे तडतडवा. त्यात आले-लसूण पेस्ट, हिरव्या व सुक्या मिरच्यांची पेस्ट घालून परता. नंतर कांदा घालून तो गुलाबीसर होईपर्यंत परतत रहा. टोमॅटो घालून पुन्हा परता. तेल सुटू लागेल. पनीरचे तुकडे, हळद, गरम मसाला, मीठ घालून परता. आवश्यक वाटले तर थोडे पाणी घाला. मंद आंचेवर आठ-दहा मिनिटे शिजू द्या. वाढताना वरून कोथिंबीर पेरा, लिंबाच्या चकत्या/ फोडी सोबत ठेवा. ही भाजी अंगासरशी होते. पोळी/फुलका/पराठा/पुलावाबरोबर छान तोंडीलावणे.

वाढणी/प्रमाण: 
तीन ते चारजणांसाठी
अधिक टिपा: 

- मिरच्यांचे प्रमाण कमी करता येईल. किंवा हिरव्या मिरच्यांची पेस्ट न करता त्या उभा छेद देऊन वापरता येतील.
- फार तिखट वाटले तर थोडे पाणी/ दही घालून चव अ‍ॅडजस्ट करता येते.
- मूळ कृतीत व्हेरिएशन करायचे तर ह्या भाजीत सिमला मिरचीही वापरता येईल.
- सोबत पाण्याचा ग्लास ठेवायला विसरू नका. Wink

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वाटतेय. पण मिरच्या मला निम्म्याहून कमीच वापराव्या लागतील. मिरच्या घेताना, तिखट तर नाहीत ना ? असे विक्रेत्याला विचारणारा मी !

सखी, फोटू काढायला विसरले गं.... पण फार काही वेगळी दिसत नाही ही पनीरची भाजी. टोमॅटो, कांदा, पनीर असल्यावर जसा रंग दिसतो तसाच येतो. लाल मिरच्यांमुळे जरा जास्त गडद.
दोन-तीन दिवसांनी पुन्हा करायचा प्लॅन आहे तेव्हा काढेन फोटो. Happy

दिनेशदा, मी वरच्या प्रमाणाच्या एक तृतीयांश घेतल्या होत्या मिरच्या! Wink पण नावातच मिर्ची असल्यामुळे त्या नावाला साजेसा तिखटपणा हवाच की!

अकु.. मस्त..वाचतांन्नाच तोंपासु Happy पण मी पनीर ऐवजी बोनलेस चिकन वापरणार Wink आणी तू सांगितलेलेच मिर्च्यांचे प्रमाण घेणार .. स्स्स्स..

'मिरच्या घेताना, तिखट तर नाहीत ना ? असे विक्रेत्याला विचारणारा मी !'

दिनेश दा-- Rofl Rofl