लिहिण्यास कारण की

Submitted by चिन्गुडी on 31 January, 2011 - 12:48

वॄंदावन वॄध्दाश्रमातला आजचा दिवसही रोजच्या सारखाचं होता, तेच हास्यक्लबचे लोक येऊन खोटं खोटं हसायला लावत होते, तेच काही निरुत्साही वृध्द पेपरचा रवंथ करत बसले होते, कोणी रोजचा तोच तो नाश्ता चिवडत होते, तेच रोजचे कर्मचारी येऊन साफसफाई करताना सगळ्यांच्या तब्येतीची चौकशी करताना दिसत होते. शेवटी वृंदावन हा एक पॉश लोकांचा वृध्दाश्रम होता, तीथे फक्त हाय प्रोफाईल लोकांनाच प्रवेश होता, आणि तसही सर्व सामान्यांना तीथली फी परवडणं ही शक्य नव्हतं. आणि म्हणुनच 'आपल्या हाय प्रोफाईल मुलांनी आपल्यासाठी एक हाय प्रोफाईल वृध्दाश्रम शोधला' या समाधानावर इथले बरेचशे वृध्द तृप्त होते.पण इथला प्रत्येक दिवस हा रोजच्यासारखाच असे, अगदी दुसरा दिवस म्हणजे पहिल्या दिवसाची कार्बन कॉपी जणु! सरीता आजही आपल्याच विचारात मग्न होती, "आणि सध्याचं इथलं वातावरण पाहता असं वाटावं की सगळी थकलेली माणसं जणुकाही मरणाची वाट पाहत, इथे एक एक घटका मोजण्यासाठीच जमा झालीयेत. त्यांना माणसं कशाला म्हणायचं? एक प्रकारचा कचराचं तो! एखादी गोष्ट जुनी झाली की ती कचरा म्हणवते, तसचं यांचंसुध्द्दा, फक्त माणसाचा कचरा झाला की तो कचरापेटीत न जाता वॄध्दाश्रमात जातो. आपणं जगलेलं आयुष्य किडामुंगीचं? कि वाघाचं? हा विचार करायला लावणारी आणि तो विचार करण्यासाठी हमखास फुरसत देणारी ही एकमेव जागा! आत्तापर्यंत वेळोवेळी दिलेली "वेळच मिळत नाही" ही सबब इथे देणं अशक्य! पुढची पिढी सुखी होण्यासाठी, या पिढीनं मोजलेली ही किंमत, या महागाईच्या काळात या "सुखासाठी" आपण मोजलेली किंमत कोणत्या इन्फ्लेशन रेटनी वाढत गेली हे वृध्दाश्रमात आल्याशिवाय लक्षात येत नाही. या धावाधावीत आपल्या मुलांना सर्वस्व देण्याच्या चढाओढीत काही महत्वाच्या पण द्यायच्या राहुन गेलेल्या गोष्टी म्हणजे वेळ, संस्कार, आपुलकी, जिव्हाळा ज्याला "वेळच मिळाला नाही" सबबच होऊ शकत नाही अशा अनेक गोष्टींचं उतारवयात आलेलं भान म्हणजे हे असं वृध्दाश्रमतलं ओशाळवाणं म्हातारपण! सगळ्याची गोळाबेरिज एकच, "स्वार्थ", कधी आई-वडिलांचा मुलांकडुन असलेल्या अपेक्षांमागे दडलेला तर कधी मुलांचा आई-वडीलाकडुन असलेल्या अपेक्षांमागे दडलेला! रात्रंदिवस कष्ट उपसुन मुलांचं भविष्य घडवायचा प्रयत्न करायचा, ते आपल्या म्हातारपणी आपल्याला मुलांनी सांभाळावे किंबहुना ते आपल्याला सांभाळण्याइतके समर्थ व्हावेत यासाठी आणि मुलांनी आपले पंख पसरुन एकदातरी आकाशात भरारी मारवी अशी आशा करुन! उलटपक्षी त्यांनी त्या बदल्यात स्वावलंबी होऊन आई-वडीलांना दाखवावं की मी एकटाही आयुष्यात यशस्वी होऊ शकतो, तुमच्या आधाराशिवाय! त्यासाठी ओव्हर टाईम आणि त्यासारख्या केलेल्या अनेक कष्टांचा सारखा ढोल वाजवायची गरज नाही. आणि त्या, कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी पळणार्‍या रेसमध्ये जर आपण एकमेकांशी सुसंवाद साधु शकलो नाही तर त्या पैशाचा उपयोग फक्त कुटुंबातली दरी वाढवण्यासाठी झाला असं म्हणावं लागेल. या हिशोबात होरपळुन गेलेल्या मुलांच्या बालपणाचं काय? एकदा मुलं मोठी व्हायला लागली कि आपण त्यांच्या सर्व भौतिक गरजा पुरवण्याकडे लक्ष देतो पण भावनिक गरजांचं काय? हा विचार आपण कधीच करत नाही.मुलांच्या भावनिक गरजा फक्त पालकचं समजु शकतात आणि पुरवु शकतात. योग्य वेळी आपण आपल्या मुलांच्या योग्य त्या गरजा समजु शकलो नाही आणि म्हणुनचं आज आपली मुलं आपल्या भौतिक गरजा लक्षात घेऊन आपल्याला वॄध्दाश्रमात ठेवत आहेत्,पण आमच्या भावनिक गरजांचं काय? पण कदाचित हाच प्रश्न आपली मुलं त्यावेळी आपल्याला विचारत असावी, पण भान कुठे होतं आपल्याला? आपली चुक कळायला इतकी वर्ष जावी लागली."

चहासोबत आलेलं कोणतंतरी बिस्कीट हातात खेळवत, सरिता आपल्याच विचारांच्या द्वंदात गढुन गेलेली होती. सकाळच्या चहाच्या ट्रे पासुन रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं आपल्याला खोलीतच मिळावं असा मानस तीने बोलुन दाखवला होता. तेवढचं जगाला आपलं तोंड दाखवायला नको. स्वताच्या मुलीने आपल्यावर जे काही आरोप केले होते ते वाचुन तीचं, खरचं आपलं काय चुकलं ह्यावर विचारमंथन सुरुच होतं दिवसरात्र, अहोरात्र! दिवसेंदिवस तीच एकलकोंडेपणा वाढतचं चालला होता. रोजचा मावळणारा दिवस तीच्याकडुन आयुष्याची आत्ताच्या घटकेपर्यंतच्या जगलेल्या क्षणांची गोळाबेरिज मागत असे आणि उजाडणारा दिवस तीच्या ह्या हिशेबात एक दिवस अधिक करत असे. आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी काय करु शकले असते आणि काय केले नाही याचं खापर कधी नशिबावर तर कधी दुर्दैवानी मिळालेल्या नवर्‍यावर फोडत असे. ऐन उमेदीची वर्ष नोकरी आणि ओव्हर टाईम करण्यात गेली आणि त्यामुळे मुलांना न देऊ शकलेल्या वेळाबद्दलची खंत करण्यात तीचं आयुष्य चाललं होतं. आयुष्याच्या केंद्रस्थानी फक्त "पैसा आणि कुटुंबाच्या गरजा यांची सांगड" ठेऊनच एका चाकोरीत आयुष्य गेल्याची, आणि त्याहीपेक्षा त्याची कोणालाही नसलेली जाणिव याची प्रचंड आलेली चीड हीच तीची सोबती होऊन गेलेली. दोन मुली एक मुलगा असुनही, वृध्दाश्रमाचे पैसे भरण्यापलीकडे त्यांचा आणि सरिताच काहीच संबध नाही. गेली अनेक वर्षे मुलं देत असलेली ही शिक्षा भोगण्यापलीकडे तीच्याकडे काहीच पर्याय नव्हता.

"या परिस्थितीत ज्याच्यासाठी मी स्वताला ढकललं तो षंढ नवरा मात्र या पश्चातापाच्या ससेमिर्‍यातुन सहीसलामत सुटला याची खंत मात्र मला अजुनही सलते आहे. सध्याचं माझं आयुष्य म्हणजे ही दहा बाय बाराची खोली आहे ज्यामध्ये मला एकच सुख आहे ते म्हणजे या अश्या जगलेल्या विचित्र आयुष्यापासुन आपण क्षणाक्षणाने का होईना आपण दुर चाललो आहोत, आत्तापर्यंत कधीच वाटलं नव्हतं की आयुष्यापासुन दुर जाण्यात पण असा एक आनंद असेल. बायकोचं कर्तव्य पार पाडता पाडता नकळत एका आईचं कर्तव्य कधी 'फक्त एक जबाबदारी' बनुन गेलं माझं मलाच कळलं नाही. दुसर्‍यांसाठी जगता जगता मी कोण आहे हे माझं मलाच न उलगडलेलं एक कोडं आहे. साध्या ऑफीसात राब राबणारी एक कारकुन पासुन एक कारकुन म्हणुनच रिटायर झालेली बाई? एका नोकरी गेलेल्या दारुड्याची बायको? मुलांच्या शिक्षणासाठी झटणारी बाई? की आपल्याच मुलांमध्ये आपल्यासाठी जिव्हाळा, आपुलकी निर्माण न करु शकलेली एक हारलेली आई?"

हे आता रोजचचं होत चाललं होतं, सरिता आलेला दिवस कसाबसा ढकलणे आणि रात्री झोपेची गोळी घेऊन झोप यायची वाट बघणे या पलीकडे काहीच करत नव्हती.गेल्या काही दिवसांपासुन तीनं आपली बाहेरच्या जगाशी असलेली नाळचं तोडुन टाकली होती. एका दुष्ट चक्रात अडकुन तीनं आपलं कलेंडर सोबतचं नातंचं तोडुन टाकलं होतं. किती आणि कसे दिवस सरले तीचं तीलाच सांगता आलं नसतं. वृंदावनात येऊनसुध्दा तीला आता बराच काळ लोटला होता. काही दिवसांपुर्वीच, आहे त्या परिस्थितीला तीनं आपलसं करुन इथे उत्तम रुटिन सुरु केलं होतं आणि तेही पुर्ण जोमानं. "तुझ्यासाठीचं एक कर्तव्य म्हणुन तुझ्या सगळ्या सोईंची व्यवस्था लावत आहोत" ही एक ओळीची चिठ्ठी त्या दिवशी वॄंदावनच्या ड्रायव्हरने सरिताच्या हातात दिली आणि सोबत चलण्याची विनंती केली. आपल्या मुलांनीही तेच केलं जे आपण त्यांच्यासोबत केलं. एखाद्याचं मत विचारात घेऊन एक 'हेल्दी डिसकशन' होणं हे किती महत्वाच असतं! विश्वासात घेऊन निर्णय घेणं, खासकरून तेव्हा, जेव्हा त्याचं व्यक्तीचं सारं आयुष्यच त्या गोष्टीशी निगडीत असतं. त्या क्षणाच्या अगदी आधीच्या क्षणापर्यंत तीला विश्वास होता की आपलं म्हातारपण एकटेपणाशी झुंजण्यात जाणार नाही, पण तसं झालं नाही. ती मनातुन कोसळली! तीनं आपलं सामान बांधलं आणि एक निरोप कळवला "तुमचा उत्कर्ष हीच माझ्या जीवनाची पुंजी आहे, त्यात मी आडवी येणार नाही. सुखी रहा!"

वृंदावनात गेल्यावर तीला स्वतःला सावरायला वेळ आणि सोबतही छान मिळाली. वृंदावन हे एक पंचतारांकीत हॉटेलप्रमाणे चालवलं जाणारं असं नीटनेटकं आणि सुंदर वॄध्दाश्रम होतं. तीथं राहणारे लोक हे एकतर स्वेच्छेने किंवा मुलांना आपल्या भव्य बंगल्यात होणारी अडगळ दूर करण्याच्या दृष्टीने तीथे सोडले गेले होते. सगळे 'बड्या' प्रस्थातुन आलेले लोक, त्यांच्या आवडी, निवडी, सवयी पाहुन सरिताचं मन पहिल्यांदा दडपायचं. आपलं कसं जमणार या लोकांसोबत असं तीला वाटायचं. पण अशा हाय प्रोफाइल लोकांच्या आयुष्यात इतकी वर्ष आलेल्या कडुगोड अनुभवानंतर हा शोभेचा पडदा बरोबर वृध्दाश्रमात येऊन गळुन पडतो. माणसाच्या राहणीमानाचा क्लास कोणताही असो, उतारवयात येणारे अनुभव थोडे बहुत प्रमाणात सारखेच असतात आणि म्हणुनच त्यांच्यात 'समदु:खी' हे एकच नातं उरलेलं असतं. माणसाच्या राहणीमानामध्ये सुखाचा, स्टँडर्ड ऑफ लिविंगचा असा वेगळा क्लास असतो पण दु:खाचा क्लास मात्र सगळ्यांसाठी एकचं!

हळुहळु सरिता तीथे रमु लागली. जसं जसं ती सुपरस्टार 'समिधा' ची आई आहे असं कळलं, तेव्हा ती चांगलीचं लोकप्रिय होऊ लागली. समिधाच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी सांगण्यात सरिताचा आणि ते एकण्यात इतर सगळ्यांचाच वेळ चांगला जात होता. वृध्दाश्रमाचा एकच नियम होता की 'एवढं सगळं चांगलं असताना तुम्ही इथे कसे?' हा प्रश्न कोणीही कोणालाही विचारायचा नाही. त्यामुळेच की काय कोण जाणे, सगळे वृध्द इथलं वातावरण उदसिन न करता आणि भुतकाळात न रमता, एक छान पॉझिटीव वातावरण तयार करणे आणि ते टिकवुन ठेवणे हे एक उद्धीष्ट म्हणुन पाळत होते. आयुष्यातल्या फक्त चांगल्या आठवणींच्या आधारे उर्वरीत आयुष्य व्यतीत करणे हे एकमेव ब्रीद सर्वांनी ठेवले होते. तसचं सरिताच्या वाचनाची आवड पण इथे आल्यापासुन पुर्ण होतं होती. दिवसदिवस ती वाचनालयात घालवतं असे. वृंदावनाचे वाचनालय हे अनेक भाषांच्या आणि अनेक विषयांच्या पुस्तकांचं एक मोठ्ठं भांडारच होतं. सरिताच्या जीवनाविषयीच्या विचारांची प्रगल्भता वाढत होती. तीच्या मुलांनी जरी तीला त्यांच्यापासुन दुर केलं असलं तरी त्यांनी तीला 'स्वतःच्या' खुप जवळ आणलं होतं आणि त्या एका गोष्टीसाठी ती त्यांची आभारीच होती. शिवाय सगळ्या वृद्धांच्या शारिरीक आरोग्याबरोबरचं त्यांच्या मानसिक आरोग्याकडेही उत्तम लक्ष दिलं जात होतं. अनेक थेरपिस्ट, डॉक्टर, सोशल वर्कर्स तीथे येऊन स्वेछेने आणि आपुलकीनी काम करत होते. रोजचा योगा क्लास, दर महिन्यात एक सहल, रोजचे संध्याकाळचे खेळ, कधी पत्ते, कधी अंताक्षरी असे अनेक उपक्रम तेथे होते, जेणेकरुन आपण निरुद्योगी असल्याची भावना कोणत्याही वृद्धाला शक्यतो येऊ नये. कोणालाही आपण निरुपयोगी आहोत असं वाटण्यापेक्षा, आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टी करण्यासाठी न देऊ शकलेला वेळ आत्ता आपल्याला मिळाला आहे ही भावना त्यांच्यात बिंबवणे हा वृद्धाश्रमा मागचा हेतुच वृंदावनला इतर आश्रमांपासुन वेगळा करत होता. थोडे दिवस सरिताला तीच्या घराची आणि मुलांची खुप आठवण येई. नुकतचं रिटायर झाल्यामुळे दिवसाचं रुटीन असं काहीच नव्हतं. त्यामुळे थोडसं मळभ आलं होतं. पण हे दिवसही सरतील असा तीचा ठाम विश्वास होता. आयुष्यात आलेली कोणतीही वेळ कायम राहत नसते हे तीला पक्क ठाऊक होतं.

"एकतर्फी प्रेमासारखा शत्रु नाही, असं प्रेम आपल्याला जीवही लावायला लावतं आणि आशा, अपेक्षांच्या ओझ्याखाली गुदमरायलाही लावतं. म्हणायला मन आपलं असतं पण ते आपल्यापेक्षा आपल्या प्रिय व्यक्तीचाच विचार जास्त करतो आणि आपल्याला खोट्या आशा दाखवुन झुरायला लावतं. त्याला हे कळत नाही की गेल्या अनेक वर्षात आपल्या आईचं तोंडही न पाहायला आलेली आपली मुलं, या वर्षीच्या दिवाळीलाही येणार नाहीत. पण तरीही आईची माया जगावेगळीच, त्यांनी संबंध तोडले म्हणुन काय आई आपल्या मुलांसोबत असलेली नाळ कधी तोडु शकेल काय?" सरिता आपल्याच विचारात गुरफटुन काय जणे कोठे रमली होती. गेली अनेक वर्षांपासुन,प्रत्येकाचा एक या प्रमाणे तीन मुलांचे तीन बॉक्स करुन ठेवलेले सरितानी! मुलं सोडुन गेल्यापासुन दर वर्षीच्या दिवाळीला तीनं प्रत्येकासाठी एक शुभेच्छापत्र आणि खाऊ घेण्यासाठी पैश्याचं एक पाकीट असे दोन लिफाफे, समिधा, सायली आणि दिवाकर अशा तीघांच्या बॉक्समध्ये टाकायची. यदाकदाचीत जर या वर्षीची दिवाळी पुर्वीसारखी साजरी करण्याचा योग आला तर आपल्या मुलांना भेटायला जाताना रिकाम्या हाताने जायला नको म्हणुन गेली कित्येक वर्षे ती हा स्वतः पाडलेला पायंडा पाळत होती. आपण ते जपलेले तीन बॉक्स त्या तीघांनी उघडल्यावर त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद आपल्याला या वर्षी नक्की पाहायला मिळेल या आशेनी ती दर वर्षी दिवळीची वाट आतुरतेने पाही. 'खाऊच्या पैश्या' पासुन सुरुवात झालेली ती पकिटे आता 'आहेर' झाली होती तरिही तीच्या कोणत्याही मुलीने अथवा तीच्या मुलाने तीला भेटण्याचा किंवा तीच्याशी बोलण्याचा एकही प्रयत्न केला नव्हता. किंवा तीच्या प्रयत्नाला प्रतिसाद दिला नव्हता.दर महीन्याला मात्र वृंदावनच्या अकाऊंटमध्ये तीच्या फी चे पैसे जमा व्हायचे. सरिताची नजर मात्र नोव्हेंबर महीना कधी येतो याच्याकडेच लागुन असायची. आपली आणि मुलांची भेट कदाचित या वर्षी, कदाचित या वर्षी होईल या एका आशेवर ती आपलं आयुष्य खर्‍या अर्थानं 'जगत' होती.

पेपर मध्ये येणार्‍या समिधाच्या चित्रपटाच्या बातम्या सरिता आवर्जुन पाही, त्यांची कात्रणं जमा करे. समिधा घरातुन बाहेर पडताना जरी कडुपणा घेऊन बाहेर पडली असली तरी तीचा सरिताला सार्थ अभिमान होता. काही वर्षापुर्वीची समिधा आठवुन तीला नेहमी वाटायचं, तीचा तडफदारपणा , कर्तुत्व आणि स्पष्ट बोलण्याची सवय आपल्यात का नाही? अवघं वीस बावीस वर्षाचं वय आणि केवढा आत्मविश्वास? सायली आणि दिवाकर सोळा आणि तेरा वर्षाचे! तेव्हाच मिलमधली नोकरी सुटल्यानं, व्यसनी झालेला बाप आणि संसाराचं रहाट गाडगं एकटीनं ओढुन आणि मुलांची शिक्षणं नीट करण्यासाठी छोट्याश्या नोकरीत राब राब राबणारी मी.. त्यांची आई! ओव्हरटाईम करून दिवाळीसाठी पैसे जमवण्यासाठी झालेली ओढाताण! कष्टानं जमवलेले पैसे, सरिता आणि मुलांना अनेकदा बेदम मारून ते पैसे पळवुन नेणारा रमाकांत आठवला तसा तीच्या अंगावर शहारा आला. आणि अश्या, पैश्यानं दरिद्री आई आणि कर्मानं दरिद्री बापाच्या पोटी जन्म घेतलेली समिधा! त्यावर्षीच्या दिवाळीला बाहेर पडलेली समिधा, तेव्हापासुन दिसली ती फक्त फोटोंमधुन! अपवाद एकच, काही काळ गेल्यावर अचानक एकेदिवशी समिधा दारात उभी ठाकली ते मला आणि दोन भावंडाना नेण्यासाठीच! बाप नावाच्या एका नराधमाच्या हातुन सोडवण्यासाठी. ती आली आणि म्हणाली,

"आई, तु, साया आणि दिवाकर, आत्ताच्या आत्ता सामान बांधा. मला फिल्म स्टुडिओत काम मिळालं आहे, आणि आपल्या चौघांचं भागेल एवढं कमावते आहे.तुला आता ओव्हरटईम करायचीपण गरज नाही. शिवाय एक खोलीपण आहे रहायला, आपलं नीट भागेल. आज या नरकातुन सुटका व्हायलाच हवी आपली."

दिवाकर आणि सायली दोघेही किती विश्वासानं बिलगले तीला. आणि मी? मी एक सधवा, नवरा जिवंत असलेली आणि एकमेकांना मरेपर्यंत साथ देऊ अशी शपथ घेतलेली मी, रमाकांत भोसले याची पत्नी. घरच्यांच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न केलेला रमा! आणि आज त्याच्या वाईट वेळेत मी त्याला न समजुन घेता, शेवटची एक संधी म्हणुन एक सुसंवाद सुध्दा न करता अशीच निघुन जाऊ? मला हे जमेल... पण ते नैतिकदृष्ट्या योग्य होणार नाही. मुलांनी नेहमीच एक विमनस्क दारुड्या बाप पाहीला आहे, पण मी? मी त्याच्यातला एक माणुस, एक जीव लावणारा आणि आपल्यासाठी जीव देणारा रमाकांत पाहिला आहे. आजच खरी कसोटी आहे, मी आज जाणार नाही. रमाला एक शेवटची संधी न देताच मी जाणार नाही. दिवाकर आणि सायाच्या भविष्याचा विचार करता, त्यानी इथे न राहणेच इष्ट असा विचार करुन दिवाकर आणि सायाला मी समुसोबत जायला सांगितले आणि मीही एक दोन दिवसातच येईन असा विश्वास दिला. ते दोघंही आनंदानं तयार झाले. मात्र समिधानी माझ्या डोळ्यातला भाव अचुक टिपला, पोटतिडकीने म्हणाली,

"आई मी तुला या सगळ्यातुन सोडवायला आले आहे, मी स्वतः पाहिलं आहे बाबांनी अनेकदा तुला मारलं आहे, घरची आर्थिक आणि मानसिक ओढाताण मी स्वतः अनुभवली आहे. आतापर्यंत मी प्रत्येक गोष्टीला तुझ्या तोंडुन 'नाही' एवढा एकच शब्द उत्तर म्हणुन ऐकला आहे. प्रत्येक वेळेस सगळे निर्णय एकटीने घेतलेस. हे घेऊया का? - 'नाही', ते करुया का? - 'नाही', मी पुढे शिकु का? - 'नाही', मी घरकाम करुन पैसे कमवु का? - 'नाही'. मी पुढे केलेला मदतीचा हात तु आत्तापर्यंत झुगारत आली आहेस. प्लीज आई आज 'नाही' म्हणु नकोस. आज तरी किमान आपल्या सर्वांच्या चांगल्या भविष्याचा निर्णय मला विश्वासात घेऊन घे."

त्या दिवशी मला उमजलं कि 'कर्तव्य' आणि 'जबाबदारी' याची खुप मोठी गल्लत करत राहीले मी आजपर्यंत आणि सगळा गुंता एका क्षणात सुटला. मी बोलले,

"आपल्या भावंडाची तु घेतलेली जबाबदारी यातचं माझ्या सगळ्या कष्टाचं चीज आणि आत्तापर्यंतच्या सगळ्या अनुत्तरीत प्रश्नांनची उत्तरं आहेत. आजपासुन माझ्या मुलांचं कसं होईल या प्रश्नातुन तु मला मुक्त केलं आहेस, माझ्या जबाबदारीतुन मुक्त केलं आहेस. पण जशी माझी तुमच्याप्रती जबाबदार्‍या आहेत तश्याचं माझ्या, माझ्या नवर्‍याप्रती पण काही कर्तव्यं आहेत आणि मला ती आत्ता "या क्षणा"ला झुगारुन तुमच्या सोबत येता येणार नाही. पण मी आश्वासन देते की ज्या दिवशी तुमचे बाबा मला या कर्तव्यातुन मुक्त करतील मी सर्वस्वी तुमची असेन. या घटकेला माझी वाटणी करू नका. उद्या कदाचित आपण पाच जणं परत एकत्र आनंदानं जगु शकु, कुटुंबातला एखादा चुकत असेल तर त्याच्यापासुन आपण पळुन न जाता त्याला त्याच्या चुकांमधुन बाहेर पडण्याचं बळ दिलं पाहिजे. त्याला एक शेवटची संधी दिली पाहिजे. मला आज कमजोर करू नका, तुमच्या बाबांना वेळ आणि संधी देऊ द्या."

माझं बोलणं ऐकुन समिधाच्या डोळ्यात अंगार उतरला ती कडाडली,

" आज मीच तुला शेवटची संधी दिली होती आणि आजही तु ती धुडकावलीस. आज, आत्ता तु आमच्यासोबत आलीस तर आम्ही तुझे! नाहीतर तु आमची कोणी नाही आणि आम्ही तुझे कोणी नाही. त्या दारुड्यासोबत तुझ्या संसाराची हौस भागली नसेल तर तुम्ही हौसेनं संसार करा आणि तुमच्या हौसेची निशाणी आम्ही तीघं. आम्हाला पोरकं करा." या संभाषणात माझा हात कधी उठला माझं मलाच कळलं नाही. आज कदाचित माझ्यातला रमाकांत जागा झाला होता. सत्य पचवण्याची माझ्यात ताकद उरली नव्हती आणि सत्य मोठ्या मनानं ऐकण्याचं ही धाडस उरलं नव्हतं. समिधा, दिवाकर, सायली माझ्या जगण्यामागची सगळ्यात मोठ्या प्रेरणा माझ्याकडे पाठ फिरवुन निघाले, समिधा वळली आणि बोलली,

"इतके दिवस बाबांमध्ये आम्ही तुझं प्रेम, तुला शोधत होतो, पण त्याऐवजी आज तुझ्यातचं बाबा दिसले. बाबाना 'बाबा' पेक्षा मी 'तो माणुस आणि तुला 'ती बाई' म्हणणं मी पसंद करेन. आजपासुन आपले संबध संपले."

त्यानंतरची समिधा दिसली ती फक्त पेपरातल्या फोटोमधुन! त्या दिवसापासुन तीच्या तीन्ही मुलांचा तीच्या विषयीचा तीरस्कार कधीच कमी झाला नाही. त्या दिवसापासुन ते वृंदावनात येईपर्यंत सरिता फक्त होरपळत राहीली. कधी रमाकांतच्या ओढीनी तर कधी मुलांच्या ओढीनी. त्या दिवशी रमाकांत घरी आल्यावर त्याला मी परिस्थीतीची जाणिव करुन देण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न केले. पण आपल्या मुलीच्या अशा वागण्याने त्याचा पुरुषी अहंकाराला ठेच पोहोचली होती. त्यानं सगळ्या गोष्टीचं खापर माझ्या डोक्यावर फोडलं. मुलांना संस्कार आणि वेळ न देऊ शकल्याने आज हा दिवस पाहावा लागला असं म्हणाला. सगळ्या गोष्टीची घुसमट आज त्याने माझ्यावर काढली. आयुष्यात एका कुटुंबाचा क्षमताशील म्होरक्या न होऊ शकल्याचं, एक चांगला कर्मचारी न होता संघटनेच्या प्रलोभनांना बळी पडुन मील बंद पाडल्याचं, एक बाप म्हणुन आपल्या मुलांच्या गरजा न भागवु शकल्याचं, बायकोच्या पैश्यावर जगतो म्हणुन हिणवलं गेल्याचं फ्रस्ट्रेशन त्यांन त्या रात्री माझ्यावर काढलं. माझी लायकी दाखवण्यासाठी त्याच्याकडे असलेल्या हुकुमी एक्क्याचा वापर त्यानं मुलं घरात नसल्यान चांगलाच केला. पण त्या शारिरीक बलात्कारापेक्षा सगळ्यानी झिडकारून केलेला मानसिक बलात्कार माझ्यावर भारी पडला. तशाच फाटक्या कपड्यानीशी रमाकांतने मला बाहेर काढले. तशा अवतारातच चालत चालत मी माझी मैत्रिण सुलभाकडे पोहोचले. परत झिडकारलं जाण्याची पर्वा न करता मी बेल वाजवली. माझ्या अंगावरच्या जखमा आणि फाटलेले कपडे पाहुन ती काय ते समजली, त्या दुर्दैवी क्षणी मला आसरा मिळाला. त्या रात्री तीचा नवरा घरी नव्हता पण तो या सर्व गोष्टींचा कसा विचार करेल याची तीलाही शाश्वती नव्हती. पण एक मैत्रीण करेल एवढी मदत तीनं नक्की केली. माझ्यासाठी नवर्‍याशी खोटं बोलुन मला आठ दिवस ठेऊन घेतलं, मला चार समजुतीच्या गोष्टी सांगुन दिलासा दिला आणि माझ्या एकटीचं बिर्‍हाड सुरक्षित ठिकाणी जमवुन दिलं. नोकरी असल्याने व्यावहारीक दॄष्ट्या काही प्रश्न नव्हता. पण विस्कटलेलं शारिरीक आणि भावनिक आयुष्य सावरायला खुप अवसर लागणार होता. कोणत्या तोंडानं मुलांना सांगायचं काय झालं ते हा सर्वात मोठा प्रश्न होता. या सर्व गोष्टीतुन मला मिळालेला धडा म्हणजे जसं शेवटची संधी जस देणार्‍याचं सोनं करु शकते तसचं ती राखरांगोळीही करू शकते. एकच समाधान होतं की जे झालं ते मुलांसमोर नाही झालं. मुलं म्हंटल्यावर मी भानावर आले. मला माहीतच नव्हतं की समु या दोघाना घेऊन कुठे राहात असेल? फक्त एवढ्च आठवलं कि ती फिल्मीस्तान मध्ये काम करते. चेहेर्‍यावरच्या जखमा घेऊन तिकडे जाणं योग्य न वाटल्यानं सुलभाला समुचा पत्ता काढायला पाठवलं. म्हणजे पत्र लिहुन तीची माफी मागता येईल आणि कदाचित आम्ही सगळे पुन्हा पहिल्या पासुन नव्या आयुष्याला सुरुवात करु शकु. कदाचित, कदाचित उरलेलं आयुष्य कुटुंबातले चार कोन एकत्र राहतील आणि एक चौकोन म्हणुन आपलं कुटुंब आपण परत सांधु शकु.

सुलभा फिल्मीस्तानला जाऊन आली पण समुची चौकशी केल्यावर एवढच कळु शकलं की ती साईड अ‍ॅक्ट्रेस म्हणुन काम करते आहे आणि शिवाय सेटवरची थोडीफार इतर कामे! सुलभानं जेव्हा वॉचमऩकडुन समुला निरोप पाठवला तेव्हा वॉचमऩने निरोप आणला.

"समीधा मैडम किसीसे नही मिलती और उनका यहा पेहेचानवाला कोई नही है| तो आप अपना और उनका टाईम बर्बाद न करें और उनका पता लगाने की कोशिश न करें|"

तेव्हापासुन मी परोपरीनं समीधाला भेटण्याचा प्रयत्न करते आहे, पण ज्या मोठेपणानी मी आपल्या मुलांच्या चुका पोटात घालत आले, तो मोठेपणा मी आपल्याच मुलांमध्ये मी निर्माण करु शकले नाही. समु मला माफ करु शकली नाही, अश्या चुकीसाठी कि जी तीच्या दॄष्टीनी 'चुक' होती पण माझ्या दॄष्टीनी ते माझं 'कर्तव्य' होतं. रमाकांत बरोबरच होता कदाचित, एक आई म्हणुन सगळ्याच आघाड्यांवर मी हरले होते.आणि ही गोष्ट वेळ निघुन गेल्यावर मला उमगली होती. मला एक शेवटची संधी देण्याचं औदार्य माझ्या मुलांमध्ये नव्हतं.

सेकंदाची मिनिटं, मिनिटांचे तास, तासांचे दिवस आणि दिवसांची वर्ष होतात. भळभळणार्‍या जखमा खपली धरतात. जखम बरी होते पण वेदना शमल्या असल्यातरी जखमेचा व्रण तुम्हाला आठवण करून देतच असते, तुम्ही सोसलेल्या त्रासाची, वेदनेची!! ह्या सगळ्या वादळानंतर सरीताचीही तीच अवस्था तशीच होती. वर्षामागुन वर्षे गेली, समीधाचा प्रवास साईड अ‍ॅक्ट्रेस पासुन ते सुपर स्टारपर्यंतचा झाला! पण सरीता एक प्रेक्षक यापलीकडे कधीच तिच्या कामाला दाद देऊ शकली नाही. दरम्यानच्या काळात नोकरी एके नोकरी आणि वेळ घालवण्यासाठीचा केलेला ओव्हरटाईम याच्या चाकोरीबद्ध तीनं आयुष्यात स्वःतला बांधुन टाकलं होतं. दर वर्षी दिवाळी हेच टारगेट ठेवलं, दर दिवाळीला समीधा, सायली आणि दिवाकर साठी, त्यांच ते वर्ष कसं गेलं असेल हे ठरवुन एक छानसं शुभेच्छापत्र लिहिणं आणि खाऊसाठीच्या पैशाचं पाकिट तयार करणं यातचं तीनं समाधान मानलं. कदाचित एखाद्या दिवाळीला मुलं परत येतील ह्या आशेवर हा सगळा खटाटोप चालायचा.ऐनवेळेस आपली गडबड नको व्हायला म्हणुन सरिताची तयारी आधीपासुन चालायची. रमाकांत जेव्हा काम करत होता तेव्हा मुलांना फक्त दिवाळीचं लालुच असायचं... काही हव असेल तर दिवाळीला घेऊ म्हणुन सरिता ती वेळ मारून न्यायची आणि खरोखरच दिवाळीत मुलांना खुश करुन टाकायची रमाकांत आणि सरिता! दर वर्षीचं तीचं वाट बघणं पण तीच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनुन गेला होता..तरी तीनं आशा सोडली नव्हती!

अचानक एके दिवशी पेपरात बातमी आली होती, 'शास्त्री रस्त्यावर एका बेवारस इसमाचा मृतदेह सापडला आहे. कृपया त्यांच्या नातेवाईकांनी येऊन तो ताब्यात घ्यावा.' खाली रमाकांतचा अत्यंत भणंग अवस्थेतील फोटो होता. सरिता ठामपणे उठली, तीने पेपर हातात घेतला आणि त्याची कस्पट होई पर्यंत फाडुन टाकला, धुसफुसत राहीली. पण तीची मुळ प्रवृती तीला स्वस्थ बसू देइना. ती बाहेर पडली, नविन पेपर विकत घेतला, रिक्षा थांबवली आणि ससुन ला न्यायला सांगितली. सगळ्या औपचारिकता पुर्ण करुन रमाकांतला ताब्यात घेतलं. गैरसमजातुन जर मुलांना वाटत असेल की मी आणि रमाकांत एकत्र राहत आहोत तर एक आशा मनात होतीच की आपला बाप गेला हे कळल्यावर तरी मुलं आपल्याकडं येतील, आणि सत्य परिस्थीती कळल्यावर ती परत आपली होतील. यासाठी तीनं तार केली समीधाच्या पत्त्यावर! क्रियाकर्म करायला दिवाकरने येणं आवश्यक होतं. पण दिवाकर खरचं येईल? भडाग्नी द्यायला मुलगा नसेल तर काय या प्रश्नानी तीला भंडावुन सोडलं होतं. जिवंतपणी ज्याचा इतका तिरस्कार केला, त्याला मेल्यावर भेटावं असं मुलाना का वाटेल्?आणि त्या हिशेबाला तरी काय अर्थ होता खरचं? आपण तरी कुठे फार दु:खानी रमाकांतचं अंतिम कार्य करत आहोत... हे तर फक्त एक कर्तव्य! आपण तेवढचं तर करत आलो आहोत. आता फार विचार करुन उपयोग नाही. शेवटी स्वयंसेवी संस्थेत विनंती करुन चार लोकं जमवली आणि रमाकांतच्या शरीराला या लोकातुन मुक्ती मिळाली. रमाकांतचे अंतीम संस्कार करणं दिवाकरचं कर्तव्य होतं पण जीथे बापानंच आपली कर्तव्यं पार नाही पाडली तीथे मुलांचा काय दोष? या सगळ्या हिशेबात नेहमीच सरिता कडे बाकी शुन्यच उरे. उद्या आपली पण अशी अवस्था झाली तर नवल नाही! सरिता शहारली!! ती घरी आली ते रमाकांतचे दिवस न करण्याचं ठरवुनच. आता कर्तव्य आणि जबाबदार्‍या याच्या बंधनात न अडकायचं ठरूनच!

दरम्यानच्या वर्षांमध्ये समीधा, सायली आणि दिवाकर यानी आपापल्या आयुष्यात खुप छान प्रगती केली होती. समीधानं आपल्या भावंडांच्या जबाबदारीचं शिवधनुष्य उत्तमरित्या पेललं होतं.समीधानी लग्न नाही केलं. ग्लॅमर, फॅशन आणि पेश्याच्या झगमगाटात तीनं स्वतःचं स्वत्वही जपलं आणि समाजात राहिल्यावर आपण समाजाचे देणे लागतो याचं भानही तीनं ठेवलं. सायलीनं एक लेखिका म्हणुन नाव कमावलं होतं. दिवाकर बहुदा कायद्याचं शिक्षण घेत होता. त्याचं नाव फारसं पेपरमधे येत नसे त्यामुळे त्यच्या विषयी फारशी माहिती सरिताकडे नव्हती. आपल्या मुलांची प्रगती बघुन सरिता तृप्त मनानी आयुष्य जगत होती. तीच्या सगळ्या जखमा आता भरुन आलेल्या होत्या, पण त्यांची खुण कधीच जाणारी नव्हती. क्षमाशील वृत्तीमुळेच सरिता आयुष्यात पुन्हा नव्याने उभी राहीली होती. सरिताची रिटायरमेंट अवघ्या दोन महिन्यांवर आली होती, त्याचं तीला आता दडपण यायला लागलं होतं. एक सामान्य कारकुन म्हणुन नोकरी सुरु करुन, एक सामान्य कारकुन म्हणुनच रिटायर होताना तीनं आयुष्यात अनेक उतार चढाव पाहिले होते आणि जाणुन बुजुन नोकरी, त्या मधील बढत्या आणि त्या सोबत वाढत्या जबाबदार्‍या आणि इतर प्रलोभनं यापसुन स्वःतला जाणिवपुर्वक दुर ठेवलं. पण आता रिटायरमेंटनंतर काय हा प्रश्न तीला भेडसावत होता. समाजसेवेत स्वतःला वाहुन घ्यायचं असा तीचा विचार होता पण त्या आधी आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी करायच्या राहुन गेल्यात त्या केल्यानंतर मगच नीट विचार करुन, कोणत्याप्रकारे आपली समाजाला मदत होऊ शकते हे ठरवुन मगच त्या दिशेने पावलं उचलावीत असं सरितानं ठरवलं.

आयुष्यात एकदा सिमल्यातला बर्फ अनुभवायचा राहुन गेलेला, उन्हाळ्यात कोकणात जाऊन आंबे खायचे राहुन गेलेले, शांत समुद्रात डुबकी मारायची राहुन गेलेली, खुप खुप पुस्तकं वाचायची राहुन गेलेली, आणि एक मनस्वी आयुष्य स्वतःसाठी जगायचं राहुन गेलं होतं. अशा आणि अजुन कितीतरी गोष्टी आयुष्यात करायच्या राहुन गेल्या होत्या, त्या पुर्ण करायचं उद्दीष्ट घेऊन सरितानं रिटायर लाईफ एंजॉय करायचं ठरवल. अशाच काही काही धमाल गोष्टी करून एके दिवशी सरिता जेव्हा घरी परतली तेव्हा दारातचं दोन लोक येऊन थांबलेले होते. विचारपुस करता कळालं की ती वृंदावन मधुन आलेली होती, सोबत एक चिठ्ठी होती 'समीधा' ची एका ओळीची चिठ्ठी होती, 'तुझ्या वृद्धापकाळातलं आमचं कर्तव्य म्हणुन, वृंदावनमध्ये तुझी सोय लावत आहोत.' जड पावलानं तीनं ते भाड्याचं घर सोडलं, मनोमन आपल्या मुलांचे आभार मानले. तीच्या 'पुढे काय?' या प्रश्नाचं सरळ सोप्प उत्तर समीधानं दिलं होतं. मनालीला न्यायची बॅग आणि ते तीन बॉक्स, एवढं सामान घेऊन दोनच दिवसात सरिता वृंदावनमध्ये दाखल झाली. तीथे गेल्यावर तीचा वेळ खुपच छान जाऊ लागला. अत्यंत समाधानाने सरिता तिथे राहत होती आणि आपल्या समाजसेवेचा हातभार ती वृंदावनमार्फतच जोडलेल्या अनेक समाजसेवी संस्थाना भेट देऊन आणि त्यांच्या शिबिरांमध्ये वगैरे भाग घेऊन करत होती. आदिवासी भागात मेडीकल कँपमधील मदत असो किंवा अनाथाश्रमात मुलांसाठी घ्यायची शिबीरं असोत किंवा वृध्द्दाश्रमात नविन दाखल झालेल्या वृध्द्धांचे समुपदेशन असो, सरिता सगळीकडेच हिरिरीने भाग घेत होती. वृंदावनची तर ती जान होती, नेहमीच उत्साहानी खुललेली असे, वय विसरुन काम करण्याकडे तीचा जास्त ओढा होता. त्यामुळे ती इतरांनाही वय विसरायला लावायची. जीवन आनंदानी जगायला ज्या ज्या गोष्टी आणि जे जे क्षण तीला मिळत ती त्याचं सोनं करत होती. कोणीही तीचा भुतकाळ असा गेला असेल असं सांगु शकलं नसतं.

एके दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सरिता पेपर वाचत बसली होती सोबत चहाचा कप होताच, वाचत कसली पेपर चाळत बसली होती. जर एखादा समीधाचा फोटो दिसला तरच चष्मा लावुन बातमी वाचायचे कष्ट ती घेत असे, नाहीतर पेपर नुसताच चाळत असे. नेहमीप्रमाणे आजही ती पण समीधाचा फोटो शोधत होती. आणि काय? आज तीचा फोटो चक्क पहील्या पानावर आणि मुख्य बातमी! ठळक अक्षर वाचण्यात वेळ न दवडता तीनं चष्मा उचलला आणि ती वाचु लागली. हेडलाईन होती, ' सुपरस्टार समीधा यांचा अकस्मात मृत्यु: चाहते शोकाकुल, अंत्यसंस्कार आज.' सरिताच्या हातापायातले त्राणच गेले. डोकं फुटुन मेंदु बाहेर येइल की काय असं झालं. डोळ्यातल्या पाण्यामुळे पुढचं काही दिसेचना. बातमीत लिहिलं होतं की दिर्घकाळापासुन समीधा कोणत्यातरी दुर्धर रोगाशी झुंज देत होती, आणि आज अचानक तीचा मृत्यु झाला होता. तीच्यामागे एक बहीण आणि एक भाऊ एवढा परिवार असल्याचंही लिहिलं होतं. आणि मी? मी तीच्या परिवाराचा हिस्सा नाहीच?

संपुर्ण पेपरमध्ये, तीच्या सुरवातीच्या काळापासुन ते आत्तापर्यंतच्या तीच्या कारकिर्दीमधे तीला मिळालेले अ‍ॅवॉर्डस, तीचं कौतुक, तीचे गाजलेले सिनेमे वगैरे, तीच्या निधनाने लोकांनी दिलेल्या भावपुर्ण प्रतिक्रिया असं बरच काही छापुन आलेलं. सरितानं लगेच टि.व्ही. सुरु केला, सारे न्युज चॅनल्स समीधामय झालेले. सरिता एक चॅनलवर थांबली, "समीधाच्या निधनानंतर त्यांच्या जीवनावर आधारीत असं एक जीवनचरीत्र लिहिण्याचा मानस समीधा यांच्या धाकट्या भगिनी सायली यांनी बोलुन दाखवला आहे. याविषयी बोलताना सायली यांनी समीधा यांच्या आयुष्याचे अनेक पैलु उलगडण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे आणि आमच्या सुत्रांशी बोलताना अत्यंत शोकाकुल होत त्या म्हणाला, ' समीधा ही फक्त माझी मोठी बहीण नसुन ती माझी आई, वडील, मैत्रीण, सखी आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा मार्गदर्शक होती. जगानी पाठ फिरवल्यावर अत्यंत प्रतीकुल परीस्थीतीत तीनं स्वतःला आणि आम्हा भावंडाना वाढवले आणि खर्‍या अर्थाने मोठे केले. ती आज आमच्यासोबत नसली तरी तीनं दाखवलेली वाट आणि तीची नीतीमुल्य तीच्या स्मृतीरुपानी आमच्यासोबत नेहमीच राहतील. देव तीच्या आत्म्यास मुक्ते देवो.' आणि त्याना अश्रु अनावर झाले". पेपरमध्ये तर फोटोसहीत वर्णन दिले होते. आज अनेक दिवसांनी सरिता आपल्या मुलांचे फोटो पाहत होती, जणुकाही ती त्यांना समोरच पाहत होती. शोकाकुल होत सरिता हुंदके देऊन रडु लागली. काही वेळानी आवेग ओसरल्यावर, सरितानं आवंढा गिळला आणि ती निर्धारानी उठली. तोपर्यंत वृंदावनात सगळ्यांना बातमी कळली होती, सर्वजण तीच सांत्वन करु लागले. तीन स्वतःला सावरलं आणि ती निघाली अंत्यदर्शनाला! मुंबईला!

मुंबईत स्मशानभुमीबाहेर प्रचंड जनसमुदाय जमला होता, जमावा जमावात चर्चा चालु होती अजुन दहन व्हायचे आहे. गेटवर समीधाचा मोठा फोटो ठेवला होता, लोक त्याला फुले वाहत होती, काही जण मेणबत्या घेऊन आले होते. आपल्या मुलीसाठी जमलेला हा समुदाय बघुन सरिताला आनंद होत होता की समीधा गेल्याचं दुखः हे तीच तीलाच कळत नव्हतं. मेंदु बधीर झाला होता, भावनांचा कल्लोळ झाला होता नुसता. रस्ते खचाखच भरले होते. कडक पोलीस बंदोबस्तामुळे धक्काबुक्की होत होती. बडे बडे दिग्गज कलाकार आले होते. तुडुंब गर्दीत वाट काढणं निव्वळ अशक्य होतं, पण ती शेवटी एक आई होती, आज दुर्दैवानी कहर केला होता, पण सुदैव एकच होते की अजुन अंतीमसंस्कार झाले नव्हते. अजुनही वेळ गेली नव्हती. चेंगराचेंगरीतुन वाट काढत ती गेटजवळ पोहोचली आणि वॉचमनला आत सोडण्यासाठी विनवण्या करू लागली. वॉचमनला ऐकु जात नव्हते, कसरत करत करत तीनं ओरडुन सांगितलं की ती समीधाची आई आहे आणि तीचं संस्कार व्हायच्या आधी आत जाणं खुप जरूरीचं आहे. हे ऐकुन वॉचमन चमकला, तो गेटजवळ आला आणि त्यानं विचारलं, 'आपका नाम सरिता भोसले है क्या?', त्या घडीला तीला हायसं वाटलं, परत एक आशेचा किरण दिसला. मुलीच्या अंतीम दर्शनासाठी आसुसलेल्या सरितानं फक्त 'हो' म्हंटलं आणि तीचा तीच्या कानांवर विश्वासच बसेना. वॉचमन म्हणाला,'सायली मॅडमने आपको अंदर न आने देने का ऑर्डर दिया है| हमे माफ कर दिजीएगा|' वॉचमनच्या डोळ्यात पाणी चमकलं आणि सरिताचे डोळे कोरडे झाले. आजही ती हरली होती! समीधाप्रमाणेच सायलीनीही आज एक शेवटची संधी तीला दिली नव्हती. तशाच बधीर अवस्थेत ती लोकांचे धक्के खात, एक एक जड पाऊल उचलत त्या माणसांच्या महापुरातुन बाहेर आली. या क्षणी तीला आपल्या जीवनाचं ध्येय संपल्यासारखं वाटु लागलं, आजपर्यंत ज्या आशेवर आयुष्य जगत आली होती अचानक त्याचं उद्दीष्ट्च संपलं होतं. आता यापुढे आपली आणि आपल्या मुलांची भेट शक्य नाही हे तीनं त्या क्षणी ओळखलं होतं. ज्या एकमेव आशेवर ती आयुष्यातले सगळे चांगले वाईट अनुभव पोटात घालतं आली होती ती आशाच आता मावळली होती. सगळं संपलं होतं. आपली मुलं आपला एवढा द्वेश करत असतानाही तीला कुठेतरी वाटत होतं की हा दुरावा कधी न कधी तरी संपणारा आहे. समीधा नावाचा पुलच हा दुरावा नष्ट करेल. पण आज तो पुलच कोलमडला होता. सायली, दिवाकर आणि सरिता यांच्यातला ही दरी आता कधीच जोडली जाणार नव्हती. आपल्या मुलीचं अखेरचं दर्शनही न मिळता सरिता तशीच परत निघाली. तेही तीच्या नशीबात नव्हतं, आणि दुसरे दिवशी सरितानं समीधाच अखेरचं दर्शनही नेहमीसारखच घेतलं, पेपरमधील फोटोतुन! त्यादिवशी तीनं दोन अश्रु ढाळले आणि त्या दिवसानंतर तीनं स्वतःला जगापासुन अलिप्त करायला सुरु केलं.

तीनं तीच आयुष्य फक्त तीची दहा बाय बाराची खोली एवढच मर्यादीत केलं. चहा, नाश्ता, जेवण, वाचन सगळं खोलीतच चालु केलं. सगळ्या गोष्टींपेक्षा ती आत्मपरिक्षणावर भर देत होती. खरच काय चुकलं माझं? की माझी मुलं माझा एवढा तिरस्कार करताहेत. आत्तापर्यंतच्या गोष्टी ती फक्त त्यांचा तीच्यावरचा राग म्हणुन समजत होती, पण राग घालवु शकतो पण तिरस्कार? त्यावर काय उपाय? तीचं असं स्वतःचं स्वतःशीच द्वंद्व सुरु असायचं. दिवस दिवस ती हेच विचार करत राहायची. सुरवातीला तीच्या आजुबाजुच्या वृद्धांना वाटायचं की समीधाच्या अकाली जाण्यानीच सरिताचं वागणं बदललं आहे. त्यानी सगळं काळावर सोडुन दिलं, कालांतराने सरिता पुर्ववत होईल असं वाटलं त्याना. पण वेळ हे नेहमीच औषध असु शकत नाही, वेळ जशी जखमा बर्‍या करु शकते तशी वेळेवर उपचार न केलेली जखमा ती चिघळवु शकते हे त्याना कळले नव्हते. काही दिवसानी सरिताचं असा एकलकोंडेपणा सगळ्यांच्याच अंगवळणी पडला. सगळे तीच्या अवस्थेची कीव करायला लागले, तीच्याकडे बघुन चुकचुकायला लागले. जी पुर्वी इतरांना समुपदेशन करायची तीला आता स्वतःला समुपदेशनाची गरज आहे असं लोक बोलु लागले. एरवी तीला हे सगळं कळलं असतं तर तीची तळपायाची आग मस्तकात गेली असती, लोकांनी तीच्या अवस्थेची कीव करावी हा तीच्या स्वभिमानाला हा फार मोठा धक्का होता पण आताची परिस्थीती फार निराळी होती आणि तीनं ती जाणिवपुर्वक स्वीकारली होती. विषण्ण असेल तरी चिडचिडीचा लवलेशही नव्हता, मनात आणि चेहेर्‍यावर एक प्रकारचा शांतपणा होता. सध्या पेपरमधील बातम्यांवरून सायली , 'समीधा आणि तीच्या आठवणीं' यावर पुस्तक लिहित असल्याच्या बातम्या होत्या. पुस्तकरुपात समीधानी खाल्लेल्या खस्ता, तीच्या सुरवातीच्या दिवसांच्या आठवणी, भावंडांची जबाबदारी, अमाप पैसा आणि लोकप्रियता मिळवल्यानंतरही पाय नेहमीच जमिनीवर घट्ट रोवुन उभी राहणारी खरी समीधा कशी होती हे सगळं उलगडवुन दाखवण्याची तयारी सायलीनी दाखवली होती. या सगळ्या गोष्टींमुळे सध्या सरिताची घालमेल होत होती. आयुष्यात पुन्हा काहितरी नवीन खळबळजनक घडणार असल्याची ती जणुकाही धोक्याची घंटा होती. या सगळ्या विचारांनी तीला जंग जंग पछाडलं होतं. पण, आयुष्यातले उरलेले क्षण हे फक्त आपल्यातलं आणि मृत्युमधलं अंतर कमी करणारं माध्यम आहे असं स्वतःला बजावत ती जगत होती. आयुष्यात कधीही हार न खाल्लेल्या आशावादी सरितानं आता मात्र हाय खाल्ली होती.

"प्रसिद्ध सिने अभिनेत्री समीधा यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्य आज त्यांच्या कनिष्ठ भगिनी सायली यानी लिहिलेल्या 'खर्‍या अर्थानी 'समीधा'' या पुस्तकाचं प्रकाशन आज गीतांजली सभागृहात होणार. या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यातच व्हावं अशी इच्छा सायली यांनी बोलुन दाखवली कारण समीधाचं जीवनचरित्र हे समीधाच्या जन्मगावातच प्रकाशित व्हावं असं मला वाटतं असं त्या म्हणाल्या. उद्या सायंकाळी सात वाजता हा समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. प्रकाशनानंतर हे पुस्तक लगेचच विक्रीस उपलब्ध करण्यात येईल आणि उद्या पुस्तक घेणार्‍या ग्राहकांस सायली यांच्या स्वाक्षरीचा सुद्धा लाभ मिळणार आहे. तरी सर्व इच्छुकांना उद्या गीतांजली सभागृहात उपस्थित राहण्याचे खुले आमंत्रण देण्यात आले आहे..." टि. व्ही वरिल सातच्या बातम्यांमध्ये दाखवलेली ही बातमी घेऊन साठे काकु लगबगीनी सरिताच्या खोलीत गेली. आणि ती बातमी देऊन त्या काय सुचवत आहेत हे सरिताच्या लक्षात आले. त्यासरशी सरितानं निश्चय केला की उद्य सोहळ्याला खुले निमंत्रण असल्याने तीला कोणीच अडवु शकणार नव्हते, तेव्हा सायालीनी स्वतः स्वाक्षरी केलेली प्रत आपणही घेऊन यावी. आणि ती उद्या समारंभाला काय कपडॅ घालायचे याचा विचार ती करु लागली.

खुप दिवसांनी तीला आज बाहेर पडावेसे वाटते आहे हे पाहुन सर्वांनाच खुप बरे वाटले. सहाच्या ठोक्याला सरिता अबोली रंगाची साडी आणि त्यावर साध्याच पण ठसठशीत मोत्याच्या कुड्या घालणं तीनं पसंद केलं. ती बाहेर आली तशी सगळ्यांनाच तीच्याकडे बघुन आनंद झाला, तीच्याकडे बघुन कोणीचं सांगु शकले नसते की ती एवढ्या मोठ्या धक्क्यातुन नुकतीच सावरली आहे. खुप दिवसांनंतर बाहेर पडल्यामुळे तीच्या चेहेर्‍यावर थोडा गोंधळलेला भाव सोडला तर ती तशी प्रसन्न दिसत होती. वृंदावनाच्या बाहेर लगेचच तीला रिक्षा मिळाली. पुर्ण प्रवासात तीनं आज कोणताच विचार केला नाही, एवढे दिवस चाललेलं विचारमंथन पुरेसं होतं त्यासाठी.त्यामुळे एखाद्या तिर्‍हाईतासारखी ती चालली होती. वेळेत पोहोचल्यामुळे तीला चांगली जागाही मिळाली. दिव्यांच्या झगमगाटात आणि फुलांच्या सजावटीत स्टेजवर ठेवलेला समीधाचा फोटो पाहुनही आज सरिता जरा सुद्धा विचलीत झाली नाही. शांतपणे स्टेजवर जमणारे लोक ती न्याहाळत होती. सगळे प्रमुख पाहुणे आणि सायली दिवाकर जमले. सातच्या सुमारास दिप प्रज्वलन छोटसं भाषण वगैरे कार्यक्रम झाल्यावर सायली आणि बाकीच्या मान्यवरांनी हातातल्या कव्हर घातलेल्या पुस्तकाचे कव्हर काढुन औपचारिकता पुर्ण केली. आणि सायली बोलण्यासाठी उठली. " ताईच्या जगण्याला मी लढणं म्हणेन, ज्याला आपण खरं आयुष्य जगणं म्हणतो ते फक्त तीच जगली. जगण्याचा खरा अर्थ तीला चांगलाच उमजला होता. बाकीचे जगतात त्याला मी फक्त आहे ती परिस्थीती स्वीकारुन दिवस ढकलणं म्हणेन. किती लोक परिस्थीतीशी लढतात? खुप कमी. आणि माझी ताई त्यातली एक होती हे सांगताना आज मला खुप अभिमान वाटतो आहे. अपयश, गरिबी, व्यसनी बाप यात होरपळलेलं बालपण पाहिलेली माझी ताई, तीनं, बंधनं आणि मुलगी याचं लेबल लागलेल्या मर्यादा मानण्यास नकार देऊन आम्हालाही स्वभिमानानं जगायला शिकवलं. मर्यादा म्हणजे फक्त समाजानं सांगितलेल्या सुचनांचं पालन नव्हे तर मर्यादा म्हणजे आपण स्वतःला घातलेली नीती आणि आपल्या स्वभिमानाचा आदर करुन घालुन दिलेली बंधनं म्हणजे खरी मर्यादा! भले समाजाच्या दृष्टीनं तीनं घर सोडलं आपल्या करिअर साठी, काही लोकांना त्यावेळेस तीनं सामाजिक मर्यादांच उल्लंघन केलं असं वाटलंही असेल पण तीनं स्वतःला घातलेली मर्यादा तीनं कधीच ओलांडली नाही !आपल्या आयुष्यात हरलेल्या बापाच्या दोन खोल्यांच्या घरात खितपत पडुन आयुष्य जगण्याला ठामपणे नकार देणार्‍या एका मुलीला, लहान वयात आपल्या दोन भावंडांची जबाबदारी स्वतःहुन पार पाडण्याला एका ताईला आणि एक अतीसामान्य मुलगी ते सुपरस्टार प्रवास करणार्‍या एका जबरदस्त अभिनेत्रीला माझा सलाम!" टाळ्यांचा कडकडाट झाला."तीच्या या प्रवासाचा परिचय आपल्या सर्वांना व्हावा ह्या साठी मी हा सगळा खटाटोप केला आहे. तीच्या या छोट्या पण भव्य प्रवासात तीच्या समोर आलेले पण तुमच्यासारख्या चाहत्यांना माहीत नसलेले अनेक अनुभव, समीधाच्या स्वभावछटा मी यात मांडलेल्या आहेत. आयुष्याच्या गोळाबेरजेमध्ये आपण किती जगलो यपेक्षा कसे जगलो याला महत्व द्या आणि शेवटी बाकी शुन्य उरणार नाही असा हिशोब मांडा! एवढं मला शिकवलं ताईनं आणि मला वाटतं याची प्रचिती प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला कधीना कधी तर येतेच.हे बोलुन मी माझे दोन शब्द संपवते. बाकी तुम्ही पुस्तक वाचुन अभिप्राय जरूर कळवाल अशी अपेक्षा करते." अस्सल मराठीमध्ये तीनं भाषण करुन जमलेल्या सगळ्यांचीच मने जिंकली. शिवाय पुण्यात जन्मलेल्या असल्याने तीनं पुस्तक मराठीत लिहुन नंतर इंग्रजीमध्ये अनुवाद प्रकाशित करण्याचा मानस दाखवल्याने मराठी माणुस सुखावला होता. टाळ्यांच्या कडकडाटात सरिताला काही ऐकु आले नाही. थोड्यावेळाने अनौपचारिक गप्पा आणि अल्पोपहाराचा कार्यक्रम झाल्यानंतर पुस्तक विक्रीला सुरवात झाली. प्रत्येक प्रतीवर सायलीची स्वाक्षरी मिळणार असल्याने लोकांनी लगेच रांगा लावायला सुरुवात केली. सरिताही रांगेत उभी राहिली. अर्ध्या तासात सायली तीच्यासाठी ठेवलेल्या खुर्चीत येऊन बसली. तीचा असिस्टंट रांगेतुन आलेल्या लोकांच्या हातातील पुस्तकाचे पहीले पान उघडुन सायलीसमोर टेबलावर ठेवत होता. सायली प्रत्येकाला नाव विचारत होती आणि ते नाव टु मध्ये लिहित होती आणि खाली 'रिगार्डस' किंवा 'विथ लव' असं लिहुन स्वाक्षरी करत होती. हजारो लोक ताटकळात उभे होते. थोड्यावेळाने सरिताचा नंबर आला, सायलीनं नाव विचारताच सरिता, 'सरिता' एवढच म्हणाली, सरितानी टेबलावर ठेवलेला हात पाहुन सायलीच्या लक्षात आलं असावं, तीन फक्त स्वाक्षरी केली, ते पुस्तक मिटलं आणि बाजुला सरकवलं. सरिताला हे अपेक्षितच होतं तीनं मुकाट्यानं ते पुस्तक उचललं आणि सभागृहाच्या बाहेर आली. वृंदावनमध्ये परत आली तेव्हा तीचा चेहरा अगदीच नॉर्मल होता, जे भाव जाताना होते तेच भाव परत आल्यावर होते. आजुबाजुच्या लोकांसोबत थोडंफार जुजबी संभाषण करून ती तीच्या खोलीकडे निघाली. कपडे बदलून झाल्यावर एखादी पोथी भक्तीभावानं हातात घ्यावी तशी तीनं ते पुस्तक हातात घेतलं.

समीधाचा त्या कव्हरवरचा फोटो पाहुन तीला नॉस्टॅल्जीक व्हायला झाले. तीच्या जन्माच्या दिवसापासुनचे सगळे लहान मोठे प्रसंग तीच्या डोळ्यासमोरुन गेले. आपण तीला काय देऊ शकलो आणि काय नाही देऊ शकलो याचा विचार तीच्या मनात तरळुन गेला. पण आता खुप उशीर झालेला होता, वेळही निघुन गेलेली होती. सगळे विचार झटकुन तीनं चष्मा लावला आणि पुस्तक वाचायला सुरुवात केली. सायलीने अक्षरशः समीधाचं आयुष्य, तीला आलेले बरे वाईट अनुभव, तीचे कष्ट, तीची जिद्द, तीनं काम केलेले चित्रपट, प्रत्येक चित्रपटामागच्या आठवणी, किस्से,चित्रपटाचे वेगळेपण, सहकलाकारांसोबतचे तीचे संबंध, लोकप्रिय असुनही सेटवरच्या लोकांशी आपुलकीने वागणारी, अडलेल्या नडलेल्या प्रत्येकाला मदत करणारी, आणि आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या वाईट प्रसंगांकडे एक 'काहीतरी शिकवुन गेलेला' अनुभव म्हणुन पाहण्याची तीची दृष्टी, शिकायला मिळालेल्या अनेक गोष्टी.... अशी सगळी सगळी समीधाच त्या ३५० पानात उलगडुन दाखवली होती. तीच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टी सरिताला नव्यानेच कळत होत्या."सुरवातीच्या खडतर दिवसांमध्ये साईड अ‍ॅक्ट्रेस पासुन ते सेट झाडण्यापर्यंतची अनेक कामं तीनं केली, मात्र आपल्या भावंडाना मात्र तळहातावरच्या फोडासारखं जपलं. त्यांची जबाबदारी तीनं स्वतःनी उचलल्यामुळे त्याना कुठे काही कमी पडुन नये म्हणुन सतत ती धडपडत असायची. त्यांचं आयुष्य आहे त्यापेक्षा अधिक सुंदर व्हावं या साठी तीन कोणतेही प्रयत्न कमी पडु दिले नाहीत. म्हणुनच ती फक्त ताई न राहता आमची आई बनली, आम्हाला तीच्या मुलांसारखं सांभाळलं आणि वाढवलं. सुपरस्टार होऊनही ती आपली मुळं कधीच विसरली नाही. काम हे काम असतं त्यात कधीही मोठेपणा आणि कमीपणा नसतो हे तत्व तीनं स्वतःही अवलंबलं आणि सहकार्यांवरही बिंबवलं.म्हणुनही ती फक्त एक फिल्म स्टार म्हणुन न जगता एक उत्तम व्यक्ती एक स्टार म्हणुन जगली आणि तीच्या अश्या साध्या राहणीमानामुळे अनेक स्टार्सना ती खुप ओल्ड फॅशन्ड वाटायची पण त्या तीच्या गुणामुळेच लोक तीला कायमच लक्षात ठेवतील. म्हणुनच ती आज आपल्यात नसली तरी किर्तीरुपाने ती नेहमीच आपल्याजवळ राहील. तीनं आपल्या आजराचाही कधी गाजावाजा केला नाही, फारच कमी लोकांना माहीत होते की ती एवढ्या मोठ्या आजरानी ग्रासली आहे. शिवाय आजार ही कामापासुन पळवाट म्हणुनही तीनं कधीच वापरली नाही.एक चांगली प्रगल्भ अभिनेत्री म्हणुन ती जगलीच पण एक बहीण, आम्हा मुलांची आई म्हणुन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक गुणी स्त्री म्हणुन ती जगली. इथे मी 'एक गुणी मुलगी म्हणुन' चा मी मुद्दामच उल्लेख केलेला नाहीये आणि याचं कारण वाचकांना पुढच्या चॅप्टरमध्ये मिळेल."

रात्रीचे दोन वाजत आले होते, सरिता आपल्या मुलीच्या या प्रवासाची, तीच्या यशाची गाथा तन्मयतेनं वाचत होती. रात्रीच जेवण, औषध सगळं तसच होतं. कोणी येऊन ते सगळं कधी टेबलवर ठेऊन गेलेलं तीला कळालंचं नव्हतं. पण ते वाक्य वाचलं आणि ती भानावर आली. जेवणाची आसक्ती नव्हतीच औषधं तेवढी घेतली तीनं. आणि ती पुढची पानं उलटुन वाचु लागली. "ताई ही खुप क्षमाशील व्यक्ती म्हणुन प्रसिद्ध होती, चुकणार्‍याला नेहमीच एक संधी द्यावी असं ती नेहमीच सांगायची. पण तीच्या आयुष्यात एका व्यक्तीला ती कधीच माफ नाही करु शकली, आणि ती व्यक्ती म्हणजे आमची आई!" सरिता जसं जसं पुढे वाचायला लागली तसंतसं सायलीनं लिहिलेलं किती एकतर्फी होतं हे तीच्या ध्यानात यायला लागलं. आपण एवढ्या लढाया लढुन, एवढ्या कोणाकोणाच्या चुका पोटात घालुनही आणि सगळं नीट होईल या एका आशेवर आतापर्यंतचं आयुष्य एकलकोंडेपणानं काढलं... कोणतीही चुक नसताना माघार घेऊन सगळ्यांना संधी देऊनही त्या सगळ्या कष्टांची ही पावती? सरिताचे डोळे त्या पुस्तकातल्या प्रत्येक प्रसंगानगणिक पाणावत होते. तरीही ती पुढे वाचत होती, " समीधा ज्या दिवशी आम्हाला घेऊन घराबाहेर पडली त्यादिवशी आम्हाला आधार द्यायचा सोडुन आईने दारुड्या नवर्‍याची बाजु घेत, समीधाला मारुन आम्हालाही घराबाहेर काढले. बाप काम करत नसल्याने आणि आईला वेळ नसल्याने अराजक माजलेल्या घरात, घर कसलं ते? खुराडं होतं ..कोंडवाडा नुसता! जीव गुदमरायला लावणारी जागा एवढीच त्याची ओळख! अश्या त्या घरात आम्हाला ती दारुड्या बापाच्या तावडीत देऊन खुशाल उशिरा उशिरा घरी यायची. सण जवळ आले की बापाच्या अंगात पिशाच्च संचारलेलं असायचं, तो आम्हाला गुरासारखं मारायचा पण त्या मारातुन स्वतःला वाचवण्यासाठी ती मुद्दाम उशिरा यायची. ती परत येईपर्यंत बाप आमच्याकडचे शाळेच्या फीचे पैसे काढुन घेऊन त्या पैशाची पिऊन पडलेला असायचा. आमचं शिक्षण अभ्यास नीट व्हावा म्हणुन ताईनं शिक्षण सोडलं होतं किंबहुना तीला आईनं ते सोडायला लावलेलं. दिवसभर घरी बसुन स्वैपाकपाणी , घरातली कामं करता करता आम्हा भावंडांचा अभ्यास घेणे अशी अनेक कामं ती करत असे. आई नोकरीच्या नावाखाली दिवसरात्र बाहेरच असायची. आपल्या सगळ्या जबाबदार्‍या ताईवर ढकलुन आई खुशाल होती. आईची माया नेहमीच आम्हाला ताईमध्येच दिसली. आईचा साधा वेळही आमच्यासाठी नव्हता. आम्हाला घालवुन देताना पण आई हेच म्हणाली की मी माझ्या स्वार्थासाठीच या पोरांना तुझ्यासोबत पाठवत आहे. त्यांची नीट काळजी घे. तीनं एकदाही विचार नाही केला की समीधा काय करेल त्या पोरांना सांभाळण्यासाठी? कुठे राहील? काय काम करेल? आपली मुलं आपल्याला परत कधी भेटतील? त्या प्रसंगानंतर ती आमचा तोंडही बघायला पण आली नाही की कधी आमची चौकशी केली नाही. या अनेक वर्षात आमच्याशी तीनं काहिही संबंध ठेवलेला नाही आहे आणि ती अजुन जीवंत आहे हे मला माहित आहे. आपल्या संसाराच्या हौसेपायी वेळोवेळी ती 'समीधाची आहुती' आपल्या लग्नाच्या अग्नीकुंडात देत आलेली आहे. ताईच अंतीम दर्शन घ्यायलाही ती बाई आली नाही. आपल्या आयुष्यात ज्या व्यक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे अशी व्यक्ती म्हणजे आई! त्याच व्यक्तीकडुन असं डावललं गेल्यावर काय वाटलं असेल समीधाला? पण तश्याही परिस्थीत तीन आम्हाला आईची उणीव भासु दिली नाही. आपल्या ऐपतीप्रमाणे ती आमच्या गरजा तर कधी लाड पुरवत राहीली. आम्हाला जन्माला घालणारी आमची आई मात्र या सगळ्या गोष्टींपासुन जाणिवपुर्वक दुर राहीली. ती एक आई तर नव्हतीच पण एका स्त्रीची दु:खही तीला कळाली नव्हती. ते फक्त एक स्वार्थी स्त्री होती. जबाबदार्‍यांपासुन दुर पळणारी. इतक्या वर्षानंतर खरं तर आता तीचा चेहेरादेखील मला आठवत नाहीये मला यापेक्षा दुर्दैव ते काय?" सरिताच्या पायाखालची जमिनच सरकली. तीचा तीच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. आत्तापर्यंतच्या खाल्लेल्या खस्ता? नवर्‍याचा संताप त्याच्या मनावर शरिरावर उमटलेल्या जखमा हे सगळं खोटं होतं की काय असं वाटायला लागलं आणि काय खरं होतं मग? जे सायलीनं लिहिलेलं ते? सरिताचं डोकं गरगरायला लागलं, काहीच सुचेनासं झालं. तीला मोठ्यांदा किंचाळावसं वाटलं की हे सगळं खोटं आहे. मीही माझ्या मुलांवर तेवढच प्रेम केलं जेवढ कोणतीही स्त्री आपल्या मुलांवर करेल. तीला आज परत रमाकांतच्या नशिबाचा हेवा वाटायला लागला, त्याच्या मुलीने त्याच्याविषयी जे भाष्य केले आहे ते वाचायला तो या जगात नाहीये काय नशिब आहे वा? ती खिन्नपणे हसली. मी केलेल्या कर्तव्य आणि जबाबदारीतल्या गल्लतीची एवढी मोठ्ठी शिक्षा? तीनं केलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे मिळालेली ही शिक्षा खरचं गरजेची होती का? तीच्या आई असण्याचा एवढा मोठा अपमान आत्तापर्यंत कोणीच केला नव्हता. गैरसमजुतीमुळे आज तीच्याच मुलीनं तीला सर्वांसमोर चपराक मारली होती. आपण आपल्या मुलांना रमाकांतपासुन दुर ठेऊन, विचारंची मोकळीक देऊन खुप मोठी चुक केल्याची जाणिव तीला होऊ लागली. समीधा स्वतःच्या पायावर उभी राहातेय हे पाहुनच आपण मुलांना तीच्या सोबत पाठवलं ना? दुसरा कोणता आधार होता मला? आणि मी रमाकांतशी बोलुन जाणरच होते न त्यांच्या जवळ राहायला?त्यांना जन्म दिल्यानंतर त्यांची जबाबदारी मी का झटकेन? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहीले होते. आपण त्या दिवशी रमाकांतला एक शेवटची संधी देता देता केवढं विष कालवलं आपल्याच मुलांच्या मनात याची तीला कल्पनाच नव्हती.त्या दिवसानंतर मुलांना भेटण्याच्या केलेल्या अनेक धडपडी, त्यांना दिलेल्या अनेक संधी हे सगळं गेलं कुठे? गेटवर ताटकण्याच्या वेळी सरितानं नेटाने केलेले सगळे प्रयत्न वाया गेलेले. त्या तीघांच्या भेटीच्या निरुत्साहामुळे सरिता अनेक वेळेस दुखावली, ओरबाडली गेली होती. आपल्या वागण्याचा असा पण अर्थ आपलीच मुलं काढतील असं सरिताला चुकुन सुद्धा वाटलं नव्हतं. सगळाच विपर्यास होता. रात्र संपुन सकाळ झाली. अख्ख पुस्तक वाचुन संपलं होतं. सरिताला मुलांची बाजु कळली पण त्यांना सरिताची बाजु न कळताच हा दुरावा तसाच राहणार का? हा नविन प्रश्न तीला भेडसावु लागला. जे जे लोक हे पुस्तक वाचतील त्या लोकांच्या मनात आपली काय प्रतिमा होईल? या पुस्तकावर लोक जेव्हा अभिप्राय नोंदवतील तेव्हा आपली जी छी थु होईल ती वेगळीच? आणि माझ्या मी उभ्या केलेल्या या वृंदावनातल्या विश्वाच्या पण चिंधड्या होतील. आत्तापर्यंत ही कटुता आपल्या चौघांमध्येच होती पण आता ती माणसामाणसापर्यंत होईल. हे असं होऊन चालणार नाही. मला माझी बाजु मांडण्याचा हक्क आहे. काहितरी केले पाहिजे. पुढचा अख्खा दिवस तीचं डोकं ठणकतं होतं. आज बरेच लोक अभिनंदन करुन गेले पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल आणि वाचायची इच्छाही दाखवुन गेले. पण त्यांनी त्या गोष्टी वाचल्यातर आपल्याबद्दलचं त्यांचं मत काय होईल याचाच ती विचार करत होती.तीच्या मनावरचं मळभ काही जाईना. अनेक दिवस विचार करुन मग तीच्या डोक्यात एक कल्पना सुचली. तीच्या मनाचं समाधान झालं. जगाला आणि त्याहीपेक्षा आपल्या मुलांना आपली बाजु समजायला हवी. आपण त्यांच्यासाठी केलेला त्याग आणि त्यामागची भुमिका स्पष्ट व्हायला हवी. उरलेलं आयुष्य आता हे ओझं मनावर घेऊन न जगता, जे सत्य आहे ते समोर आणलचं पाहिजे. शेवटी त्यांनी मला 'स्वार्थी स्त्री' म्हटंलं असलं तरीही मी त्याना जन्म दिलेली आई आहे आणि भले त्यांनी मला पोरकं केलं असेल पण मी त्याना पोरकं करणार नाही. आत्तापर्यंतच्या त्यांच्या सगळ्या चुका मी माफ केल्या मग ही का नाही? सरिताच्या सगळ्या प्रश्रांची जणु उत्तरं तीला मिळाली होती , मोठ्या समाधानानं ती झोपी गेली.

आयुष्याला एक ध्येय मिळालं की माणुस झपाटुन जातो नुसता. सायलीच्या वाचलेल्या पुस्तकानंतर सरिताच्या आयुष्याला एक कलाटणीच मिळाली जणु! त्यानंतरचे अनेक महिने तीची अवस्था झपाटल्यासारखीच होती. एखादी गोष्ट करताना तहान भुक विसरायला होणं म्हणजे काय हे ती अनुभवत होती.समीधाचा मृत्युमुळे तीच्या आयुष्यात जी दोलायमान परिस्थीती आली होती त्यातुन खरं तर सायलीच्या 'त्या' पुस्तकामुळेच ती भानावर आली. ते पुस्तक वाचुन झाल्यानंतरचे अनेक दिवस ती विचारांच्या वावटळीत सापडली होती पण ज्याप्रमाणे वावटळ काही वेळाकरता आपल्या डोळ्यात धुळ फेकते, आपण डोळे मिटुन घेतो आणि वावटळ शांत झाल्यावर आपले डोळे परत पहिल्यासारखं सगळच लख्ख पाहु लागतात त्याप्रमाणे सरिताही त्या विचारातुन बाहेर पडली ते तीच्या एका भन्नाट कल्पनेसोबतच. त्यानंतरच्या दिवशी सरिता स्वतः बाहेर पडली आणि एक फुलस्केप वही, एक पेन आणि काही रिफील्स घेऊन आली. तीनं लिहायला सुरुवात केली, "

प्रस्तावना
लिहिण्यास कारण की तुझं 'समीधा' वाचलं. समीधाच्या खुप सुंदर आठवणी जाग्या केल्यास, अख्खी समीधाच उलगडवुन दाखवलीस जणु. पण काही गोष्टी खटकल्या, काही मनाला जखमा करुन गेल्या, काही बर्‍याच एकतर्फी वाटल्या. म्हणुनच हा सगळा शब्दप्रपंच! एक आई आपल्या मुलांशी असं वागु शकते यावर बरिच चरितचर्वणं झाली आहेत त्यामुळे त्या विषयाला हात न घालता मी माझ्या दृष्टीनं जे जे योग्य वाटले ते ते करत गेले. आणि हे पुस्तक मी माझ्या लाडक्या समीधा, सायली आणि दिवाकर साठी लिहितेय. माझी मुलं, त्यांचं आयुष्य आणि मी, हे सगळं माझ्या दृष्टीकोनातुन कशी दिसतात ते पाहुया तर ......." सरिता दिवसेंदिवस नुसतं लिहित होती. काय लिहु आणि काय नको असं झालं होतं. आयुष्यातले अनेक कडु गोड प्रसंग ती पहिल्यांदाच एक तिर्‍हाईत म्हणुन लिहित होती, त्या प्रत्येक प्रसंगाशी असणारी नाळचं जणु तीनं तोडुन टाकली होती. अनेक वादळं येऊनही तटस्थ कसं रहावं हे ती आता शिकली होती. आज पहिल्यांदाच मनात साठवलेली मळमळ बाहेर पडत होती, कधीच कोणाला न सांगितलेल्या, कधीच कोणाला माहित न पडलेल्या अशा अनेक गोष्टी होत्या तीच्याकडे, सगळं सगळं ती कोणताही आडपडदा न ठेवता ती लिहित होती. कधी असंच आठवेल तसं लिहित होती तर कधी 'समीधा' समोर घेऊन त्यातल्या प्रसंगानुसार लिहित होती. लहानपणीच्या आठवणी, काही मजेशीर प्रसंग, काही कबुलीजबाब, काही लहान सहान गोष्टी करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी केलेला खटाटोप, काही गोष्टी मुलांसाठी करता न आल्यामुळे आलेली असहायतेची भावना अशा एक न अनेक गोष्टी ती लिहीत होती.जसं ती लिहु लागली होती तसं तीला खुप मोकळं वाटायला लागलं होतं, जणुकाही सगळी बंधनंच कोणीतरी काढुन घेतल्यासारखी. जगण्याला खर्‍या अर्थानं काही घ्येय मिळालं होतं. या सगळ्या काळामध्ये 'समीधा' चा रिव्हीव्यु आला होता, पुस्तक वाचलेल्या लोकांनी मुक्तमंचावर जशी पुस्तकाची तारीफ केली होती तशी सरिताच्या एकंदरीतच्या भुमिकेबद्दल तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केली होती. काहींनी संमिश्र प्रतिक्रीयाही दिल्या होत्या. खुप थोड्या लोकांनी सरिताच्या एक आई म्हणुनच्या भुमिकेचा / बाजुचा विचार करण्याची तयारी दाखवली होती. सरिताला त्या लोकांचे कौतुक वाटले. या जगात सारासार विचार करणारी माणसं अजुन आहेत हे बघुन तीला दिलासा मिळाला होता. पण सरिताची छबी एकंदरीतच खुप खराब झाली होती. नशिबाने सायलीनं सरिताचं नाव लिहिलं नव्हतं. आईचा उल्लेख सरिता भोसले न करता फक्त आई एवढाच केला होता, आणि तो एक मोठा दिलासा होता. पण त्या सगळ्या लोकांच्या मताचा फारसा काही परिणाम सरितावर झाला नाही, ते वाचुन ती अजिबात विचलीत झाली नाही. हे लिखाण सुरु केल्यापासुन तीच्या स्वभावात एक प्रगल्भता आली होती. एक एक प्रसंग आपण कसे निभावले याचं खरंतर तीचं तीलाच खुप कौतुक वाटायला लागलं होतं. आपल्या आयुष्यात काही गोष्टी आपण इतक्या सहज आणि स्वाभाविकपणे करतो की त्या गोष्टी करण्यातला मोठेपणा आपल्या लक्षातही येत नाही पण जेव्हा त्या गोष्टीचं आत्मभान येतं तेव्हा कळतं की कोणी काहिही म्हंटलं तरीही टिका करणं जेवढं सोपं असतं तेवढचं महत्वाच आणि अवघड असतं ती टिका ऐकुन घेऊन योग्य वेळेस त्याला प्रत्युत्तर देणं! सरिताही तेच करत होती. किंबहुना तेच तीच्या आयुष्याचं उद्दीष्ट बनलं होतं. आणि आजपर्यंतच्या आयुष्यात तीनं जे काही केलं त्याचा तीला सार्थ अभिमान वाटत होता.

सरिताच पुस्तक लिहुन पुर्ण झालं. तीच्या प्रकाशकांकडे जश्या फेर्‍या सुरु झाल्या तश्या अनेक उलटसुलट वावड्या उठायला लागल्या, 'समीधा' वाचल्यानंतर तीच्या आईला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला असेल, बड्या लोकांना बातम्यांमध्ये राहण्यासाठीची ही कारणं वगैरे पासुन ते, सायलीच्या पुस्तकाला ग्लॅमर आणि पब्लीसिटी देण्यासाठी हा सगळा पब्लीसिटी स्टंट असल्याचे आरोपही झाले. अश्या बातम्या येत असताना सरिताच्या पुस्तकाला प्रकाशक मिळाला नसता तरच नवल होतं. एका बड्या प्रकाशकानं सगळ्या अटी मान्य करत पुस्तक छापायचं मान्य केलं. सामान्य माणसाच्या आयुष्यात काही सनसनी झाली की अतीसामान्य माणुम असामान्य व्हायला वेळ लागत नाही. प्रकाशक मिळाल्यानंतर, प्रकाशनपुर्व पत्रकार परिषद आयोजित केली होती त्या प्रकाशकानीच! पुस्तकातल्या मजकुरापेक्षा ते लिहिणारी बाई ही एका मोठ्या सेलेब्रिटीची आई होती आणि नविन प्रकाशित होणार्‍या पुस्तकाच्या खपाच्या दृष्टीने महत्वाच होतं. हे सगळं गृहीत घरुनच ती सगळ्या पत्रकारांची ठामपणे आणि निर्भिडपणे उत्तरं देत होती. आत्तापर्यंत कधीही प्रकाशझोतात न आलेली 'समीधा'ची आई आज अचानक अशा प्रकारचं पुस्तक लिहुन प्रकाशात येण्याचा का प्रयत्न करत आहे? अशा प्रश्नांपासुन ते पुढे अजुन काही लिहिण्याचा विचार आहे का? वगैरे अशा अनेक प्रश्नांची तीनं छान मुडमध्ये उत्तरं दिली आणि आनंदाने ती परतली. समाधान हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे, तीच आयुष्याला पुर्णत्वाकडे नेण्याचं बळ देत असते. दिवाळी काही दिवसांवर आली होती, दर वर्षीप्रमाणे सरितानं पत्र लिहायला सुरुवात केली. पण गेल्या वर्षी आणि या वर्षी तीला फक्त दोनच पत्र लिहायची होती. मागच्या वर्षीपेक्षा तीच्याकडे या वर्षी लिहिण्यासारखं, सायली आणि दिवाकरला सांगण्यासारखं खुप होतं. मात्र समीधाच्या बॉक्समध्ये टाकण्यासाठी, तीला देण्यासारखं सरिताकडे काहीच नव्हतं!

प्रकाशनाचा दिवस आला, एका छोटेखानी कार्यक्रमात काही खास लोकांच्या उपस्थितीत पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. तसही वृंदावनात अश्या खास लोकांची काही कमी नव्हती, विशेष म्हणजे 'समीधा'च्या प्रकाशनानंतर या सगळ्या खास लोकांनीच सरिताला आधार दिला, सावरायला मदत केली. सरिताची छबी त्या सगळ्यांनी तीच्याशी निगडीत त्याना आलेल्या अनुभवांवरुन बनवली होती आणि त्या पुस्तकामुळे त्यात तसुभरही फरक पडला नव्हता! सरिता समाधान पावली, सगळ्या आपल्या लोकांमध्ये तीला खुप बरं वाटत होतं. जे आहे त्यात समाधान मानण्यातच शहाणपणा आहे ते तीला सद्य परिस्थीतीतील प्रसंगांनी शिकवलं होतं. त्याउलट 'आशे'च्या नावाखाली आपण जी स्वतःची फसवणुक करत असतो ती आयुष्यात जास्ती घातक ठरु शकते. तीच गोष्ट आपल्याला सत्य परिस्थीतीपासुन दुर घेऊन जाते आणि आपली सारासार विचार करायची क्षमताच संपते. आपण केलेल्या योग्य गोष्टींविषयीही आपल्याला संभ्रम व्हायला लागतो, निर्णयक्षमता कमकुवत होते आणि आपण आपल्यासाठी न लढता, आपल्याच विरोधात लढायला लागतो. आयुष्यात या वळणावर अशा द्वंद्वात सापडल्यानंतर परतीचा मार्ग सापडणं अशक्यच जवळजवळ, पण त्यातुन बाहेर पडण्यासाठी वृंदावनातल्या सर्वांनी केलेली मदती विषयी कृतज्ञता व्यक्त करायला मात्र ती आपल्या भाषणात विसरली नाही. "समीधामधली क्षमाशीलता ही तीनं तीच्या आईकडुन घेतलेली होती आणि म्हणुनचं "खरी मला कळालेली समीधा" हे पुस्तक 'समीधा' या पुस्तकाचे प्रत्युत्तर किंवा उत्तरार्ध नसुन ती फक्त त्याची दुसरी न कळलेली बाजु आहे. पण याच्या नावातल्या समीधाचा रेफरन्स म्हणजे सुपरस्टार "समीधा" नसुन, अग्निकुंडात आहुती म्हणुन पडणारी समीधा आहे. ती समीधाच्या आईची न कळलेली किंबहुना न विचारात घेतलेली बाजु आहे आणि ती तीनं तीच्या मुलांसाठीच लिहिलेली आहे. कारण ही स्वार्थी स्त्री अजुनही त्यांची वाट पाहते आहे दर दिवाळीप्रमाणे या दिवाळीसाठीही! तुम्ही तुमचा अभिप्राय जरुर कळवाल अशी अपेक्षा करते." टाळ्यांचा अगदी कडकडाट झाला नसला तरी तीथं असलेल्या कोणीही सांगितलं असतं की सरितानं थेट मनाला हात घालणारं भाषण केलं होतं. समारंभानंतर वृंदावनातल्या सगळ्या तीच्या सोबत्यांना तीनं पार्टी देण्याचं जाहीर करताच सगळेच आनंदले. अनेक वर्षांनंतर सरिताला खुप आनंद झालेला होता, एखाद्या गोष्टीला पुर्णत्व देण्यातला जो आनंद ती आज अनुभवत होती तो आनंद या आधी कधीच तीला झाला नव्हता. स्वतःसाठी काहीतरी करण्याचे संधीच तीला कधी मिळाली नव्हती, आणि आता या वयात तीला ती संधी मिळाली होती, तीनं त्याचं सोनं केलं होतं. सगळ्यांच्या सानिध्यात घालवलेली संध्याकाळ आणि रात्रीचं हॉटेलमधलं जेवण अशा छान आठवणी घेऊन सरिता वृंदावनात परतली. या पुस्तकाला मिळणार्‍या प्रतिसादापेक्षा आपली बाजु आपल्या मुलांना कळण्याचं महत्व तीला जास्त होतं पण त्यांनी हे पुस्तक वाचलचं नाही तर? तक्षणी तीच्या डोक्यात अजुन एक कल्पना आली. दिवाळी दोन दिवसावर आली होती. एक संधी द्यायला काय हरकत आहे असा तीनं विचार केला आणि त्याप्रमाणे तीनं ती कल्पना अंमलातही आणली.

सायली आणि दिवाकरला द्यायची या दिवाळीची भेटवस्तु स्वतःजवळ न ठेवता, सरितानं ती कुरियरने पाठवली होती. दिवाळीच्या एक दिवस आधी आलेली भेटवस्तु पाहुन दोघेही संभ्रमात पडले. त्यावरच्या लेबलवर लिहिलेलं होतं "आईकडुन सप्रेम भेट!" आणि कव्हरच्या आत होतं पुस्तक "खरी मला कळालेली समीधा"!

सरिता आज खरी धन्य झाली होती, काहिही आडपडदा न ठेवता तीनं आपलं "खरी मला कळालेली समीधा" पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि ज्यांच्यासाठी तीनं ते लिहिलं होतं त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं देखिल होतं. आज ती खर्‍या अर्थानी तृप्त झाली होती. समाधानच्या परमोच्च क्षण तीला गवसला होता. एवढा परमानंद की जन्माचा खरा हेतुच साध्य झाल्यासारखं तीला वाटत होतं. आणि एकदा जन्माचं सारर्थक झाल्यानंतर मग जगण्याला काय तो अर्थ? इतके दिवस ज्या मृत्युकडे जाण्याची ओढ तीला लागली होती, तो स्वतःच तीच्याकडे येत होता. संतांनी म्हंटल्याप्रमाणे माणसाने कधी मरावे तर ज्या क्षणापासुन आयुष्यात करण्यासारखे काही उरले नसेल तेव्हा मरावे. आणि हीच तृप्तीची, परिपुर्णतेची जाणिव सरिताच्या मनात सळसळत होती. एक चैतन्याची शिरशिरी जाणवु लागली, मणामणाचे ओझे उतरल्यासारखे वाटु लागले. तीनं परमात्म्याला नमस्कार केला, या जन्माला घातल्याबद्दल त्याचे आभार मानले, छातीतुन एक सुक्ष्म कळ निघाली आणि तीनं डोळे मिटले... कायमचे! पेपरमध्ये दुसर्‍या दिवशी एक छोटीशी बातमी छापुन आली होती. "खरी मला कळालेली समीधा"या पुस्तकाच्या लेखिका आणि अभिनेत्री कै. समीधा यांच्या मातोश्रींचे देहावसान!"

सायली आणि दिवाकर वृंदावनाच्या त्या दहा बाय बाराच्या खोलीत उभे होते. दिवाकरच्या हातात "दिवाकर" लिहिलेला बॉक्स होता आणि सायलीच्या हातात "सायली" आणि "समीधा" लिहिलेले बॉक्स होते. डोळ्यात तरळलेले अश्रु हे आईपासुन तुटल्याचे, पोरके झाल्याचे होते की पश्चातापाचे होते हे त्यांचे त्यांनाच कळत नव्हते.

समाप्त!

गुलमोहर: 

.

छान लिहिली आहेत कथा... वाचताना सरिता आणी समीधा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.

पु. ले. शु.

धन्यवाद आपल्या प्रतिसादांबद्दल, लिहिण्यातल्या चुका नक्कीच सुधारेन!!

चिन्गुडे, चांगली जमलीये कथा. वेगळंच कथाबीज आहे... आणि फुलवलयही चांगलं.
<<..... त्याउलट 'आशे'च्या नावाखाली आपण जी स्वतःची फसवणुक करत असतो ती आयुष्यात जास्ती घातक ठरु शकते. तीच गोष्ट आपल्याला सत्य परिस्थीतीपासुन दुर घेऊन जाते आणि आपली सारासार विचार करायची क्षमताच संपते. आपण केलेल्या योग्य गोष्टींविषयीही आपल्याला संभ्रम व्हायला लागतो, निर्णयक्षमता कमकुवत होते आणि आपण आपल्यासाठी न लढता, आपल्याच विरोधात लढायला लागतो. आयुष्यात या वळणावर अशा द्वंद्वात सापडल्यानंतर परतीचा मार्ग सापडणं अशक्यच जवळजवळ.....>>

ही काही वाक्यं म्हणजे सरिताचं संपूर्णं पूर्वायुष्याचं सार आहे... असं मला वाटतय.

मुलांच्या भवितव्यासाठी अतोनात झटताना... हे आपण केलं तरच मुलांचं आयुष्यं मार्गी लागेल "हीच एक आशा",... त्या काळात त्यांच्या मनांपासून झालेली फारकत लक्षातच येत नाही तिच्या... ही सुद्धा त्यातलीच गत का?

दारुड्या पतीपासून दूर जाण्याची संधी असतानाही "भलत्या आशे" पोटी तिनं समिधाबरोबर न जाण्याचा घेतलेला निर्णय... ह्यातलच का?

हा धागा मी जोडला.... पण हेच तुला अपेक्षित होतं का? की समीधानं लिहिलेल्या पुस्तकाला रिअ‍ॅक्शन (उत्तर नाही) म्हणून सरिताचं लिहिणं आहे?
<<सरिताला मुलांची बाजु कळली पण त्यांना सरिताची बाजु न कळताच हा दुरावा तसाच राहणार का? हा नविन प्रश्न तीला भेडसावु लागला. जे जे लोक हे पुस्तक वाचतील त्या लोकांच्या मनात आपली काय प्रतिमा होईल? या पुस्तकावर लोक जेव्हा अभिप्राय नोंदवतील तेव्हा आपली जी छी थु होईल ती वेगळीच? आणि माझ्या मी उभ्या केलेल्या या वृंदावनातल्या विश्वाच्या पण चिंधड्या होतील. आत्तापर्यंत ही कटुता आपल्या चौघांमध्येच होती पण आता ती माणसामाणसापर्यंत होईल. हे असं होऊन चालणार नाही. मला माझी बाजु मांडण्याचा हक्क आहे. काहितरी केले पाहिजे. पुढचा अख्खा दिवस तीचं डोकं ठणकतं होतं. आज बरेच लोक अभिनंदन करुन गेले पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल आणि वाचायची इच्छाही दाखवुन गेले. पण त्यांनी त्या गोष्टी वाचल्यातर आपल्याबद्दलचं त्यांचं मत काय होईल याचाच ती विचार करत होती.तीच्या मनावरचं मळभ काही जाईना.....>>
<<"समीधामधली क्षमाशीलता ही तीनं तीच्या आईकडुन घेतलेली होत.....>> हे कसं?

मला कुठेतरी सरिता व्यक्ती म्हणून कथेच्या शेवटी ह्यापेक्षा वरती उठलेली कथाबीजात जाणवतेय (तुझ्या त्या वरच्या वाक्यांमुळेच)... पण कथेत ती तितकी "उठावदार"पणे जाणवत नाहीये.

ए, हे ह्या कथेचं परिक्षण वगैरे नाही. एका सुंदर कथेचा मला झालेला बोध अन... त्यामागची भूमिका समजून घेणं आहे.... राग मानू नकोस, बाई.

@दाद.. धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्दल... तुमच्या ज्या शंका आहेत त्याचं हे छोटसं विश्लेषण...
बघा पटतय का?
<<<ही काही वाक्यं म्हणजे सरिताचं संपूर्णं पूर्वायुष्याचं सार आहे... असं मला वाटतय.>>>>>>

पहिली गोष्ट म्हणजे ही एक दीर्घ कथा आहे आणि त्यामुळेच आधी सरिता आणि मग समीधा यांना केंद्र्स्थानी ठेऊन ही कथा लिहिली आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावचे विविध पैलु दाखवण्यासाठी किंवा त्या नीट समजाव्या यासाठी प्रत्येक प्रसंगानंतर सरिताच्या मनात उठलेल्या सगळ्या विचारांचे डीटेल्स दिले आहेत.

<<<मुलांच्या भवितव्यासाठी अतोनात झटताना... हे आपण केलं तरच मुलांचं आयुष्यं मार्गी लागेल "हीच एक आशा",... त्या काळात त्यांच्या मनांपासून झालेली फारकत लक्षातच येत नाही तिच्या... ही सुद्धा त्यातलीच गत का?>> सरिता आपल्यावर पडलेल्या जबाबदार्‍यांच्या ओझ्यामध्ये, आपला संसार चालवताना आपण किती वेळ काम, करतोय हे विसरुन जात होती,नेहेमीच्या पगारामध्ये पाच जणांचं घर चालण अशक्य होतं म्हणुन ओव्हरटाईमचे ज्यादाचे पैसे ही त्या कुटुंबाची गरज होती. समीधा मोठि असल्याने तीच्यावर घर सोपवुन ती रोज ओव्हरटाईम करत होती. पण या काळात मुलांच्या हे लक्षातच येत नाही की ती ज्याप्रकारे काम करत होती, त्या प्रकारानं तीन काम नाही केलं तर त्यांच्या गरजा ती भागवु शकली नसती आणि कदाचित समीधासारखंच सायली आणि दिवाकरलाही शिक्षण सोडावं लागलं असतं. आणि जर बाप कमवत नसेल तर आईच हे कर्तव्यच नव्हे का? आणि आपणच हे केलं तरच आपल्या मुलांचं आयुष्य मार्गी लागेल हे खरच नाही का?

<<< दारुड्या पतीपासून दूर जाण्याची संधी असतानाही "भलत्या आशे" पोटी तिनं समिधाबरोबर न जाण्याचा घेतलेला निर्णय... ह्यातलच का?>> तीनं समीधाबरोबर न जाण्याचा निर्णय घेतलेला नव्हता, तीनं "त्या क्षणाला" त्यांच्या सोबत न जाण्याचा निर्णय घेतला होता. ( त्यानी इथे न राहणेच इष्ट असा विचार करुन दिवाकर आणि सायाला मी समुसोबत जायला सांगितले आणि मीही लवकरच येईन असा विश्वास दिला) तीनं आपल्या दारुड्या पतीला जो आधी तीचा प्रियकर होता आणि सरिताच्या प्रेमापोटी त्यानं आपल्या घरच्यांचा विरोध पत्करला होता, त्या प्रेमाखातर तीला त्याला एक शेवटची संधी द्यायची होती. जेव्हा तो कोलमडला होता तेव्हा त्याला एक सावरायची संधी द्यायची होती.

<<< पण हेच तुला अपेक्षित होतं का? की समीधानं लिहिलेल्या पुस्तकाला रिअ‍ॅक्शन (उत्तर नाही) म्हणून सरिताचं लिहिणं आहे?>>> सरिताचं लिहिणं हे फक्त एक शेवटचा पर्याय म्हणुन तीनं निवडला आहे. वेळोवेळी तीन आपल्या मुलांशी संपर्क करायचे अनेक प्रयत्न करुनही मुलं तीची बाजु समजुन घ्यायला तयार नव्हती आणि त्यात त्या पुस्तकाच्या निमित्त्याने तीला आपल्या मुलांच्या मनात काय आणि किती विष भरलेलं आहे हे कळल्यानंतर तीन तो एक पर्याय म्हणुन निवडला आहे. तीनं म्हंटलंही आहे ""खरी मला कळालेली समीधा" हे पुस्तक 'समीधा' या पुस्तकाचे प्रत्युत्तर किंवा उत्तरार्ध नसुन ती फक्त त्याची दुसरी न कळलेली बाजु आहे. पण याच्या नावातल्या समीधाचा रेफरन्स म्हणजे सुपरस्टार "समीधा" नसुन, अग्निकुंडात आहुती म्हणुन पडणारी समीधा आहे."

<<<<<"समीधामधली क्षमाशीलता ही तीनं तीच्या आईकडुन घेतलेली होत.....>> जेव्हा सायलींने "समीधा" लिहिलं त्यात तीनं लिहिलेले आहे ""ताई ही खुप क्षमाशील व्यक्ती म्हणुन प्रसिद्ध होती, चुकणार्‍याला नेहमीच एक संधी द्यावी असं ती नेहमीच सांगायची. पण तीच्या आयुष्यात एका व्यक्तीला ती कधीच माफ नाही करु शकली, आणि ती व्यक्ती म्हणजे आमची आई!" त्या रेफरन्सला धरुन "समीधामधली क्षमाशीलता ही तीनं तीच्या आईकडुन घेतलेली होती." हे वाक्य आहे.
बाकी मला वाटते तुम्ही कथा परत एकदा नीट वाचा म्हणजे ह्या खुलास्यांनंतर तुम्हाला ती जास्ती छान वाटेल. बाकी तुमची त्या गोष्टी समजुन घ्यायची इच्छा बघुन आनंद वाटला. बाकी चिडले वगैरे अजिबात नाही.... Happy

चिन्गुडे, सॉरी, मधल्या काळात इथे आलेच नाहीये. तुझ्या विश्लेषणासाठी धन्यवाद. ते वाचलच. अन तू म्हणतेयस तशी, कथा मी परत एकदा नीट वाचली.
तरीही मला जे प्रश्नं आहेत, त्यांची उत्तरं मिळत नाहीयेत. त्याचं कारण, कदाचित माझे प्रश्नंच मला नीट मांडता आले नाहीयेत.
कथा छानच आहे, वाचणार्‍याच्या मनोभूमीवर "अर्थं" अनेकदा अवलंबून असतो.
तुझ्या पुढील लेखनाला अनेक शुभेच्छा. लिहीत रहा.... खरच छान लिहिते आहेस.